15 May 2017

आदर्श समाजासाठी मराठा आचारसंहिता

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पुढाकाराने काही दिवसापुर्वी मराठा आमसभा संपन्न झाली. मराठा मोर्च्यामध्ये मराठा समाज एकत्र आला आणि मराठा समाजाच्या ज्वलंत समस्या विषयी संशोधन सुरु झाले. अशा वेळी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी नियोजन करण्यासाठी आदर्श आचार संहितेची गरज असल्याचे स्पष्ट झाले; त्यामुळे अनिष्ट रुढी-परंपरात अडकलेल्या मराठा समाजाला बाहेर काढण्यासाठी व त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कोल्हापूर येथे मराठा महासंघाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत मराठा समाजाची आदर्श आचारसंहिता बनवण्यात आली आहे. परंतु अनिष्ट रुढी-परंपरात आणि जातीच्या व्रुथा अभिमानात अडकलेला आणि त्या कालबाह्य परंपरेलाच प्रतिष्ठा मानणारा मराठा समाज या आदर्श आचारसंहिताचे पालन कितपत करतो हे सांगणे कठीण आहे. अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी - परंपरात तथा हुंडाबळी सारख्या समस्या मराठा समाजाबरोबर इतर समाजातचही मोठ्या प्रमाणात आहेत. पण मराठा समाज हा सगळ्यात मोठा असल्याने त्या समाजातील त्रुटी लगेच द्रुष्टीस पडतात हे सत्य असले तर जातीचा व्रुथा अभिमान बाळगण्यात मराठा समाज नेहमीच अग्रेसर असतो हे शास्वत सत्य आहे. जातीचा अभिमान वाईट नाही पण व्रुथा अभिमान समाजाच्या सर्वांगिण विकासामध्ये अडथळा ठरतो. मराठा समाज जातीच्या व्रुथा अभिमानामध्ये एवढा गुरफ़टलेला आहे की कोणीही केवळ जातीच्या नावाने मराठा समाजाचा स्वत:च्या हितासाठी वापर करू शकतो. यातून प्रथमत: मराठ्यांनी स्वत:ची सूटका करवून घेतली पाहिजे.
           राजकारण आणि मराठा समाजाचे अतुट नाते बनलेले आहे. राजकारण संकल्पना केवळ मराठ्यांना द्रुष्टी समोर ठेवूनच उदयास आली आहे की काय असे वाटावे इतके अतुट नाते. राजकारणामुळे मराठा समाजाचे खुप नुकसान झालेले आहे. शिवाजी महाराजांच नाव घेऊन राजकारण्यांनी आणि धर्मवाद्यांनी मराठा तरुणांचा खुप वापर केला. त्यामुळे चांगलं शिक्षण घॆऊन नोकरी - व्यवसाय करण्याच्या वयात राजकीय पक्षासाठी आणि धर्मासाठी रस्त्यावर उतरुन दंगा करण्यात जास्त वेळ घालवणे हे मराठा तरुणांना चांगलंच महागात पडलं आहे आजपर्यंत. पण राजकारण काय नी धर्मवाद काय दोन्हीमुळे मराठ्यांचे केवळ नुकसान झाले आहे. मराठा समाजाला ना राजकारणाने काही दिले ना धर्माने. धर्मवाद्यांनी केवळ देव-धर्मासाठी मराठ्यांच्या शक्तीचा केवळ वापर केला परंतू मराठा समाजाच्या समस्येकडे कायमच साफ़ दुर्लक्ष केले. त्यामुळे आता मराठा समाजाने आत्मपरिक्षण केले पाहिजे. कायम देणंच माहीत असणार्या मराठा समाजावर आरक्षण मागण्याची वेळ येणे ही बाब मराठ्यांसाठी शोभणीय नाही. महाराष्ट्राला कायम