Showing posts with label संतश्रेष्ठ तुकोबा. Show all posts
Showing posts with label संतश्रेष्ठ तुकोबा. Show all posts

6 January 2016

शिवरायांचे प्रेरक : रामदास स्वामी की तुकाराम महाराज ?

         विश्ववंद्य छत्रपती शिवरायांनी अठरापगड जातींना सोबत घेऊन मराठा स्वराज्य स्थापन केले. मराठा स्वराज्य म्हणजे सर्व जाती धर्मातील रयतेच्या आशा आकांक्षा पुर्ण करणारे लोकल्याणकारी राज्य. आजपर्यंतच्या इतिहासात पाहिले तर बर्याच अंशी इतिहासाचा विपर्यास केला गेला आहे. त्यामधील सर्वाच चर्चेचे ठरलेले प्रकरण म्हणजे स्वराज्याचे प्रेरणास्थान. आजपर्यंतचा इतिहास बघितला तर शिवरायांचे प्रेरणास्थान रामदास होते असा गवगवा केला गेला त्याचबरोबर पुरोगामी संघटनांचे म्हणने आहे शिवरायांचे प्रेरणास्थान तुकोबा होते. यातुनच "शिवरायांचे प्रेरक कोण रामदास स्वामी की तुकाराम महाराज" या वादाला परिमाण प्राप्त झाले आहे. वास्तविक इतिहास बघता शिवरायांचे गुरु किंवा प्रेरणास्थान म्हणून रामदासांचा किंवा तुकाराम महाराजांचा एकही उल्लेख सापडत नाही. पण मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर साहेब ज्याप्रमाणे म्हणतात "जेंव्हा जेंव्हा आपल्याकडे कागदोपत्री काही पुरावे उपलब्ध नसतात त्या वेळेस आपल्या  मेंदूचा तार्किक पद्धतीने वापर केला पाहिजे." त्याप्रमाणे चिकित्सा केली पाहिजे.
         क्षत्रियकुलावतंस श्री शिवाजी महाराज भोसले यांच्या पराक्रमास इ.स. १६४० चे सुमारास प्रारंभ झाला असे श्री वि.ल.भावे म्हणतात तर प्रत्यक्ष राज्य स्थापनेला सुरुवात इ.स. १६४५ साली झाली. त्यांची मुद्रा असणारे पहिले पत्र इ.स. १६४६ चे असे नरहर कुरुंदकर म्हणतात आणि ते सभासदाची बखर आणि शिवभारत इत्यादिंशी सुसंगत आहे. यावेळेपर्यंत रामदासस्वामी हे शिवरायांच्या प्रदेशात आलेही नव्हते. वर्णवर्चस्ववादी वि.का.राजवाडे यांनी "राष्ट्रगुरू रामदास" या लेखात छत्रपती शिवरायांच्या एकंदर व्यक्तिमत्वाच्या तसेच स्वराज्याच्या उभारणीत रामदासांचा कसा वाटा आहे हे ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे पटवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये ऐतिहासिक पुराव्यांच्या नावाखाली उत्तरकालीन खोट्या रामदासी बखरींचा संसर्भ देण्यात आला होता. उत्तरकालीन बखरी ह्या सर्वात अविश्वसनीय मानल्या जातात. कारण त्या सर्व पेशवेकालीन आहेत.
       रामदास स्वामी महाराष्ट्रात पहिल्यांदा आले ते इ.स. १६४४ मध्ये. यावेळी महाराष्ट्राच्या ज्या भागात रामदास स्वामींनी वास्तव्य केले तो भाग म्हणजे महाबळेश्वर. त्यावेळी महाबळेश्वर, जावळी वगैरे ठिकाणे ही शिवरायांच्या शत्रुकडे होती. त्यामुळे तिकडे शिवरायांच्या भेटीचा प्रश्नच उद्भवत नव्हता. रामदासी संप्रदायाचा विश्वकोश "दासविश्रामधाम" या ग्रंथाप्रमाणे रामदास पिशाचलिला करत होते. यामुळे त्या काळात ते "पिसाट रामदास" म्हणूनच ते चहुकडे ओळखले जायचे. याच काळात त्यांनी अदिलशहाच्या मुलुखातील चाफ़ळ येथे श्रीरामाच्या मुर्तीची स्थापना इ.स.१६४८ मध्ये केली. याचवेळी विजापुरच्या सरदारांकडून इनाम जमिनीही मिळवल्या. दियानतराव व बाजी घोरपडे यांनी रामदासांना जमीनी इनाम देऊ करून त्यांचे शिष्यही बनले. याच वेळेस बाजी घोरपड्याने शहाजीराजांना कपटाने पकडून दिले. यावरून स्पष्टच आहे की तेंव्हा शहाजीराजे, शिवाजी महाराज किंवा स्वराज्याशी रामदासांचा यावेळेपर्यंत तरी कुठलाही संबंध नव्हता हेच सिद्ध होते.
     अर्थात सत्य काय आहे, "शिवरायांच्या स्वराज्य ऊभारणीस ९ वर्षे झाली तोवर रामदासांचे पाऊल शिवरायांच्या प्रदेशातही नव्हते. ते होते शत्रुंच्या प्रदेशात". ज्यावेळी रामदास महाराष्ट्रात आले त्यांच्या आगमनापुर्वी पाच - सहा वर्षापासून तुकाराम महाराजांची किर्ती व वाणी  मात्र सर्वत्र दुमदुमत होती हे बहिनाबाईंचे आत्मचरित्र सांगते. तेंव्हा मावळखोर्यातील लोकांची मनोरचना स्वराज्य उभे करण्याची पुर्व तयारी रामदासांना करता येणे शक्य नसून ते कार्य तुकोबांनीच केले होते हेच निष्पन्न होते. शिवकालीन महाराष्ट्रात झालेल्या क्रांतीचा विचार करणे म्हणजे शिवाजी महाराजांच्या केवळ भौतिक साधनांचा विचार करून चालणार नाही तर त्याकाळी लोकांचा आत्मा कोणत्या स्वरुपाचा होता याचा विचार करणे आवश्यक आहे असे महाराष्ट्रधर्मकार भा.वा.भट म्हणतात. महाराष्ट्रातील साधुसंत यांनी समतेची शिकवण दिली, भजनी मेळावे भरवले, त्यामुळे समाजात चैतन्य निर्माण झाले आणि शिवाजी महाराजांना स्वराज्य संघटना करण्यासाठी जाग्रुत जनतेची बैठक मिळाली. श्री. त्र्यं. शेजवलकर यांनी राज्याची सप्तांगे सांगुण म्हंटले आहे, "शिवाजीने प्रथम शेवटचे अंग जे मित्र ते जोडून घेतले ही गोष्ट कधी साध्य झाली याचा इतिहास अज्ञात आहे. पण त्याने हाती घेतलेल्या कार्यात वाटेल ते परिश्रम करणारे, प्रसंगी जीवावर उदक सोडणारे मित्र त्याला मिळाले हे सर्वात आधी लक्षात घेतले पाहिजे. समाजाची उंची वाढवण्यास शिवाजीला राजकारणापुढे केंव्हाच उसंत मिळाली नाही" मग हे कार्य शिवरायांच्या उदयकाळी कोणी केले ?
