20 January 2014

प्राचीन समाज व्यवस्था,संत साहित्य व भारतीय राज्य घटना [१]

        तज्ञांच्या मते अंदाजे दोनशे कोटी वर्षापुर्वी प्रुथ्वीची निर्मिती झाली.डार्विनच्या उत्क्रांती सिद्धांतानुसार अंदाजे दोन कॊटी वर्षापुर्वी प्रथम जीव जन्माला आला.अंदाजे वीस लक्ष वर्षापुर्वी मानव प्राणी आस्तित्वात आला.प्रुथ्वीच्या निर्मीती पासून आज अखेरचा काळ चार युगांमध्ये विभागला आहे.[१] सत्ययुग/क्रुतयुग-४,३२ लक्षवर्ष,[२] त्रेतायुग-३,३२ लक्षवर्ष.[३] द्वापारयुग-२,३२ लक्षवर्ष व [४] कलीयुग-१,३२ लक्षवर्ष.द्वापार युगारंभी वेदांची निर्मीती झाली.यामध्ये ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद प्रथम लिहिले गेले.कलीयुगारंभी अथर्ववेद लिहिला गेला.यामध्ये एक लक्ष ऋचा प्रुथ्वी निर्मीतीच्या व प्रार्थनेच्या म्हणजे देववर्णनांच्या आहेत.ऐंशी हजार ऋचा यज्ञासंबंधी व चार हजार ऋचा स्रुष्टी ज्ञानाच्या आहेत.सोळा हजार ऋचा भक्ति पर आहेत.त्याकाळी ब्रह्मा,विष्णू व महेश या देवता सर्व मान्य होत्या.नंतर अग्नी व गणेश यांची निर्मीती झाली.या सर्वांमध्ये समाज रचनेचा कोठेही उल्लेख नाही.
        अंदाजे पाच हजार वर्षापुर्वी मनू हा ऋषि होऊन गेला.तो अहंकारी,मुत्सद्दी,ज्ञानी व विद्याव्यासंगी होता.त्याने तत्कालिन परिस्थितीचा सर्वकश विचार करून समाज रचना कशी असावी याची सुसूत्र मांडणी केली.त्यास स्म्रुती असे म्हणतात.मनुस्म्रुती नुसार चार वर्ण असावेत.[१] ब्राह्मण [२] क्षत्रिय [३] वैश्य [४] शुद्र.नंतर कालांतराने निक्रुष्ठ दर्जाची स्वच्छता कामे करणारा शुद्रातिशुद्र वर्ग निर्मान झाला.लोक पुर्व कर्मानुसार पिढ्यानं पिढ्या तीचतीच कामे करू लागला.त्यामुळे ब्राह्मण वर्गाने लेखन,वाचन व मार्गदर्शन केले.क्षत्रियांनी संरक्षण केले.वैश्यांनी व्यापार व उत्पादन केले.शुद्रानी सेवेची कामे केली.अतिशुद्रानी सर्वांच्या स्वच्छतेची निक्रुष्ट कामे केली.
        मनुविचारानुसार माणसाच्या आयुष्याचे चार विभाग झाले.[१]ब्रह्मचर्याश्रम [२] ग्रुहस्थाश्रम [३] वानप्रस्थाश्रम व [४] संन्यासाश्रम,ही व्यवस्था फ़क्त पहिल्या दोन वर्गांना म्हणजे फ़क्त ब्राह्मण व क्षत्रियांना लागू होती.पुढे सत्तासंघर्षामध्ये परशुरामाने एकवीसवेळा प्रुथ्वी नि:क्षत्रिय केली.त्यामुळे समाजात फ़क्त दोनच वर्ण शिल्लक राहिले ते म्हणजे ब्राह्मण व शुद्र त्यामुळे समाजाचे सर्व अधिकार ब्राह्मणांना मिळाले.इतर फ़क्त सांगकामे झाले.ब्राह्मण म्हणतील व सांगतील तोच कायदा व नियम झाला.मनुने  सर्वांचे अधिकार नष्ट केले.स्त्रिया व शुद्रांना कसलेही अधिकार नाहीत.सेवेतच त्यांचे जन्म,जीवन व म्रुत्यू झाले." करा व मरा" हा एकमेव शिक्का त्यांचे कपाळी मारला गेला.तो अंदाजे अकराव्या शतकांपर्यंत.सर्वाधिकार ब्राह्मणांना आहेत.उदा.मनुस्म्रुतीमधील पुढील धर्मादेश पहा.
[१] य:कश्चित्फ़चितधर्मो मनुना परिकीर्तित:।स सर्वो:मिहितो वेदे सर्वज्ञानमयो हि स:॥ (मनुस्म्रुती २/८)
अर्थ : मनुने जे काही सांगितले आहे ते वेद मुलक आहे.मनुस सर्व वेदांचे ज्ञान आहे.कारण मनु स्वयं वेदमुर्ती आहे.
[२] श्रुति स्तु वेदो विज्ञेयो धर्म शास्त्रं तु वै स्म्रुती । ते सर्वाथैष्व मिमांस्थे तांभ्यांम्र धर्मो ही निळैभौ ॥ (मनुस्म्रुती २/१०)
अर्थ : श्रुती म्हणजे वेद व स्म्रुती म्हणजे धर्मशास्त्र.या श्रुती व स्म्रुती विरुद्ध तर्क करून भांडन करू नये.ते चिकित्सेचे विषय नाहीत कारण त्यांच्या पासुनच धर्म तयार झाला आहे.
[३] यो:वमण्येत ते मुल्येहेतुशास्त्राश्रयादद्विज: । ससाधुर्भिषहिष्कार्यो नास्तिको वेद निन्दक ॥ (मनुस्म्रुती २/११)
अर्थ : जो कुतर्काच्या आधारे धर्माचे मुळ श्रुति व स्म्रुतीला प्रमाण न मानता निंदा/चेष्टा करेल तो निंदक म्हणजे पापी होय.तो साधू लोकां (शिष्ट) कडून बहिष्क्रुत केला जावा.
[४] निषेकादिश्मशानान्तो मन्म्रर्यस्योदितो विधी: । तस्य शास्त्रे:धिकारो:स्मिम्झोयो नान्यस्य कस्यचित ॥ (मनुस्म्रुती २/१६)
अर्थ : धर्मशास्त्र श्रुती व स्म्रुती मधील गर्भादान ते अन्त्येष्ठिचे अधिकार / संस्कार फ़क्त ब्राह्मणांना आहेत.अन्य स्त्री शुद्रादिशुद्रांना नाहीत.हे सनातन धर्माचे कटू सत्य आहे.
