Showing posts with label संत महात्मे. Show all posts
Showing posts with label संत महात्मे. Show all posts

20 April 2014

महाराष्ट्राचे हृदयसम्राट : ज्ञानराज

               संत ज्ञानेश्वरांचा जन्म इ.स. १२७५ मध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत व आईचे नाव रुक्मिणीबाई असे होते. विठ्ठलपंतचे मूळ घराणे पैठणजवळील आपेगावचे; पण पुढे ते आळंदी येथे स्थायिक झाले. ज्ञानेश्वर जन्मले ते सनातनी समाजाचा शाप घेवूनच. ‘संन्याशाचा मुलगा’ हा शिक्का त्यांच्या कपाळावर समाजाने मारला होता. त्यांचे वडील विठ्ठलपंत कुलकर्णी यांनी काही काळ संन्यास घेतला आणि नंतर गुरूच्या आज्ञेवरून परत ते संसारात आले. त्यानंतर त्यांना निर्वृतीनाथ, ज्ञानदेव, सोपानदेव, मुक्ताबाई अशी चार मुले  जन्माला आली. कर्मठ व नतद्रष्ट समाजाला ते पाहवले नाही. त्याने या कुटुंबाला बहिष्कृत करून कुटुंबाचे स्वास्थ हिरावून घेतले. तरीपण निष्ठुर समाजाने त्या चार अनाथ लेकारांनाही छळले.
आपेगाव हे औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणजवळ गोदावरी नदीच्या काठावर वसलेले छोटे गाव आहे. विठ्ठलपंत तीर्थयात्रा करत करत श्री क्षेत्र आळंदी मुक्कामी येऊन स्थायिक झाले. आळंदी हे सिद्धपीठ होते. त्या काळी संन्यासाची मुले म्हणून सर्व समाज या चौघा भावंडांची हेटाळणी करीत असे. परित्यक्त ब्राह्मण म्हणून त्यांना काळ कंठावा लागला. श्रीज्ञानेश्र्वरांच्या आई-वडिलांनी देहांत प्रायश्र्चित घेतले.
ज्ञानराज माऊली..
        संत ज्ञानेश्वर म्हणजे महाराष्ट्राचे एक अनमोल रत्न ! महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनातील, परमार्थाच्या क्षेत्रातील ‘न भूतो न  भविष्यति’ असे अजोड व्यक्तिमत्त्व व अलौकिक चरित्र म्हणजे संत ज्ञानेश्वर! गेली सुमारे ७४० वर्षे महाराष्ट्रातील सर्व पिढ्यांतील, सर्व स्तरांतील समाजाने जे व्यक्तिमत्त्व आपल्या मनोमंदिरात एक अढळ श्रद्धास्थान म्हणून जपले आहे आणि जे श्रद्धास्थान पुढील असंख्य पिढ्यांतही कायमच अढळ व उच्चस्थानी राहणार आहे; असे एकमेवाद्वितीय व्यक्तिमत्त्व म्हणजे श्री संत ज्ञानेश्वर!
          अलौकिक काव्य प्रतिभा लाभलेला रससिद्ध महाकवी, महान तत्त्वज्ञ, श्रेष्ठ संत, सकल विश्र्वाचे कल्याण चिंतणारा भूतदयावादी परमेश्वरभक्त, पूर्ण ज्ञानाचे मूर्तिमंत प्रतीक, श्रीविठ्ठलाचा प्राणसखा - अशा शब्दांत त्यांचे वर्णन केले जाते. परंतु त्यांचे परिपूर्ण वर्णन करण्यासाठी शब्द अपुरे पडल्याचेही जाणवते. संत चोखामेळा पुढील शब्दांत त्यांना वंदन करतात.
‘कर जोडोनिया दोन्ही। चोखा जातो लोटांगणी।।
महाविष्णूचा अवतार। प्राणसखा ज्ञानेश्वर।।’ 
             प्राणसखा' हा अतिशय वेगळा, सुंदर व समर्पक शब्द चोखोबांनी संत ज्ञानेश्वरांबद्दल वापरला आहे.
संत ज्ञानेश्वरांविषयी तुकोबा म्हणतात...
ज्ञानियांचा गुरु राजा महाराव । म्हणती ज्ञानदेव तुम्हां ऐसें ॥१॥
मज पामरा हे काय थोरपण । पायींची वाहान पायीं बरी ॥२॥
ब्राह्मादिक जेथें तुम्हां वोळगणें । इतर तुळणे काय पुढं ॥३॥
तुका म्हणे नेणें युक्तीची ते खोली । म्हणोनी ठेवीली पायीं डोई ॥४॥
तर नामदेव महाराज ज्ञानेश्वरांबद्दल उद्गारतात...
ज्ञानराज माझी योगियांची माऊली । जेणे निगम वल्ली प्रगट केली ॥१॥
गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी । ब्रह्मानंद लहरी प्रगट केली ॥२॥
अध्यात्म विद्येचे दाविलेसे रुप । चैतंन्याचा दिप उजळला ॥३॥
नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी । एक तरी ओवी अनूभवावी ॥४॥
ज्ञानराज म्हणजे माय मराठीचे हृदय !
          श्री निवृत्तीनाथ हेच संत ज्ञानेश्र्वरांचे सदगुरू होते. ज्ञानेश्वरांनी भगवद् गीतेवर  प्रख्यात टीका लिहिली.या ग्रंथास ‘ज्ञानेश्वरी’ किंवा ‘भावार्थदीपिका’ असे म्हणतात. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून संस्कृत भाषेतील ‘ज्ञान’, श्री संत ज्ञानेश्वरांनी प्राकृत भाषेत आणले.
माझा मराठाचि बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके।
ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।। 
               असे म्हणत त्यांनी मराठी भाषेविषयीचा अभिमान, मराठीची महती व्यक्त केली आहे. सर्व स्तरांतील लोकांना ही ‘ज्ञानेश्वरी’ भुरळ घालते. मराठी भाषेतील हा अद्वितीय ग्रंथ आहे. विचार, भावना, आशयाची खोली, अलंकाराचे श्रेष्ठत्व, अद्वैतानुभूती, भक्तीचा ओलावा, रससंपन्नता या सर्वच बाबतीत ज्ञानेश्वरीने उंची गाठलेली आहे. ‘पसायदान’ ही विश्वकल्याणाची प्रार्थना म्हणजे संत ज्ञानेश्वरांच्या वैश्विक सद्भावनेचा, तसेच प्रतिभेचा परमोच्च साक्षात्कार आहे. कर्मयोग, ज्ञानयोग व भक्तियोग सांगणार्‍या ग्रंथराज ज्ञानेश्वरीत सुमारे ९००० ओव्या आहेत. हा ग्रंथ इ.स. १२९० मध्ये लिहिला गेल्याचे मानले जाते.
