Showing posts with label हिंदु धर्म. Show all posts
Showing posts with label हिंदु धर्म. Show all posts

17 January 2017

राजसंन्यास, धर्मवीर आणि शंभुप्रेमींची जबाबदारी

             महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात ३ जानेवारी २०१७ हा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्वाच्या दिवसातील एक ठरला. छत्रपती संभाजी महाराज उद्यानात असलेला रा. ग. गडकरी यांचा पुतळा काही तरुणांनी मध्यरात्री हातोडी, कुर्‍हाडीचे घाव घालून फोडला आणि तो मुठा नदीत फेकून दिला. काही वेळातच हा प्रकार सर्वदुर पसरला. या घटनेचे शंभुप्रेमींनी जोरदार समर्थन केले तथा नितेश राणेंनी त्या तरुणांचा शब्द दिल्याप्रमाणे उचित सन्मान केला तर गडकरी प्रेमींनी निषेद आणि संताप व्यक्त केला. पण रा. ग. गडकरींचा पुतळा का तोडला,  यामागची भावना काय होती याचा विचार करणे निषेदार्ह संताप व्यक्त करणार्यां गडकरी प्रेमींना महत्वाचे वाटले नाही. कारण शिवभक्तांनी केलेल्या कोणत्याही घटनेला ब्राह्मणद्वेषाचे लेबल लावून त्यातुम निसटणे हा आज लोकप्रिय फ़ंडा झालेला आहे.
          राम गणेश गडकरीं यांची ओळख सांगायची तर, गडकरींचा जन्म गुजरात मधील नवसारी येथे २६ मे १८८५ रोजी झाला. तर २३ जानेवारी १९१९ रोजी त्यांचा म्रुत्यु झाला. वयाच्या ३४ वर्षात त्यांनी कविता, नाटक तथा विनोदी लेख यांसारखे बरेच साहित्य निर्माण केले. त्यांच्या साहित्यांनी आयुष्याच्या शेवटच्या काळात मराठी भाषा आणि साहित्यावर सत्ता गाजवली. प्रेमसंन्यास, राजसंन्यास, एकच प्याला, पुण्यप्रभाव ही त्यांची गाजलेली काही नाटके लिहिणारे गडकरी हे मराठीतील शेक्सपियर म्हणून ओळखले जात. राम गणेश गडकरींच्या पुतळ्याला मुठा नदीच्या पाण्याची चव चाखायला लावणारे त्यांचे साहित्य म्हणजे "राजसंन्यास" नाटक. आजपर्यंत इतिहासाचे बर्याच प्रमाणात विक्रुतीकरण झालेले आहे तसेच सत्य इतिहासही बाहेर आलेला आहे.महाराष्ट्राच्या इतिहासात अशा विक्रुती करताना बर्याच मर्यादा ओलांडल्या आहेत. त्यापैकी म्हणजे इतिहासाचे संशोधन करताना नाना फ़डणीस याने भोगलेल्या रखेल्यांची यादी सापडली होती ती दत्तो वामन पोतदार याने गिळून टाकली. नाना ने रखेल्या भोगल्या पण पोतदार ने तर अखंड रखेल्या गिळुन नाना फ़डणीस वरच कढी केली. महाराष्ट्रातील इतिहास विक्रुतीने सडलेला आहे त्यात गडकरींच्या "राजसंन्यास" ची भर पडली.
राजसंन्यास आणि आधुनिक धर्मप्रेमी
        हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज म्हणजे विरश्रींचे शिरोमणी. वयाच्या १४ व्या वर्षी बुधभुषणम सारखा ग्रंथ लिहुन साहित्य क्षेत्रात आपले नाव अजरामर केले.शिवराज्याभिषेक विधी करणार्या गागा भट्टांनी देखील त्यांचा समयनद हा ग्रंथ संभाजी राजांना अर्पण केला आहे. या महानायकाने भारतातील साहित्यिकांना, कादंबरीकारांना, कथाकारांना, नाटककारांना वेगवेगळ्या प्रकारे खाद्य पुरविले. बुद्धीच्या अनेक ठेकेदारांनी आपापल्या पद्धतीने शंभुराजांचे चरित्र लोकांसमोर मांडले. परंतु राष्ट्ररक्षणार्थ बलिदान देणार्या पराक्रमी शिवपुत्रावर साहित्यिकांनी प्रचंड अन्याय केलेला आहे. राम गणेश गडकरींनी "राजसंन्यास" नाटकाच्या माध्यमातून सर्वांवर कढी केलेली आहे. कारण राजसंन्यास नाट्य छ.संभाजी राजांचे बदफ़ैली, स्त्रीलंपट चरित्र रंगवून प्रचंड अन्याय करणारे आहे. संभाजी राजांच्या बदनामीला सर्वप्रथम कारणीभूत होती ती मल्हार रामराव चिटणीसची बखर. स्वराज्यद्रोहा बद्दल संभाजी राजांनी बाळाजी आवजी चिटणीसला देहांत शासन दिले होते. बाळाजी हा मल्हार रामराव चिटणीसचा खापरपणजोबा होता. आपल्या खापर पणजोबाला शंभूराजांनी हत्तीच्या पायाखाली दिले होते, त्याचाच सूड घेण्यासाठी तब्बल १२२ वर्षांनी मल्हार रामरावाने बखर लिहून त्यांना बदनाम करण्याचे कारस्थान केले. परंतू कै. वा. सी. बेंद्रे यांनी चाळीस वर्षे कष्ट घेऊन शंभुचरित्राचा खरा इतिहास उभा केला आणि जाज्वल्य इतिहासातून अनेक लेखकांना दिव्य द्रुष्टी दिली. त्यामध्ये शिवाजी सावंत, डॉ.जयसिंगराव पवार, विश्वास पाटील, डॉ.कमल गोखले, विजय देशमुख यांसारख्या विद्वानांनी खरे आणि भव्य दिव्य असे  शंभुराजांचे चरित्र जनमानसांसमोर आणले. पण दुर्दैवाने संभाजी राजांच्या ज्वाज्वल कर्त्रुत्वापेक्षा त्यांच्या इतिहासाची विक्रुत मांडणी करणार्यांना साहित्य क्षेत्रामध्ये आढळ स्थान दिले गेले. त्यावर कढी म्हणजे संभाजी राजांच्या चरित्रावर प्रचंड अन्याय करणार्या गडकरींचा पुतळा संभाजी राजांच्या नावाने असणार्या उद्यानात उभारणे हीच खरी महाराष्ट्राची शोकांतिका आहे.
          संभाजी महाराज उद्यानातील गडकरींचा पुतळा काढल्यानंतर खरी कसोटी लागली ती शंभुच्या रक्तगटाची तरून पिढी निर्माण करायला निघालेल्या आणि आयुष्य ब्राह्मणप्रतिपालनाला वाहुन घेतलेल्या हिंदुत्ववाद्यांची. आता काय करावे ? या प्रश्नाने गोंधळ घातला. एकिकडे शंभुराजांविषयी निष्ठा दाखायची होती तर दुसरीकडे गडकरींचा निषेद करायचा होता अशा धर्मसंकटात सापडलेल्या हिंदुत्ववाद्यांनी या सगळ्या कृत्याला नेहमीप्रमाणे ब्राह्मणद्वेषाची लेबल लावून हात झटकून घेतले. हिंदुत्वावाद्यांचे शिव-शंभुंवरचे खोटे प्रेम वेळोवेळी उघडे पडले आहे. संभाजी ब्रिगेड ने केलेली प्रत्येक गॊष्ट ब्राह्मणद्वेषाचा शिक्का मारून झाकुन ठेवायची ही हिंदुत्ववाद्यांची जुनी खोड आहे, म्हणुनच की काय जेम्स लेन प्रकरणावेळी संभाजी ब्रिगेडने जिजाऊ मातांच्या अपमानाचा तिव्र संताप आणि निषेद व्यक्त केल्यावर हिंदुत्ववाद्यांनी मात्र शांत राहाणंच पसंत केलं होतं. तोच स्थायी स्वभाव त्यावेळीही त्यांनी अबाधित ठेवला आहे. हिंदुत्ववाद्यांना जर संभाजी राजेंविषयी आदर आणि प्रेम असता तर गडकरींच्या लिखानाचा विचार केला असता आणि काही कारणास्तव निषेद करायला जमत नसले तरी किमान खंत तरी व्यक्त असती पण या दोन्ही ठिकाणी ते असमर्थ ठरलेत. बहुजनवाद्यांची काय वेगळी स्थिती नाही. संभाजी राजेंना शाक्तवीर ठरवनार्या बहुजनवाद्यांनी पण या प्रकराणाकडे केवळ संभाजी मराठा आणि गडकरी ब्राह्मण त्यामुळे ते दोघे बघून घेतील असा सोईस्कर विचार करून दुर्लक्ष करणंच पसंत केलेलं दिसतं. त्यामुळे सच्चा शंभुभक्तांच्या जबाबदाऱ्या आहेत.
