11 April 2013

शाहू छत्रपतींचा जातीअंताचा लढा

              राजर्षी शाहू छत्रपती यांच्या काळातील फ़ार गाजलेले वेदोक्त प्रकरण तर समद्यास्नी ठाऊक असेलच.त्या वेदोक्त प्रकरणात थुसिडाईडस या तत्वज्ञानाच्या "आमचे मालक होणे तुमच्या हिताचे असेल पण तुमचे गुलाम बनण्यात आमचे कोणते हित आहे ?" या वचनाची प्रचिती आणि अनुभव शाहू महाराजांना आला.वेदोक्त प्रकरणाचे मुळ हिंदुंच्या वर्णव्यवस्थेच्या आधारीत असणार्या समाजरचनेत शोधावे लागते.हिंदु मध्ये ब्राह्मण,क्षत्रिय,वैश्य आणि क्षुद्र हे चार वर्ण मानले जात होते पण नंतर त्यातही बदल घडला शुरवीर(?) परशुराम याने प्रुथ्विवरील क्षत्रिय नष्ट केले आणि वैश्य आपोआप नष्ट झाले.त्यामुळे या विश्वात ब्राह्मण आणि क्षुद्र असे दोनच वर्ण शिल्लक राहिले.जे ब्राह्मणेत्तर आहेत त्यांना क्षुद्र समजले जाते.वेदोक्त मंत्रांप्रमाणे आपले धार्मिक संस्कार करून घेता येतील ते फ़क्त ब्राह्मणांना.पण ब्राह्मणेत्तरांना मात्र आपले धार्मिक संस्कार वेदोक्त पद्धतीनुसार करण्याचा अधिकार नव्हता.ब्राह्मणेत्तर आपले धार्मिक संस्कार पुराणोक्त पद्धतीने करू शकत होता.पुरोणोक्त पद्धत म्हणजे जे धार्मिक संस्कार पुराणातील मंत्राच्या आधारे केले जातात व वेदोक्त पद्धत म्हणजे वेदातील मंत्राप्रमाणे केले जातात.वेद हे   अपौरुषेय आहे तर पुराणे ही मानवाने रचलेली आहेत.
          हिंदू धर्मातील चार वर्णात ब्राह्मण हे सर्वश्रेष्ठ मानण्यात आले होते.म्हणूनच हिंदू समाजरचणेत आपणच सर्वश्रेष्ठ आहोत,इतरांचे गुरुपद आणि नेत्रुत्व ही आमची मिरासदारी राहिली पाहिजे,आमचे वर्तन भ्रष्ट झाले तरी त्यामुळे आमच्या श्रेष्ठ्त्वाला काहीच बाधा येवू शकत नाही अशी आडमुठी भुमिका ब्राह्मण वर्गाकडून मांडली जाऊ लागली.या दर्पोक्तीतच जरी ब्राह्मण झाला भ्रष्ट तरी तो तिन्ही लोकी श्रेष्ठ हे त्यांचे ब्रीदवाक्य खरे ठरू पाहत होते.या मिरासदारीच्या दर्पोअक्तीतुनच ब्राह्मणांनी मराठे हे क्षत्रिय नसून क्षुद्र आहेत असे म्हणुन वेदोक्ताचा अधिकार नाकारला.
            शाहू छत्रपतींचा जन्म घाटगे नामक मराठा कुळात झाला असल्याने त्यांना क्षत्रियांच्या वेदोक्त संस्कार पद्धतीने आपले धार्मिक विधी करून घेता येणार नाहीत अशी दुराग्रही भुमिका घेतली.त्यातूनच छत्रपतींचा आश्रित असणार्या नारायण भटाने शाहुंच्या १८९९ सालच्या पंचगंगेतील पवित्र कार्तिक स्नानाच्या वेळी बुरस्या अंगाणे पुराणोक्त मंत्र उच्चारून उद्दामपणे म्हंटले ,धर्मानुसार ब्राह्मण श्रेष्ठ आहेत आणि सर्वशक्तिमान ब्राह्मणवर्ग तुम्हाला क्षत्रिय म्हणून मान्यता देत नाही,तोपर्यंत तुम्ही क्षत्रिय कुळावतंस अशी बिरुदावली जरी मिरवली तरी तुम्ही आमच्यासाठी क्षुद्रच.