भरभरून देणार्या समाजाची आज ही अवस्था का झाली याची कारणे मराठा समाजाने शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सर्वांगीण विकासासाठी पहिली वाटचाल म्हणुन मराठ्यांनी प्रथमत: धार्मिक गुलामी झुगारून सुरुवात केली पाहिजे. अतिधार्मिकता मराठ्यांच्या प्रगतीमध्ये मोठा अडथळा बनली आहे. म्हणूनच आज कितीही गरीबीत असला तरी मराठा समाज कर्ज काढून धार्मिक सण - उत्सव तथा विधी करत असतो हे थांबवणे किंवा याचे प्रमाण कमी करणे अत्यंत गरजचे आहे, तरच मराठा समाजामध्ये सुधारणा शक्य आहे.
शहाण्णव कुळीचा बाऊ नको, बुवाबाजी हाकला : अखिल भारतीय मराठा महासंघ
         अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी - परंपरात गुरफ़ट जाणार्या मराठा समाजाच्या सर्वांगीण उन्नती आणि विकासासाठी महासंघाने आमसभेमध्ये  मराठा समाजासाठी आदर्श आचार संहिता निर्माण केली. त्यामध्ये बुवाबाजीला थारा नको, घरोघरी महाप्रसादाची प्रथा नको, विवाह ठरवताना शहाण्णव कुळीचा बाऊ नको, की अनाठायी खर्च नको, मराठा संस्कृती टिकविण्यासाठी समाजाने पुढाकार घेऊन मराठा समाजाचा विकास घडवावा,  असे आवाहन करण्यात आले.
आदर्श मराठा समाज घडवण्यासाठीची आचारसंहिता अशी
          वास्तुशांती, लग्नकार्य समारंभ इत्यादी कार्यक्रमामध्ये छ.शिवरायांच्या प्रतिमेला अभिवादन करणे.  मराठा संस्कृती टिकविण्यासाठी प्रयत्न करणे व समाजावर संस्कार करणे. समाजाच्या पूर्वजांची व वीरतेची कुलदैवते, कुलस्वामीनी (उदा. जोतिबा, खंडोबा, तुळजाभवानी) यांची मनोभावे पूजा व्हावी. या दैवतांमध्ये अनावश्‍यक वाढ होऊ नये. बुवाबाजीला थारा नको. घरोघरी महाप्रसादाची प्रथा नको.
          शहाण्णव कुळी समाजाची संभ्रमावस्था आहे. यात विभागणी होऊ नये. सर्व एकच आहोत, ही भावना वाढीस लावावी. यासाठी संशोधकांची मदत घ्यावी. विवाह ठरवताना शहाण्णव कुळीचा बाऊ करू नये. कर्तृत्त्वाला महत्त्व द्या. जन्मकुंडलीचा सांगोपांग विचार करून कालबाह्य रूढी झुगारून द्या व विज्ञानाची कास धरून रक्तगट तपासणी व्हावी. विवाहापूर्वी एच. आय. व्ही. च्या तपासणीला हरकत नाही.
विवाहातील बडेजाव व अट्टहास - 1) मुहूर्तमेढ - आंब्याच्या फांदीऐवजी कुंडीतील आंब्याचे कलमी रोप वापरावे.  2) आहेर - खोट्या प्रतिष्ठेपायी 100 ते 500 व्यक्तींपर्यंत आहेर करण्याची प्रथा बंद करावी, असा एकमुखी निर्णय. 3) काव्याक्षतांची नासाडी थांबवावी. 4) लग्न कार्यातील वधू-वरांना उचलण्याचा अट्टहास, काव्याक्षता फेकाफेकी व वरातीत डॉल्बी व दारूच्या वापराने तंटे होतात. त्यामुळे वरातीसारख्या पद्धती बंद व्हाव्यात. 5) अनाठायी खर्च टाळावा. 6) हुंडा व सोन्याच्या मोहापायी कर्जबाजारी होऊन होणारे अनर्थ टाळूया. 7) सामुदायिक विवाह पद्धतींना प्रोत्साहित करण्यासाठी प्रयत्न करणे.