पुर्वी गीता ही संस्क्रुत भाषेमध्ये होती. ही संस्क्रुत भाषा सर्वसामान्य मराठी माणसाला समजत नव्हती. म्हणूनच ज्ञानेश्वरीच्या रुपाने हीच गीता ज्ञानेश्वरांनी प्रथम मराठीमध्ये आणली. इ.स.१२७५ मध्ये जन्मलेल्या संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेले पसायदान आजही भारतात म्हंटलं जातं.ज्ञानेश्वर  केवळ गीतेचे भाष्यकारच नव्हते तर लेखक आणि कवीही होते.भागवत धर्माला त्यांनी तात्विक अधिष्ठान दिले.संस्क्रुत भाषेच्या वर्चस्वाच्या काळात सामान्य माणसाला मराठीतून आध्यात्मज्ञान उपलब्ध करून मराठी भाषेला प्राधान्य मिळवुन दिले.
           त्यांचा दुसरा ग्रंथ ‘अनुभवामृत’ किंवा ‘अमृतानुभव’ होय. हा विशुद्ध तत्त्वज्ञानाचा ग्रंथ आहे. सुमारे ८०० ओव्या या ग्रंथात आहेत. तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने हा श्रेष्ठ ग्रंथ आहे. वाङमयीन सौंदर्य व गुणविशेषांबरोबरच मराठीचा अभिमान, संयम, उदात्तता, नम्रता, त्यांचे निर्मळ चारित्र्य, सर्वसमावेशकता, वात्सल्य, भक्तिपरता आणि कालातीतता - असे अनेक गुणविशेष त्यांच्या साहित्यातून आपल्याला अनुभवण्यास मिळतात. ज्ञानदेवांसह सर्व भावंडांवर तत्कालीन समाजाने प्रचंड अन्याय केला, पण त्या अन्यायाबद्दलची पुसटशी प्रतिक्रियादेखील त्यांच्या साहित्यात आढळत नाही, हे त्यांच्या मनाचे मोठेपणच.!
        ‘जो जे वांछिल, तो ते लाहो’ असे म्हणत अखिल विश्वाची जणू काळजी वाहणार्‍या संत ज्ञानेश्वरांना वारकरी संप्रदायासह सर्वच भक्त प्रेमाने ‘माउली’ म्हणतात. त्यांनी धर्मातील क्लिष्ट अवडंबरे काढून धर्माला कर्तव्याचा वेगळा अर्थ दिला. वाङ्मय निर्मितीबरोबरच त्यांनी आध्यात्मिक लोकशाहीचे बीज रोवण्याचा यशस्वी प्रयत्न चंद्रभागेच्या वाळवंटात केला. भागवत धर्माचा तथा वारकरी संप्रदायाचा पाया रचण्याचे अभूतपूर्व कार्य त्यांनी केले. संत नामदेव, संत गोरोबा कुंभार, संत सावतामाळी, संत नरहरी सोनार, संत चोखामेळा या समकालीन संत प्रभावळीचे अनौपचारीक नेतृत्व करत, संत ज्ञानेश्वरांनी अध्यात्माच्या क्षेत्रात समानता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला.
महाराष्टातील वारकरी संप्रदायची प्रतिष्ठापणा ज्ञानेश्वरांनी केली. त्यांनी समाजातल्या सर्व लोकांना भागवत पंथाच्या झेंड्याखाली एकत्र आणले. ज्ञानेश्वरांच्या काळात  नाम शिंपी, नरहरी सोनार, सावता माळी, कान्होपात्रा असे कित्येक भागवत भक्त अभंगरचना करत होते. हे वारकरी कोणालाही श्रेष्ठ-कनिष्ठ मानत नव्हते. ज्ञानदेवांनी लोकांना भक्तीचा सोपा मार्ग दाखवला. परमेश्वरला तुमच्याकडून काही नको असते. देव भक्त भावाचा भुकेला असतो तुम्ही मनापासून भक्ती करा. त्यासाठी पुजा व अर्चेचे अवडबर  माजवण्याची  गरज नाही. केवळ नामस्मरण करा, देव तुमच्यावर प्रसन्न होईल. ज्ञानेदेव जरी मोठे तत्त्वज्ञ होते तरी ते रुक्ष स्वभावाचे नव्हते. उलट त्यांच्या वागणुकीत सर्वांना आईचे वात्सल्य दिसायचे. म्हणूनच सर्वच भक्त ज्ञानेश्वरांना प्रेमाने ‘माउली’ म्हणतात. 
        ‘अमृतानुभव’ या ग्रंथाच्या लेखनानंतर संत ज्ञानेश्वरांनी तीर्थयात्रा केली. संत नामदेव महाराजांच्या ‘तीर्थावली’ मध्ये या तीर्थयात्रेचा उल्लेख आढळतो. या यात्रेनंतर माउलींनी समाधी घेण्याचा निर्णय घेतला. संत नामदेवांच्या ‘समाधीच्या अभंगां’मध्ये तत्कालीन संदर्भ सापडतात. अन्य संतांची मानसिक स्थिती, त्यांच्यासह समाजाला झालेले दु:ख, खुद्द नामदेव महाराजांच्या वेदना, ज्ञानेश्वरांचा संयम आणि निग्रह या सर्व गोष्टींचे प्रतिबिंब समाधीच्या अभंगांत आढळते.
        ज्ञानेश्वरांनी केवळ मराठी साहित्यालाच नाही तर संपुर्ण जनमाणसाला दिलेली अम्रुतवाणी लोकांच्या चिरकाल स्मरणात राहिल. ते सांगत असलेले तत्वज्ञान सनातनी लोकांना समजत नव्हते, की त्यांचा विरोध होता की कोनते कारण होते. त्यांच्या समाधीपणात ते अल्प काळात समाधिस्त झाले. त्यांचे समाधी घेणे म्हनजे न उलघडलेलं कोडंच आहे. आज श्री ज्ञानराजांचे समाधीजीवन असे या महापुरुषाचे लोकोत्तरत्व दर्शविणारे वेगळे कार्य सदभक्तांद्वारे अहमहमिकतेने प्रचारिले जाते. त्याब बाबत कोणी शब्द काढला तरी तो द्वेषी वा तिरस्कारणीय नास्तिक ठरतो.पण मराठीजन म्हणून एवढं मात्र नक्की वाटते की ज्ञानराज जर अजुन काही दिवस जिवंत राहिले असते तर मराठी भाषेला अजुन मोठ्या दर्जाची सम्रुद्धी प्राप्त झाली असती यात काही एक दुमत नाही. असा हा महान ज्ञानसुर्य इ.स.१२९६ ला आळंदी इथे समाधिस्त झाला.
संदर्भ :
मराठी संतांचा परमार्थमार्ग [गुरुदेव रानडे].
संत आणि समाज [पद्मश्री का.कारखानीस ].
संतश्रेष्ठ तुकोबांच्या अभंगाचा गाथा [शासकीय].
आंतरजालावरील काही संकेतस्थळे.
दैनिक देशोन्नती [आत्मोन्नती गुरुवार,दि.२० नोव्हेंबर २००८].