या अपमानाचे जहर पचवून उद्याची समाजक्रांती घडविण्यासाठी शाहू छत्रपतींच्या मनात अंतर्यामी कोठेतरी विद्रोहाची एक ठिणगी हळूहळू पेट घेत होती.वेदोक्त वादाची सुरुवात करणारा पंचगंगेच्या काठी घडलेला शाहू छत्रपतींचा अपमान करणारा तो प्रसंग छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनातील क्रांतिकारक क्षण होता.चेदोक्त वादात सनातनी ब्रह्मव्रुंदांनी त्यांचा अत्यंत मानसिक छळ केला.त्यामुळे हिंदू समाजरचणेत प्रत्येक व्यक्तिचा सामाजिक दर्जा ठरविण्याचा जो ब्राह्मणांना सार्वभौम अधिकार होता,त्या अधिकारालाच आव्हान देऊन ब्राह्मणांचे वर्चस्व कमी करण्याचा जबरदस्त प्रयत्न वेदोक्त वादातून शाहू छत्रपतींनी केला.वेदोक्त प्रकरणाने त्यांना दिव्यद्रुष्टी लाभली.त्यानंतर त्यांनी आपली सत्ता व संपत्ती शुद्रातिशुद्रांच्या कल्याणासाठी उपयोगात आणण्याचे अलौकिक कार्य हाती घेतले.वेदोक्त प्रकरणानंतर शाहू महाराज जातीय विषमता नष्ट करण्याच्या प्रयत्नाला लागले.हिंदू समाजातील वर्णव्यवस्था व सम्रुद्धीचे जीवन जगता यावे म्हणून उच्चवर्णीयांसाठी निर्माण करण्यात आलेली सर्वच क्षेत्रातील १०० टक्के राखीव जागांचीच व्यवस्था होती.जातीय समानता प्रस्थापित करणे म्हणजे जातीसंस्थेच्या अस्तित्वाला सुरुंग लावणे हे समीकरण शाहू राजांच्या मनात पक्के रुजले होते.जातीसंस्था नष्ट करण्यासाठी तथाकथित उच्च जातींनीच जास्तीत जास्त प्रयत्न केले पाहिजेत असा छत्रपती शाहूंचा ठाम विश्वास होता.जपान देशातील जातीभेदाचा बीमोड होण्याचे कारण उच्च वर्गाच्या सामुराई लोकांनी सुरुवात केली हेच आहे.म्हणुनच जपान आज महासत्ता आहे.
             शाहू महाराज जातीसंस्था नष्ट करण्याच्या द्रुष्टीने अनेक क्रांतिकारक निर्णय घेऊन कटाक्षाने त्यांची प्रत्येक्ष अंमलबजावणी करत होते.त्यांची जातीसंस्था संपविण्याच्या द्रुष्टीकोणातून आंतरजातीय विवाहाचा प्रयोग आपल्याच राजघराण्यात केला.शाहू महाराजांची चुलत भगिनी चंद्रप्रभा व इंदुरचे युवराज यसवंतराव होळकर यांचा मराठा-धनगर या दोन्ही पक्षांनी ठरवलेला सुनियोजित आंतरजातीय विवाह ९ फ़ेब्रुवारी १९२४ रोजी इंदुर मुक्कामी मोठ्या थाटामाटात साजरा झाला.परंतू हा विवाह पाहण्यास शाहू छत्रपती हजर नव्हते कारण ६ मे १९२२ रोजी त्यांचे निधन झाले होते.डॉ.बाबसाहेब आंबेडकरांनी एका ब्राह्मण महिलेशी आंतरजातीय विवाह करून असाच आदर्श समाजाला घालून दिला आहे.