महात्मा फ़ुले, केळुस्करादी लेखक आणि राजसंन्यास
गडकरींचा पुतळा  काढून फ़ेकल्यानंतर त्यांच्या साहित्यविषयी चर्चेला उधान आलं. बर्याच विद्वानांनी मते मांडली. संभाजी महाराजांविषयीचे हे चित्र दुर्दैवाने इतिहासकारांमध्येच बराच काळ प्रचलित होते. तेंव्हाचे सर्वच इतिहासकार या गैरसमजाला बळी पडलेले आहेत. केवळ गडकरीच नव्हे. त्यामुळे गडकरींनी लिहिलेले नाटक हे त्यावेळच्या संदर्भ आणि पुराव्यावर आधारीत आहे असे म्हणून या विद्वानांनी पद्धतशीरपणे गडकरींना पाठिशी घातले आहे. परंतु हे विद्वान हे विसरले आहेत की गडकरींनी राजसंन्यास मध्ये जो विक्रुतीचा उन्माद मांडलाय तो याआधी कोनत्याही लेखकाने किंवा इतिहासकाराने मांडलेला नाही. इतर लेखकांनी संभाजीराजेंच्या विक्रुत इतिहासातील संदर्भ आहे तसे वापरले आहेत पण गडकरींनी मात्र त्या विक्रुतीमध्ये स्वत:च्या विकृतीची घुसळण केलेली स्पष्ट जाणवते. त्यामुळे इतर इतिहासकार चुकिच्या इतिहासाला बळी पडले असे म्हणता येईल पण गडकरींबद्दल तसं समजता येणार नाही.
               महाराष्ट्रामध्ये संभाजी ब्रिगेड जे काही करेल त्याला ब्राह्मनद्वेषाची पार्श्वभुमी असते तसेच अफ़जल आणि औरंगजेबाची कबर उध्वस्त करणे हा इस्लामद्वेष नाही पण कोंडदेव आणि गडकरींचा पुतळा काढणे म्हणजे ब्राह्मणद्व्वेष आहे असा एक लाडका सिद्धांत हिंदुत्ववाद्यांचा असतो. पण संभाजी ब्रिगेडला विरोध करण्याच्या नादात आपण काय करतोय याचही भान त्यांना राहात नाही. याही प्रकरणात संभाजी ब्रिगेडला विरोध करण्याच्या भरात त्यांनी गडकरींच्या लेखनाचे समर्थन केले. मग खरच जर गडकरींच्या वेळी संभाजी राजेंचा तोच इतिहास प्रचलित होता तर त्या इतिहासामध्ये संभाजींची बदनामी आहे आणि तो आपण ऐतिहासिक आधार म्हणून घेऊ नये एवढी पण अक्कल गडकरींना असू नये हे मात्र न पटण्यासारखे आहे. एक वेळ मान्य केले की संभाजींचा इतिहास त्यावेळी तोच होता त्याला गडकरी बळी पडले पण शिवरायांचा इतिहास तर सत्य होताच ना तरीही शिवरायांना दुय्यम स्थान देऊन स्वराज्ज्याचे श्रेय रामदासांच्या घस्यात घालण्यामागचा गडकरींचा काय हेतु होता ? किमान याचा तरी विचार हिंदुत्ववाद्यांनी करावा. हिंदुत्ववादी मंडळीं दावा करतात की ते नाटक प्रकाशित झालं नाही त्यामुळे जे नाटक कोणीच वाचलेले नव्हते ते आता संर्वांना माहीत झाले. हिंदुत्ववाद्यांची एक सर्वात मोठी अडचण आहे ती म्हणजे त्यांना जे माहीत नाही ते आस्तित्वातच नाही असे ते ग्रुहित धरतात त्यामुळे "राजसंन्यास" आम्हाला माहीत नाही म्हणजे कोणालाच माहीत नाही असे त्यांनी सहज ठरवूनही ठाकले. पण त्यांना माहीत असणे गरजेचे आहे की,  'महाराष्ट्र शासनाने' 'राम गणेश गडकरी समग्र वाड्मय' प्रकाशित केलेले आहे.त्याचे संपादन प्र. के. अत्रे यांनी केलेले आहे. त्यामध्ये राजसंन्यास नाटकही प्रकाशित केले आहे. त्यामुळे हे नाटक कोणालाच माहीत नाही या भ्रमातून हिंदुत्ववाद्यांनी स्वत:ची सुटका करावी.
               राम गणेश गडकरींच्या बचावा साठी हिंदुत्ववाद्यांची एक मांडणी असते की, महात्मा फ़ुलेंनी शिवरायांना अक्षरशुन्य म्हंटले. तसेच क्रुष्णा अर्जुन केळूस्कर यांनीही संभाजी राजें आणि शिवरायांविषयी हेच मत मांडलेले आहे मग यांचं काय करायचं ?. महात्मा फ़ुलेंनी शिवरायांवर जे लिखाण केले ते त्या काळात जे पुरावे उपलब्ध होते त्यानुसार. शिवरायांना ते कमी लेखत नव्हते. किंबहुना शिवरायांचे श्रेष्ठ्त्व त्यांच्या साहित्यातून दिसून येतेच. शिवराय हे निरक्षर नव्हते. आज याचे पुरावे उपलब्ध आहेत. त्यामुळे महात्मा फ़ुलेंना कोणताही दोष लागत नाही. आज महात्मा फ़ुले हयात नाहीत. ते हयात असताना जर असे पुरावे उपलब्ध झाले असते तर त्यांनी आपल्या भुमिकेत निश्चित बदल केला असता.किंबहुना त्यांना या गोष्टींचा खुप आनंदच झाला असता. महात्मा फ़ुले हे खरे सत्यशोधक छ्त्रपती शिवाजी महाराजांचे सच्चे अनुयायी होते. परंतु महात्मा फ़ुलेंच्या शिवरायांविषयीच्या बोलण्याची तुलना गडकरींच्या राजसंन्यास शी करणे म्हणजे कानाखाली चपटी मारलेल्याची तुलना आयसीस च्या आतंकवाद्याशी करण्यासारखे आहे. शिवरायांना दुय्यम ठरवून संभाजी राजेंना चरित्रहीन ठरवण्यापेक्षा केवळ अक्षरशुन्य म्हणने हा खुप मोठा अपमान हिंदुत्ववाद्यांना वाटतो यातून शिवरायांविषयीचा आदर नाही तर महात्मा फ़ुलेंविषयीचा द्वेषच स्पष्ट जाणवतो. केळुस्कर गुरुजींबद्दल बोलायचे झाले तर त्यांनीच आपल्या छत्रपती शिवाजी महाराज या पहिल्या शिवचरित्रामध्ये प्रस्थावनेत नमुद असे केले आहे कि, "लेखकाला ज्या गोष्टी आज सत्य वाटल्या व ज्या क्रमाने त्या घडल्या अशी त्याची खात्री झाली, त्या गोष्टी त्या क्रमाने त्याने प्रस्तुत ग्रंथात नमूद केल्या आहेत. अनेक पंडितांचे इतिहाससंशोधनाचे काम सांप्रत चालू आहे. त्यांचे शोध जगापुढे आल्यावर प्रस्तुत चरित्रलेखात दुरुस्ती करावी लागेल हे उघड आहे." त्यामुळे आज आपण त्यांच्या ग्रंथातील अनैतिहासिक मुद्दे बाजुला काढू शकतो पण गडकरींच्या राजसंन्यास मधील असे मुद्दे बाजुला काढण्याची हिम्मत गडकरीप्रेमी हिंदुत्ववाद्यांमध्ये आहे काय ?. त्यामुळे गडकरींच्या राजसंन्यास मधील विक्रुतीची तुलना इतर इतिहासकारांच्या लेखणाशी करणे ही सुद्धा एक विक्रुतीच आहे असं म्हणावं लागेल.