[५] न शुद्राय मति दद्यान्नोच्छिष्टं न हविष्क्रूतम । न चास्योपदिशेध्दर्म न चास्त्र व्रतमादिषेत ॥ ८० ॥
      यो हयस्य धर्ममाचष्टे यश्चैषादिशति व्रतम । सो संव्रुतं नाम तम: सहतेनैव मज्जति ॥ ८१ ॥
अर्थ : शुद्रास मति (ज्ञान) देऊ नये.कोणताही धर्मोपदेश करू नये.कोणतेही व्रत सांगु नये.जो धर्म सांगतो तो शुद्रासह नरकात बुडतो.(मनुस्म्रुती अ. १०/१२३),१/९१,९/१८,१०/२५,१०/२६.इ.मध्ये असे अनेक श्लोक आहेत की ज्यामध्ये शुद्रांनी फ़क्त ब्राह्मणांची सेवा करावी.लिहु,वाचू नये,अन्यथा ते नरकात जातात.शुद्रांनी फ़क्त उष्टे अन्न खावे.उपास - तपास करू नये.स्त्री शुद्रांना धर्माधिकार नाहीत.विप्राने शुद्राकडून सेवा करून घ्यावी.त्या बदल्यात त्यांना टाकाऊ अन्न व फ़ाटकी वस्त्रे द्यावीत.शुद्रांनी विनातक्रार (अनसुया) तिन्ही वर्गाची सेवा करावी."जरी ब्राह्मण झाला भ्रष्ट तरी तो मानावा श्रेष्ठ","न स्त्री स्वातंत्र्यंअर्हति",ही वेदवाक्य झाली.
यामुळे ब्राह्मणांचे वर्चस्व वाढले.स्त्रीशुद्रादी नगन्य झाले.कसेतरी जगणे त्यांच्या नशिबी आले.परिणामत: शुद्र खचले. स्वातंत्र्य,समानता,बंधुता,संधी,धर्म इ. सर्व हद्दपार झाले.ते अकराव्या शतकापर्यंत.
सन १२७५ मध्ये सर्व स्वातंत्र्य,सदविचार,इ.चे पुनरुज्जिवन झाले.त्याची सुरुवात निव्रुत्तीनाथांपासून झाली.बाराव्या शतकापासून सतराव्या शतकापर्यंत निव्रुत्ती महाराज ,ज्ञानदेव महाराज,सोपान,मुक्ताबाई, नामदेव महाराज, एकनाथ महाराज, तुकाराम महाराज आदी संत झाले. त्यांची विद्या,स्वातंत्र्य, बंधुत्व,लेखण,वाचण,भाषण,प्रवचन,भक्ति,समानता इ.ची कवाडे सर्वांना खुली केली.महाराष्ट्रात नवयुग आले.सुर्योदय झाला.मनुनिर्मित अंध:कार नष्ट झाला.सर्वोदय झाला.
महाराष्ट्रात सोलापुर जिल्ह्यात मंगळवेढे आहे.तेथे बाराव्या शतकात बिज्जल नावाचा राजा राज्य करत होता.त्याचे प्रधान बसवेश्वर(११०५ ते ११६५) होते.बसवेश्वरांनी सर्वधर्म परिषद(११५०) बोलाविली."अनुभव मंटप" संस्था सुरु केली.सर्वधर्मसमभाव निर्माण केला.त्यामध्ये काश्मिर ते कन्याकुमारी येथील प्रतिनिधी उपस्थित होते.त्यामध्ये सर्व संतांनी भाग घेतला.त्यांनी शिवधर्माचे सर्व भारतभर प्रसार व प्रचार कार्य केले."अनुभव मंटप" चे सभापती होते संत अल्लमप्रभू ! बसवेश्वर प्रवर्तक होते.त्यामध्ये धानम्मा (जत), अक्कमहादेवी, शिवलिंगव्वा, निलांबिका, लिंगम्मा,लकम्मा,वीरम्मा, सांतव्वा, काळव्वा, कल्याणम्मा आदि स्त्रिया संत होत्या. बसवेश्वर, चन्नबसवेश्वर, सिद्धरामेश्वर(सोलापुर), कक्कय्या(कैकाडी), बोमय्या(ढोर), कन्नया(सोनार), हरळय्या(चांभार), मधुवय्या(चांभार), चन्नय्या(मांग), माचय्या(धोबी), अप्पण्णा(न्हावी) आदि संत होते.या संतांचा कर्नाटकात अति मोठ्या प्रमाणात प्रसार झाला.
ज्ञानदेवांनी भागवत धर्मांचा/परंपरेचा पाया घातला.सातशे श्लोकांच्या गीतेचे मराठीत तत्वज्ञान आणले.यात सोपान मुक्ताई सामील झाले.नामदेवांनी त्याचा विस्तार केला.भारत भ्रमण करून पंजाबी/गुरुमुखी व हिंदी मध्ये अभंग रचना केली.त्यामध्ये सर्व धर्मियांना/जातींना सामावून घेतले. गोरोबा(कुंभार), चोखामेळा.बंका, सोयरा (सर्व महार), सावता (माळी), जनाबाई(दासी),  कान्होपात्रा आदिंना स्थाने दिली. लेखन, वाचन, भजन, पुजन इ.अधिकार दिले.संत तुकोबारायांनी ४५८३ अभंग रचना केली.या संतांनी अंगिकारलेली तत्वे व त्यांचे अभंग पुढील प्रमाणे आहेत.
[१] मनुचे तेहतीस कोटी देव नाकारले व एकच देव मानला.पंढरीचा "विठठल" हे एकमेव दैवत व त्याचे दर्शन म्हणजे सर्वाच्च सुख होय.
सकळ कुळांचा तारकु / तोचि जाणावा पुण्यश्लोकु । पांडुरंगी रंगलानिशंकु । धन्य जन्म तयाचा ॥ - संत ज्ञानेश्वर महाराज
सर्व सुखांचे आगरू । बापरुखत्मादेविवरू ॥ - संत ज्ञानेश्वर महाराज 
विठठल विठठल मंत्र हेचि निजशास्त्र । विचारिता सर्वत्र दुजे नाही ॥ - संत निव्रुत्तीनाथ
नको तु करी सायास । धरी पा विश्वास ॥ एका जनार्दनास डोळा । पाहि ॥ - संत एकनाथ महाराज
बळीया माझा पंढरीराव । जो या देवांचाही देव ॥ - संत तुकाराम महाराज
भागवत धर्मासच वारकरी संप्रदाय म्हणतात.विष्णुभक्तांना वैष्णव म्हणतात.वारकरी संप्रदायात दीक्षा-भिक्षा याचे अवडंबर नाही.

