24 December 2016

मनुस्मृति : समाजशास्त्रीय समालोचन

        भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २५ डिसेंबर,  १९२७ रोजी "मनुस्मृति" या ग्रंथाचे जनसमुदयाच्या समक्ष जाहिररित्या दहन केले. दलित समाजाला मानसिक गुलामीतून मुक्त करण्यासाठी त्यांच्यामध्ये गुलामीच्या विरोधात संघर्षाची जिद्द निर्माण केली. त्यासाठी त्यांनी २० मार्च १९२७ रोजी चवदार तळयाचा सत्याग्रह केला. हा सत्याग्रह चवदार तळ्यातील पाणी पिण्यासाठी नव्हता, ज्या तलावात कुत्री-मांजरी, जनावारे पाणी पित होती. त्यांना पाणी पिण्याची बंदी नव्हती, परंतु माणसाला पाणी पिण्याची बंदी होती. म्हणूनच मानवी हक्काची प्रतिष्ठा स्थापन करण्यासाठी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला होता. दलित समाजाला अशा अनेक धार्मिक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. असे आंबेडारांचे मत झाले होते. त्यामुळेच आंबेडकरांनी मनुस्मृति ग्रंथ जाळण्याचे ठरवले तत्पुर्वी आधीच्या शतकात राष्ट्रपिता जोतिराव फ़ुलेंनी "जाळून टाकावा  । मनुग्रंथ ॥ असे म्हंटले होते. आंबेडकरांनी मनुस्मृति जाळली (१९२७) त्याला पुढच्या वर्षी ९० वष्रे पूर्ण होतील,  त्यामुळे मनुस्मृति विषयी जाणुन घेणं महत्वाचे आहे. 
             भुतांत प्राणी श्रेष्ठ, प्राण्यात बुद्धीजीवी, बुद्धीवंतांत मनुष्य़ श्रेष्ठ आणि मनुष्यात ब्राह्मण श्रेष्ठ, शुद्रास मति (ज्ञान) देऊ नये, कोणताही धर्मोदेश देऊ नये, कोणतेही व्रत सांगु नये. जो धर्म सांगतो तो नरकात बुडतो. (मनुस्मृति अ.१०/१२३), असे अनेक (१०/२५, १/९१, १०/२६, ९/१८) श्लोक आहे ज्यामध्ये शुद्रांनी फ़क्त ब्राह्मणांची सेवा करावी. लिहु, वाचू नये अन्यथा ते नरकात जातात. शुद्रांनी फ़क्त उष्टे अन्न खावे, उपास-तपास करू नये, स्त्री-शुद्रांना धर्माधिकार नाहीत, शुद्रांनी विनातक्रार तीन्ही वर्णाची सेवा करावी. मनुस्मृतिमुळे ब्राह्मण वर्गाचे वर्चस्व वाढले. स्त्री-शुद्रादी नगण्य झाले. या सर्व कारणामुळेच २५ डिसेंबर १९२७ रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी जनसमुदायासमोर भाषण करून त्यांच्या मते अस्पृष्यता आणि विषमतेचे समर्थन करणारा, ब्राह्मणवर्ग सांगेल तोच कायदा व नियम माननारा आणि शुद्र आणि स्त्रीयांचे सर्व अधिकार हिरावून घॆणारा ग्रंथ मनुस्मृति जाळून टाकला. आंबेडकरांनी मनुस्मृति जाळली ही जाती-वर्ण द्वेषातून नाही. ज्या ग्रंथामुळे माझ्या समाजाला जनावारा पेक्षा वाईट वागणूक मिळते, या वागणूकीला प्रेरणा मनुस्मृतितून मिळत आहे असा समज आंबेडकरांचा झाला होता. पण आज त्यांचे अनुयायी केवळ हिंदु तथा ब्राह्मण द्वेषातून मनुस्मृतिला विरोध करताना दिसत आहेत.