शंभुप्रेमींची जबाबदारी
           संभाजीराजे म्हणजे शिवरायांच्या वंदणीय व्यक्तिमत्वातून हे प्रकटलेले शंभुतेज. आपल्या अफ़ाट पराक्रमाने शंभुराजांनी हिंदवी स्वराज्याच्या सीमारेषा वर्धिष्णू करीत या तेजाची दाहकता सिद्ध केली. शिवरायांनंतर हिंदवी स्वराज्यावर लाखोंचा फ़ौजफ़ाटा घेऊन चालून आलेल्या औरंगजेबाला नामोहरण करणे ही सामान्य बाब नव्हती. नऊ वर्षाच्या अखंड संघर्षात एकही लढाई हरले नाहीत किंवा एकही तह केला नाही.मोगली सल्तनत, पोर्तुगिज, इंग्रज या बलाढ्य शत्रुबरोबरच स्वकियांविरोधात हिंदवी स्वराज्याच्या संवर्धनासाठी आणि संरक्षणासाठी केलेली एकाकी झुंज ही निश्चितच संभाजीराजांच्या महानतेची आणि पराक्रमाची साक्ष देते.हे सगळं त्यांनी कोणासाठी केले ? स्वराज्यासाठी, तुमच्या - आमच्यासाठी. वयाच्या अवघ्या ३२ व्या वर्षीच संभाजीराजेंनी स्वराज्यकार्यी हौतात्म्य पत्करले. अटकेत असताना त्यांनी दिर्घकाळ यमयातना सहन केल्या, एक - एक अवयव तोडला गेला, अंगाची साल सोलून काढण्यात आली, डोळे काढून जीभ कापली गेली, पायापासून ते मस्तकापर्यंत अवघ्या शरीराची खांडोळी केली गेली, आणि हे सगळं सहन केलं ते स्वराज्यासाठी, आपल्या साठी. एवढ्या मरणयातना सहन करूनही स्वाभिमान आणि राष्ट्रनिष्ठा अभेदच राखुन बलिदानाची, त्यागाची एक परंपरा या राष्ट्राला समर्पित केली जिला देशातच काय पण जगाच्या इतिहासात तोड नाही. पण मालती तेंडुलकर "मराठ्यांचा राजा" या नाटकात म्हणतात, "संभाजी म्हणजे स्वाभिमानाची व शौर्याची जळती मशाल, परंतु दुर्दैवाने ते महाराष्ट्रात जन्मले ! त्यांच्या अतुल व अमोघ क्रुतीला आमच्या कारस्थानी इतिहासकारांनी हिडिस रुप दिले व मानभावी इतिहासकारांनी त्याला माना डोलवल्या". याचप्रमाणे संभाजी राजांच्या इतिहासाचे विक्रुतीकरण पुन्हा होऊ शकते.आपल्या समाजाची मानसिकता ही नाटक, कादंबरी, चित्रपट या माध्यमातून मांडला जाणारा इतिहास हाच खरा असे माननारी आहे. कारण ग्रंथापेक्षा या नाटक आणि चित्रपट माध्यमांचा प्रभाव खुप असतो. हेच काही वर्षात हे नाटक प्रकाशित होऊन त्या विक्रुतीखाली संभाजी राजांचा खरा इतिहास दडपला जाऊ शकतो. त्यामुळे संभाजी राजांचं खरे चरित्र आणि इतिहास सर्वांसमोर आणने हे महत्वाचे कर्तव्य आहे. संभाजी राजांचे मद्यान्हीच्या तळपत्या सुर्यप्रकाशाइतके शुद्ध चरित्र सर्वांसमोर आणने हे शंभुप्रेमींचे आद्य कर्तव्य आहे, हिच सर्वात मोठी जबाबदारी आहे. 

24 December 2016

मनुस्मृति : समाजशास्त्रीय समालोचन

        भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २५ डिसेंबर,  १९२७ रोजी "मनुस्मृति" या ग्रंथाचे जनसमुदयाच्या समक्ष जाहिररित्या दहन केले. दलित समाजाला मानसिक गुलामीतून मुक्त करण्यासाठी त्यांच्यामध्ये गुलामीच्या विरोधात संघर्षाची जिद्द निर्माण केली. त्यासाठी त्यांनी २० मार्च १९२७ रोजी चवदार तळयाचा सत्याग्रह केला. हा सत्याग्रह चवदार तळ्यातील पाणी पिण्यासाठी नव्हता, ज्या तलावात कुत्री-मांजरी, जनावारे पाणी पित होती. त्यांना पाणी पिण्याची बंदी नव्हती, परंतु माणसाला पाणी पिण्याची बंदी होती. म्हणूनच मानवी हक्काची प्रतिष्ठा स्थापन करण्यासाठी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला होता. दलित समाजाला अशा अनेक धार्मिक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. असे आंबेडारांचे मत झाले होते. त्यामुळेच आंबेडकरांनी मनुस्मृति ग्रंथ जाळण्याचे ठरवले तत्पुर्वी आधीच्या शतकात राष्ट्रपिता जोतिराव फ़ुलेंनी "जाळून टाकावा  । मनुग्रंथ ॥ असे म्हंटले होते. आंबेडकरांनी मनुस्मृति जाळली (१९२७) त्याला पुढच्या वर्षी ९० वष्रे पूर्ण होतील,  त्यामुळे मनुस्मृति विषयी जाणुन घेणं महत्वाचे आहे. 
             भुतांत प्राणी श्रेष्ठ, प्राण्यात बुद्धीजीवी, बुद्धीवंतांत मनुष्य़ श्रेष्ठ आणि मनुष्यात ब्राह्मण श्रेष्ठ, शुद्रास मति (ज्ञान) देऊ नये, कोणताही धर्मोदेश देऊ नये, कोणतेही व्रत सांगु नये. जो धर्म सांगतो तो नरकात बुडतो. (मनुस्मृति अ.१०/१२३), असे अनेक (१०/२५, १/९१, १०/२६, ९/१८) श्लोक आहे ज्यामध्ये शुद्रांनी फ़क्त ब्राह्मणांची सेवा करावी. लिहु, वाचू नये अन्यथा ते नरकात जातात. शुद्रांनी फ़क्त उष्टे अन्न खावे, उपास-तपास करू नये, स्त्री-शुद्रांना धर्माधिकार नाहीत, शुद्रांनी विनातक्रार तीन्ही वर्णाची सेवा करावी. मनुस्मृतिमुळे ब्राह्मण वर्गाचे वर्चस्व वाढले. स्त्री-शुद्रादी नगण्य झाले. या सर्व कारणामुळेच २५ डिसेंबर १९२७ रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी जनसमुदायासमोर भाषण करून त्यांच्या मते अस्पृष्यता आणि विषमतेचे समर्थन करणारा, ब्राह्मणवर्ग सांगेल तोच कायदा व नियम माननारा आणि शुद्र आणि स्त्रीयांचे सर्व अधिकार हिरावून घॆणारा ग्रंथ मनुस्मृति जाळून टाकला. आंबेडकरांनी मनुस्मृति जाळली ही जाती-वर्ण द्वेषातून नाही. ज्या ग्रंथामुळे माझ्या समाजाला जनावारा पेक्षा वाईट वागणूक मिळते, या वागणूकीला प्रेरणा मनुस्मृतितून मिळत आहे असा समज आंबेडकरांचा झाला होता. पण आज त्यांचे अनुयायी केवळ हिंदु तथा ब्राह्मण द्वेषातून मनुस्मृतिला विरोध करताना दिसत आहेत.
            सध्या मनुस्मृति जाळल्याचा दिवस "मनुस्मृति दहन दिन" म्हणून साजरा केला जातो यावेळी दलित-आंबेडकरवादी लोक मनुस्मृति जाळल्याचा आनंद व्यक्त करतात. पण या सर्वांमध्ये एक वास्तव मान्य करावंच लागेल की मनुस्मृति दहन दिन साजरा करणार्यांना (किंवा तसा उल्लेख करणार्याला) मनुस्मृति विषयी किती ज्ञान आहे हे सांगणे कठीन आहे हीच अवस्था मनुस्मृतिच्या समर्थकांची आहे. आपण हिंदु आहोत आणि म्हणून मनुस्मृति आपल्याला पुज्य आहे तसेच आपण दलित आहोत आणि बाबासाहेबांनी जाळली म्हणजे नक्कीच ती वाईट आहे. असे दोन्ही पक्षाचे तर्क असतात. यावर समर्थक आणि विरोधक यांच्यापैकी किती लोकांनी मनुस्मृति वाचलेली आहे हा संशोधनाचा विषय होऊ शकतो.
मनुस्मृति तथा हिंदु धर्मग्रंथ आणि समाजमन
              आजच्या काळामध्ये हिंदु धर्मग्रंथावर टिका करणे हे पुरोगामीत्वाचे सर्वात मोठे लक्षण मानले जाते. तुम्ही कितीही समता-बंधुतेचा जागर करा, तुम्ही कितीही निर्लपबुद्धी आणि निपक्षपाती जीवन जगा पण त्याला पुरोगामीत्वामध्ये कवडीची किंमत नाही जोपर्यंत तुम्ही किमान एका हिंदु धर्मग्रंथा विरोधात एकतरी शब्द उच्चारत नाही. या तथाकथित पुरोगामी लोकांना अशी संधीही हिंदु धर्मातील ठेकेदार आणि धर्मरक्षकांमुळेच मिळते. जगात कोणत्याही धर्माचे नाहीत एवढे ग्रंथ हिंदु धर्माचे आहेत. पण हिंदु धर्मरक्षकांनी धर्माचे तत्वज्ञान केवळ ग्रंथापुरतेच मर्यादित राहू दिले. कारण यांना जास्त रस टिकाकारांचे खंडण तथा ग्रंथांचा प्रसार करण्यापेक्षा त्यांना केवळ विरोध करण्यातच असतो. "वेदां"पासून ते "श्रीमद्भगवतगीता" आणि "ज्ञानेश्वरी" पासून ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या "ग्रामगीता" पर्यंत या सर्व ग्रंथाविषयी धर्मरक्षकांच्या काय भावना तथा आस्था आहेत हे अजुनही स्पष्ट झालेले नाही कारण धर्मग्रंथांपेक्षा केवळ धर्म (हा शब्दच) च परमपवित्र वाटतो. धर्माचा प्रसार हा धर्मातील वैश्विक आणि शास्वत तत्वाज्ञानामुळे होत असतो त्यामुळे धर्माबरोबरच धर्मग्रंथांचे तत्वज्ञान आणि विचार लोकांपर्यंत येणे अत्यावश्यक आहे.