             "विद्येविना मती गेली,मतीविना नीती गेली" हा महात्मा फ़ुले यांचा आदर्श समोर ठेवून छत्रपती शाहूंनी १९०१ ते १९२२ पर्यंत आपली राजधानी कोल्हापूर शहरात मराठा, जैन, लिंगायत, मुस्लिम, ख्रिश्चन, महार, सोनार, शिंपी, पांचाळ, ब्राह्मण, प्रभू, वैश्य, ढोर, चांभार, सुतार, इ.विविध धर्माच्या आणि अठरापगड जातींच्या विद्यार्थ्यांसाठी अनेक शाळा व  अनेक वसतीग्रुहे सुरु केलीत.अस्प्रुष्यांना त्यांनी शिक्षणाचे दरवाजे खुले केलेत आणि कोरवी,वडार, फ़ासेपारदी यांसारख्या गावकुसाबाहेरील जाती जमातींच्या मुलांना सुद्धा त्यांनी शिक्षणाच्या परिघात आणले.त्यांनी सर्वांना प्राथमिक शिक्षण मोफ़त व सक्तीचे केले.१८३५ साली हंटर कमिशनसमोर महात्मा ज्योतिराव फ़ुले यांनी बहुजन समाजातील मुलांसाठी प्राथमिक शिक्षण  सक्तीचे करण्याची मागणी केली होती.त्यांनी १८५१ मध्ये महार, मांग, समाजातील मुलांसाठी पुण्यात पहिली भारतीय शाळा काढली.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये अनुच्छेद ४५ अन्वये १४ वर्षापर्यंतच्या मुलांना मोफ़त व सक्तीचे शिक्षण देण्याची तरतूद केली आहे.परंतू केंद्र सरकारला सदरहू कायदा करण्यासाठी २००९ साल उजडावे लागले त्यातही चालाखी करण्यात आली.पहिली ते आठवी परिक्षा न घेता विद्यार्थ्यांना सरसकट वरच्या वर्गात ढकलायचे आहे.परीक्षाच नाही तर गुणवत्ता कशी कळणार ? याचा दुष्परिणाम असा होईल की पुढील पिढ्यांच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक पात्रता आठवी पास आणि नववी नापास अशी राहिल.भारतात आज परकिय इंग्रजांचे सरकार आहे की लोकांनी लोकांचे लोकांसाठी चालवलेले सांददिय लोकशाही सरकार आहे.संभ्रम निर्माण करणारा हा परिक्षा न घेण्याचा निर्णय आहे.असा निष्कर्ष काढण्यावाचुन पर्याय नाही.
              राजर्षी शाहू महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील स्नेहसंबंध अत्यंत जिव्हाळ्याचे होते.३१ जानेवारी १९२० रोजी डॉ.बाबासाहेब यांनी "मुकनायक" हे पत्रक सुरु केले.त्या व्रुत्तपत्रास छत्रपती शाहूंनी २५०० रुपयांची भरघोस मदत दिली होती.शाहू छत्रपतींनी "मुकनायक" ला आर्थिक मदत देऊन पाठीशी सर्वशक्तीनिशी उभे असतात तर दुसरीकडे टिळकांचा "केसरी" पैसे देऊनसुद्धा अस्प्रुष्यांच्या व्रुत्तपत्राची जहिरात देखील छापण्यास तयार नव्हता, हि बाब लक्षात घेतली पाहिजे.१९०२ पासून १९२० पर्यंत शाहूंनी आपल्या संस्थानात मागासवर्गीयांसाठी राखीव जागा, अस्प्रुष्यांसाठी मोफ़त शिक्षणाची सोय,इत्यादि कार्य केले आहेत.