            सध्या मनुस्मृति जाळल्याचा दिवस "मनुस्मृति दहन दिन" म्हणून साजरा केला जातो यावेळी दलित-आंबेडकरवादी लोक मनुस्मृति जाळल्याचा आनंद व्यक्त करतात. पण या सर्वांमध्ये एक वास्तव मान्य करावंच लागेल की मनुस्मृति दहन दिन साजरा करणार्यांना (किंवा तसा उल्लेख करणार्याला) मनुस्मृति विषयी किती ज्ञान आहे हे सांगणे कठीन आहे हीच अवस्था मनुस्मृतिच्या समर्थकांची आहे. आपण हिंदु आहोत आणि म्हणून मनुस्मृति आपल्याला पुज्य आहे तसेच आपण दलित आहोत आणि बाबासाहेबांनी जाळली म्हणजे नक्कीच ती वाईट आहे. असे दोन्ही पक्षाचे तर्क असतात. यावर समर्थक आणि विरोधक यांच्यापैकी किती लोकांनी मनुस्मृति वाचलेली आहे हा संशोधनाचा विषय होऊ शकतो.
मनुस्मृति तथा हिंदु धर्मग्रंथ आणि समाजमन
              आजच्या काळामध्ये हिंदु धर्मग्रंथावर टिका करणे हे पुरोगामीत्वाचे सर्वात मोठे लक्षण मानले जाते. तुम्ही कितीही समता-बंधुतेचा जागर करा, तुम्ही कितीही निर्लपबुद्धी आणि निपक्षपाती जीवन जगा पण त्याला पुरोगामीत्वामध्ये कवडीची किंमत नाही जोपर्यंत तुम्ही किमान एका हिंदु धर्मग्रंथा विरोधात एकतरी शब्द उच्चारत नाही. या तथाकथित पुरोगामी लोकांना अशी संधीही हिंदु धर्मातील ठेकेदार आणि धर्मरक्षकांमुळेच मिळते. जगात कोणत्याही धर्माचे नाहीत एवढे ग्रंथ हिंदु धर्माचे आहेत. पण हिंदु धर्मरक्षकांनी धर्माचे तत्वज्ञान केवळ ग्रंथापुरतेच मर्यादित राहू दिले. कारण यांना जास्त रस टिकाकारांचे खंडण तथा ग्रंथांचा प्रसार करण्यापेक्षा त्यांना केवळ विरोध करण्यातच असतो. "वेदां"पासून ते "श्रीमद्भगवतगीता" आणि "ज्ञानेश्वरी" पासून ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या "ग्रामगीता" पर्यंत या सर्व ग्रंथाविषयी धर्मरक्षकांच्या काय भावना तथा आस्था आहेत हे अजुनही स्पष्ट झालेले नाही कारण धर्मग्रंथांपेक्षा केवळ धर्म (हा शब्दच) च परमपवित्र वाटतो. धर्माचा प्रसार हा धर्मातील वैश्विक आणि शास्वत तत्वाज्ञानामुळे होत असतो त्यामुळे धर्माबरोबरच धर्मग्रंथांचे तत्वज्ञान आणि विचार लोकांपर्यंत येणे अत्यावश्यक आहे.
        आज सर्व धर्मग्रंथापैकी समाजावर प्रभाव पाडणारे दोनच ग्रंथ अहेत, श्रीमद्भगवतगीता आणि मनुस्मृति. मनुस्मृति अप्रत्यक्षात का असेना पण जिवंत आहे. अजाणतेपणाने त्याचे पालन सर्वांकडूनच होते. हिंदुंच्या अनेक परंपरा तथा चालीरिती ह्यांचे मुळ मनुस्मृतित आहे. मनुने ब्रह्मचर्य, ग्रुहस्थाश्रम, संन्यासाश्रम, राजधर्म, चित्तशुद्धी करण्याबाबत विषय सुचविले आहेत. पण काही श्लोकांमध्ये गीतेत नसणारी विसंगति मनुच्या स्म्रुतीमध्ये दिसून येते. संपुर्ण मनुस्मृति वाचल्यानंतर समजुन येईल की मनुने काही आक्षेपार्ह (अनेक लेखकांच्या मते क्षेपक) श्लोक वगळले तर जिवनाचे किती व्यापक स्वरुप मांडले आहे. व्यक्तिगत चित्तशुद्धीपासून ते संपुर्ण समाज-व्यवस्थेपर्यंतचे बोध सुचिले आहेत.