       बहुजन समाजास जागरुकतेचा संदेश देऊन समता, बंधुभाव इत्यादी राष्ट्रीय सदगुणांची ओळख करून देण्यास श्री तुकाराम महाराजांची अभंगवाणी कारण ठरली असे किर्तनसम्राट श्री नित्यानंद मोहिते म्हणतात. सर्व संतांमध्ये श्री तुकाराम महाराज यांची कामगिरी विषेश नजरेत भरण्यासारखी आहे. त्यांनी आपल्या भक्तीपुर्ण, रसाळ, सोप्या अर्थपुर्ण अभंगातून जनतेमध्ये जाग्रुती निर्माण केली व म्रुतवत पडलेल्या महाराष्ट्राला अभंगरुपी संजिवनी देऊन त्यांच्यात नवचैतन्य निर्माण केले. श्री बाळशास्त्री हरदास म्हणतात, "श्री तुकाराम महाराजांमुळेच पंडीत - अपंडीत, शुद्र-अतिशुद्र, यच्चयावत बहुजन समाज देवनिष्ठेच्या आणि धर्मनिष्ठेच्या सुत्रात उपनिबद्ध होऊन पंढरीच्या पांडुरंगाच्या केंद्राभोवती एकात्म भुमिकेवर आला. श्री तुकारामांच्या ठिकाणी स्वतंत्र संप्रदाय प्रवर्तकाचे सामर्थ्य होते". तर ह. श्री. शेणोलीकर म्हणतात, "धर्माभिमान, स्वामीनिष्ठा, शरीरसुखापेक्षा धर्मनितीचे श्रेष्ठ्त्व, धर्मकर्मापेक्षा चित्तशुद्धीचे व सदाचाराचे महत्व इ. उच्चतर जीवनमुल्यांनी ओळख तुकारामांनी सामान्य जनतेला करून दिली. त्यांच्या या विधायक कार्याने शिवकार्याला उपयोगी असा ध्येयनिष्ठ, सुसंघटित व कार्यक्षम मराठा समाज तयार झाला. त्यात मराठा मावळ्यांच्या बळावर स्वराज्यसंपादनाच्या कार्यात शिवरायांना यशस्वी होता आले".
    मावळ्यांना धर्मवाड:मय कोणतेही माहीत असेलच तर तुकोबांचे अभंगच होय. मावळ्यांना धर्मनीतीव्यवहाराचे मोठे शिक्षण तुकोबांच्या किर्तनातून मिळाले होते हे अमान्य करणे शक्य नाही. समाज हा विराट पुरुष आहे व विराट झालेल्या महात्म्यावाचून त्याला गदगद हालवायला कोणीही समर्थ होत नाही. असे पांगारकरांचे विचार सार्थच आहेत. म्हणूनच श्री ना.ग.जोशी म्हणतात, "महाराष्ट्राची उंची व गौरव वाढविण्याचे ,या राष्ट्रगत व्यक्तित्वाच्या आविष्काराचे कार्य संतश्रेष्ट तुकारामांनी जे केले ते अपुर्व आहे". "एखादा संत म्हणजे नुसता मऊ मेंगुळवाणा माणुस अशी जी समजुत वारकरी संतांबाबत रुढ झाली तिला संपुर्णपणे निरुत्तर करणारा जबाब या विभुतीने केला". कळीकाळालाही पायाशी नमवण्याची अमोघ शक्ती ज्यांच्याजवळ आहे. त्यांच्या मनाची थोरवी केवढी असेल. अशा या विठठलाच्या गाढ्या विरांमध्ये तुकारामांचे स्थान अत्युच्यपदी आहे हे स्वाभाविकच आहे. तुकारामांची उन्नत व्यक्तिरेखा मोठी उठावदार दिसते आणि युगपुरुष त्याला मिळालेले महत्व सार्थ ठरते.
          तुकोबा खरे युगपुरुष होते.समकालीन संत बहिनाबाईंनी त्यांना सर्वद्रष्टा, सर्वांतरसाक्षी, विश्ववंद्य इत्यादी विशेषणे लावली असून रामेश्वरांनी विश्वसखा, सच्चिदानंदमुर्ति इत्यादी पदव्यांनी गौरवले आहे. एवढेच नाही तर त्यांनी तुकोबांचा गौरव करताना म्हंटले आहे, "तुकाराम तुकाराम । नाम घॆता कापे यम ॥ धन्य तुकोबा समर्थ । जेणे केला पुरुषार्थ ॥". अर्थात तुकोबा हेच स्वराज्योदयकाळी वस्तुत: समर्थ म्हणुन सर्वत्र गाजत होते असे रामेश्वरांच्या उद्गारावरून दिसते. या राष्ट्रपुरुषाच्या महत्कार्याचा गौरव त्यांचे काळीच सतजन करीत. म्हणजे आपल्या  कार्याची फ़लश्रुती तुकोबांना आपल्या चाळीसीतच पाहायला मिळाली. अशा परिस्थितीत शिवरायांना कोणाकडेही पाठवण्याची तुकोबांना काय आवश्यकता उरली होती ? आणि कोणत्या विषेश प्राप्तव्यासाठी ? गेली कित्येक वर्ष शुन्यातून स्रुष्टी उभी करणार्या शिवबांना खास कोणता मंत्र मिळवायचा राहिला होता ?
         एक विषेश बाब अशी की, "शिवाजी महाराज नेहमी फ़िरत असून वेळोवेळा तुकारामांचे किर्तन ऐकावयाची संधी साधीत असत. असा इतरत्र स्पष्ट उल्लेख आहे मग अशा वेळी त्यांस दर्शन होत नसे का ?" असे केळुसकर गुरुजी म्हणतात त्यावेळी श्री रा.ग.हर्षे म्हणतात की, "शिवाजी अनेक बार तुकोबांच्या किर्तनाला येत पण एकमेकांच्या प्रत्येक्ष भेटीचा असा प्रसंग कधी आला नव्हता." पण हे म्हणने किती असंभाव्य ठरते ?. बाबा  याकुत सारख्या फ़किराकडे श्रद्धेने जाणारे शिवाजी पुण्यानिकटच्या देहूच्या महाराष्ट्रसिद्ध तुकोबांना विसरतील आणि दिल्लीपर्यंत ख्यात असणार्या शिवयुवकाचे नाव शेजारच्या तुकोबांना ठाऊक नसेल हा सामान्यज्ञानविरोधा कुतर्क कोण मानणार ?
देहू पुणे अन आसपासच्या गावागावात । अहा वसविली श्री तुकयाने भक्तीची पेठ ॥
कीर्ती सकळही शिवरायांच्या श्रवणावर आली । श्रद्धा या सत्पुरुषावर शिवरायाची जडली ॥
हे अगदी स्वाभाविकच आहे.
