30 September 2013

स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ : ज्ञानज्योती सावित्रीबाई फ़ुले

            काटेरी अंथरुणावर जन्माला येवून या अंथरूणाची ज्यांना सवय होते ते सामान्य म्हणून जगतात पण बोचणार्या काट्यांची ज्यांना जाणीव होते आणि हक्क मिळवण्यासाठी ज्यांच्यात जिद्द असते ते असामान्य होतात.भारत देशातील पुरुषप्रधान व्यवस्थेला तोंड देत प्रत्येक स्त्रीच्या जीवनाला ज्ञानाम्रुताचा आनंद देणार्या सावित्रीबाई फ़ुले या अशाच असामान्य व्यक्ती नव्हे तर ज्ञानाची देवता आहेत.त्यांच्यामुळेच आज,"अगं सोनू,अरे पिल्या,अरे बाळा लवकर उठ,शाळेला जायचं ना ! तयारी करावयाची आहे.लवकर उठ."अशाप्रकारचे संवाद आज भारतातील घराघरात ऐकायला मिळतात.
शिक्षणाची ज्ञानगंगा प्रत्येकाच्या घराघरात पोहवविणार्या पहिल्या महिला जन्मदात्या म्हणून अजरामर असणार्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फ़ुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात नायगांव येथे झाला.नायगाव येथील खंडूजी नेवसे पाटील यांची एकुलती एक लाडकी, हुशार मुलगी होती.तत्कालीन परिस्थितीत भारतीय समाजात बालविवाहाची पद्धत असल्यामुळे सावित्रीबाईंचं लग्न वयाच्या नवव्या वर्षी जोतिबा फ़ुले यांच्याबरोबर झाले.त्यावेळी फ़ुलेंचे वय १३ वर्ष होते.१८४० मध्ये विवाह झाल्याबरोबर परंपरागत चातुर्वर्ण्याधिष्ठीत समाज व्यवस्थेरूपी हिरव्यागार विषव्रुक्षाला घनदाट जंगलातील एका-एका विषव्रुक्षाला मुळासकट उपटून फ़ेकून देण्याचे धाडस,बाणेदारपणा आणि जॊखिम आपल्या पतीबरोबर सावित्रीबाईंनी तना-मनाने स्विकारले होते.
सावित्रीबाईंनी त्याच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर स्वतंत्र स्त्री म्हणून विचार केला.फ़क्त विचार करून थांबल्या नाहीत तर प्रत्यक्ष त्याप्रमाणे वाटचाल केली.ही वाटचाल सनातन काळात अत्यंत खडतर होती म्हणूनच त्यांनी घडवून आणलेल्या शैक्षणिक क्रांतीचे मोल अनमोल होते हे निश्चितपणे समाजाने स्वीकारले आहे.ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा आहे असे राष्ट्रपिता महात्मा जोतिराव नेहमी म्हणत त्यामुळे "विद्या हेच बळ,ज्ञान हीच शक्ती" ही म.जोतिराव फ़ुलेंची मुलगामी क्रांतिकारी वचने सावित्रीबाईंनी आत्मसात केली होती.शिक्षणाशिवाय समता नाही आणि समतेशिवाय मानवता नाही हे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी "चुल आणि मुल" यात गुंतुन न पडता घराचा उंबरठा ओलांडून त्यांनी सामाजिक कार्यात भाग घेतला.महात्मा जोतिराव फ़ुलेंनी स्वत: सावित्रीबाईंनी शिकविण्यास सुरुवात केली.त्यासाठी शेतातील काळी जमीन सावित्रीबाईंची पाटी होती.त्या पाटीवर सावित्रीबाई एका छोट्याशा काडीने अक्षरे गिरवायला शिकल्या पुढे त्यांनी अहमदनगर येथे फ़रारबाईंच्या व पुण्यात मिचेलाबाईंच्या मॉर्मन स्कुलमध्ये अध्यापनाचे शिक्षण घॆऊन आद्य भारतीय शिक्षिका आणि मुख्याध्यापिका झाल्या हिच भारतीयांच्या इतिहासात अजरामर संस्मरणीय घटना घडली.
