17 April 2014

"अब्राह्मणी" इतिहासकार : कॉम्रेड शरद पाटील

दिनेश पाटील
संपर्क : ९६२३८५८१०४
        स्वातंत्र्य समता आणि मित्रता ही त्रयी फ़्रेंच समाजक्रांतीने प्रथम प्रवर्तित केली नसून नितींच्या वैराजाने केलेली आहे. तिची समतावादी परंपरा "अब्राह्मणी" परंपरा म्हणून वैदिक काळापासून ओळखली जाऊ लागली. असा क्रांतिकारक सिद्धांत मांडून भारतीय इतिहासातील "अब्राह्मणी" इतिहास आणि ज्ञानपरंपरेची सशक्त पुराव्यानिशी पुनर्मांडणी कॉम्रेड शरद पाटील यांनी केली. म्हणूनच अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचा पहिला "इतिहासकार वा.सी.बेंद्रे पुरस्कार" त्यांना जाहीर झाला, ही महत्वाची घटना आहे. इतिहास संशोधक वा. सी. बेंद्रेंनी अब्राह्मणी इतिहास लेखणाचा प्रवाह मराठ्यांच्या इतिहास लेखणात विकसीत केला. त्यामुळेच इतिहासाची नव्याने मांडणी करणार्या संशोधकास हा पुरस्कार दिला गेला. या पुरस्काराच्या निमित्ताने त्यांच्या संशोधनाला ॲकॅडेमिक मान्यता मिळत आहे.
            गेली ४० वर्ष एक "जीवनदायी कार्यकर्ता" म्हणून संशोधन आणि चळवळ या दोन्ही क्षेत्रात अखंडपणे कार्यरत असणार्या शरद पाटील यांना अवहेलना, द्वेष आणि मनहानी सहन करत अत्यंत एकाकी प्रवास करावा लागला. हा प्रवास कोणत्याही वैचारिक तडजोडीशिवाय झाला असल्याने एक "जैविक विचारवंत" ही त्यांची ओळख कोणालाही पुसता येणार नाही.
इतिहासाची पुनर्मांडणी करताना त्यांनी मांडलेली भुमिका, लावलेला इतिहासाचा अन्वयार्थ याबाबत नेहमीच अभ्यासकांमध्ये मतभेद आढळतात. भविष्यातही ते निर्माण होतील. परंतू इतिहासाच्या अभ्यासाची त्यांची अन्वेषण पद्धत, त्यांचे सिद्धांत समग्र समाजाचा इतिहास समजून घॆऊ इच्छिणार्यांना सतत प्रेरक शक्ती देणारे आहेत. भुतकाळाच्या घनदाट अरण्यात दडलेल्या अनेक प्रश्नांची त्यांनी दिलेली उत्तरे नवी द्रुष्टी आणि आत्मविश्वास देतात.
          राम आणि क्रुष्ण यांची भारताच्या इतिहासातील भुमिका, भारतातील आद्य स्त्रीसत्ताक गणराज्याचे ऐतिहासिक महत्व असे अनेक मुलभुत विषय त्यांनी सैद्धांतिक मांडणीत केंद्रस्थानी आणले. इ.स.१९८२ मध्ये रणजित गुहा यांच्या नेत्रुत्वाखाली "वंचितांचे" भारताच्या इतिहासातील योगदान मांडणारा "सबर्ल्टन प्रकल्प" सुरु झाला. त्याअगोदर शरद पाटील यांनी वंचित / हीन मानल्या गेलेल्या जात समुह तसेच स्त्रियांच्या योगदानाचे महत्व अधोरेखित करनार्या अब्राह्मणी परंपरेची सैद्धांतिक मांडणी सुरु केली होती हे महत्वाचे.