        आज सर्व धर्मग्रंथापैकी समाजावर प्रभाव पाडणारे दोनच ग्रंथ अहेत, श्रीमद्भगवतगीता आणि मनुस्मृति. मनुस्मृति अप्रत्यक्षात का असेना पण जिवंत आहे. अजाणतेपणाने त्याचे पालन सर्वांकडूनच होते. हिंदुंच्या अनेक परंपरा तथा चालीरिती ह्यांचे मुळ मनुस्मृतित आहे. मनुने ब्रह्मचर्य, ग्रुहस्थाश्रम, संन्यासाश्रम, राजधर्म, चित्तशुद्धी करण्याबाबत विषय सुचविले आहेत. पण काही श्लोकांमध्ये गीतेत नसणारी विसंगति मनुच्या स्म्रुतीमध्ये दिसून येते. संपुर्ण मनुस्मृति वाचल्यानंतर समजुन येईल की मनुने काही आक्षेपार्ह (अनेक लेखकांच्या मते क्षेपक) श्लोक वगळले तर जिवनाचे किती व्यापक स्वरुप मांडले आहे. व्यक्तिगत चित्तशुद्धीपासून ते संपुर्ण समाज-व्यवस्थेपर्यंतचे बोध सुचिले आहेत.
        धर्मग्रंथामध्ये दोन प्रकार असतात सांप्रदायिक आणि वैश्विक. मनुस्मृति म्हणजे सांप्रदायिकच आहे. मनुस्मृतिची रचना इ.पू. २०० ते इ.पू. २०० या काळात झाली असे अभ्यासक मानतात तर डॉ.आंबेडकरांच्या मते इ.पू.१७० ते इ.पू.१५० या काळात मनुस्मृतिची रचना झाली. अर्थातच हे अंतिम सत्य नाही. मनुस्मृतिमध्ये घेण्यालायक आहे तसेच सोडण्यासारख्याही गोष्टीही आहेत. आज बहुतांशी हिंदुंनी त्यातील बहुतांश भाग सोडून दिलेला आहे. मनुस्मृतीमधील घेण्यासारखे आहे त्याकडे दुर्लक्ष करून चुकीचे वचणे दाखवणे हे बरोबर नाही. मनुने कसे चुकीचे वचणे लिहिली आहेत हे दाखवण्यात आपण जास्त वेळ घालवतो आणि चांगल्या विचारांना मुकतो. मनुचे सर्वच विचार मान्य करण्यासारखे नसतील किंवा जे मान्य करण्यासारखे असतील त्यातही विसंगती असेल. हिंदु धर्माचे (म्हणजे हिंदुंनी आपले मानलेले) पुष्कळ ग्रंथ आहेत त्या सर्वच ग्रंथामध्ये एकवाक्यता असेल असे सांगता येत नाही भिन्न वचणे वाचायला मिळण्याची शक्यता असू शकते. आपल्याला इथे मनुस्मृती विषयीच्या एकंदरीत तर्क - वितर्काकडे बघायचे आहे. मनुस्मृति का चांगली किंवा का वाइट किंवा अमुक श्लोकात काय म्हंटले आणि तमूक  श्लोकात काय ? याचा अभ्यास तुम्ही वयक्तिकरित्या करू शकता.
मनुस्मृति आणि वर्णव्यवस्था
             महर्षी मनु महाराज कोण होते ?, कोणत्या वर्णाचे होते ?, एकून मनु किती होते ?, किंवा मनुस्मृतिची रचना नेमकी कोणत्या काळी झाली ? हे थोडं बाजुला ठेऊ. मनुस्मृतिमध्ये साधारण २६८५ श्लोक आहेत. संपुर्ण मनुस्मृतिमध्ये ब्राह्मण आणि क्षुद्र या वर्णाविषयी जास्त लेखन मिळते. मनुस्मृति म्हणजे केवळ वर्णव्यवस्थावादी आहे. मनुस्मृति गुणकर्मावर आधारीत वर्णव्यवस्था मानते. त्यामुळे जन्माधिष्ठीत जातीव्यवस्थेला डोक्यावर घेऊन जातीचे फ़ायदे घेणार्या अर्धवटांनी गुणकर्मप्रमाणित वर्णव्यवस्थेविरोधात बोलताना विचार करणे आवश्यक आहे.
            मनुस्मृतिबद्दल अजुनही स्पष्टता नाही कारण अभ्यासकांचे म्हणणे आहे की १७९४ साली विल्यम जोन्स यांने मनुस्मृति अनुवादित केली त्यानंतर त्यामध्ये इतर वर्णाविषयी आक्षेपार्ह नोंदी केल्या. मनुस्मृतिबाबत बोलताना दोन मुख्य आरोप केले जातात. ते म्हणजे स्त्रीयांचा अपमान आणि अस्प्रुष्यतेचे समर्थन. प्रथमता स्त्रीयांबाबत मनुस्मृतिचे मत जाणुन घेऊ, कोणतेही प्रतिक्रिया देताना आजच्या काळाची आणि मनुच्या काळाची तुलना करणे गरजेचे आहे. आजच्या काळातही स्त्रीयांचे जीवन इतके स्वतंत्र नाही. आजही स्त्रीला दुय्यम स्थान आहे परिस्थिती काहीशी निवळली असली तरी फ़ारशी नाही. मग मनुचा काळ तर हजार वर्षापुर्वीचा त्यावेळी काय अवस्था असेल ? निश्चितच स्त्रीयांविषयी मनुस्मृतिमध्ये आक्षेपार्ह वक्तव्ये केली गेलेली आहेत ती निषेदार्ह आहेतच. पण सर्वच लेखन स्त्रीविरोधी आहे का ? तर नाही. तर स्त्रीयांची बाजु मांडलेले ही लिखान आपल्याला आढळेल. मुळात एक गोष्ट समजून घॆतली पाहिजे ती म्हणजे स्त्रीयांवर जे आरोप केले गेलेले आहेत ते म्हणजे स्त्रीया आजन्म अशा असतात असे नाही तर त्यांचा स्थायी गुणधर्म सांगितला आहे. आजच्या काळात त्याचे समर्थन होऊ शकत नाही पण मनुने स्त्रीयांचा मुळ स्वभाव सांगितला आहे. चांगल्या कुळीन संस्काराने स्त्रीयांमध्ये सुधारणा होऊ शकते हेच त्यामागचे सत्य. त्याचवेळी स्त्रीयांच्या हक्काधिकाराविषयी सुद्धा मनुनी लिहिले आहे. आता विषेश म्हणजे सवर्ण समाजातील स्तीयांविषयी अश्लाघ्य टिका करणे, त्यांच्या स्त्रीयांविषयी पुस्तकातून घाणेरडे लिखान करणे असे भिमपराक्रम करनार्यांनी मनुने स्त्रीयांचा अपमान केला म्हनून मनुस्मृतिला विरोध करणे केवळ दुटप्पीपणाचे तथा मुर्खपणाचे आहे. ख्रिश्चन धर्मामध्ये कुटुंब नियोजनाला विरोध आहे. मुस्लिम धर्मामध्ये आजही स्त्रीयांची काय परिस्थिती आहे हे तथाकथित पुरोगामी लोकांना माहीत आहे का ? नक्कीच माहीत आहे पण त्यांच्या विरोधात बोलाव तर मिळत तर काहीच नाही पण हातच्या पुरोगामित्वाच्या प्रमाणपत्राची वैधता संपण्याची भिती.
           अस्प्रुष्यता : मनुस्मृतिवरील आणखी एक आरोप म्हणजे अस्प्रुष्यतेचे समर्थन. मुळात आपण एक गॊष्ट लक्षात घेतली पाहिजे की मनुची व्यवस्था ही कर्मप्रमाणित व्यवस्था होती त्यामूळे अमुक जात बहिष्क्रुत करा असं कूठं आढळणार नाही. पण आज आपल्याला पुरोगामी बनायचं असेल तर मनुस्मृतितील अस्प्रुष्यतेवर घाणाघाती टिका करावीच लागते त्याशिवाय पुरोगामित्वाचे प्रमाणपत्र मिळत नाही. वर्णव्यवस्था आणि अस्प्रुष्यता आजही आस्तित्वात आहे आणि राहील. कालांतराने अस्प्रुष्यता नाहीशी जरी झाली तरी वर्णव्यवस्था शाश्वत आहे आणि राहिल. फ़रक एवढाच की ती जातीनिधिष्ठ न राहता श्रीमद्भगवतगीतेत सांगितल्याप्रमाणे गुणकर्मावर आधारीत राहील हेच सत्य आहे. मी वयक्तिकरित्या अस्प्रुष्यतेला विरोध करत नाही जर ती जातीनिधिष्ठ नसेल तर. अशी अस्प्रुष्यता आजही अस्तित्वात आहे. आज पुरोगामित्वासाठी अस्प्रुष्यता विरोधात ढोल बडवावा लागत आहे, तसे नसते तर यांनी परिणामावर ओरडण्यापेक्षा कारण शोधले असते. अस्प्रुष्यतेला मुळ कारणीभुत होते ते संस्काराचा अभाव आणि घाणेरडे राहणीमान यामुळे त्यांच्यावर अस्प्रुष्यतेचा शिक्का बसला कालांतराने हिच त्यांची ओळख बनून गेली आणि ती जातीवर लादली गेली,  यामध्ये अस्प्रुष्यांचा दोष नसेलही किंवा सर्व वर्णाना गुरुप्रमाणे संस्कार करणे ब्राह्मणांचे काम होते ते त्यांनी प्रामाणिकपणे केले नाही हे खरे असले तरी अस्प्रुष्यता मानणारे दोषी होतेच असे म्हणता येणार नाही कारण हे त्यांच्या अडाणीपणातून होत असे. आजच्या काळातसुद्धा दुर्गंधी - अस्वच्छ असनार्या लोकांना इतर लोक जवळ करत नाहीत ही स्वाभाविक प्रतिक्रिया आहेत. मग हजार वर्षापुर्वी काय अवस्था असेल याची कल्पना केल्यास परिस्थिती उजेडात येईल.