स्त्रियांच्या आणि शुद्रांच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून ज्ञानाचे दरवाजे त्यांच्यासाठी खुले करण्याचा महात्मा जोतिराव फ़ुलेंचा मानस होता."जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाची उद्धारी." या सत्याचा त्यांना प्रत्यय आल्यामुळे विचाराअंती त्यांनी मुलींच्यासाठी शाळा काढण्याचे ठरवून १ जानेवारी १८४८ रोजी पुणे येथील भिडे वाड्यात मुलींच्या शिक्षणासाठी पहिली शाळा सुरु केली आणि त्या शाळेत सावित्रीबाई विनावेतन शिक्षिकेचे काम करू लागल्या.आपल्या या कार्याचा एकखांबी तंबू होऊ नये म्हणून त्यांनी कार्यकारी मंडळाची स्थापना केली.
१ जानेवारी १८४८ रोजी मुलींची पहिली शाळा पुण्यात सुरु करण्यात आली होती. ती भारतातील पहिली शाळा म्हणून भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहावा लागेल.जेव्हा ब्राह्मण समाजाला समजले की ही शाळा एका शुद्र जोडप्यांनी सुरु केली आहे.तेंव्हा त्यांनी संताप व्यक्त केला.सावित्रीबाई शाळेत जात असताना त्यांच्यावर शेण टाकणे,चिखल फ़ेकणे,अचकट-विचकट भाषेचा वापर करणे,निंदानालस्ती करणे असे अनेक प्रकार सुरु होते.परंतू सावित्रीबाई फ़ुले या स्वभावाने बंडखोर स्वभावाच्या होत्या.अशा अनेक अडचणी आणि संकटांना त्यांनी भीक घातली नाही.कारण जे कार्य त्यांनी हाती घेतले ते भारतातील महिलांसाठी उज्वल भविष्या निर्माण करणारे होते.त्यांनी अस्प्रुश्यांसाठी शाळा काढल्या.त्याकाळी स्त्रीयांना अजिबातच स्वातंत्र नव्हते.स्त्रियांना शिक्षण देणे म्हणजे पाप आहे असे समजले जात असे.परंतू हे धाडसी काम फ़ुले दांपत्यांनी सुरु केले.
सावित्रीबाई प्रतिभावंत कवयत्री देखील होत्या.त्यांनी ५० वर्षे जोतिराव फ़ुलेंच्या ध्येय प्रणाली, चळवळीमध्ये झोकून दिले होते.सावित्रीबाईंचा पहिला काव्यसंग्रह १८५४ साली प्रकाशीत झाला.त्यामध्ये सुद्धा त्यांनी आपल्या बहुजन बांधवांना काव्य अर्पण केले.उदा.तयास म्हणावे मानव काय,शिकण्यासाठी जागे व्हा,शुद्र शब्दाचा अर्थ श्रेष्ठ धन इत्यादी काव्य रचनेमधून त्यांनी शिक्षणाचे महत्व पटवून दिले.एका काव्यामध्ये सावित्रीबाई फ़ुले म्हणतात- नसानसात इर्षा खेळवू विद्या मी घेईन,शुद्रत्वाचा डाग हो माझा निपटून मी काढीन.सावित्रीबाई म्हणतात-तुमच्या रोमारोमात अशी इर्षा जाणवू द्या की,आम्ही शुद्र आहोत याचा डाग आम्ही पुसुन टाकणार आहोत आणि त्यासाठी आम्हाला शिक्षण घेणे आवश्यक आहे.