16 January 2014

मराठा सेवा संघ बदलतो आहे?

             सिंदखेडराजाला १२ जानेवारीला होणारा मराठा सेवा संघाचा जिजाऊ महोत्सव. या सार्‍या उत्सवांना लाखोंची गर्दी असते. हे उत्सव आयोजित करणार्‍या संस्था, संघटना या महाराष्ट्राचे राजकारण व समाजकारणावर निर्णायक प्रभाव टाकणार्‍या असल्याने स्वाभाविकच या उत्सवांमध्ये कुठले निर्णय होतात, कार्यकर्त्यांना कुठली दिशा दिली जाते, याकडे राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसोबतच माध्यमांचंही बारकाईने लक्ष असतं.
महाराष्ट्रात काही संस्था-संघटनांच्या वार्षिक उत्सवांचं एक वेगळं महत्त्व आहे. दसर्‍याच्या दिवशी नागपुरात दीक्षाभूमीवर आयोजित होणारा धम्मचक्र परिवर्तन दिन, त्याचदिवशी रेशीमबागमध्ये होणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव, तिकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवरील शिवसेनेचा दसरा उत्सव आणि
         या संघटनांमध्ये मराठा सेवा संघ ही तुलनेने नवी संघटना. मात्र केवळ २४ वर्षांच्या कालावधीत या संघटनेने सार्‍याच क्षेत्रातील दिग्गजांना दखल घेणे भाग पडावे, असे आपले वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण केले आहे. त्यामुळेच जिजाऊ महोत्सवात काय निर्णय होतात, याबाबत सार्‍यांनाच उत्सुकता असते. मराठा सेवा संघाबद्दल त्यांचे टीकाकार, विश्लेषक काहीही म्हणो, मात्र महाराष्ट्राच्या समाजजीवनात त्यांनी घडविलेले काही बदल कोणालाच नाकारता येणार नाही. मराठा सेवा संघाचं सर्वात मोठं कुठलं योगदान असेल, तर हजारो वर्षे चुकीच्या रूढी-परंपरा आणि कर्मकांडांचा जबरदस्त पगडा असलेल्या बहुजन समाजाला त्यांनी खडबडून जागं केलं. इतिहासाचं जाणीवपूर्वक केलेलं विकृतीकरण या समाजाच्या लक्षात आणून देताना त्यांना त्यांच्या सत्त्वाची जाण सेवा संघाने करून दिली. असं म्हटलं जातं की, पोथी वाचणार्‍या समाजाला सेवा संघानं पुस्तकं वाचायला शिकविली. ते खरंच आहे. धार्मिक पोथी, पुराणांशिवाय काही न वाचणार्‍या समाजाला सेवा संघानं फुले, आंबेडकर वाचायला लावले. हे परिवर्तन खूप मोठं आहे. सामाजिक समरसता वगैरे अशा भंपक गोष्टी न करता एका समाजाची मानसिकता बदलविण्याचं मोठं काम सेवा संघानं केलं आहे. एका मोठय़ा समूहाला आत्मभान देणारं हे परिवर्तन आहे. हा असा बदल घडवायला शेकडो वर्षे जातात. 
         मात्र २५ वर्षांपेक्षा कमी कालावधीत सेवा संघाने हे काम केलं. दुसरं महत्त्वाचं कुठलं काम सेवा संघानं केलं असेल, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सनातन संस्था अशा जातीयवादी आणि समाजात द्वेषाची पेरणी करणार्‍या संघटनांविरुद्ध ताकदीने शड्ड ठोकला. सरकार नावाची यंत्रणा आणि इतर पुरोगामी संघटना या संस्थांचा मुकाबला करताना सपशेल अयशस्वी ठरत असताना सेवा संघाने वैचारिक मार्गाने आणि वेळप्रसंगी मैदानातही या संघटनांना जबरदस्त आव्हान दिले. बहुजन समाजाचं ब्राह्मणीकरण करायला निघालेल्या या संघटनांच्या कारवायांना सेवा संघाने बर्‍यापैकी चाप लावला हे कबूल करावंच लागतं. पुरोगामी विचारसरणीचा पुरस्कार करणारा एक जबरदस्त दबाव गट सेवा संघाच्या निमित्ताने महाराष्ट्रात तयार झाला. हे परिवर्तन करताना मराठा सेवा संघालाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारखाच द्वेषाचा मार्ग पत्करावा लागला. ब्राह्मण समाजाला टार्गेट करून इतर जातीयवादी संघटनांप्रमाणेच स्वतंत्र विचार न करू शकणारी पिढी सेवा संघाने तयार केली, असा आरोप त्यांच्यावर होतो. या आरोपात काही अंशी तथ्यांश निश्‍चित आहे. सेवा संघाच्या प्रारंभीच्या काळात आणि अगदी आताआतापर्यंतही देशातील प्रत्येक समस्येला ब्राह्मण जबाबदार आहेत, अशी मांडणी सेवा संघाकडून होत होती. कुठलाही अपवाद न करता सरसकट सर्व ब्राह्मणांना सेवा संघाचे नेते आडव्या हाताने घेत होते. ब्राह्मणांनी निर्माण केलेल्या सर्व प्रथा, परंपरा मोडित काढल्या पाहिजेत, आर्यांनी (ब्राह्मणांनी) या देशावर आक्रमण केल्यानंतर येथील समाजाला गुलाम केल्यानंतर ज्या-ज्या गोष्टी लादल्या, त्या सार्‍या नाकारायचा चंग सेवा संघानं बांधला. त्यातून मग गुलामगिरीची सारी प्रतीकं झिडकारून लावायचे आवाहनही सेवा संघाच्या विचारपीठावरून करण्यात येत असे. 
