26 June 2013

स्वराज्याचे पहिले सरसेनापती : हंबीरराव मोहिते

           शिवशाहीच्या उदयापुर्वी अनेक कर्तबगार घराणी उदयास आली होती त्यामध्ये मोहिते, घाटगे, महाडिक, सुर्वे, जाधव, सावंत या विविध घराण्यांनी पराक्रमी पुरुषांनी मुस्लिम शाह्यामध्ये लष्करी सेवा करून नावलौकिक मिळवला होता.त्यांच्या भोसले घराण्याशी संबंध आला त्यावेळी नावलौकीकात आणखीनच भर पडली.काही घराण्यांनी छत्रपती घराण्यांशी नातेसंबंध निर्माण केला.त्यापैकी मोहिते घराणे जवळचे घराणे होते.या घराण्यात अनेक कर्तबगार पुरुष निर्माण झाले.याच घराण्यातील हंबीरराव मोहिते यांना शिवरायांनी अष्ठ्प्रधान मंडळामध्ये सरसेनापती म्हणुन स्थान दिले.खर्या अर्थाने हंबीरराव हे स्वराज्याचे पहिले सरसेनापती होते.हंबीररावांच्या अगोदर शिवरायांचे पराक्रमी सेनापती प्रतापराव गुजर व नेताजी पालकर यांचे स्वराज्यस्थापनेत मोठे योगदान आहे.परंतू त्यांच्याबाबतीत शोकांतिका झाली आणि साहजिकच हंबीरराव सरसेनापती झाले.
           सरसेनापती हंबीररावांच्या गराण्याचा इतिहास पाहिला तर तो गौरवशाली आहे.हंबीररावांचे पणजोबा रतोजी मोहिते यांनी निजामशाहीत मोठा पराक्रम गाजविला होता.त्यांना निजामशाहीने "बाजी" हा किताब दिला होता.हे घराणे तळबीड या गावची पाटीलकी सांभाळत होते.तुकोजी मोहिते हे पराक्रमी पुरुष तळबीड येथे आला व तेथील पाटीलकी सांभाळत सेवा करू लागला या घराण्याने घाटगे आणि घोरपडे घराण्याशी सोयरीक जुळवून आणली.याच दरम्यान शहाजीराजे यांच्याशी या घराण्यातील संभाजी व धारोजी मोहिते यांचा संबंध येवून शहाजीराजांच्या लष्कारात सामील झाले व मोठे शौर्य गाजवले.संभाजी मोहिते व धारोजी मोहिते त्या काळातील प्रराक्रमी सेनानी होते.त्यांच्या शौर्याची गाथा अदिलशाही फ़र्मानामध्ये पहावयास मिळतात.यातील संभाजी मोहितेचा मुलगा म्हणजे हंबीरराव मोहिते हा मर्दमराठा शिवरायांच्या सानिध्यात आले.स्वराज्याच्या स्थापनेवेळी संभाजी मोहिते हे शहाजी राजेंच्या लष्करात सहहवालदार होते.संभाजी मोहिते पुढे कर्नाटकला गेले मात्र आपली मुलगी सोयराबाई हिचा विवाह शिवरायांसोबत लावून दिला व छत्रपती घराण्यांशी पुन्हा नाते निर्माण केले.पुढे संभाजी मोहिते यांचा मुलगा हंबीरराव मोहिते यांनी आपली मुलगी ताराबाई हिचा शिवपुत्र राजाराम महाराजांशी विवाह लावून दिला.मोहिते घराणे हे छत्रपतीचे अगदी जवळचे घराणे आहे.याच घराण्यातील उदयास आलेला मर्द मराठा म्हणजेच हंबीरराव मोहिते.
