30 November 2013

आतातरी पुढे हाची उपदेश

             जगतगुरु संतशिरोमणी संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे ह्र्दयाला भिडणारे अभंग. अज्ञान, रुढी, परंपरा, ब्राह्मणवाद आणि कर्मकांडात अडकलेला समाज व त्याची दयनीय अवस्था पाहून महाराज कळवळून गेले.त्यांनी बहुजन समाजाची बारकाव्याने चौफ़ेर पाहणी केली. त्यातून समाजाची दयणीय अवस्था तुकोबारायांना पाहवली नाही.ते म्हणाले,
"न देखवे डोळा ऐसा हा आकांत । परपिडे चित्त दु:खी होते ॥"
त्यानंतर त्यांच्या जे काही लक्षात आले ते समाजाचे चित्र बदलण्यासाठी समाज परिवर्तनासाठी त्यांनी खुप कष्ट घेतले,तेंव्हा महाराज म्हणाले.
"भीत नाही आता आपुल्या मरणा । दु:खी होता जन न देखवे ॥"
यातून महाराजांनी निर्भीडपणे सत्य सांगण्यास सुरुवात केली.हे सत्य कितीही तिखट व झोंबणारे का असेना पण शेवटपर्यंत त्यांनी सत्य सांगायचे सोडले नाही.हे सत्य जरी बहुमतांच्या विरोधात का असेना पण बहुमतांपेक्षा आम्ही सत्यालाच मानतो.या बद्दल महाराज म्हणतात.
"सत्य असत्याशी मन केले ग्वाही । मानियेली नाही बहुमता ॥"
किंवा हे सत्य सांगत असताना कुणाला तनका येत असेल,राग येत असेल तरी देखील आम्ही सत्यच सांगण्याचं काम करणार आहोत असे महाराज एके ठिकाणी म्हणतात.
"तुका म्हणे सत्य सांगोत । येतील रागे तरी येवोत ॥"
यावरून महाराज अत्यंत परखड भूमिका घॆताना दिसून येतात.मग ते व्रत वैकल्यांवर आसूड ओढतात.बुवाबाजीवर प्रहार करतात तर कधी वैदिक पंडीतांच्या बाष्फ़ळ ज्ञानाची प्रौढी उघड करतात.अनेकेश्वर नाकारताना ते म्हणतात.
"सेंदरी ही देवी दैवसे । कोण ती पुजी भूते केते ॥
आपल्या पोटा जी रडते । मगती शिते अवदान ॥१॥"
त्याहीपेक्षा पुढे जाऊन महाराज म्हणतात सगळ्या देवांचा देव म्हणून आम्ही फ़क्त विठ्ठलच मानतो,स्वीकारतो.
"नव्हे जोखाई जोखाई । मायराणी मेसाबाई॥
बळीया माझा पंढरीराव । जो या देवांचाही देव ॥
रंडीचंडी शक्ती । मदयमांस भक्षिती॥
बहीराव खंडेराव । रोटी सोटीसाठी देव ॥
गणोबा विक्राळ । लाडू मोदकांचा काळ ॥
मुंज्या मैसासुरे । हे तो कोण लेखी पोरे॥
वेताळे फ़ेताळे । जळो त्यांचे तोंड काळे ॥
तुका म्हणे चित्ती । धरा रखुमाईचा पती ॥४॥"
नवस केल्यावर लेकरं-बाळं झाले असते तर नवरा करायची गरज काय ? हा जाहीर प्रश्न महाराज चुकलेल्या समाजाला करतात.
"नवसे कन्या-पुत्र होती । मग का करणे लागे पती ॥"
हे सगळे करीत असताना समाजाला अज्ञानाच्या अंधकारातून बाहेर काढत असताना,ज्ञानाचा नवा मार्ग दाखवत असताना त्यांना बर्याच संकटांना तोंड द्यावे लागतं.ब्राह्मणवर्ग त्यांना त्रास देतो,अमानुष छळ करतो तर त्यांची गाथा पाण्यात बुडवतो.
यातून महाराज खचून न जाता पुन्हा नव्याने उभे राहतात आणि पहिल्याहीपेक्षा खंबीर,धाडसी भूमिका ते पुढे घॆतात.
"तुका म्हणे ऐसा नरा । मोजुनी हाणाव्या पैजारा ॥"