अशा प्रकारे काव्य रचना करून बहुजनांना शिक्षणासाठी प्रेरित,चैतन्यमय केले आहे.विद्येचे महत्व पटवून दिले.खालील ओळीमध्ये त्यांनी सांगितले आहे की "विद्याधन आहे रे श्रेष्ठ सार्या धनाहून,तिचा साठा जयापाशी ज्ञानी तो मानवी जन".पुरुष शिकला तर तो एकटाच शिकतो परंतू स्त्री शिकली तर संपुर्ण कुटूंब शिक्षित होते.पर्यायाने समाज शिकतो आणि राष्ट्राच्या प्रगतीला हातभार लागू शकतो.ही शिकवण सावित्रीबाईंनी समाजाला दिली.कारण त्या काळात अखंड भारतामध्ये स्त्री ही एका रानात चुकलेल्या पाडसासारखी वावरत होती.ती घाबरलेली,बावरलेली,मनाने दबलेली होती.कोणीतरी ब्रुचे धिंडवडे काढील या मनस्थितीत वावरत होती.तिला शिक्षणापासून वंचित केले जात होते.पुरुषप्रधान समाजव्यवस्था आणि स्त्रियांना दासी लेखणारी पुरुषी मानसिकतेने महिलांवर अनेक बंधने लादली होती.त्याठिकाणी सावित्रीबाईंनी अंधार्या कोठडीत चाचपडणार्या स्त्रीला तिच्या आस्तित्वाची जाणीव करून दिली.सनातनी लोकांचा रोष पत्करून तिला पुरुषांच्या बरोबरीत वागायला शिकवले.असे हे शिक्षण क्षेत्रातील महान कार्या बघून ब्रिटीश सरकारने त्यांचा पुणे येथील विश्रामवाड्यात १६ नोव्हेंबर १८५२ मध्ये तत्कालीन पुना संस्क्रुत कॉलेज चे प्राचार्य मेजर कॅंडी यांच्या अध्यक्षतेखाली फ़ुले दांपत्यांना सन्मानित करून त्यांचा गौरव करण्यात आला.
आज एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करायला स्त्रीला कोणी मार्ग दाखविला असेल तर तो सावित्रीबाई फ़ुलेंनीच.त्यांनी जर हा रस्ता दाखवला नसता तर कोठेतरी सह्याद्रीच्या रांगामध्ये,कोणत्यातरी दाट जंगलात,कोणत्यातरी गुहेत काट्यांतून प्रवास करायला लागला असता.सह्याद्रीच्या शिखरावर पोहचण्याऐवजी सह्याद्रीच्या खोल दरीत व दु:खाच्या गर्तेत हिंडावे लागले असते.पण सावित्रीबाई फ़ुलेंनी राष्ट्रपिता महात्मा फ़ुले यांच्या बरोबरीने स्त्रियांसाठी जी नवीन दालने उभी केली त्याला तोड नाही.त्याकाळी मुठीमध्ये मापेल एवढ्या मनुवादी लोकांची शिक्षणावर मक्तेदारी होती.ही मक्तेदारी स्वत: अक्षर गिरवून या गिरवण्यातून पुर्ण भारतातील स्त्रियांना भवितव्याचा मार्ग दाखविला.
या प्रेमळ माऊलीचे १० मार्च १८९७ ला महानिर्वाण झाले.म्हणून म्हंटले जाते की,"युगायुगातून एखादीच अशी सावित्री जन्माला येते म्हणूनच ती युगसावित्री होते." राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फ़ुलेंसारख्या क्रांतीसुर्याबरोबर सहवास आणि मार्गक्रमण करीत असणारी ती एक क्रांतीज्योती होती.म्हणूनच अशा तपस्वी,न्यायमुर्ती,तेजस्विनी महामायेला कोटी कोटी विनम्र प्रणाम.

