28 March 2014

संतश्रेष्ठ तुकोबा : वैकुंठगमन की खुन ? [भाग तीन]

तुकोबांचे वैकुंठगमन आणि जिजा-कान्होबा.
आपण हे क्षणभर धरून चाललो की "संतात कीर्ति केली । तनु सायुज्यी नेली ॥"असे हे सदेह वैकुंठगमनाचे अदभुत व अपुर्व भाग्य एकट्या तुकोबांच्याच वाट्याला आले होते.तेंव्हा अशा या भाग्यशाली परिवाराकडे देहुच्याच नव्हे तर आजुबाजुच्या लोकांनीदेखील केवढ्या आदराने, किती आत्मियतेने पाहिले असते. तुकोबांच्या पुण्यपावन कुटुंबियांना कसे डोक्यावर घेऊन नाचवले असते. तळहाताच्या फ़ोडाप्रमाणे वागवले असते. त्यांच्यावर प्रेमाचा व सुखांचा वर्षाव केला असता. तुकोबांचे एखादे भव्य स्मारक उभारून तेथे नित्यमहोत्सवाचा कसा जल्लोष उडवून दिला असता आणि तुकोबांची अम्रुतवाणी मिळेल तेथून संग्रहीत करुन तो प्रचंड गाथा कसा अगदी सुरक्षीत करून ठेवला असता. त्या पुण्यस्थळाची माती मस्तकी  लावण्यासाठी व अभंग उतरून नेण्यासाठी दर्शकांची कशी रीघ लागली असती. अगदी स्वाभाविकपणेच हे सारे घडणे अनिवार्य होते. परंतू असे काही घडले आहे का ? ऐतिहासिक आधार काय सांगतात ? आपणास आश्चर्य वाटेल की इतिहास याबाबतीत स्पष्टपणे विरुद्ध साक्ष देत आहे.
           इतिहास स्वच्छ सांगतो की संतश्रेष्ठ तुकोबांच्या निर्वणानंतर महिना-दोन महिन्यातच तुकोबांच्या संपुर्ण परिवाराला देहू गाव सोडून जाणे भाग पडले. संपुर्ण कुटुंबाला देहुतून परागंदा व्हावे लागले. तुकोबांच्या निर्वाणानंतर जिजाबाई आपल्या लहान मुलास घेऊन खेडला जाऊन राहिल्या.कान्होबा सुदुंबरे येथे जाऊन राहिले.त्यामुळे विठ्ठलटिके पडिक राहिले (तु.संतसांगाती-मंबाजी). मंबाजीकडे नुसत्या देवाच्या पुजेऐवजी देऊळवाड्याची वगैरे सर्वच व्यवस्था आली होती. अशा व्यवस्थेत ती मंडळी देहुत राहणे शक्य नव्हते.’ (तु.सं.सां.-बहिना) कचेश्वर ब्रम्हे यांना, निर्वाणानंतर एक-दिड तपाने देहूस १०-५ अभंगाखेरीज तुकोबांची अम्रुतवाणीही मिळू शकली नाही. (तु.सं.सां.-कचेश्वर). तुकोबांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या निर्वाणानंतर तडकाफ़डकी गाव का सोडले, याचा संकेत कान्होबांच्या तत्कालीन अभंगातच मिळतो. आपल्या शोकमय अभंगात ते त्यावेळचे नि:सहाय व भयास्पद वातावरण सुचित करतात की-
आक्रंदती बाळे करूणावचनी । त्या शोके मेदिनी फ़ुटो पाहे ॥(२९८८)
असो आता काई करोनिया ग्लांती ? कोणा काकुलती येईल येथे ?
करिता रोदना बापुडे म्हणती । परि नये अंती कामा कोणी ॥ (२९९०)
माझे बुडविले घर । लेकरेबाळे दारोदार ।
लाविली काहार । तारातीर करोनि ॥(३००६)
काही विपत्ती अपत्या । आता आमुचिया होता ।
काय होईल अनंता ? पाहा,बोलों कासया ? ॥(३०११)
              अर्थात आपली मुलेबाळे सुद्धा निराधार झाली, दारोदार लागली व त्यांचेवर कोणत्या क्षणी काय विपत्ती कोसळेल याचा नेम उरला नाही, या भयग्रस्त भावनेनेच प्रिय पुत्रबंधुंनी आपली जीवाभावाची भुमी ताबडतोब सोडली हे स्पष्ट दिसून येते.