         अगदी आताआतापर्यंत महिलांनी मंगळसूत्र घालू नये, कुंकू लावू नये, बांगड्या घालू नये, असे ठासून सांगणारे काही वक्ते जिजाऊ महोत्सवात असायचे. हिंदू धर्मातील बहुसंख्य ज्यांना देव म्हणून भक्तिभावानं पूजतात, ते आपले देव असू शकत नाही, असेही सांगितले जात असे. हा सर्व प्रचार सनातन व्यवस्थेविरुद्ध एल्गार पुकारण्यासाठी व्यूहरचना म्हणून कदाचित ठीक असेल, पण यातून सामान्य कार्यकर्त्यांच्या डोक्यात जबरदस्त गोंधळ तयार होत होता. तसंही देवाधर्माच्या विषयात हात टाकला की सॉलिड केमिकल लोचा निर्माण होतो, हा पुरोगामी संघटनांचा नेहमीचा अनुभव आहे. मराठा सेवा संघही सध्या या अवस्थेतून जात आहे. त्यामुळेच परवाच्या जिजाऊ महोत्सवात डॉ. आ. ह. साळुंखे यांनी सुधारित शिवधर्मगाथेबद्दल माहिती देताना मानवी स्वातंत्र्यांचा आदर करण्याचे आवाहन करताना महिलांनी मंगळसूत्र घालावे की नाही, कुंकू लावावे की नाही, बांगड्या घालाव्या की घालू नये, हा त्यांचा अधिकार आहे. या विषयात जबरदस्ती करता येणार नाही, अशी भाषा वापरली तेव्हा सेवा संघाचे अनेक कार्यकर्ते चमकले. सेवा संघ बदलत तर नाही ना, अशी भावना त्यांच्या मनात निर्माण झाली. जिजाऊ महोत्सवाचे अनेक वर्षांपासून वार्तांकन करणार्‍या वार्ताहरांनाही सेवा संघ बदलतो आहे, काहीसा सौम्य होत आहे, हे या वेळी जाणवले. कधी काळी क्रिकेट या खेळाची तीन लाकडं आणि अकरा माकडं अशा वाक्यात संभावना करणारा सेवा संघ आता एका क्रिकेटपटूला मराठा विश्‍वभूषण पुरस्कार देतो, ही विसंगतीही अनेकांना खटकली. अर्थात, रेखाताई खेडेकरांनी भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढविण्यासारख्या अनेक विसंगती सेवा संघाच्या प्रवासात दाखविता येतात. मात्र सेवा संघाच्या विचारपीठावर आणि कोअर मीटिंगमध्ये त्यावर वेळोवेळी मोकळेपणाने चर्चाही होते. या लेखाचा तो विषय नाही. सेवा संघ बदलतो आहे का, हा मुद्दा आहे. या विषयात सेवा संघाच्या जडणघडणीत सुरुवातीपासून सहभागी असलेल्या काही जणांसोबत चर्चा केली असता त्यांनी सेवा संघ निश्‍चितपणे बदलत आहे, हे मान्य केले. मात्र हे बदल वैज्ञानिक बदल असून संघटनेला निकोप वाढीकडे नेणारे बदल असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ब्राह्मण समाजाबद्दलचा आक्रमक प्रचार आणि प्रतीक नाकारण्याबाबतचा टोकाचा अट्टाहास याबाबत सेवा संघामध्ये प्रारंभापासूनच दोन मतप्रवाह होते. 
         एक गट इतिहासाचं विकृतीकरण ज्यांनी केलं, ज्यांनी वर्णव्यवस्था, जातिव्यवस्था निर्माण करून बहुजन समाजाला हजारो वर्षे गुलामगिरीत ठेवलं त्यांच्याबद्दल आक्रमकतेनेच बोललं पाहिजे, लिहिलं पाहिजे आणि त्यांनी निर्माण केलेली सारी प्रतीकं उखडून फेकली पाहिजे, नाकारली पाहिजे, या मताचा होता. दुसरा गट मात्र हजारो वर्षांच्या माथी मारलेल्या का होईना परंपरा, प्रतीकं काही दिवसात मोडीत काढता येत नसतात. तसेही माणसं जबरदस्तीने बदलत नसतात. त्यामुळे वैयक्तिक आचरणाबाबत कुठलेही फतवे काढू नयेत. माणसं तयार झालीत की त्यांचे अपसमज आपोआप मोडित निघतात. त्यामुळे टोकाचा विचार न करता चळवळ निकोप आणि सशक्त केली पाहिजे, या मताचा होता. कोणं कोणत्या जातीत जन्माला यावं हे कोणाच्याच हाती नसतं. त्यामुळे ठरावीक समाजाबद्दल न बोलता प्रवृत्तीला विरोध असला पाहिजे, असेही हा गट आग्रहाने सांगत होता. शेवटी डॉ. आ. ह. साळुंखेंसारख्या ज्यांचा इतिहास, धर्म, संस्कृती, समाजशास्त्राबद्दल प्रचंड अभ्यास आहे, त्यांना भूमिका ठरविण्याचे अधिकार देण्यात आले. डॉ. साळुंखे यांचा लौकिक हा अतिशय संतुलित व निकोप विचार करणारा विचारवंत असा आहे. त्यांनी शिवधर्मगाथेतील बदलाबाबत सांगताना, 'लढाई ही ईश्‍वराच्या अस्तित्वाबद्दल कधीच नव्हती. संघर्ष हा शोषणाविरोधातला आहे. त्याविरोधात ठामपणे उभं राहून समतेची शिकवण देणं हाच शिवधर्माचा गाभा आहे,' असे सांगितले. हे त्यांचं सांगणं समजून घेण्याजोगं आहे. 
            विवेकवाद आणि विवेकाचा आधार हीच सुजाण म्हणविणार्‍या सर्वांची जगण्याची पद्धत असली पाहिजे. त्यातही परिवर्तनाच्या चळवळीत काम करणार्‍या माणसांनी चळवळीच्या वाढीसाठी आवश्यक ते बदल स्वीकारले पाहिजे. बदल हा शेवटी माणसाचा स्थायिभाव आहे आणि तसंही कट्टरता ती कोणाचीही असो, शेवटी ती नुकसानच करते. त्यामुळे रौप्यमहोत्सवी वर्षाकडे वाटचाल करताना एका व्यापक उद्देशाने मराठा सेवा संघात सकारात्मक बदल होत असेल, तर त्याचं स्वागतच करायला हवं. 