12 प्रतिक्रिया :

  1. वकील,डॉक्टर झालीस मिनिस्टर
    फ़िरायला लागलीस गाडीत
    माझी सावित्रीबाई नसती तर
    असतीस गुरांचं शेण झाडीत

    क्रांतीज्याती ज्ञानज्योती सावित्रीबाई फ़ुले यांना मनापासून विनम्र अभिवादन !

    ज्यांच्यामुळे समस्त स्त्रीवर्ग एवढे शिक्षण घेउ शकत आहे, स्वतंत्र आहे, त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम.

    माननीय सावित्रीबाई फुले यांना त्रिवार अभिवादन!!!!

    भारत देशातील पुरुषप्रधान व्यवस्थेला तोंड देत प्रत्येक स्त्रीच्या जीवनाला ज्ञानाम्रुताचा आनंद देणार्या सावित्रीबाई फ़ुले यांना प्रणाम

    शिक्षण आणि महिला हे दोन शब्द आले की आणखी एक नाव त्याच्याबरोबर भारताच्या स्वातंत्र्यपुर्वकाळात स्त्रियांच्या शिक्षणासाठी घेणे अत्यावश्यक ठरते ते सावित्रीबाई फ़ुले यांचे. महिलांच्या शिक्षणासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचा वारसा आज अनेक ठिकाणी रुपांतरीत झालेला दिसतो आहे.

    आमच्याकडे ज्ञान आहे पण पैसा नाही...




    लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऎकतो मराठी धर्म पंथ जात एक जानतो मराठी ऎवढ्या जगात माय मानतो मराठी बोलतो मराठी ऎकतो मराठी जानतो मराठी मानतो मराठी आमच्या मना मनात दंगते मराठी आमच्या रगा रगात रंगते मराठी आमच्या मना मनात दंगते मराठी आमच्या रगा रगात रंगते मराठी आमच्या उरा उरात स्पंदते मराठी आमच्या नसा नसात नाचते मराठी॥

    या, सावित्रीबाई आलात?
    कशाने आलात पुण्याहून डेक्कननं की सिंहगड?
    डेक्कनची अवस्था बघवत नाही म्हणता?
    चालायचंच हॊ, त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं
    काय घेणार? कापुचीनो की थंड बर्फ़ाळलेलं बाटलीतलं
    तुमच्याच देशातलं ज्वलंत पाणी?
    यानंतर आपण सरळ मल्टिप्लेक्समधल्या-
    स्क्रीनवर छान गारेगार एसी मध्ये बसून
    “स्त्री- शोषण एक सामाजिक प्रश्न” बघणार आहोत.
    तुमच्याशी थेट संवाद दूरध्वनीवरुन भगिनींना
    साधता येणार आहे……

    काय म्हणता? प्रत्यक्ष भेट?
    हो आहे ना, महिला मंडळात साडी ड्रेपिंगवर कार्यशाळा–
    त्यात तुमच्या नऊवारीवर माझे भाषण आहे. प्रात्यक्षिकही आहे.
    त्यानंतर ताज मध्ये लंच-

    तुम्ही हातात लेखणी दिलेली छकुली
    आता साक्षर नी प्रौढ झाली आहे- काळजी करु नका
    तळागाळातल्या स्त्रिया? त्या आता उरल्याच नाहित.
    गेल्यात कुठल्यातरी मोर्चात सामील व्हायला,
    कोणी मंत्री येणार आहेत, मिळतात दहा दहा रुपये प्रत्येकिला
    किती समजावं लागतं बाई तुम्हाला.

    अम्रुता, जेसिका लाल , खैर लांजी ही कुठली नावं?
    नका हो अशी भाषा बोलु प्लिज…..
    आम्ही सुशिक्षीत मांडतो आहोत ना त्यांचे प्रश्न ,
    चर्चा सत्रे , मेळावे काव्यसम्मेलने आयोजित करुन
    तुम्ही नका काळजी करु.

    काय म्हणताय? समुद्रावर फिरायला जायचंय?
    हं…. तो मात्र बापडा तस्साच आहे हं,
    बसलाय बापडा कित्येक वर्षाच्या जुन्या खुणा,
    अंगावर बाळगीत, अन नविन वार सोसत
    चला , तुमच्याबरोबर दिवस घालवल्यावर,
    “एक दिवस सावित्रीचा” या प्रोजेक्टवर रिपोर्ट
    व्ही. सी. ना द्यायचाय.

    तुम्हाला नाही हो कळायच्या अश्या गोष्टी.
    या सावित्रीबाई आलात?

    “एखाद्या स्त्रीने कागद हाती घेतला की आमच्या वडील माणसांची अमर्यादा होने.जणू काही तिने अत्यंत लाजिरवाणी गोष्ट केली. एखादे आप्तेष्ठांकडून तिचे नावाने टपालातून पत्र आले की घरातील माणसांना आपली अब्रू गेलीसे वाटत. एखाद्या वर्तमान पत्रात एखादीचे नांव प्रसिध्द झाले, लेख प्रसिध्द झाला की घराची अब्रू कमी केल्याचा डोंगराएवढा आरोप तिचे माथी बसलाच म्हणून समजावे…..