व्यक्तीच्या मृत्यूनंतर अनावश्‍यक रूढींचे प्रदर्शन थांबवावे. 1) बारा दिवसांचा दुखवटा काळ कमी करणे (पाच ते सात दिवस). 2) एक कलश रक्षा नदीमध्ये विसर्जित करावी व बाकी रक्षाकुंडात विसर्जित करावी किंवा शेतीमध्ये विसर्जन करून प्रिय व्यक्तीच्या स्मृती जागृत ठेवाव्यात. 3) रक्षा विसर्जनानंतर नैवेद्य रूपाने होणारी अन्नाची नासाडी टाळावी. घरच्या व्यक्तींनीच मृत व्यक्तीच्या आवडीचा पदार्थ ठेवण्यास हरकत नाही.  4) कालानुरूप वेळेचे महत्त्व लक्षात घेऊन सकाळी नऊ ते दहाच्या आत रक्षा विसर्जन होण्यासाठी दक्ष राहावे.  कारण व्यावसायिक व नोकरदार यांना सोयीचे होईल. 6) दिवसकार्याप्रसंगी भेटवस्तू (भांडी) वाटप बंद करावे. 7) दिवस कार्यानंतर पै-पाहुण्यांकडून नव्याने येऊ घातलेली मटण भोजनाची प्रथा पूर्णपणे बंद करावी. 8) वास्तुशास्त्र-घर बांधणीमध्ये हवा, प्रकाश या पुरताच हा विषय मर्यादित ठेवावा. यामध्ये थोतांड करणाऱ्यांना आळा घालून जरब बसविणे. वास्तुशांती छत्रपती शिवरायांच्या प्रतिमा पूजनाने करावी. 9) प्रत्येक गोष्टीची विज्ञानाच्या दृष्टिकोनातून चिकित्सा करावी. 10) मुलगा-मुलगी भेद नको. दोघांना समान वागणूक द्यावी. मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी मराठा समाजाने प्रयत्न करणे. 11) गावच्या जत्रा, माही पूर्वीप्रमाणे आप्तांच्या पुरत्याच मर्यादित ठेवाव्यात. कर्ज काढून मोठ्या प्रमाणात भोजनावेळी बंदी व्हाव्यात. यामध्ये दारूचा वापर थांबवावा.
          मराठा समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी मराठा आमसभेमध्ये ठरवलेल्या आचारसंहितेशिवाय पर्याय नाही. आदर्श आचारसंहिता मराठा समाजाबरोबरच इतर समाजासाठीही तेवढीच महत्वाची आहे. प्रबोधन हे केवळ बोलण्या - लिहिण्यापुरतेच राहू नये त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. जन्म संगोपनाने विचार करुन कालबाह्य रुढी झुगारुन दिल्या पाहिजेत. मराठा समाजातील गरजू, गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक तथा वैद्यकिय मदत तसेच निराधारांना विविध प्रकारचे सहकार्य करणे हे मराठा समाजासाठी आद्यकर्तव्य आहे त्याचे पालन झाले पाहिजे.केवळ मोठ्या संख्येने एकत्र न येता एकमेकांच्या मदतीसाठीही मराठा समाजने हिंदुत्ववाद, बहुजनवाद असले वाद बाजुला सारून केवळ एक मराठा म्हनून एकत्र आले पाहिजे आपल्या मराठा समाजासाठी. आज समता-समानता म्हनूण कितीही ओरडले तरी मराठ्यांनी आपल्या जातीसाठी मराठा म्हणून एकत्र यावे आणि आपल्या समाजाच्या कल्याणासाठी वचनबद्ध व्हावे हिच काळाची गरज आहे. मराठा आमसभेमध्ये ठरवल्या गेलेल्या आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करुन मराठा समाजाच्या प्रगतीसाठी आदर्श समाज व्यवस्थेच्या नवनिर्माणासाठी कृती करावी.
जय शिवराय जयोस्तु मराठा जय महाराष्ट्र