          आता रामदासांच्या कारकिर्दीकडे वळुया, पुर्वोक्त रामदास हे स्वराज्याचा यत्न केला तेंव्हा महाराष्ट्रातही आले नव्हते. श्री नरहर कुरुंदकर म्हणतात, "शिवाजीच्या स्वराज्य उद्योगाला सुरुवात इ.स.१६४५ ला आणि मुद्रा असणारे पत्र इ.स.१६४६ चे व रामदासी पंथाची स्थापना इ.स.१६४९ ची हा कालानुक्रम समजून घ्यावा. रामदासी पंथ हा आदिलशाहीत स्थापिला गेला व चाफ़ळ देवस्थानचे पहिले विश्वस्त शिवाजीचे शत्रु आहेत. स्वराज्यनिर्मितीची प्रेरणा समर्थांची नव्हे हाच याचा अर्थ." ह.वी राजमाने म्हणतात, "शिवाजीमहाराजांच्या यश-किर्तीचा प्रताप महिमा मध्यान्हीच्या सुर्यापासून तळपत असताना समर्थ पाहत होते. पण त्यांना भेटण्यास जाण्याचे रामदासांनी मनावर घेतलेले दिसत नाही. रामदास ज्या भागात वावरत होते,तो भाग महाराजांच्या शत्रुच्या ताब्यात होता. त्यामुळे शहाणा माणुस तरी विनाकारण विस्तवावर पाय ठेवण्याचे टाळणारच"
रामदास स्वामी आणि शिवरायांची पहिली भेट राज्याभिषेकापुर्वी झाली नव्हती यावर सर्वांचेच एकमत आहे. पण त्यानंतर केंव्हा झाली याबाबतही अस्सल पुरावा उपलब्ध नाही. दि.२२ जुलै १६७२ रोजी दत्ताजी पंत व गणेश गोजदाऊ यांना जी आज्ञा दिली आहे त्यावरून असे दिसते की तोपर्यंत तरी महाराजांचे रामदासांशी जवळकीचे नाते प्रस्थापित झाले नव्हते. शिवसमर्थांच्या जीवनकालातली व नंतरची कागदपत्रे तर शके १५९४ (इ.स.१६७२) नंतर केंव्हातरी भेट झाली असली पाहिजे असे दर्शवणारी आहेत असे प्रा. फ़ाटक म्हणतात. ती भेट झालीच असेल तर पुढे केंव्हाही होवो पण इ.स.१६७२ पर्यंत मात्र झालेली नव्हती हेच इतिहास सांगतो. श्री नरहर कुरुंदकर म्हणतात, "रामदास-शिवाजी भेट झालीच असेल तर ती इ.स. १६७२  साली झाली, हे एक साधे सत्य आहे. पण समजा ही भेट इ.स.१६४५ साली झाली असती तरी त्यामुळे रामदास हा शिवाजीचा राजकीय गुरु व प्रेरक ठरत नाही.
शेवटी येथे चंद्रशेखर शिखरे यांच्या "शिवरायांचे प्रेरणास्त्रोत आणि खरे स्वराज्यद्रोही" या पुस्तकातील उतारा देत आहे.
       "शहाजीराजांचे असामान्य धैर्य, त्यांची स्वतंत्र राज्यकारभार करण्याची व्रुत्ती, त्यांनी मोघलांना दिलेला एक हाती लढा यापासुनच शिवरायांना प्राथमिक प्रेरणा मिळाली. शिवाजीराजांची राजमुद्रा व ध्वज ही शहाजीराजांची देणगी आहे. शिवाजीराजांचे पालनपोषन, संगोपण, त्यांना उत्क्रुष्ठ शिक्षण देण्याची व्यवस्था जिजाऊंनी केली. त्यांनी शिवरायांवर अत्युच्च प्रतिचे संस्कार केले, त्यांच्या मनात स्वतंत्र राज्याचे बीजारोपन केले. हे स्वराज्य अस्तित्वात येण्यासाठी शिवरायांना मार्गदर्शन करून त्यांची खंबीरपणे पाठराखन केली. त्यामुळे जिजाऊ ह्याच शिवाजीराजाच्या प्रेरणास्त्रोत असल्याचे स्पष्ट होते. वारकरी चळवळीच्या व विशेषत: संत तुकारामांच्या प्रबोधन कार्यामुळे शिवाजीराजांच्या स्वराज्यस्थापनेत मदत झाली. त्यांच्या अभंगामुळे समाजजाग्रुती झाली व हजारो मावळे शिवकार्यात सहभागी झाले. या सर्वांचे शिवकार्यात निश्चितच महत्वाचे स्थान आहे. दादोजी किंवा रामदास स्वामी यांचा शिवाजी महाराजांच्या स्वराज्यस्थापनेशी दुरान्वयानेही संबंध नाही हे सुर्यप्रकाशाएवढे स्वच्छ आहे. त्यांनी स्वत:ही असे श्रेय घेतलेले नाही. त्यांच्या जात्यभिमानी अनुयायींनी ओढूनतानून रचलेला हा बनाव आहे. यामध्ये रामदास आणि दादोजी यांच्याच इभ्रतीचे धिंडवडे निघाले आहेत."
   यामुळे या तथाकथित इतिहासचार्यांसाठी रामदासांचा एक सल्ला खुप महत्वाचा आहे किमान रामदासभक्तांनीतर मानलाच पाहिजे.
"अक्षरे गाळून वाची । कां ते घाली पदरची ॥
निगा न करी पुस्तकांची । तो येक मुर्ख ॥"
संदर्भ :
पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी (पृष्ट क्र.११) [श्री बाळशास्त्री हरदास],प्राचिन मराठी वाड:मयाचे स्वरुप (पृष्ट क्र.११५) [श्री शेणोलीकर],श्री तुकाराम चरित्र (पृष्ट क्र.४१६) [श्री पांगारकर],शिवरायांचे प्रेरणास्त्रोत आणि खरे स्वराज्यद्रोही.(पृष्ट क्र.४४) [चंद्रशेखर शिखरे],श्री दासबोध (२-२-७०) [समर्थ रामदास स्वामी],श्रीमान योगी, प्रस्तावना [श्री नरहर कुरुंदकर],समर्थांचे गुरु छत्रपती,प्रथमाव्रुत्ती(पृष्ट क्र.४५,४६) [ह.वि.राजमाने],छत्रपती शिवरायांची पत्रे (पहिली आव्रुत्ती,पृष्ट क्र.१४९) [श्री प्र.न.देशपांडे],वारसा (पृष्ट क्र.९२) [वि.ल.भावे],श्री समर्थावतार (पृष्ट क्र. १९५) [श्री देव],समर्थ चरित्र (पृष्ट क्र. २९,पृष्ट क्र.१७०) [ज.स.करंदीकर,प्रा.न.र.फ़ाटक],श्री सांप्रदायिक विविध विषय (पृष्ट क्र. ५८)[श्री देव,राजवाडे],श्री सांप्रदायिक वृत्त व चर्चा (पृष्ट क्र. १६)[श्री भा.वा.भट],अस्मिता महाराष्ट्राची (पृष्ट क्र. ६४) [श्री पा.वा.गाडगीळ],श्री शिवछत्रपती (पृष्ट क्र. ८८,९५) [श्री त्र्यं.श.शेजवलकर], श्री संत तुकारामांची राष्ट्रगाथा (पृष्ट क्र.११) [श्री नित्यानंद मोहिते],छ.शिवाजी महाराज (पृष्ट क्र.५३५) [श्री क्रुष्णाराव अर्जुन केळुसकर],सांप्रदायिक विवेचन (पृष्ट क्र.१२१ ते १२३) [श्री ना.ग.जोशी],शिवायन महाकाव्य (पृष्ट क्र.१०७) [श्री ना.रा.मोरे],तुकाराम चरित्र (पृष्ट क्र.९६) [श्री रा.ग.हर्षे].