    आज कोणतेही क्षेत्र असे नाही की ज्या क्षेत्रात स्त्रीने नुसते स्वतःचे पाउल ठेवले नाही तर तिथे स्वतंत्र कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. ही अत्यंत आनंदाची मनाला उत्साह आणण्यासारखी बाब आहे.परंतू पुन्हा प्रश्न उभा रहातोच तो असा की स्त्री खरंच समग्र दृष्टीने स्वतंत्र झाली आहे कां? की ’न स्त्री स्वातंत्र्यर मर्हती’ अशीच तिची अवस्था आहे ? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यास मागिल कालखंडातील साहित्याचा मागोवा घेतला तर असे लक्षात येते की अगदी मौखिक वांड्गमयापासून ते लिखित स्वरुपाच्या वांड्गमयाचा अगदी आजचा काळ घेतला तर त्याचे उत्तर अजुनही नकाराच्या परिसीमा ओलांडू शकल्या नाही असेच खेदाने म्हणावेसे वाटते.

    ReplyDelete
  2. सावित्रीबाई यांनी एक शाळा काढली हे सत्य आणि ते चांगले कामही आहे. त्यापूर्वी स्त्रियांना शिक्षणच मिळत नव्हते हा मात्र गैरसमज आहे. स्वतः जिजाऊ साक्षर होत्या तसेच आनंदीबाईनी ध चा मा केला तो साक्षर असल्यानेच! प्रमाण लिपी आणि मागासलेली इंग्रजी भाषा या दोन गोष्टीना शिक्षण समजावे असा दंडक इंग्रजांनी स्वताच्या सोयीसाठी केला आणि या गोष्टी येत नसलेले त्यांनी अशिक्षित ठरवले. अन्यथा सर्व समाज, अगदी ब्राह्मण आणि ब्राह्मणेतरही त्यांना माहित असलेल्या लिपीत लिहू-वाचू शकत होते. बलात्कारी मंडळींच्या भीतीने सारा समाज मुलीना शिकायला घराबाहेर पाठवणे टाळू लागला म्हणून मुलींचे घराबाहेर जाऊन शिकणे काही शतके थांबले होते. ते पुन्हा सुरु करण्याचे काम सावित्रीबाईनी केले. हे काम वंदनीय असून ब्राह्मण लोकांसह सर्वजण त्याचा आदर करतात. या संकेतस्थळावर भेट देणाऱ्या सर्वानी याची नोंद घ्यावी म्हणून ही प्रतिक्रिया दिली आहे. साक्षरतेचा आणखी जुना उल्लेख म्हणजे लंकेचा सेतू बांधताना मारुती आणि सहकाऱ्यांनी लिहिलेले नाव `राम'. इंग्रज इकडे आल्यावर मग भारताला साक्षरता शिकवली ही इंग्रजांनी पसरवलेली अफवा खोडून काधायाचाही सर्वानी प्रयत्न करावा ही अपेक्षा

    ReplyDelete
  3. शिक्षणाच्या बाबतीत आपल्या महापुरुषांनी जे कार्य केले ते अत्युल्य होते त्यामध्ये सावित्रीबाईंचे योगदान फ़ार मोठे होते.त्यांच्यामुळेच आज आपण शिक्षण घेत आहोत
    शिक्षक दिन म्हणजे महात्मा फ़ुले यांचा स्म्रुती दिन
    आणि महिला दिन म्हणजे सावित्रीबाई फ़ुले यांचा जन्म दिन
    जय मुलनिवासी नायक.

