4 February 2016

स्त्री अस्मिता आणि विषमता

           भारत देश हा पुरुष प्रधान संस्क्रुतीवर आधारलेला आहे त्यामुळे इथे स्त्रीला कमी लेखणे म्हणजे सामान्य बाब आहे. याचा प्रत्यय रोज आपल्याला पहायला मिळतो. पहिल्यापासून स्त्री ही पुरुषी अहंकारामध्ये भरडली गेली आहे तीच परिस्थिती आजतागात आहे. त्यामुळे स्त्रीने कोणते निर्णय घ्यावेत आणि कोणते नाही हे पुरुषच ठरवणार. त्यांच्या आवडी कोणत्या असाव्यात आणि नसाव्यात हेही पुरुषच ठरवणार. एवढेच नाही तर त्यांनी मंदिरात प्रवेश करावा की नाही आणि करावा तर कधी करावा हेही पुरुष वर्गच ठरवणार याला काही स्त्रीयाही बळी पडल्या आहेत. स्त्रीयांची दुर्बलता यासाठी कारणीभुत आहे. आजपर्यंत स्त्रीयांनी धर्माची आज्ञा मानून अन्याय सहन केला. महिलांना या धर्माने शुद्र मानले, गुलामापेक्षाही हीन वागवले तरीही तो आपल्या वाड - वडीलांचा धर्म म्हणून येथील महिलांनी त्यांच्यावर होणारा अन्याय मुकाटपणे सहन केला. आजही तेच चालू आहे मग भारत महासत्ता होण्याच्या बाजारगप्पा मारनार्यां लोकांसाठी ही लाजिरवाणी गोष्ट नाही का ?
        काही दिवसापुर्वी शनी शिंगणापुरच्या मंदिरात प्रवेश मिळवण्यासाठी सामान्य हिंदु स्त्रीयांनी आंदोलन सुरु केले. शनीचे दर्शन घ्यावे की नाही असे दोन मतप्रवाह पडले. त्यानंतर लगेच मुंबईच्या हाजी - अली दर्ग्यात आम्हाला प्रवेश मिळावा म्हणून मुस्लिम स्त्रीयायी पुढे आल्या. अशा पुरोगामी कार्यासाठी ही वाटचाल खरच स्वागतार्ह आहे.पण सनातनी हिंदु व्यवस्थेमध्ये ती वाटचाल कितपत यशस्वी होईल ते सांगणे कठीण आहे. कारण आजपर्यंतचा इतिहास बघता कोणतेही पुरोगामी पाऊल सहजासहजी पुढे पडलेले नाही आणि यापुढेही पडू नये अशी सनातनी मानसिकता हिंदुधर्माइतकिच इतर धर्मानेही पोसलेली आहे. हि सनातनी मानसिकता आपल्या जुन्या परंपरेला घट्ट धरून असल्यामुळे त्यापरंपरा पुरोगामींच्या प्रत्येक अव्हानाला थोपवणार्या आहेत. या आधी या सनातनी प्रव्रुत्तीविरोधात अनेक समाजसुधारक  दत्त म्हणून उभे ठाकले होते. आपल्या समाजातील स्त्रीयांना शैक्षणिक तसेच सामाजिक अधिकार मिळावेत यासाठी हमिद दलवाई यांनी आयुष्यभर लढा दिला आहे. सर्व धर्माची हीच परिस्थिती आहे.सर्वच धर्म परंपरानिष्ठ आणि जुन्या रुढींनी बांधलेले आहेत. स्त्री सती जाण्याची परंपरा मोडण्यासाठी राजा राममोहनराय यांनी खुप कष्ट घेतले.तसेच बालविवाह, दलितांना मंदिर प्रवेश मिळावा म्हणून बाबासाहेब आंबेडकर यांनी अपार कष्ट घेतले.
          आज चाललेले आंदोलन शनिशिंगनापुरचे आव्हानही तसेच आहे मंदिर प्रवेश हा स्त्रीयांच्या अधिकारांशी संबंधित प्रगतशील विचार आहे. शनी मंदिरात प्रवेश करणार्या त्या स्त्रीया हिंदुच होत्या आणि प्रवेशाला विरोध करणार्या सर्व संघटना सनातनी हिंदुच होत्या.मुळात पुरुष प्रधान आणि जातीवर आधारीत असलेल्या समाजामध्ये महिलांसाठी प्रतिष्ठा नावाची गोष्टच नाही तिथे आहे फ़क्त तिला कमी लेखने एवढंच. तीला विचार स्वातंत्र्य आहे का ? ती सुरक्षित आहेत का ? एकिकडे स्त्रीयांनाच पुजायचे आणि दुसरीकडे स्त्रीयांना मंदिरात प्रवेश नाकारायचा हे फ़क्त आपल्याच संस्क्रुतीत होऊ शकते. शनि बाबत द्वारकापीठाच्या शंकराचार्याने काढलेला फ़तवाही विचार करण्यासारखाच आहे की, "शनी हा देव नाही तो ग्रह आहे स्त्रीयांना येथे प्रवेश देण्याऐवजी त्यालाच  पळवून लावा".