         ज्या काळात माणुस जगत असतो तो त्याच प्रमाणे लिखान करत असतो हा नियमच आहे. सध्याच्या वातावरणानुसार माणुस जी कल्पना करू शकतो त्याच्यातूनच तो जग पाहत असतो.आजच्या काळात कोणीही काही लिहिल ते आजच्या काळात योग्य ठरेल पण इथून पुढे शेकडॊ - हजारो वर्षांनी कालबाह्य होईल हा परिवर्तनाचा नियम आहे. मनुस्मृतिच्या काळात जे काही लिहिलं गेलं ते सध्या सर्वच समर्थनीय आहे असं नाही. काही निश्चितच आक्षेपार्ह गोष्टी आहेत मनुस्मृतिमध्ये पण ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याचे अनुकरण का करू नये ? की केवळ चुका दाखवण्यातच धन्यता मानायची ?. कायदा, सुव्यवस्था आणि न्यायव्यवस्था यासाठी लिहिलेला ग्रंथ. राजाचं आचरण कसं असावं, प्रजेचं रक्षण कसं करावं, अत्यंत सुंदर माहीती त्यामध्ये दिलेली आहे. त्याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे तो फ़क्त हिंदु धर्मापुरता मर्यादित नाही. म्यानमार, इंडोनेशिया सारख्या देशामध्ये मनुस्मृति हा महत्वाचा ग्रंथ मानला जातो. फ़िलीफ़ाईन्स म्हणजे महर्षी मनूं पुतळा उभा केला गेला आहे. मग त्यांनी हे सगळं मनुस्मृति न वाचताच केलं का ? मग लक्षात घ्या जातीभेद आणि द्वेष नेमका कुठे आहे.
             वैदिक-हिंदु विचार-प्रणाली आणि मान्यता  ह्या काळानुसार बदलत राहतात. त्यामुळेच हजार वर्षापासून चालत आलेल्या रुढी-परंपरा आज बदललेल्या तर काही बंद झालेल्या दिसतील तसं इतर धर्मात होत नाही म्हणून धर्म अभ्यासक हिंदु हा धर्म मानण्यापेक्षा एक मान्यता-संस्क्रुती तथा विचार प्रणाली मानतात. मनुस्मृतिमध्ये ज्या श्लोकांवर आक्षेप आहे किंवा जी वचणे विषमतावादी आहेत ती काढून टाकली तरी मनुला फ़ारसा फ़रक पडणार नाही.कारण मनुस्मृति समाजशास्त्र आहे.ती निव्वळ अध्यात्मिक बोधच देत नाही तर सामान्य नितीबोध, सांसरीक कार्यासाठी मार्गदर्शन, राजा तसेच व्यापारी आदींची कार्य - कर्तव्ये याविषयी मनुने मार्गदर्शन केले आहे.यामुळे लक्षात येईल की मनुचा मुख्य उद्देश समाजाला मुख्य व्यवहारीक मार्गदर्शन देण्याचा आहे. म्हणून विनोबा म्हणतात "मनु समाजशास्त्रज्ञ आहे तो नेहमीच बदलत असतो. मनु जर आज असता तर त्याला आपली मनुस्मृति बाजुला सारून वेगळीच मनुस्मृति लिहावी लागली असती. याचा अर्थ पहिल्यामध्ये घेण्यासारखं काही नाही असे नाही. मनुस्मृति सारखे ग्रंथ समाज-व्यवस्था कायम रहावी या उद्देशाने लिहिली गेलेली आहेत".

27 December 2015

जरी तो ब्राह्मण झाला कर्मभ्रष्ट तरी.....??

संतश्रेष्ठ तुकोबांच्या हयातीत मंबाजी भट-ब्राह्मण आणि त्यांचे सर्व साथीदार यांनी तुकोबांचा खुप कडाडून विरोध केला. त्यांचे अभंग नदीत बुडविले. गाथा इंद्रायणीच्या डोहात बुडवली आणि तुका सदेह वैकुंठाला गेला अशी आवई मात्र जोरात उठवली. नदीत बुडवूनदेखील तुकोबांचे अभंग लोकांत राहिलेच. ते तेच म्हणू लागले आणि जेंव्हा अभंग बुडवूनसुद्धा आणि तुकोबांना संपवूनही तुकोबा संपत नाही असं दिसून आलं तेंव्हा मंबाजीचे सर्व प्रकारचे सर्व वारसदार तुकोबांचे कौतुक करू लागले. त्यांच्या अभंगात आपले फ़ुसके अभंग घुसडू लागले [त्यांचेच वंशज आजही आहेतच]. त्यांच्या अभंगावर कथा-किर्तने करू लागले.पण हे सगळे करताना एक करू लागले की तुकोबांनी अंधश्रद्धेवर व अन्यायावर जे कोरडे ओढले होते ते लोकांपर्यंत पोहचणार नाहीत अशी दक्षता घेऊ लागले.
असेच काही फ़ुसके क्षेपक अभंग तुकोबांच्या गाथेत आढळतात त्यातील एक प्रचलित म्हणजे "जरी तो ब्राह्मण झाला कर्मभ्रष्ट । तुका म्हणे श्रेष्ठ तिन्ही लोकी ॥ [३०४०].तुकोबांची ब्राह्मणांविषयी ही आस्था आधिक ताणून "जरी  ब्राह्मण झाला भ्रष्ट तरी तो तिन्ही लोकी श्रेष्ठ असे भ्रष्ट ब्राह्मणांविषयी उदारतेचे उद्गार काढणारे तुकोबाराय" सर्वप्रथम श्री  अनंतदास रामदासींनी उभे केले; आणि ’तुका म्हणे तुम्ही देवा द्विज वंद्य’ [शा.२८८४] आदि अभंग पाहून "रुढ मुल्यांवर निष्ठुरपणे प्रहार करणारे तुकोबा शांत मन:स्थितीत पुन: रुढीपुढे नम्र होतात."हे मात्र सत्य नाही.जरी तो ब्राह्मण झाला कर्मभ्रष्ट । तुका म्हणे श्रेष्ठ तिन्ही लोकी.[३०४०] हे तुकोबांचे म्हणणे केवळ औपरोधित किंवा अर्थवादात्मक आहे"(सा.सं.तु.प्रुष्ठ:१४०) वस्तुश: असली दोनचार वचणे हे गाथेच्या अंगावरील आगंतुक कोडच म्हंटले पाहिजे. असल्या भोंगळ वचनांच्या विरोधात तुकोबांची शेकडो युक्तियुक्त वचणे बाह्या ठोकून उभी आहेत.
यथार्तवाद सांडून उपचार बोलती ते अघोर भोगतील ! "तुका म्हणे आम्ही येथील पारखी । छंदावी सारिखी नव्हो ऐसी" माझ्या जातीचे वजनास बोल कोण ठेवू शके ? "सत्या नाही पाठीपोट" व "लटकियाची न करू स्तुती हिशेब आले ते घ्यावे" हीच तुकोबांची खरी कणखर भुमिका ! "गुण-अवगूण निवाडा " करणारा व "अवगुणी दंडण गुणी पुजा" हे न्याय्य ब्रिद सांभाळणारा तुकोबांचा ’निवाड्याचा ठाव’ असली बुद्धिभेद करणारी वचणे उच्चारूच शकत नव्हता,हे उघड आहे.[९६२, ११३७, १३६७, २३७६,२३७८,२७३५,३४८५,३५१८,(पं.५२४९),५३४७].
