9 April 2014

आपल्या सर्वांचे शिवराय !!

          आमचं शिवरायांवरचे प्रेम वयाच्या नवव्या वर्षी, चौथीच्या पुस्तकातील अफ़झल खानाच्या चित्रावर पेनाने गिचमिड कालवा करून सुरु झालं. त्याचवेळी चौथीत पहिल्यांदाच कळलं कि वर्गातला नौशाद् शेख आपल्यातला नाही. हे म्हणजे अफाटच होतं, आजपर्यंत आमच्या घोळक्यात तुमच्या-आमच्यासारखाच­ असणारा, मिसळणारा आणि आरेला कारे करणारा नौशाद एकदमच परका झाला होता. आम्ही काही गोष्टी फक्त तो नसतानाच बोलायला लागलो. त्याच्या समोर शिवाजी महाराजा विषयी प्रेम व्यक्त करायला कचरू लागलो. हे त्याने पण लगेच समजून घेतले असावे. कारण त्याच्या वागण्या बोलण्यात आपोआप बदल झाला होता. जरा मोठे झालो कि कळते कि आपला धर्म आणि जात आपल्या रक्तातच आहे, लहानपणी ते रक्त वेगळे असते का कुणास ठावूक ? पण मोठेपणी प्रत्येक जण आपल्या आपल्या परीने आपल्या रक्ताचा, रक्तात भिनलेल्या संस्कृतीचा, आपल्या रक्ताशी मिळतेजुळते रक्त असणाऱ्या (जातभाई ) नेत्यालाच आदर्श मानायला चालू करतो. आणि ह्याच वेळी चालू होते दुसर्या जाती - धर्माच्या नेत्यांचा त्या-त्या लोकांच्या समोर अतोनात आदर करणे. मग अश्या तर्हेने परतफेड चालू होते, कुणी आंबेडकरांचे गोडवे गातो, कुणी शिवाजी महाराजांचे, कुणी मौलाना आझाद, टिपू सुलतान किंवा भगवानबाबा. दहावी पर्यंत येस्तोवर कळले कि आपण समाजात असताना सर्वधर्म समभाव असतो आणि सजातीय लोकामध्ये असताना आपली जात आणि धर्म संकटात आलेला असतो. बहुतेक लोक हे अश्या तर्हेचे सोंग घेवून समाजात वावरत असतात आणि वरून मी जातीभेद धर्मभेद मानत नाही असे सांगताना "त्या" लोकानी एवढे माजल्यावणी करायला नाही पाहिजे असे सल्ले पण देत असतो.
हळू हळू दहावी पर्यंत नौशादचा ग्रुप वेगळा झाला व आमचा वेगळा. तरी पण क्रिकेट खेळायला, गणपतीची वर्गणी मागायला तो आमच्यात असायचाच. पण आमच्या लक्ष्यात येवू लागले कि प्रत्येक वेळी याला आपण देशाशी कसे इमानदार आहोत, हिंदू धर्माचे शत्रू नाही आहोत हे सिद्ध करावे लागत आहे किंवा तोच स्वता:हून सिद्ध करायचा प्रयत्न करतोय. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात सईद अन्वरला आमच्या पेक्ष्या एक शिवी तो जास्तच द्यायचा. डोक्याला नेमाटी वोढून शिवजयंतीची वर्गणी मागताना शिवाजी महाराजा बद्दलचा त्याचा आदर आम्हाला नेहमी जास्तच वाटायचा. चुकून आम्ही कधी "शिवाजी" बोललो तरी तो फक्त "महाराजाच" म्हणायचा. अर्थात त्याच्या आदराविषयी अजिबात शंका नाही पण आमच्या इतर मित्रापेक्षा त्याचे योगदान नेहमीच जास्त असायला पाहिजे असा त्याचाच दंडक होता. असा दंडक त्याने का करून घेतला असेल याचे उत्तर आजच्या अल्पसंख्यांक आणि बहुसंख्याक ह्या दोन सज्ञे मध्ये आढळेल. त्यांनी इथे राहावे पण आम्ही सांगेन तसेच दुय्यम नागरिकत्व पत्करून राहावे हि आपली सुप्त पण कधी कधी उतू येणारी भावना. एकुणातच हे राज्य आमचे आहे हि भावना जणतेमध्ये निर्माण करणे हे म्हणजे धोरणात्मक रित्या शिवाजी महाराजांच्या विचारणा मूठमाती देण्यासारखे आहे.
शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीकडे बघताना सर्वसामान्य मराठी माणूस हा अफजलखानाचा वध, आग्र्याहून सुटका, पुरंदरचा तह, आणि भवानी तलवार ह्या पुढे जाताना दिसत नाही तर अमराठी माणूस हा मराठ्यांचे राज्य, लुटारूंचे राज्य अश्या कुत्सित नजरेनेच बघताना दिसतो. ह्याला मूळता आपली शिक्षण पद्धती आणि राजकारणच कारणीभूत असले पाहिजे. शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीकडे स्वतंत्ररित्या पाहता येवू शकणार नाही. हिंदुस्थानमध्ये दक्षिण उत्तर आणि पशिच्म पूर्व पसरलेल्या मुस्लिम राजवटीमध्ये संपूर्ण प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत स्वराज्य निर्मिती करणारा, हे राज्य राजाचे नाही तर रयतेचे आहे असे देशप्रेम रयतेच्या मनात निर्माण करणारा तो एकमेव राजा होवून गेला. शिवाजी महाराजांनी स्वता:साठी फक्त कार्यकर्ते नाहीत तर आपल्या पाठीमागे राज्य सांभाळतील असे नेते तयार करून एक स्वराज्याचा विचार दिला होता म्हणूनच सह्याद्रीच्या कुशीत तयार झालेले ह्या छोट्याश्या स्वराज्याने पुढे जावून आपली सीमा उत्तरेकडे अफघानिस्तान पर्यंत तर दक्षिणेला तामिळनाडू पर्यंत पोहचवली.
शिवाजी महाराजांच्या कारकीर्दीनंतर नंतर जवळ जवळ पावणे चारशे वर्षांनी जर आजच्या समाजाकडे आणि राज्यव्यवस्थेकडे पाहिले तर ढोबळ मानाने आपण असे म्हणू शकतो कि आपण शिवाजी महाराजांच्या स्वातंत्र्याच्या, समानतेच्या, न्यायाच्या, कायद्याच्या राज्याच्या आणि स्वराज्याच्या संकल्पनेला तिलांजली दिलेली आहे. शिवाजी महाराजांचा वारसा सांगणारे आणि शिवाजी महाराजांच्या नावाने सत्ता मागणारे महाराजांचा नेमका कोणता विचार रुजवू पाहत आहेत हेच कळत नाही. आजचा काळ मला शिवपूर्व काळाची आठवण करुण देत आहे. मुघलांनी आणि इतर दक्षिणेतल्या शाह्यांनी जसे सरंजामशाहीला प्रोत्साहन देवून हिन्दुस्थानवरचि आपली पकड मजबूत केली होती तशीच पकड लोकशाही मार्गाने दिल्लीच्या राज्यकर्त्यांनी खानदानी सरंजाम निर्माण करून आपले राज्य चिरायू करण्याचा प्रयत्न केला आहे. त्या वतणासाठी झालेल्या लढाया आपण कधी कधी पाहतो पण त्यामुळे वरच्या सल्तनतीला काहीच फरक पडत नाही.
प्रत्येकाने आपल्या सोयीनुसार शिवाजी महाराजांना वापरले आहे, त्यामुळे कुणासाठी शिवाजी महाराज हिंदुत्ववादी असतात, कुणासाठी मराठी, कुणासाठी मराठा तर एखाद्याला राजपूत आहे म्हणून मिरवून घेण्यात कौतुक वाटते. आजच्या पिढीमध्ये शिवाजी महाराजांचे विचार रुजवायचे असतील तर अगोदर शिवाजी महाराजाविषयीचे लोकामध्ये असलेले गैरसमज दूर करायला हवेत. ते देवाचा अवतार नव्हते तर ते एक तुमच्या आमच्यासारखेच हाडामासाचे माणूस होते व स्वकष्टातून आणि जिजाऊ-शहाजी राजांच्या मार्गदर्शनातून त्यांनी स्वराज्य निर्मिती केली होती. त्यांचे राज्य हे कुणा धर्माच्या विरोधात नाही तर ते स्वकीयांचे राज्य होते, अफझल खानाला मारणे हा त्यांचा धर्म होता कारण तो स्वराज्यावरचे संकट होता पण त्याची कबर प्रतापगडाच्या पायथ्याशी बांधणे हा सुद्धा महाराजांचा धर्म त्यांनी पाळला होता. सतराव्या शतकामध्ये जातीपातीची उतरंड असताना त्यांनी सर्व जातीच्या आणि धर्माच्या लोकांना आपल्या सैन्यात आणि प्रशासनात स्थान देवून समतेच्या राज्याची स्थापना करताना आपण धोरणी आणि दूरदृष्टी असलेले राजे आहोत हे दाखवून दिले होते.
आजच्या पिढीमध्ये शिवाजी महाराजांचे एवढे गुण जरी आपण रुजवू शकलो तरी पुढे शिवाजी महाराजांचा वापर कुणी जातीय, धार्मिक व राजकारणातील दंगलीसाठी करायचा प्रयत्न करताना हजार वेळा विचार करील आणि नौशाद पुढे त्याच्या मित्रांना महाराजा विषयी बोलताना अडखळण्याची गरज पडणार नाही किंवा किंवा नौशादाला त्याची इमानदारी सिद्ध करण्यासाठी सईद अन्वरला एक शिवी मुद्दामहून जास्त द्यावी लागणार नाही.

संदर्भ- http://vikasgodage.blogspot.in.
लेखक - विकास गोडगे सर.