25 प्रतिक्रिया :

  1. लेख छान आहे.मराठा महासंघाची आचारसंहिता योग्य आहे त्याचे सर्व मराठा बांधवांनी पालन करावे.धर्मवादी लोकांनी आणि राजकारण्यांनी मराठा मराठा करून राजकारण करून घर भरली आणि साठ वर्ष देशाचं राजकारण केल त्या मराठा नेत्यांनी काय केलं इतके दिवस ? वरून मराठा आरक्षणाला विरोध आणि एट्रोसिटी ला समर्थन. एकही मराठा नेता एट्रोसिटीच्या विरोधात आला नाही.मराठ्यांची ताकत आजुन पर्यंत मराठ्यंना कुणी कळुच दिली नव्हती....मराठा समाज राजकरण्याच्या मागे जास्त राहिला जेव्हा मराठा मोर्चा निघाला तेव्हा राजकारनी बाजूला ठेवल्या मुळ एव्हडया मोठ्या प्रमाणात मराठ्यांची एकी झाली.अशीच एकी मराठ्यांनी जातीसाठी ठेवली पाहिजे.
    जय शिवाजी जय भवानी जयस्तु मराठा

    ReplyDelete
    Replies
    1. बहुजन समाजाने आता एक होणे गरजेचे आहे.प्रत्येकाने आपापल्या जाती घेऊन बसले तर सगळ्यांचेच नुकसा आहे. मराठा मोर्चा जातीवर आधारीत होता. म्हणूण इतर समाजापासून मराठा समाज दुर गेला आहे हे सत्य नाकारता येत नाही.खेडेकर साहेब पण म्हणालेत की मराठा मोर्चाने महाराष्ट्राचे नुकसान झाले.

      Delete
    2. मराठा क्रांती मोर्च्यामुळे महाराष्ट्राचे कसे काय नुकसान झाले हे सांगायचे विसरले की खेडेकर साहेब.तुम्ही तरी सांगा.

      Delete
    3. विश्वनाथ सुर्यवंशीWednesday, 17 May, 2017

      इतर समाज मराठा समाजापासून लांब गेला हा गैरसमज कोणी पसरवला समजत नाही.शिवाजी महाराज हे सर्व मराठी माणसांना जोडणारा दुवा आहेत.जोपर्यंत सर्व समाज शिवभक्त आहे तोपर्यंत तो मराठ्यांपासून लांब जाऊ शकत नाही.मराठा समाज पहिल्यापासूनच इतर समाजाला घेऊन जात आहे.आजही खेडोपाडी मराठा समाज इतरांना सोबत घेऊन जात आहे त्यामुळे काही संघटनांना असं वाटू शकतं पण ते सत्य नाही.

      Delete
  2. छान निर्णय.गावच्या यात्रा, म्हायी या कर्ज काढून होतात हे मी पाहिलेले आहे.ते थांबले पाहिजे.नको त्या गोष्टीत मराठा समाज प्रतिष्ठा पाहतो हे अत्यंत चुकीचे आहे.बाकी शिवरायांच्या प्रतिमा पुजनाने वास्तुप्रवेश, लग्न समारंभ आयोजित व्हावेत ही चांगली संकल्पना आहे.प्रत्येक समाजाने ही आचार संहिता आमलात आणावी.

    ReplyDelete
    Replies
    1. खरं आहे.मराठा समाजात नको त्या गोष्टींना प्रतिष्ठा समजली जाते.आमच्याच गावचे एक उदाहरण आहे.एक पाटील पुढारी आहे त्याने मुलांच्या शिक्षणासाठी पैसा खर्च करावा लागतो म्हणून त्यांचे शिक्षण मध्येच बंद केले पण त्यांच्या लग्नाच्या वेळी मात्र कर्ज काढून एक हजार लोकं बोलवून लग्न केले असे मुर्ख जोपर्यंत समाजात आहेत तोपर्यंत समाज सुधारत नाहीत.

      Delete
  3. शिक्षणाला दुय्यम स्थान देणारा मराठा समाज आता शिक्षणाकडे वळत आहेत ही बाब अत्यंत कौतुकास्पद आहे.आज राज्यसेवा आणि लोकसेवा सारख्या परिक्षा निकालामध्ये मराठा समाजाची यादी मॊठी असते ही चांगली गोष्ट आहे.पण अजुनही मराठा समाज व्यवसायाकडे दुर्लक्ष करतो.एक बाजू अशीही असताना दुसरी बाजूही विचार करायला लावणारी आहे काही भागात मराठा समाज नको त्या सण-उत्सव आणि परंपरेसाठी कर्ज काढतो आणि नंतर आत्महत्या करायची वेळ येते.ही सवय मोडली पाहिजे.जातीच्या खोट्या प्रतिष्टेतून बाहेर येणे खुप गरजेचे आहे मराठा समाजाला.

    ReplyDelete
    Replies
    1. मराठा समाज आता शिक्षित झालेला आहे त्यामुळे या फ़तव्याची काही खास गरज नव्हती.तसही मराठा संघटना म्हणजे मराठा समाज नव्हे.मराठा समाज ठरवेल की कोणते सण-उत्सव पाळायचे आणि कोणते नाही.परंपरा ह्या धर्माच्या असतात त्या पाळणे गरजेचे आहे हिंदुधर्म म्हणून.