28 March 2014

संतश्रेष्ठ तुकोबा : वैकुंठगमन की खुन ? [भाग तीन]

तुकोबांचे वैकुंठगमन आणि जिजा-कान्होबा.
आपण हे क्षणभर धरून चाललो की "संतात कीर्ति केली । तनु सायुज्यी नेली ॥"असे हे सदेह वैकुंठगमनाचे अदभुत व अपुर्व भाग्य एकट्या तुकोबांच्याच वाट्याला आले होते.तेंव्हा अशा या भाग्यशाली परिवाराकडे देहुच्याच नव्हे तर आजुबाजुच्या लोकांनीदेखील केवढ्या आदराने, किती आत्मियतेने पाहिले असते. तुकोबांच्या पुण्यपावन कुटुंबियांना कसे डोक्यावर घेऊन नाचवले असते. तळहाताच्या फ़ोडाप्रमाणे वागवले असते. त्यांच्यावर प्रेमाचा व सुखांचा वर्षाव केला असता. तुकोबांचे एखादे भव्य स्मारक उभारून तेथे नित्यमहोत्सवाचा कसा जल्लोष उडवून दिला असता आणि तुकोबांची अम्रुतवाणी मिळेल तेथून संग्रहीत करुन तो प्रचंड गाथा कसा अगदी सुरक्षीत करून ठेवला असता. त्या पुण्यस्थळाची माती मस्तकी  लावण्यासाठी व अभंग उतरून नेण्यासाठी दर्शकांची कशी रीघ लागली असती. अगदी स्वाभाविकपणेच हे सारे घडणे अनिवार्य होते. परंतू असे काही घडले आहे का ? ऐतिहासिक आधार काय सांगतात ? आपणास आश्चर्य वाटेल की इतिहास याबाबतीत स्पष्टपणे विरुद्ध साक्ष देत आहे.
           इतिहास स्वच्छ सांगतो की संतश्रेष्ठ तुकोबांच्या निर्वणानंतर महिना-दोन महिन्यातच तुकोबांच्या संपुर्ण परिवाराला देहू गाव सोडून जाणे भाग पडले. संपुर्ण कुटुंबाला देहुतून परागंदा व्हावे लागले. तुकोबांच्या निर्वाणानंतर जिजाबाई आपल्या लहान मुलास घेऊन खेडला जाऊन राहिल्या.कान्होबा सुदुंबरे येथे जाऊन राहिले.त्यामुळे विठ्ठलटिके पडिक राहिले (तु.संतसांगाती-मंबाजी). मंबाजीकडे नुसत्या देवाच्या पुजेऐवजी देऊळवाड्याची वगैरे सर्वच व्यवस्था आली होती. अशा व्यवस्थेत ती मंडळी देहुत राहणे शक्य नव्हते.’ (तु.सं.सां.-बहिना) कचेश्वर ब्रम्हे यांना, निर्वाणानंतर एक-दिड तपाने देहूस १०-५ अभंगाखेरीज तुकोबांची अम्रुतवाणीही मिळू शकली नाही. (तु.सं.सां.-कचेश्वर). तुकोबांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या निर्वाणानंतर तडकाफ़डकी गाव का सोडले, याचा संकेत कान्होबांच्या तत्कालीन अभंगातच मिळतो. आपल्या शोकमय अभंगात ते त्यावेळचे नि:सहाय व भयास्पद वातावरण सुचित करतात की-
आक्रंदती बाळे करूणावचनी । त्या शोके मेदिनी फ़ुटो पाहे ॥(२९८८)
असो आता काई करोनिया ग्लांती ? कोणा काकुलती येईल येथे ?
करिता रोदना बापुडे म्हणती । परि नये अंती कामा कोणी ॥ (२९९०)
माझे बुडविले घर । लेकरेबाळे दारोदार ।
लाविली काहार । तारातीर करोनि ॥(३००६)
काही विपत्ती अपत्या । आता आमुचिया होता ।
काय होईल अनंता ? पाहा,बोलों कासया ? ॥(३०११)
              अर्थात आपली मुलेबाळे सुद्धा निराधार झाली, दारोदार लागली व त्यांचेवर कोणत्या क्षणी काय विपत्ती कोसळेल याचा नेम उरला नाही, या भयग्रस्त भावनेनेच प्रिय पुत्रबंधुंनी आपली जीवाभावाची भुमी ताबडतोब सोडली हे स्पष्ट दिसून येते.
         त्यातही विचार करण्यासारखी गोष्ट ही की,तुकोबांच्या परिवारापैकी एकाही व्यक्तीने पुढील वीस-एकवीस वर्षात देहूच्या भुमीवर पाऊल सुद्धा टाकले नाही. आपल्या महान पित्रुदेवताच्या वार्षिक निर्वाणमहोत्सवाला देखील नाही ! आणि हा उत्सव तरी होत होता कोठे ? जिजाईच्या म्रुत्यु नंतर एकवीस वर्षाचा नारायणबुवा बंधुसह देहुस आला. तो देखील कचेश्वर यांच्या सत्पुरुषाने त्यांना प्रेरित केल्यानंतर. तुकोबांच्या मुलांनी पुन्हा देहुस ठांण दिल्यानंतर तिकोबांबद्दल जाग्रुती निर्माण झाली. विशेषत: तुकोबांचे व्रुंदावन नारायणबाबाने इ.स.१७०४ मध्ये बांधून पुण्यतिथी साजरी करावयास लागल्यानंतर तुकोबांचा किर्तीमहिमा वाढण्यास आधिकाधिक भर पडू लागली. (सं.तु.प्रास्ताविक प्रु.८) त्यापुर्वी महादेव, नारायण आदि तुकोबांच्या सुपुत्रांनी नुसती देहुच सोडली होती असे नव्हे तर विठठल देव देखील सोडला होता. त्यांनी मधल्या काळात विठोबाच्या पुजेअर्चेकडे लक्षच दिले नाही कारण विठोबा मुळेच त्यांच्या घराण्याची धुळधान उडाली अशी त्यावेळी त्यांची समजुत झाली होती. (सं.तु.प्रु.११२). श्री.वा.सी. बेंद्रे यांचे सारे संशोधन बरोबर असेल तर, तुकोबांच्या निर्वाणानंतर त्यांच्या परिवाराची झालेली वाताहत, ही दुरवस्था व विचित्र मनोरचना एकच गोष्ट ओरडून सांगत आहे असे म्हणावे लागेल की तुकोबांचे सदेह वैकुंठगमन झालेले नाही शंका नाही.
मंबाजी उवाच
      नुकतीच चाळीशी ओलांडलेल्या तुकोबांचे घातपाती निर्वाण झाले. त्यावेळी जिजाईंच्या उदरी असणारे नारायणबुवा हे वीस-एकवीस वर्षाच्या वयात जेंव्हा देहूस आले, त्यावेळचा एक प्रसंग तुकोबांचे पणतू गोपाळबुवा यांनी "नारायणबाबाचे चरित्राख्यान" यात दिलेला आहे.
एके दिवशी नारायण । इंद्रायणीचे करूनी स्नान ।
करावया श्रीमुर्तीचे पुजन । मार्गे आपण जात असता ॥
तव भेटला ब्राह्मण । तुकयाचा द्वेष्टा पुर्ण ।
मंबाजी ज्याचे नामाभिमान । तो दुष्टवचन बोलिला ॥
म्हणे रे तुझा पिता कोठे गेला ? नेणो भुताखेतांनी ओढूनि नेला ।
किंवा विदेशासि जाऊन मेला । घटस्पोट केला नसता पै ।...
            यावेळी पित्याची उत्तरर्क्रिया न केल्या कारणाने मंबाजीने नारायणाला मुर्तीला स्पर्ष सुद्धा करू दिला नाही. अखेर मंबाजीच्या उर्मटपणामुळे त्याला तिघा भावांनी ठोकून ’दिल्हा ग्रामांतरी लावुनिया ॥’ असे म्हंटलेले आहे. वरील प्रसंग हा गोपाळबुवांना अधिक्रुत परंपरेद्वारे अवगत होणे हे जितके स्वाभाविक आहे तितकेच "विंचवाची नांगी । तैसा दुर्जन सर्वांनी (३१६०)" अशा मंबाजीने हा डंख मारणे देखील नैसर्गिक आहे, यात शंकेला जागा नाही. तुकोबासंबंधी मंबाजीने हा केलेला विषारी उपहास पाषाणह्रुदयी मंबाजीच्या स्वभावाची यथातथ्य कल्पना आणून देतो. सदेह वैकुंठगमनाचे ताशे कोणी कितीही बडवले असले तरी आतली खरी बात मंबाजीलाच माहीत असल्यामुळे तो वीस एकवीस वर्षनंतर सुद्धा दुष्टवचन बोलून नारायणाला सुतकी समजून मुर्तीस हातही लावून देत नाही.हे खचितच विचार करण्याजोगे नव्हे का ? 
हत्येला जात जबाबदार ?
           तुकोबांचे हे खुनी म्हणजे मंबाजीसारखे एका विशिष्ट जातीचे असेच म्हणता येईल का ? छे:! तुकोबांच्या या खुनाला विशिष्ट जात जबाबदार आहे असे समजून जे कोणी जातीय तेढ अथवा जातीद्वेष वाढवू पाहतात त्यांना तुकोबा मुळिच कललेले नाहीत असे म्हणजे भाग आहे. गुणकर्मवादी तुकोबा जन्माने ठरलेल्या कोणत्याही जातीला अथवा वर्गजमातीला एकाच काठीने हाकायला तयार नाहीत. ते म्हणतात,"नाही यातीकुळ फ़ासे ओढी तयासी" अर्थात गळेकापू ठगाला जातकुळी कसली ?. जो दुर्जन असेल तो कुळाने मांग असो वा ब्राह्मण त्यांची जात एकच त्यामुळे तुकोबांचा खुन करणारी ती एक विशिष्ट मनोव्रुत्ती आहे. मंबाजी वगैरे केवळ तिचे प्रतिक, केवळ प्रतिनिधी! नुसत्या जन्मजातीवरून अथवा पंथादिकावरून उच्चनिचतेचा टेंबा मिरवून मोठेपणाची मिरासदारी वा त्याद्वारे स्वार्थसाधनाची मक्तेदारी कायम ठेवु पाहणारी आणि त्यासाठी हवे ते करू शकणारी दुष्ट मनोव्रुत्ती हीच तुकोबांच्या खुनाला जबाबदार आहे. शुद्र समाजनेते व्हायला लागले तर आम्हाला कोण विचारणार ? या द्वेषमुलक शुद्रस्वार्थी व वर्णांहंकारी कूविचाराचा खदखदता लाव्हारस कर्मठ समाजात आतल्या आत तीव्रतेने धुमसत आला. त्याचा मंबाजी आदिंच्या माध्यमातून झालेला परिस्फ़ोट म्हणजेच मानवतावादी वैष्णवाग्रणी तुकोबांचा अमानुष खुन. श्री नरहर चव्हान यांचे म्हणजे अक्षरश: सत्य आहे की "तुकारामाला बिना पेट्रोल च्या विमानात बसवुन सदेह वैकुंठाला पाठवण्याची पोपटपंची पुन्हा पुन्हा कथन करणे म्हणजे हा तुकारामावर अन्याय केल्यासारखे होईल". हा माणुस सामाजिक विषमता, वर्णवाद्यांची मिरासदारी व बडव्यांचे उपद्व्याप दूर करण्याच्या प्रयत्नात त्या काळात स्वत:च्या बलिदानाने हुतात्मा झाला, असे म्हणणे जास्त सयुक्तिक होईल!. तसेच कुठलाही वर्णद्वेष न वाढविता जन्माधिष्ठित उच्चनिचतेचे समाजातून समुळ उच्चाटन करून "विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म । भेदाभेदभ्रम अमंगळ" ही विचारप्रणाली जीवनात सर्वत्र प्रतिष्ठित करणे हीच तुकोबांविषयीची खरीखुरी भक्ती म्हणता येईल.
संदर्भ ग्रंथ :
संतश्रेष्ठ श्री तुकोबांच्या अभंगगाथा [शासकीय,पंढरीप्रत,पडवळांची गाथा,साहित्यलंकार रा.गो.पाटील यांनी संपादलेली]
संतश्रेष्ठ तुकाराम : वैकुंठगमन की खून ? (मुळ ग्रंथ)[साहित्यरत्न सुदाम सावरकर]
स्वप्न आणि सत्य [श्री साने गुरुजी]
प्रसाद[फ़ेब्रुवारी १९६७  श्री.न.र.फ़ाटक]
महाराष्ट्र सारस्वत [श्री.वि.ल.भावे]
संतकवि तुकाराम आणि त्यावरील आक्षेप [श्री दयानंद पोतदार ]
नारायणबाबा चरित्राख्यान [श्री गोपाळबुवा]
व्रुत्तपत्रे [लोकमत दि.६ फ़ेब्रुवारी १९७७]

