Showing posts with label स्वराज्याचे शिलेदार. Show all posts
Showing posts with label स्वराज्याचे शिलेदार. Show all posts

26 June 2013

स्वराज्याचे पहिले सरसेनापती : हंबीरराव मोहिते

           शिवशाहीच्या उदयापुर्वी अनेक कर्तबगार घराणी उदयास आली होती त्यामध्ये मोहिते, घाटगे, महाडिक, सुर्वे, जाधव, सावंत या विविध घराण्यांनी पराक्रमी पुरुषांनी मुस्लिम शाह्यामध्ये लष्करी सेवा करून नावलौकिक मिळवला होता.त्यांच्या भोसले घराण्याशी संबंध आला त्यावेळी नावलौकीकात आणखीनच भर पडली.काही घराण्यांनी छत्रपती घराण्यांशी नातेसंबंध निर्माण केला.त्यापैकी मोहिते घराणे जवळचे घराणे होते.या घराण्यात अनेक कर्तबगार पुरुष निर्माण झाले.याच घराण्यातील हंबीरराव मोहिते यांना शिवरायांनी अष्ठ्प्रधान मंडळामध्ये सरसेनापती म्हणुन स्थान दिले.खर्या अर्थाने हंबीरराव हे स्वराज्याचे पहिले सरसेनापती होते.हंबीररावांच्या अगोदर शिवरायांचे पराक्रमी सेनापती प्रतापराव गुजर व नेताजी पालकर यांचे स्वराज्यस्थापनेत मोठे योगदान आहे.परंतू त्यांच्याबाबतीत शोकांतिका झाली आणि साहजिकच हंबीरराव सरसेनापती झाले.
           सरसेनापती हंबीररावांच्या गराण्याचा इतिहास पाहिला तर तो गौरवशाली आहे.हंबीररावांचे पणजोबा रतोजी मोहिते यांनी निजामशाहीत मोठा पराक्रम गाजविला होता.त्यांना निजामशाहीने "बाजी" हा किताब दिला होता.हे घराणे तळबीड या गावची पाटीलकी सांभाळत होते.तुकोजी मोहिते हे पराक्रमी पुरुष तळबीड येथे आला व तेथील पाटीलकी सांभाळत सेवा करू लागला या घराण्याने घाटगे आणि घोरपडे घराण्याशी सोयरीक जुळवून आणली.याच दरम्यान शहाजीराजे यांच्याशी या घराण्यातील संभाजी व धारोजी मोहिते यांचा संबंध येवून शहाजीराजांच्या लष्कारात सामील झाले व मोठे शौर्य गाजवले.संभाजी मोहिते व धारोजी मोहिते त्या काळातील प्रराक्रमी सेनानी होते.त्यांच्या शौर्याची गाथा अदिलशाही फ़र्मानामध्ये पहावयास मिळतात.यातील संभाजी मोहितेचा मुलगा म्हणजे हंबीरराव मोहिते हा मर्दमराठा शिवरायांच्या सानिध्यात आले.स्वराज्याच्या स्थापनेवेळी संभाजी मोहिते हे शहाजी राजेंच्या लष्करात सहहवालदार होते.संभाजी मोहिते पुढे कर्नाटकला गेले मात्र आपली मुलगी सोयराबाई हिचा विवाह शिवरायांसोबत लावून दिला व छत्रपती घराण्यांशी पुन्हा नाते निर्माण केले.पुढे संभाजी मोहिते यांचा मुलगा हंबीरराव मोहिते यांनी आपली मुलगी ताराबाई हिचा शिवपुत्र राजाराम महाराजांशी विवाह लावून दिला.मोहिते घराणे हे छत्रपतीचे अगदी जवळचे घराणे आहे.याच घराण्यातील उदयास आलेला मर्द मराठा म्हणजेच हंबीरराव मोहिते.
            शिवरायांच्या राज्याभिषेकापुर्वी महापराक्रमी सेनापती प्रतापराव गुजर बहलोल खानाशी झालेल्या संघर्षात मारले गेले.त्यांच्या शोकांतिकेनंतर ते सेनापती पद रिकामे झाले व ते पद हंबीरराव मोहितेंना दिले आणि अष्टप्रधान मंडळातील सरसेनापती पद म्हणुन मान मिळाला.हंबीरराव हा प्रतापरावांच्या सैन्यात सेनानी होता.ज्यावेळी प्रतापराव पडल्याचे कळाले तेंव्हा हंबीररावांनी अदिलशाहीच्या सेनेवर जबरदस्त हल्ला केला.शत्रुला विजापुरपर्यंत पिटाळून लवण्यात हंबिररावांचे मोठे योगदान आहे.सरसेनापती हा केवळ पराक्रमीच असून चालत नाही.तर तो प्रसंगाचा जाणकार व ह्रुदयाठायी शहाणपण आणि सबुरी असावी लागते.हे सर्व गुण हंबीररावांकडे होते.छत्रपती शिवरायांनी त्याच्या पराक्रमाचा गौरव म्हणुनच अष्ठ्प्रधान मंडळात स्थान दिले.हंबीररावांचे मुळ नाव हंसाजी मोहिते होते.महाराजांनी हंसाजी चा "हंबीरराव" हा किताबाने सन्मान केला.सरनौबत दिली.राज्याभिषेकानंतर मोघली सुभेदार दिलेरखान व बहादूरखान यांच्या छावण्यावर हल्ला करण्याचा आदेश शिवरायांनी हंबीररावांना दिला.ही स्वारी यशस्वी करून खानदेशातील मोघलांची खानदेश,बागलाल,गुजरात,बर्हाणपूर,वर्हाड,माहूड, वरकड प्रर्यंत प्रदेशात धुमाकूळ घातला होता.यानंतर (सन १६७६) सरसेनापती हंबिररावाने कर्नाटकातील कोप्पल येथील अदिलशाही पठाणी सरदार हुसेनखान मियाणच्या  येलबुर्गा येथे मोठा पाडाव करूण त्याच्या जुलमातून रयतेची मुक्तता केली.सरसेनापती हंबीररावांच्या तलवारीची कमाल या विषयीचे वर्णन बखरीतून आलेले आहे.हुसेनखान केंद्र करून सेनानी धनाजी जाधव व सरसेनापती हंबीरराव मोहिते शिवरायांस येवून मिळाले त्यावेळी शिवराय गोवळकोंड्यात भागानगर येथे होते. यानंतर महाराजांना आपले बंधू व्यंकोजीराजेंबरोबर सामोपचाराने चांगले संबंध निर्माण करावयाचे होते.मात्र व्यंकोजींची भेट यशस्वी झाली नाही.पुढे महाराजांनी कर्नाटकातील मोहिम आटोपती घेतली आणि महाराष्ट्रात (स्वराज्यात) आले.नंतर हंबिरराव सन १६७८ मध्ये महाराष्ट्रात (स्वराज्यात) आले.दरम्यान युवराज छत्रपती संभाजी राजेंचे मोघालांना जाऊन मिळणे पुन्हा स्वराज्यात येणे यानंतर छत्रपती शिवराय व संभाजी राजेंची पन्हाळा गडावर भेट या घटना घडल्या.त्यानंतर महाराजांनी लहान पुत्र राजाराम महाराजांचा प्रतापराव गुजर यांची मुलगी जानकीबाईशी विवाह घडवून आणला.त्यानंतर अवघ्या दहा ते बारा दिवसांनी छत्रपती शिवरायांचे निधन झाले.यावेळी हंबीरराव कर्हाड परिसरात छावणी टाकून होते.
           थोड्याच दिवसांत काही ब्राह्मण प्रधानांनी संभाजी राजेंना छत्रपतीपदावर न बसविता त्यांचा हक्क डावलून राजाराम महाराजांचे मंचकारोहन केले ही बाब संभाजी राजांना कळली तेंव्हा त्यांनी आपल्या सर्व किल्लेदार व अधिकारांना आपल्या पायाशी रुजु होण्याचे आदेश सोडले.हे आज्ञापत्र सरसेनापती हंबीररावांनाही मिळाले होते.हंबीररावांनी संभाजी राजांचीच सेवा करण्याचा निर्णय घेतला.ज्यावेळी राजाराम महाराजांच्या बाजुने असणारे प्रधान हंबीररावांना भेटण्यास आले तेंव्हा त्यांची तिव्र शब्दात निर्भलना केली.याठिकाणी स्वामीनिष्ठा दिसून येते कारण स्वराज्याचा वारसदार म्हणुन संभाजी राजांचा खरा हक्क होता.हंबीररावांळेच बंडखोर प्रधानांचे  मनोरथ विरून गेले व संभाजी राजे छत्रपती झाले.यावेळीचा हंबीररावांचा न्यायीपणा इतिहासात प्रसिद्ध आहे.संभाजी राजेंच्या राज्याभिषेकानंतर संभाजी राजेंच्या आदेशानुसार विविध आघाड्यांवर हंबीररावांनी आपला पराक्रम गाजवला त्यापैकी बुर्हाणपुरचा विजय, त्यांनी मिळवलेली प्रचंड लुट महत्वाची आहे.या विजयाने मोघलांची नाचक्की झाली.त्यानंतर मोघली सरदार शहाबुदीनखान उर्फ़ गाजीउदीनखान बाहदूर याच्यावरील हंबीररावांची स्वारी महत्वाची आहे.खान रामसेज किल्ल्याला वेढा देऊन होता त्यावेळी हंबीररावांनी त्याच्यावर हल्ला करून पराक्रम गाजवला.यावेढ्यात हंबीरराव जखमी झाले होते.यानंतर पुढे संभाजी राजांच्या आदेशानुसार भिमानदीच्या परीसरातून मोघली सरदार कुलीचखान व पन्हाळा परीसरातून शहाजादा आज्जमला पिटाळून लावण्यासाठी हंबीररावांनी शर्थीचा यशस्वी प्रयत्न केला.त्यानंतर कल्याण जवळ रहुल्लाखान व बाहदुरखानाचा पराभव केला.सन १६८८ मध्ये रायगडाजवळ हंबिररावांनी गाजीउद्दीन खानाबरोबर दोन हात केले या लढाईत मराठ्यांचे मोठे नुकसान झाले.यानंतरच्या कालखंडात खुद्द संभाजीराजेंच्या बरोबर अनेक मोहिमेत हंबीररावांचा मोठा सहभाग होता.सरसेनापती हंबीररावांची शेवटची लढाई झाली ती वाईजवळ या युद्धात मोघली सरदार सर्जाखानाचा पराभव झाला परंतू हंबीररावांना तोफ़ेचा गोळा लागून धारातिर्थी पडले.नेमकी ही लढाई कोठे झाली याची नोंद नाही.मात्र वाईजवळील युद्धात हा मर्द मराठा सरसेनापती धारातिर्थी पडला.डिसेंबर १६८७ मध्ये हंबीररावांच्या म्रुत्युने मोठी पोकळी निर्माण केली.संभाजीराजांपुढे अनेक आव्हाने निर्माण झाली.
             एकंदरीत सरसेनापती हंबीरराव मोहितेंचे मराठा स्वराज्यप्रेम व स्मामीनिष्ठा दिसून येत असताना छत्रपती शिवरायांची शिकवण ही महत्वाची होती हे ही दिसून येते. हंबीररावांच्या ठायी शत्रुशी लढण्याची जिद्द व जबर आत्मविश्वास या सर्व गोष्टी छत्रपती शिवरायांच्या तालमीतुनच हंबीररावांना मिळाल्या होत्या. इतिहासानेही दाखवून दिले आहे की विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराजांची सरसेनापतीची निवड अगदी योग्य होती.अशा या मर्दमराठ्यास मानाचा मुजरा.