28 March 2014

संतश्रेष्ठ तुकोबा : वैकुंठगमन की खुन ? [भाग तीन]

तुकोबांचे वैकुंठगमन आणि जिजा-कान्होबा.
आपण हे क्षणभर धरून चाललो की "संतात कीर्ति केली । तनु सायुज्यी नेली ॥"असे हे सदेह वैकुंठगमनाचे अदभुत व अपुर्व भाग्य एकट्या तुकोबांच्याच वाट्याला आले होते.तेंव्हा अशा या भाग्यशाली परिवाराकडे देहुच्याच नव्हे तर आजुबाजुच्या लोकांनीदेखील केवढ्या आदराने, किती आत्मियतेने पाहिले असते. तुकोबांच्या पुण्यपावन कुटुंबियांना कसे डोक्यावर घेऊन नाचवले असते. तळहाताच्या फ़ोडाप्रमाणे वागवले असते. त्यांच्यावर प्रेमाचा व सुखांचा वर्षाव केला असता. तुकोबांचे एखादे भव्य स्मारक उभारून तेथे नित्यमहोत्सवाचा कसा जल्लोष उडवून दिला असता आणि तुकोबांची अम्रुतवाणी मिळेल तेथून संग्रहीत करुन तो प्रचंड गाथा कसा अगदी सुरक्षीत करून ठेवला असता. त्या पुण्यस्थळाची माती मस्तकी  लावण्यासाठी व अभंग उतरून नेण्यासाठी दर्शकांची कशी रीघ लागली असती. अगदी स्वाभाविकपणेच हे सारे घडणे अनिवार्य होते. परंतू असे काही घडले आहे का ? ऐतिहासिक आधार काय सांगतात ? आपणास आश्चर्य वाटेल की इतिहास याबाबतीत स्पष्टपणे विरुद्ध साक्ष देत आहे.
           इतिहास स्वच्छ सांगतो की संतश्रेष्ठ तुकोबांच्या निर्वणानंतर महिना-दोन महिन्यातच तुकोबांच्या संपुर्ण परिवाराला देहू गाव सोडून जाणे भाग पडले. संपुर्ण कुटुंबाला देहुतून परागंदा व्हावे लागले. तुकोबांच्या निर्वाणानंतर जिजाबाई आपल्या लहान मुलास घेऊन खेडला जाऊन राहिल्या.कान्होबा सुदुंबरे येथे जाऊन राहिले.त्यामुळे विठ्ठलटिके पडिक राहिले (तु.संतसांगाती-मंबाजी). मंबाजीकडे नुसत्या देवाच्या पुजेऐवजी देऊळवाड्याची वगैरे सर्वच व्यवस्था आली होती. अशा व्यवस्थेत ती मंडळी देहुत राहणे शक्य नव्हते.’ (तु.सं.सां.-बहिना) कचेश्वर ब्रम्हे यांना, निर्वाणानंतर एक-दिड तपाने देहूस १०-५ अभंगाखेरीज तुकोबांची अम्रुतवाणीही मिळू शकली नाही. (तु.सं.सां.-कचेश्वर). तुकोबांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या निर्वाणानंतर तडकाफ़डकी गाव का सोडले, याचा संकेत कान्होबांच्या तत्कालीन अभंगातच मिळतो. आपल्या शोकमय अभंगात ते त्यावेळचे नि:सहाय व भयास्पद वातावरण सुचित करतात की-
आक्रंदती बाळे करूणावचनी । त्या शोके मेदिनी फ़ुटो पाहे ॥(२९८८)
असो आता काई करोनिया ग्लांती ? कोणा काकुलती येईल येथे ?
करिता रोदना बापुडे म्हणती । परि नये अंती कामा कोणी ॥ (२९९०)
माझे बुडविले घर । लेकरेबाळे दारोदार ।
लाविली काहार । तारातीर करोनि ॥(३००६)
काही विपत्ती अपत्या । आता आमुचिया होता ।
काय होईल अनंता ? पाहा,बोलों कासया ? ॥(३०११)
              अर्थात आपली मुलेबाळे सुद्धा निराधार झाली, दारोदार लागली व त्यांचेवर कोणत्या क्षणी काय विपत्ती कोसळेल याचा नेम उरला नाही, या भयग्रस्त भावनेनेच प्रिय पुत्रबंधुंनी आपली जीवाभावाची भुमी ताबडतोब सोडली हे स्पष्ट दिसून येते.
         त्यातही विचार करण्यासारखी गोष्ट ही की,तुकोबांच्या परिवारापैकी एकाही व्यक्तीने पुढील वीस-एकवीस वर्षात देहूच्या भुमीवर पाऊल सुद्धा टाकले नाही. आपल्या महान पित्रुदेवताच्या वार्षिक निर्वाणमहोत्सवाला देखील नाही ! आणि हा उत्सव तरी होत होता कोठे ? जिजाईच्या म्रुत्यु नंतर एकवीस वर्षाचा नारायणबुवा बंधुसह देहुस आला. तो देखील कचेश्वर यांच्या सत्पुरुषाने त्यांना प्रेरित केल्यानंतर. तुकोबांच्या मुलांनी पुन्हा देहुस ठांण दिल्यानंतर तिकोबांबद्दल जाग्रुती निर्माण झाली. विशेषत: तुकोबांचे व्रुंदावन नारायणबाबाने इ.स.१७०४ मध्ये बांधून पुण्यतिथी साजरी करावयास लागल्यानंतर तुकोबांचा किर्तीमहिमा वाढण्यास आधिकाधिक भर पडू लागली. (सं.तु.प्रास्ताविक प्रु.८) त्यापुर्वी महादेव, नारायण आदि तुकोबांच्या सुपुत्रांनी नुसती देहुच सोडली होती असे नव्हे तर विठठल देव देखील सोडला होता. त्यांनी मधल्या काळात विठोबाच्या पुजेअर्चेकडे लक्षच दिले नाही कारण विठोबा मुळेच त्यांच्या घराण्याची धुळधान उडाली अशी त्यावेळी त्यांची समजुत झाली होती. (सं.तु.प्रु.११२). श्री.वा.सी. बेंद्रे यांचे सारे संशोधन बरोबर असेल तर, तुकोबांच्या निर्वाणानंतर त्यांच्या परिवाराची झालेली वाताहत, ही दुरवस्था व विचित्र मनोरचना एकच गोष्ट ओरडून सांगत आहे असे म्हणावे लागेल की तुकोबांचे सदेह वैकुंठगमन झालेले नाही शंका नाही.