22 March 2014

संतश्रेष्ठ तुकोबा : वैकुंठगमन की खुन ? [भाग दोन]

संशोधनापुढे ध्येय
        तुकोबारायांची "ब्रह्मरुप काया" ऐन उमेदीत नाहिशी झाल्याने त्यांच्या परीवाराचे,देशाचे आणि धर्माचे देखील अपरिमित नुकसान झाले. हे खरे असले तरी ती काया नाहीशी कशी झाली याचे गुढ आता उकलून काही खास लाभ होण्याचा संभव आहे का ? अजिबात नाही आणि या संशोधनाचा उद्देश तो असूच नये.पण त्यांच्या देहाबरोबर त्यांचे श्रेष्ठ तत्वज्ञानच लोपवून टाकण्याचा जो प्रयत्न ’सदेह वैकुंठगमना’ची कल्पना पसरवणार्यांनी कळत-नकळत केला.तो हाणून पाडणे हेच काय ते प्रयोजन असले पाहिजे. "पावलो पंढरी वैकुंठभवन"(३८९९) म्हणणार्या तुकोबांना कुठल्या दुरस्थ वैकुंठी जायचे होते की हे विश्वच वैकुंठरुप करायचे होते ? हे जरी स्पष्ट झाले तर मानव समाजाला ते हितावह ठरणार हे सांगायलाच नको.तुकोबांना वैकुंठातून भुमीवर आणणे हे लोकाद्धारासाठीच उपयुक्त आहे.नाहीतर कुठले तरी वैकुंठ हेच भाविकांचे ध्येय ठरून, आकाशाकडे पाहत त्यांची भुमीवर अस्ताव्यस्त पावले पडणे व "परलोका"च्या ठेकेदारांना त्याची मनसोक्त लुट करता येणे चालूच राहणार हे लक्षात घेता, हे संशोधन म्हणजे गडे मुर्दे उकरणे नव्हे तर "खरे नानवट निक्षेपीचे जुने । काढले ठेवणे समर्थांचे" (८८३) याची जाणीव ज्ञात्यांना झाल्याखेरीज राहणार नाही.
संतशिरोमणी तुकोबा आणि इतर संत महात्म्य..
आज श्री ज्ञानराजांचे समाधीजीवन व तुकोबारायांचे सदेह वैकुंठगमन असे या महापुरुषांचे लोकोत्तरत्व दर्शविणारे वेगळे कार्य सदभक्तांद्वारे अहमहमिकतेने प्रचारिले जाते. त्याब बाबत कोणी शब्द काढला तरी तो द्वेषी वा तिरस्कारणीय नास्तिक ठरतो. याबाबत खरा विचार करायला हवा की खरेच का असली बाब हीच त्या महापुरुषांचे सर्वश्रेष्ठत्व दर्शवणारी आहे ? त्यांच्या संतत्वाची गमक काय ? आद्यशंकराचार्यापासून तर समर्थ रामदासांपर्यंत एकालाही- श्री ज्ञानराजाला सुद्धा-सदेह वैकुंठी सुयोग लाभला नाही, म्हणून त्या सर्वांच्याच संतत्वाचा दर्जा तुकोबारायांपेक्षा कमी असे लेखण्याचे मनोधैर्य आपल्यात आहे काय ? समाधीजीवन, पुनर्जीवन किंवा सदेहवैकुंठगमन हेच आपले खरे पुर्णत्व किंवा हेच मानवजीवणाचे परमलक्ष्य होय. असे तरी त्या महात्म्यांनी स्वत: कोठे सांगून ठेवले आहे काय  ? तसे जर नाही तर या गोष्टीला इकडे पराकोटीचे महत्व देण्याला तरी काय अर्थ आहे ? 
वैकुंठगमनालाच खराखुरा अर्थ आहे असे जर प्रामाणिकपणे वाटत असेल तर त्याचा पुरेपूर छडा लावणे हे तरी प्रत्येक जाणत्या भक्ताला अत्यावश्यक का वाटू नये ? निव्वळ ’पीछेसे आयी आगे धकाय” अशी मुर्दांड श्रद्धा जपून ठेवण्याला काही किम्मत आहे का ? "वंदिले वंदावे निंदिले निंदावे" अशी "न धरावी चाली करावा विचार" हीच तुकोबांरायांची शिकवण आहे आणि याच शिकवणीनुसार त्यांच्या "सदेह वैकुंठगमना" च्या अथाशक्य सर्व पैलूंवर त्यांच्याच वाणीचा विवेकपुर्ण प्रकाश पाडताना अनेक प्रश्न-शंका उभे ठाकतात, "ज्या महापुरुषाचा इहलोकी अभंगरचना करण्याचा देखील अधिकार तीव्रपणे नाकारण्यात आला, त्या महापुरुषाला एकट्यालाच सदेह वैकुंठगमनाचा सर्वाच्च अधिकार मात्र खुशाल बहाल केला जातो यातील मख्खी काय कळत नाही. शिवाय, ज्या कुटुंबातील प्रमुख देवपुरुष ’सकळा पुसून’ देवासह सदेह वैकुंठी जाण्याचे अभूतपुर्व कार्य करून दाखवितो, त्या कुटुंबाला त्या भाग्यशाली घटानेनंतर महिन्याभरातच सर्वस्व टाकून त्या पावन पित्रुभुमीतून पळून जावे लागते याचा अर्थ काय ? इत्यादी शंकांच्या संदर्भातही अथाशक्य समग्र विचार करणे प्रत्येक तुकोबांच्या सदभक्तांचे कर्तव्य आहे."
तुकोबांच्या हत्येची शक्यता ?
यापुर्वीचे बरेच विचारवंत आणि आजच्या सामाजिक संघटनांच्या मते तुकोबांची हत्या झाली असावी. याचे मुख्य कारण त्यांचे क्रांतिकारक तत्वज्ञान. कर्मकांडांच्या बडिवारापेक्षा भक्तीचे श्रेष्ठत्व ते सांगत होते. वर्णश्रेष्ठत्वापेक्षा सदचाराचा महिमा ते गात होते."वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा । येरांनी वाहावा भार माथा" असे गर्जत "भेदाभेद अमंगळ" म्हणून इंद्रायणीच्या वाळवंटात तुकोबांनी समतेचा झेंडा रोवला होता. त्यामुळे प्रतिष्ठितांच्या प्रतिष्ठेवर आघात होत होते. त्यांच्या प्रस्थापित वर्णवर्चस्वाला होणार्या खंद्या विरोधामुळे मंबाजी सारखे अहंकारी भट मत्सराने जळू लागले होते. याचा पहिला प्रत्यय तुकोबांना आला तो त्यांना आपल्या अभंगाच्या वह्या इंद्रायणीत बुडवायला सांगण्यात आले तेंव्हा.वर्णवर्चस्वाच्या स्वार्थापलीकडे कुठलाही शास्त्रार्थ यामागे नव्हता.
या प्रसंगानंतर कालांतराने तुकोबांना आपल्यावरील प्राणांतिक संकटाची कल्पना आली."लावुनी कोलीत माझा करतील घात" ह्या अशा अनेक उद्गारावरून हे स्पष्ट होईल.त्याप्रमाणेच शेवटी झाले. सालो-मालो, मंबाजी यासारखे दुर्जन भट तुकोबांच्या विरोधात जळफ़ळत होते.त्यांनीच तुकोबांच्या खुनाचा डाव रचला आणि सिद्धिसही नेला. तुकोबांच्या त्या अंत्यकालीन संकटाची जाणीव संत बहिनाबाईंच्या अभंगाद्वारे होते. संत बहिनाबाईंनी पाहिलेला मंबाजी "मारु पाहे घात चिंतुनीया" असे स्पष्ट वर्णन केले आहे.
तुकोबांचा खुन झाला असावा असे आत्तापर्यंत अनेकांनी म्हंटलेले आहे. श्री दयानंद पोतदार यांच्या "संत तुकाराम आणि त्यांच्यावरील आक्षेप" या पुस्तकाला लिहिलेल्या प्रस्तावनेत त्यांनी म्हंटले आहे की तेंव्हा तुकोबांचा कोणीतरी गुप्तपणे वध केला असावा आणि खर्या गोष्टीच तपास लावण्याकडे कोणाची मती वळू नये म्हणुन प्रारंबी यात्रेची, नंतर जलसमाधीची व त्यानंतर सदेह वैकुंठगमनाची अशा एकेक कंड्या वातावरणात सोडून दिल्या असाव्यात असा तर्क संभवणीय वाटतो."
दुसरा पुरावा असा की तुकोबांचा नैसर्गिक म्रुत्यू आला असता किंवा ते खरोखरच सदेह वैकुंठाला गेले असते तर त्यांचे बंधू कान्होबा यांना "दु:खे दुभागले ह्रुदयसंपुष्ट" इतका शोक करण्याचे काय कारण होते ? वस्तुस्थिती अशी दिसते की तुकोबांच्या अंतानंतर त्यांचे सगळे कुटुंबच देशोधडीला लागले.पुढे अनेक वर्षापर्यंत तुकोबांचा एकही वंशज देहूला नव्हता.याचे कारण काय असावे ? ह्या सर्व गोष्टी विचारवंतांनी प्रतिपादन केलेल्या प्रमेयाला पुष्टीच देतात.
                                                                                                                                 (क्रमश:)

