10 March 2014

अमर जाहले शंभुराजे !

शिवशाहीर जगदीशचंद्र पाटील
बुलढाणा
|| जय शिवराय | जय शंभुराजे | जयोस्तु मराठा | जयोस्तु महाराष्ट्र ||
              मराठा स्वराज्याचे दुसरे छत्रपती शंभुराजे म्हणजे जगातील इतिहासकारांचं न सुटलेलं कोडंच आहे. शंभुराजे या महानायकाने हिंदुस्तानातील हजारो साहित्यिकांना, कादंबरीकारांना, कथाकारांना, नाटककारांना, चित्रपट निर्मात्यांना वेगवेगळ्या प्रकारे खाद्य पुरविले. बुद्धीच्या अनेक ठेकेदारांनी आपापल्या पद्धतीने शंभुराजांचे चरित्र लोकांसमोर मांडले.ते सुद्धा बर्याच प्रमाणात विक्रुत चरित्र. शंभुराजांच्या विषयी उणीउरी दोनशे वर्षे गैरसमजांचे जे पिक आले, त्याला कारणीभूत होती ती मल्हार रामराव चिटणीसची बखर; परंतू कै.वा.सी.बेंद्रे यांनी चाळीस वर्षे कष्ट घेऊन शंभुचरित्राचा खरा इतिहास उभा केला आणि जाज्वल्य इतिहासातून अनेक लेखकांना दिव्य द्रुष्टी दिली. त्यामध्ये शिवाजी सावंत, डॉ.जयसिंगराव पवार, विश्वास पाटील, डॉ.कमल गोखले, विजय देशमुख यांसारख्या विद्वानांनी खरे आणि भव्य दिव्य असे  शंभुराजांचे चरित्र जनमानसांसमोर आणले. शंभुराजांनी वयाच्या नवव्या वर्षापासून राजकारणाचे धडे घेतले. हिंदी व संस्क्रुतमध्ये कमी वयात चार ग्रंथ लिहिणारे शंभुराजे एकमेव साहित्यिक होते. मोअज्जमच्या छावणीत शिवरायांनी त्यांना दोन वर्ष पाठविले होते. वयाच्या चौदाव्या वर्षी ते राजकारभारात लक्ष घालू लागले आणि वयाच्या सतराव्या वर्षी रायगडावर युवराज म्हणून घोषित झाले.एकोणीसाव्या वर्षी पन्हाळा, श्रुंगारपूर आणि प्रभावलीचे सरसुभेदार म्हणून नेमले गेले.
        छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसार ते दिलेरखानाच्या गोटात गेले आणि स्वराज्यावर होणारे मोघली आक्रमण काही काळ थोपवून धरले. या वेळेस छत्रपती शिवराय दक्षिण मोहिमेवर गेलेले होते. शंभुराजे जालन्याकडील लढाईवर गेले असता, थोरले महाराज निधन पावले. महाराजांच्या निधनाचे व्रुत्त आणि राजाराम महाराजांना गादीवर बसविण्याचे कारस्थान त्यांना पन्हाळ्यावर कळले. त्यानंतर त्यांनी पन्हाळ्यावरूनच कारभार पाहिला. या ठिकाणी शेकडो मराठे त्यांना येऊन मिळाले. रायगडावरील कट करणार्यां प्रधानमंत्र्यांनी शंभुराजांना अटक करण्याचा प्रयत्न केला; परंतू तो त्यांनी हाणून पाडला व स्वत: रायगडावर दाखल झाले. शिवरायांच्या काही मंत्र्यांनी विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रकार समजताच सर्वांना