         त्यातही विचार करण्यासारखी गोष्ट ही की,तुकोबांच्या परिवारापैकी एकाही व्यक्तीने पुढील वीस-एकवीस वर्षात देहूच्या भुमीवर पाऊल सुद्धा टाकले नाही. आपल्या महान पित्रुदेवताच्या वार्षिक निर्वाणमहोत्सवाला देखील नाही ! आणि हा उत्सव तरी होत होता कोठे ? जिजाईच्या म्रुत्यु नंतर एकवीस वर्षाचा नारायणबुवा बंधुसह देहुस आला. तो देखील कचेश्वर यांच्या सत्पुरुषाने त्यांना प्रेरित केल्यानंतर. तुकोबांच्या मुलांनी पुन्हा देहुस ठांण दिल्यानंतर तिकोबांबद्दल जाग्रुती निर्माण झाली. विशेषत: तुकोबांचे व्रुंदावन नारायणबाबाने इ.स.१७०४ मध्ये बांधून पुण्यतिथी साजरी करावयास लागल्यानंतर तुकोबांचा किर्तीमहिमा वाढण्यास आधिकाधिक भर पडू लागली. (सं.तु.प्रास्ताविक प्रु.८) त्यापुर्वी महादेव, नारायण आदि तुकोबांच्या सुपुत्रांनी नुसती देहुच सोडली होती असे नव्हे तर विठठल देव देखील सोडला होता. त्यांनी मधल्या काळात विठोबाच्या पुजेअर्चेकडे लक्षच दिले नाही कारण विठोबा मुळेच त्यांच्या घराण्याची धुळधान उडाली अशी त्यावेळी त्यांची समजुत झाली होती. (सं.तु.प्रु.११२). श्री.वा.सी. बेंद्रे यांचे सारे संशोधन बरोबर असेल तर, तुकोबांच्या निर्वाणानंतर त्यांच्या परिवाराची झालेली वाताहत, ही दुरवस्था व विचित्र मनोरचना एकच गोष्ट ओरडून सांगत आहे असे म्हणावे लागेल की तुकोबांचे सदेह वैकुंठगमन झालेले नाही शंका नाही.
मंबाजी उवाच
      नुकतीच चाळीशी ओलांडलेल्या तुकोबांचे घातपाती निर्वाण झाले. त्यावेळी जिजाईंच्या उदरी असणारे नारायणबुवा हे वीस-एकवीस वर्षाच्या वयात जेंव्हा देहूस आले, त्यावेळचा एक प्रसंग तुकोबांचे पणतू गोपाळबुवा यांनी "नारायणबाबाचे चरित्राख्यान" यात दिलेला आहे.
एके दिवशी नारायण । इंद्रायणीचे करूनी स्नान ।
करावया श्रीमुर्तीचे पुजन । मार्गे आपण जात असता ॥
तव भेटला ब्राह्मण । तुकयाचा द्वेष्टा पुर्ण ।
मंबाजी ज्याचे नामाभिमान । तो दुष्टवचन बोलिला ॥
म्हणे रे तुझा पिता कोठे गेला ? नेणो भुताखेतांनी ओढूनि नेला ।
किंवा विदेशासि जाऊन मेला । घटस्पोट केला नसता पै ।...
            यावेळी पित्याची उत्तरर्क्रिया न केल्या कारणाने मंबाजीने नारायणाला मुर्तीला स्पर्ष सुद्धा करू दिला नाही. अखेर मंबाजीच्या उर्मटपणामुळे त्याला तिघा भावांनी ठोकून ’दिल्हा ग्रामांतरी लावुनिया ॥’ असे म्हंटलेले आहे. वरील प्रसंग हा गोपाळबुवांना अधिक्रुत परंपरेद्वारे अवगत होणे हे जितके स्वाभाविक आहे तितकेच "विंचवाची नांगी । तैसा दुर्जन सर्वांनी (३१६०)" अशा मंबाजीने हा डंख मारणे देखील नैसर्गिक आहे, यात शंकेला जागा नाही. तुकोबासंबंधी मंबाजीने हा केलेला विषारी उपहास पाषाणह्रुदयी मंबाजीच्या स्वभावाची यथातथ्य कल्पना आणून देतो. सदेह वैकुंठगमनाचे ताशे कोणी कितीही बडवले असले तरी आतली खरी बात मंबाजीलाच माहीत असल्यामुळे तो वीस एकवीस वर्षनंतर सुद्धा दुष्टवचन बोलून नारायणाला सुतकी समजून मुर्तीस हातही लावून देत नाही.हे खचितच विचार करण्याजोगे नव्हे का ? 