18 March 2014

संतश्रेष्ठ तुकोबा : वैकुंठगमन की खुन ? [भाग एक]

संतश्रेष्ठ तुकोबाराया
           साने गुरुजींनी त्यांच्या स्वप्न आणि सत्य ग्रंथामध्ये प्रुष्ट क्र.११२ वर म्हंटले आहे "ग्यानबातुकाराम हे महाराष्ट्राचे ह्रुदयसम्राट आहेत. त्यांचे साहित्य हे खरे राष्ट्रीय साहित्य आहे,कारण ते सर्व थराथरात गेले." संत तुकोबांच्या गाथेमध्ये अखिल विश्वाच्या कल्याणाचे तत्वज्ञान एकवटलेले आहे. प्रा.न.र.फ़ाटक म्हणतात "तुकोबांच्या वाणीत जे तेज व सत्व आहे त्याची घट्ट ओळख असणार्यांनी ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ यांची ओळख करून नाही घेतली तरी चालेल. तुकोबांच्या लिखानात या सर्वांच्या शिकवणुकीचे रहस्य सापडेल; अशा योग्य उद्देशाने भागवतधर्ममंदिराचा कळस म्हणण्याची प्रथा पडली." अशा या परमोज्ज्वल कळसा बाबत जनाजनाच्या मनामनात प्रगाढ श्रद्धा आहे.पण त्यातही वारकर्यांच्या आवडीचे स्वरूप काही निराळे आहे.
जीव जीती जीवनासंगे । मत्स्या मरण त्या वियोगे ॥
सकळा पढीये भानु । परि त्या कमळाचे जीवनु ॥
या प्रमाणे इतरांच्या द्रुष्टीने महान असणारे तुकोबाराय वारकर्यांचे तर जीवनच आहेत.
            संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या निर्वाणासंबंधी आजपर्यंत अनेकांनी चर्चा केली आहे."महाराष्ट्र सारस्वत"कार भावे यांच्या पासून ते आत्तापर्यंतचे साहित्यिक यात आहेत. श्री वा.सी.बेंद्रे यांसारखे संशोधकही यामध्ये आहेत. यांच्या मालिकेत आजच्या सामाजिक संघटनांचा देखील समावेश करावा लागेल. संत तुकारामांचा खुनच केला असावा असे स्पष्टपणे प्रतिपादन करणारेही बरेच होऊन गेले. इतकेच काय पण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनीही "मेला की मारला कळेना । म्हणती वैकुंठाला गेला ।" या आपल्या उद्गारात याच प्रमेयाकडे संकेत केला आहे.
निर्वाण अभंग आणि अभंगपत्रे
           संतश्रेष्ठ तुकोबांच्या निर्वानाचा प्रश्न त्यांच्याच अभंगाच्या द्वारे सर्वांनी सोडविण्याचा प्रयत्न केला आहे.मग त्यात मत-मतांतरे का निर्माण व्हावीत ? यातील एक महत्वाची गोष्ट अशी की, संतांच्या आज ज्या गाथा आढळतात त्यात त्यांनी हे लिहिलेले अभंग कालानुक्रमाने दिलेले असतात असे मुळीच नाही. संत तुकारामांच्या अभंगातही असेच झालेले आहे. आपल्या आयुष्यात अभंगरचना करताना कदाचित स्वत: तुकाराम महाराजांनी किंवा त्यांच्या लेखनिकांनी  ते क्रमश: लिहुन ठेवलेलेही असतील. पण आज कालानुक्रमाने लिहिलेल्या अशा अभंगाचा अस्सल गाथा उपलब्ध नाही. आहे त्या अभंगाची विषयावार विभागणी करून ते छापलेले आहेत. उपलब्ध गाथ्यात सर्वत्र ही विषयविभागणी आणि त्यात अंतर्भूत केलेल्या अभंगाची संख्या ही सारखी आढळते अशी नाही. अशा विषयविभागणीच्या प्रयत्नातूनच तुकाराम महाराजांच्या अंत्यकाळा विषयीच्या अभंगाचे प्रकरण निर्माण झाले आहे.
             निरनिराळ्या गाथ्यात आढळणार्या अशा निर्वाण प्रकरणातील अभंगाची तर्ककठोर बुद्धीने छाननी केली तर समजुन येईल की हे निर्वाणाचे अभंग केवळ संकलनात्मक आहेत. प्रत्येक संपादकाने वेगवेगळ्या अभंगसंचातून आपल्याला सोईचे वाटतील असे किंवा ओढून ताणून उपयोगी आणता येतील असे असंबद्ध विषयींचे अभंग आपापल्या संपादणीतील निर्वाण प्रकरणात संकलीत केले आहेत. इतकेच नाही तर तुकोबांच्या निर्वाणासंबंधी आपल्या मताच्या पुष्ट्यर्थ काही प्रक्षिप्त अभंगही त्यात घातले गेले आहेत. या संकलनाबाबत एक दोन उदाहरणे पुरेशी आहेत.
१] "क्र.१५९६ या अभंगात गरुडावर बसून चतुर्भुज हरी वैकुंठाहुन तुकोबांच्या घरी येतात. क्र.१६०६ मध्ये श्रीरंगाशेजारी गरुडावर बसण्याऐवजी तुकोबा एकदम कुडीसहीत गुप्त होतात...गुप्त झाल्यानंतरही अभंग सुरुच असतात. क्र.१६०७ मध्ये तर आत्तापर्यंतच गरूड विमानात परिवर्तीत होतो आणी तुका बैसला विमानी हे द्रुष्य़ संत लोचनी पाहू शकतात. याच अभंगाच्या शेवटी तुका वैकुंठासी नेला तरी देखील १६०८ हा अभंग जन्मास येतोच.त्यात तर तुकोबा ’क्षीरसागर शयनी’ पोहचून सिंहासनी बसले आहेत.तो अभंग इहलोकी कसा म्हंटला गेला ? आणि क्षीरसागरी पोहचल्यानंतर वाराणसीपर्यंत असो सुखरूप (क्र.१६०९) असा काशीला पोहचल्याचा निरोप कसा काय आला ? या शेवटच्या अभंगात आपण येथून निजधामास जाणार असे तुकोबा म्हणतात. येथे तुकोबांबरोबर देव नाही पण गरूड मात्र आहे ! अशी ही सारी विसंगतीची चमत्क्रुती !"
२] "चार कोसांवर विमान थांबवून जर हे अभंग लिहिले तर ’सकळही माझी बोळवण करा’ हे म्हणजे भुमीवरचे की आकाशातले ? ’उठा एक ऐका सांगतो तुम्हासी’..अशी सहा ओळीत तीनदा सांगण्याची पुनुराव्रुत्ती व्हावी,हे तुकोबांना सर्वथा अमान्य असणार्या रचनाशैथिल्याची कल्पना आणुन देण्यास पुरेसे नाही का ? स्वपत्नीसाठी येतो काकुलती मनी धरा म्हणून ’पदर पसरून दाढी ओठी’ धरून केविलवाणीने लोकांची मनधरणी करावी. देवासह वैकुंठी जाण्याचे अपुर्व भाग्य लाभले असताही ’अहो देवा ! कैसी घरबुडवण केली’ म्हणून आकांत करावा आणि ’देवांचे ते मुळ शोधू नये कोणी’ असा भलताच उपदेश करावा  हे सारे तुकोबांच्या व्यक्तित्वाशी सुसंगत असेच आहे का ?  ’म्हणे मज आता निरोप द्यावा- ऐसे बोलो निया गुप्त झाले’ ही सारी रचना तुकोबांचीच आहे असे म्हणता येईल का ?..."
श्री तुकोबा महाराज विमानात बसुन सदेह वैकुंठाला गेले असे मानणार्या प्राचीनांनीच त्यांची ’विमानातून लिहिलेई अभंगरुप पत्रे’ निर्माण केली आहेत. असे का म्हणू नये ? ’चौकोशावरी थांबवली विमाने । पत्र हे तेथून तुम्हा लिहिले’ व ’स्वर्गलोकीहुनि आले हे अभंग’ या वचनांमधील ’तेथून’ व ’आले’ हे शब्द स्पष्टच सुचवितात की ते शब्द प्रुथ्वीवरील व्यक्तीच उच्चारू शकते. शिवाय ’चौकशा’वर ’स्वर्गलोक’ असू शकत नाही. ’सप्त अभंगी पत्र’ व ’बारा अभंगी पत्र’ या दोन्ही बरोबर ’टाळगोधडी’ चा उल्लेख आहेच. तेंव्हा, तुकोबांबरोबर ’टाळगोधड्या तरी किती कल्पाव्या ? "तुकोबांचे निर्वाण झाले द्वितीयेस तर टाळगोधडी मिळाली पंचमीस ! हे साहित्य नेमके देहुलाच पडले" हे वास्तवतेच्या पलिकडचे नव्हे काय ? अशा भाकडकथा सांगणारे अभंग प्रक्षिप्त नव्हे तर काय म्हणावे ?.  
शुद्ध संशोधनासाठी
देवधर्म आणि अंधश्रद्धा यांमध्ये बुडालेले कोणी भक्त म्हणतील की लोकमाणसात वैकुंठगमनाची दिव्य कल्पना शेकडो वर्ष द्रुढमुल झाली असता आता हे नव्याने मांडून कोणते कल्याण होणार आहे ? "जाले तेंव्हा जाले मागील ते मागे । आता वर्म लागे ठावी झाली ॥" हे सत्य असले तरी गडे मुर्दे उकरून लाभ काय ? हा प्रश्न बराच महत्वाचा आहे..खरे तर कोणत्याही बाबतीतले सत्यदर्शन हे निरपेक्षपणे स्वत:च अत्यंत मुल्यवान असते हे खरे. असत्यावर आधारलेली कल्पना दिव्य असली तरी ती कांचनम्रुगाप्रमाणे फ़सवी असते.  ’जगरुढीसाठी घातले दुका असे ’पोटदंभाचे पसार’ मांडणारे धर्माचे घाऊक व्यापारी ’चालीचाचि वाहो’ कायम ठेऊन आपल्या ग्राहकांच्या भ्रांत भावनांची खुशाल जपणूक करोत, पण संत मात्र तो मुलामा उडवून लावणेच हितावह समजतात. कारण भ्रामक कल्पनांनी कोणाचा कधीच उद्धार होत नसतो. उलट असत्याभिमान व डोळे बांधलेली श्रद्धा यांच्या पोटी शेकडॊ पापेच जन्मास येतात.
"तुका म्हणे लोपे । सत्याचिया घडती पापे " हे कसे विसरता येईल ? म्हणूनच तुकोबाराया निक्षून सांगतात-
"अहो श्रोतेवक्ते । सकळही जन ! बरे पारखून बांधा गाठी ॥
तुके तरी तुकी खर्याचे उत्तम । मुलामांचा भ्रम कोठवरी ?"
           भक्तांच्या भावना दुखावतील एवढ्यासाठी सत्य दडपून टाकायचे हा धर्म आहे का ? "लटिके ते रुचे । सत्य कोणाही ना पचे ॥" म्हणून असत्यच घोपटायचे की काय ? "धर्म आहे वर्माअंगी" याची वारंवार जाणीव करून देणार्या तुकोबांनी स्वष्ट केले आहे की कोणाच्या भिडेसाठी अथवा भावनेसाठी सत्य डावलता कामा नये.’नये भिडा सांगो आन’ व ’काकुळतीसाठी सत्याचा विसर । पडले अंतर न पाहिजे॥. ’त्यामुळे इथे कोरड्या कल्पना जुगारून यथार्तवादच स्विकारायला हवा.
                                     (क्रमश:)