"पंडिता: समदर्शिन:" व "य.क्रियावान स पंडित:" यापैकी एकही गुण अंगी नसलेल्या पण अंगी ज्ञानपणाची मस्ती ठेवून इतरांना हिन,तुच्छ समजणार्या ब्राह्मणांना तुकोबा स्पष्टपणे सुनावतात की, "मर्यादा ते जाण अरे अभागिया । देवाच्या ऐसिया सकळ मुर्ती ॥","करी अनेकांचा अपमान । खळ छळवादी ब्राह्मण । तया देता दान । नरका जाती उभयता ॥".असे रोखठोक बाण्याचे तुकोबा; "ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा करू पाहतो" म्हणणार्या शिवरायांच्या प्रणालीचेच होते. म्हणूनच तुकोबांनी ’भेदवाही’ व ’खळवादी वेव्हार’ करणार्या ब्राह्मणांना ’भ्रष्ट सुतकिया खेळ..विटाळ पातकी..न्यानगंडे ढोरे’ इ. शेलक्या शिव्या हासडल्या आहेत व नरकगामी म्हंटलेले आहे.(११२९, १३४५, २३३६, ३६७८, ४५०५)."महाराचा स्पर्ष झाल्यामुळे ज्या ब्राह्मण म्हणविणार्यास क्रोध येतो, तो खरा ब्राह्मणच नव्हे. " या दोषद्रुष्टीमुळे त्याच्या हातून जे पातक घडाले गेले, त्या पातकाला देहान्त प्रायचित्ताशिवाय अन्य प्रायश्चित नाही" हा रोखठोक निर्णय तुकोबा सुनावतात; किंबहुना तया प्रायश्चित काही देहत्याग करता नाही. असे त्यापुढेही एक पाऊल टाकतात. "यातिकुळ येथे असे अप्रमाण । गुणाचे कारण असे अंगी ॥" असे वारंवार झडझडून सांगणार्या तुकोबांनी कोणत्याही कर्मभ्रष्टाला श्रेष्ठत्व देणे शक्यच नाही. हे अभंग बळीच घुसडलेले आहेत.मग हे असले अभंग एखाद्या "सालो-मालो" चे असोत की "श्री समर्थप्रतापामधील एखाद्या हेळवाकीच्या अथवा बिडवीच्या रामदास्याचे असोत.
तुकोबा जर कोणा कर्मभ्रष्ट ब्राह्मणांनाही श्रेष्ठ म्हणू शकले असते तर त्यांचे साहित्य बुडविण्याचे महत्पाप कोणालाही करावेसे वाटले नसते. "सत्याचिया लोपे पापे घडती" या धारणेने तुकोबा सत्य तेच बोलायचे. शिवाय सामान्य समाज हा तत्कालीन ब्राह्मणांच्या नादी लागून आंधळ्याचे काठी लागलेल्या आंधळ्याप्रमाने देवधर्माला आचवन गर्तेत बुडत आहे हे द्रुष्य़ तुकोबांना डोळा देखेवेना. त्याकाळी ब्राह्मणांचे किती अंध:पात झाला होता याची शेकडो प्रमाणे तुकोबांच्याच नव्हे तर ब्राह्मण लेखकांच्याही साहित्यात मिळते.रामदासांचे शिष्य दिनकर गोसावी "स्वानुभव-दिनकर" ग्रंथात ब्राह्मण भांग सेवू लागल्याचे लिहिले आहे.किंबहुना "ब्राह्मण झाले दासीगमनी" असे वर्तवले आहे. समर्थबंधु "श्रेष्ठ" यांनी सुद्धा "तपसत्यविहिन द्विज परान्न प्रद्रव्य परस्त्रीलोलुप" होऊन "तीर्थव्रतादि करणारांचा उपहास" करीत, "वेदशास्त्र पुराण"च नव्हे, तर "कन्याविक्रय"करीत. "दुष्टदेवा दुष्टपरिग्रह दुराचारी दुराग्रह व मद्यमांसाशन" हेच ब्राह्मणांचे स्वरूप झाले होते असे म्हंटले आहे(भक्तिरहस्य). खुद्द रामदास स्वामी सुद्धा "ब्राह्मण बुद्धिपासून चेवले । आचारापासून भ्रष्टले ॥", ब्राह्मणास ग्रामणीने बुडविले, मिथ्या अभिमान गळेना मुर्खपणाचा, आदि वचणं बोलीले आहेत. संत कान्होबा म्हणतात, "उत्तम ब्रह्मकर्म सोडून अठरा यातीचे व्यापार ब्राह्मण करत."
ब्राह्मणांचा देह शुद्रकर्मासाठी नसतो असे भागवत म्हणते. वेदाखेरीज अन्य कार्य करणारा ब्राह्मण जीवंतपणीच शुद्र होतो. अशीही स्म्रुती आहे. तरीपण व्याजबट्याचा व्यवसाय ब्राह्मणांनी सर्वत्र स्विकारलेला दिसतो आणि स्म्रुतीनियमाप्रमाणे असे करणे पाप होते. साता दिवसांचा जरी झाला उपाशी । तेने किर्तनासी सोडू नये ॥ हे तुकोबांचे नि:स्प्रुह लोकशिक्षणव्रत म्हणजे ब्रह्मकर्मावर आक्रमण वा अपराध म्हणता येईल का ? ब्राह्मण वेदविद्वांस मद्यमांस, अंगीकरून भेद न देखता खुशाल गोंधळ घालायचे, केवळ पिंडाचे पाळण करण्यासाठी पुण्यविकारा करायचे किंबहुना आचार सांडून अधर्मा टेकायचे, चहाड्चोर व्हायचे. अर्थात त्याकाळी बहुतांशी ब्राह्मण वंदाया पुरते तणसाचे वाघ होऊन राहिले होते आणि आपली आब्रु वाचवण्यासाठी "ब्राह्मण जरी झाला भ्रष्ठ । तरी तो तिन्ही लोकी श्रेष्ठ" असल्या बिनबुडाच्या पाट्या रंगवाव्या लागत होत्या. मग अशांना "हिन सुकराच्या जाती" म्हणून तुकोबांनी संबोधले तर चुकले कोठे ?.
सर्वात महत्वाचे म्हणजे ब्राह्मण त्याकाळी वयक्तिक चरित्रच गमावून बसला होता असे नाही. तर स्वदेश, स्वभाषा व स्वदेशधर्म आपल्या शुद्रस्वार्थापायी कोळून पिताना दिसत होता.
सांडुनिया रामराम । ब्राह्मण म्हणती दोमदोम । 
तुका म्हणे व्रुत्ती । सांडूनी गदा मागत जाती ॥(७९३)
पोटासाठी खौसा । वंदिती म्लेच्छांच्या ॥ (३०३५)
हे निरुपायाने आपदधर्म म्हणून ते करीत होते, असेही नाही.स्वार्थ बुडविली आचरणे (३९२२) असे तुकोबा सांगतात तर रामदास म्हणतात."कित्येक दावलमलकास जाती । कितेक पिरास भजती । कितेक तुरूक होती । आपुले इच्छेने ॥" इथे आपुले इच्छेने  हे शब्द विशेष लक्षणीय आहेत.
एकूण ब्राह्मणवर्ग परधर्मिय मुसलमानांच्या सेवेत गर्क झालेला असून त्याची नीतिमत्ताही सामान्य जनांच्या पातळीवर आलेली होती. ब्राह्मण वर्गात अमुक एक गोष्ट न करणारा असा राहिला नव्हता असे त्र्यं.शं.शेजवलकर म्हणतात. वि.का.राजवाडे देखील मान्य करतात की "घाटांचे दर्गे बनले आणि राऊळाचे महल झाले, फ़ार काय सांगावे, ब्राह्मण दावलमलकादि पीरांना भजू लागले. कित्येक ब्राह्मण पीरांचे मुजावरही बनले ! ते बहुतेक मुसलमान बनन्यासारखे झाले, इतकेच की त्यांनी सुनतेची दिक्षा मात्र घेतली नाही, तीही त्यांनी घॆतली असती, परंतू त्यांच्या आड एक मोठी धॊंड आली ती धॊंड म्हणजे महाराष्ट्रातील साधूसंत होते." याच साधुसंतांचे मुख्य प्रतिनिधी शिवबालकिल्यात संतश्रेष्ठ तुकोबा हे होते आणि ते "झाडू संतांचे मारग" या प्रतिज्ञेने कटिबद्ध होऊन भक्तिच्या सुगम मार्गाने संपुर्ण बहुजन समाजाची उन्नती सारी शक्ती एकवटून करू पाहत होते.
अवघ्या दूर्बळ जगात "दुर्बळांच्या नावे डोंगारा पिटून" आपली प्रतिष्ठा टिकवण्यासाठी ब्राह्मणांनी जो ’लटकियाचा वाहो’ म्हणजे असत्य रुढ्यांचा हैदोस चालवला होता, तो जनजाग्रुतीद्वारे हाणुन पाडण्यासाठी "गाडीन मी भेद । प्रमाण तो यासी वेद ॥" अशी प्रतिज्ञा तुकोबांना करावी लागली. भेद वाढवणार्या धर्मठकांची रोखठोक पणे "वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा" या आत्मविश्वासपुर्ण घोषणेने तुकोबांनी इंद्रायणीच्या वाळवंटात समतेचा झेंडा रोवला.ही घटना अटकेपार झेंडा रोवण्याच्या घटनेपेक्षा कमी नव्हेच, उलट आधिक गौरवाची आहे.
म्हणुनच "वर्ण-अभिमाने कोण झाले पावन । ऐसे द्या सांगूण  मजपाशी ॥
अत्यंजादि योनी तरल्या हरीभजणे । तयांची पुराणे भाट झाली ॥
            असे ठणकावून वर्णव्यवस्थेची रेवडी उडवून टाकणारे तुकोबा कोणत्याही कर्म-भ्रष्ट झालेल्या ब्राह्मणाला सर्वश्रेष्ठत्वाचे प्रमाण दिले असेल असे ज्यांना वाटेल त्यांना वाटो पण हा अभंग निश्चितच क्षेपक आहे.