            ज्या मंडल आयोगामुळे आज ओबीसींना २७ टक्के राखीव जागा मिळाल्या आहेत,त्या ओ.बी.सी.च्या प्रतिनिधित्वाचा प्रस्ताव सर्वप्रथम राष्ट्रपिता ज्योतिराव फ़ुले यांनी आपल्या "शेतकर्याचा आसूड" या ग्रंथात मांडला.तर शाहू छत्रपतींनी अस्प्रुष्यता नष्ट करण्यासाठी पहिले पाऊल म्हणून २६ जुलै १९०२ रोजी आपल्या संस्थानातील मागासलेल्या जातींसाठी ५० टक्के जागा राखीव ठेवण्याचा जाहीरनामा काढला.मागासवर्गीय व ओबीसींचा भाग्योदय राष्ट्रपिता फ़ुले,छत्रपती शाहू महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या प्रचंड संघर्षाचे फ़लित आहे.हे मान्य करावेच लागेल.टिळकांनी तर "तेल्या तांबोळ्यांना संसदेत जाऊन काय नांगर हाकायचा आहे ? " अशी भुमिका घॆऊन या वर्गाचे हक्क नाकारले होते.असे असूनही ओबीसी या तीन महापुरुषांचे विचार स्विकारत नाहीत, हीच आजची शोकांतिका आहे.
          राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फ़ुले यांचे विचार हीच छत्रपती शाहू महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरणा होती.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी तर महात्मा फ़ुलेंना तिसरे गुरु मानले होते.महात्मा फ़ुलेंचा जन्म ११ एप्रिल १८२७ व म्रुत्यू २८ नोव्हेंबर १८९०, छत्रपती शाहुंचा जन्म २६ जुन १८७४ व म्रुत्यू ६ मे १९२२ तर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म १४ एप्रिल १८९१ व म्रुत्यू ६ डिसेंबर १९५६ रोजी झाला.१८२७ ते १९५६ अशा १२९ वर्षाच्या कालखंडातील या तीन महापुरुषांनी केलेल्या सामाजिक संघर्षामुळे हजारो वर्षे उच्चवर्णीयांच्या जुलमी सत्तेखाली दडपला गेलेला बहिष्क्रुत आणि ओबीसी समाज त्यांच्या सामाजिक व अर्थिक गुलामितून मुक्त झाला.या तीन विभुतींनी या देशाचा सामाजिक,सांस्क्रुतीक व राजकीय इतिहास बदलून टाकला आणि सर्वसामान्य माणसाला भयमुक्त जीवन जगण्याचे स्वातंत्र्य बहाल केले.
             जर फ़ुले-शाहू-आंबेडकर यांचे अनुयायी एकत्र आले तर देशातील जातीव्यवस्था नष्ट होऊन सामाजिक समता प्रस्थापित होण्यास वेळ लागणार नाही.आज मराठ्यांना आरक्षण मिळावे अशी मागणी होत आहे.परवाच महामोर्चा निघाला मुंबईमध्ये.कालचे तालेवार जमीनदार मराठे आज अल्पभुधारक आणि भुमिहीन होत आहे.तरीही सुंभ जळाला पण जातीय अहंकाराचा पीळ अजुन कायम आहे.त्यामुळे मराठ्यांनी शाहू राजांना स्विकारले नाही.हे आजचे दाहक वास्तव्य आहे.पण आंबेडकरांच्या अनुयायींनी मात्र फ़ुले आणि शाहू यांना स्विकारले आहे.कारण फ़ुले-शाहू आणि आंबेडकरांचे कार्य परस्परांशी पुरक आहे.म्हणूनच आंबेडकरांच्या अनुयायींनी सर्वा जाती-जमातींना एकत्र जोडण्यासाठी आपल्या चळवळीला फ़ुले-शाहू-आंबेडकर चळवळ अशी सर्वसमावेशक केली आहे.हि चळवळ व्रुद्धिवंत होऊन फ़ुले-शाहू-आंबेडकरांचे जातीविरहीत एकसंघ भारताचे स्वप्न साकार होईल,अशी आशा करूया.राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याला विनम्र अभिवादन आणि कोटी कोटी मानाचा मुजरा !...