(लेखक दैनिक 'पुण्य नगरी'चे कार्यकारी संपादक आहेत.) भ्रमणध्वनी : ८८८८७४४७९६

23 December 2013

प्रतिशिवराय : नरवीर शिवाजी काशिद [भाग २]

शिवाजी काशिद यांची स्वराज्यनिष्ठा
फ़ाजलखान म्हणाला "अगर आपको जान चाहिए तो सच बताओ",तरीदेखील शिवाजी काशिद म्हणाले,"हॉं मै ही शिवाजी महाराज हूं".पण वर्मीच्या घावाचा व्रण दिसला पाहिजे अशी अफ़जलखानाच्या मुलाची तथा फ़ाजलखानाची पक्की खात्री होती.तो वर्मी घाव त्यांना दिसला नाही.कारण ते छ्त्रपती शिवाजी महाराज नव्हते.तर प्रतिशिवराय नरवीर शिवाजी काशिद होते.यामुळे सिद्धी जौहरला कळून चुकले की आपणास छत्रपती शिवाजी महाराजांनी चकवा दिला आहे.यावर शिवाजी महाराज म्हणजेच शिवाजी काशिद यांच्या जवळ संशयाच्या नजरेने न्याहाळत विचारले, तू छत्रपती शिवाजी  महाराज नाहिस तर कोण आहेस ? यावर शिवाजी काशिद हसत म्हणाले,मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा एक चाकर आहे,यावर सिद्धी म्हणाला हं.. कसलं स्वराज्य ? कसाला शिवाजी राजा ? जौहर संतापलेला होता.तो छद्मी स्वरात म्हणाला,मला दगाबाजी करून तुझा शिवाजी राजा माझ्या हातातून निसटला आहे.पण जाणार कुठे ? गाठ जौहरशी आहे ! पाताळातून शोधून काढीन’ शिवाजी काशिद जौहरकडे पाहून हसू लागले आणि म्हणाले,’आमचे राजे धनुष्यातून सुटलेल्या बाणाप्रमाणे  तुमच्या वेढ्यातून निसटले आहेत.आता हाती लागणे शक्य नाही.छातीचा कोट करून आमच्या राजाला जपणारे कितीएक तरी त्यांच्या सोबत आहेत.जीव देतील स्वत:च्या राजासाठी पण राजाला तुमच्यापासून राखून ठेवतील हाती लागू देणार नाहीत.
सिद्धी जौहर मोठमोठ्याने हसू लागला आणि शिवाजी काशिद यांच्याकडे पाहत म्हणाला, तुझा राजा नक्की सापडेल आणी सापडल्यावर मी त्याला काय शिक्षा देईन ठाऊक आहे काय ? जौहरने स्वत:चा हात गळ्याभोवती फ़िरवला आणि बोलला , समजलं ? शिरच्छेद करील त्याचा,आणि तू::::: त्याच्यानंतर तुझं देखील मुंडकं उडवीन मी ! म्हणजे आता जे बोलत होतास त्याबद्दल तुला पश्चाताप वाटेल.यावर शिवाजी काशिद यांना जौहरचे बोलणे आवडले नाही.त्यांचे डोळे रागाने लालेलाल झाले आणि जौहरच्या नजरेला नजर भिडवित शिवाजी काशिद ओरडले,खामोश! माझ्या राजाबद्दल एक शब्द जरी वावगा बोललास तर याद राख! वटवागूळ देखील रात्रीच घुत्कारतं, म्हणून ते कोणी कान देऊन ऐकत नाही,तुझं बोलणं तसलंच आहे.ते कशापायी ऐकायचं ? 
माझा शिवाजी राजा :: त्यांची सर  तुझ्यासारख्याला यायची नाही.तू पोटार्थी हबशी:: तुला शिवरायांचं मोठंपण काय समजणार ? आमचा राजा लाखमोलाचा आहे,पोशिंदा आहे.लाख मरोत पण माझा राजा जगो,असंच मी म्हणणार! हे सारं ऐकून सिद्धी जौहर गांगरला.थोड्याच वेळात स्वत:स सावरून म्हणाला,वैसाही होगा......मरने को हो तैयार..तेरे राजा के वास्ते तू मरेगा ? अब यहॉं इसी वक्त ? शिवाजी काशिद हसत म्हणाले, मरणाचे भय मला घालतोस ? मरणाचे भय तुझ्यासारख्यांना वाटावं, आम्हाला नाही.छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा स्वराज्याचा भगवा हाती घॆतला,त्याच वेळी या मर्द मराठा मावळ्याने छातीवर मरण गोंदवून घेतलं.स्वराज्यासाठी मरण कुठेही येवो,कसंही येवो::मरणाला भिऊन पळणारा हा शिवाजी काशिद नाही.मेला तरी स्वराज्यासाठी मरण:..! स्वराज्यासाठी जगणं आणि स्वराज्यासाठी मरणं..स्वराज्याचा चंग बांधला आहे आम्ही.तेंव्हा मरणाचं भय या गड्याला गालू नकोस समजलं ? जौहर पिसाळला शिवाजी काशिद यांचे बोलने त्याच्या जिव्हारी झोंबलं, छत्रपती शिवाजी महाराज हातून निसटल्याने तो बिथरला होता,शिवाजी काशिद हे देखील वस्तादों के वस्ताद होते.त्यांना ना मरणाचे भय, ना खेद, ना खंत यांचे बोलणे आणि विचार म्हणजे फ़क्त छत्रपती शिवाजी महाराज रयतेच्या स्वराज्याचे.
शिवाजी काशिद यांची स्वराज्यनिष्ठा पाहून सिद्धी जौहरने शिवाजी काशिद यांना ठार मारण्याचा आदेश दिला.तरी देखील शिवाजी काशिद हे ठाम होते.जौहरच्या सैनिकांनी शिवाजी काशिद यांच्या छातीत दोन भाले खुपसले.शिवाजी काशिद खाली कोसळले; शिवाजी काशिद यांच्या छातीतून भाले खुपसल्याने रक्त उडाले.खाली पडत असताना प्राण सोडण्यापुर्वी शिवाजी काशिद म्हणाले.’अरे वेड्यांनो! सोंग घेणार्या शिवाजीची पाठ पाहता आली नाही.खर्या शिवाजीराजांचा विचारच सोडून द्या,गुप्तहेर खात्यातील शिवाजी काशिद यांनी प्राण सोडला.त्यांना शिवाजी राजांचे रुप घेत असताना माहीत होते की, आपल्याला जर दगाफ़टका झाला तर आपल्याला जीव गमवावा लागेल,याची पुरेपूर खात्री असताना देखील आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी;रयतेच्या स्वराज्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालून छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रतिरूप घॆऊन आपले प्राण त्यागले.(दिनांक - १३ जुलै १६६०).
छत्रपती शिवाजी महाराज वेढ्यातून निसटले
छत्रपती शिवाजी महाराज निसटल्याचे समजल्याबरोबर जौहरने "दिलेर मसूद" याला राजांच्या पाठलागावर पाठविले.तोपर्यंत काही अवधी निघून गेला होता.छत्रपती शिवाजी महाराजांनी योजलेली रणनीती पाहून सिद्धी जौहर आणि त्याचे सैन्य कमालीचे संतापले होते.त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी मोठ्या त्वेषाने पाठलाग सुरु केला.विशाळगडापर्यंतचे अंतर खूप असल्याने मावळ्यांना प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागत होती.परंतू जिद्द कायम होती.विशाळगडापासून आठ मैल अंतरावर असणार्या गजापूर जवळील घोडखिंडीत छत्रपती शिवाजी महाराज जेंव्हा आले,त्यावेळी त्या खिंडीतच शत्रुशी लढ्यासाठीची तयारी शिवरायांनी दाखवली.मात्र बाजीप्रभूंनी शिवाजी राजांना पुढे निघून जाण्यास सांगितले.आपण काही सैन्य घेऊन ही खिंड लढवतो.शरीरात प्राण असेपर्यंत एकाही गनिमास पुढे जाऊ देणार नाही.असे सांगितले.छत्रपती शिवाजी महाराजांना बाजीप्रभूंच्या हट्टापायी विशाळगडावर जावे लागले.तथापि शिवरायांनी विशाळगडावर गेल्यागेल्या ५ तोफ़ा उडविल्या जातील.अशी ग्वाही देऊन त्यानंतर ही लढाई थांबवून ताबडतोब विशाळगडाकडे बाजीप्रभूंना सर्व सैन्य घॆऊन कुच करण्यास सांगितले.
बाजीप्रभूंनी स्वराज्यासाठी प्राण त्यागले
बाजीप्रभूंना निवडक सैन्य घॆऊन घोडाखिंडीत मसुदला रोखन्यासाठी थांबविले.बाजीप्रभूंच्या शरीरावर असंख्य घाव होऊन देखील त्यांची तलवार शत्रूंची शिरे उडवित होती.बाजीप्रभू मसुदशी लढता लढता धारातिर्थी पडले.मात्र शिवाजी महाराज विशाळगडावर गेल्याच्या ५ तोफ़ा ऐकल्याबरोबर बाजीप्रभूंनी प्राण सोडला.(दिनांक - १३ जुलै १६६०).छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रतिरूप घॆणारे शिवाजी काशिद व घोडखिंड पावनखिंड बनविणारे बाजीप्रभू या शूरवीरांचे पुर्णाक्रुती पुतळे कोल्हापूरातील पन्हाळगडावर बसविण्यात आले आहेत.छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या रयतेच्या स्वराज्यासाठी प्राणाची आहुती देणारे वीर बाजीप्रभू आणि वीर शिवाजी काशिद हे स्वराज्यनिष्ठ मावळे होते.शाहिस्तेखानावर हल्ला करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी तह करून पन्हाळा २२ सप्टेंबर १६६० रोजी सिद्धी जौहरला दिला.यानंतर सुमारे १३ वर्षानंतर पन्हाळगड पुन्हा ६ मार्च १६७३ रोजी कोंडाजी फ़र्जंद यांनी अवघ्या ६० मावळ्यांच्या शर्तीच्या प्रयत्नाने स्वराज्यात जिंकून घॆतला.छत्रपती शिवाजी महाराजांनी या गडाचा कारभार महाप्रतापी स्वातंत्र्यवीर छत्रपती संभाजी महाराजांवर सोपविला होता.
छत्रपती शिवाजी महाराजांचे नेबापूला आगमन
छत्रपती शिवाजी महाराज रयतेच्या स्वराज्यासाठी प्राणत्याग करणार्या प्रतिशिवाजी गुप्तहेर शिवाजी काशिद यांच्या घरी गेले.शिवाजी काशिद यांच्या पत्नी पारूबाई यांचे छत्रपती शिवाजी महाराजांनी सांत्वन केले.शिवाजी काशिद यांचा मुलगा यशवंत यांना अधिकारी पदी नेमले.गुप्तहेर शिवाजी काशिद यांचे नेबापूरला स्मारक उभारले.सर्व कुटुंबाची व्यवस्था करून छत्रपती शिवाजी महाराज राजगडावर गेले.
प्रतिशिवराय गुप्तहेर नरवीर शिवाजी काशिद आणि वीर बाजीप्रभू या स्वराज्यनिष्ठ मावळ्यांना विनम्र अभिवादन आणि मानाचा मुजरा....