            शिवरायांच्या राज्याभिषेकापुर्वी महापराक्रमी सेनापती प्रतापराव गुजर बहलोल खानाशी झालेल्या संघर्षात मारले गेले.त्यांच्या शोकांतिकेनंतर ते सेनापती पद रिकामे झाले व ते पद हंबीरराव मोहितेंना दिले आणि अष्टप्रधान मंडळातील सरसेनापती पद म्हणुन मान मिळाला.हंबीरराव हा प्रतापरावांच्या सैन्यात सेनानी होता.ज्यावेळी प्रतापराव पडल्याचे कळाले तेंव्हा हंबीररावांनी अदिलशाहीच्या सेनेवर जबरदस्त हल्ला केला.शत्रुला विजापुरपर्यंत पिटाळून लवण्यात हंबिररावांचे मोठे योगदान आहे.सरसेनापती हा केवळ पराक्रमीच असून चालत नाही.तर तो प्रसंगाचा जाणकार व ह्रुदयाठायी शहाणपण आणि सबुरी असावी लागते.हे सर्व गुण हंबीररावांकडे होते.छत्रपती शिवरायांनी त्याच्या पराक्रमाचा गौरव म्हणुनच अष्ठ्प्रधान मंडळात स्थान दिले.हंबीररावांचे मुळ नाव हंसाजी मोहिते होते.महाराजांनी हंसाजी चा "हंबीरराव" हा किताबाने सन्मान केला.सरनौबत दिली.राज्याभिषेकानंतर मोघली सुभेदार दिलेरखान व बहादूरखान यांच्या छावण्यावर हल्ला करण्याचा आदेश शिवरायांनी हंबीररावांना दिला.ही स्वारी यशस्वी करून खानदेशातील मोघलांची खानदेश,बागलाल,गुजरात,बर्हाणपूर,वर्हाड,माहूड, वरकड प्रर्यंत प्रदेशात धुमाकूळ घातला होता.यानंतर (सन १६७६) सरसेनापती हंबिररावाने कर्नाटकातील कोप्पल येथील अदिलशाही पठाणी सरदार हुसेनखान मियाणच्या  येलबुर्गा येथे मोठा पाडाव करूण त्याच्या जुलमातून रयतेची मुक्तता केली.सरसेनापती हंबीररावांच्या तलवारीची कमाल या विषयीचे वर्णन बखरीतून आलेले आहे.हुसेनखान केंद्र करून सेनानी धनाजी जाधव व सरसेनापती हंबीरराव मोहिते शिवरायांस येवून मिळाले त्यावेळी शिवराय गोवळकोंड्यात भागानगर येथे होते. यानंतर महाराजांना आपले बंधू व्यंकोजीराजेंबरोबर सामोपचाराने चांगले संबंध निर्माण करावयाचे होते.मात्र व्यंकोजींची भेट यशस्वी झाली नाही.पुढे महाराजांनी कर्नाटकातील मोहिम आटोपती घेतली आणि महाराष्ट्रात (स्वराज्यात) आले.नंतर हंबिरराव सन १६७८ मध्ये महाराष्ट्रात (स्वराज्यात) आले.दरम्यान युवराज छत्रपती संभाजी राजेंचे मोघालांना जाऊन मिळणे पुन्हा स्वराज्यात येणे यानंतर छत्रपती शिवराय व संभाजी राजेंची पन्हाळा गडावर भेट या घटना घडल्या.त्यानंतर महाराजांनी लहान पुत्र राजाराम महाराजांचा प्रतापराव गुजर यांची मुलगी जानकीबाईशी विवाह घडवून आणला.त्यानंतर अवघ्या दहा ते बारा दिवसांनी छत्रपती शिवरायांचे निधन झाले.यावेळी हंबीरराव कर्हाड परिसरात छावणी टाकून होते.