         इतिहासाला बुद्ध, दिग्नाग, धर्मकीर्ती ते फ़ुले आंबेडकरांचे असणारे योगदान सैद्धांतिक पातळीवर मांडण्याचा बहुदा पहिला यशस्वी प्रयत्न त्यांनी केला. तर फ़ुले आणि आंबेडकर हे दार्शनिक होते हे त्यांनीच सिद्ध केले. भारतीय इतिहासातील अब्राह्मणी ज्ञानशाखेची असणारी भक्कम परंपरा हजारो वर्षाचा भारताचा इतिहास नव्या परिप्रेक्ष्यात मांडून त्यांनी पुढे आणली. "दासशुद्रांची गुलामगिरी", जातिव्यवस्थाक सामंती सेवकत्व, जात्यंतक भांडवलदारी लोकशाही क्रांती व तिची समाजवादी पुर्ती व प्रिमिटिव्ह कम्युनिझम, मात्रुसत्ता-स्त्रीसत्ता आणि भारतीय समाजवादी या चार ग्रंथामधून त्यांनी हा महाप्रकल्प साकार केला.
           शिवराय-संभाजींची सर्वाधिक चिकित्सा धर्मकेंद्री झाली आहे. ती तशी का झाली हे नव्याने सांगण्याची गरज नाही; परंतू या चिकित्सेतून शिवराय-संभाजींच्या ऐतिहासिक योगदानाला योग्य न्याय मिळाला नाही. शरद पाटील यांनी त्यांच्या "शिवाजीच्या हिंदवी स्वराज्याचे खरे शत्रु कोण-महंमदी की ब्राह्मणी ?" या बहुचर्चित मौलिक ग्रंथात जातकेंद्री अन्वेषन पद्धतीद्वारे या दोघांचे समतावादी समाज उभारणीतील मौलिक योगदान पुढे आणले. या पुस्तकाने अनेक प्रश्न उपस्थित करून महाराष्ट्रातील प्रस्थापित इतिहास लेखनासमोर कडवे आव्हान उभे केले. महाराष्ट्राची अस्मिता असनार्या शिवरायांच्या वस्तुनिष्ठ आकलनाच्या अनेक शक्यता त्यातून स्पष्ट झाल्या. हे पुस्तक म्हणजे कॉम्रेड शरद पाटील यांचे महाराष्ट्राच्या इतिहासाला असणारे अद्वितीय योगदान आहे. याबरोबरच "अब्राह्मणी साहित्याचे सौंदर्यशास्त्र" या ग्रंथाने संस्क्रुतीतील  सौंदर्यशास्त्राचे स्थान मराठी साहित्य आणि संस्क्रुतीच्या संदर्भात अधोरेखित केले.
         मराठी साहित्याला स्वत:चे स्वतंत्र सौंदर्यशास्त्र नाही. म्हणूनच हे सौंदर्यशास्त्र दिग्नाग आणि धर्मकीर्ती यांसारख्या बौद्ध दार्शनिकांच्या सौंदर्यशास्त्रीय योगदानाशी नाते जोडत दलित अदिवासी साहित्यातील समन्वयातून उभारण्याचा आग्रह त्यांनी धरला.संस्क्रुत, प्राच्यविद्या  आणि तत्वज्ञान या तिन्ही शाखांचा आणि सर्वाहारांच्या चळवळीतील रस्त्यावरचा कार्यकर्ता म्हणून त्यांनी घेतलेला अनुभव यामुळे त्यांच्यातील इतिहास संशॊधकाची द्रुष्टी आधिक व्यापक, मुलगामी झाली आहे. त्यांची ही द्रुष्टी निखळ भुमिकेतून स्वीकारल्यास इतिहासाच्या आकलनाच्या प्रस्थापित मर्यादा आणि सांस्क्रुतीक राजकारणाचे दबाव झुगारून संशोधन करण्यासाठी आवश्यक आत्मविश्वास आणि मनोधैर्य अभ्यासकांना मिळेल. ज्याची उद्याच्या काळात अनिवार्य गरज आहे.
