इतिहासामध्ये रामदासांचे महत्व वाढविण्यासाठी त्यांच्या शिष्यांनी व अभिमान्यांनी अनेक भाकडकथा त्यांच्या चरित्रात घुसडून ठेवल्या आहेत.एखाद्या क्षेत्राचे महत्व वाढवण्याचे झाले तर लगेच त्या क्षेत्राचे "महात्म्य" प्रसिद्ध केले जाते,त्याचप्रमाणे पुर्वीच्या थोर पुरुषांच्या चरित्रातील अनेक गोष्टी जशाच्या तशाच फ़ारतर थोडा फ़ेरफ़ार करून रामदासाच्या चरित्रातही घुसडलेल्या आहेत.गुरुचरित्रात नरसिंह सरस्वतीच्या म्हणुन ज्या चमत्कारांच्या कथा दिलेल्या आहेत.त्यापैकी बर्याचशा रामदासाच्या चरित्रात आलेल्या आहेत.या रामदासी कथांबद्दल लिहिताना "न.र.फ़ाटक" यांनी आपल्या "रामदास व शिवाजी" या लेखात लिहिले आहे की "रामदासी चमत्काराच्या ज्या दुसर्या कथा आहेत, त्या पुर्वीच्या व नंतरच्या साधु संतांच्या चमत्काराशी जुळणार्या आहेत, इतकेच नव्हे तर काही कथा इतर साधू संतांच्या चरित्रातून घेऊन रामदासाच्या चरित्रात भरल्या आहेत की काय असा संशय येतो.आपल्या गुरु च्या जीवनकथेत कसलीही उणीव राहू नये व दुसरा कोणताही संत कोणत्याही बाजूने आपल्या गुरुपेक्षा श्रेष्ठ दिसू नये, असा संकल्प करून सांप्रदायिक लोक रामदासाची चरित्रे लिहावयास बसल्यानंतर चमत्काराचा तुटवडा कसा उत्पन्न होणार ? उदा.सरस्वती गंगाधरचे गुरुचरित्र आणि रामदासाचे चरित्र ही एकमेकांशी ताडून पाहिल्यास वरील विधानाची सत्यता अंतरंगात ठसेल.",न.र.फ़ाटक यांनी यापुढे अनेक उदाहरणे देऊन हे विधान स्पष्ट केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी विरक्त होऊन एकदा आपल्या तथाकथित गुरुच्या म्हणजे रामदासाच्या झोळीत आपले राज्य अर्पण केल्याचा कागद टाकून दिला आणी रामदासाने तो कागद शिवरायांना परत देऊन मला गोसाव्याला राज्य काय करावयाचे आहे.तुज राज्य चालव फ़क्त माझ्या स्वामित्वाची खूण म्हणून आपल्या राज्याचे निशाण भगवे कर म्हणजे झाले असे सांगितले.अशी कथा जी सांगितली जाते ती वरील मसाल्याचीच आहे.या कथेलाही ऐतिहासिक आधार नाही.न.र. फ़ाटक लिहितात की,"शत्रुला जिंकून राज्य अर्पण करण्याची कल्पना अतिशय प्राचिन काळापासून हिंदू वाड्मयात प्रचलित आहे.युधिष्ठिरने कौरवांच्या पराभवानंतर राज्य ब्राह्मणाला समर्पिल्याचे वर्णन महाभारतात आहे.वसिष्ठ ला रामचंद्रांनी राज्य दिल्याची कथा आहे.रजपुतांच्या इतिहासात" अशी उदाहरणे सापडतात.गोपीचंदाचा राज्यत्याग हा या कथापरंपरेतीलच एक दुवा आहे." शिवाय थोडीशी मिळालेली जहागीर ज्याला सोडून देता आली नाही,त्याने मिळालेले राज्य परत केले असे म्हणजे हा निव्वळ ढोंग आहे.
छत्रपती शिवरायांचे भगवे निशाण पाहून रामदासाच्या झोळीत राज्यार्पण करण्याची इच्छा रामदासाच्या भक्तांना झालेली दिसते.रामदास साधूपुरुष होते तेंव्हा सन्याश्याच्या भगव्या वस्त्राची जोड शिवरायांच्या भगव्या निशाणाशी घालून दिली की ठिक जमेल असे समजून ही कथा रामदासाच्या चरित्रात घुसडलेली दिसते.पण या चरित्रकारांनी जात विचार केलेला दिसत नाही.कारण रामदास हे संन्याशी नसल्याने ते इतर सन्यांश्यांसारखे भगवे वस्त्र न वापरता विटकरी रंगाचे वस्त्र वापरत होते जिथे स्वत:चे वस्त्रच भगवे नव्हते तिथे शिवरायांच्या झेंड्याला भगवे वस्त्र कोठून देणार ?.