           थोड्याच दिवसांत काही ब्राह्मण प्रधानांनी संभाजी राजेंना छत्रपतीपदावर न बसविता त्यांचा हक्क डावलून राजाराम महाराजांचे मंचकारोहन केले ही बाब संभाजी राजांना कळली तेंव्हा त्यांनी आपल्या सर्व किल्लेदार व अधिकारांना आपल्या पायाशी रुजु होण्याचे आदेश सोडले.हे आज्ञापत्र सरसेनापती हंबीररावांनाही मिळाले होते.हंबीररावांनी संभाजी राजांचीच सेवा करण्याचा निर्णय घेतला.ज्यावेळी राजाराम महाराजांच्या बाजुने असणारे प्रधान हंबीररावांना भेटण्यास आले तेंव्हा त्यांची तिव्र शब्दात निर्भलना केली.याठिकाणी स्वामीनिष्ठा दिसून येते कारण स्वराज्याचा वारसदार म्हणुन संभाजी राजांचा खरा हक्क होता.हंबीररावांळेच बंडखोर प्रधानांचे  मनोरथ विरून गेले व संभाजी राजे छत्रपती झाले.यावेळीचा हंबीररावांचा न्यायीपणा इतिहासात प्रसिद्ध आहे.संभाजी राजेंच्या राज्याभिषेकानंतर संभाजी राजेंच्या आदेशानुसार विविध आघाड्यांवर हंबीररावांनी आपला पराक्रम गाजवला त्यापैकी बुर्हाणपुरचा विजय, त्यांनी मिळवलेली प्रचंड लुट महत्वाची आहे.या विजयाने मोघलांची नाचक्की झाली.त्यानंतर मोघली सरदार शहाबुदीनखान उर्फ़ गाजीउदीनखान बाहदूर याच्यावरील हंबीररावांची स्वारी महत्वाची आहे.खान रामसेज किल्ल्याला वेढा देऊन होता त्यावेळी हंबीररावांनी त्याच्यावर हल्ला करून पराक्रम गाजवला.यावेढ्यात हंबीरराव जखमी झाले होते.यानंतर पुढे संभाजी राजांच्या आदेशानुसार भिमानदीच्या परीसरातून मोघली सरदार कुलीचखान व पन्हाळा परीसरातून शहाजादा आज्जमला पिटाळून लावण्यासाठी हंबीररावांनी शर्थीचा यशस्वी प्रयत्न केला.त्यानंतर कल्याण जवळ रहुल्लाखान व बाहदुरखानाचा पराभव केला.सन १६८८ मध्ये रायगडाजवळ हंबिररावांनी गाजीउद्दीन खानाबरोबर दोन हात केले या लढाईत मराठ्यांचे मोठे नुकसान झाले.यानंतरच्या कालखंडात खुद्द संभाजीराजेंच्या बरोबर अनेक मोहिमेत हंबीररावांचा मोठा सहभाग होता.सरसेनापती हंबीररावांची शेवटची लढाई झाली ती वाईजवळ या युद्धात मोघली सरदार सर्जाखानाचा पराभव झाला परंतू हंबीररावांना तोफ़ेचा गोळा लागून धारातिर्थी पडले.नेमकी ही लढाई कोठे झाली याची नोंद नाही.मात्र वाईजवळील युद्धात हा मर्द मराठा सरसेनापती धारातिर्थी पडला.डिसेंबर १६८७ मध्ये हंबीररावांच्या म्रुत्युने मोठी पोकळी निर्माण केली.संभाजीराजांपुढे अनेक आव्हाने निर्माण झाली.
             एकंदरीत सरसेनापती हंबीरराव मोहितेंचे मराठा स्वराज्यप्रेम व स्मामीनिष्ठा दिसून येत असताना छत्रपती शिवरायांची शिकवण ही महत्वाची होती हे ही दिसून येते. हंबीररावांच्या ठायी शत्रुशी लढण्याची जिद्द व जबर आत्मविश्वास या सर्व गोष्टी छत्रपती शिवरायांच्या तालमीतुनच हंबीररावांना मिळाल्या होत्या. इतिहासानेही दाखवून दिले आहे की विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराजांची सरसेनापतीची निवड अगदी योग्य होती.अशा या मर्दमराठ्यास मानाचा मुजरा.