         शरद पाटील यांच्या संशोधनाची तुलना "अल्जेरीअन मनोविश्लेषक" आणि "काळ्यांच्या" आत्मसन्मानाच्या लढ्यातील जीवनदायी कार्यकर्ता फ़्रांन्झ फ़ॅननशी करता येईल. त्यांच्या "वसाहतवादाचे मानसशास्त्र" मांडनार्या "द रेचेड ऑफ़ द अर्थ" या १९६३ मधील महान साहित्य क्रुतीने तुलनात्मक वाचन केल्यास शरद पाटील यांच्या योगदानाचे महत्व अधिक प्रकर्षाने जाणवते. त्यांनी वर्गजातीस्त्रीदास्यातांच्या लढ्यांना अग्रकमाने समजावून घेत माफ़ुआ अन्वेषण पद्धतीने वासाहतिक काळ आणि एकुणच भारतीय इतिहास याकडे पारंपारिक मार्क्सवादी अभ्यासकापेक्षा वेगळ्या आणि बहुपर्यायी द्रुष्टीने पाहिले. याचे कारण असे की फ़क्त मार्क्सवाद, फ़ुलेवाद किंवा आंबेडकरावाद हे द्रुष्टीकोन स्वतंत्रपणे वापरल्यामुळे  समाजाच्या आकलनावर मर्यादा येतात. त्याऐवजी मार्क्स, फ़ुले आणि आंबेडकरांचा समन्वय साधणारी बहुप्रवाही "मार्क्सवाद - फ़ुले - आंबेडकरवाद" ही अब्राह्मणी अन्वेषणपद्धती आधिक व्यापक आणि सर्वस्पर्शी असल्याने या पद्धतीची अनिवार्यता शरद पाटील सातत्याने मांडत आले आहेत. या अन्वेषणपद्धतीमध्ये ते ब्राह्मणी/अब्राह्मणी या कोटीक्रमांचा वापर करतात.हा कोटीक्रम जातीवाचक नसून ज्ञानपरंपरावाचक आहे.
कॉम्रेड शरद पाटील यांची ग्रंथसंपदा : 
            कॉ. शरद पाटील यांनी दास - शुद्रांची गुलामगिरी, खंड एक भाग १ व दोन इंग्रजी व मराठी तसेच रामायण-महाभारतातील वर्ण संघर्ष खंड १ भाग , जाती व्यवस्थापक सामंती सेवकतत्त्व हे इंग्रजी व मराठी खंड २ भाग १ तसेच शिवाजीच्या हिंदवी स्वराज्याचे खरे शत्रू कोण, खंड भाग २  जात्यंतक भांडवलदारी लोकशाही क्रांती व तिची समाजवादी कृती, मराठी व हिंदी, खंड  तर खंड ४  मध्ये प्रिमिटिव्ह कम्युनिझम मातृसत्ता-स्त्रीसत्ता आणि भारतीय समाजवाद असे चार खंड लिहिले आहेत. इतर पुस्तकांमध्ये अब्राह्मणी साहित्याचे सौंदर्यशास्त्र, मार्क्‍सवाद-फुले- आंबेडकरवाद, भारतीय तत्त्वज्ञान व नास्तिक मत बुध्द-भारतीय इतिहासातील लोकशाही, स्वातंत्र्य व समतेचा अग्निस्रोत, पश्चिम भारतीय स्वायत्त आदिवासी राज्याची भूमिका, स्त्री शूद्रांच्या स्वराज्याचा राजा, शोध, मूलनिवासींचा की शूद्र वर्णाचा जात्यंतक समतेचा? नामांतर-औरंगाबाद आणि पुण्याचे, बुध्द, भिक्खू, आनंद, धम्म-आनंद-वधू विशाखा यांचा समावेश आहे.

13 April 2014

इतिहासावरील विषाणू दाखवणारा लेखक

             आपल्या देशाचा इतिहास म्हणजे गुलामगिरीचा इतिहास होय. हिंदुस्तान आणि महाराष्ट्राचा विचार केला तर बाहेरून आलेल्या आर्यांच्या टोळ्यांनी इथल्या मुळ रहिवाशी महारट्ठ यांना जिंकुन इथला मुळ इतिहास मिटवण्याचे काम या टोळ्यांनी केले. राजमाता जिजाऊ, विश्ववंद्य शिवराय यांनी गुलामगिरीचा इतिहास बदलला आणि स्वराज्याची स्थापना केली.नंतर फ़ुले, शाहू, आंबेडकरांनी [यामध्ये केळुस्कर गुरुजी आणि जवळकर यांचेही मोलाचे योगदान आहे.] आपल्या इतिहासात घुसखोरी करणार्या विषाणूंना नष्ट केले व स्वत: इतिहास समोर आणला. परंतू [अजुनही] आपल्या इतिहासात विषाणू लपून बसले आहेत हे विषाणू दाखविण्याचे काम डॉ.बालाजी जाधव हे करीत आहेत.