20 January 2014

प्राचीन समाज व्यवस्था,संत साहित्य व भारतीय राज्य घटना [२]

[२] सर्वधर्मसमभाव 
म्हणोनी कुळजाती वर्ण । हे अबघेचि गाअकारण । एथ अर्जुना माझेपण । सार्थक एक ॥ - ज्ञानदेव (ओ.४५६)
त्या प्रमाणे क्षत्रिय,वैश्य स्त्रिया,पापी,अत्यंत,शुद्र अंगणा,जर मला भजत असतील तर ते माझेच आहेत. - (ओ.४७४)
याती कुळ माझे गेले हरपुनी । श्रीरंगा वाचून आणू नये ॥ - ज्ञानदेव
[३] फ़ड,दिंडी,टाळ,भजन,कीर्तन,हरीकथा,पताका,तुळस,कळस व वारकरी यांच्या प्रती अतूट श्रद्धा बाळगणे आवश्यक
[४] संत वाडमय ही समतेची शिदोरी जगकल्याणासाठी आहे.
[५] ज्ञानमेवाम्रुतम - ज्ञानासारखे पवित्र व श्रेष्ठ दुसरे काही नाही.
[६] साधी भाषा,सोपे नाम,सर्व राव रंक,लहान थोर इ. सर्वांसाठी विठठल देव,पंढरी स्थान राम नाम आहे.
[७] प्रसन्न चित्त,सर्वाभुती नम्रता व कार्य हाच परमेश्वर :
कुलजातीवर्ण हे अवघेचि गाअकारण - ज्ञानेश्वर महाराज
अर्भकाचे साठी । पंथे हाती धरली पाटी ॥ - तुकाराम महाराज
कांदा,मुळा,भाजी । अवघी विठाई माझी - सावता माळी
दळीता कांडिता,तुज गाईन अनंता - जनाबाई
नाचु किर्तनाचे रंगी । ज्ञानदीप लावू जगी - नामदेव महाराज
सकळाचे पायी माझे दंडवत । आपुलाले चित्त शुद्ध करा ॥ - तुकाराम महाराज
[८] भाषा संम्रुद्धी भाषा हेच धन व भाषा हेच शस्त्र
आम्हा घरी धन शब्दांचीच शस्त्रे । शब्दांचीच शस्त्रे यत्न करू ॥ - तुकाराम महाराज
माझा मराठाची बोल कवतीकें । परि अम्रुतातेही पैजा जिंकें ॥ - ज्ञानेश्वर महाराज
[९] आम्ही ज्ञानी व आम्ही संत
वेदाचातो अर्थ आम्हासीच ठावा । येरांनी वाहावा भार माथ्या ॥
तुका म्हणे तोची संत । सोसी जगाचे आघात ॥
तेची संत तेची संत ।  ज्यांचा हेत विठठल ॥
[१०] सर्वांचे सहकार्य,शुद्ध भाव व बीज,उत्तम व्यवहार.
एकमेकां सहाय्य करू । अवघे धरू सुपंथ ॥
शुद्ध बिजापोटी । फ़ळे रसाळ गोमटी 
जोडोनिया धन उत्तम व्यवहारे । उदास विचारे वेच करी ॥ - तुकाराम महाराज
चोखा डोंगा परी । भाव नोहे डोंगा ॥ - चोखामेळा
[११] जाती धर्माची बंधने नाहीत
वर्ण अभिमाणे कोण झाले पावन । ऐसे द्या सांगून मजपाशी ॥
    अंत्यजादी योनी तरल्या हरी भजने । तयांची पुराणे भार झाली ॥ - तुकाराम महाराज
भेदाभेद अमंगळ । - तुकाराम महाराज
[१२] विश्वबंधुत्व
हे विश्वचि माझे घर । ज्ञानदेव:चोखा माझा जीव । चोखा माझा भाव ॥ -  नामदेव महाराज
जे का रंजले गांजले । त्यासी म्हणे जो आपुले ॥ तोचि साधू ओळखावा । देव तेथोचि जाणावा ॥ -                     तुकाराम महाराज
जो जे वांछील तो ते लाहो । प्राणीजात ॥ - ज्ञानेश्वर महाराज
यारे यारे लहान थोर । याती भलत्या नारीनर ॥ - तुकाराम महाराज
उच्च नीच काही नेणे भगवंत । - तुकाराम महाराज
          स्वातंत्र्य,समता,बंधुता,सहकार्य,समुदाय,शुद्धभाव,समान संधी,श्रद्धा,एक ध्येय,एकदेव,विक्रम आणि वैराग्य,भक्ति आणि युक्ती,एकच धर्म-राष्ट्रकार्य,शिस्त व ऐक्य इ.मार्गदर्शक तत्वे आपल्या अभंग - ओव्यातून सांगून,म्लेंच्छांच्या काळात राष्ट्रधर्मा(भागवत धर्मा)ची ध्वजा फ़डकत ठेवली.समाज जाग्रुती केली.समाज ऐक्य टिकवले.इतके सगळे संत साहित्याने घडविले.
                हे सर्व शिवकाळांत झाले.राजा शिवछत्रपतींनी तत्कालीन मातब्बर सरदारांना विचारले.ते सर्व म्हणजे निंबाळकर, घोरपडे, शिर्के, सावंत, मोरे, जाधव, जेधे इ . निजामशाह व आदिशहाचे मांडलिक होते. शिवाजींनी बारा बलुतेदार एकत्र करून त्यांच्यातून सैन्य गोळा केले.त्यांना सरदार ते सेनापती केले.स्वत:स राज्याभिषेक केला व स्वराज्याची मुहुर्तमेढ रोवली.संतांना मान-सन्मान दिला.छत्रपती संतांपुढे नतमस्तक झाले.
    हुन,चौल,चालुक्य,शालिवाहन,बहामनी,मोघल,तुघलक,पेशवाई व आंग्ल इ.च्या अस्थिर राजकीय अटळ परिस्थितीत व प्रचंड देशी व विदेशी वादळामध्ये भारतीय संस्क्रुती व परंपरा(वारकरी धर्म) म्हणजेच भारतीय समाज संतांनी रुजविलेल्या अत्मिक विचारामुळे व सदाचारामुळे भारतीय समाज एकसंघ राहिला.संत शिकवणीच्या भक्कम पायावरच भारतीय स्वातंत्र्याची चळवळ उभी राहिली.संत साहित्याचे सुमधुरफ़ळ म्हणजेच भारतीय स्वातंत्र्य होय.
             पेशवाई मध्ये ब्राह्मण पंतप्रधान(पेशवे) झाले.त्यांनी लेखणी सोडून तलवार हाती घेतली पण ती काही काळच.पेशवाई मध्ये पुजा अर्चा,बेल-फ़ुले यांचे महत्व वाढले.सत्यनारायण पुजा,अघोरी उपाय,जादुटोणा,गंडादोरा यांचे स्तोम माजले.सन १८१८ मध्ये पेशवाई (शुरवीर महारांच्या हाती )संपली.महात्मा जोतिबा फ़ुलेंनी समाज सुधारणा व शिक्षण कार्य चळवळ सुरु केली.इंग्रज राज्यकर्ते झाले.त्यांनी १५० वर्षे राज्य केले.त्यांनी शिस्त आणली,देश एक केला.धर्मात हस्तक्षेप केला नाही.जाती-पाती-धर्म यांनी छिन्न विछिन्न झालेला समाज तसाच अज्ञान अंध:कारात चाचपडत राहिला.विनाधिकार संस्थाने जिवंत राहिली.
       सन १९०१ ते १९४७ या काळात तीन मोठ्या चळवळी झाल्या.महात्मा गांधींची स्वातंत्र्याची चळवळ,कर्मवीर भाऊराव पाटील यांची यांची शैक्षणिक चळवळ व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची दलित मुक्ती चळवळ.१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वातंत्र्य झाला.सर्वांच्या प्रयत्नांना स्वातंत्र्याचे फ़ळ आले.तत्पुर्वी डॉ.बाबासाहेब आंबेडकर लोकराजा शाहू छत्रपती व बडोदानरेश सयाजीराव गायकवाड यांच्या आर्थिक मदतीने व स्वकष्टाने उच्च आंग्लविभूषित झाले.त्यांनी संत वांडमयाचा संपुर्ण अभ्यास केला.त्याचे बहुजन उद्धाराचे कार्य दि.२५ मे १९४१ रोजी "महार जात पंचायतीची" स्थापना करून सुरु केले.ते दि.६ डिसें.१९५६ रोजी त्यांच्या निर्वानानेच थांबले.या अदभुत कार्याचा गौरव म्हणुन त्यांना दि.१४ एप्रिल १९९० भारतरत्न म्हणून घोषित केले.
१ नोव्हेंबर १९४६ रोजी पंडीत नेहरुंनी इंग्लंडमधील घटना विषारद डॉ.जेन आयर यांना स्वतंत्र भारतासाठी घटना लिहुन देण्यासाठी विनंती केली.डॉ.आयर म्हणाले "आमच्या पेक्षा बुद्धिमान बॅरि.जयकर,बॅरि.सप्रु व डॉ.बाबासाहेब आंबेडकर भारतात आहेत.त्यांच्या कडून घटना का लिहुन घेत नाही.?" घटना मसुदा समितीमध्ये सात लोकं होती पण काही अडचणींमुळे मसुदा लेखनाची जबाबदारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी एकट्याने समर्थपणे पेलली.डॉ.बाबासाहेबांनी अनेक देशांच्या (इंग्लंड,फ़्रांस,अमेरीका,कॅनडा,रशिया इ.) घटनांचा व संतसाहित्याचा सर्वकश तपशीलवार अभ्यास केला.त्यांनी तथागत गौतम बुद्ध,संत कबीर व महात्मा फ़ुले यांना गुरु मानले.त्यांनी देशाला "स्वतंत्र,सार्वभौम,समाजवादी,धर्मनिरपेक्ष व लोकसाही" इ.तत्वांचा पाया असलेली घटना दिली.घटनेच्या प्रास्ताविकात घटनेचा सारांश दिला आहे.तो खालील प्रमाणे.
भारतीय संविधान 
प्रास्ताविका :
            आम्ही भारताचे नागरिक,भारताचे एक सार्वभौम,समाजवादी,धर्मनिरपेक्ष,लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरीकास : सामाजिक,आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ति, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र, दर्जाची व संधीची समानता;निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वामध्ये व्यक्तिची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपुर्वक निर्धार करून,आमच्या संविधान सभेत आज दि.२६ नोव्हेंबर १९४९ रोजी याद्वारे हे संविधान अंगिक्रुत आणि अधिनियमित करून स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
           मनुस्म्रुतीने नाकारलेली,सर्व संतांनी अंगिकारलेली,आचरलेली,ओवी-अभंगातून प्रचारलेली व प्रसारित केलेली, न्याय(सामाजिक,आर्थिक,राजकीय), स्वातंत्र (विचार,अभिव्यक्ति, विश्वास, श्रद्धा, उपासना), समानता (दर्जा व संधी), आश्वासन(प्रतिष्ठा, एकता, एकात्मता),  बंधुता (धर्मनिरपेक्ष, सामाजिक, लोकशाहीवादी),  सार्वभौमत्व(देश, लोक व संसद)इ.पायाभुत भक्कम तत्वे व आचरणाची हमी असलेली घटना देशाला मिळालेली आहे.घटनेमध्ये २२ भाग व ३९५ कलमे असून आवश्यकतेनुसार आज अखेर ८५ वेळा त्यामध्ये दुरुस्त्या केलेल्या आहेत.घटनेचा पायाभूत भक्कम ढाचा बदलण्याचा कोणासही अधिकार नाही.स्वातंत्र्य,न्याय,समानता व बंधुता इ.ची शिकवण व तत्वे दिल्याबद्दल आम्ही सर्व अखिल भारतीय संतांचे व सर्वश्रेष्ठ संत सहित्याचे चिरंतर ऋणि आहोत.

******************
प्राचार्य एस.एस.माळी
M.A.,LL.B.,M.B.A.,(USA)
सांगली
संपर्क : ९३७१४९७५९८

प्राचीन समाज व्यवस्था,संत साहित्य व भारतीय राज्य घटना [१]