30 May 2013

स्वराज्याचे शिलेदार - सेनापती संताजी घोरपडे

           संताजी घोरपडे हे मराठा साम्राज्याचे (१६८९ ते १६९७) सरसेनापती होते. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांच्या स्वातंत्र्यलढ्याची धूरा वाहिली. संताजी घोरपडे हे नाव धनाजी जाधव यांच्यासोबत मराठेशाहीत घेतले जाते. या दोघांनी मिळून अत्यंत दीर्घ काळ (१७ वर्षे) औरंगजेबच्या बलाढ्य सेनेचा सामना केला,मुघल सैनिकां मध्ये संताजी आणि धनाजी यांची प्रंचड दहशत होती. सार्वत्रिकरीत्या मुघल छावण्यांवर हल्ले हे त्यांच्या युद्धनीतीचा भाग होते. अत्यंत नाजूक पडत्या काळात मराठ्यांचे स्वराज्य नष्ट होण्यापासून वाचवले व जसजसे औरंगजेबचा प्रतिकार क्षीण होत गेला तसतसे नंतर धनाजींनी स्वराज्य पसरवण्याचे धोरण अवलंबले. १७०७ मध्ये औरंगजेबच्या मृत्यू समयी मराठ्यांनी मध्य भारतापर्यंतचा भूभाग स्वराज्यात आणला होता. शिवाजी महाराजांनी स्थापिलेल्या स्वराज्याला संताजी व धनाजी यांनी वाचवले व पसरवले. मराठ्यांनी १८ व्या शतकात जवळपास संपूर्ण भारतावर आपला दरारा निर्माण केला. त्यांच्या एका मोहिमेचा हा किस्सा ....... 
           शंभूराजानंतर राजाराम महाराजांनाही आता औरंगजेब वाट मोकळी करत नव्हता त्यामुळे पन्हाळ्या वरूनच राजाराम महाराज राजकारभार पाहत होते. सर्व मराठा मावळ्यांमध्ये एक शल्य होते आणि ते म्हणजे संभाजी महाराजांसाठी काहीच करू शकलो नाही ,मनात ठासून राग भरला होता पण याला पर्याय काय ? कोण घेणार पुढाकार ? कोण राखणार स्वराज्य ? कोण राखणार शिवरायांची शान ? कोण मिळवून देणार मावळ्यांचा आत्मविश्वास ? आणि याचा उद्रेक शेवटी होणार तो झालाच.मराठा सरदारांच्या गुप्त बैठका सुरु झाल्या.. कसे उट्टे काढायचे ? कसा बदला घ्यायचा ? त्या औरंग्याची दात घशात कशी घालायची ? कसे दाखवायचे मराठ्यांचे सळसळते रक्त ? कोण येणार पुढे ? गुप्त सल्लामसलतीमध्ये आघाडीवर होते संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव, सोबतीला संताजींचे दोन बंधू बहिर्जी आणि मालोजी सोबत विठोजी चव्हाण तसेच आणखी काही शूर सेनानी..या गुप्त बैठकीत धाडसी बेत ठरला कि औरंग्याला त्याचाच छावणीत घुसून लज्जित करायचा..त्याचा पाडाव करायचा. त्यात सोन्याहून पिवळी एक गोष्ट म्हणजे शंभूराजांचा बदला तुळापुर येथेच करायचा कारण औरंग्या इथेच होता.. (तुळापुर जिथे संभाजीराजांना मारण्यात आले) चर्चा झाली.. निर्णय ठरला.. धनाजीरावांकडे पाहत संताजी घोरपडे म्हणाले “खानाचा माज तुम्ही जिरवा फलटणला आणि मी खुद्द २००० निवडक मावळ्यान्सोबत औरंग्याला मराठ्यांचा रुद्रावतार दाखवितो, दाखवितो मराठे आजही आहेत.. तुमास्नी आसमंत दाखवायास”या निर्णयावर शिक्कामोर्तब करणे इतके सोपे नव्हते परंतु संताजींनी सर्व मोहीम नियोजनबद्ध आखली, दस्तुरखुद्द संताजींनी एका एका मावळ्याला प्रत्यक्ष भेटून त्याचा जोश वाढविला आणि प्रसंगी संयम राखण्याचा सल्ला दिला.. हळूहळू संताजींची हि तुकडी तुळापुरकडे कूच करू लागली, औरंग्याला त्यावेळी विचारसुद्धा नव्हता कि अशी त्याची वाट मावळे लावतील,भयान अंधारातून पायवाट काढली जाऊ लागली, झाडाझुडपाचा, पालापाचोळ्याचा आणि रातकिड्याचा आवाज कानी घुमू लागला.. तुळापुर जसजस जवळ येत होत तसतस मुघलांची घुबड दिसू लागली.
        रात्रीची भयाण शांतता तुळापुरभोवती पसरलेली होती.. त्यावेळेस काही मराठी लोकांच्या फौजही औरंग्याकडे होत्याच त्यामुळे मुघल सैन्याला वाटले आपलीच माणसे असतील……. आणि नेमका याच गोष्टीचा आणि या अंधाराचा फायदा घेत मावळ्यांची तुकडी थेट औरंग्याच्या छावणीत घुसली,काही कळायच्या आतच मावळ्यांनी “हर हर महादेव” चा जयघोष करत आणि “जय भवानी, जय शिवाजी” या नावाने मोघलांची अक्षरशः कत्तलच सुरु केली शीर धडावेगळे होत होते, कुठे नुसती रक्ताची चिळकांडी दिसून येत होती.औरंग्यासोबत अख्खी त्याची लाखोंची सेना भांबावून गेली होती, या अवस्थेत ते स्वतःच्याच सैन्यासोबत युद्ध करू लागलेबरगडीत मराठ्यांच्या तळपत्या तलवारी घुसून बाहेर पडू लागल्याने तडफडत जीव सोडू लागले.एकच हल्लकल्लोळ सुरु झाला परंतु तरीही संताजींचा एक मनोदय फसला तो म्हणजे औरंग्याला भुईसपाट करायचा अंगरक्षकांनी अक्षरशः पळवूनच नेले त्याला. जेवढे प्रचंड नुकसान करता येईल तेवढे करत करत शेवटी औरंग्याचा तंबुच उखडून टाकला.. औरंग्याचा डेरा भुईसपाट करून त्याचा सुवर्ण कलश निशाणी म्हणून घेऊन संताजींनी मावळ्यांना माघारी फिरण्याचा आदेश दिला.याअगोदर कि औरंग्याची सेना तयार होईल छोट्या छोट्या तुकडीत विभागून संताजींनी मावळ्यांना शेवटी मोहीम सिंहगडाकडे कूच करण्याचा आदेश दिला…. मोहीम फत्ते झाली होती.
रणझुंझार सेनापती संताजी घोरपडे यांना मानाचा सलाम........!!!
“ जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे

19 May 2013

स्वराज्याचे शिलेदार - गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक

          स्वराज्य स्थापनेच्या कार्यात श्री शिवरायांच्या पराक्रमी अनुयायांबरोबरच त्यांच्या गुप्तहेर खात्याचा सुद्धा अत्यंत उपयुक्त सहभाग होता. स्वकीय विरोधक व उघड शत्रू यांच्या हालचाली, दूरवरच्या प्रदेशातील परिस्थिती इ. माहिती वेळच्या वेळी मिळण्यावर राजकीय आणि सैनिकी यश अवलंबून आहे हे ओळखून शिवराय गुप्तहेर खात्यावर भरपूर पैसा खर्च करत. शत्रूच्या हालचाली आणि गुप्त कारवाया तसेच शत्रुप्रदेशातील संपन्न शहरे, खजिन्याच्या जागा,हल्ल्यासाठी जाण्याचा आणि परत येण्याचा मार्ग इत्यादी गोष्टींची गुप्तहेरांमार्फत खडानखडा माहिती मिळवून श्री शिवरायांनी अनेक धाडसी हल्ले करून शत्रूंची शहरे लुटली.छत्रपती शिवरायांचे गुप्तहेर खाते अतिशय कार्यक्षम होते. या गुप्तहेरांपैकी एक नाव प्रसिद्धीस आले ते म्हणजे बहिर्जी नाईक यांचे. बहिर्जी नाईक हे मराठ्यांच्या इतिहासातील एका महानायकाचं. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या स्वराज्याची शपथ रायरेश्वराच्या मंदिरात घेतली त्या स्वराज्याचा सुरुवातीपासुन ते महाराजांच्या निधनापर्यंतचा चा साक्षीदार म्हणजेच बहिर्जी नाईक होते.
           दिवसभर बहुरुप्याचे खेळ करुन पोट भरवणारे बहिर्जी एकदा राजे मोहिमेवरती असताना त्यांना भेटले. महाराजांनी त्यांच्यातील कसब ओळखली, नाईक स्वराज्यनिर्मीतीच्या कामाला हिरा आहेत हे राज्यांनी ओळखेले आणि तात्काळ त्यांना त्या कामात रुजु करुन घेतले. महाराज नेहमी आपल्या माणसांतील गुण ओळखुन त्यांना कामे वाटत असत. बहिर्जी नाईक कुणाच्याहि नकला, वेशांतर करायला अगदी पटाईत होते. तसेच ते बोलण्यातही हुशार होते. त्यामुळे राज्यांनी त्यांना गुप्तहेर खात्यात रुजु करुन घेतले.
          बहिर्जी नाईक यांचे गुण सांगायचे ठरले तर अंगात स्फ़ुरण आल्याशिवाय राहणार नाही. नाईक हे महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते. फ़किर, वासुदेव, कोळि, भिकारी, संत, अगदी कुठलेही वेशांतर करण्यात ते पटाईत होते. पण फ़क्त वेशांतरच नाही तर समोरच्या माणसाच्या नकळत त्याच्या तोंडातुन शब्द चोरण्याचं चातुर्य त्यांच्याकडे होतं. ह्यातं सर्वात मोठं आश्चर्य हे कि विजापुरचा आदिलशहा आणि दिल्लीचा बादशहा ह्यांच्या महालात वेशांतर करुन जात व स्व:त अदिलशहा व बादशहा कडुन ते पक्कि माहिती घेऊन येत. हेर असल्याचा संशय जरी आला तरी कत्तल करणारे हे दोन्ही बादशहा नाईकांना एकदा देखील पकडू शकले नाहीत यातच त्यांची बुद्धीमत्ता व चातुर्य दिसुन येतं.
         महाराजांच्या गुप्तहेर खात्यात जवळजवळ तिन ते चार हजार गुप्तहेर असायचे. ह्या सर्वांच नेतृत्व नाईकांकडे होतं. हे सर्व गुप्तहेर नाईकांनी विजापुर, दिल्ली, कर्नाटक, पुणे इत्यादी शहरांत अगदी हुशारीने पसरवले होते. चुकिची माहिती देणार्यास कडॆलोट हा पर्याय नाईकांनी ठेवला होता. त्यांनी गुप्तहेर खात्याची जणुकाही एक भाषाच तयार केली होती. ती भाषा फ़क्त नाईकांच्या गुप्तहेरांना कळे. त्यात पक्षांचे, वार्याचे आवाज असे. कुठलाही संदेश द्यायचा असल्यास त्या भाषेत दिला जाई. महाराज आज कुठल्या मोहिमेवर जाणार आहेत हे सर्वात आधी नाईकांना माहित असायचं. त्याठिकाणची खडानखडा माहिती नाईक काढत व महाराजांपर्यंत लवकरात लवकर पोहचवीत. असं म्हटलं जात कि, महाराजांच्या दरबारात नाईक जर वेशांतर करुन आलेले असले तर ते फ़क्त महराजांनाच ओळखायचे-थोडक्यात दरबारात बहिर्जी नाईक नावाचा इसम नाहिच अशी सर्वांची समजुत असायची. ते फ़क्त गुप्तहेरच नाही तर लढवय्ये देखील होते. तलवारबाजीत-दांडपट्यात ते माहिर होते. कारण गुप्त हेरांना कधीही कुठल्याही प्रसंगाला सामोरे जावे लागेल हे त्यांना माहित होते. कुठल्याही घटणेचा ते खुप बारकाईने विचार करी. शत्रुचे गुप्तहेर कोण? ते काय करतात? ह्यांची देखील माहिती ते ठेवत. तसेच त्यांच्याकडे एखादी अफ़वा पसरवायची असल्यास किंवा शत्रुला चुकिची माहिती पुरवायची असल्यास ते काम ते चतुराईने करीत. फ़क्त शत्रुच्याच प्रदेशाची नाही तर महाराजांच्या स्वराज्याची देखील पुर्ण माहीती ते ठेवत.
         शिवाजी राजे व शंभु राजे जेव्हा दिल्लीच्या बादशहाच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याला भेटायला गेले असताना त्याआधीच दिल्लीत नाईकांचे गुप्तहेर दाखल झाले होते कारण महाराजांना काहि दगा फ़टका होऊ नये ह्याची त्यांनी पुर्ण काळजी त्यांनी घेतली होती. त्यासाठी त्यांनी आपले साडे चारशे गुप्तहेर वेगवेगळ्या वेशात दिल्लीच्या कानाकोपर्यात लपवले होते आणि तेही महाराजांच्या येण्याच्या महिनाभर अगोदर केले. हा एकच प्रसंग परंतु महारांजांच्या आयुष्यातील प्रत्येक घटनेत गुप्तहेर म्हणुन त्यांचा सहभाग असायचा. त्यात अफ़जलखानाचा वध, पन्हाळ्यावरुन सुटका, शाईस्ताखाणाची बोटे तोडणे, पुरंदरचा वेढा, किंवा सुरतेची लुट असो प्रत्येक प्रसंगात बहिर्जी नाईक महाराजांचे अर्धे काम पुर्ण करत असत. ह्या प्रत्येक घटनेत नाईकांनी शत्रुची इत्यंभुत माहिती महाराजांना दिली होती.बर्याच वेळा महाराज बहिर्जींनी दिलेल्या सल्यांचा विचार करुन पाऊल टाके. राज्याभिषेक करताना महाराजांनी ज्या अष्ट मंडळाची निर्मीती केली होती त्यात गुप्तहेर खातं तयार करण्यात आलं होतं. तेव्हा देखील नाईक त्या खात्याचे प्रमुख होते.
        राजगडापासून जवळपास ५०० कि.मी. अंतरावर असणारी सुरत हि व्यापारी पेठ लुटण्याचे ठरताच सुरतेची संपूर्ण माहिती, एवढेच नव्हे तर कुठे निश्चितपणे भरपूर धन हाती लागेल अशा सुरतेमधील ठिकाणांची तपशीलवार माहिती आणण्याच्या कामी महाराजांनी बहिर्जी यांना पाठविले. अचूक योजनेसाठी लागणारी अचूक माहिती बहिर्जी नाईकांनी किती कसोशीने मिळविली हे सुरतेची केवळ पाचच दिवसात लुटलेली कोट्यावधींची संपत्ती सांगते. या माहितीसाठी बहिर्जींनी कुठली सोंगे घेतली, गुप्त जागी ठेवलेल्या धनाचा पत्ता कसा लावला हे आजही आपल्यासून गुप्त आहे.१६७९ साली जालानापूर लुटून महाराज येत असताना ती बातमी लागून संगमनेराजवळ मोगली सैन्याने मराठ्यांना गाठून कोंडीत पकडण्याची वेळ आणली होती. या भागातील डोंगरातील गुप्त वाटांची माहिती असणाऱ्या बहिर्जी नाईकांनी महाराजांना लुटीसह सुरक्षितपणे पट्टा उर्फ विश्रामगड या किल्ल्यावर पोहचविले.हेर हे राजाचे डोळे आणि कान असतात हि म्हण सार्थ करणारे बहिर्जी नाईक महाराजांच्या अनेक यशस्वी मोहिमांमागे,धाडसी हल्ल्यांमागे, दूरवरच्या प्रदेशात अचानक जाउन केलेल्या लुटीमागे आणि सुखरूप परत येण्यामागे असणारी कल्पक, चतुर, प्रसंगावधानी आणि हरहुन्नरी व्यक्ती. 
           अश्या ह्या बहिर्जी नाईकांपासुन व त्यांच्या हुशारी पासुन आपण शिकण्यासारखं बरच काहि आहे. हे शक्य झालं नाही तरी नाईकांचे स्वराज्यासाठीचे लाखमोलाचे योगदान विसरु नका.