20 December 2013

प्रतिशिवराय : नरवीर शिवाजी काशिद [भाग १]

        स्वराज्य स्थापनेच्या कार्यात श्री शिवरायांच्या पराक्रमी अनुयायांबरोबरच त्यांच्या गुप्तहेर खात्याचा सुद्धा अत्यंत उपयुक्त सहभाग होता. स्वकीय विरोधक व उघड शत्रू यांच्या हालचाली, दूरवरच्या प्रदेशातील परिस्थिती इ. माहिती वेळच्या वेळी मिळण्यावर राजकीय आणि सैनिकी यश अवलंबून आहे हे ओळखून शिवराय गुप्तहेर खात्यावर भरपूर पैसा खर्च करत. शत्रूच्या हालचाली आणि गुप्त कारवाया तसेच शत्रुप्रदेशातील संपन्न शहरे, खजिन्याच्या जागा,हल्ल्यासाठी जाण्याचा आणि परत येण्याचा मार्ग इत्यादी गोष्टींची गुप्तहेरांमार्फत खडानखडा माहिती मिळवून श्री शिवरायांनी अनेक धाडसी हल्ले करून शत्रूंची शहरे लुटली.छत्रपती शिवरायांचे गुप्तहेर खाते अतिशय कार्यक्षम होते. या गुप्तहेरांपैकी एक नाव म्हणजे नरवीर शिवाजी काशिद. छत्रपती शिवरायांच्या रयतेच्या स्वराज्यासाठी आपल्या प्राणाची बाजी लढवणारे गुप्तहेर नरवीर शिवाजी काशिद हे मराठ्यांच्या इतिहासातील एका महानायकाचं.
ऐतिहासिक पार्श्वभूमी
छत्रपती शिवरायांनी दिनांक १० नोव्हेंबर १६५९ रोजी प्रतापगडावर अफ़जलखानास व अफ़जलखानाचा वकील क्रुष्णा भास्कर कुलकर्णीस कापल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज जानेवारी १६६० मध्ये आदिलशाहाच्या ताब्यातील मिरजेला वेढा देण्यासाठी आले.आदिलशाहाने कुर्नलचा सिद्धी जौहर याला सलामतखान हा किताब देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात लढण्यासाठी पाठविले.मिरजेला छत्रपती शिवाजी महाराजांनी वेढा दिल्यानंतर आजच्या सांगली जिल्ह्यातील तासागांव तालुक्यातील धुळगांव या छोट्याशा गावांत छत्रपती शिवाजी महाराज आल्याची व येथील रहिवाश्यांना शिवाजी महाराजांनी जमिनी दिल्याची ऐतिहासिक नोंद आजही धुळगांवातील लोकांच्या घरी ताम्रपटाच्या स्वरुपात सापडते.आजही तेथील लोकांकडे छत्रपती शिवरायांनी दिलेले ताम्रपट उपलब्ध आहेत.
सिद्धी जौहरचा पन्हाळगडचा वेढा
छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावर राहून सिद्धी जौहरला तेथेच रोखून ठेवणार होते.जोवर शिवराय पन्हाळगडावर आहेत तोवर जौहर तेथेच थांबणार हे निश्चित होते आणि पुढील रणनीती छत्रपती शिवाजी महाराज आखणार होते.कधीकधी डावपेच यशस्वी करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीची आखणी करावी लागते.अत्यंत मुत्सद्दीपणाने आखलेले डावपेच देखील एखाद्यावेळी यशस्वी होत नाहीत.त्याप्रमाणे पन्हाळगडाच्या वेढ्यात छत्रपती शिवाजी महाराज अडकले आणि पन्हाळगडचा वेढा जौहरने घट्ट आवळला.
वेढ्यातून सुटण्यासाठी रणनीती
सिद्धी जौहर मुत्सद्दी सेनानी होता,मुत्सद्दी राजकारणी नव्हता,विचार न करता सरळ रेषेत धडक देणार्या रेड्यासारखे त्याचे वागणे होते.म्हणून तो छत्रपती शिवाजी महाराजांना ओळखू शकला नाही.जौहरला छत्रपती शिवरायांची रणनीती ओळखणे जमले नाही.या पन्हाळगडाच्या वेढ्याचा चार महिन्याचा काळ ओलांडला होता.नेमके याच वेळेत छत्रपती शिवाजी महाराजांनी जौहरला पत्र पाठविल्यामुळे जौहर सुखावला होता.छत्रपती शिवाजी महाराजांकडून जौहरला निरोप गेला.उद्या आम्ही भेट घेण्यासाठी तळावर येऊ.छत्रपती शिवाजी महाराजांकडून हा निरोप गेल्याने जौहरचा वेढा ढिला पडल.सैनिक बेहोश झाले.अवघ्या एका रात्रीचा प्रश्न होता.
गुप्तहेर खात्यातील शूरवीर शिवाजी काशिद
गडाबाहेर कसे पडायचे ? या योजनेची तयारी चालू झाली होती.छत्रपती शिवाजी महाराज या विचारात असतानाच गुप्तहेर खात्यातील शूरवीर शिवाजी काशिद छत्रपती शिवाजी महाराजांकडे आले.शिवाजी काशिद हे पन्हाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या नेबापूर गावचे होते.ते दिसायला छ्त्रपती शिवाजी महाराजांसारखेच होते.
पन्हाळगडावर बाहेरचा माणूस आत जाऊ शकत नव्हता व आतील माणूस बाहेर जाऊ शकत नव्हता.जौहरने छत्रपती शिवाजी महाराजांना वेढ्यामध्ये अडकून ठेवल्याने स्वत: जौहरला देखील येथून हालता येत नव्हते.छत्रपती शिवाजी महाराजांनी याठिकाणची अडचण लक्षात घॆऊन नेताजी पालकरांनी विजापूरला मुबलक सैन्यासह धडका देण्यास सुरुवार केली खरी पण त्यांना त्यात यश मिळाले नाही.
विशाळगडासही वेढा
सिद्धी जौहरने विशाळगडासही वेढा दिला.वेढा अत्यंत कडक होता.नेमक्या त्याच वेळी नेताजी पालकर विजापूरला धडक देऊन जिजाऊंच्या मार्गदर्शनासाठी राजगडावर आले होते.नेताजी पालकर समोर आलेले पाहून आई जिजाऊंना संताप आला व त्या म्हणाल्या तुमचा राजा तिकडे कैद होऊन पडला आहे आणि तुम्ही दुरवर जाऊन बसलात ? राजांची सुटका कोण करणार ? तेंव्हा राजमाता जिजामातांनी छत्रपती शिवाजी महाराजांची सुटका करण्यासाठी हाती तलवार घेतली व राजगडावरून पन्हाळगडाकडे निघाल्या.हे पाहत असलेल्या नेताजी पालकरांनी जिजाऊंना विनंती केली व जिजाऊंकडील तलवार हातात घेत म्हंटले जौहरला हिसका दाखवितो आणि राजांना सोडवून आणतो आणि आई जिजाऊंचा आशिर्वाद घेऊन नेताजी पन्हाळगडाच्या मोहिमेकडे निघाले.विजापूरहून आलेले नेताजी पालकर क्षणाची देखील विश्रांती न घेता तातडीने पन्हाळगडाकडे निघाले.
छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या दिसणार्या समकालीन दोन व्यक्ती होत्या, हिरोजी फ़र्जंद आणि शिवाजी काशिद