संदर्भ : 
संतश्रेष्ठ श्री तुकोबांच्या अभंगगाथा [शासकीय,पंढरीप्रत,श्री पडवळ संपादित]
श्री.शिवछत्रपती(प्रुष्ठ क्र.३४) [त्र्यं.शं.शेजवलकर].
छ.शिवाजी महाराजांची पत्रे(प्रुष्ठ क्र.१६७)- [प्र.न.देशपांडे].
संतश्रेष्ठ तुकाराम : वैकुंठगमन की खून ? [साहित्यरत्न सुदाम सावरकर].
गीता (अ. ६-श्लो. १८) [व्यास].
महाभारत (शां.२६५-९) [वाल्मिकी].
भागवत (११-१७-४२).
स्वानुभव-दिनकर (९-२-७७)[दिनकर गोसावी].
भक्तिरहस्य (२-३९,४०.७३-४६,४८).
पहिला सुमनहार (प्रुष्ठ क्र.१२७) [श्री अनंतदास रामदासी].
दासबोध (१४-७-३१ते ३९)[समर्थ रामदास].
संत आणि समाज(प्रुष्ठ क्र.१२०) [श्री कारखाणीस].

14 September 2012

हिंदू - जगण्याची सम्रुद्ध अडगळ

              मराठी साहित्य प्रकाशना दिवशीच रेकॉर्डब्रेक करणारी भालचंद्र नेमाडे यांची "हिंदू - जगण्याची सम्रुद्ध अडगळ" हि प्रदिर्घ प्रतिक्षा असणारी कादंबरी प्रकाशीत झाली तेंव्हा साहित्य विश्वात एकच खळबळ उडाली. कादंबरीवरती अनेक अंगाने चर्चा सुरु झाली.कादंबरीवरती अनेक अंगाने लिहिता येईल, नेमाडेंचा देशी वाद, ब्राह्मणी जोखडातून नेमाडेंनी अस्सल कष्टकर्यांची सुटका केलेली आहे."हिंदू" मध्ये कारुण्य आहे,रंजकता आहे, ग्रामीण जीवणाचे यथार्थ दर्शन आहे, विनोद आहे.गावगाड्यातील समाजजीवनाचे जिवंत असे चित्रण  केले आहे.पारावरच्या, पाराखालच्या, शेतातील. आडोशाचे,खाजगीतील बोली भाषा आहे त्यामुळे कदंबरी अधिकच अक्रुतीम झाली आहे.हिंदू वरती अनेक अंगाने लिहिता येईल भाषाशास्त्राचे, मराठी भाषेचे तज्ञ ते काम करतीलच पण इथे नेमाडेंनी ब्राह्मणी छावणीला दिलेला धक्का याबाबत विवेचन करणार आहे.वैदिक उर्फ़ ब्राह्मणी परंपरेने भारतात विषमता , अंधश्रद्धा, स्त्रीबंधन लादली याविरुद्ध अनेक महापुरुषांनी काम केले, महिलांवर तर ब्राह्मणी परंपरेने अनेक अमानुष नियम लादले.
            ब्राह्मणांची कटकारस्थानं उघड करताना नेमाडे लिहितात "साले हे ब्राह्मण लोकच  गावोगावी अशी जातीभेदाची लफ़डी सुरु करतात....कशावरून  ? .. एवढा मोठा जातिभेद मोडणारा आपला वारकरी पंथ ह्या ब्राह्मणांनी नासवला.पुन्हा ब्राह्मणी धर्मच वारकरी पंथावाटे लादला हो आपल्यावर पेशवाईपासून स्वराज्य तर बुडवलंच, आता चालले एकेक इंग्रजी शिकून नोकर्या धरायला शहराइत, शहरी होत चालले ब्राह्मण ..(प्रुष्ठ क्र.१५७)" जातीभेदाची निर्मिती ब्राह्मणांनीच केली असे नेमाडे सांगतात.तसेच वारकरी पंथ हा जातिभेद मोडणारा होता.पण अलीकडे वारकरी पंथातच जातीभेद पाळला जातो.जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या आरतीला विरोध करणारी प्रव्रुत्ती ब्राह्मणांचीच, वारकरी पंथ हा अंधश्र्द्धा विरोधी आहे पण अलीकडे वारकरी पंथातील लोक अंधश्रद्धाळू,देवभाळे,विषमतावादी झाले आहेत, कारण ब्राह्मण त्यामध्ये घुसले आणि वारकरी पंथ नासवला. वारकरी पंथ हा ब्राह्मण विरोधी पण ब्राह्मणी धर्मच वारकरी पंथाद्वारे लादला आणि हे काम ब्राह्मणांनी पेशवाईच्या काळात केले.छत्रपती शिवरायांनी निर्मान केलेले रयतेचे स्वराज्य ब्राह्मणांनी बुडविले मराठी अस्मितेच्या गप्पा मारणार्या ब्राह्मणांनीच इंग्रजी शिकून शहरे गाठली , हेही नेमाडे यांनी निसंदिग्धपणे लिहिले आहे.भारतातील बौद्ध धर्म का संपला आणि ब्राह्मणांचा हिंदू धर्म खेड्यापाड्यात का गेला ते सांगताना नेमाडे लिहितात "खेडोपाडी कानाकोपर्यात मिलिटरीसारखे ब्राह्मण जाऊन राहिवल्यानं हिंदूधर्म  खेडोपाडी रुजला.बौद्धधर्म शहरीच होता , शहरीच राहिला त्यामुळे संपला" (प्रुष्ठ क्र. १५८,५८७)
          शेतकर्यांची मुलं शिकून डॉक्टर,वकील,इंजिनीअर, प्राध्यापक , कलेक्टर झाली पण परोपकार, प्रेम, समता,विज्ञानवाद विसरत चालली.या बाबत नेमाडे लिहितात "वारकरी हिंदू  धर्माचा नैतिक पाया किती भुसभुशीत झाला आहे.याचा पुरावा म्हणजे ही तळागाळातील गरीब शेतकर्यांची मुलं.शिकून वर गेली आणि शेतकर्यांचा फ़ाळ गोतास काळ बी निसूक निघाल हो हंगाम निष्टुक वाया गेला हो !"(प्रुष्ठ क्र.३०२) ब्राह्मणी धर्म वारकरी पंथात घुसल्यानेच तो नासला आणि पर्यायाने त्यांचे अनुयायी देखील नासले.ब्राह्मण जिथं घुसतो ते नासवुनच टाकतो, असेच नेमाडेंनी सुचित केलेले आहे.राष्ट्रीय स्वयंसेवक संघात काय चालते ? बहुजन मुलांच्या मनावर मुस्लिमद्वेष आणि ब्राह्मणी श्रेष्ठ्त्व कसे बिंबवले जाते याबाबतचे अत्यंत धक्कादायक वर्णन नेमाडे यांनी  प्रुष्ठ क्र.३१८ ते ३२४ वर केलेले आहे.यातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही विक्रुतांची टोळधार आहे हे स्पष्टपणे लक्षात येते.
            महात्मा गांधी यांची हत्या ब्राह्मणांने केली असताना देखिल ती मुसलमानानेच केलेली असावी असा संशय होता.पण ती ब्राह्मणाने केली आणि त्यानंतर काय झाले याचे सविस्तर वर्णन नेमाडे यांनी प्रुष्ठ क्र.३२४ ते प्रुष्ठ ३२७ वर केलेले आहे.त्यातील काही भाग पुढील प्रमाने ".. हे असं (गांधी हत्येचं) राक्षसी क्रुत्य फ़क्त ब्राह्मणच  ह्या देशात करु शकतो. ते खरच ठरलं.रात्री दिल्लीहुन इकडे तिकडे केलेल्या ट्रंक फ़ोनवरून खुनी माणूस गोडसे होता, अशा बातम्या मोरगावांत ("हिंदू " कादंबरीचा नायक खंडेराव पाटलांचे गांव) आल्या आणि सकाळी तर ठेंगू जोशीबुवांना दिल्लीहुन मुलाची तारच आली.-- काळजी घ्या ----राजाभाऊ अग्निहोत्री यांनी रात्री ब्राह्मणवाड्यात साखर वाटली. अशी कुजबुज होती." ब्राह्मण आळीत एकाने बायकोला हर्षभरात , अहो, पुरणपोळ्या करा , असंच काहीतरी ओरडून सांगितल्याचही काहिंना ऐकल्याचं स्पष्ट आठवत होतं " ( प्रुष्ठ क्र.३२५) सावरकर देशभक्त वगैरे नसून मुसलमानांचा द्वेष करणारा आणि देशाची फ़ाळणी करणारा असा द्वेषी माणुस होता असे नेमाडे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. "याचं(सावरकराचं) देश कार्य म्हणजे द्वेषकार्य" आपल्या देशात खालच्या जातीच्या लोकांना वैदिक,ब्राह्मणी धर्माने फ़ार छळले त्यामुळेच मुसलमान धर्म लोकांनी जवळ केला, याबाबत उद्वेगाने नेमाडे लिहितात " आपला हिंदूधर्म खालच्यांसाठी काय शेटं करतो ? " (प्रुष्ठ क्र.३२९) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गुप्त अजेंडा काय होता, याबाबत निळुभाऊच्या डायरीतील नोंदिवरून नेमाडे यांनी पुढील विवेचन केले आहे पहिल्याच पानावर.