6 September 2012

आद्यक्रांतिकारक उमाजी नाईक

            हिंदुस्तानच्या इतिहासात अनेक ऐतिहासिक घटना घडल्या आहेत काहींची नोंद झाली, काही तशाच राहून गेल्या.सन १८५७ च्या उठावा अगोदरही अनेक उठाव झाले अशाच पहिल्या उठावाद्वारे इंग्रजांना सलग १४ वर्ष सळो की पळो करून सोडणारा व सर्व प्रथम क्रांतीचे स्वप्न पाहणारा महाराष्ट्रातील निधड्या छातीचा वीर आद्यक्रांतिकारक नरवीर ठरला गेला.तो म्हणजे 'उमाजी नाईक'.परंतु रामोशी-बेरड समाजाशिवाय कोणाच्याच नेहमीप्रमाणे तो लक्षात राहिला नाही.आणि उमाजी नाइक फक्त रामोशी-बेरड समाजापुरता सीमित राहून गेल्यासारखे वाटू लागले. क्रांतीकारांचा आदर आणि त्यांचे स्मरण सर्वच जाती धर्मातील लोकांनी केले पाहिजे मग ते कोणत्या का जातीचे व धर्माचे असेनात.मग हे उमाजी नाइक असे उपेक्षीत का राहून गेले हे समजेनासे झाले आहे.तसे पाहण्यास गेले तर या क्रांतीकाराबद्दल आपल्या समाजाला माहितीही खूप कमी आहे.त्यामुळेच ते उपेक्षीत राहिले असावेत.तर चला थोडेसे जाणून घेऊया या आद्याक्रांतीकाराबद्दल ....
           दिनांक ७ सप्टेंबर हा भारताचे पहिले आद्यक्रांतिकारक उमाजी नाईक यांचा जयंती दिन.१७९१ रोजी पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील भिवडी या गावी उमाजी नाईकांचा जन्म रामोशी जमातीत झाला.महाराष्ट्रात रामोशी जमातीस रानटी जमात म्हणुन ओळखले जायचे.चातुर्वर्णीय व्यवस्थेच्या चौकटीबाहेर फ़ेकले गेल्याने या जमातीच्या वाट्याला असा कोणताच व्यवसाय आला नव्हता.पर्यायाने लुटमार करणे , दरोडे टाकणे त्यांना भाग पडत असे.३५० वर्षापुर्वीही हिच स्थिती होती.शिवरायांनी स्वराज्य निर्मीतीचा निर्णय घेतला, तेंव्हा त्यांनी बहुजनातील अनेक जातीचे मावळे गोळा केले होते. छत्रपती शिवराय रत्नपारखी होते.त्यांच्या सैन्यात सामावून घेण्यासाठी त्यांच्या नजरेतून ही जमातही सुटली नाही.पुरंदरच्या डोंगर कपारीत फ़िरणारे लढाऊ, धाडसी व प्रामाणिक रामोशी आपल्या सैन्यात घेतले. अनेक रामोशी जमातीच्या लोकांनी मर्दमकी गाजवली.स्वराज्यासाठी प्राण दिले.छ.  शिवरायांनी त्यांच्या शौर्याचं चीज म्हणून अनेकांना वतने, इमाने, ताम्रपट देऊ केले, याचा परिणाम असा झाला की , अस्थिर रामोशी स्थिर जीवन जगू लागले.छ.शिवराय गेले तरी त्यांनी स्वराज्याशी कधीही बेईमानी केली नाही.पेशवाई संपेपर्यंत त्यांनी अनेक किल्ल्यांचे किल्लेदार म्हणुन रक्षण केले.
          'मरावे परि क्रांतीरूपे उरावे' अशी उक्ती आहे.ती आद्याक्रांतीकारक उमाजी नाइक यांच्याबद्दल तंतोतंत जुळते.ते स्वताच्या कार्याने एक दीपस्तंभ ठरले आहेत.त्यांचा गौरव करण्यापासून इंग्रज अधिकारीहि स्वताला रोकु शकले नाहीत.इंग्रज अधिकारी रोबर्ट याने १८२० ला इस्ट इंडिया कंपनीला लिहिताना म्हंटले आहे,उमजीचा रामोशी समाज इंग्रजांविरुद्ध तिरस्काराने पेटला असून तो कोणत्या तरी राजकीय बदलाची वाट पाहत आहे.जनता त्यांना मदत करत असून कोणी सांगावे हा उमाजी राजा होऊन छत्रपती शिवाजीसारखे राज्य स्थापणार नाही? तर टोस म्हणतो,उमाजीपुढे छत्रपती शिवरायांचा आदर्श होता.त्याला फाशी दिली नसती तर तो दुसरा शिवाजी झाला असता.हे केवळ गौरावौदगार नसून हे सत्य आहे ... जर इंग्रजांनी कुटनीती आखली नसती तर कदाचित तेंव्हाच स्वातंत्र्य लाभले असते.नरवीर उमाजी नाइक यांचा जन्म रामोशी-बेरड समाजात लाक्षिमीबाई व दादोजी खोमणे यांच्या पोटी ७ सप्टेंबर १७९१ रोजी पुणे जिल्ह्यातील भिवडी येथे झाला.उमाजीचे सर्व कुटुंब पुरंदर किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडत होते.त्यामुळेच त्यांना नाइक हि पदवी मिळाली.उमाजी जन्मापासूनच हुशार,चंचल,शरीराने धडधाकट,उंचपुरा,करारी त्यामुळे त्याने पारंपारिक रामोशी हेरकला लवकरच आत्मसात केली होती.जसा उमाजी मोठा होत गेला तसा त्याने दादोजी नाइक यांच्याकडून दांडपट्टा ,तलवार,भाते,कुर्हाडी,तीरकामठी ,गोफणी चालवण्याची कला अवगत केली.या काळात इंग्रजांनी हिंदुस्तानात आपली सत्ता स्थापन करण्यास सुरवात केली.हळू हळू मराठी मुलुख हि जिंकत पुणे ताब्यात घेतले.१८०३ मध्ये पुण्यात दुसर्या बाजीराव पेशव्यास स्थानपन्न केले.आणि त्याने इंग्रजी पाल्य म्हणून काम सुरु केले.सर्वप्रथम त्याने इतर सर्व किल्ल्याप्रमाणे पुरंदर किल्ल्याचे संरक्षणाचे काम रामोशी समाजाकडून काढू घेऊन आपल्या मर्जीतील लोकांकडे दिले.त्यामुळे रामोशी समाजावर उपासमारीची वेळ आली.जनतेवर इंग्रजी आत्त्याचार वाढू लागले.अशा परिस्थतीत करारी उमाजी बेभान झाला.
           छत्रपती शिवरायांना श्रद्धा स्फूर्तीचे स्थान देत त्याने त्यांचा आदर्श घेऊन स्वताच्या आधीपात्त्या खालील स्वराज्याचा पुकार करत माझ्या देशावर परकीयांना राज्य करू देणार नाही, असा पण करत विठुजी नाईक,कृष्ण नाईक,खुशाबा रामोशी,बाबू सोल्स्कर यांना बरोबर घेऊन कुलदैवत जेजुरीच्या श्री खंडोबारायला भंडारा उधळत शपथ घेतली व इंग्रजांविरोधात पहिल्या बंडाची गर्जना केली. इंग्रज,सावकार,मोठे वतनदार अशा लोकांना लुटून गोरगरिबांना आर्थिक मदत करण्यास सुरवात केली.कोणत्याही स्त्रीवर अत्याचार ,अन्याय झाल्यास तर तो भावासारखा धावून जाऊ लागला.इंग्रजांना त्रास दिल्यामुळे उमजीला १८१८ ला एक वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सरकारने दिली.परंतु तो काळ सत्कारणी लावत त्याने त्याकाळात लिहिणे वाचणे शिकले.आणि सुटल्यानंतर इंग्रजांविरुद्धाच्या कारवाया आणखी वाढल्या.उमाजी देशासाठी लढत असल्याने जनताही त्याला साथ देऊ लागली आणि इंग्रज मेटाकुटिला आले. उमाजीला पकडण्यासाठी इंग्रज अधिकारी मोकीन टोस याने सासवड-पुरंदर च्या मामलेदारास फर्मान सोडले.मामलेदार इंग्रज सैन्य घेऊन पुरंदरच्या पश्चिमेकडील एका खेड्यात गेला असता तेथे त्यांच्यात आणि उमाजीच्या सैन्यात तुंबळ युद्ध झाले आणि इंग्रजांना पराभव स्वीकारावा लागला.उमाजीने ५ इंग्रज सैन्याची मुंडकी कापून मामलेदाराकडे पाठवली.त्यामुळे इंग्रज चांगलेच धास्तावले.उमाजीचे सैन्य डोंगरात टोळ्या करून राहत असत एका टोळीत जवळ जवळ ५ हजार सैन्य होते. १८२४ ला उमाजीने भाबुड्री येथील इंग्रज खजिना लुटून तो देवळाच्या देखभालीसाठी जनतेला वाटला होता.३० नोव्हेंबर १८२७ ला इंग्रजांना त्याने ठणकावून सांगितले कि,आज हे एक बंड असले तरी असे हजारो बंड सातपुड्यापासून सह्याद्रीपर्यंत उठतील व तुम्हास जेरीस आणतील,फक्त इशारा देऊन न थांबता त्याने इंग्रजांना सळो की पळो करून सोडले.२१ डिसेंबर १८३० ला उमाजीनी आपला पाठलाग करणाऱ्या इंग्रज अधिकारी बोईड आणि त्याच्या सैन्याला मांढरदेवी गडावरून बंदुका,गोफणी चालवून घायाळ करून परत पाठवले होते.आणि काहीचे प्राण घेतले होते.
             १६ फेब्रुवारी १८३१ रोजी इंग्रजी सत्तेविरुद्ध एक जाहीरनामाच त्याने प्रसिद्ध केला त्यात नमूद केले होते,इंग्रजी नोकऱ्या सोडाव्यात.देशवासीयांनी एकाच वेळी एकत्र येऊन जागोजागी गोंधळ घालावा आणि इंग्रजांविरुद्ध अराजकता माजवावी.इंग्रजांचे खजिने लुटावेत.इंग्रजांना शेतसारा,पट्टी देऊ नये.इंग्रजांची राजवट आता लवकरच संपुष्टात येणार आहे.त्यांना कोणीही मदत करू नये तसे केल्यास नवीन सरकार त्यांना शासन करेल. असे सांगून एकप्रकारे त्याने स्वराज्याचा पुकारच केला होता.तेंव्हापासून उमाजी जनतेचा राजा बनला.
            या सर्व प्रकारामुळे इंग्रज गडबडले.आणि त्यांनी उमाजीला पकडण्यासाठी युक्तीचा वापर केला.मोठे सावकार,वतनदार यांना आमिषे दाखवण्यात आली उमाजीच्या सैन्यातील काहीना फितूर करण्यात आले.त्यातच उमाजीने एका स्त्रीचे अपहरण केले म्हणून हात कलम केलेला काळोजी नाइक इंग्रजांना जाऊन मिळाला.इंग्रजांनी उमजीची माहिती देणाऱ्यास १० हजार रुपये आणि चारशे बिघे जमीन बक्षीस म्हणून देण्याची घोषणा केली.तसेच नाना चव्हाण हि फितूर झाला आणि त्यांनी उमाजीची सर्व गुप्त माहिती इंग्रजांना दिली. १५ डिसेंबर १८३१ रोजी भोर तालुक्यातील उतरोली या गावी रात्री बेसावध असताना उमाजीला भोरचा सचिव कुलकर्णी याच्या सहाय्याने इंग्रजांनी पकडले.त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवण्यात आला.आणि पुण्यात मामलेदार कचेरीतील एका काळ्या खोलीत ठेवण्यात आले.अशा या खोलीत उमाजी असताना त्याला पकडणारा इंग्रज अधिकारी मोकीन टोस दररोज महिनाभर त्याची माहिती घेत होता.त्यानेच उमाजीची सर्व माहिती लिहून ठेवली. आहा या नरवीर उमाजीस न्यायाधीश जेम्स टेलर याने दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली.३ फेब्रुवारी १८३२ ला पुण्याच्या खडकमाळ आळी येथील मामलेदार कचेरीत वयाच्या ४१ व्या वर्षी देशासाठी सर्वप्रथम नरवीर उमाजी नाइक हसत हसत फासावर चढला.अशा या उमाजीचे प्रेत इतरांना दहशत बसावे म्हणून कचेरीच्या बाहेर पिंपळाच्या झाडाला तीन दिवस लटकावून ठेवले होते.उमाजीबरोबर इंग्रजांनी त्याचे साथीदार खुशाबा नाइक आणि बापू सोळकर यानाही फाशी दिली.
            अशा या धाडसी उमाजीनंतर तब्बल १३ वर्षांनी १८४५ ला क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके जन्माला आले.त्यांनी त्यानंतर ३०० रामोशाना बरोबर घेऊन १८५७ चे बंड सुरु केले.त्यावेळीही दौलती रामोशी हा त्या बंडाचा सेनापती होता.