बर्याच इतिहासकारांनी भेगवा झेंडा या विषयावर प्रकाश टाकलेला आहे.भगवा झेंडा शिवाजी महाराजांच्या अगोदरपासून असून तो शहाजीराजांनी सुरु केलेला आहे.हे मत कोणत्याही भटोबाला किंवा रामदासी भक्ताला खोडता आलेले नाही."रामदास आणि शिवरायांची भेट झालीच नाही असे बर्याच इतिहासकारांचे म्हणने आहे.तरीही थोडा वेळ मानले की शिवराय आणि रामदासांची भेट झाली तर ती १६७६ मध्येच.त्यावेळी शिवराज्याभिषेक होऊन दोन वर्षे झाली होती व त्याआधीच भगवा सर्वत्र फ़डकत होता.यावरून भगव्या झेंड्याचा संबंध रामदास स्वामींशी लावण्यात अडचण येत आहे." बरे रामदासांच्या सांगण्यावरून भगवा झेंडा शिवरायांनी घेतला असे मानल्यास पुर्वी राज्य कमविताना निशाण कोणते होते याचाही उल्लेख कोठे आढळत नाही, हे ध्यानात ठेवण्यासारखे आहे.
"छत्रपती शिवरायांचे वडील शहाजीराजे पराक्रमी होते.पाच पातशाहीत त्यांनी सन्मानामे नोकरी केली.मोठमोठ्या लढाया मारल्या.कर्नाटकात फ़ार मोठा मुलुख जिंकला व तंजावरचा पाया घातला.आपला अंमल जाहीर करण्याला व सैन्याच्या हालचालीला निशाणीची म्हणजे झेंड्याची गरज असते.त्यासाठी शहाजीराजांनी आपले निशाण भगवे केले."शेडगांवकरांच्या बखरीच्या छापिल पुस्तकात १३ व्या पानावर पुढील मजकूर आहे.दुसरी लढाई जाधवराव वजीर व राजे यांची जाहली नंतर शहाजीराजे हे कोथळा पर्वत चढोन शिखरावर फ़ौजेसुदा राजघाटाने चढून गेले,त्या दिवसापासून राजघाट असे अद्याप म्हणत आहेत.श्रीशंभु महादेव यांचे दर्शन करून शंभुचे भगवे वस्त्र प्रासादिक ते आम्हांस वंद्य हे जाणुन शहाजीराजे यांना त्याचक्षणी आपली लष्कराची ढाल भगवी व हत्तीवरील निशाण व घोड्यावरील डंका निशाण भगवे." त्याच दिवसापासुन तीच चाल आजपावेतो चालत आहे.परंतू पुर्वीचे मुळ ठिकाण उदेपुरास निशाण पाच रंगाचे तिकडे आहे हे सुर्यवंशी राणाजी म्हणोन तेच निशाण पुर्वीचे आहे.शहाजीराजे यांनी शंभुचे ठिकाणी तळीचे ठिकाणी तळ्याचे चिरेबंदी ताल बांधावयाचे काम सुरु केले.नंतर तेथुनच कुच दरकुच करून विजापुरास लढाई करीत करीत गेले.शके १५४८ क्षयनाम सवतसरे फ़सली सन १०३६ या साली तेथे जाऊन सुलतान महमदशहा पातशहा याची व शहाजीराजे या उभयतांचे भेटीचा समारंभ जाहला."