डॉ.बालाजी जाधव समिक्षक, विचारवंत आणि नव्या पिढीचे लेखक आहे. मराठा सेवा संघाची मराठवाडा विभागाची त्यांच्याकडे जबाबदारी आहे. महाराष्ट्रभर त्यांचे व्याख्यानाचे कार्यक्रम होत असतात. त्यांचे कार्यक्षेत्र मोठे आहे. शिवाय ते उच्चशिक्षित बी. एच. एम. एस डॉक्टर आहेत. सध्या एम. डी. चेही शिक्षण चालू आहे. तरूण वयात अल्पावधीतच त्यांनी हे यश प्राप्त केलं आहे. समाजसेवेचे व्रुत्त घॆऊन ते काम करत आहेत. त्यांच्याशी संवाद साधताना त्यांनी मराठ्यांना संघटीत होण्याचे आवाहन केले आहे. त्यांची घेतलेली ही मुलाखत.
खंरत्नाकर डागळे : आपण लेखक म्हणून परिचीत आहात त्याच बरोबर मराठा सेवा संघाचे कार्य ही चालू आहे. या विचाराकडे आपण कसे वळलात ?
डॉ.जाधव साहेब : तसा मी कट्टर शिवसैनिक होतो. घरातही हिंदुत्ववादी वातावरण. माझ्या घरात बाळासाहेब ठाकरे यांचे फ़ोटो असायचे. सामना या दैनिकातील कात्रणं मी काढून ठेवत. ते आजही माझ्याकडे आहेत.मी कट्टर हिंदुत्ववादी होतो.आज अगदी या विरोधी आहे.
रत्नाकर खंडागळे : मग परिवर्तनवादी विचाराकडे कसे ?
डॉ.जाधव साहेब : मी प्रथम कट्टर हिंदुत्ववादी होतो. मी कुणाचेही काही ऐकत नव्हतो. माझ्या भावांनी मला एकदा प्रश्न केला की, शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध का झाला ? या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नव्हते. त्यांनी दुसरा प्रश्न केला की, तुकाराम महाराज वैकुंठी गेले की त्यांच्या खून झाला ? याही प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नव्हते. मात्र भावाने असे प्रश्न केल्याने मी मात्र भावावर खवळलोच तेंव्हा भावाने मला आ.ह.साळूंके यांचे विद्रोही तुकाराम, मा.म.देशमुख यांचे रामदास पेशवाई आणि गोविंद पानसरे यांचे शिवाजी कोण होता हे पुस्तक वाचण्यास सांगितले. दुसरा प्रसंग असा घडला की, मी लातुरला १२ वी इंटरशीपला असतांना माझा मित्र भोसले मला मा.म.देशमुख यांच्या केडर कॅंपला घेऊन गेला होता. तेंव्हा मला त्यांचे विचार आवडले आणि डोळ्यावरची हिंदुत्ववादाची झाडप गळून पडली. आपणही समाजासाठी काहीतरी करावं असं ठरवलं. त्यावेळेस मा.म.देशमुख यांची भेट घेतली. त्यांनी शिक्षण विचारलं, मी १२ वी इंटरशिपला असल्यामुळे त्यांनी नंतर या तुमचं समाजासाठी काम करण्याचं वय नाही असे सांगितले. ही आपलेपणाची भावना मला पटली कारण असे कोणीही सांगत नाही तेंव्हा पासून मी या चळवळीत कार्य करायचं ठरवलं व त्याप्रमाणे मी कार्य करत आहे.
रत्नाकर खंडागळे : आपण लिखानाकडे कसे वळलात ? 