8 July 2012

समुद्रावरचा राजा - कान्होजी आंग्रे

मराठा साम्राज्याच्या आरमाराचे प्रमुख ’ सरखेल’ कान्होजी आंग्रे यांची ४ जुलै रोजी पुण्यतिथी, त्यानिमित्य त्यांच्या स्म्रुतीला उजाळा देणारा लेख.
             छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कान्होजी आंग्रे सुवर्णदुर्ग येथे चाकरीला होते.१६८८ मध्ये सुवर्णदुर्ग चा किल्लेदार अचलोजी मोहिते पैसे घेऊन फ़ितूरीने किल्ला सिद्धीकडे सोपवणार असे कळल्यावर कान्होजी यांनी सिद्धीवरून किल्ला लढवला आणि पराक्रम केला.पुढे १६९८ मध्ये सरखेल सिधोजी गुजर गेल्यानंतर राजाराम महाराजांनी कान्होजी आंग्रे यांना सरखेल(आरमाराचा सरसेनापती) पद सोपवले.ते त्यांच्या म्रुत्युनंतर त्यांच्याकडेच होते.मराठा - मुघल युद्धामध्ये कोकणपट्टी सांभाळण्याचे कार्य कान्होजी आंग्रे यांनी यशस्वीरित्या पार पाडले.पोर्तुगीज, इंग्रज, आणि सिद्धी यांना त्यांनी चांगलेच जेरीस आणले आणि संपुर्ण भागात आपला वचक प्रस्थापित केला.
 जन्म आणि वैवाहिक जीवन
            कान्होजी आंग्रे यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील खेडजवळील कालोसे या गावी १६६९ मध्ये झाला वडिलांचे नाव तुकोजी संकपाळ आणि आईचे बिम्बाबाई होते.नवसाने आणि अंगाच्या धुपाराने कन्होजींचा जन्म झाला म्हणून आंग्रे हे आडनाव लावले गेले.त्यांनी ३ लग्ने केली.पहिली पत्नी राजूबाई/मथुराबाई. यांच्याकडून त्यांना सेखोजी आणि संभाजी म्हणजेच आबासाहेब अशी २ मुले झाली.सेखोजी हे नाव त्यांच्या आजोबांच्या नावावरून ठेवले गेले.दुसरी पत्नी राधाबाई/ लक्ष्मीबाई यांच्याकडून त्यांना मानाजी आणि तुळाजी असे २ पुत्र झाले, तर तिसरी पत्नी गहिणबाई यांच्याकडून त्यांना येसाजी आणि धोंडजी असे २ पुत्र झाले.शेवटी एक मुलगी झाल्याने तिचे नाव "लाडूबाई" ठेवले गेले.
समुद्रावरचा शिवाजी
          कान्होजींनी अलिबागचा कुलाबा किल्ला जिंकुन घेऊन तेथे आपली राजधानी थाटली.छत्रपती महाराजांनी आंग्रे यांना आरमारचा प्रमुख केले आणि आंग्रे कोकण किणार्याचे राजे झाले.इ.स. १७०० मध्ये राणी ताराबाईंनीही या पराक्रमी वीराला सन्मानित करून सावंतवाडी ते मुंबईपर्यंतची किनारपट्टी रक्षणासाठी ताब्यात दिली.या नव्या आव्हानाबरोबर कान्होजींना एकाच वेळी परकीय आणि स्वकियांबरोबर लढा द्यावा लागत होता.१७०७ मध्ये मराठेशाही मध्ये फ़ुट पडल्यावर त्यांनी कोणाचीही बाजू न घेता स्वतंत्रपणे कारभार सुरु केला.पुढे त्यांचे बालमित्र असलेला बाळाजी विश्वनाथ भट (पेशवे ) याने त्यांचे मन वळवून सातारा गादी बरोबर वळवंड, लोणावळा येथे तह करवला.कोकणाबरोबरच कच्छ, सौराष्ट्रपासून त्रावणकोर, कोचीनपर्यंतची सागरी सत्ता कान्होजींच्या हाती होती.
परकियांना पुरुन उरले 
              सागरी भागात मुक्तपणे संचार करणार्या परकियांवर निर्बंध आले होते. १६९८ पासून मराठी राज्याची सारी सागरी सत्ता कान्होजींकडे आली होती. त्यांच्या परवानगीशिवाय कोणीही सागरावर व्यापार करू शकत नव्हते याचा प्रतिकार करण्याचे परकियांनी ठरवले.सर्व परकियांनी एकत्रित येऊन कान्होजींना संपविण्याचे ठरवले.तरीही त्यांनी इंग्रज, पोर्तुगीजांनाही पराभुत केले.शत्रुच्या आक्रमणांना तोंड देण्यासाठी कान्होजींनी दुर द्रुष्टिने अगोदरच अनेकांशी मैत्रीचे संबंध ठेवले होते.अशा संबंधांच्या मदतीने त्यांनी आपले आरमार अधिक शस्त्रसज्ज केले.पोर्तुगीजांच्या मार्गदर्शनाखाली शस्त्रनिर्मितीचा कारखाना आणि कुलाबा, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग येथे सुधारीत पद्धतीने जहाज बांधनीचे कारखाने त्यांनी उभारले.या सुसज्जतेसह कान्होजींनी समुद्रकिनार्यावर एक दबदबा निर्मान केला होता.कान्होजींचा लढा धार्मिक आक्रमनाची धार कमी करण्यासाठी पण होता.कान्होजी आंग्रे यांनी कोकणातील मंदिरासह , पंढरपुर, आळंदी, जेजुरी, तुळजापूर येथील देवस्थानांना इनाम व रोख देणग्याही दिल्या.
         छत्रपती शिवाजी महाराजांच्या म्रुत्युनंतरही औरंगजेबाला मराठी मुलूख काबीज करता आला नाही.यामागे अनेक शुर सरदारांचे योगदान होते.कोकण किणार्यावरील राजसत्तेचा जागता पहारा असणारे कान्होजी हेही त्यातीलच एक. दि.४ जुलै १७२९ रोजी कान्होजींनी जगाचा निरोप घेतला.

2 June 2012

सूर्याजी पिसाळ - फ़ितूर नव्हेच ! [पान ३]

