"दादोजी,शिवाजी महाराज आणि सत्य" अशा मथळ्याचा राजा पिंपरखेडकर लिखीत लेख "लोकसत्ता" मध्ये ३१ ऑगस्ट २०१४ रोजी प्रसिद्ध झाला. अर्थात तो लेख म्हणजे एक पुस्तक परीचय होता. श्यामसुंदर मुळे यांनी लिहिलेले "हिंदवी स्वराज्याचे कारभारी दादोजी कोंडदेव : खंडण आणि मंडण " याच पुस्तकाचा परीचय. या लेखामध्ये लेखकाने असे लिहिले आहे की, "दादोजी कोंडदेव यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी महाराज यांचं सुरुवातीचं शिक्षण झालं, त्यांची नेमणूक खुद्द शहाजीराजांनीच केली होती" तसेच "दादोजी यांचं शिवाजी महाराजांच्या जडणघडणीतलं स्थान नाकारण्यात काहीच अर्थ नाही." असही सुचवले आहे. आजच्या सामाजिक संघटना इतिहासाची मोडतोड करून आपल्याला सोईस्कर इतिहास लिहितात असा आरोप त्यांनी केला आहे पण आजपर्यंतच्या तथाकथित इतिहासकारांनी जे उपद्व्याप केले आहेत त्याविषयी लिहायचे मात्र ते विसरलेत. अर्थात या लेखकांनी "सत्य" हा शब्द मथळ्यापुरताच मर्यादित ठेवला आहे. त्यामुळे सत्य काय आहे हे समजून घेणे गरजेचे आहे.
शिवचरित्रामध्ये सर्वात जास्त चर्चेचे ठरलेले प्रकरण म्हणजे त्यांचे गुरुत्व. यामध्ये रामदास स्वामी आणि दादोजी कोंडदेव ही नावे आघाडीवर होती. पण आजपर्यंत रामदास स्वामींना शिवरायांच्या गुरुपदी बसवणारे लेखक अक्कल आल्यावर रामदास स्वामी आणि शिवरायांनी भेटच झाली नसल्याचे बोलत आहेत तसेच शिवराय आणि रामदास भेटीचे अस्सल पुरावे नाहीत हे तर इतिहाससिद्ध आहेच. त्यामुळे अशा वेळी एकच नाव उरते ते म्हणजे दादोजी कोंडदेव.
राजा पिंपरखेडकर यांच्या म्हणण्यानुसार "शहाजीराजांनी दादोजी कोंडदेव यांची नेमणुक केली होती" हे खरे आहे पण नेमणुक केली होती ती सेवक म्हणून गुरु किंवा शिक्षक म्हणून नव्हे. शहाजी राजांनी शिवाजी महाराजांबरोबर काही नोकर दिले होते. शहाजी राजांच्या पुणे परीसरातील काही मुकाशांचा कारभार त्यांच्या वतीने दादोजी कोंडदेव पाहत असे. दादोजी कोंडदेव शहाजीराजांचा खाजगी नोकर होता. तो पुणे परगण्याच्या पाटस विभागातील मलठण गावचा कुलकर्णीही होता. काही इतिहासकार म्हणतात की दादोजी कोंढाण्याचा सुभेदार होता. परंतु कोंढाणा परीसरातील शहाजीराजांच्या मुलखाचा कारभार पाहण्यासाठी शहाजीराजांनी त्याची मुतालिक म्हणुन नेमणुक केली होती. अर्थात तो "अदिलशहाचा अधिकारी नव्हता तर शहाजीराजांचा नोकर होता. १६४१-४२ मध्ये शिवाजीराजे पुण्याला येण्यापुर्वी तो शहाजीराजांच्या आज्ञा पाळीत असे." शिवाजीराजे पुण्याला आल्यानंतर तो शिवाजीराजे आणि जिजाऊमाता यांच्या आज्ञा पाळीत असे.
आत्तापर्यंतच्या बर्याच उत्तरकालीन बखरकारांनी व काही तथाकथित इतिहासकारांनी दादोजीला शिवाजी महाराजांचा बालपणीचा गुरु करून शिवरायांच्या स्वराज्यस्थापनेच्या प्राथमिक कार्याचे श्रेय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही इतिहासकारांनी शिवरायांना शस्त्रास्त्राचे शिक्षण दादोजी कोंडदेव याने दिल्याचे लिहिले आहे. यावरूनच प्रेरणा घेऊन महाराष्ट्र शासनाने उत्क्रुष्ट क्रिडा प्रशिक्षकासाठी "दादोजी कोंडदेव पुरस्कार" देखील सुरु केला होता व "दादोजी कोंडदेव स्टेडीयम" या नावाने मोठे स्टेडीयम ठाणे येथे तयार केले.
