14 February 2014

शिवजन्मोत्सव : १९ फ़ेब्रुवारी

        शिवरायांची आठवण तर उठता बसता, चालता फिरता, कायमस्वरुपी यायला हवी. पण जर एकाच दिवशी महान शिवजन्मोत्सव  करायचा असेल तर तो तारखेप्रमाणे केला पाहिजे. १९ फ़ेब्रुवारी ही तारीख अवघ्या जगभरात मान्य केली असताना हिंदुत्व वाद्यांच्या काही सडक्या कल्पनेने नासलेले काही लोक मात्र तिथी चा आग्रह धरतात. मुळात देशातला कोणताच व्यवहार हा तिथी प्रमाणे न होत तारखे प्रमाणे होतो. शाळा, कोलेज, न्यायालये, बाजारपेठा, संसद हे सगळे तारखेप्रमाणे चालतात आणि तारीख ही जगभरात इथुन-तिथुन एकच असते. म्हणजे तारखेप्रमाणे (१९ फ़ेब्रुवारी) जर शिवजयंती साजरी केली तर ती जगभरात साजरी होईल आणि सर्व मराठे एकत्र जमतील ही भीती सड्क्या डोक्याच्या उपटसुंभांना आहे म्हणुन त्यांनी तथाकथित हिंदूह्र्दयसम्राटांना  हाताशी  धरून  मराठ्यांत  फ़ुट  पाडण्यासाठी  आणि  शिवजयंती फ़क्त महाराष्ट्रापुरती मर्यादित करण्यासाठी तिथी चा आग्रह धरतात.कुठल्याही व्यक्तीला शिवजयंतीची तारीख विचारली तर तो १९ फ़ेब्रुवारी ही तारीख पटकन सांगू शकेल. पण तिथी कोण सांगु शकेल काय ? 
         छत्रपती शिवरायांच्या जन्मदिनाबाबतचा वाद गेली शंभर वर्ष आहे, शिवचरित्राच्या अनेक साधनांमधून साधारणत: दोन जन्मतिथी येतात.वैशख शके १५४९ म्हणजे एप्रिल१६२७ आणि फ़ाल्गुन शके १५५१म्हणजे फ़ेब्रुवारी १६३०. सर्वप्रथम १९०० मध्ये वि.का.राजवाडे यांनी बखरीच्या आधारे शके १५४९(१६२७) हा शक निश्चित केला.नंतर "जेधे शकावली"मिळाल्यावर शके १५५१शुक्ल संवत्सर, फ़ाल्गून वद्य त्रुतीया(१६३०) ही नवी तिथी उजेडात आली. जेधे शकावली हे मराठ्यांच्या इतिहासातील एक अस्सल साधन व अव्वल प्रतिचा ऐतिहासिक कागद मानल्याने या जन्मतिथीबद्दल विद्वानांत एकमत होऊ लागले.
              इ.स. १६२७(शके १५४९) ही जन्म तारीख पुढील साधनांच्या आधारे मानली गेली होती. [१]९१ कलमी बखर [२] मल्हार रामराव चिटणीस बखर [३] मराठी साम्राज्याची छोटी बखर [४] शिवदिग्विजय [५] श्री शिवप्रताप [६] पंत प्रतिनिधीची बखर इ.इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यावी लागेल ती अशी की, या बखरी व इतर साधने पेशवाई व उत्तर पेशवाईतील आहेत.
                इ.स.१६३०(शके १५५१) या तिथीचा आधार मुखत्वे जेधे शकावली, शिवभारत व शिवराम ज्योतिषी हा आहे.जेधे शकावली ही छत्रपतींच्या म्रुत्युनंतर १०-१५ वर्षांत लिहिण्यात आली आहे. शिवभारत हा काव्यग्रंथ छत्रपती शिवरायांच्या पदरी असणार्या परमानंद कवीने लिहिला आहे. तर शिवराम ज्योतिषी हा छत्रपती शिवरायांचा समकालीन होता.