मुत्सद्दी राणी येसूबाई
             रायगडाबाबत धोरणी,निग्रही व मुत्सद्दी येसूबाईंनी प्रतिकार अशक्य झाल्याने कमीतकमी नुकसान सोसून किल्ला स्वाधिन केला.पुढेही औरंगजेबाच्या स्वारीचा रेटा अन भर ओसरेपर्यंत हे धोरण मरठ्यांनी स्वीकारलेले दिसते. म्हणजे मोठी फ़ितूरी नाही.सूर्याजींचे नावही तेथे नाही.जेधे शकावलीत नोंद ’कार्तिक महिन्यात रायगड झुल्फ़िकारखानाच्या स्वाधिन करण्यात आला.शाहूस (शिवाजी द्वितीय) गडावरुन तुळापुरास औरंगजेबकडे नेण्यात आले.बादशहाने त्यास सहा हजारी मनसबदार केले व शाहू राजे असे नाव ठेवले.आणि त्यास आपल्या ’जाळी’ (तुरुंगात) मध्ये ठेविले.शिवचरित्रप्रदीपमध्ये हे पहिल्या ५० पानात वाचावयास मिळत.खानास राजधानीत खुप द्रव्य सापडले .त्याने सिंहासन फ़ोडले.बंदीवासात प्रतापराव गुजरांचे कुटुंब आणि मुलगा खंडेराव होते.खंडेरावावर धर्मांतराचा प्रसंग आला. नाव बदलले नाही. सुटून दक्षिणेत आल्यावर, म्रुत्यूनंतर त्यांचे व्रुंदावन  कसबे परळी येथे बांधिले.सूर्याजींचेवर धर्मांतराचा प्रसंग नंतर आलाच.शिवरायांची एक भार्या व संभाजीची एक मुलगी, मोरोपंत सबनीस, राजाद्न्या, कारकून, कारभारी, कारखानदार असे व विश्वासू नोकर इ. हजार - पाचसे लोक कैद झाले होते.सर्वांच्या खर्चाची व्यवस्था बादशहाने लाऊन दिली.कदाचित राजा पौरसची इतकी व्यवस्था सिकंदराने लावली नसावी ! शाहूंचे लग्न कैदेतच झाले, तेंव्हा रायगडचा पाडाव करून आणलेली शिवाजींची भवानी तलवार त्यांनी शाहूस बक्षीस दिली.
फ़ितूर केंव्हा ?
           छत्रपती राजाराम सिंहगडावर इ.स.१७०० त निवर्तले. मराठ्यांसह छत्रपती नाही, शाहू कैदेत. पुर्ण पराभव करण्यास बादशहाने मराठ्यांचे किल्ले पुन्हा जिंकून घ्यायचे ठरविले.वाई प्रांतात वैराटगड, पांडवगड वगैरे चार किल्ले जिंकण्याचे काम (केंजळगड,कमळगडसहीत) बादशाही सरदार इस्माईल मका यांस करावयाचे होते. या इस्माईल मकास इ.स. १७०४ मध्ये सूर्याजी पिसाळची मदत झाली.मराठ्यांच्या द्रुष्टिने झाली असेल तर हिच त्याची फ़ितूरी होइल.पण १६८९ कोठे आणि १७०४ कोठे ? शिवाय तीन छत्रपतीनंतर झालेल्या विस्कळीत कारभारात इकडचे सरदार, देशमुख तिकडे तर तिकडचे इकडे, एरव्ही अकबर हा बादशहाचा मुलगा संभाजीराजेंकडे आश्रयास आलाच होता.जेधेंच्यावर वहीम आला.अशी स्वामीनिष्टेची थोडीफ़ार अदलाबद्ल त्याकाळी मुख्य आधार गेल्यावर घडचत असे.त्यात नविन काही नाही. पण महत्वाच्या प्रसंगी कोणी ’स्वामीनिष्ट’ फ़ितूर होत नसत, हेही ध्यानात घ्यावयास हवे.राजारामांची पत्नी ताराबाईंनी खुपच शौर्य गाजविले. स्वराज्याची ढासळली इमारत सावरुन धरली, हे नि:संशय शाहू सुटून आल्यावर थोडी भाऊबंदकी झालीच.दोन राज्ये झाली म्हणुन का,मराठे शिलेदारांच्या हालचाली सर्वथा फ़ितुरीस पोषक असे म्हणता यावयाचे नाही.
नरसिंगराव पिसाळांचे म्हणणे
            सूर्याजींना चार पुत्र जानोजी नाईक, फ़िरंगोजी, गुणाजी व रुद्राजी.नरसिंगराव पिसाळ म्हणतात की,इ.स.११०० ते १२०० च्या दरम्यान देवगिरीचे यादवांचे कारकीर्दीत त्यांचे पुर्वजास देशमुखी मिळाली.असो, पद्मसिंह पिसाळ शाहूंचे बरोबर कैदेत होते.नंतर ते शाहूंचे सेनापतीही झाले.सूर्याजी पिसाळ नंतर मुसलमान झाले.तेही शाहू व येसूबाईंना मुस्लिम करणार म्हणुन ! बहीण मिरा पिसाळ यांचे शहाजी लोखंडेबरोबर लग्न झाले.सूर्याजी मुसलमान झाल्यावर त्यांना इमामखान व तीन पुत्र झाल.सूर्याजी पिसाळांच्या मुसलमान वंशजापैकी गफ़ूर बाळासाहेब देशमुख सेवानिव्रुत्त (१९६२).
प्राथमिक शिक्षक सांगतात की सूर्याजी हे नंतर मुसलमान झाले आणि म्हणून त्यांना वाईची देशमुखी मिळाली(हेही चुक). पद्मसिंह पिसाळांना शाहूंनी एका कामगिरीत पाठविले त्या लढाईत ते मारले गेले. सूर्याजी पिसाळ घोडेगाव, ता. आंबेगाव,जि,पुणे येथे म्रुत्यू पावले. सुर्याजी पिसाळांच्या मुलीचा मुलगा (मानाजी ?) अक्कलकोट संस्थानात गेला.त्या शाहूंनी दत्तक घेतले, ते अक्कलकोटचे संस्थापक भोसले आडनाव लावतात.रायगडहून सातार्यास गादी आणताना पद्मसिंह पिसाळ (मुलगा) शाहूंबरोबर होते.शाहूंचा राज्याभिषेक झाला तेंव्हा पिसाळांनी आपल्या देशमुखी वतनातील  लिंब,वाघोली, बावधन, अष्टे इ. गावे नजराना म्हणून दिली आहेत.या सर्व गावांचे उत्पन्न सातारच्या छत्रपतींच्या खाजगीत जाते/मिळते.मूळ तारळे गावचे पण आत सातार चे देशपांडे वकील म्हणत, ’१९६५-६७ च्या दरम्यान श्री.बाबासाहेब पुरंदरे यांनी पिसाळ- देशमुखांचा व्रुतांत लिहावा म्हणून ठरविले होते पण ते घडू शकलेले नाही.
राजकारणातील विश्वासघात
     शत्रुला फ़ितूर होऊन स्वजनांचा विश्वासघात करणार्या व्यक्तिला ’सूर्याजी पिसाळ’ म्हणवयाचे. हा शब्दप्रयोग मराठी वाड:मयातच रुढ झालेला आहे. इतकेच नव्हे तर छोट्या-छोट्या फ़सवणुकीच्या, लबाडीच्या, काही काल संधिसाधुपणा करणार्या व्यक्तिंना आपण काही मंडळी सर्रास सूर्याजी पिसाळ हे नामाभिधान करुन रिकामे होतो, हे गैर. राजकारण्यांनादेखील सवंगपणे लावला जातो.थोडाफ़ार उलटा गेला की खंजीर खुपसणारा, सूर्याजी पिसाळ ही विशेषणे लावण्यास राजकारणी भूषण मानतात.देशांतर्गत राजकारणात अशी दुषणे लावणे सर्वथा चूक.Everything is fair in love and war (and Election !) प्रेमात,युद्धात अन आता लोकशाही जमान्यात, निवडणुकीत सारेच क्षम्य ! सारे चालते, चालवून घेतले जाते. पण तसे नाही / नव्हेच. विरोध पक्ष (शत्रुपक्ष म्हणनेही चुक) नेत्यांच्या चुका दाखविणे ठिक. पण राळ, चिखल अन त्याही पुढे जाऊन वैयक्तिक अतिनीचतम पातळीवरुन गलिच्छ, गालीप्रधानात्मक भाषा वापरणे कितपत योग्य हे पाहाणे इष्ट ठरेल.
अन्यायाची परमावधी
             किंबहुना एकाच देशातील लोक पक्ष, संघटना, संस्था अनेक कारणांनी भांडता.ते एकमेकांचे विरोध अलंकारीकरित्या शत्रुपक्ष म्हणने इथपर्यंत ठिक, पण वारंवार शत्रु, सूर्याजी पिसाळ, राय नाईक (रायनाक),,आनंदीबाई (’ध’ चा ’मा’ ), दुसरे बाजीराव (पळपुटा) असे जर आपण म्हणत राहीलो तर त्या एतिहासिक व्यक्तिंवर आपण सारे घोर अन्याय करतो.उचलली जीभ लावली टाळ्याला, असा प्रकार होऊ नये. Tell a lie hundred times and it become a truth - खोटे शंभर वेळा सांगा अन ते सत्यच ठरते.या हिटलरी न्यायाने असत्ये सत्य म्हणुन लोक स्वीकारतात. याचे भानही बोलणार्यास, लिहिणार्यास राहात नाही. गैरसमज खोडुन सत्य प्रस्थापित करणे अवघड होते.नुकसान होऊन जाते.इतिहासकारांनी ते काम करु नये.त्यांचे काम सत्य मांडणे.
           शेवटी पुनश्च लक्षात घेऊया की, रायगड व राजकुटूंब सूर्याजी पिसाळांच्या फ़ितूरी,विश्वासघातकीपणा, स्वार्थी यामुळे शत्रुच्या ताब्यात गेलेले नाही.तसे झाले असते तर इतर मराठा मंडळातील सरदार-दरकदारांनी सूर्याजींचा खातमा तात्काळ केला असता.बादशाहाच्या छावणीचे सोन्याचे कळस कापणारे छ,राजारामांचे तरुण साथीदार आणि सेनापती संताजी घोरपडे व धनाजी जाधव यांनी सूर्याजी पिसाळांना शिल्लक ठेवले नसते.राजारामांनी त्यांची कन्या त्यांच्या पुत्रास दिली नसती. रायगडावर वेढ्याच्यावेळी त्यांचे तेथे आस्तित्व नव्हते.मोठी लढाई रायगड काबीज करताना झालेली नाही.
          शिवाजी द्वितीय (शाहू) केवळ ९ वर्षाचे होते.राणी येसूबाई आणि त्यांचे सल्लागार मराठा मंडळाने ’ शांतपणे शरण जाण्यातच शाहूंचे व सर्वांचे कल्याण आहे’ असा विचार तो बरोबरच. मराठेशाहीत अन बिकट प्रसंगाच्या युद्धात किल्ल्यांच्या आणि माघारीबाबत हाच विचार क्रुतीत आणला जात असे/जातो."शक्य तेवढा प्रतिकार अशक्य झाल्यास कमीत कमी नुकसान सोसून किल्ला स्वाधीन करणे हेच धोरण  मराठ्यांनी औरंगजेबच्या दक्षिण स्वारीचा जोर ओसरेपर्यंत स्वीकारले.’......’ तेच धोरण राणी येसूबाईंनी अमलात आणले.
            सूर्याजीने ना गडाचा दस्तुरखुद्द दरवाजा उघडला ना फ़ितुरी केली हे नि:संशय. येथुन पुढे फ़ितूर "फ़ितूरच" ,  सूर्याजी पिसाळ नव्हे.
          (पूरक माहीती : श्री नरसिंगराव पिसाळ-देशमुख,ओझर्डे; श्री राम राजेशिरके, कोल्हापूर; अनेक इतिहासग्रंथ)

सुर्याजी पिसाळ - फ़ितूर नव्हेच ! [पान २]