दादोजी ने शिवरायांना कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण दिल्याचा किंवा स्वराज्य कार्यास प्रेरणा दिल्याचा अथवा मदत केल्याचा एकही उल्लेख समकालीन साधनांमध्ये नाही. शहाजी राजेंच्या पदरी असलेल्या जयराम पिंडे लिखित राधामाधवविलासचंपु, कविंद्र परमानंदाचे शिवभारत, जेधे शकावली या सर्वात विश्वसनीय समजल्या जाणार्या समकालीन साधनांमध्ये दादोजी कोंडदेव चा उल्लेखच नाही. स्वराज्यकार्यात लहानमोठे योगदान दिलेल्या अनेक व्यक्तींचे उल्लेख या ग्रंथांमध्ये असताना दादोजी कोंडदेवचा उल्लेख नसणे ही गोष्ट शिवाजी महाराजांच्या स्वराज्य कार्यातील व जीवनातील दादोजीचे गौण स्थान दर्शवते. विश्वसनीय साधनांमधील सभासदाच्या बखरीतदेखील दादोजीने शिवरायांना शिक्षण दिल्याचे उल्लेख नाहीत. सभासद लिहितो, "शाहजीराजे कर्नाटक प्रांती बेंगरुळ येथे होते. शाहजीराजे यांसी दौलतीमध्ये पुणे परगाणा होता. तेथे दादोजी कोंडदेव शहाणा चौकस ठेविला होता. तो बेंगरुळास महाराजांच्या भेटीस गेला त्याचबरोबर राजश्री शिवाजीराजे व जिजाबाईआऊ ऐशी गेली. त्यासमयी राजियास वर्षे बारा होती. बराबर शामराव निळकंठ म्हणून पेशवे करून दिले व बाळक्रुष्णपंत व नारोपंत दीक्षितांचे चुलतभाऊ मुजुमदार दिले.व सोनाजीपंत डबीर व रघुनाथ बल्लाळ सबनीस ऐसे देऊन दादोजीपंतास व राजे राजे यांसी पुण्यास रवाना केले. ते पुण्यास आले. येताच बारा मावळे काबीज केली. मावळे देशमुख बांधून, दस्त करून पुंड होते त्यास मारीले. त्यावर कालवशात दादोजी कोंडदेव म्रुत्यु पावले. पुढे शिवाजीराजे आपणच कारभार करीत चालले. "अर्थात इतर नोकर-चाकरांप्रमाणे दादोजी कोंडदेव हा नोकरच होता यात तीळमात्र शंका असण्याचे कारण नाही.
पेशवेकालीन बखरीमध्ये दादोजी कोंडदेव चे उदात्तीकरण करण्यात आले आहे. पेशवाईच्या उत्तर काळात स्वराज्य स्थापनेचे श्रेय जातीनिशी लाटण्यासाठी दादु कोंडदेव ला शिवरायांच्या गुरुपदावर आरुढ करण्याचं कार्य सुरु झालं. याच काळात लिहिल्या गेलेल्या शिवदिग्विजय, चिटणीस बखर यांसारख्या बखरीमधुन दादु कोंडदेव हा शिवरायांचा गुरु असल्याचा खोटा इतिहास रचण्यात आला. या बखरींबद्दल इतिहास संशोधक सेतू माधवराव पगडी म्हणतात - मराठा साधनांपैकी एक्क्याण्णव कलमी बखर काय किंवा चिटणीस बखर काय, उत्तर पेशवाईतील असल्यामुळे भारूडांनी भरल्या आहेत. अशा बखरींमध्ये आलेला इतिहास हा आजपर्यंत होऊन गेलेल्या इतिहासकारांनी नाकारलेला आहे. सभासद बखरीचे संपादक दत्ता भगत म्हणतात, "उत्तरकालीन बखरकारांनी शिवाजी महाराजांच्या जडणघडणीत दादोजी कोंडदेवाचे गुरु म्हणून चित्रण करताना दादोजीला अवास्तव महत्व दिले आहे, ते या (सभासद) बखरीत नाही. शिवाजी महाराजांना दादोजीबद्दल आदर असणार पण यांचे संबंध मालक/सेवक (चाकर) आहेत हे सभासदाच्या लक्षात आहे. " प्रसिद्ध विचारवंत, प्राच्च्यविद्या संशोधक व संस्क्रुतचे गाढे अभ्यासक डॉ.आ.ह.साळूंखे यांनी परमानंदाच्या शिवभारतावर आधारित "शिवराय : संस्कार आणि शिक्षण" नावाचा एक ग्रंथ लिहिला आहे त्यात प्रुष्ठ क्र.३८ वर ते लिहितात "महाराष्ट्रात आढळणार्या दंतकथांमधील तथाकथित गुरुंचा उल्लेखही नाही. शहाजी राजे आणि जिजाऊ यांच्या स्वत:च्या क्षमता, त्यांनी शिवरायांवर केलेले संस्कार स्वत: आणि विविध शिक्षकांमार्फ़त त्यांची करून घेतलेली तयारी या सर्वांचे परमानंदाने जे अत्यंत सविस्तर वर्णन केलेले आहे यातुन एक गोष्ट लक्षात येते की दंतकथामधील कोणत्याही गुरुचा साधा उल्लेखही परमानंदाने संपुर्ण ग्रंथात कुठेही केलेला नाही." इतिहास संशोधक वा.सी.बेंद्रे यांनीही असे म्हंटले आहे की, "शिवाजी-जिजाई यांना दादोजी कोंडदेवाबरोबर पाठविले ही एक काल्पनिक माहीती आहे. अर्थात ती चुकीची आहे."