हत्येला जात जबाबदार ?
           तुकोबांचे हे खुनी म्हणजे मंबाजीसारखे एका विशिष्ट जातीचे असेच म्हणता येईल का ? छे:! तुकोबांच्या या खुनाला विशिष्ट जात जबाबदार आहे असे समजून जे कोणी जातीय तेढ अथवा जातीद्वेष वाढवू पाहतात त्यांना तुकोबा मुळिच कललेले नाहीत असे म्हणजे भाग आहे. गुणकर्मवादी तुकोबा जन्माने ठरलेल्या कोणत्याही जातीला अथवा वर्गजमातीला एकाच काठीने हाकायला तयार नाहीत. ते म्हणतात,"नाही यातीकुळ फ़ासे ओढी तयासी" अर्थात गळेकापू ठगाला जातकुळी कसली ?. जो दुर्जन असेल तो कुळाने मांग असो वा ब्राह्मण त्यांची जात एकच त्यामुळे तुकोबांचा खुन करणारी ती एक विशिष्ट मनोव्रुत्ती आहे. मंबाजी वगैरे केवळ तिचे प्रतिक, केवळ प्रतिनिधी! नुसत्या जन्मजातीवरून अथवा पंथादिकावरून उच्चनिचतेचा टेंबा मिरवून मोठेपणाची मिरासदारी वा त्याद्वारे स्वार्थसाधनाची मक्तेदारी कायम ठेवु पाहणारी आणि त्यासाठी हवे ते करू शकणारी दुष्ट मनोव्रुत्ती हीच तुकोबांच्या खुनाला जबाबदार आहे. शुद्र समाजनेते व्हायला लागले तर आम्हाला कोण विचारणार ? या द्वेषमुलक शुद्रस्वार्थी व वर्णांहंकारी कूविचाराचा खदखदता लाव्हारस कर्मठ समाजात आतल्या आत तीव्रतेने धुमसत आला. त्याचा मंबाजी आदिंच्या माध्यमातून झालेला परिस्फ़ोट म्हणजेच मानवतावादी वैष्णवाग्रणी तुकोबांचा अमानुष खुन. श्री नरहर चव्हान यांचे म्हणजे अक्षरश: सत्य आहे की "तुकारामाला बिना पेट्रोल च्या विमानात बसवुन सदेह वैकुंठाला पाठवण्याची पोपटपंची पुन्हा पुन्हा कथन करणे म्हणजे हा तुकारामावर अन्याय केल्यासारखे होईल". हा माणुस सामाजिक विषमता, वर्णवाद्यांची मिरासदारी व बडव्यांचे उपद्व्याप दूर करण्याच्या प्रयत्नात त्या काळात स्वत:च्या बलिदानाने हुतात्मा झाला, असे म्हणणे जास्त सयुक्तिक होईल!. तसेच कुठलाही वर्णद्वेष न वाढविता जन्माधिष्ठित उच्चनिचतेचे समाजातून समुळ उच्चाटन करून "विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म । भेदाभेदभ्रम अमंगळ" ही विचारप्रणाली जीवनात सर्वत्र प्रतिष्ठित करणे हीच तुकोबांविषयीची खरीखुरी भक्ती म्हणता येईल.
संदर्भ ग्रंथ :
संतश्रेष्ठ श्री तुकोबांच्या अभंगगाथा [शासकीय,पंढरीप्रत,पडवळांची गाथा,साहित्यलंकार रा.गो.पाटील यांनी संपादलेली]
संतश्रेष्ठ तुकाराम : वैकुंठगमन की खून ? (मुळ ग्रंथ)[साहित्यरत्न सुदाम सावरकर]
स्वप्न आणि सत्य [श्री साने गुरुजी]
प्रसाद[फ़ेब्रुवारी १९६७  श्री.न.र.फ़ाटक]
महाराष्ट्र सारस्वत [श्री.वि.ल.भावे]
संतकवि तुकाराम आणि त्यावरील आक्षेप [श्री दयानंद पोतदार ]
नारायणबाबा चरित्राख्यान [श्री गोपाळबुवा]
व्रुत्तपत्रे [लोकमत दि.६ फ़ेब्रुवारी १९७७]