2 February 2014

भारतातील पहिल्या महिला संपादिका : तानुबाई बिर्जे

            कृष्णाजी भालेकर यांनी १८७७ मध्ये सुरू केलेल्या ‘दिनबंधु’ या वृत्तपत्राचं संपादकपद 1906 ते 1912 या काळात तानुबाई बिर्जे यांनी साभाळलं. महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील त्या पहिल्या संपादिका ठरल्या. महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रभाव असलेल्या तानुबाईंनी संपादक म्हणून आपल्या अग्रलेखातून समाजातील विषमतेवर प्रहार करून त्याची चिरफाड केली. बहुजन शिक्षणाचा विचार मांडला. नाविन्यपूर्ण विषय हाताळले. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला महाराष्ट्राच्या प्रबोधनात महत्त्वाची भूमिका बजावणा-या तानुबाईंची ही ओळख..
     तानुबाई बिर्जे हे नाव महाराष्ट्रात परिचित नाही. अलिकडच्या काळात तानुबाईंना महाराष्ट्रात फारसे कुणी ओळखत असल्याचे ऐकिवात नाही. तानुबाई आणि त्यांचे ‘दिनबंधु’ वृत्तपत्र यांची दखल वृत्तपत्रसृष्टीच्या इतिहासातही फारशी कुणी घेतली नाही. सत्यशोधक चळवळीतील विचारांशी बांधिलकी असणा-या अनेक वृत्तपत्रांची दखल मराठी वृत्तपत्रसृष्टीने घेतली नाही. मात्र, ज्यावेळी महिलांना चूल आणि मूल यापलीकडे पाहिलं जात नव्हतं, अशा काळात तानुबाईंनी सत्यशोधकीय पत्रकारितेची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आणि ती चोखपणे बजावली. हे समजलं तर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसू शकतो. सत्यशोधकीय चळवळ ही महात्मा जोतिबा फुलेंनी सुरू केली आणि त्यांना अनेक ब्राह्मणेतर समर्थक लाभले. ‘दिनबंधु’चे पहिले संस्थापक-संपादक कृष्णाजी भालेकर यांनी 1877 ध्ये सुरू केलेल्या या वृत्तपत्राचं नंतरच्या काळात संपादन तानुबाई बिर्जे यांनी उत्कृष्टरीत्या केलं होतं. त्या भारतातील पहिल्या महिला संपादक ठरल्या. परंतु भारतातीलच नव्हे तर जगातील त्या पहिल्या संपादक असाव्यात, असा निष्कर्ष काढला जात आहे. त्या काळात भारतातील पहिल्या महिला संपादक म्हणून त्यांचं नाव गाजलं, परंतु पत्रकारितेच्या इतिहासाने तानुबाईंची योग्य प्रकारे दखल घेऊन त्यांना प्रकाशझोतात ठेवलं असतं तर आज हजारो महिला पत्रकारिता क्षेत्रात पुढे आल्या असत्या.
          महात्मा फुलेंचे सहकारी व शेजारी देवराव ठोसर यांची कन्या व सावित्रीबाई फुले यांची मानसकन्या तानुबाईंचा जन्म 1876 मध्ये पुण्यात झाला. त्यांचं शिक्षण वेताळपेठेतील महात्मा फुलेंच्या शाळेत झालं, तर 26 जानेवारी 1893 रोजी पुण्यामध्ये वासुदेव लिंबोजी बिर्जे यांच्याशी सत्यशोधकीय पद्धतीने त्यांचा विवाह झाला. वासुदेव बिर्जे यांनी बडोदा सरकारमध्ये त्यांनी 1894 ते 1905 अशी अकरा वर्षे ग्रंथपाल म्हणून कार्य केलं. त्यानंतर नोकरीचा राजीनामा देऊन ‘दिनबंधु’ हे वृत्तपत्र 1897 मध्ये पुन्हा सुरू केलं. कृष्णाजी भालेकर यांनी 1 जानेवारी 1877 रोजी सुरू केलेलं हे वृत्तपत्र आर्थिक अडचणीत सापडल्यामुळे बंद पडलं होतं. 1880 मध्ये नारायण मेघाजी लोखंडे यांनी ते मुंबईतून सुरू केलं. त्यानंतर 1897 मध्ये बिर्जे यांनी त्याची जबाबदारी घेतली व ते 1906 पर्यंत चालवलं, मात्र 1906 मध्ये प्लेगने त्यांचा मृत्यू झाला तेव्हा ते वृत्तपत्र पुन्हा बंद पडते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली. मात्र पतीनिधनानंतर डगमगून न जाता प्रबोधनाचे कार्य तानुबाई बिर्जे यांनी पुढे चालू ठेवले. तानुबाईचे वडील देवराव ठोसर हे महात्मा फुले यांचे सहकारी आणि सत्यशोधकच होते. महात्मा फुले यांच्या घराशेजारीच त्यांचं घर होतं. त्यामुळे फुले दांपत्याचा सहवास तानुबाईंना लहानपणीच मिळाला. वडील ठोसर व पती बिर्जे यांच्या संस्कारातून तयार झालेल्या तानुबाईंनी ‘दिनबंधु’ चालवायला घेतले आणि जगातल्या पहिल्या संपादक बनण्याचा लौकिक मिळवला. हे वृत्तपत्र त्यांनी 1906 ते 1912 पर्यंत अतिशय चांगल्या प्रकारे चालवून संपादिका म्हणून आपल्या कार्याचा ठसा उमटवला. 