        धर्मग्रंथामध्ये दोन प्रकार असतात सांप्रदायिक आणि वैश्विक. मनुस्मृति म्हणजे सांप्रदायिकच आहे. मनुस्मृतिची रचना इ.पू. २०० ते इ.पू. २०० या काळात झाली असे अभ्यासक मानतात तर डॉ.आंबेडकरांच्या मते इ.पू.१७० ते इ.पू.१५० या काळात मनुस्मृतिची रचना झाली. अर्थातच हे अंतिम सत्य नाही. मनुस्मृतिमध्ये घेण्यालायक आहे तसेच सोडण्यासारख्याही गोष्टीही आहेत. आज बहुतांशी हिंदुंनी त्यातील बहुतांश भाग सोडून दिलेला आहे. मनुस्मृतीमधील घेण्यासारखे आहे त्याकडे दुर्लक्ष करून चुकीचे वचणे दाखवणे हे बरोबर नाही. मनुने कसे चुकीचे वचणे लिहिली आहेत हे दाखवण्यात आपण जास्त वेळ घालवतो आणि चांगल्या विचारांना मुकतो. मनुचे सर्वच विचार मान्य करण्यासारखे नसतील किंवा जे मान्य करण्यासारखे असतील त्यातही विसंगती असेल. हिंदु धर्माचे (म्हणजे हिंदुंनी आपले मानलेले) पुष्कळ ग्रंथ आहेत त्या सर्वच ग्रंथामध्ये एकवाक्यता असेल असे सांगता येत नाही भिन्न वचणे वाचायला मिळण्याची शक्यता असू शकते. आपल्याला इथे मनुस्मृती विषयीच्या एकंदरीत तर्क - वितर्काकडे बघायचे आहे. मनुस्मृति का चांगली किंवा का वाइट किंवा अमुक श्लोकात काय म्हंटले आणि तमूक  श्लोकात काय ? याचा अभ्यास तुम्ही वयक्तिकरित्या करू शकता.
मनुस्मृति आणि वर्णव्यवस्था
             महर्षी मनु महाराज कोण होते ?, कोणत्या वर्णाचे होते ?, एकून मनु किती होते ?, किंवा मनुस्मृतिची रचना नेमकी कोणत्या काळी झाली ? हे थोडं बाजुला ठेऊ. मनुस्मृतिमध्ये साधारण २६८५ श्लोक आहेत. संपुर्ण मनुस्मृतिमध्ये ब्राह्मण आणि क्षुद्र या वर्णाविषयी जास्त लेखन मिळते. मनुस्मृति म्हणजे केवळ वर्णव्यवस्थावादी आहे. मनुस्मृति गुणकर्मावर आधारीत वर्णव्यवस्था मानते. त्यामुळे जन्माधिष्ठीत जातीव्यवस्थेला डोक्यावर घेऊन जातीचे फ़ायदे घेणार्या अर्धवटांनी गुणकर्मप्रमाणित वर्णव्यवस्थेविरोधात बोलताना विचार करणे आवश्यक आहे.