त्यांनी देहान्त शासन केले. या शिक्षेमध्ये बाळाजी आवजी चिटणीसचा समावेश होता. बाळाजी हा मल्हार रामराव चिटणीसचा खापरपणजोबा होता. आपल्या खापर पणजोबाला शंभूराजांनी हत्तीच्या पायाखाली दिले होते. म्हणून त्यांचा सूड घेण्यासाठी तब्बल १२२ वर्षांनी मल्हार रामरावाने शंभूराजांच्या चरित्राची बखर लिहून त्यांना बदनाम करण्याचे कारस्थान केले. पण असल्या गोष्टी इतिहासाला मानवत नसतात. शंभुराजे हे साधुसंतांचा आदर करणारे होते. छत्रपती शिवरायांच्या अलौकिक व्यक्तिमत्वातून हे शंभुतेज प्रकटले होते. आपल्या अचाट पराक्रमाने शंभुराजांनी मराठा स्वराज्याच्या सीमारेषा वर्धिष्णू करीत या तेजाची दाहकता सिद्ध केली होती. शिवरायांच्या निधनानंतर अवघं मराठा स्वराज्य नेस्तनाबूत करण्याच्या प्रचंड महत्वकांक्षेने सात लाखांच्या अफ़ाट फ़ौजेसह दक्षिणेत उतरलेल्या औरंगजेबाला नामोहरण करून सोडणं ही काही समान्य बाब नव्हती. या बलाढ्य मोगली सल्तनतीशिवाय जंजिरेकर सिद्धी, पोर्तुगीज आणि इंग्रजांसारखे शत्रूदेखील स्वराज्याचे लचके तोडायला एकवटून उभे झालेले होते. हे कमी पडावेत म्हणुन की काय आमच्यातलेही हिंदू विरोधकही तलवार उपसून सज्ज उभे होतेच. या सर्व आघाड्यांवर मराठा स्वराज्याच्या संवर्धनासाठी आणि संरक्षणासाठी सांडलेली संभाजी राजांची एकाकी झुंज, ही निर्विवादपणे त्यांच्या महानतेची आणि पराक्रमाची यथार्थ सक्ष देऊन जाते.उण्यापुर्या नऊ वर्षाच्या अखंड संघार्षात सुमारे सव्वाशे लढाया जिंकणारे आणि एकही तह न करणारे संभाजीराजे अलौकिक आणि असामान्य होते. अशा कडव्या धेयवादासाठी आणि अस्मितेसाठी काळीज आणि मनगट संभाजीराजांचेच हवे.येर्यागबाळ्याचे ते काम नव्हे.
           वयाच्या अवघ्या बत्तीसाव्या वर्षीच संभाजीराजांनी स्वराज्यकार्यी हौतात्म्य पत्करले. अटकेत असताना संभाजीराजांच्या दीर्घाकाळ यमयातना सुरु होत्या.तोज एक एक अवयव तोडल्या जाऊन त्यांच्या संपुर्ण अंगाची साल सोलून काढण्याच आली.डोळे काढून जीभ कापल्या गेली. पायापासून ते मस्तकापर्यंत अवघ्या देहाची खांडॊळी करून संभाजीराजांचे मस्तक भाल्याच्या टोकावर रोवण्यात आले. देह खंडित झाला तरीही शंभुराजांचा स्वाभिमान आणि राष्ट्रनिष्ठा अभेदच राहिली. कारण शिवशाहीची हीच उदात्त शिकवण होती. छत्रपती शिवरायांच्या आदर्श पावलांवर पाऊल टाकीत या सिंहपुत्राने बलिदानाची, त्यागाची एक नवी परंपरा राष्ट्राला समर्पित केली. जिला देशातच काय पण जगाच्या इतिहासात तोड नाही. 