    ReplyDelete
  4. आज भारतामध्ये बर्याच ठिकाणी शिक्षणाची सोय झाली आहे खेडोपाडी शिक्षणाची सोय झाली आहे पण सावित्रीबाईंनी ई शिक्षणाची सोय केली त्यला तोड नाही कारण त्यावेळी सनातनी लोकांचा विरोध झुगारून शिक्षण चालू करणे फ़ार अवघड होते
    जय महात्मा क्रांतीसुर्य आणि जय क्रांतिज्योती

    ReplyDelete
  5. आज सर्व मुली शिक्षण घेत अहेत त्या फ़क्त आणि फ़क्त माता सावित्रीमाई मुळेच ब्राह्मणांचे विरोध झुगारून त्यांनी समाजाला शीकवण दिली.त्यांच्या या कार्याला मनापासून प्रणाम
    जय मुलनिवासी...

    ReplyDelete
  6. पहिल्या शिक्षीका ज्ञानज्योती क्रांतीज्योती सावित्रीमाई फ़ुले यांना विनम्र अभिवादन !!!

    ReplyDelete
  7. बहुतांशी वेळा आपण शैक्षणिक कार्यक्रमांची सुरुवात सरस्वती पूजनाने करतो. मला मात्र ही पद्धत अतिशय चुकीची वाटते. कारण सरस्वतिला वैदिक संस्कृतीने विद्येची देवता मानले आहे. त्यामुळे सहाजिकच शैक्षणिक कार्यक्रमामध्ये सरस्वतीचा उदो-उदो केला जाणार. जर सरस्वती विद्येची देवता असेल तर तिच्याकडे उच्च-नीच , गरीब-श्रीमंत असला भेदभाव नसला पाहिजे. मग असे असताना बहुजन समाज तिन-साडेतिन हजार वर्षे शिक्षणापासून वंचित का राहिला. सरस्वतीने बहुजनांच्या शिक्षनाच्या दृष्टीने काहीच केले नाही का ? हजारो वर्षापासून सरस्वतीची पूजा विद्येची देवता म्हणून केली जाते. मग बहुजनाना शिकायला बंदी का होती ? दूसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सरस्वती हिसुधा एक स्त्री होती, मग स्त्रियानाही शिकायला बंदी का

    ReplyDelete
  8. आजवर चिकित्सा न केल्यामुळेच बहुजन समाज गुलामगिरीत अडकुल पडला आहे. आणि “होय बा!” वृत्तीमुळे तर तो या दलदलीत खोल रुतत चालला आहे. त्यामुळे विद्येची खरी देवता कोण होवू शकते याचा थोडा चिकित्सक पद्धतीने विचार केला गेला पाहिजे. कारण तमाम बहुजन समाजासाठी शिक्षणाची कवाडे खुली केली ती महात्मा जोतीराव आणि सावित्रीमाई फुले यांनी. पण शाळा महाविद्यालयात त्यांच्या प्रतिमेचे पूजन होत नाही. अनेक शैक्षणिक संस्थामध्ये काल्पनिक देवतांच्या प्रतिमा लावल्या जातात. परंतु ज्यांनी सुरुवात केली त्यांच्या प्रतिमा मात्र नसतात. आणि अशा शाळा, महाविद्यालये किंवा संस्थामधून कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने केली जाते, मात्र ज्या सावित्रीमाईंनी शिक्षणाच्या प्रचार आणि प्रसारासाठी आयुष्य वेचले त्यांची साधी आठवण ही कोणाला होवू नये ? पहिली स्त्री शिक्षिका, स्त्री मुख्याध्यापिका म्हणून सावित्रीमाई सर्वश्रुत आहे. परंतु पहिली स्त्री शिक्षिका कशी घडली याचा कितीजण गांभीर्याने विचार करतात ? ज्यांना काल्पनिक देवावर श्रद्धा ठेवायची असेल त्यांनी जरूर ठेवावी. त्यांच्या भावना आम्हाला दुखवायच्या नाहीत किंवा त्यांना श्रद्धेचा जो अधिकार आहे तो आम्हाला नाकारायचा नाही. परंतु ज्या माउलीने आम्हाला शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली तीच आमच्या दृष्टीने सर्वश्रेष्ठ आहे. तीच आमची खरी विद्येची देवता आहे. कारण जर सावित्रीमाई आणि जोतीराव घडले नसते तर कदाचित भारत आजही अशिक्षित असता. या दाम्पत्यानेच शैक्षणिक क्रांती घडवली हे वास्तव आम्हाला नाकारून चालणार नाही.