            मनुस्मृतिबद्दल अजुनही स्पष्टता नाही कारण अभ्यासकांचे म्हणणे आहे की १७९४ साली विल्यम जोन्स यांने मनुस्मृति अनुवादित केली त्यानंतर त्यामध्ये इतर वर्णाविषयी आक्षेपार्ह नोंदी केल्या. मनुस्मृतिबाबत बोलताना दोन मुख्य आरोप केले जातात. ते म्हणजे स्त्रीयांचा अपमान आणि अस्प्रुष्यतेचे समर्थन. प्रथमता स्त्रीयांबाबत मनुस्मृतिचे मत जाणुन घेऊ, कोणतेही प्रतिक्रिया देताना आजच्या काळाची आणि मनुच्या काळाची तुलना करणे गरजेचे आहे. आजच्या काळातही स्त्रीयांचे जीवन इतके स्वतंत्र नाही. आजही स्त्रीला दुय्यम स्थान आहे परिस्थिती काहीशी निवळली असली तरी फ़ारशी नाही. मग मनुचा काळ तर हजार वर्षापुर्वीचा त्यावेळी काय अवस्था असेल ? निश्चितच स्त्रीयांविषयी मनुस्मृतिमध्ये आक्षेपार्ह वक्तव्ये केली गेलेली आहेत ती निषेदार्ह आहेतच. पण सर्वच लेखन स्त्रीविरोधी आहे का ? तर नाही. तर स्त्रीयांची बाजु मांडलेले ही लिखान आपल्याला आढळेल. मुळात एक गोष्ट समजून घॆतली पाहिजे ती म्हणजे स्त्रीयांवर जे आरोप केले गेलेले आहेत ते म्हणजे स्त्रीया आजन्म अशा असतात असे नाही तर त्यांचा स्थायी गुणधर्म सांगितला आहे. आजच्या काळात त्याचे समर्थन होऊ शकत नाही पण मनुने स्त्रीयांचा मुळ स्वभाव सांगितला आहे. चांगल्या कुळीन संस्काराने स्त्रीयांमध्ये सुधारणा होऊ शकते हेच त्यामागचे सत्य. त्याचवेळी स्त्रीयांच्या हक्काधिकाराविषयी सुद्धा मनुनी लिहिले आहे. आता विषेश म्हणजे सवर्ण समाजातील स्तीयांविषयी अश्लाघ्य टिका करणे, त्यांच्या स्त्रीयांविषयी पुस्तकातून घाणेरडे लिखान करणे असे भिमपराक्रम करनार्यांनी मनुने स्त्रीयांचा अपमान केला म्हनून मनुस्मृतिला विरोध करणे केवळ दुटप्पीपणाचे तथा मुर्खपणाचे आहे. ख्रिश्चन धर्मामध्ये कुटुंब नियोजनाला विरोध आहे. मुस्लिम धर्मामध्ये आजही स्त्रीयांची काय परिस्थिती आहे हे तथाकथित पुरोगामी लोकांना माहीत आहे का ? नक्कीच माहीत आहे पण त्यांच्या विरोधात बोलाव तर मिळत तर काहीच नाही पण हातच्या पुरोगामित्वाच्या प्रमाणपत्राची वैधता संपण्याची भिती.
           अस्प्रुष्यता : मनुस्मृतिवरील आणखी एक आरोप म्हणजे अस्प्रुष्यतेचे समर्थन. मुळात आपण एक गॊष्ट लक्षात घेतली पाहिजे की मनुची व्यवस्था ही कर्मप्रमाणित व्यवस्था होती त्यामूळे अमुक जात बहिष्क्रुत करा असं कूठं आढळणार नाही. पण आज आपल्याला पुरोगामी बनायचं असेल तर मनुस्मृतितील अस्प्रुष्यतेवर घाणाघाती टिका करावीच लागते त्याशिवाय पुरोगामित्वाचे प्रमाणपत्र मिळत नाही. वर्णव्यवस्था आणि अस्प्रुष्यता आजही आस्तित्वात आहे आणि राहील. कालांतराने अस्प्रुष्यता नाहीशी जरी झाली तरी वर्णव्यवस्था शाश्वत आहे आणि राहिल. फ़रक एवढाच की ती जातीनिधिष्ठ न राहता श्रीमद्भगवतगीतेत सांगितल्याप्रमाणे गुणकर्मावर आधारीत राहील हेच सत्य आहे. मी वयक्तिकरित्या अस्प्रुष्यतेला विरोध करत नाही जर ती जातीनिधिष्ठ नसेल तर. अशी अस्प्रुष्यता आजही अस्तित्वात आहे. आज पुरोगामित्वासाठी अस्प्रुष्यता विरोधात ढोल बडवावा लागत आहे, तसे नसते तर यांनी परिणामावर ओरडण्यापेक्षा कारण शोधले असते. अस्प्रुष्यतेला मुळ कारणीभुत होते ते संस्काराचा अभाव आणि घाणेरडे राहणीमान यामुळे त्यांच्यावर अस्प्रुष्यतेचा शिक्का बसला कालांतराने हिच त्यांची ओळख बनून गेली आणि ती जातीवर लादली गेली,  यामध्ये अस्प्रुष्यांचा दोष नसेलही किंवा सर्व वर्णाना गुरुप्रमाणे संस्कार करणे ब्राह्मणांचे काम होते ते त्यांनी प्रामाणिकपणे केले नाही हे खरे असले तरी अस्प्रुष्यता मानणारे दोषी होतेच असे म्हणता येणार नाही कारण हे त्यांच्या अडाणीपणातून होत असे. आजच्या काळातसुद्धा दुर्गंधी - अस्वच्छ असनार्या लोकांना इतर लोक जवळ करत नाहीत ही स्वाभाविक प्रतिक्रिया आहेत. मग हजार वर्षापुर्वी काय अवस्था असेल याची कल्पना केल्यास परिस्थिती उजेडात येईल.