वा.सी.बेंद्रे यांनी इ.स.१६४४ मध्ये मुहम्मद अदिलशहाने दादोजी कोंडदेवाचा एक हात कापल्याचे नमुद केले आहे. रा.व्य.जोशी देखील यांनी देखील आपल्या "परकियांच्या द्रुष्टीतून शिवाजी" या पुस्तकात "मुघल दरबारच्या एका कागदामध्ये दादोजीचा एक हात अदिलशाहने तोडल्याची बातमी आहे." असे लिहिले आहे.यावरून इ.स.१६४४ पासून त्याच्या म्रुत्युपर्यंत म्हणजेच इ.स.१६४७ पर्यंत दादोजीला एकच हात आहे. दादोजी शस्त्रकौश्यल्यासाठी प्रसिद्ध असल्याची समकालीन साधनांमध्ये एकही नोंद नाही. त्यातही एक हात तुटलेल्या अवस्थेमध्ये दादोजीने शिवरायांना शस्त्रास्त्र चालविण्याचे प्रशिक्षण देणे अशक्यप्राय गोष्ट आहे.
गो.ग.सरदेसाई यांच्यासारख्या बरेच इतिहासकार शिवरायांच्या सुरुवातीच्या काळातील किल्ले जिंकणे व स्वराज्य स्थापनेचे श्रेय दादोजी कोंडदेव ला देतात. सरदेसाईंचे असे मत होते की, "इ.स.१६४४ मध्ये कोंडाणा प्रांत व किल्ला दादोजीने हस्तगत केला तसेच दादोजीच्या मदतीने शिवाजीने तोरणा, रायगड, सिंहगड इत्यादी किल्ले घेतले. या गॊष्टीसाठी ते विजपुरहून सुटलेल्या फ़र्मानाचा दाखला देतात". पण ज्या फ़र्मानाचा ते उल्लेख करतात त्या फ़र्मानाचा आणि दादोजीने किल्ले घेतण्याचा संबंधच नाही. शाहजीवर अदिलशहाने बंडखोरीचा आरोप केला त्यासंदर्भात ते फ़र्मान आहे. फ़र्मान १ ऑगस्ट १६४४ चे असून कान्होजी जेधे याला उद्देशून आहे. सेतु माधवराव पगडी म्हणतात की, "सत्य हे आहे की, दादोजीच्या म्रुत्युनंतरच शिवाजीने किल्ले घेऊन स्वराज्यस्थापनेला सुरुवात केली". श्री ग.ह.खरे म्हणतात, "जेधे करीण्यात राजगडाविषयी माहीती आली आहे, ती कालप्रसंग अचुक असेल तर दादोजी चा म्रुत्यु झाल्यावरच शिवाजीने तोरणासह हा किल्ला जिर्णोद्धार करण्याचे काम चालविले होते असे ठरते". सभासद बखरीत देखील असाच उल्लेख आहे, "दादोजी कोंडदेवच्या म्रुत्युनंतरच शिवाजीराजांनी किल्ले जिंकण्यास सुरुवात केली". सेतु माधवराव पगडी म्हणतात, "महाराजांच्या स्वराज्यस्थापनेचा उपक्रम काही इतिहासकार इ.स.१६४४ पर्यंत मागे नेतात. पण त्याला आधार नाही. स्वराज्यस्थापनेच्या उपक्रमाची सुरुवात दादोजी कोंडदेवाच्या म्रुत्युनंतरच झाली आहे". यामुळे शिवरायांच्या स्वराज्यस्थापनेच्या कार्यात दादोजीचा काडीमात्र संबंध नसल्याचे निदर्शनास येते.