           तानुबाईंनी त्यांच्या संपादकपदाच्या कारकीर्दीत ‘दिनबंधु’मध्ये सत्यशोधक चळवळीच्या वृत्तांवर भर दिला. समाजाला आत्मभान यावे म्हणून जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची वचने ‘दिनबंधु’मध्ये छापली. तुकाराम महाराजांचे अभंग अग्रलेखाच्या शिरोस्थानी प्रसिद्ध करून तानुबाईंनी एका अर्थाने ‘दिनबंधु’चे उद्दिष्ट कथन केले होते. वासुदेव राव बिर्जे यांनी सातत्याने बहुजनांच्या सर्वागीण उन्नतीसाठी शिक्षणाच्या अनुषंगाने विचार मांडले तर तानुबाईंनी बहुजन शिक्षण पॅटर्नसह विविध विषयांवर लेखन केले. समाजजागृतीच्या हेतूने 1912 मध्ये ‘दिनबंधु’मध्ये एक नाविन्यपूर्ण विषय हाताळण्यात आला आहे. देशाच्या स्वातंत्र्याची पहाट उजाडण्यास मोठा अवधी असताना त्यांनी भारतासारख्या खंडप्राय देशात लोकशाही शासनप्रणाली अंमलात आणण्यासाठी हिंदुस्तान लायक आहे का, असा प्रश्न उपस्थित करून अभ्यासू लेखमाला प्रसिद्ध केली. अग्रलेखाच्या मांडणीवरून तानुबाईंच्या प्रतिभेची झेप किती मोठी होती, याची कल्पना येते. 
               तानुबाईंच्या एकूण लेखमालेवर फुले, भालेकर, लोखंडे आणि बिर्जे यांच्या लेखनाचा प्रभाव जाणवतो. 27 जुलै 1912 च्या अंकातील ‘मुंबई इलाक्यातील लेजिस्लेटिव्ह कौन्सिल आणि बहुजन समाज’ हे तनुबाईंचे आणखी एक असाधारण ऐतिहासिक, राजकीय आणि धारदार संपादकीय आहे. या संपादकीयामध्ये तानुबाई म्हणतात, ‘कायदे कौन्सिलात बहुजन समाजाच्या हिताविषयी अनास्था दिसून येत आहे. या अनास्थेचे कारण शोधण्यास दूर जावयास नको. मराठीत एक म्हण अशी आहे की, ज्याचे पोट दुखेल तो ओवा मागेल. बहुजन समाजाच्या दु:खांनी हल्लीच्या कौन्सिलातील लोकनियुक्त अथवा सरकारी सभासदांचे पोट दुखत नाही. कारण त्यांचा बहुजन समाजाशी निकटचा संबंध नाही. श्रीमंत आणि गरीब या भेदाशिवाय हिंदुस्थानात नाना जाती आणि पंथ आणि धर्म यांचे जाळे पसरलेले आहे. या अनेक भेदांनी बहुजन समाजास या देशात राजकीय अस्तित्वच नाही, असे म्हटले असता चालेल. याप्रमाणे कायदे कौन्सिलात किंबहुना सरकार दरबारात ज्या लोकांचा प्रवेश होऊ शकतो अथवा होत आहे, त्या लोकांच्या आणि बहुजन समाजाच्या चालीरीती व आचार-विचार यामध्ये महद अंतर असल्यामुळे कौन्सिलात सभासदांस या मुक्या समाजाची ओरड ऐकू जावी कशी अणि त्यांनी सरकारपाशी या मुक्या समाजाचे पोट दुखत आहे म्हणून ओवा मागावा कसा हा एक मोठा प्रश्न आहे. याचे कारण काय? याचे कारण हेच की, ‘तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे, येरा गबाळाचे काम नाही, न ये नेत्रांजळ, नाही अंतरी कळवळा’. 
           तानुबाईंनी समाजातील विषमतेवर प्रहार करून त्याची चांगलीच चिरफाड आपल्या अग्रलेखातून केली. सत्ता चिरंतन राहावी म्हणून चार वर्णाचा पुरस्कार करणा-या मनुस्मृतीला राजघराण्यांनी आपलेसे केले. त्यामुळे समाजात विषमता निर्माण झाली. मात्र, गौतम बुद्धाच्या कालखंडात समता प्रस्थापित झाल्याचे नमूद करून त्यांनी पुढे म्हटले आहे, ‘शंकराचार्यानी मंडनमिश्रावर मिळवलेल्या विजयानंतर पुनश्च वेदांत बोकाळला. ब्राह्मण हा देवांचाही देव समजला जावा, अशा प्रकारची योजना, ब्राह्मण हिंदुशास्त्राकारांनी करून ठेवलेली आहे. परंतु, फार पुढे इंग्रजांचे राज्य देशावर चालून आले. इंग्रजांनी समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी केलेल्या सुधारणांचा आढावा घेऊन याविरोधात येथील उच्चवर्णीयांनी समान हक्कांची मागणी करून स्वहितासाठी राष्ट्रीय सभा (काँग्रेस) स्थापन केली.’ यावरून तानुबाईंची सामाजिक जाणीव, बहुजनांच्या उत्थानासाठी तळमळ आणि देशातील सामाजिक सुधारणांसाठी वृत्तपत्राच्या माध्यमातुन तानुबाईंची सामाजिक जाणीव, बहुजनांच्या उत्थानासाठी तळमळ आणि देशातील सामाजिक सुधारणांसाठी वृत्तपत्राच्या माध्यमातून प्रबोधन करण्याचे ध्येय यांची कल्पना येते. एक अत्यंत यशस्वी, सक्षम संपादक म्हणून त्यांचे नाव मराठी पत्रकारितेच्या इतिहासात नक्कीच सुवर्णाक्षरांनी लिहावे लागेल.