डॉ.जाधव साहेब : मराठा सेवा संघाचे किर्तन ऐकले व जेम्स लेन हे प्रकरण झालं तेंव्हा अक्षरशा मी रडलो. यावेळेस मी या विषयावर अनेक पुस्तकं वाचली यावरच मी माझ्या शैलीत एक प्रकरण लिहिले या प्रकारे मी लेखनाकडे वळलो. एक द्रुष्टी मिळाली ओळीचा मतिअर्थ समजला.
रत्नाकर खंडागळे : आपले पहिले पुस्तक कोणते ? काही अडचणी आल्या का ?
डॉ.जाधव साहेब : रामदासी पेशवे शिवाजी महाराजांवर शिंतौडे उडवत होते. तेंव्हा मराठा हा झोपलेलाच होता त्यांना जागे करण्यासाठी मराठ्यांनो षंड झालात काय ? हे पहिले पुस्तक लिहिले.अडचण म्हणजे हे पुस्तक छापायला कोणी प्रकाशक तयार नव्हता. मुद्रकही छापायला तयार नव्हता. तेंव्हा नाव न टाकण्याच्या अटीवर एक मुद्रक तयार झाला व मी ही आईच्या नावाने पंचफ़ुला प्रकाशन मार्फ़त पहिले पुस्तक छापले. ह्या पुस्तकाची दोन वर्षात १५००० प्रति विकल्या गेल्या. काही पुस्तके तर आमच्या बौद्ध बांधवांनी स्वत: वाटली.७ हजार पुस्तके जिजाऊ स्रुष्टीवर दोन तासात विकल्या गेली या पुस्तकाच्या सात आव्रुत्या आहेत.
रत्नाकर खंडागळे : आगामी कुठलं पुस्तक येतय ? किती पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत.
डॉ.जाधव साहेब : सध्या खेडेकर साहेबांच्या जिजाऊ कहे शिवबासे या पुस्तकाचे अनुवाद चालू आहेत. त्याच वाघ्या कुत्र्यावर ही पुस्तक येतय. माझी पाच पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. त्यामध्ये मराठ्यांनो षंड झालात काय ?, नाठाळांच्या काठी हानू माथा,ब्राह्मणांना का झोडपू नये, जेम्स लेन पुस्तकातील ब्रह्मराक्षस हे पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.
रत्नाकर खंडागळे : शिवधर्माबद्दल थोडं सांगा.
डॉ.जाधव साहेब : शिवधर्म म्हणजे एक जाती अंताची चळवळ आहे. इथला बहुजन समाज अठरा पगड जातीत विभागला आहे.त्यांना स्वत:ची ओळख नाही. त्यांना ओळख देण्याचे काम आम्ही करतो. बौद्ध धर्म आणि शिवधर्माच्या माध्यमातून आम्ही जाती अंताचा लढा लढतोय.
रत्नाकर खंडागळे : मराठा आरक्षणा बाबत काय मत आहे ?
डॉ.जाधव साहेब : मराठा समाज हा शिक्षणापासून दुर आहे.आरक्षण हे बाबासाहेब आंबेडकर आणि भाऊसाहेब देशमुख यांनी दिले आहे. सामाजिक,शैक्षणिक आणि मागासलेपण दुर करण्यासाठी दिले आहे. परंतू कुणबी आणि मराठा असा भेद करून ते नाकारले गेले आहे. त्यासाठी आम्ही लढत आहोत. ओबीसी ला आमचा विरोध नाही ते आमचे बंधुच आहेत.वैदिक विरुद्ध अवैदिक असा हा लढा आहे.
रत्नाकर खंडागळे : तरुणांना काय संदेश द्याल ?
डॉ.जाधव साहेब : मराठा तरुणांमध्ये एक दुर्गुण आहे ते एकमेकांच्या जवळ येत नाहीत. जेम्स लेन प्रकरणात ब्राह्मण समाज एक झाला परंतू आमचा मराठा समाज एक होत नाही. त्यांच्या अहंमपणाची भावना आहे.
ही भावना टाकून आज तरुणांनी संघटित व्हावे. आज विचार, देवान-घॆवान करणं महत्वाचं आहे. मोठा भाऊ म्हणून काम करावं तेंव्हा इतिहास सांगण्याचा व शिकवण्याचा अधिकार राहिल.
मुलाखत : रत्नाकर खंडागळे