      Delete
    2. महासंघानं हा काही फ़तवा काढलेला नाही.प्रबोधनासाठी समाजाची आचारसंहिता ठरवली आहे.ती काही पाळाच म्हणून तलवार उचलली नाहीये.एक प्रगतीकडे जाणाचा मार्ग दाखवला आहे तो आपण पाळायचा की नाही ज्याने त्याने ठरवायचे आहे.नंतर रडत बसण्याआधी सुधारणा करणे गरजेचे आजे.मी मराठा नाही पण मीही ती आचारसंहिता पाळण्याचा प्रयत्न करणार.

      Delete
  4. दिपा भगतTuesday, 16 May, 2017

    अंधश्रद्धा रुढी-परंपरा यामुळे मराठा समाजाचं अतोनात नुकसान झालेले आहे.देव धर्माला घाबरून गरीब मराठा विनाकारण पैसा बरबाद करतो आहे धर्मावर हे थांबले पाहिजे.देव-धर्म सगळं काल्पनिक आहे.यासाठी प्रबोधन करणे आवश्यक आहे अशा कोणातरी संघटनेने सांगुण जास्त फ़ायदा होईल असं वाटत नाही.लोकांची मने बदलायला हवीत मुळात तेंव्हाच हे शक्य होईल.

    ReplyDelete
  5. शिवाजी महाराजांचा सत्य इतिहास मराठा समाजालाच माहीत नाही त्यामुळे मराठा समाजाचं प्रबोधन करणे अवघड आहे.कारण मराठा समाज फ़क्त म्हणत असतो की शिवरायांनी जातपात मानली नाही.सगळ्यांचं कर्त्रुत्व बघितले पण त्यांचाच मराठा आज जातीच्या अभिमानात अडकलेला आहे.लग्न करताना कोणताही विधी करताना जातपात-धार्मिकता बघुनच करत असतो.आज वर्णव्यवस्थेनुसार उच्च ब्राह्मण समाज आंतरजातीय विवाह करतो पण मराठा समाजात विषेश अशी लग्न होत नाही.झाली तरी त्यांचे संबंध ओबीसी पर्यंत येवून थांबतात.त्याखालील समाजामध्ये लग्न होत नाहीत.अशी अनेक उदाहरणे आहेत त्यामुळे मराठा समाजामध्ये याविषयी प्रबोधन करणे गरजेचे आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. १.सैराट वेळी एक प्रकरण चर्चेत आले होते.पोर्णिमा गोखले मुलगी आणि शिर्के मुलगा यांचा प्रेमविवाह झाला होता.पण दलिताबरोबर लग्न केले म्हणून त्या ब्राह्मण कुटुंबाने तीच्यावर बहिष्कार घातला होता.२.सचिन माळी आणि शितल साठे यांचा प्रेमविवाह आहे.शितल साठे मातंग असल्यामुळे सचिन माळीच्या कुटुंबाने मांगाची पोरगी घरात आणणार का ? म्हणुन विरोध केला.शेवटी त्यांनी लग्न केले सचिन च्या घरचे लग्नाला गेले नाहीत.३.परवा आमच्या गावी सुताराच्या मित्राचे लग्न झाले महार मुलीसोबत त्या सुताराच्या पोराला घरातून हाकलून दिले आहे म्हाराची पोरगी आणली म्हणून.
      या उदाहरणावरून समजून जा की तुम्हाला कोणी स्विकारत नाही.त्यामुळे आधी आचार-विचार सुधरा,राहणीमान स्वच्छ ठेवा.मग आंतरजातीय विवाहाचा हट्ट धरा.

      Delete
    2. अहो जिथे अनिसुचित जातीमधील चांभार लोक महार आणि मातंगाना स्विकारत नाहीत तर हे दलित लोक्स सवर्णांकडून का अपेक्षा करतात तेच कळत नाही.मुळात अडचण ही आहे की यांना सगळं फ़ुकट खायची सवय लागली आहे.शिक्षण, सवलत जशी मोफ़त मिळते तसं कोनत्याही गोष्टीसाठी कष्ट करण्याची यांची तयारी नसते.सगळं मोफ़त पाहिजे.तसंच आंतरजातीय लग्न ही मोफ़त व्हावीत असं यांना वाटते म्हणून हे सुधरायला बघत नाहीत.