           आपल्या संस्क्रुतीचे पालन करतात देव - देश आणि धर्म याचा विचार केला जातो. पण सध्या सर्व निष्ठा देव आणि धर्मापुरतीच मर्यादित केली आहे. करं तर देव आणि धर्मापेक्षा "राष्ट्र" ही संकल्पना श्रेष्ठ आहे आणि माणुसकी हाच सर्वात मोठा धर्म आणि याविरोधात जाणारेच खरे समाजद्रोही, धर्मद्रोही आणि राष्ट्रद्रोही आहेत. या पार्श्वभुमीवर शनीशिंगनापुरच्या मंदिरातील प्रवेशाचे हिंदु तथा हाजी अली दर्ग्यात प्रवेश मिळावा म्हणुन आंदोलन केलेल्या मुस्लिम स्त्रीयांचे सर्व भारतीय समाजाने स्वागत केले पाहिजे. सनातनी लोकं इतिहासातुनच हटवादी असतात त्यांना परिवर्तन मान्य नसते, परिवर्तन निसर्गाचा नियम आहे जो माननार नाही तो नष्ट होईल. स्त्रीया मंदिरात आल्या तर शनी देवाचं पावित्र्य अडचणीत येते असे त्यांचे म्हणने आहे. पण चांगल्या परिवर्तनवादी पावलं थाबविणारा देव हा देव म्हणन्याच्या लायक असेल का हा विचार भक्तांनी नक्कीच केला पाहिजे. मग स्त्रीयांना प्रवेश नाकारणारा देव आहे की त्याच्या नावाने आपली हिंदुतील पुरोहित आणि मुस्लिमातील मौलवी असले उद्योग करत असतात ?. खरं तर आमचा धर्म कसा श्रेष्ठ आहे असं भासवणार्यांनी स्त्री-स्वातंत्र्याचे निव्वळ ग्रंथिक दाखले देऊ नयेत. प्रत्येक्षात पाऊल उचलन्याची वेळ आली आहे.
    आपल्या धार्मिक आणि सामाजिक आधिकारांसाठी आजपर्यंत बर्याच वेळा आंदोलन झाली आहेत. आजपर्यंतचा इतिहास बघता स्त्रीयांच्या सबलीकरणाच्या आणि हक्काधिकाराच्या प्रस्थापनेसाठी लढणार्या संघटना मुख्यत: हिंदु धर्मामध्येच आहेत. पण सध्या सुरु असलेले आंदोलन, आपल्या धार्मिक आणि सामाजिक आधिकारांसाठी मुस्लिम स्त्रीयांनी उचललेले पाऊल म्हणजे भारतीय समाजातील पहिलीच घटना आहे. हमिद दलवाईनी उभारलेल्या लढ्याला कमी प्रतिसाद मिळाला पण विरोधच जास्त झाला, धर्मगुरुंनी मोर्चे संघटित केले. हमिद दलवाईं विरोधात केलेले आंदोलन खुप मोठे होते त्यांना मुस्लिम कब्रस्थानात जागा मिळु न देण्याइतपत मोठे, याचाच स्वच्छ अर्थ असा की सनातनी मानसिकता कोणत्या एका धर्माची मक्तेदारी नव्हतीच कधी. जशी हमिद दलवाईंना इस्लिमी धर्मगुरुंच्या विरोधात संघर्ष करावा लागला तसेच हिंदु धर्मामध्ये सुद्धा संत तुकोबां पासून दोभॊळकर - पानसरे यांनाही सनातन्यां विरोधात संघर्ष करावा लागला. मात्र सर्वच धर्मातील सनातन्यांनी एक गोष्ट मात्र कायमस्वरुपी लक्षात ठेवली पाहिजे. त्यांचे विजय कायमच दिवास्वप्नासारखेच अल्पजीवी असतात.
         सध्या चाललेल्या शनीमंदिर प्रवेशबंदिच्या वादावर पडता टाकताना आपण कोणत्या प्रवाहात समिल व्हायचे ते ठरवावे लागेल.खरं तर मुख्य मुद्दा स्त्री स्वातंत्र्याचा राहिलेला नाही. हे मुद्दे राजकारणाचे केंद्रे बनलेले आहेत. म्हणजे निव्वळ विरोधाला विरोध म्हणून विरोध केला जातो.सनातनी व्यवस्थेला विरोध म्हणून या आंदोलनाला पाठिंबा बाकी आम्हाला त्यांच्या असलेल्या-नसलेल्या श्रद्धेशी देणंघेणं नाही त्याचप्रमाणे निव्वळ पुरोगामी चळवळीला विरोध म्हणून स्त्री-प्रवेश बंदीला समर्थन असे प्रवाह रुजु झालेले आहेत अशा घटना राष्ट्रीय ऐक्यास बाधकच अशाच आहेत.हे सर्व थांबवणे गरजेचे आहे श्रद्धेमध्ये राजकारणाने प्रवेश करता कामा नये. पुरुषप्रधान समाजामध्ये स्त्रियांचे स्वातंत्र्य फ़क्त मंदिरापुरतेच मर्यादितही असू नये. म्हणूनच आज या सर्व विषमतावादी सनातनी मानसिकतेतून बाहेर पडून स्त्रीयांना समाजात समतेचे आणि समानतेचे स्थान बहाल करून देणे आवश्यक आहे.