किंवा
"तुका म्हणे गाढव लेखा । जेथे भेटेल तेथे ठोका ॥"
             अशा प्रकारे जगतगुरु तुकोबाराय समाजासाठी दिवसरात्र स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करायला लागतात.अज्ञान सोडा,भटमुक्त व्हा,भागवत धर्म स्विकारा असे वारंवार महाराज सांगतात.सर्व सांगुनही न ऐकणार्या वर्गाबद्दल त्यांना चीड येते.ह्या न ऐकणार्या वर्गाला एकदा महाराज उद्देशून म्हणतात.
"किती सांगू तरी न ऐकती बटकीचे।
पुढे शिंदळीचे रडतील ॥"
               आज शेतकर्यांच्या आत्महत्या झाल्या आणि वाटले महाराजांचे बोल खरे ठरले.त्यांनी सांगितलेले न ऐकल्यामुळे आमच्यावर रडायची वेळ आली.अजुन आम्हाला तुकोबाराय पुर्णपणे समजलेले नाहीत असेच म्हणावे लागेल.एवढेच काय तर बर्याच जनांच्या घरामध्ये तुकोबारायांची गाथा नाही.संत तुकोबाराय वाचून,समजून घेण्याऐवजी आम्ही वारकरी फ़क्त मंदिरात तुकाराम चालीवर गातो.तुकोबाराय फ़क्त गाण्यापुरतेच ठेवले आम्ही.यामुळे त्यांच्याच शब्दात सांगायचे झाल्यास,
"उठिते ते कुटिते टाळ । अवघा मांडिला कोल्हाळ ॥"
आम्ही एवढे शहाणे, महाराज करू नको म्हणाले ते आम्ही आधी करून बसलो.नव्हे आजही करत आहोत.
महाराज व्रत,वैकल्याच्या भानगडीत पडू नका म्हणाले होते.आम्ही अजुनही व्रतवैकल्य सोडायला तयार नाही.महाराज दगडाला देव मानू नका म्हणाले होते,ते रंजल्या गांजल्यांना आपुले म्हणणार्यांच्यात देव शोधा म्हणाले होते.आम्ही नेमकं याच्या उलट वर्तन करतो.ते नवस करू नका म्हणाले होते आम्ही करतो,ते बुवाबाजी,कर्मकांड करू नका म्हणाले होते.पण बुवाबाजी,बापूकापू आणि भामट्यांशिवाय आमचे पान हालत नाही.ते अनेक देवी-देवता मानू नका म्हणाले होते.आम्ही सगळ्यांना खेटून येतो.ते म्हणाले होते प्रत्येक गोष्ट श्रमाने,अभ्यास करून मिळवा पण आम्हाला हे जमत नाही.आपला कल दोन नंबरच्या मार्गावर असतो.
म्हणून आम्ही आतातरी अंतर्मुख होऊन तुकोबारायांना समजून घेतले पाहिजे.किमान त्या दिशेने एखादे पाऊल तरी टाकले पहिजे.असे म्हणतात साहित्याला काळाच्या मर्यादा असतात.पण आजही तुकोबारायांचं साहित्य प्रासंगिक ठरतं.समाजोपयोगी ठरतं.ही गोष्ट केवढी मोठी आणि अभिमानाची आहे.आपली प्रगती व्हावी,गुलामीतून आपण बहुजन समाजाने बाहेर पडावे म्हणून आयुष्य पणाला लावणारे संत तुकोबाराय आम्ही असेच विसरून जायचे का ?
ह्रुदयाला घाव झाल्यावर,असंख्य शारिरीक आणि मानसिक वेदना सहन करून अगदी आतून घायाळ झालेले संत तुकोबाराय अगदी  कळवळून शेवटचा उपदेश करतात.रात्रंदिवस तुमचा आमचा विचार करणारे तुकोबाराय शेवटीस काकुळतीस येवून म्हणतात...
"आतातरी पुढे हाची उपदेश।
नका करू नाश आयुष्याचा ॥
सकळ्यांच्या पाया माझे दंडवत ।
आपुलाले चित्त शुद्ध करा ॥"
बघा काही.....जमतं का पाळायला !!

* नार्याची मुंज आणि कूशीचे लग्न
* तुकोबारायांची गाथा