        तज्ञांच्या मते अंदाजे दोनशे कोटी वर्षापुर्वी प्रुथ्वीची निर्मिती झाली.डार्विनच्या उत्क्रांती सिद्धांतानुसार अंदाजे दोन कॊटी वर्षापुर्वी प्रथम जीव जन्माला आला.अंदाजे वीस लक्ष वर्षापुर्वी मानव प्राणी आस्तित्वात आला.प्रुथ्वीच्या निर्मीती पासून आज अखेरचा काळ चार युगांमध्ये विभागला आहे.[१] सत्ययुग/क्रुतयुग-४,३२ लक्षवर्ष,[२] त्रेतायुग-३,३२ लक्षवर्ष.[३] द्वापारयुग-२,३२ लक्षवर्ष व [४] कलीयुग-१,३२ लक्षवर्ष.द्वापार युगारंभी वेदांची निर्मीती झाली.यामध्ये ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद प्रथम लिहिले गेले.कलीयुगारंभी अथर्ववेद लिहिला गेला.यामध्ये एक लक्ष ऋचा प्रुथ्वी निर्मीतीच्या व प्रार्थनेच्या म्हणजे देववर्णनांच्या आहेत.ऐंशी हजार ऋचा यज्ञासंबंधी व चार हजार ऋचा स्रुष्टी ज्ञानाच्या आहेत.सोळा हजार ऋचा भक्ति पर आहेत.त्याकाळी ब्रह्मा,विष्णू व महेश या देवता सर्व मान्य होत्या.नंतर अग्नी व गणेश यांची निर्मीती झाली.या सर्वांमध्ये समाज रचनेचा कोठेही उल्लेख नाही.
        अंदाजे पाच हजार वर्षापुर्वी मनू हा ऋषि होऊन गेला.तो अहंकारी,मुत्सद्दी,ज्ञानी व विद्याव्यासंगी होता.त्याने तत्कालिन परिस्थितीचा सर्वकश विचार करून समाज रचना कशी असावी याची सुसूत्र मांडणी केली.त्यास स्म्रुती असे म्हणतात.मनुस्म्रुती नुसार चार वर्ण असावेत.[१] ब्राह्मण [२] क्षत्रिय [३] वैश्य [४] शुद्र.नंतर कालांतराने निक्रुष्ठ दर्जाची स्वच्छता कामे करणारा शुद्रातिशुद्र वर्ग निर्मान झाला.लोक पुर्व कर्मानुसार पिढ्यानं पिढ्या तीचतीच कामे करू लागला.त्यामुळे ब्राह्मण वर्गाने लेखन,वाचन व मार्गदर्शन केले.क्षत्रियांनी संरक्षण केले.वैश्यांनी व्यापार व उत्पादन केले.शुद्रानी सेवेची कामे केली.अतिशुद्रानी सर्वांच्या स्वच्छतेची निक्रुष्ट कामे केली.
        मनुविचारानुसार माणसाच्या आयुष्याचे चार विभाग झाले.[१]ब्रह्मचर्याश्रम [२] ग्रुहस्थाश्रम [३] वानप्रस्थाश्रम व [४] संन्यासाश्रम,ही व्यवस्था फ़क्त पहिल्या दोन वर्गांना म्हणजे फ़क्त ब्राह्मण व क्षत्रियांना लागू होती.पुढे सत्तासंघर्षामध्ये परशुरामाने एकवीसवेळा प्रुथ्वी नि:क्षत्रिय केली.त्यामुळे समाजात फ़क्त दोनच वर्ण शिल्लक राहिले ते म्हणजे ब्राह्मण व शुद्र त्यामुळे समाजाचे सर्व अधिकार ब्राह्मणांना मिळाले.इतर फ़क्त सांगकामे झाले.ब्राह्मण म्हणतील व सांगतील तोच कायदा व नियम झाला.मनुने  सर्वांचे अधिकार नष्ट केले.स्त्रिया व शुद्रांना कसलेही अधिकार नाहीत.सेवेतच त्यांचे जन्म,जीवन व म्रुत्यू झाले." करा व मरा" हा एकमेव शिक्का त्यांचे कपाळी मारला गेला.तो अंदाजे अकराव्या शतकांपर्यंत.सर्वाधिकार ब्राह्मणांना आहेत.उदा.मनुस्म्रुतीमधील पुढील धर्मादेश पहा.
[१] य:कश्चित्फ़चितधर्मो मनुना परिकीर्तित:।स सर्वो:मिहितो वेदे सर्वज्ञानमयो हि स:॥ (मनुस्म्रुती २/८)
अर्थ : मनुने जे काही सांगितले आहे ते वेद मुलक आहे.मनुस सर्व वेदांचे ज्ञान आहे.कारण मनु स्वयं वेदमुर्ती आहे.
[२] श्रुति स्तु वेदो विज्ञेयो धर्म शास्त्रं तु वै स्म्रुती । ते सर्वाथैष्व मिमांस्थे तांभ्यांम्र धर्मो ही निळैभौ ॥ (मनुस्म्रुती २/१०)
अर्थ : श्रुती म्हणजे वेद व स्म्रुती म्हणजे धर्मशास्त्र.या श्रुती व स्म्रुती विरुद्ध तर्क करून भांडन करू नये.ते चिकित्सेचे विषय नाहीत कारण त्यांच्या पासुनच धर्म तयार झाला आहे.
[३] यो:वमण्येत ते मुल्येहेतुशास्त्राश्रयादद्विज: । ससाधुर्भिषहिष्कार्यो नास्तिको वेद निन्दक ॥ (मनुस्म्रुती २/११)
अर्थ : जो कुतर्काच्या आधारे धर्माचे मुळ श्रुति व स्म्रुतीला प्रमाण न मानता निंदा/चेष्टा करेल तो निंदक म्हणजे पापी होय.तो साधू लोकां (शिष्ट) कडून बहिष्क्रुत केला जावा.
[४] निषेकादिश्मशानान्तो मन्म्रर्यस्योदितो विधी: । तस्य शास्त्रे:धिकारो:स्मिम्झोयो नान्यस्य कस्यचित ॥ (मनुस्म्रुती २/१६)
अर्थ : धर्मशास्त्र श्रुती व स्म्रुती मधील गर्भादान ते अन्त्येष्ठिचे अधिकार / संस्कार फ़क्त ब्राह्मणांना आहेत.अन्य स्त्री शुद्रादिशुद्रांना नाहीत.हे सनातन धर्माचे कटू सत्य आहे.
[५] न शुद्राय मति दद्यान्नोच्छिष्टं न हविष्क्रूतम । न चास्योपदिशेध्दर्म न चास्त्र व्रतमादिषेत ॥ ८० ॥
      यो हयस्य धर्ममाचष्टे यश्चैषादिशति व्रतम । सो संव्रुतं नाम तम: सहतेनैव मज्जति ॥ ८१ ॥
अर्थ : शुद्रास मति (ज्ञान) देऊ नये.कोणताही धर्मोपदेश करू नये.कोणतेही व्रत सांगु नये.जो धर्म सांगतो तो शुद्रासह नरकात बुडतो.(मनुस्म्रुती अ. १०/१२३),१/९१,९/१८,१०/२५,१०/२६.इ.मध्ये असे अनेक श्लोक आहेत की ज्यामध्ये शुद्रांनी फ़क्त ब्राह्मणांची सेवा करावी.लिहु,वाचू नये,अन्यथा ते नरकात जातात.शुद्रांनी फ़क्त उष्टे अन्न खावे.उपास - तपास करू नये.स्त्री शुद्रांना धर्माधिकार नाहीत.विप्राने शुद्राकडून सेवा करून घ्यावी.त्या बदल्यात त्यांना टाकाऊ अन्न व फ़ाटकी वस्त्रे द्यावीत.शुद्रांनी विनातक्रार (अनसुया) तिन्ही वर्गाची सेवा करावी."जरी ब्राह्मण झाला भ्रष्ट तरी तो मानावा श्रेष्ठ","न स्त्री स्वातंत्र्यंअर्हति",ही वेदवाक्य झाली.
यामुळे ब्राह्मणांचे वर्चस्व वाढले.स्त्रीशुद्रादी नगन्य झाले.कसेतरी जगणे त्यांच्या नशिबी आले.परिणामत: शुद्र खचले. स्वातंत्र्य,समानता,बंधुता,संधी,धर्म इ. सर्व हद्दपार झाले.ते अकराव्या शतकापर्यंत.
सन १२७५ मध्ये सर्व स्वातंत्र्य,सदविचार,इ.चे पुनरुज्जिवन झाले.त्याची सुरुवात निव्रुत्तीनाथांपासून झाली.बाराव्या शतकापासून सतराव्या शतकापर्यंत निव्रुत्ती महाराज ,ज्ञानदेव महाराज,सोपान,मुक्ताबाई, नामदेव महाराज, एकनाथ महाराज, तुकाराम महाराज आदी संत झाले. त्यांची विद्या,स्वातंत्र्य, बंधुत्व,लेखण,वाचण,भाषण,प्रवचन,भक्ति,समानता इ.ची कवाडे सर्वांना खुली केली.महाराष्ट्रात नवयुग आले.सुर्योदय झाला.मनुनिर्मित अंध:कार नष्ट झाला.सर्वोदय झाला.
महाराष्ट्रात सोलापुर जिल्ह्यात मंगळवेढे आहे.तेथे बाराव्या शतकात बिज्जल नावाचा राजा राज्य करत होता.त्याचे प्रधान बसवेश्वर(११०५ ते ११६५) होते.बसवेश्वरांनी सर्वधर्म परिषद(११५०) बोलाविली."अनुभव मंटप" संस्था सुरु केली.सर्वधर्मसमभाव निर्माण केला.त्यामध्ये काश्मिर ते कन्याकुमारी येथील प्रतिनिधी उपस्थित होते.त्यामध्ये सर्व संतांनी भाग घेतला.त्यांनी शिवधर्माचे सर्व भारतभर प्रसार व प्रचार कार्य केले."अनुभव मंटप" चे सभापती होते संत अल्लमप्रभू ! बसवेश्वर प्रवर्तक होते.त्यामध्ये धानम्मा (जत), अक्कमहादेवी, शिवलिंगव्वा, निलांबिका, लिंगम्मा,लकम्मा,वीरम्मा, सांतव्वा, काळव्वा, कल्याणम्मा आदि स्त्रिया संत होत्या. बसवेश्वर, चन्नबसवेश्वर, सिद्धरामेश्वर(सोलापुर), कक्कय्या(कैकाडी), बोमय्या(ढोर), कन्नया(सोनार), हरळय्या(चांभार), मधुवय्या(चांभार), चन्नय्या(मांग), माचय्या(धोबी), अप्पण्णा(न्हावी) आदि संत होते.या संतांचा कर्नाटकात अति मोठ्या प्रमाणात प्रसार झाला.
ज्ञानदेवांनी भागवत धर्मांचा/परंपरेचा पाया घातला.सातशे श्लोकांच्या गीतेचे मराठीत तत्वज्ञान आणले.यात सोपान मुक्ताई सामील झाले.नामदेवांनी त्याचा विस्तार केला.भारत भ्रमण करून पंजाबी/गुरुमुखी व हिंदी मध्ये अभंग रचना केली.त्यामध्ये सर्व धर्मियांना/जातींना सामावून घेतले. गोरोबा(कुंभार), चोखामेळा.बंका, सोयरा (सर्व महार), सावता (माळी), जनाबाई(दासी),  कान्होपात्रा आदिंना स्थाने दिली. लेखन, वाचन, भजन, पुजन इ.अधिकार दिले.संत तुकोबारायांनी ४५८३ अभंग रचना केली.या संतांनी अंगिकारलेली तत्वे व त्यांचे अभंग पुढील प्रमाणे आहेत.
[१] मनुचे तेहतीस कोटी देव नाकारले व एकच देव मानला.पंढरीचा "विठठल" हे एकमेव दैवत व त्याचे दर्शन म्हणजे सर्वाच्च सुख होय.
सकळ कुळांचा तारकु / तोचि जाणावा पुण्यश्लोकु । पांडुरंगी रंगलानिशंकु । धन्य जन्म तयाचा ॥ - संत ज्ञानेश्वर महाराज
सर्व सुखांचे आगरू । बापरुखत्मादेविवरू ॥ - संत ज्ञानेश्वर महाराज 
विठठल विठठल मंत्र हेचि निजशास्त्र । विचारिता सर्वत्र दुजे नाही ॥ - संत निव्रुत्तीनाथ
नको तु करी सायास । धरी पा विश्वास ॥ एका जनार्दनास डोळा । पाहि ॥ - संत एकनाथ महाराज
बळीया माझा पंढरीराव । जो या देवांचाही देव ॥ - संत तुकाराम महाराज
भागवत धर्मासच वारकरी संप्रदाय म्हणतात.विष्णुभक्तांना वैष्णव म्हणतात.वारकरी संप्रदायात दीक्षा-भिक्षा याचे अवडंबर नाही.