रणधुरंदर महापराक्रमी शंभुराजांना मानाच मुजरा... जय शंभुराजे

9 March 2014

शाहूछत्रपती आणि तथाकथित अनुयायी

सातशे संस्थानी अशी शक्ती । एक कोल्हापूरी शाहूमुर्ती ।
अलौकीक विलायतेत किर्ती ॥
जो निद्रिस्त महाराष्ट्राला । जागे करण्याला ज्ञानरवी झाला ।
शाहू छत्रपती सत्य आधार । मानवी जाणविले अधिकार ।
म्हणुन शाहू प्रभू शिव अवतार ॥
राजर्षी शाहू महाराजांनी सत्ता आणि संपत्ती ही एक सामाजिक द्रुष्ट्या नैतिक जबाबदारी आणि ठेव समजून आपले आयुष्य खर्ची घातले. त्यांच्या स्वभावातील मानवतेचे दर्शन त्यांच्या जीवनकार्यातून प्रेतीत होते. एकवेळ राज्य गेले तरी चालेल पण बहुजन उद्धाराचे कार्य मी कदापि सोडणार नाही. असे म्हणणार्या शाहू छत्रपतींची जयंती एखाद्या सण-उत्सवासारखी साजरी केली पाहिजे असा आर्त संदेश देऊन युगप्रवर्तक बाबासाहेब आंबेडकर यांनी शाहू महाराजांचं स्थान स्पष्ट केलं. परंतू आज बहुजन समाजामध्ये आणि बहुजन चळवळ-संघटनेत सुद्धा मनुवादी निर्माण होत आहेत. याच तथाकथित बहुजनवादी संघटनांनी तर शाहू महाराजांचे नावच घेणं सोडून दिले आहे. काही तथाकथित पुरोगामी मंडळी तर फ़ुले-शाहू-आंबेडकर चळवळीला फ़क्त फ़ुले-आंबेडकर चळवळ संबोधून छत्रपती शाहू महाराजांना संपविण्याचा विडा उचलत आहेत. यांचे शाहूकार्य संपले आहे आता यांना शाहू महाराजांची गरज नाही असे यांचा समज आहे. याच बहुजनवादी संघटनांना छत्रपती शाहू राजांच्या बहुजनवादी कार्याचा विसर पडलेला आहे. गादी सोडेन पण बहुजन उद्धारांचे कार्य सोडणार नाही असे म्हणनार्या शाहू छत्रपतींचा समाजाला पडलेला विसर, त्यांचे कार्य घरोघरी न पोहचण्याचे कारण व त्यांचे बहुजनवादी कार्य याचा विचार करणं गरजेचं आहे.
आरक्षणाचे जनक
२६ जुलै १९०२ रोजी युरोप दौर्यावर असताना कोल्हापूरात छत्रपती शाहू महाराजांनी प्रसिद्ध केलेला जाहीरनामा म्हणजे बहुजन समाजासाठी आजवर कोणीही न केलेले उपकार होय. तो असा की सरकारी जागांमध्ये रिकाम्या झालेल्या जागांपैकी शेकडा ५० जागा मागासलेल्या लोकांस भराव्या. ज्या कार्यालयामध्ये मागासलेल्या वर्गाचे प्रमाण शेकडा ५० पेक्षाही कमी असेल तर पुढची नेमणूक ह्या वर्गातील व्यक्तीची करावी. असा जाहीरणामा मागासलेल्यांना सन्मानाने प्रशासनात आणून त्यांच्या गुणांना योग्य वाव देणारा आहे, असे कोणाला का वाटत नाही ? जर छत्रपती शाहू राजे मागासवर्गीयांना हल्ली कळले असते तर त्यांनी किमान शाहूंच्या विचारांचे अनुकरण तरी केले असते. पण हाच तो बहुजन समाज ज्यांच्यासाठी छत्रपती शाहू महाराज राज्य सोडायला तयार होते तोच समाज आपमतलबी बनताना पाहून कीव करावीसी वाटते. विचारांचे अनुकरण करायचे लांबच पण यांना राजे शाहूंचे नाव घ्यायची पण अडचण वाटू लागलीये ! 
          बहुजनांसाठी मुलांसाठी उभारलेली वसतीग्रुहे १८ एप्रिल १९०१ मध्ये शिक्षणात मागासलेल्या खेड्यापाड्यातील शेकडो वर्षापासून अज्ञानात पिचत पडलेल्या बहुजन मुलांसाठी छत्रपती शाहूंनी वसतीग्रुहाची स्थापना "व्हिक्टोरिया मराठा बोर्डींग" च्या नावे कोल्हापूरात प्रथम केली. वसतीग्रुहाला मराठा नाव असलं किंवा संस्थानही मराठ्यांचं समजलं जात असलं तरी फ़क्त मराठाच असा त्याचा अर्थ नाही. छत्रपती शाहूंच्या वसतीग्रुहात मुस्लिम, शिंपी, कोळी, माळी, गवळी असा बहुजन विद्यार्थ्यांचा भरणा होता. सोबतच १९०१ मध्ये जैन, लिंगायत, मुस्लिम, अस्प्रुश्य, सोनार, शिंपी, पांचाळ, गौड, सारस्वत, इंडियन ख्रिश्चन, वैश्य, ढोर, चांभार,सुतार, नाभिज, सोमवंशीय, आर्य, क्षत्रिय, कोष्टी अशी विविध जातीधर्माची वसतीग्रुहे छत्रपती शाहू महाराजांनी स्थापन करून देखील बहुजनांच्या जातीतील किती टक्के बहुजन छत्रपती शाहू महाराजांची जयंती साजरी करतात याचे चिंतन होणे गरजेचे आहे.