"शेडगांवकरांच्या बखरीतील काही गोष्टी चुकीच्या ठरतील.कालाची संगती त्यात कोठे कोठे बरोबर रहिलेली नाही.बखर लिहिणार्यास गोष्टी जशाजशा आठवल्या तसतशा त्याने त्या लिहिल्या आहेत.तथापि शेडगांवकरांचा राजघराण्याशी निकट संबंध होता. व निशाण बदलण्याची गोष्ट सर्व घराण्यांत घडून आल्याने तिची माहीती कर्णोपकर्णी सर्व भोसल्यांना असलीच पाहिजे.आपले निशाण पुर्वी कसले होते आणि ते पुढे काय कारणाने केंव्हा बदलले ही माहीती बापापासून मुलाला व आजापासून नातवाला मिळणे साहजीकच आहे.मुळचे निशाण उदेपुरचे पाचरंगी होते.पण शंभुप्रसादानंतर ते भगव्या रंगाचे शहाजीने केले असेही ही बखर सांगते."
शहाजी राजांना शंभु महादेवाची भक्ती विशेष होती असे दिसते.म्हणूनच त्यांनी आपल्या थोरल्या मुलाचे नाव शंभु ठेविले.यापुर्वी या घराण्यात शंभु हे नाव आढळत नाही.दुसरा पुत्र शिवाजी यांचेही नाव शिव हे शंभुमहादेवाचेच आहे. नामदार भास्करराव जाधव यांनी शहाजीराजांनी हे भगवे निशाण स्वीकारले तो प्रसंग किती आणीबाणीचा होता ते वर्णन करून संकटकाली कुलस्वामीचा प्रसाद म्हणूनच भगव्या निशाणाची उत्पत्ती झाली असे लिहिले आहे.पुढे ते लिहितात की "विजापुरच्या अदिलशहाची भेट सन १६२६ मध्ये झाली असे का.स.प.या. पान.४१० यावरून उघड होते. यापुर्वी थोडेच दिवस भगवे निशाण शहाजी राजांनी सुरु केले होते.म्हणून शहाजींच्या पुणे व सुपे जहागिरीत हे निशाण शिवजन्माच्या अगोदरच फ़डकू लागले होते.शिवाजी राजांस बालपणापासूनच भगव्याचा अभिमान वाटत होता व त्याच निशाणाखाली लढून त्यांनी व त्यांच्या सरदारांनी हिंदुपदपातशाही स्थापना केली."
"राज्याभिषेक करूण घेतांना छत्र,चामर,सुर्यपान,सिंहासन वगैरे राजचिन्हे धारण करावी लागली.त्यावेळी छत्रपतींच्या उच्च दर्जास साजेल असा जरीपटकाही स्वीकारला.पण भगवे निशाण हे आपल्या कुलस्वामींच्या स्मरणार्थ आहे व तय त्या कुलस्वामींच्या प्रसादाच्या दिवसापासून आपल्या घराण्याचा खरा उदय झाला ही गोष्ट स्मरून छत्रपती शिवाजी महाराजांनी भगवा झेंडाही चालू ठेवला.सध्या मोठया समारंभाच्या वेळी जरीपटका भगव्या झेंड्याबरोबरच मिरवण्यात येतो.कायम सतत फ़डकणारे निशाण भगवा झेंडाच आहे."
"तंजावरसही मुळापासून भगवा झेंडाच फ़डकतो ही गोष्ट विशेष विचार करण्यासारखीच आहे.भगवा रामदासांच्या आज्ञेने शिवछत्रपतींनी सुरु केला असता तर तो तंजावत मध्ये फ़डकणे संभवनीय नाही.तंजावर शिवरायांच्या अंमलात केंव्हाही नव्हते, व व्यंकोजीराजे हे आपल्या वडील भावाचा नेहमीच मत्सर करीत.म्हणून त्यांचे निशाण तंजावरास टिकणे शक्य नाही.यावरून भगवे निशाण शिवछत्रपतींनी सुरु केले नसले पाहिजे.बखरीत वर्णिल्याप्रमाणे शहाजी राजांनी आपले निशाण भगवे ठरविले.याच कारणाने त्यांच्या महाराष्ट्रातील व कर्नाटकातील मुलुखात तेच सर्वत्र प्रचारात आले.शिवाजी व व्यंकोजी या शहाजीराजांच्या मुलांनी त्याचा अभिमान धरून तेच पुढे चालविले.यासाठी हा भगवा झेंडा मराठेशाहीचे निशाण म्हणून शहाजीराजांच्या वेळेपासून सर्वत्र दिसून येत आहे."
यावरून शिवरायांच्या राज्यार्पणाची कथा आणि भगवा झेंडा यांच्या संबंधात रामदासांची किंमत काय आहे हे लगेच दिसून येते.
जय जिजाऊ || जय शिवराय