पक्षांच्या पंखावर शेवाळ उगवते.
             आवळसकर सांगतात की, याबाबत पुर्व इतिहासकारांचे लेखन अत्यंत भ्रामक स्वरुपाचे आहे. मराठ्यांनी शर्थ केली,पण शेवटी रायगड सुर्याजी पिसाळांच्या फ़ितूरीमुळे मोंगलांच्या हाती गेला तसे नाही.शिवसून येसूबाईंनी रायगड मजबुत आहे, हे जाणले होते.’छत्रपती राजाराम व त्यांच्या पत्नींनी गडावरून निघावे’.राजाराम सहकुटूंब प्रतापगडाकडे ५ एप्रिल १६८९ ला बाहेर पडल.वेढा आरंभी अगदीच शिथील होता.
          संपुर्ण रायगडला वेढा  देणे, तेथील आजची ही भौगोलिक स्थिती पाहाता अशक्य होते.राजारामांच्या बरोबर खंडो बल्लाळ, रामचंद्र आमात्य, प्रल्हाद निराजी, शंकराजी नारायण इ. नामवंत माणसे वेढ्यातून निसटली. एकही मोंघलांच्या हाती लागला नाही.रायगडच्या खोर्यात श्रावण, भाद्रपद व आश्विन महिन्यात पाऊस इतका कोसळतो की ’पक्षांच्या पंखावर शेवाळ उगवते’ व वारा इतका सुटतो की, त्यावेळी वेढा घालणार्या सैनिकांना नुसते उभे राहाणेदेखील अशक्य ! ’वेढा नाममात्र. गड अजिंक्यच ! मोठी मंडळी बाहेर पडल्याने शत्रु त्यांचे अंगावर जाईल, गडावरील ताण कमी होईल.
          राजारामांच्या दोन्ही भार्या रांगणा,विशाळगड, गगनगडकडे सुरक्षित गेल्या.छत्रपती राजाराम पुढे जिंजीस जाताना कोल्हापूर प्रांतातील शिवगड (दाजीपूर) गगनगड-काळम्मावाडी खोर्यातूनच गेले, त्यासमयी भागातील राणे, जाधव, खोपडे, पाटील, कुलकर्णी या मराठ्यांनीच त्यांना सर्व बाबतीत सहय्य केले आहे.
मोठी लढाई नाही, ठिसूळ पुरावा
            म्हणजे परीसरात अशी लढाई झाली नसावी. तसे पुरावे नाहीत.शर्थीची झुंज दिली असती तर शेकडो मुसलमान सैनिक मरण पावले व त्यांची एखादी कबर तरी रायगड परिसरात सापडली. एकही नाही ! मराठ्यांनी नष्ट केली म्हणावे तर त्यांचा तो स्वभाव नाही.रायगडावरच्या फ़ितूरांचा गवगवा,गाजावाजा हा कालविपर्यासाचा प्रकार आहे.सुर्याजी वाई प्रांतातील ओझर्डे देशमुख.तो दुरवरच्या रायगडावर कशाला जानार ? तो सरदार वा किल्लेदारही त्यावेळी नव्हता.
          ’फ़ितुरी’स भक्कम पुरावा नाही.इतिहासकारांचे भ्रामक,रंजित लिखानच काय तो ठिसुळ पुरावा.तो ग्राह्य धरता येणार नाही.पण गडावरुन सुटलेल्या राजारामांचे तरुण साथीदार संताजी व धनाजींनी बादशाही फ़ौजेस ’दे माय धरणी ठाय’ करुन सोडले.बादशहाच्या तंबूचे सोन्याचे कळसही कापले.पाण्यात त्यांना ही जोडगोळी दिसायची म्हणे.खरे की वाडःमयीन रंजितपणा ? मग त्यांनी फ़ितुर सूर्याजीचा खातमा का केला नाही ? तसे काही नव्हतेच.                                      
शुभविवाह
           विशेष गोष्ट अशी की, छत्रपती राजारामांची दासीपुत्री व सूर्याजी पिसाळांचा दासीपुत्र यांचा विवाह होऊन ते व्याही झाले.हा विवाह इ.स.१६८९ नंतर व १७०० चे पुर्वी दासीपुत्री अनौरस..तिचा विवाह कोनाशीही झाला तरी चालेल असे अशी समाजनिती इतिहासकालात नव्हती.उलट समसमासंयोग साधण्याची प्रव्रुत्ती असे. त्या कालात अशी संतती शिष्टसंमत होती.छत्रपती राजाराम सूर्याजीशी नाते जोडतात, याचा स्पष्ट अर्थ असा की सूर्याजी इ.स.१७०० पर्यंत तरी फ़ितुर नव्हते.रायगड समेटामुळे पडला ती तारीख ३ नोव्हेंबर १६८९ आहे.झुल्फ़िकारखानाच्या मर्दमुखीमुळे नव्हे, तर राणी येसूबाईंच्या मुत्सदीपणामुळे गड ताब्यात दिला गेला.
            फ़ितुर्यांच्या, खंजीर खुपसणार्यांच्या मुलास, स्वातंत्र्याची किंमत जाणणारा, जाणत्या शिवरायांचा मुलगा राजाराम आपली मुलगी,दासीपुत्री असो , देईलच कसा ? इति सूर्याजी पिसाळ रायगडप्रकरणी पुर्णपणे निर्दोष आहेत. माझे तसे स्पष्ट मत आहे.
इतिहासकार सरदेसाई
          इतिहासकार सरदेसाई म्हणतात, फ़ितूरीपुढे हद्द आहे... वाईच्या सूर्याजी पिसाळास देशमुखी हवी होती.तिच्या लोभाने किल्ल्याचा दरवाजा खानास सताड उघडा झाला असे एके ठिकाणी लिहितात, तर दुसरीकडे ’ आठ महीने झाले तरी इतिकादखानाचे (झुल्फ़िकारखान) पाऊल य:त्किंचितही पुढे पडेना.... कपटविद्या, हुशार सूर्याजी पिसाळास वाईच्या देशमुखीचे आमिष .... त्याने मोंघलांचा आत प्रवेश करुन दिला.राणी येसूबाईंच्या अवस्थेची त्यांना काळजी पडते ! आणि त्या खानाकडुन शपथ घेववुन मुलामंडळीसह    खानाच्या स्वाधिन होतात.असे सांगतात.कुलाबा ग्याझिटियरने तीच री ओढली आहे. पण प्रथम सूर्याजी हे वाईचे नव्हे,ओझर्ड्याचे. तसेच ते किल्लेदार नव्हते की रायगडावरही त्यांचे आस्तित्व १६८९ मध्ये नव्हते.ही दुसरी गोष्ट लक्षात घेतली तर फ़ितूर ठरविणारे सारे खोटे पडतात.
               शिवाय पुणे जहागीर व आसपासचे पहीले तीन देशमुख शिवाजीराजेंना मिळाले ते जेधे,पिसाळ व मरळ हे होत.ते प्रथमपासून विश्वासातील होते, असे सध्याचे त्यांचे वंशज ओझर्डेचे नरसिंगराव पिसाळ, देशमुख ठासून सांगतात.सूर्याजी हे मुळ पुरुष हरनाकपासून सातव्या पिढीतील.
इतिहासकार राजवाडे
         इतिहासकार राजवाडे तर सांगतात की, छत्रपती राजाराम कर्नाटकात गेले.रायगड व इतर किल्ले गनिमाने घेतले.त्यावेळी जेधे-देशमुख गनिमास सामील झाले ! पण पुढे या पत्रास राजवाडे टिप देतात की, पत्र विश्वसनीय दिसत नाही ! मोठ्या प्रमाणावर फ़ितुरी होणे  असंभव. शिवचरित्र साहित्य खंड १० मधील लेखांक २४ च्या उतार्यांन्वये राजाराम छत्रपतींनी चंदीहुन (जिंजी) नरसोजी गायकवाड रायगडावर असता इतिकादखानास गडावरील हावपालत सांगितली म्हणून त्याचा मुलगा संभाजी गायकवाड देशमुख तपे(तालुका) बिरवाडी याची देशमुखी जप्त केली.गुन्हा तसा गंभीर,पण पुढे ५०० पातशाही होन खंड घेऊन देशमुखी दुमाला केली आहे.
सरदेसाई व राजवाडे दोन्ही खरोखरच मातब्बर इतिहासकार पण त्यांच्याकडून काहीच चुकणार  नाही असे कसे म्हणायचे.
सर जदुनाथ सरकार
               बंगालचे जागतिक कीर्तीचे इतिहासतद्न्य सर जदुनाथ सरकार १९३१ च्या दरम्यान ओझार्डे येथे आले होते.त्यांनी आत्ताच्या पिसाळ मंडळींची भेट घेतली होती.त्यांच्या चर्चेत सूर्याजी पिसाळांवरचा आरोप खोटा आहे, असे प्रतिपादिले गेले.(इति नरसिंगराव पिसाळ) हिस्ट्री ओफ़ औरंगजेब भाग ४ या त्यांच्या इतिहासग्रंथात सरकारांनी आपले विचार मांडले आहेत.१६८८ डिसेंबरमध्येच आसदखानपुत्र इतिकादखान रायगडकडे निघाला होता.१९ ओक्टोंबर १६८९ मध्ये रायगड घेऊन शिवाजी,संभाजी व राजाराम यांचे परिवारास कैद केले.
               चिटणीसांची बखर व इश्वरदास यांचे संयुक्तीक म्हणने असे की, येसूबाई आणि तिचे सल्लागार यांनी बहुदा असे ठरविले असावे की,संभाजींचा म्रुत्यू व राजारामांचे  महाराष्ट्राबाहेर जाणे या गोष्टी ध्यानी घेता व महत्वाची बरीच मातब्बर माणसे महाराष्ट्राबाहेर गेली आहेत.अशावेळी रायगडावर असलेल्या सामान्य बिनलढाऊ माणसांचा प्रतिकाराचा यत्न फ़ुकट आह. शांतपणे शरण जाण्यातच शाहू व सर्वांचे कल्याण आहे.फ़ुका मरण व नुकसान यापेक्षा तह समेट योग्य.  