राष्ट्रपिता महात्मा फ़ुले शिवाजीमहाराजांच्या पोवाड्यात दादोजी व शिवाजीराजे यांच्या संबंधाविषयी वर्णन करतात. मासा पाणी खेळे गुरु कोण असे त्याचा । पोवाडा गातो शिवाजीचा ॥. शिवछत्रपतींचे कर्तृत्व हे त्यांचे स्वतः चे होते, त्याचे श्रेय दादोजीला द्यायला ज्योतिबा तयार नव्हते. या पोवाड्यातून महात्मा फ़ुलेंनी दादोजी हा शिवरायांचे गुरु नसल्याचेच प्रतिपादन केले आहे. कोल्हापूरचे इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांनीही "उपलब्ध ऐतिहासिक दस्ता-ऐवजांवरून असे दिसते की कुठलाही पुरावा नसतांना दादोजी कोडदेव ह्यांना काही इतिहासकारांनी गुरु असल्याचे जाणीव पूर्वक घुसविले आहे" असे म्हणुन वरील सर्व मतांना पुष्टी दिलेली आहे.
सर्व प्रख्यात विचारवंत आणि इतिहास संशोधकांनी दादू कोंडदेवचे गुरुत्व नाकारणे तसेच शिवरायांच्या समकालीन साधनांमध्ये दादू कोंडदेवचा साधा उल्लेखही नसने या दाव्यावरून हेच लक्षात येते की दादोजी कोंडदेव शिवरायांचा गुरु किंवा शिक्षक नव्हता. तसेच दादोजी कोंडदेव यांचा शिवाजी महाराजांच्या स्वराज्यस्थापनेशी दुरान्वयानेही संबंध नाही हे सुर्यप्रकाशाएवढे स्वच्छ आहे. समकालीन ग्रंथामध्ये दादोजी कोंडदेव चे नाव देखील नसताना, दादोजी कोंडदेव शिवरायांचा गुरु असण्यासंबंधीचा एकही ऐतिहासिक पुरावा नसताना दादोजी कोंडदेव शिवरायांचा गुरु म्हणुन सांबोधणारे आधुनिक इतिहासकार दादोजी शाहजीराजांचा नोकर होता ही गोष्ट कसे काय विसरले हेही एक आश्चर्य आहे. तसेच जिजाऊमातांच्या देखरेखीखाली प्रशिक्षित होऊन शिवरायांनी स्वयंप्रयत्नाने आणि मात्रुप्रेरणेने स्वराज्य स्थापन केले. या स्वराज्यासाठी शुर मावळ्यांनी स्वत:चे रक्त सांडले. अशा या शुर मावळ्यांनी रक्त सांडून स्थापन केलेल्या शिवरायांच्या स्वराज्यस्थापनेच्या अद्वितीय पराक्रमाचे श्रेय शाहजीराजांचा एका नोकर असलेल्या दादोजी कोंडदेवला देणे हे अनाकलनीय तथा चुकीचे आहे तसेच इतिहासाशी अप्रामाणिकता दर्शवणारे आहे.
जय शिवराय जयोस्तु स्वराज्य
संदर्भ :
छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचिकित्सक चरित्र,(पुर्वार्ध) प्रथमाव्रुत्ती १ मे १९७२. [वा.सी.बेंद्रे].
परकियांच्या द्रुष्टीतून शिवाजी [रा.व्य.जोशी].
शिवराय : संस्कार आणि शिक्षण (पृष्ट क्र. ३८) [डॉ.आ.ह.साळूंखे]
श्री राजा शिवछत्रपती,खंड १ भाग १,पूर्वोक्त (पृष्ट क्र.६०५ व ६०९ वरील तळटिप क्र ५४)[गजानन भास्कर मेहंदळे].
सभासद बखर (संपादक-दत्ता भगत).
स्वराज्यातील तीन दुर्ग [श्री ग.ह.खरे].
शिवचरित्र एक अभ्यास [सेतु माधवराव पगडी].
शिवरायांचे प्रेरणास्त्रोत आणि खरे स्वराज्यद्रोही [चंद्रशेखर शिखरे].
महात्मा फ़ुलेंक्रुत शिवाजींचा पोवाडा [महात्मा फ़ुले समग्र वाङमय,महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्क्रुती मंडळ,आव्रुत्ती ५ वी].
मराठी व्रुत्तपत्रे ("लोकसत्ता" ,लेख : "दादोजी,शिवाजी महाराज आणि सत्य" राजा पिंपरखेडकर लिखीत मध्ये ३१ ऑगस्ट २०१४ )