30 November 2013

आतातरी पुढे हाची उपदेश

             जगतगुरु संतशिरोमणी संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे ह्र्दयाला भिडणारे अभंग. अज्ञान, रुढी, परंपरा, ब्राह्मणवाद आणि कर्मकांडात अडकलेला समाज व त्याची दयनीय अवस्था पाहून महाराज कळवळून गेले.त्यांनी बहुजन समाजाची बारकाव्याने चौफ़ेर पाहणी केली. त्यातून समाजाची दयणीय अवस्था तुकोबारायांना पाहवली नाही.ते म्हणाले,
"न देखवे डोळा ऐसा हा आकांत । परपिडे चित्त दु:खी होते ॥"
त्यानंतर त्यांच्या जे काही लक्षात आले ते समाजाचे चित्र बदलण्यासाठी समाज परिवर्तनासाठी त्यांनी खुप कष्ट घेतले,तेंव्हा महाराज म्हणाले.
"भीत नाही आता आपुल्या मरणा । दु:खी होता जन न देखवे ॥"
यातून महाराजांनी निर्भीडपणे सत्य सांगण्यास सुरुवात केली.हे सत्य कितीही तिखट व झोंबणारे का असेना पण शेवटपर्यंत त्यांनी सत्य सांगायचे सोडले नाही.हे सत्य जरी बहुमतांच्या विरोधात का असेना पण बहुमतांपेक्षा आम्ही सत्यालाच मानतो.या बद्दल महाराज म्हणतात.
"सत्य असत्याशी मन केले ग्वाही । मानियेली नाही बहुमता ॥"
किंवा हे सत्य सांगत असताना कुणाला तनका येत असेल,राग येत असेल तरी देखील आम्ही सत्यच सांगण्याचं काम करणार आहोत असे महाराज एके ठिकाणी म्हणतात.
"तुका म्हणे सत्य सांगोत । येतील रागे तरी येवोत ॥"
यावरून महाराज अत्यंत परखड भूमिका घॆताना दिसून येतात.मग ते व्रत वैकल्यांवर आसूड ओढतात.बुवाबाजीवर प्रहार करतात तर कधी वैदिक पंडीतांच्या बाष्फ़ळ ज्ञानाची प्रौढी उघड करतात.अनेकेश्वर नाकारताना ते म्हणतात.
"सेंदरी ही देवी दैवसे । कोण ती पुजी भूते केते ॥
आपल्या पोटा जी रडते । मगती शिते अवदान ॥१॥"
त्याहीपेक्षा पुढे जाऊन महाराज म्हणतात सगळ्या देवांचा देव म्हणून आम्ही फ़क्त विठ्ठलच मानतो,स्वीकारतो.
"नव्हे जोखाई जोखाई । मायराणी मेसाबाई॥
बळीया माझा पंढरीराव । जो या देवांचाही देव ॥
रंडीचंडी शक्ती । मदयमांस भक्षिती॥
बहीराव खंडेराव । रोटी सोटीसाठी देव ॥
गणोबा विक्राळ । लाडू मोदकांचा काळ ॥
मुंज्या मैसासुरे । हे तो कोण लेखी पोरे॥
वेताळे फ़ेताळे । जळो त्यांचे तोंड काळे ॥
तुका म्हणे चित्ती । धरा रखुमाईचा पती ॥४॥"
नवस केल्यावर लेकरं-बाळं झाले असते तर नवरा करायची गरज काय ? हा जाहीर प्रश्न महाराज चुकलेल्या समाजाला करतात.
"नवसे कन्या-पुत्र होती । मग का करणे लागे पती ॥"
हे सगळे करीत असताना समाजाला अज्ञानाच्या अंधकारातून बाहेर काढत असताना,ज्ञानाचा नवा मार्ग दाखवत असताना त्यांना बर्याच संकटांना तोंड द्यावे लागतं.ब्राह्मणवर्ग त्यांना त्रास देतो,अमानुष छळ करतो तर त्यांची गाथा पाण्यात बुडवतो.
यातून महाराज खचून न जाता पुन्हा नव्याने उभे राहतात आणि पहिल्याहीपेक्षा खंबीर,धाडसी भूमिका ते पुढे घॆतात.
"तुका म्हणे ऐसा नरा । मोजुनी हाणाव्या पैजारा ॥"
किंवा
"तुका म्हणे गाढव लेखा । जेथे भेटेल तेथे ठोका ॥"
             अशा प्रकारे जगतगुरु तुकोबाराय समाजासाठी दिवसरात्र स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करायला लागतात.अज्ञान सोडा,भटमुक्त व्हा,भागवत धर्म स्विकारा असे वारंवार महाराज सांगतात.सर्व सांगुनही न ऐकणार्या वर्गाबद्दल त्यांना चीड येते.ह्या न ऐकणार्या वर्गाला एकदा महाराज उद्देशून म्हणतात.
"किती सांगू तरी न ऐकती बटकीचे।
पुढे शिंदळीचे रडतील ॥"
               आज शेतकर्यांच्या आत्महत्या झाल्या आणि वाटले महाराजांचे बोल खरे ठरले.त्यांनी सांगितलेले न ऐकल्यामुळे आमच्यावर रडायची वेळ आली.अजुन आम्हाला तुकोबाराय पुर्णपणे समजलेले नाहीत असेच म्हणावे लागेल.एवढेच काय तर बर्याच जनांच्या घरामध्ये तुकोबारायांची गाथा नाही.संत तुकोबाराय वाचून,समजून घेण्याऐवजी आम्ही वारकरी फ़क्त मंदिरात तुकाराम चालीवर गातो.तुकोबाराय फ़क्त गाण्यापुरतेच ठेवले आम्ही.यामुळे त्यांच्याच शब्दात सांगायचे झाल्यास,
"उठिते ते कुटिते टाळ । अवघा मांडिला कोल्हाळ ॥"
आम्ही एवढे शहाणे, महाराज करू नको म्हणाले ते आम्ही आधी करून बसलो.नव्हे आजही करत आहोत.
महाराज व्रत,वैकल्याच्या भानगडीत पडू नका म्हणाले होते.आम्ही अजुनही व्रतवैकल्य सोडायला तयार नाही.महाराज दगडाला देव मानू नका म्हणाले होते,ते रंजल्या गांजल्यांना आपुले म्हणणार्यांच्यात देव शोधा म्हणाले होते.आम्ही नेमकं याच्या उलट वर्तन करतो.ते नवस करू नका म्हणाले होते आम्ही करतो,ते बुवाबाजी,कर्मकांड करू नका म्हणाले होते.पण बुवाबाजी,बापूकापू आणि भामट्यांशिवाय आमचे पान हालत नाही.ते अनेक देवी-देवता मानू नका म्हणाले होते.आम्ही सगळ्यांना खेटून येतो.ते म्हणाले होते प्रत्येक गोष्ट श्रमाने,अभ्यास करून मिळवा पण आम्हाला हे जमत नाही.आपला कल दोन नंबरच्या मार्गावर असतो.
म्हणून आम्ही आतातरी अंतर्मुख होऊन तुकोबारायांना समजून घेतले पाहिजे.किमान त्या दिशेने एखादे पाऊल तरी टाकले पहिजे.असे म्हणतात साहित्याला काळाच्या मर्यादा असतात.पण आजही तुकोबारायांचं साहित्य प्रासंगिक ठरतं.समाजोपयोगी ठरतं.ही गोष्ट केवढी मोठी आणि अभिमानाची आहे.आपली प्रगती व्हावी,गुलामीतून आपण बहुजन समाजाने बाहेर पडावे म्हणून आयुष्य पणाला लावणारे संत तुकोबाराय आम्ही असेच विसरून जायचे का ?
ह्रुदयाला घाव झाल्यावर,असंख्य शारिरीक आणि मानसिक वेदना सहन करून अगदी आतून घायाळ झालेले संत तुकोबाराय अगदी  कळवळून शेवटचा उपदेश करतात.रात्रंदिवस तुमचा आमचा विचार करणारे तुकोबाराय शेवटीस काकुळतीस येवून म्हणतात...
"आतातरी पुढे हाची उपदेश।
नका करू नाश आयुष्याचा ॥
सकळ्यांच्या पाया माझे दंडवत ।
आपुलाले चित्त शुद्ध करा ॥"
बघा काही.....जमतं का पाळायला !!

* नार्याची मुंज आणि कूशीचे लग्न
* तुकोबारायांची गाथा

29 October 2012

समता प्रिय संत शिरोमणी संत नामदेव महाराज

           संत नामदेव महाराज हे वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ संत. त्यांचं कर्त्रुत्व महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून उत्तर- वायव्य भारतापर्यंत आपला ठसा उमटवून गेले."नाचू किर्तनाचे रंगी । ज्ञानदीप लावू जगी ॥" यांसारख्या शब्दांनी समाजात समतेच्या मार्गाने ज्ञानदीप लावण्याचा ध्यास घेतलेल्या संर नामदेव महाराजांनी भाषा,प्रांत,धर्म, जातपात या पलीकडे जाऊन समाज जीवणाचा विचार केला.त्यामुळे संत नामदेव महाराज केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता पंजाबमधील शिखांनाही तितकेच पुज्य ठरतात.प्रतिकुल ,राजकीय, सामाजिक अन धार्मिक आतावरणात मराठी आणि अन्य प्रादेशिक लोकजीवनाला नवे वळण लावण्याचे कार्य ज्या काही थोर संतांनी केले त्यांचे अग्रणी संत नामदेव महाराज होते.
                 मध्ययुगीन समाज जीवन प्रामुख्याने धर्मप्रधान होते.पण कर्मकांड आणि विधिनिषेद यांचे स्तोम फ़ार माजलेले होते. वर्णाश्रमाच्या धोरणामुळे उच्चवर्णीय समाजामध्ये अराजकता निर्माण झाली होती.धार्मिक संस्कार तेच करायचे ज्ञान , अध्ययन, अध्यापन, धनसंचय, शस्त्र धारण करण्याचा अधिकार त्यांनाच होता.तसेच मंदिर प्रवेश ,सार्वजनिक पाणवठे इत्यादी ठिकाणी पाणी भरण्याचा अधिकार अस्प्रुष्यांना नव्हता.हळूहळू या रुढींनाच धर्माचे महात्म्य प्राप्त होत गेले आणी समाजात भयानक अज्ञान आणि अंधश्रद्धाचे स्तोम माजले होते.
           या पार्श्वभुमीवर २६ ऑक्टोंबर १२७० रोजी नामदेव महाराजांचा जन्म एका शिंपी कुटुंबात झाला.संत नामदेव केवळ भक्तिभावाची (काव्य) गाणी लिहिणारे नव्हते तर समाजात समता प्रस्थापित करण्यात आणि समाज प्रबोधन करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.भेदाभेदांनी विदीर्ण (भग्र) झालेल्या भारतीय समाजात संत नामदेवांनी लोकनिंदेचा विचार न करता समतेची बीज रोवून विषमतेवर प्रहार केला.विसोबा खेचरांना गुरु मानणार्या  संत नामदेवांनी जेंव्हा संत चोखोबांच्या परिवारावर आपत्ती आली तेंव्हा ते मंगळवेढ्याला गेले आणि त्यांच्या (चोखोबांच्या) अस्थी स्वत: आणून सनातन्यांच्याच नगरीत खुद्द पंढरपुरच्या विठ्ठ्लाच्या पायरीशी संत नामदेवांनी चोखोबांच्या स्म्रुतीमंदिरांची निर्मीती केली.
           संत नामदेवांनी नेहमी जातीनिरपेक्ष धार्मिक लोकशाहीचा पुरस्कार केला ते एक प्रतिभासंपन्न कवी व संगीताचे चांगले जाणकार होते आणि कीर्तन कलेवर त्यांचे प्रभुत्व होते.संत नामदेवांनी त्रिप्रकरणात्मक, चरित्र, आत्मचरित्र, व्यक्तिचरित्र, आख्यानक रचना,प्रवास वर्णन, काव्य, कुटरचना,लोक कविता, भाव आणि भक्तीपर कविता,सश्यूकुडी वाणीतील हिंदी रचना अशी त्यांनी वैविध्यपुर्ण वाड:मय संपदा लिहिली.
           संत नामदेव महाराजांनी संपुर्ण भारतभर ५४ वर्ष फ़िरून समाजात समता प्रस्थापित करण्याचा अथक प्रयत्न केला.८० वर्षाचे वय झाल्यावर त्यांनी इहलोकाचा निरोप घॆण्याचे ठरविले आणि ३ जुलै १३५० रोजी पंढरपुर इथे विठ्ठ्ल मंदिराच्या महाद्वारात संत चोखोबांच्या समाधी शेजारी समाधी घॆऊन समाजासमोर समतेचा महान आदर्श ठेवला.अशा या महान संत शिरोमणींची २६ ऑक्टॊंबर रोजी जयंती.अशा या समता प्रिय संत शिरोमणी संत नामदेव महाराज यांना कोटी - कोटी विनम्र वंदन....