    ReplyDelete
  9. विद्येची खरी देवता कोण ? हा वाद विनाकारण उकरून काढला जात आहे असे काही जणांना वाटण्याचा संभव आहे. कारण सामान्य बहुजन समाजाच्या मनावर आणि मेंदूवर प्रचलित धर्म व्यवस्थेने आणि तिच्या ठेकेदारांनी नियंत्रण मिळवले आहे. त्यामुळे आजवर भारतात धर्म व्यवस्थेचे ठेकेदार जे सांगतील तेच लोकांना सत्य वाटत आले आहे. कारण आपल्या देशात विचार आणि चिकित्सा करायला बंदी आहे ? हे असं का ? ते तसं का ? असले प्रश्न विचारायचे नसतात. नदीचं मूळ आणि ऋषीचं कूळ कधी शोधू नये असही धर्माने सांगून ठेवले आहे. त्यामुळे साहजिकच सामान्य माणूस परंपरेच्या नियंत्रणात राहतो. स्वताचा मेंदू वापरत नाही. त्यामुळे विद्येची खरी देवता कोण असा प्रश्न त्याला पडत नाही. आणि पडलाच तर कशाला मेलेली मढी उकरून काढताय म्हणून तो दुसर्यानाच दोष देत बसणार. परंतु फुले दाम्पत्याच्या विचाराने जागृत झालेला बहुजन मात्र स्वताचा मेंदू वापरणार आणि विचार ही करणार. त्यामुळे त्याला चिकित्सा ही करावीच लागणार. आणि चिकित्सा क्रमप्राप्त आहे. त्याबद्दल धर्म मार्तंड किंवा कुणी इतरांनी त्याला विरोध करायचे कारण नाही.

    ReplyDelete
  10. आता एकच गोष्ट स्पष्ट करतो. कोणी देव मानत असेल वा नसेल. परन्तु देव ही काल्पनिक संकल्पना आहे. काल्पनिक देव-देवतांची पूजा करायची आणि त्याचवेळी ज्यानी समाजात अमुलाग्र क्रांती घडवली त्या महामानवांची मात्र उपेक्षा करायची हे कोणत्याही प्रामाणिक माणसाला पटणार नाही. हे विचार वाचल्यानंतर वाचकाना मी हिन्दुद्रोही वाटेन. मी धर्माला, देवाला विरोध करतोय म्हणून भावनिक बनून ते वरील विचार झिडकारून लावतील. परंतु प्रामाणिकपणे बुद्धि जागृत ठेवून विचार करा की कळत नकळत आपण आपल्या महापुरुषांची किती उपेक्षा करतोय.
    ज्यांच्यामुळे आपण आज शिक्षण घेवु शकतो, त्यांचे विचार जोपासायाचे की आजपर्यंत ज्यानी आपल्या शिक्षणाला विरोध केला त्यांच्या तालावर नाचायाचे. निर्णय सर्वस्वी तुमचा आहे.

    ReplyDelete
  11. सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली हे सर्वश्रुत आहे पण केवळ शिक्षणाच्याच क्षेत्रात सावित्रीबाईंनी आमूलाग्र क्रांती घडविली असे अनेक वक्ते मंडळी प्रचार करतांना आढळतात त्यांनी सावित्रीबाईंनी केवळ ह्याच भिंतीत बंदिस्त करून ठेवले आहे परंतु हे निर्विवाद सत्य आहे की त्यांचे कार्य हे फक्त शिक्षणाच्या संबंधित नव्हते तर त्याने स्त्री वर्गाला एक स्वाभिमान आत्मविश्वास दिला की स्त्री ही नीच नसून पुरुषाच्या समांतर आहे.

    ReplyDelete

प्रतिक्रिया देताना सभ्य भाषेचा वापर करावा तसेच मराठी भाषेत लिहिण्याचा जास्तित जास्त प्रयत्न करावा. प्रतिक्रिया देताना कोणत्याही जात, धर्म, पंथ, वर्ण तथा कोणत्याही समुहाच्या श्रद्धास्थानांविषयी बोलताना सभ्यता बाळगणे आवश्यक.