             वरील सर्व मतमतांतरातून शिवजन्माची तिथी निश्चितीसाठी महाराष्ट्र राज्यशासनाने दत्तो वामन पोतदार, प्रा.न.र.फ़ाटक, डॉ.आप्पासाहेब पवार, ग.ह.खरे,बा.सी.बेंद्रे, बाबासाहेब पुरंदरे यांची "निर्णय समिती" १९६६ मध्ये नेमली. परंतू त्यातून तिथीनिश्चिती न झाल्याने इ.स.१६२७ ही तिथी चालू ठेवण्याचा निर्णय घेतला. हा वाद २००१ पर्यंत चालला.शासनाने २००१मध्ये अध्यादेश काढून १९ फ़ेब्रुवारी १६३० ही जन्मतारीख निश्चित केली. या तारखेनंतर एक नवा वाद काही ब्राह्मणवादी मंडळींनी सुरु केला. त्यामध्ये बाबासाहेब पुरंदरे, "कालनिर्णय" वाले जयंत साळगावकर, निनाद बेडेकर आदींचा समावेश आहे. या मंडळींच्या मते शिवजयंती ही इंग्रजी तारखेप्रमाणे साजरी न करता मराठी तिथीप्रमाणे करावी.तिथीप्रमाणे शिवजयंतीची तारीख सतत बदलत राहते. म्हणजे २००० साली शिवजयंती २३ मार्च ला होती तर २००१ ला १२ मार्च,२००२ ला ३१ मार्च, २००३ ला २० मार्च, २००४ ला ०९ मार्च आणि २००५ ला २८ मार्च रोजी.
             आता इथे एक प्रश्न तयार होतो तो असा की ,बाळ गंगाधर टिळक,हिंदुत्ववाद्यांचे प्रेरणास्थान विनायक सावरकर, गांधी, नेहरू अशा अनेकांची जयंती सर्वत्र  इंग्रजी तारखेप्रमाणे साजरी होते मग विश्ववंद्य छत्रपती शिवरायांची जयंती तिथीप्रमाणे का ?
              हिंदुंच्या  कालगणनेनुसार शिवजयंती व्हावी असा आग्रह हे लोक धरतात. परंतु  हिंदूंची  कालगणना  एक  नाही. भारतात  विक्रम संवत व शालीवाहन शक अशा दोन  कालगणना  हिंदुंच्या आहेत. यातही बोंब अशी की   या   कालगणनेमध्ये   भारतातच  अनेक  बदल  आहेत  .उदा. विक्रम संवतच्या  वर्षाची सुरुवात बंगाल व इतर प्रांतात चैत्र शुक्ल प्रतिपदा आहे. तर  गुजरात आणि राजस्थानच्या काही भागात आषाढ शुद्ध प्रतिपदा आहे. तर शाहीवाहन शक महाराष्ट्रापेक्षा तामीळनाडूत एक वर्षाने  पुढे आहे. म्हणजे तामिळनाडूत  ३०० वी  शिवजयंती असेल  तर महाराष्ट्रात २९९ वी शिवजयंती असते.
                याचा अर्थ इतकाच की हिंदूंची म्हणून खात्रीपुर्वक सांगता येईल अशी सर्वमान्य कालगणना वापरात नाही. व्यवहारात सर्व सामान्य माणसे हिंदूंची कालगणना वापरत नाहीत तर इंग्रजी कालगणना वापरतात.जर तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करायची म्हंटले तर मागील वर्षी किती तारखेला जयंती झाली किंवा पुढील वर्षी  किती तारखेला जयंती येईल हे साळगांवकर सारख्या भटांच्या पंचांगाचा आधार घेतल्याशिवाय सांगता येणार नाही.
         आज शिवजयंती महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेर आणि भारताबाहेरदेखील साजरी होत आहे. त्यामुळे शिवजयंती ही प्रतिवर्षी एकाच तारखेला शिस्तबद्धपणे साजरी होणे महत्वाचे आहे. काही ब्राह्मणवाद्यांना मात्र शिवजयंतीच्या माधमातून स्वत:चे स्वार्थी राजकारण राबवायचे आहे म्हणून ते इंग्रजी तारखेला विरोध करत असतात. तिथीच्या आग्रहामुळे शिवजयंती उत्सवात एकवाक्यता राहत नाही. ही गोष्ट छत्रपती शिवरायांच्या व्यक्तिमत्वास हानीकारक आहे. म्हणून १९ फ़ेब्रुवारी १६३० ही तारीख बरोबर आहे हे सत्य स्विकारून मोठ्या प्रमाणात शिवजयंती १९ फ़ेब्रुवारी रोजीच धुमधडाक्यात साजरी केली पाहिजे. शेवटी शिवभक्तांचा निर्णय हा अंतिम आहे. पुन्हा एकदा शिवभक्तांना विनंती कि छत्रपती शिवराय यांच्या दोन जयंत्या करुन राजांची थट्टा थांबवावी. छत्रपतींचा जन्मोत्सव जर जागतिक दर्जाचा बनवायचा असेल तर आपणास जगमान्य असलेल्या कॅलेंडर नुसार तारखेप्रमाणे शिवजयंती साजरी करावी लागेल. सर्व शिवभक्तांना पुन्हा एकदा आवाहन शिवजयंती हि तारखे प्रमाणेच करावी. 
जय जिजाऊ । जय शिवराय । जयोस्तु मराठा । जयोस्तु शिवराष्ट्र ॥