      Delete
    3. आज गावखेड्यामध्ये महार असो वा मातंग समाज खुपच दरिद्री अवस्थेत जगत आहे.परंतु जे शिकलेले आहेत त्यांचीही अवस्था काही चांगली नाही.त्यामुळे या सगळ्याचा परिणाम त्यांच्या राहणीमानावर पडतो.त्यांच्यामध्ये शिक्षणाची कमी असल्यामुळे आचार-विचार म्हणावे तसे विकसित होत नाहीत.त्यामुळे आंबेडकरवादी संघटनांनी आधी आपल्या त्या समाजाकडे लक्ष दिले पाहिजे.इतरांचे प्रबोधन करण्यास सगळे समर्थ आहेत्त.

      Delete
  6. रुढी परंपरा आणि अंधश्रद्धा ह्या सगळ्याच जाती-धर्मात आहेत सगळेच पाळतात.धर्माचा पगडा इथल्या संस्क्रुतीचा पगडा सर्वांच्यावर सारखाच आहे.प्रत्येक धर्माच्या आपापल्या संस्क्रुत्या असतात.मी म्हणतो की वेळोवेळी मराठा समाजानेच महाराष्ट्राला प्रबोधन शिकवले आहे.पुरोगामी चळवळीची परंपरा ही मराठा समाजामध्ये जास्त आहे.पण लोकसंख्या जास्त असल्यामुळे त्याचा प्रसार होण्यास थॊडा कालावधी लागणारच.पण रुढी परंपरा आणि अंधश्रद्धा त्याग करण्यात मराठा समाज पुढे आहे आज हेच सत्य आहे.मराठ्यांना पुरोगामीपणा शिकवू नये कोणीही.
    जय मराठा

    ReplyDelete
  7. खरंच आदर्श आचारसंहिता आहे.मराठा समाजाने हि आचार संहिता गांभिर्याने घेतली पाहिजे.फ़क्त मराठाच असं नाही तर प्रत्येक समाजाने हि पाळली पाहिजे एक आदर्श समाज घडवण्यासाठी.
    धन्यवाद.

    ReplyDelete
  8. अजित पानसरेThursday, 18 May, 2017

    #मराठा_समाज_भवितव्य
    तथाकथित व्यवस्था परिवर्तन-जातीअंत-सत्ता परिवर्तन-वर्ण व्यवस्था-जातीव्यवस्था-धर्मव्यवस्था-बहुजनवाद-समाजवाद इ. समाज परिवर्तनाच्या सर्व बाबींच्या बाबत ज्या पद्धतीने तथाकथित परिवर्तनवादी आणि सनातनी संघटनांनी प्रचार व प्रसार करून आपापल्या छुप्या हेतूंच्या पूर्तीसाठी मराठा समाजाच्या तरुणांना आणि अनेक संघटनांच्या नेतृत्वाला आणि कार्यकर्त्यांना वैचारिक आणि आचरणाच्या दृष्टीने संभ्रमित आणि गुलाम केलेले आहे, त्यापलीकडे जावून मराठा तरुणांनी स्वतःच्या बुद्धीने स्वतंत्रपणे निर्णय घेवून वाटचाल केल्यासच मराठा समाजाला भवितव्य आहे. अन्यथा दुसऱ्यांच्या पालखीचे भोई होऊन जगावे लागेल...!!!!! हे सर्व समजून घेवून बदलण्याची आणि स्वतःबरोबरच समाजाची प्रगती करण्याची क्षमता आणि धमक मराठा तरुणांमध्ये निश्चितपणे आहे. गरज आहे ती फक्त तथाकथित सर्व प्रतिगामी पुरोगामी विचारांमधून स्वविकासासाठी योग्य विचार निवडून आचरण करण्याची. गरज आहे ती तथाकथित कोणतीही विचारसरणी तुम्हाला वास्तव जगापासून दूर दिवास्वप्नांच्या विश्वात नेऊन तुमचे भवितव्य खराब करीत आहे, हे समजून घेण्याची. तुम्ही समजून घ्याल अशी आशा आहे....!!!!!
    फ़ेसाबुक वरून

    ReplyDelete
    Replies
    1. हिंदुत्ववाद काय नी बहुजनवाद काय दोन्हीकडे मराठ्यांचा वापर झाला.फ़ायदा काहीच नाही वेळप्रसंगी दोघेही मराठ्यांच्या मदतीला धावले नाहीत.