      " स्वत:च्या रक्तानं रंगवलेला भगवा झेंडा. नंतर एका पानावर एका खाली एक लिहिलं होतं
१७५७
१८५७
१९५७
          काय याचा अर्थ ? याचा अर्थ तुमच्या सारख्यांना सांगुन काय उपयोग ? १७५७ पलाशीची लढाई, १८५७ तात्यांचं बंड, आणि आता १०० वर्षांनी - रक्तरंजित  आसे तु हिमाचल, अखंड हिंदूस्तान, एकुण एक इंग्रज कापून काढला जाणार होता.राजधानी पुणे ठरली होती.राष्ट्रध्वज भगवा, राष्ट्रगीत - नमस्ते सदावत्सले - स्वतंत्रते भगवते एकत्रित घटना वगैरेचा व्यय आणि घोळ कशाला ? मनुस्म्रुती आहेच."(प्रुष्ठ क्र.३३०)मनुस्म्रुतीने बहुजनांच्या हजार पिढ्यांना नरक यातना दिल्या.त्या मनुस्म्रुतीचे राज्य ब्राह्मणांना अपेक्षीत होतं. हे नेमाडेंनी मांडले आहे.राष्ट्रीय स्वयंसेवक संघात काम करणार्या बहुजन समाजातील तरुनांचा ब्राह्मण वापरून कसा चोथा करतात हे नेमाडेंनी रेखाटलेल्या "निळुकाकाच्या " पात्रावरून लक्षात येतं.ब्राह्मण पत्रकार ,संपादक बहुजनांच्या ग्रामिण भागातील बातम्या वस्तुस्थितीला धरून देत नाहीत.याबाबत ग्रामीण भागातील शेतकर्यांची संपादकाबाबतची प्रतिक्रिया नेमाडे यांनी पुढीलप्रमाणे नोंदवलेली आहे."खरंच आहे हो, तो मायझवाड्या संपादक श्रमाची काय प्रथिष्ठा मानतो ? " (प्रुष्ठ क्र.४०८)
       आजच्या वारकरी पंथात जातीभेद आहे.नुसते देवळात नाचुन अध्यात्मिक सुख मिळवण्याच्या बाता मारतात.मुसलमान तर सोडाच पण महारमांगाना देखील यांनी सामावून घेतले आहे, मुसलमान द्वेष शिकवणार्या तथाकथित हिंदुत्ववाद्यांना नेमाडे सवाल विचारतात."एकादशीला मिरची,रताळ,पेरू,पपया, शेंगदाणे,खजुर, बटाटा, साबूदाणा असले म्लेंच्छ यावणी पदार्थ कसे काय चालतात ? हे तर अलीकडे बोटींनी समुद्रावरून आयात केलेले पदार्थ."(प्रुष्ठ क्र.४४१) रामदास हा शिवरायांचा गुरु नसताना , तो तसा ब्राह्मणांनी रेखाटला याउलट तो एका मुलीचे जीवण उद्ध्वस्त करून लग्न मंडपातून पळाला, याबाबत खंडेरावांचे मित्र मछिंदर , वाणखेडे , अनंतराव यांचा संवाद नेमाडे पुढील प्रमाणे रेखाटलेला आहे."(मछिंदर अनंतरावला म्हणतो ) रामदास स्वामींच्या  मंडपात राहुन गेलेल्या बायकोच्या दु:खावर फ़ार सुंदर कविता होईल नाही ? वानखेडे म्हणाला , सुंदर ?  तिकडे कोवळी पोरगी का बोडकी ठवली जन्मभर का मारली - आणि तुला सुंदर कविता लिहायचीय ?  त्यापेक्षा ती उद्ध्वस्त बाई हातात वहान घेऊन याला(रामदासाला) शोधत शिवरथकडे चाललीय अशी कविता - पेक्षा श्लोकच का नाही लिहित- 
         जनाचे श्लोक मनाची नको लाज ठेवू तू जरी ।
     जनाची तरी ठेवी पळपुट्या नागड्या तू ॥
इथे मराठी कवींना तर रामदासाच्या ह्या बिचारीचं नाव सुद्धा माहीत नाही नै.॥" (प्रुष्ठ क्र.४५०)
          ब्राह्मण पत्रकार हा अक्षरज्ञान, धुर्तपणा, कावेबाजपणा याच्या बळावर काय-काय उचापती करतो हे अनंतराव या पत्राद्वारे नेमाडेंनी अत्यंत रसभरीत वर्णन केलेले आहे, आणि हाच अनंतराव काय करायचा हे नेमाडे लिहितात. "मराठे आणि महारांमध्ये कलागती लावून त्याबद्दल कलात्मक भाषेत लिहिणं - ह्या जबाबदार्या एकटा अनंतराव जबाबदारीनं सांभाळायचा" (प्रुष्ठ क्र.४५०) मराठावाडा नामांतराचा लढा पुरोगामी ब्राह्मणांनी कसा लावून दिला, पुणे , मुंबई विद्यापिठाच्या नामांतराबद्दल न बोलणार्या पुरोगामी ब्राह्मणांचे नेमाडे यांनी पितळ उघडे पाडलेले आहे."अशा भंपक सुधारणा आपल्या पुण्यात किंवा मुंबईत न होता दुसर्या मागासलेल्या भागात झाल्या तर उत्तमच, असं वाटणार्या पुण्या - मुंबईच्या उच्चवर्णीय पुरोगामी विचारवंतांनी सगळीकडून मराठावाडा विद्यापिठाचं नाव बदललं पाहिजे , अशी मोहिम सुरु केली "(प्रुष्ठ क्र.४६४) दशमान पद्धती हि आर्य, द्रविडपुर्व अतिप्राचिन असुन त्याबाबतचे संशोधन झाले पाहिजे आणि  ब्राह्मणी व्युत्पतीवर नेमाडेंचा विश्वास नाही , त्याबाबत ते लिहितात "दहा पर्यंतचे आकडे वेगळे करायचे , अकरा- बारा-तेरा - पंधरासतरा-अठरा - ह्या सगळ्यांच्या शेवटी रा आहे. रा म्हणजे दहा -----रावणमध्येही दहा या अर्थी रा-----असावं------राव म्हणजे आवाज म्हणून रावण, असल्या संस्क्रुत बंडल व्युत्पत्त्यांवर आपला विश्वास नाही" (प्रुष्ठ क्र.५३४) ग्रेट निकोबरी सारख्या आदिवासी समाजात बायकोवर कोणत्याही स्वरुपाचा संशय घेत नाहीत्पण हिंदू संस्क्रुतीची अवस्था काय आहे याचे विवेचन करतात , "लहान मुलं ज्या निकोबारी तरुणाला सतत चिकटून असायच त्या तरूणाला मंडीने विचारले , हा कोण ? निकोबारी म्हणाला--माझ्या बायकोचा मुलगा---असं कसं ? ह्यावर तो चिडून म्हणाला , तुम्हा बायकांना हे कळायला पाहिजे, बायकोला मी सोडून दुसर्यापासून मुल नाही होऊ शकत ? आश्चर्य , अरे, इंग्लंड मध्ये सुद्धा कुठलाही नवरा असं चिंतू सुद्धा शकणार नाही.हि नैतिकता भारतीयांच्या केंद्रस्थानी यायला पाहिजे.इथे थोड्याशा संशयावरून बायकोला जाळुन टाकणारी आमची हिंदू संस्क्रुती -----" (प्रुष्ठ क्र.५३८) हिंदूधर्मात मुलींची किंमत नाही, याबाबत नेमाडे लिहितात " मुलींची काय किंमत ?  गचाळ हिंदू कुटूंब व्यवस्था" (प्रुष्ठ क्र.५८३)   
           भालचंद्र नेमाडे यांनी अशा अनेक बाबी प्रस्तुत कादंबरीमध्ये नोंदविल्या आहेत.त्यांचे सविस्तर लेखन म्हणजे एका पुस्तकाचा विषय आहे, हे काम पुढे कोणी तरी करेलच , नेमाडे यांची भाषा लोकभाषा आहे , ती कष्टकरी , श्रमकर्यांना आपली वाटणारी आहे,नेमांडेंच्या भाषेला ब्राह्मणी निकष लावणे गैर आहे, नेमांडेंकडे जस फ़टकळपणा आहे , विनोद आहे तसेच दु:खी, श्रमकरी, कष्टकरी, शेतकरी स्त्रिया यांच्या व्यथा मांडणारे कारुण्य देखील आहे,भाषा , आशय, वाकप्रचार, म्हणी , शब्द, साहित्य, कादंबरी ही ब्राह्मणीच असली पाहिजे या ब्राह्मणी सांस्क्रुतीक दहशदवादाला गाडणारी आणि त्यांच्या  व्यवस्थेला उघडी पाडणारी  भालचंद्र नेमाडे यांची "हिंदू - जगण्याची सम्रुद्ध अडगळ" ही कादंबती आहे.