अस्प्रुष्याच्या पंगतीत बसून जेवणारे शाहू :-
        शाहू महाराज हे केवळ मराठाच नव्हे तर सार्या बहुजन समाजात मिळून मिसळून राहत असे. अस्प्रुष्याच्या पंगतीत बसूण जेवन घॆत.त्यांच्या घरचे, त्यांच्या हातचे पाणी पीत असत. शाहू महाराजांनी त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था करून नोकर्यांमध्ये आरक्षण दिले. ते एवढ्यावरही थांबले नाहीत तर महाराजांनी दुर्गम डोंगराळ भागात राहणार्या आदिवासी लोकांची सक्षम गाठीभेटी घॆतल्या व त्यांच्या अडीअडणींचे निवारणही केले. महारोग्यांची परिस्थिती पाहून राजांना दुख: होत असे. म्हणुन त्यांनी महारोग्यांसाठी दवाखाना सुरु केला. ते महारोग्याच्या जवळ बसून त्यांच्या प्रक्रुतीची, त्यांना मिळत असलेल्या औषदाची चौकशी करत असत. एवढेच नव्हे तर रोगमुक्त होणार्या रोग्यांना पोटापाण्याची व्यवस्था देखील करीत होते. राजर्षी शाहू महाराज लोकराजा या नावाने प्रसिद्ध झाले, त्यांना आपल्या रयतेची विशेष करून अस्प्रुष्य समाजाची जास्त काळजी वाटत असे, कारण अस्प्रुष्य समाजात त्यांची काळजी घॆणारा, त्यांच्या वेदना जाणणारा, त्यांना बरोबर घेऊन जाणारा कोणी दमदार पुढारी दिसून येत नसे.
छत्रपती शाहू आणि मुस्लिम समाज
         शाहू महाराज यांचे मुस्लिम प्रेम कदाचित मुस्लिम समाजात येवू दिले नाही वा मुस्लिम समाजासही समजले नाही. निदान मुस्लिम समाजाने यावर लक्ष देणे अत्यंत महत्वाचे आहे. छत्रपती शिवरायांचा सर्वधर्मसमभाव हा छत्रपती शाहू महाराजांनी जोपासला.जगाच्या इतिहासात मुस्लिम समाजासाठीही प्रेम करणार्या लोकराजाने १९०६ मध्ये स्वत:च्या पुढाकाराने प्रमुख मुस्लिम मंडळांची सभा बोलावून मोहोमेडन एज्युकेशन सोसायटी ची स्थापना करून मुस्लिम बोर्डींग सुरु केले. संस्थानातील दर्गे, मशिदी इ.धार्मिक स्थळांच्या खर्चातून उरलेला पैसा मुस्लिम समाजासाठी गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर खर्च केला. या सोसायटीचे छत्रपती शाहू महाराज खुद्द पदसिद्ध अध्यक्ष होते. इतिहासात मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक विकासासाठी प्रयत्न करणारे छत्रपती शाहू महाराज कदाचित पहिलेच असू शकतील. मुस्लिमांना शिक्षणाची गोडी लागावी म्हणून शाहू महाराजांनी जोरदार प्रयत्न केले. मात्र मुस्लिम समाजाने या संधीचा फ़ायदा घेतला नाही. शिक्षण क्षेत्रात मुस्लिम समाज थंड राहिल्यावरही छत्रपती शाहू राजे मात्र थंड न बसता या समाजातील शिक्षणाची आवड असणार्या विद्यार्थ्यांना आपल्या व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग मध्ये प्रवेश देऊन मुस्लिम शिक्षणास चालना दिली.
         मुस्लिम बोर्डिंग साठी चौफ़ाळाच्या माळावर पंचवीस हजार चौरस फ़ुटाची मोकळी जागा व इमारत बांधणीस ५५०० रु.ची भरगोस देणगी दिली व संस्थानच्या जंगलातून मोफ़त सागवान लाकूड दिले. मुस्लिम समाजातील मुलांनी शिकावे यासाठी भरभरून दान छत्रपती शाहू महाराजांनी दिले. मुस्लिम समाजाच्या उत्कर्षासाठी प्रयत्न करणार्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याचा सन्मान करणे प्रत्येक मुस्लिमांचे कर्तव्य नव्हे काय ? उर्दू शाळांमधून छत्रपती शाहू महाराजांचे कार्य जिवंत ठेवण्यास मुस्लिम समाजाने छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याचा अभ्यास करून हे कार्य जोमाने पुढे नेणे आता आवश्यक बनले आहे.