मंबाजी उवाच
      नुकतीच चाळीशी ओलांडलेल्या तुकोबांचे घातपाती निर्वाण झाले. त्यावेळी जिजाईंच्या उदरी असणारे नारायणबुवा हे वीस-एकवीस वर्षाच्या वयात जेंव्हा देहूस आले, त्यावेळचा एक प्रसंग तुकोबांचे पणतू गोपाळबुवा यांनी "नारायणबाबाचे चरित्राख्यान" यात दिलेला आहे.
एके दिवशी नारायण । इंद्रायणीचे करूनी स्नान ।
करावया श्रीमुर्तीचे पुजन । मार्गे आपण जात असता ॥
तव भेटला ब्राह्मण । तुकयाचा द्वेष्टा पुर्ण ।
मंबाजी ज्याचे नामाभिमान । तो दुष्टवचन बोलिला ॥
म्हणे रे तुझा पिता कोठे गेला ? नेणो भुताखेतांनी ओढूनि नेला ।
किंवा विदेशासि जाऊन मेला । घटस्पोट केला नसता पै ।...
            यावेळी पित्याची उत्तरर्क्रिया न केल्या कारणाने मंबाजीने नारायणाला मुर्तीला स्पर्ष सुद्धा करू दिला नाही. अखेर मंबाजीच्या उर्मटपणामुळे त्याला तिघा भावांनी ठोकून ’दिल्हा ग्रामांतरी लावुनिया ॥’ असे म्हंटलेले आहे. वरील प्रसंग हा गोपाळबुवांना अधिक्रुत परंपरेद्वारे अवगत होणे हे जितके स्वाभाविक आहे तितकेच "विंचवाची नांगी । तैसा दुर्जन सर्वांनी (३१६०)" अशा मंबाजीने हा डंख मारणे देखील नैसर्गिक आहे, यात शंकेला जागा नाही. तुकोबासंबंधी मंबाजीने हा केलेला विषारी उपहास पाषाणह्रुदयी मंबाजीच्या स्वभावाची यथातथ्य कल्पना आणून देतो. सदेह वैकुंठगमनाचे ताशे कोणी कितीही बडवले असले तरी आतली खरी बात मंबाजीलाच माहीत असल्यामुळे तो वीस एकवीस वर्षनंतर सुद्धा दुष्टवचन बोलून नारायणाला सुतकी समजून मुर्तीस हातही लावून देत नाही.हे खचितच विचार करण्याजोगे नव्हे का ? 
हत्येला जात जबाबदार ?
           तुकोबांचे हे खुनी म्हणजे मंबाजीसारखे एका विशिष्ट जातीचे असेच म्हणता येईल का ? छे:! तुकोबांच्या या खुनाला विशिष्ट जात जबाबदार आहे असे समजून जे कोणी जातीय तेढ अथवा जातीद्वेष वाढवू पाहतात त्यांना तुकोबा मुळिच कललेले नाहीत असे म्हणजे भाग आहे. गुणकर्मवादी तुकोबा जन्माने ठरलेल्या कोणत्याही जातीला अथवा वर्गजमातीला एकाच काठीने हाकायला तयार नाहीत. ते म्हणतात,"नाही यातीकुळ फ़ासे ओढी तयासी" अर्थात गळेकापू ठगाला जातकुळी कसली ?. जो दुर्जन असेल तो कुळाने मांग असो वा ब्राह्मण त्यांची जात एकच त्यामुळे तुकोबांचा खुन करणारी ती एक विशिष्ट मनोव्रुत्ती आहे. मंबाजी वगैरे केवळ तिचे प्रतिक, केवळ प्रतिनिधी! नुसत्या जन्मजातीवरून अथवा पंथादिकावरून उच्चनिचतेचा टेंबा मिरवून मोठेपणाची मिरासदारी वा त्याद्वारे स्वार्थसाधनाची मक्तेदारी कायम ठेवु पाहणारी आणि त्यासाठी हवे ते करू शकणारी दुष्ट मनोव्रुत्ती हीच तुकोबांच्या खुनाला जबाबदार आहे. शुद्र समाजनेते व्हायला लागले तर आम्हाला कोण विचारणार ? या द्वेषमुलक शुद्रस्वार्थी व वर्णांहंकारी कूविचाराचा खदखदता लाव्हारस कर्मठ समाजात आतल्या आत तीव्रतेने धुमसत आला. त्याचा मंबाजी आदिंच्या माध्यमातून झालेला परिस्फ़ोट म्हणजेच मानवतावादी वैष्णवाग्रणी तुकोबांचा अमानुष खुन. श्री नरहर चव्हान यांचे म्हणजे अक्षरश: सत्य आहे की "तुकारामाला बिना पेट्रोल च्या विमानात बसवुन सदेह वैकुंठाला पाठवण्याची पोपटपंची पुन्हा पुन्हा कथन करणे म्हणजे हा तुकारामावर अन्याय केल्यासारखे होईल". हा माणुस सामाजिक विषमता, वर्णवाद्यांची मिरासदारी व बडव्यांचे उपद्व्याप दूर करण्याच्या प्रयत्नात त्या काळात स्वत:च्या बलिदानाने हुतात्मा झाला, असे म्हणणे जास्त सयुक्तिक होईल!. तसेच कुठलाही वर्णद्वेष न वाढविता जन्माधिष्ठित उच्चनिचतेचे समाजातून समुळ उच्चाटन करून "विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म । भेदाभेदभ्रम अमंगळ" ही विचारप्रणाली जीवनात सर्वत्र प्रतिष्ठित करणे हीच तुकोबांविषयीची खरीखुरी भक्ती म्हणता येईल.
संदर्भ ग्रंथ :
संतश्रेष्ठ श्री तुकोबांच्या अभंगगाथा [शासकीय,पंढरीप्रत,पडवळांची गाथा,साहित्यलंकार रा.गो.पाटील यांनी संपादलेली]
संतश्रेष्ठ तुकाराम : वैकुंठगमन की खून ? (मुळ ग्रंथ)[साहित्यरत्न सुदाम सावरकर]
स्वप्न आणि सत्य [श्री साने गुरुजी]
प्रसाद[फ़ेब्रुवारी १९६७  श्री.न.र.फ़ाटक]
महाराष्ट्र सारस्वत [श्री.वि.ल.भावे]
संतकवि तुकाराम आणि त्यावरील आक्षेप [श्री दयानंद पोतदार ]
नारायणबाबा चरित्राख्यान [श्री गोपाळबुवा]
व्रुत्तपत्रे [लोकमत दि.६ फ़ेब्रुवारी १९७७]