      Delete
  9. पाटील मराठा समाजाची आचारसंहिता मान्य करणे हे पटू शकते पण हिंदुत्व नाकारण्यात काय अर्थ आहे ? हिंदुत्वाशिवाय पर्याय नाही.इतर समाज कधीही हिंदुत्वाला विरोध करणार नाही.आज हिंदुत्ववामध्ये दलित आणि ओबीसी मोठ्या प्रमाणात आहेत मग ज्यांच्यामुळे हिंदुत्वाचं वेळो वेळी रक्षण झालं तो समाज कसा दुर राहू शकतो बरं हिंदुत्वापासून ? मराठा समाजाच्या प्रश्नांचा आणि हिंदुत्वाचा काय संबंध ?

    ReplyDelete
    Replies
    1. कारण हिंदुत्ववाद आणि बहुजनवाद मानणारे मराठा लोक स्व:जातीला दुय्यम मानतात.प्रथम त्यांची विचारसरणी हिंदुत्व किंवा बहुजनवाद.यामुळेच मराठ्यांचे खुप नुकसान झालेले आहे.मराठे बसलेत हिंदुत्व आणि बहुजनवाद मानत आणि बाकीचे लोक आपापल्या जातीच्या भल्यात गुंतले. इतर लोकं प्रथम अपल्या जातीला प्राधान्य देतात नंतर मग हिदुत्व असेल किंवा बहुजनवाद असेल.त्यामुळे मराठ्यांनी आता स्व:जातीच्या भल्यासाठी हिंदुत्व आणि बहुजनवाद वेळीच दुर ठेवला पाहिजे.

      Delete
    2. हिंदुत्ववादामुळे मराठा समाजालाच असं नाही तर कोणत्याच समाजाला फ़ायदा झालेला नाही कारण हिंदुत्व हे राष्ट्रियत्व आहे.जो काही फ़ायदा व्हायचा तो राष्ट्राचा व्हायला हवा कोण्या जातीचा नाही.प्रत्येक समाज आपापल्या लोकांसाठी झटत आहे आणि फ़ावल्या वेळेत हिंदुत्वाचं कार्य करत आहेत.

      Delete
    3. ब्रिगेडमध्ये जसे दिडदमडीचे आहेत तसेच हिंदुत्ववामध्ये पण आहेत.त्यांच्यकडे लक्ष न देता आपले कार्य चालू ठेवले पाहिजे.देशावर भगवा फ़डकवणे अत्यावश्यक आहे.

      Delete
  10. सुदेश खंदारेFriday, 26 May, 2017

    छान लेख.मराठ्यांनी मुंबई मोर्चासाठी तयार रहावे.
    जय शिवराय जयस्तु मराठा

    ReplyDelete
  11. मराठा समाजाने आता आपापसातील वाद मिटवून एकत्र आले पाहिजे.मराठा समाजातील पोटजाती मिटवून एकत्र आले पाहिजे.पाटील-देशमुखीचा गर्व बाजुला सारूण मराठा समाजासाठी झटले पाहिजे.सध्याचा काळ हा प्रगतशील आहे.त्यात आपणही समावीष्ट झाले पाहिजे.जातीचा अभिमान असावा पण कुळाचा अभिमान समाजासाठी घातकच आहे हे मराठा सेवा संघ कायमच सांगत आलेला आहे.
    जयस्तु मराठा

    ReplyDelete
  12. लेख छान आहे धन्यवाद सर. केवळ मराठाच नाही तर बहुजन समाजातील सर्व लोकांनी या महापुरुषांच्या विचारांचे पालन केले पाहिजे.

    ReplyDelete

प्रतिक्रिया देताना सभ्य भाषेचा वापर करावा तसेच मराठी भाषेत लिहिण्याचा जास्तित जास्त प्रयत्न करावा. प्रतिक्रिया देताना कोणत्याही जात, धर्म, पंथ, वर्ण तथा कोणत्याही समुहाच्या श्रद्धास्थानांविषयी बोलताना सभ्यता बाळगणे आवश्यक.