पन्हाळगडावर गुप्त बैठक
छत्रपती शिवाजी महाराजांची व गुप्तहेरांची बैठक झाली.यात छत्रपती शिवाजी महाराजांनी रणनीती आखली.पन्हाळगडावरून २४ मैल दूर असलेल्या विशाळगडाच्या दिशेने या योजनेची तयारी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केली होती.जाण्याचा मार्ग निवडला होता,केंव्हा निघायचं ? कसे निघायचं ? सोबत कोण कोण असणार ? शत्रूने अडविले तर कसा प्रतिकार करायचा ? शत्रूच्या गोटात कसा गोंधळ निर्माण करायचा ? सगळा तपशील या अगोदरच ठरला होता.या अनुषंगाने शिवाजी काशिद छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणाले,राजे तुम्ही सिद्धी जौहरला तहासाठी निरोप द्या.जौहरच्या भेटीला मी जातो.तुम्ही गडाबाहेर पडा,यावर छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले तुम्हाला दगा फ़टका झाला तर ? त्यावर शिवाजी काशिद म्हणाले होणार नाही आणि झालाच तर माझ्यासारखे अनेक शिवाजी काशिद निर्माण होतील पण तुमच्यासारखे शिवराय स्वराज्याला नितांत आवश्यक आहेत.शिवाजी काशिदांच्या या प्रामाणिक व निष्ठापूर्वक आवेशाच्या बोलण्याने छत्रपती शिवाजी महाराजांना गहिवरून आले.
प्रतिरुपाचे प्रात्यक्षिक
शिवाजी काशिद यांना कोण ओळखेल काय ? याची खात्री करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वत:चा पेहराव देऊन दुपारी गडावरील अधिकारी कर्मचारी यांचे सत्कार शिवाजी काशिद यांच्या हाती पार पाडले.गुप्तहेर खात्यातील शिवाजी काशिद यांना कोणीही ओळखले नाही.जिथे आपले कर्मचारी ओळखू शकले नाहीत तिथे शत्रू तर अजिबातच ओळखू नाही शकणार अशी खात्री पटल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी तहाच्या वाटाघाटीसाठी येत आहोत असा निरोप सिद्धी जौहरला पाठविला.
१२ जुलै १६६० चा दिवस उजाडला.छत्रपती शिवाजी महाराजांनी दोन पालख्या तयार ठेवण्यास संगितल्या.गुप्तहेर खात्यातील शिवाजी काशिद आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा समान पेहराव,समान सैनिक रात्री १० वाजता किल्ल्यातून दोन पालख्या खाली उतरू लागल्या.शिवाजी महाराजांनी पन्हाळगड सोडला.वेढ्याच्या एका बाजूतून ते वेढ्याबाहेर पडले.सोबत वाट दाखविणारे वाटाडे होते.त्यांनी विशाळगडाचा रस्ता धरला,मार्गात राजांची माणसे अगोदर ठरल्यानुसार त्यांना येवून मिळत होती.वेढ्यापासून छत्रपती शिवाजी महाराज ४ ते ५ मैल दूर पोहचले.विशाळगडावर पोहचण्यासाठी १९ ते २० मैल अंतर अद्याप बाकी होते.याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांसोबत १००० मावळे होते.त्यातच शिवाजी काशिद होते.यावेळी त्यांच्या अंगावर छत्रपती शिवाजी महाराजांसारखा पेहराव होता.जणू प्रतिशिवराय राजेच.
सिद्धी जौहरला चकवा दिला
शिवाजी काशिद यांना पालखीत बसविण्यात आले.पालखीसोबत १० ते १२ हत्यारबंद मावळे होते.राजांचा निरोप घेऊन शिवाजी काशिद यांची पालखी लगबगीने मलकापूरच्या दिशेने गेली व छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी विशाळगडाच्या दिशेने रस्त्याने निघाली.ते पन्हाळगडापासून आणखी दूर जात असताना जौहरच्या गस्ताच्या सैनिकांनी त्यांना पाहिले.आरडाओरडा करीत ते तंबूच्या दिशेने धावले.काही वेळातच सगळा तळ जागा झाला.जौहर रागाने लालेलाल झाला होता.छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला मुर्ख बनविल्याची भावना त्याला क्षणाक्षणाला झाली.
प्रतिरुपाला शत्रुने ओळखले
सिद्धी जौहरने घोडदळाच्या तुकड्या छत्रपती शिवरायांना शोधण्यासाठी पाठविल्या.एक तुकडी मलकापूरच्या दिशेने गेली होती.या तुकडीला मलकापूरच्या रस्त्यात शिवरायांची पालखी दिसली.या पालखीत बसलेले छत्रपती शिवाजी महाराज (प्रति शिवाजी राजे: गुप्तहेर शिवाजी काशिद) दिसले.या जौहरच्या हत्यारबंद सैनिकांच्या तुकडीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशातील गुप्तहेर शिवाजी काशिद यांना पकडले.त्यांची पालखी सिद्धी जौहरच्या तंबूकडे नेली.छत्रपती शिवाजी  महाराज आल्याची बातमी जौहरला समजताच तो राजांच्या स्वागताला आला.त्याने छत्रपतींच्या पेहराव्यातील गुप्तहेर शिवाजी काशिद यांची भेट घेतली.छत्रपती शिवाजी महाराज तहासाठी गडाखाली तंबूत आलेले आहेत ही बातमी वार्यासारखी पसरली व गडाभोवती डोळ्यात तेल घालून पहारा देणार्या सैनिकांना समजताच त्यांना आनंद झाला.पालखीत बसलेल्या शिवाजी महाराजांना(गुप्तहेर शिवाजी काशिद) जौहरच्या समोर नेण्यात आले.इकडे सिद्धी जौहरच्या तंबूत छत्रपती शिवाजी महाराजांना ओळखणारा अफ़जलखानाचा मुलगा फ़ाजलखान होता.क्रुष्णा भास्कर कुलकर्णीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या कपाळावर तलवारीचा वार केला होता हे फ़ाजलखानास माहीती होते.म्हणुन फ़ाजलखान गुप्तहेर शिवाजी काशिद यांना म्हणाला ’क्या आप सचमुच शिवाजी महाराज है ? अगर आपको जान प्यारी है तो सच बत’,यावर शिवाजी काशिद म्हणाले, ’हॉं मै शिवाजी महाराज हू’ आणि फ़ाजलखानाने शिवरायांचा जिरेटोप मागे सारला आणि पाहतो तर काय कपाळावर क्रुष्णा भास्कर कुलकर्णीने दिलेल्या तलवारीचा वर्मी बसलेल्या घावाचा व्रण काही दिसला नाही.त्याने तात्काळ ही बाब सिद्धी जौहरच्या नजरेत आणून दिली.