22 March 2014

संतश्रेष्ठ तुकोबा : वैकुंठगमन की खुन ? [भाग दोन]

संशोधनापुढे ध्येय
        तुकोबारायांची "ब्रह्मरुप काया" ऐन उमेदीत नाहिशी झाल्याने त्यांच्या परीवाराचे,देशाचे आणि धर्माचे देखील अपरिमित नुकसान झाले. हे खरे असले तरी ती काया नाहीशी कशी झाली याचे गुढ आता उकलून काही खास लाभ होण्याचा संभव आहे का ? अजिबात नाही आणि या संशोधनाचा उद्देश तो असूच नये.पण त्यांच्या देहाबरोबर त्यांचे श्रेष्ठ तत्वज्ञानच लोपवून टाकण्याचा जो प्रयत्न ’सदेह वैकुंठगमना’ची कल्पना पसरवणार्यांनी कळत-नकळत केला.तो हाणून पाडणे हेच काय ते प्रयोजन असले पाहिजे. "पावलो पंढरी वैकुंठभवन"(३८९९) म्हणणार्या तुकोबांना कुठल्या दुरस्थ वैकुंठी जायचे होते की हे विश्वच वैकुंठरुप करायचे होते ? हे जरी स्पष्ट झाले तर मानव समाजाला ते हितावह ठरणार हे सांगायलाच नको.तुकोबांना वैकुंठातून भुमीवर आणणे हे लोकाद्धारासाठीच उपयुक्त आहे.नाहीतर कुठले तरी वैकुंठ हेच भाविकांचे ध्येय ठरून, आकाशाकडे पाहत त्यांची भुमीवर अस्ताव्यस्त पावले पडणे व "परलोका"च्या ठेकेदारांना त्याची मनसोक्त लुट करता येणे चालूच राहणार हे लक्षात घेता, हे संशोधन म्हणजे गडे मुर्दे उकरणे नव्हे तर "खरे नानवट निक्षेपीचे जुने । काढले ठेवणे समर्थांचे" (८८३) याची जाणीव ज्ञात्यांना झाल्याखेरीज राहणार नाही.
संतशिरोमणी तुकोबा आणि इतर संत महात्म्य..
आज श्री ज्ञानराजांचे समाधीजीवन व तुकोबारायांचे सदेह वैकुंठगमन असे या महापुरुषांचे लोकोत्तरत्व दर्शविणारे वेगळे कार्य सदभक्तांद्वारे अहमहमिकतेने प्रचारिले जाते. त्याब बाबत कोणी शब्द काढला तरी तो द्वेषी वा तिरस्कारणीय नास्तिक ठरतो. याबाबत खरा विचार करायला हवा की खरेच का असली बाब हीच त्या महापुरुषांचे सर्वश्रेष्ठत्व दर्शवणारी आहे ? त्यांच्या संतत्वाची गमक काय ? आद्यशंकराचार्यापासून तर समर्थ रामदासांपर्यंत एकालाही- श्री ज्ञानराजाला सुद्धा-सदेह वैकुंठी सुयोग लाभला नाही, म्हणून त्या सर्वांच्याच संतत्वाचा दर्जा तुकोबारायांपेक्षा कमी असे लेखण्याचे मनोधैर्य आपल्यात आहे काय ? समाधीजीवन, पुनर्जीवन किंवा सदेहवैकुंठगमन हेच आपले खरे पुर्णत्व किंवा हेच मानवजीवणाचे परमलक्ष्य होय. असे तरी त्या महात्म्यांनी स्वत: कोठे सांगून ठेवले आहे काय  ? तसे जर नाही तर या गोष्टीला इकडे पराकोटीचे महत्व देण्याला तरी काय अर्थ आहे ? 
वैकुंठगमनालाच खराखुरा अर्थ आहे असे जर प्रामाणिकपणे वाटत असेल तर त्याचा पुरेपूर छडा लावणे हे तरी प्रत्येक जाणत्या भक्ताला अत्यावश्यक का वाटू नये ? निव्वळ ’पीछेसे आयी आगे धकाय” अशी मुर्दांड श्रद्धा जपून ठेवण्याला काही किम्मत आहे का ? "वंदिले वंदावे निंदिले निंदावे" अशी "न धरावी चाली करावा विचार" हीच तुकोबांरायांची शिकवण आहे आणि याच शिकवणीनुसार त्यांच्या "सदेह वैकुंठगमना" च्या अथाशक्य सर्व पैलूंवर त्यांच्याच वाणीचा विवेकपुर्ण प्रकाश पाडताना अनेक प्रश्न-शंका उभे ठाकतात, "ज्या महापुरुषाचा इहलोकी अभंगरचना करण्याचा देखील अधिकार तीव्रपणे नाकारण्यात आला, त्या महापुरुषाला एकट्यालाच सदेह वैकुंठगमनाचा सर्वाच्च अधिकार मात्र खुशाल बहाल केला जातो यातील मख्खी काय कळत नाही. शिवाय, ज्या कुटुंबातील प्रमुख देवपुरुष ’सकळा पुसून’ देवासह सदेह वैकुंठी जाण्याचे अभूतपुर्व कार्य करून दाखवितो, त्या कुटुंबाला त्या भाग्यशाली घटानेनंतर महिन्याभरातच सर्वस्व टाकून त्या पावन पित्रुभुमीतून पळून जावे लागते याचा अर्थ काय ? इत्यादी शंकांच्या संदर्भातही अथाशक्य समग्र विचार करणे प्रत्येक तुकोबांच्या सदभक्तांचे कर्तव्य आहे."
तुकोबांच्या हत्येची शक्यता ?
यापुर्वीचे बरेच विचारवंत आणि आजच्या सामाजिक संघटनांच्या मते तुकोबांची हत्या झाली असावी. याचे मुख्य कारण त्यांचे क्रांतिकारक तत्वज्ञान. कर्मकांडांच्या बडिवारापेक्षा भक्तीचे श्रेष्ठत्व ते सांगत होते. वर्णश्रेष्ठत्वापेक्षा सदचाराचा महिमा ते गात होते."वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा । येरांनी वाहावा भार माथा" असे गर्जत "भेदाभेद अमंगळ" म्हणून इंद्रायणीच्या वाळवंटात तुकोबांनी समतेचा झेंडा रोवला होता. त्यामुळे प्रतिष्ठितांच्या प्रतिष्ठेवर आघात होत होते. त्यांच्या प्रस्थापित वर्णवर्चस्वाला होणार्या खंद्या विरोधामुळे मंबाजी सारखे अहंकारी भट मत्सराने जळू लागले होते. याचा पहिला प्रत्यय तुकोबांना आला तो त्यांना आपल्या अभंगाच्या वह्या इंद्रायणीत बुडवायला सांगण्यात आले तेंव्हा.वर्णवर्चस्वाच्या स्वार्थापलीकडे कुठलाही शास्त्रार्थ यामागे नव्हता.
या प्रसंगानंतर कालांतराने तुकोबांना आपल्यावरील प्राणांतिक संकटाची कल्पना आली."लावुनी कोलीत माझा करतील घात" ह्या अशा अनेक उद्गारावरून हे स्पष्ट होईल.त्याप्रमाणेच शेवटी झाले. सालो-मालो, मंबाजी यासारखे दुर्जन भट तुकोबांच्या विरोधात जळफ़ळत होते.त्यांनीच तुकोबांच्या खुनाचा डाव रचला आणि सिद्धिसही नेला. तुकोबांच्या त्या अंत्यकालीन संकटाची जाणीव संत बहिनाबाईंच्या अभंगाद्वारे होते. संत बहिनाबाईंनी पाहिलेला मंबाजी "मारु पाहे घात चिंतुनीया" असे स्पष्ट वर्णन केले आहे.
तुकोबांचा खुन झाला असावा असे आत्तापर्यंत अनेकांनी म्हंटलेले आहे. श्री दयानंद पोतदार यांच्या "संत तुकाराम आणि त्यांच्यावरील आक्षेप" या पुस्तकाला लिहिलेल्या प्रस्तावनेत त्यांनी म्हंटले आहे की तेंव्हा तुकोबांचा कोणीतरी गुप्तपणे वध केला असावा आणि खर्या गोष्टीच तपास लावण्याकडे कोणाची मती वळू नये म्हणुन प्रारंबी यात्रेची, नंतर जलसमाधीची व त्यानंतर सदेह वैकुंठगमनाची अशा एकेक कंड्या वातावरणात सोडून दिल्या असाव्यात असा तर्क संभवणीय वाटतो."
दुसरा पुरावा असा की तुकोबांचा नैसर्गिक म्रुत्यू आला असता किंवा ते खरोखरच सदेह वैकुंठाला गेले असते तर त्यांचे बंधू कान्होबा यांना "दु:खे दुभागले ह्रुदयसंपुष्ट" इतका शोक करण्याचे काय कारण होते ? वस्तुस्थिती अशी दिसते की तुकोबांच्या अंतानंतर त्यांचे सगळे कुटुंबच देशोधडीला लागले.पुढे अनेक वर्षापर्यंत तुकोबांचा एकही वंशज देहूला नव्हता.याचे कारण काय असावे ? ह्या सर्व गोष्टी विचारवंतांनी प्रतिपादन केलेल्या प्रमेयाला पुष्टीच देतात.
                                                                                                                                 (क्रमश:)