छत्रपती शाहूं विषयी खोटे प्रेम
           छत्रपती शाहूंचा गौरव करताना यशवंतराव मोहिते म्हणतात की "राजर्षी शाहू महाराजांना जातिभेदाच्या चौकटीत सर्व जातींना सहिष्णुतेने सामावून घ्यावयाचे नव्हते, तर ती जातिभेदाची चौकटच मोडावयाची होती. म्हणुन शाहू महाराज महाराष्ट्राचे गौतम बुद्ध होत."
         हल्ली आमच्या महापुरुषांचा वापर फ़क्त सत्तेसाठी आणि राजकीय समारंभापुरताच केला जातो. जसा हिंदुत्ववाद्यांनी शिवरायांच्या नावाचं भांडवल केलं. हिंदुत्ववाद्यांची दुकानदारी शिवाजी या एका नावाच्या पलीकडे जात नाही. संपुर्ण भारतात कोणतेही आंदोलन करताना श्री रामा चे नाव घेतात पण महाराष्ट्रात शिवरायांच्या नावाशिवाय काहीही चालत नाही हे या मंडळींना चांगलंच ठाऊक आहे. हे शाहूंच्या बाबतीत आहे. पण छत्रपती शाहू महाराजांच्या नावाचा फ़क्त खोटा आदर करणारे फ़ुले-आंबेडकरांचा तरी वारसा काय चालवणार ? डॉ. बाबासाहेबांच्या जीवनातील एक सच्चा मित्र म्हणजे राजर्षी शाहू महाराज. म्हणून तर बाबासाहेब म्हणतात "छत्रपती शाहू महाराजांसारखा सखा आम्हाला पुर्वी लाभला नव्हता व पुढे लाभेल की नाही याबद्दल मला शंका आहे."
           मुकनायक व्रुत्तपत्रामागे अर्थसहाय्य उभे करणे, माणगांव परिषदेत बाबासाहेबांना भारताचे पुढारी म्हणून गौरव करणे, सोनतळी कॅंम्पवर   बाबासाहेबांच्या  जेवणाचे  निमंत्रण  स्विकारून  कोल्हापूरी जरीपटक्याचा  भावपुर्ण  आहेर करणे, २६ जून १९२० ला बाबासाहेबांनी "मुकनायक" चा विशेषांक  काढून छत्रपती शाहू महाराजांबद्दल क्रुतज्ञता व्यक्त करणे ह्या सगळ्या ठळक घटनेवरून आपण लक्षात घ्यावे की महात्मा फ़ुलें मुळे शाहू महाराज तर शाहू महाराजांमुळेच डॉ.बाबासाहेब!या त्रिमुर्तींचा वसा आणि वारसा एकच होता.
          सामाजिक चळवळीत कार्य करणार्या बहुजनवाद्यांनी ही गोष्ट कायमस्वरुपी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. हिंदुत्ववादी तसेच टिळक कंपुतील मंडळी शाहू द्वेष्टी आहेत. यांना शाहू राजांच्या कार्याचे किंवा जयंतीचे काही देणे घेणे नाही. छत्रपती शाहूंना सुद्धा टिळक कंपुच्या प्रवाहाशी सोयरसुतक नव्हते. शाहू महाराज लढले ते ब्राह्मणेत्तर समाजाच्या उत्कर्षासाठी, बहुजन समाजासाठी! निदान बहुजनवाद्यांनी तरी शाहूंशी बेइमानी करू नये, अन्यथा याचे पातक भोगावे लागेल."शाहू महाराजांचा जन्मदिवस बहुजनांनी सणाप्रमाणे साजरा करावा असे ठासून सांगणार्या बाबासाहेबांचा तरी आदर करावा". राजर्षी शाहू महाराज हे फ़ुले आणि आंबेडकर यांना जोडणारा दुवा आहे शाहू महाराजांशिवाय फ़ुले-शाहू-आंबेडकर चळवळ पुर्णत्वास येणार नाही हे तरी लक्षात घ्यावे.