सूर्याजी पिसाळ - फ़ितूर नव्हेच !

मूळ लेखक : प्रिं.अमरसिंह राणे
संदर्भ : दैनिक पुढारी (बहार ) , रविवार, दि.२८ नोव्हेंबर १९९९ .
लेखन : अभिजीत पाटील 
"कूणीही फ़ितुर झालं की त्याला महाराष्ट्रात ताबडतोब ’सूर्याजी पिसाळ’ हे विशेषण जाते.जणू काही फ़ितुरांना दिला जाणारा किताबच.निवडनुकीच्या काळात ’सूर्याजी पिसाळ’ हे नाव शिवी म्हणुन मुक्तकंठाने वापरले जाते.....पण मराठेशाहीतील लढवय्या सुर्याजी पिसाळ हा योद्धा हा साहसी लढवय्या कधिही फ़ितुर झाला नव्हता.हा स्वराज्यनिष्ठ देशमुख आजतागायत फ़ितुरीची खोल जखम कपाळी घेऊन वावरत आहे..... पण आता त्याची खोल जखम भरुन निघायलाच हवी... कारण तो खरोखरच स्वराज्याचा प्रामाणिक पाईक होता."

           इतिहास हा व्यक्तिंभोवती फ़िरतो. व्यक्तिपरत्वे गुणदोष आलेच.इतिहास लेखणाची पुनर्छाननी व मुल्य तपासले जावे.त्यातील बारकावे आणि तपशील देताना शास्त्रशुद्ध, ओघवते विवेचन दिसले पाहीजे सत्याचा अपलाप न करता काल्पनिक,पुर्णत: कादंबरीमय घटना आणि व्यक्तीचित्रणे असता कामा नयेत. तटस्थ व्रुतीने आणि निष्पक्षपणे लेखण व्हावे लागते.मराठ्यांच्या इतिहासात अनेक समज,गैरसमज आणि अपसमज आढळुन येतात. इतिहासलेखण देखील व्यक्तीच करतात.छत्रपती संभाजी,सुर्याजी पिसाळ, महादजी शिंदे, मल्हारराव होळकर, दुसरा बाजीराव,आनंदीबाई, सोयराबाई शिर्के, टिळक, छ.शाहु आदी; एवढेच काय छत्रपती शिवरायांच्या बाबतही आपल्या काही लेखकांनी अवास्तव, अवाजवी गोष्टी लिहुन ठेवल्या आहेत.विशेषत: बखरकारांना गोंधळ व भडक, रंजक चित्रणे तर विचारायलाच नको.त्यातले सत्य शोधणे/ घेणे आवश्यक.

वाडःमयाची घुसखोरी 
           वास्तवाशी फ़ारकत घेतली आणि काल्पनिकतेस प्राधान्य दिले की इतिहासाची प्रासादिक कादंबरी होते.तसे पाहता ऐतिहासिक कादंबरीनेही इतिहासाशी प्रामाणिकपणा राखला पाहीजे आणि म्हणूनच श्रीमान योगी, छावा, राजेश्री आदी ग्रंथ, ऐतिहासिक कादंबरी न राहता कादंबरीमय इतिहास किंवा इतिहासमय कादंबर्या झाल्या आहेत.ग्रंथाच्या तिनीही  नामवंत लेखकांनी सत्य, ऐतिहासिक घटना अनेकवेळा पाठीमागे ठेवून स्वत:च्या प्रासादिक फ़ुलोर्यास अतिमहत्व दिले आहे.परंतु सर्वसामान्य वाचक  आणि प्रेक्षक त्या प्रसंगांना सहजपणे सत्य मानतो.त्यावरील चित्रपटात तेच दाखवले जाते.म्हणून अशा कादंबर्या, चित्रपट आणि नाटके ऐनैतिहासिक ठरतात. मग लेखनपरत्वे अनेक ऐतिहासिक व्यक्तिंच्यावर अन्याय होतो.समजापसमजास वाव मिळ्तो आणि तेच सत्य म्हणून समाजात वर्षानुवर्षे, शतकानुशतके प्रचलित होत राहते.हा एक दैवदुर्विलासच.याच द्रुष्टिकोनातुन "सुर्याजी पिसाळ" या इतिहासकालीन देशमुखावर अन्याय झालेला आहे.
सुर्याजी पिसाळ आणि राजकारण
          ’सुर्याजी पिसाळ’ म्हणजे ’फ़ितूर’ हे समीकरण जे झाले आहे, ते निखालस खोटे.इतिहासात आणि  राजकारणातले फ़ितूर व गद्दार हे शब्द अगदीच सापेक्ष असतात.आजचा फ़ितूर हा उद्याचा जीवस्चकंठस्च मित्र होऊ शकतो.मतभेदांपायी कोणी दुर गेला तर गद्दार होतो.मग गद्दाराचा विजय झाला तर त्याला तसे म्हणणारा करंटा होऊ शकतो.कुटील नीती अथवा राजनीतीचा तो अपरिहार्य  भाग असतो. नाही तरी राजकारण हे बदमाशांचे शेवटचे आश्रयस्थान असे कोणी आंग्ल  लेखकाने गमतीने खरेच लिहून ठेवले आहे.त्या उक्तिचा उपयोग देखील आपण एक ठाम सत्य म्हणुन सरसकट वापरात आणतोच.तसे पाहीले तर रामायनकालीन रावन हा एक सोन्याच्या लंकेचा चांगला राजा होता.त्याचा पराभव झाल्यावर लेखकांनी त्यास दहा तोंडे चिकटवली.तो क्रुर, दुसर्याची पत्नी पळवणारा,घाणेरडा रावण झाला.जेत्यांनी त्याच्या प्रतिमा करवून तिचे वार्षिक अग्निदहन, हेटाळणी सुरु केली.आजही चालु आहे.
रावणराजा
            क्षणभर कल्पना करा, रावणराजाचा विजय झाला असता तर राम भले एकपत्नी,एकवचनी, एकबानी खरोखर असुनही रामायनाच्या ऐवजी जे महारावणायण लिहिले गेले असते, त्यात राम-लक्ष्मण कसे दाखवले असते ? त्यांना क्रुर,गद्दार, फ़ितूर, खंजीर खुपसणारे ही विशेषणे ग्रंथकर्त्यांनी प्रासादिकरीत्या चपखलपणे बसविली असतीच नाही का ? म्हणून शब्दांचा वापर,प्रसंगानुरुप जित-जेत्यांच्या संदर्भातही तपासुन पाहिला पाहिजे. हजारो  वर्षे रामराजांची परीक्षा होऊन ते आज देवत्वाला पोहोचले आहेत ते नि:संशय. एरव्ही बिभीषणाने रावणाच्या पाठीत खंजीर खुपसलाच.रामाचा विजय झाला म्हणून तो सुटला.
आलमगीर
            आलमगीर (औरंगजेब) जितका आपणास वाईट, जिझिया कर बसविणारा,हिंदूद्वेष्टा वाटतो, तितका तो इतर सर्व बाबतीत होता का ? तो स्वधर्मपरायण होता.दिवसातून पाच वेळा नमाज पढे, तो ऐषआरामी नव्हता, चटईवर झोपे वगैरे. आमच्या एका इतिहासाच्या प्राध्यापकांनी ’आलमगीर’ या विषयावर पंचवीस वर्षापुर्वी मिरजेत जोरकस व्याख्यान देऊन औरंगजेब काही गोष्टीत कसा चांगला होता, हे पटवून द्यायचा सोदाहरण प्रयत्न केला.
        ’रायगडची जीवनकथा’ या महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्क्रुती मंडळाने १९६२ साली प्रसिद्ध केलेल्या ले.शां.वि. आवळसकरांच्या रु.४ किमतीच्या पुस्तकात त्यांनी रायगड प्रकरणी सुर्याजी पिसाळ (१९८९) आणि रा.य.नाईक (१८१८) हे दोघेही मोघलांस व इंग्रजांस फ़ितूर झाले या गोष्टी संशयातीत आहेत, दोघेही निर्दोष आहेत,असे सांगितले आहे. त्यांचे व अस्मादिकांचे तसे पक्के मत झाले आहे.
घटनाक्रम असा-
संभाजीराजे गिरफ़्तार 
राजारामांचे मंचकारोहण
१ फ़ेब्रुवारी १६८९ रोजी छ संभाजी संगमेश्वराजवळ अलकनंदा व वरुणा या  नद्यांचे संगमावरील नावडी येथे होते.मोंघल सरदार शेख निजाम तथा मुकबर्रखानने चकमकीनंतर त्यांना पकडले.संताजी घोरपडे यांचे वडील आणि शिवकालिन सरदार मालोजी घोरपडे त्यावेळी  ठार झाले.रायगडावर ९ फ़ेब्रुवारी १६८९ रोजी राजाराम अटकेत असताना ही वार्ता कळाली.त्याची सुटका होऊन राजारामांनी ’ मंचकारोहण’ केले.
          रायगडचा किल्लेदार चांगोजी काटकरने कैदेतील मानाजी मोरे इ. ना सोडले तर यसजी व सिदोजी फ़र्जंद यांचा कडेलोट केला.म्हणजे रायगडावर सुर्याजी पिसाळ त्यावेळी किल्लेदार नव्हते.राजप्रतिनीधी म्हणुन राजाराम राज्यकारभार १२ फ़ेब्रुवारी १६८९ पासुन शाहू लागले.कारण शिवाजी द्वितीय (शाहू) केवळ सात वर्षाचे होते.हा दुरदर्शीपणा येसूबाईंचा.मराठ्यांची राजधानी व नविन राजा यांना ताब्यात घेण्यास आसदखानपुत्र इतिकादखानने रायगडला २५ मार्चला वेढा घातला.