18 March 2014

संतश्रेष्ठ तुकोबा : वैकुंठगमन की खुन ? [भाग एक]

संतश्रेष्ठ तुकोबाराया
           साने गुरुजींनी त्यांच्या स्वप्न आणि सत्य ग्रंथामध्ये प्रुष्ट क्र.११२ वर म्हंटले आहे "ग्यानबातुकाराम हे महाराष्ट्राचे ह्रुदयसम्राट आहेत. त्यांचे साहित्य हे खरे राष्ट्रीय साहित्य आहे,कारण ते सर्व थराथरात गेले." संत तुकोबांच्या गाथेमध्ये अखिल विश्वाच्या कल्याणाचे तत्वज्ञान एकवटलेले आहे. प्रा.न.र.फ़ाटक म्हणतात "तुकोबांच्या वाणीत जे तेज व सत्व आहे त्याची घट्ट ओळख असणार्यांनी ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ यांची ओळख करून नाही घेतली तरी चालेल. तुकोबांच्या लिखानात या सर्वांच्या शिकवणुकीचे रहस्य सापडेल; अशा योग्य उद्देशाने भागवतधर्ममंदिराचा कळस म्हणण्याची प्रथा पडली." अशा या परमोज्ज्वल कळसा बाबत जनाजनाच्या मनामनात प्रगाढ श्रद्धा आहे.पण त्यातही वारकर्यांच्या आवडीचे स्वरूप काही निराळे आहे.
जीव जीती जीवनासंगे । मत्स्या मरण त्या वियोगे ॥
सकळा पढीये भानु । परि त्या कमळाचे जीवनु ॥
या प्रमाणे इतरांच्या द्रुष्टीने महान असणारे तुकोबाराय वारकर्यांचे तर जीवनच आहेत.
            संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या निर्वाणासंबंधी आजपर्यंत अनेकांनी चर्चा केली आहे."महाराष्ट्र सारस्वत"कार भावे यांच्या पासून ते आत्तापर्यंतचे साहित्यिक यात आहेत. श्री वा.सी.बेंद्रे यांसारखे संशोधकही यामध्ये आहेत. यांच्या मालिकेत आजच्या सामाजिक संघटनांचा देखील समावेश करावा लागेल. संत तुकारामांचा खुनच केला असावा असे स्पष्टपणे प्रतिपादन करणारेही बरेच होऊन गेले. इतकेच काय पण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनीही "मेला की मारला कळेना । म्हणती वैकुंठाला गेला ।" या आपल्या उद्गारात याच प्रमेयाकडे संकेत केला आहे.
निर्वाण अभंग आणि अभंगपत्रे
           संतश्रेष्ठ तुकोबांच्या निर्वानाचा प्रश्न त्यांच्याच अभंगाच्या द्वारे सर्वांनी सोडविण्याचा प्रयत्न केला आहे.मग त्यात मत-मतांतरे का निर्माण व्हावीत ? यातील एक महत्वाची गोष्ट अशी की, संतांच्या आज ज्या गाथा आढळतात त्यात त्यांनी हे लिहिलेले अभंग कालानुक्रमाने दिलेले असतात असे मुळीच नाही. संत तुकारामांच्या अभंगातही असेच झालेले आहे. आपल्या आयुष्यात अभंगरचना करताना कदाचित स्वत: तुकाराम महाराजांनी किंवा त्यांच्या लेखनिकांनी  ते क्रमश: लिहुन ठेवलेलेही असतील. पण आज कालानुक्रमाने लिहिलेल्या अशा अभंगाचा अस्सल गाथा उपलब्ध नाही. आहे त्या अभंगाची विषयावार विभागणी करून ते छापलेले आहेत. उपलब्ध गाथ्यात सर्वत्र ही विषयविभागणी आणि त्यात अंतर्भूत केलेल्या अभंगाची संख्या ही सारखी आढळते अशी नाही. अशा विषयविभागणीच्या प्रयत्नातूनच तुकाराम महाराजांच्या अंत्यकाळा विषयीच्या अभंगाचे प्रकरण निर्माण झाले आहे.
             निरनिराळ्या गाथ्यात आढळणार्या अशा निर्वाण प्रकरणातील अभंगाची तर्ककठोर बुद्धीने छाननी केली तर समजुन येईल की हे निर्वाणाचे अभंग केवळ संकलनात्मक आहेत. प्रत्येक संपादकाने वेगवेगळ्या अभंगसंचातून आपल्याला सोईचे वाटतील असे किंवा ओढून ताणून उपयोगी आणता येतील असे असंबद्ध विषयींचे अभंग आपापल्या संपादणीतील निर्वाण प्रकरणात संकलीत केले आहेत. इतकेच नाही तर तुकोबांच्या निर्वाणासंबंधी आपल्या मताच्या पुष्ट्यर्थ काही प्रक्षिप्त अभंगही त्यात घातले गेले आहेत. या संकलनाबाबत एक दोन उदाहरणे पुरेशी आहेत.
१] "क्र.१५९६ या अभंगात गरुडावर बसून चतुर्भुज हरी वैकुंठाहुन तुकोबांच्या घरी येतात. क्र.१६०६ मध्ये श्रीरंगाशेजारी गरुडावर बसण्याऐवजी तुकोबा एकदम कुडीसहीत गुप्त होतात...गुप्त झाल्यानंतरही अभंग सुरुच असतात. क्र.१६०७ मध्ये तर आत्तापर्यंतच गरूड विमानात परिवर्तीत होतो आणी तुका बैसला विमानी हे द्रुष्य़ संत लोचनी पाहू शकतात. याच अभंगाच्या शेवटी तुका वैकुंठासी नेला तरी देखील १६०८ हा अभंग जन्मास येतोच.त्यात तर तुकोबा ’क्षीरसागर शयनी’ पोहचून सिंहासनी बसले आहेत.तो अभंग इहलोकी कसा म्हंटला गेला ? आणि क्षीरसागरी पोहचल्यानंतर वाराणसीपर्यंत असो सुखरूप (क्र.१६०९) असा काशीला पोहचल्याचा निरोप कसा काय आला ? या शेवटच्या अभंगात आपण येथून निजधामास जाणार असे तुकोबा म्हणतात. येथे तुकोबांबरोबर देव नाही पण गरूड मात्र आहे ! अशी ही सारी विसंगतीची चमत्क्रुती !"
२] "चार कोसांवर विमान थांबवून जर हे अभंग लिहिले तर ’सकळही माझी बोळवण करा’ हे म्हणजे भुमीवरचे की आकाशातले ? ’उठा एक ऐका सांगतो तुम्हासी’..अशी सहा ओळीत तीनदा सांगण्याची पुनुराव्रुत्ती व्हावी,हे तुकोबांना सर्वथा अमान्य असणार्या रचनाशैथिल्याची कल्पना आणुन देण्यास पुरेसे नाही का ? स्वपत्नीसाठी येतो काकुलती मनी धरा म्हणून ’पदर पसरून दाढी ओठी’ धरून केविलवाणीने लोकांची मनधरणी करावी. देवासह वैकुंठी जाण्याचे अपुर्व भाग्य लाभले असताही ’अहो देवा ! कैसी घरबुडवण केली’ म्हणून आकांत करावा आणि ’देवांचे ते मुळ शोधू नये कोणी’ असा भलताच उपदेश करावा  हे सारे तुकोबांच्या व्यक्तित्वाशी सुसंगत असेच आहे का ?  ’म्हणे मज आता निरोप द्यावा- ऐसे बोलो निया गुप्त झाले’ ही सारी रचना तुकोबांचीच आहे असे म्हणता येईल का ?..."
श्री तुकोबा महाराज विमानात बसुन सदेह वैकुंठाला गेले असे मानणार्या प्राचीनांनीच त्यांची ’विमानातून लिहिलेई अभंगरुप पत्रे’ निर्माण केली आहेत. असे का म्हणू नये ? ’चौकोशावरी थांबवली विमाने । पत्र हे तेथून तुम्हा लिहिले’ व ’स्वर्गलोकीहुनि आले हे अभंग’ या वचनांमधील ’तेथून’ व ’आले’ हे शब्द स्पष्टच सुचवितात की ते शब्द प्रुथ्वीवरील व्यक्तीच उच्चारू शकते. शिवाय ’चौकशा’वर ’स्वर्गलोक’ असू शकत नाही. ’सप्त अभंगी पत्र’ व ’बारा अभंगी पत्र’ या दोन्ही बरोबर ’टाळगोधडी’ चा उल्लेख आहेच. तेंव्हा, तुकोबांबरोबर ’टाळगोधड्या तरी किती कल्पाव्या ? "तुकोबांचे निर्वाण झाले द्वितीयेस तर टाळगोधडी मिळाली पंचमीस ! हे साहित्य नेमके देहुलाच पडले" हे वास्तवतेच्या पलिकडचे नव्हे काय ? अशा भाकडकथा सांगणारे अभंग प्रक्षिप्त नव्हे तर काय म्हणावे ?.  
शुद्ध संशोधनासाठी
देवधर्म आणि अंधश्रद्धा यांमध्ये बुडालेले कोणी भक्त म्हणतील की लोकमाणसात वैकुंठगमनाची दिव्य कल्पना शेकडो वर्ष द्रुढमुल झाली असता आता हे नव्याने मांडून कोणते कल्याण होणार आहे ? "जाले तेंव्हा जाले मागील ते मागे । आता वर्म लागे ठावी झाली ॥" हे सत्य असले तरी गडे मुर्दे उकरून लाभ काय ? हा प्रश्न बराच महत्वाचा आहे..खरे तर कोणत्याही बाबतीतले सत्यदर्शन हे निरपेक्षपणे स्वत:च अत्यंत मुल्यवान असते हे खरे. असत्यावर आधारलेली कल्पना दिव्य असली तरी ती कांचनम्रुगाप्रमाणे फ़सवी असते.  ’जगरुढीसाठी घातले दुका असे ’पोटदंभाचे पसार’ मांडणारे धर्माचे घाऊक व्यापारी ’चालीचाचि वाहो’ कायम ठेऊन आपल्या ग्राहकांच्या भ्रांत भावनांची खुशाल जपणूक करोत, पण संत मात्र तो मुलामा उडवून लावणेच हितावह समजतात. कारण भ्रामक कल्पनांनी कोणाचा कधीच उद्धार होत नसतो. उलट असत्याभिमान व डोळे बांधलेली श्रद्धा यांच्या पोटी शेकडॊ पापेच जन्मास येतात.
"तुका म्हणे लोपे । सत्याचिया घडती पापे " हे कसे विसरता येईल ? म्हणूनच तुकोबाराया निक्षून सांगतात-
"अहो श्रोतेवक्ते । सकळही जन ! बरे पारखून बांधा गाठी ॥
तुके तरी तुकी खर्याचे उत्तम । मुलामांचा भ्रम कोठवरी ?"
           भक्तांच्या भावना दुखावतील एवढ्यासाठी सत्य दडपून टाकायचे हा धर्म आहे का ? "लटिके ते रुचे । सत्य कोणाही ना पचे ॥" म्हणून असत्यच घोपटायचे की काय ? "धर्म आहे वर्माअंगी" याची वारंवार जाणीव करून देणार्या तुकोबांनी स्वष्ट केले आहे की कोणाच्या भिडेसाठी अथवा भावनेसाठी सत्य डावलता कामा नये.’नये भिडा सांगो आन’ व ’काकुळतीसाठी सत्याचा विसर । पडले अंतर न पाहिजे॥. ’त्यामुळे इथे कोरड्या कल्पना जुगारून यथार्तवादच स्विकारायला हवा.
                                     (क्रमश:)