         ज्या काळात माणुस जगत असतो तो त्याच प्रमाणे लिखान करत असतो हा नियमच आहे. सध्याच्या वातावरणानुसार माणुस जी कल्पना करू शकतो त्याच्यातूनच तो जग पाहत असतो.आजच्या काळात कोणीही काही लिहिल ते आजच्या काळात योग्य ठरेल पण इथून पुढे शेकडॊ - हजारो वर्षांनी कालबाह्य होईल हा परिवर्तनाचा नियम आहे. मनुस्मृतिच्या काळात जे काही लिहिलं गेलं ते सध्या सर्वच समर्थनीय आहे असं नाही. काही निश्चितच आक्षेपार्ह गोष्टी आहेत मनुस्मृतिमध्ये पण ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याचे अनुकरण का करू नये ? की केवळ चुका दाखवण्यातच धन्यता मानायची ?. कायदा, सुव्यवस्था आणि न्यायव्यवस्था यासाठी लिहिलेला ग्रंथ. राजाचं आचरण कसं असावं, प्रजेचं रक्षण कसं करावं, अत्यंत सुंदर माहीती त्यामध्ये दिलेली आहे. त्याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे तो फ़क्त हिंदु धर्मापुरता मर्यादित नाही. म्यानमार, इंडोनेशिया सारख्या देशामध्ये मनुस्मृति हा महत्वाचा ग्रंथ मानला जातो. फ़िलीफ़ाईन्स म्हणजे महर्षी मनूं पुतळा उभा केला गेला आहे. मग त्यांनी हे सगळं मनुस्मृति न वाचताच केलं का ? मग लक्षात घ्या जातीभेद आणि द्वेष नेमका कुठे आहे.
             वैदिक-हिंदु विचार-प्रणाली आणि मान्यता  ह्या काळानुसार बदलत राहतात. त्यामुळेच हजार वर्षापासून चालत आलेल्या रुढी-परंपरा आज बदललेल्या तर काही बंद झालेल्या दिसतील तसं इतर धर्मात होत नाही म्हणून धर्म अभ्यासक हिंदु हा धर्म मानण्यापेक्षा एक मान्यता-संस्क्रुती तथा विचार प्रणाली मानतात. मनुस्मृतिमध्ये ज्या श्लोकांवर आक्षेप आहे किंवा जी वचणे विषमतावादी आहेत ती काढून टाकली तरी मनुला फ़ारसा फ़रक पडणार नाही.कारण मनुस्मृति समाजशास्त्र आहे.ती निव्वळ अध्यात्मिक बोधच देत नाही तर सामान्य नितीबोध, सांसरीक कार्यासाठी मार्गदर्शन, राजा तसेच व्यापारी आदींची कार्य - कर्तव्ये याविषयी मनुने मार्गदर्शन केले आहे.यामुळे लक्षात येईल की मनुचा मुख्य उद्देश समाजाला मुख्य व्यवहारीक मार्गदर्शन देण्याचा आहे. म्हणून विनोबा म्हणतात "मनु समाजशास्त्रज्ञ आहे तो नेहमीच बदलत असतो. मनु जर आज असता तर त्याला आपली मनुस्मृति बाजुला सारून वेगळीच मनुस्मृति लिहावी लागली असती. याचा अर्थ पहिल्यामध्ये घेण्यासारखं काही नाही असे नाही. मनुस्मृति सारखे ग्रंथ समाज-व्यवस्था कायम रहावी या उद्देशाने लिहिली गेलेली आहेत".