30 November 2013

आतातरी पुढे हाची उपदेश

             जगतगुरु संतशिरोमणी संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे ह्र्दयाला भिडणारे अभंग. अज्ञान, रुढी, परंपरा, ब्राह्मणवाद आणि कर्मकांडात अडकलेला समाज व त्याची दयनीय अवस्था पाहून महाराज कळवळून गेले.त्यांनी बहुजन समाजाची बारकाव्याने चौफ़ेर पाहणी केली. त्यातून समाजाची दयणीय अवस्था तुकोबारायांना पाहवली नाही.ते म्हणाले,
"न देखवे डोळा ऐसा हा आकांत । परपिडे चित्त दु:खी होते ॥"
त्यानंतर त्यांच्या जे काही लक्षात आले ते समाजाचे चित्र बदलण्यासाठी समाज परिवर्तनासाठी त्यांनी खुप कष्ट घेतले,तेंव्हा महाराज म्हणाले.
"भीत नाही आता आपुल्या मरणा । दु:खी होता जन न देखवे ॥"
यातून महाराजांनी निर्भीडपणे सत्य सांगण्यास सुरुवात केली.हे सत्य कितीही तिखट व झोंबणारे का असेना पण शेवटपर्यंत त्यांनी सत्य सांगायचे सोडले नाही.हे सत्य जरी बहुमतांच्या विरोधात का असेना पण बहुमतांपेक्षा आम्ही सत्यालाच मानतो.या बद्दल महाराज म्हणतात.
"सत्य असत्याशी मन केले ग्वाही । मानियेली नाही बहुमता ॥"
किंवा हे सत्य सांगत असताना कुणाला तनका येत असेल,राग येत असेल तरी देखील आम्ही सत्यच सांगण्याचं काम करणार आहोत असे महाराज एके ठिकाणी म्हणतात.
"तुका म्हणे सत्य सांगोत । येतील रागे तरी येवोत ॥"
यावरून महाराज अत्यंत परखड भूमिका घॆताना दिसून येतात.मग ते व्रत वैकल्यांवर आसूड ओढतात.बुवाबाजीवर प्रहार करतात तर कधी वैदिक पंडीतांच्या बाष्फ़ळ ज्ञानाची प्रौढी उघड करतात.अनेकेश्वर नाकारताना ते म्हणतात.
"सेंदरी ही देवी दैवसे । कोण ती पुजी भूते केते ॥
आपल्या पोटा जी रडते । मगती शिते अवदान ॥१॥"
त्याहीपेक्षा पुढे जाऊन महाराज म्हणतात सगळ्या देवांचा देव म्हणून आम्ही फ़क्त विठ्ठलच मानतो,स्वीकारतो.
"नव्हे जोखाई जोखाई । मायराणी मेसाबाई॥
बळीया माझा पंढरीराव । जो या देवांचाही देव ॥
रंडीचंडी शक्ती । मदयमांस भक्षिती॥
बहीराव खंडेराव । रोटी सोटीसाठी देव ॥
गणोबा विक्राळ । लाडू मोदकांचा काळ ॥
मुंज्या मैसासुरे । हे तो कोण लेखी पोरे॥
वेताळे फ़ेताळे । जळो त्यांचे तोंड काळे ॥
तुका म्हणे चित्ती । धरा रखुमाईचा पती ॥४॥"
नवस केल्यावर लेकरं-बाळं झाले असते तर नवरा करायची गरज काय ? हा जाहीर प्रश्न महाराज चुकलेल्या समाजाला करतात.
"नवसे कन्या-पुत्र होती । मग का करणे लागे पती ॥"
हे सगळे करीत असताना समाजाला अज्ञानाच्या अंधकारातून बाहेर काढत असताना,ज्ञानाचा नवा मार्ग दाखवत असताना त्यांना बर्याच संकटांना तोंड द्यावे लागतं.ब्राह्मणवर्ग त्यांना त्रास देतो,अमानुष छळ करतो तर त्यांची गाथा पाण्यात बुडवतो.
यातून महाराज खचून न जाता पुन्हा नव्याने उभे राहतात आणि पहिल्याहीपेक्षा खंबीर,धाडसी भूमिका ते पुढे घॆतात.
"तुका म्हणे ऐसा नरा । मोजुनी हाणाव्या पैजारा ॥"
किंवा
"तुका म्हणे गाढव लेखा । जेथे भेटेल तेथे ठोका ॥"
             अशा प्रकारे जगतगुरु तुकोबाराय समाजासाठी दिवसरात्र स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करायला लागतात.अज्ञान सोडा,भटमुक्त व्हा,भागवत धर्म स्विकारा असे वारंवार महाराज सांगतात.सर्व सांगुनही न ऐकणार्या वर्गाबद्दल त्यांना चीड येते.ह्या न ऐकणार्या वर्गाला एकदा महाराज उद्देशून म्हणतात.
"किती सांगू तरी न ऐकती बटकीचे।
पुढे शिंदळीचे रडतील ॥"
               आज शेतकर्यांच्या आत्महत्या झाल्या आणि वाटले महाराजांचे बोल खरे ठरले.त्यांनी सांगितलेले न ऐकल्यामुळे आमच्यावर रडायची वेळ आली.अजुन आम्हाला तुकोबाराय पुर्णपणे समजलेले नाहीत असेच म्हणावे लागेल.एवढेच काय तर बर्याच जनांच्या घरामध्ये तुकोबारायांची गाथा नाही.संत तुकोबाराय वाचून,समजून घेण्याऐवजी आम्ही वारकरी फ़क्त मंदिरात तुकाराम चालीवर गातो.तुकोबाराय फ़क्त गाण्यापुरतेच ठेवले आम्ही.यामुळे त्यांच्याच शब्दात सांगायचे झाल्यास,
"उठिते ते कुटिते टाळ । अवघा मांडिला कोल्हाळ ॥"
आम्ही एवढे शहाणे, महाराज करू नको म्हणाले ते आम्ही आधी करून बसलो.नव्हे आजही करत आहोत.
महाराज व्रत,वैकल्याच्या भानगडीत पडू नका म्हणाले होते.आम्ही अजुनही व्रतवैकल्य सोडायला तयार नाही.महाराज दगडाला देव मानू नका म्हणाले होते,ते रंजल्या गांजल्यांना आपुले म्हणणार्यांच्यात देव शोधा म्हणाले होते.आम्ही नेमकं याच्या उलट वर्तन करतो.ते नवस करू नका म्हणाले होते आम्ही करतो,ते बुवाबाजी,कर्मकांड करू नका म्हणाले होते.पण बुवाबाजी,बापूकापू आणि भामट्यांशिवाय आमचे पान हालत नाही.ते अनेक देवी-देवता मानू नका म्हणाले होते.आम्ही सगळ्यांना खेटून येतो.ते म्हणाले होते प्रत्येक गोष्ट श्रमाने,अभ्यास करून मिळवा पण आम्हाला हे जमत नाही.आपला कल दोन नंबरच्या मार्गावर असतो.
म्हणून आम्ही आतातरी अंतर्मुख होऊन तुकोबारायांना समजून घेतले पाहिजे.किमान त्या दिशेने एखादे पाऊल तरी टाकले पहिजे.असे म्हणतात साहित्याला काळाच्या मर्यादा असतात.पण आजही तुकोबारायांचं साहित्य प्रासंगिक ठरतं.समाजोपयोगी ठरतं.ही गोष्ट केवढी मोठी आणि अभिमानाची आहे.आपली प्रगती व्हावी,गुलामीतून आपण बहुजन समाजाने बाहेर पडावे म्हणून आयुष्य पणाला लावणारे संत तुकोबाराय आम्ही असेच विसरून जायचे का ?
ह्रुदयाला घाव झाल्यावर,असंख्य शारिरीक आणि मानसिक वेदना सहन करून अगदी आतून घायाळ झालेले संत तुकोबाराय अगदी  कळवळून शेवटचा उपदेश करतात.रात्रंदिवस तुमचा आमचा विचार करणारे तुकोबाराय शेवटीस काकुळतीस येवून म्हणतात...
"आतातरी पुढे हाची उपदेश।
नका करू नाश आयुष्याचा ॥
सकळ्यांच्या पाया माझे दंडवत ।
आपुलाले चित्त शुद्ध करा ॥"
बघा काही.....जमतं का पाळायला !!

* नार्याची मुंज आणि कूशीचे लग्न
* तुकोबारायांची गाथा