30 November 2013

आतातरी पुढे हाची उपदेश

             जगतगुरु संतशिरोमणी संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे ह्र्दयाला भिडणारे अभंग. अज्ञान, रुढी, परंपरा, ब्राह्मणवाद आणि कर्मकांडात अडकलेला समाज व त्याची दयनीय अवस्था पाहून महाराज कळवळून गेले.त्यांनी बहुजन समाजाची बारकाव्याने चौफ़ेर पाहणी केली. त्यातून समाजाची दयणीय अवस्था तुकोबारायांना पाहवली नाही.ते म्हणाले,
"न देखवे डोळा ऐसा हा आकांत । परपिडे चित्त दु:खी होते ॥"
त्यानंतर त्यांच्या जे काही लक्षात आले ते समाजाचे चित्र बदलण्यासाठी समाज परिवर्तनासाठी त्यांनी खुप कष्ट घेतले,तेंव्हा महाराज म्हणाले.
"भीत नाही आता आपुल्या मरणा । दु:खी होता जन न देखवे ॥"
यातून महाराजांनी निर्भीडपणे सत्य सांगण्यास सुरुवात केली.हे सत्य कितीही तिखट व झोंबणारे का असेना पण शेवटपर्यंत त्यांनी सत्य सांगायचे सोडले नाही.हे सत्य जरी बहुमतांच्या विरोधात का असेना पण बहुमतांपेक्षा आम्ही सत्यालाच मानतो.या बद्दल महाराज म्हणतात.
"सत्य असत्याशी मन केले ग्वाही । मानियेली नाही बहुमता ॥"
किंवा हे सत्य सांगत असताना कुणाला तनका येत असेल,राग येत असेल तरी देखील आम्ही सत्यच सांगण्याचं काम करणार आहोत असे महाराज एके ठिकाणी म्हणतात.
"तुका म्हणे सत्य सांगोत । येतील रागे तरी येवोत ॥"
यावरून महाराज अत्यंत परखड भूमिका घॆताना दिसून येतात.मग ते व्रत वैकल्यांवर आसूड ओढतात.बुवाबाजीवर प्रहार करतात तर कधी वैदिक पंडीतांच्या बाष्फ़ळ ज्ञानाची प्रौढी उघड करतात.अनेकेश्वर नाकारताना ते म्हणतात.
"सेंदरी ही देवी दैवसे । कोण ती पुजी भूते केते ॥
आपल्या पोटा जी रडते । मगती शिते अवदान ॥१॥"
त्याहीपेक्षा पुढे जाऊन महाराज म्हणतात सगळ्या देवांचा देव म्हणून आम्ही फ़क्त विठ्ठलच मानतो,स्वीकारतो.
"नव्हे जोखाई जोखाई । मायराणी मेसाबाई॥
बळीया माझा पंढरीराव । जो या देवांचाही देव ॥
रंडीचंडी शक्ती । मदयमांस भक्षिती॥
बहीराव खंडेराव । रोटी सोटीसाठी देव ॥
गणोबा विक्राळ । लाडू मोदकांचा काळ ॥
मुंज्या मैसासुरे । हे तो कोण लेखी पोरे॥
वेताळे फ़ेताळे । जळो त्यांचे तोंड काळे ॥
तुका म्हणे चित्ती । धरा रखुमाईचा पती ॥४॥"
नवस केल्यावर लेकरं-बाळं झाले असते तर नवरा करायची गरज काय ? हा जाहीर प्रश्न महाराज चुकलेल्या समाजाला करतात.
"नवसे कन्या-पुत्र होती । मग का करणे लागे पती ॥"
हे सगळे करीत असताना समाजाला अज्ञानाच्या अंधकारातून बाहेर काढत असताना,ज्ञानाचा नवा मार्ग दाखवत असताना त्यांना बर्याच संकटांना तोंड द्यावे लागतं.ब्राह्मणवर्ग त्यांना त्रास देतो,अमानुष छळ करतो तर त्यांची गाथा पाण्यात बुडवतो.
यातून महाराज खचून न जाता पुन्हा नव्याने उभे राहतात आणि पहिल्याहीपेक्षा खंबीर,धाडसी भूमिका ते पुढे घॆतात.
"तुका म्हणे ऐसा नरा । मोजुनी हाणाव्या पैजारा ॥"
किंवा
"तुका म्हणे गाढव लेखा । जेथे भेटेल तेथे ठोका ॥"
             अशा प्रकारे जगतगुरु तुकोबाराय समाजासाठी दिवसरात्र स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करायला लागतात.अज्ञान सोडा,भटमुक्त व्हा,भागवत धर्म स्विकारा असे वारंवार महाराज सांगतात.सर्व सांगुनही न ऐकणार्या वर्गाबद्दल त्यांना चीड येते.ह्या न ऐकणार्या वर्गाला एकदा महाराज उद्देशून म्हणतात.
"किती सांगू तरी न ऐकती बटकीचे।
पुढे शिंदळीचे रडतील ॥"
               आज शेतकर्यांच्या आत्महत्या झाल्या आणि वाटले महाराजांचे बोल खरे ठरले.त्यांनी सांगितलेले न ऐकल्यामुळे आमच्यावर रडायची वेळ आली.अजुन आम्हाला तुकोबाराय पुर्णपणे समजलेले नाहीत असेच म्हणावे लागेल.एवढेच काय तर बर्याच जनांच्या घरामध्ये तुकोबारायांची गाथा नाही.संत तुकोबाराय वाचून,समजून घेण्याऐवजी आम्ही वारकरी फ़क्त मंदिरात तुकाराम चालीवर गातो.तुकोबाराय फ़क्त गाण्यापुरतेच ठेवले आम्ही.यामुळे त्यांच्याच शब्दात सांगायचे झाल्यास,
"उठिते ते कुटिते टाळ । अवघा मांडिला कोल्हाळ ॥"
आम्ही एवढे शहाणे, महाराज करू नको म्हणाले ते आम्ही आधी करून बसलो.नव्हे आजही करत आहोत.
महाराज व्रत,वैकल्याच्या भानगडीत पडू नका म्हणाले होते.आम्ही अजुनही व्रतवैकल्य सोडायला तयार नाही.महाराज दगडाला देव मानू नका म्हणाले होते,ते रंजल्या गांजल्यांना आपुले म्हणणार्यांच्यात देव शोधा म्हणाले होते.आम्ही नेमकं याच्या उलट वर्तन करतो.ते नवस करू नका म्हणाले होते आम्ही करतो,ते बुवाबाजी,कर्मकांड करू नका म्हणाले होते.पण बुवाबाजी,बापूकापू आणि भामट्यांशिवाय आमचे पान हालत नाही.ते अनेक देवी-देवता मानू नका म्हणाले होते.आम्ही सगळ्यांना खेटून येतो.ते म्हणाले होते प्रत्येक गोष्ट श्रमाने,अभ्यास करून मिळवा पण आम्हाला हे जमत नाही.आपला कल दोन नंबरच्या मार्गावर असतो.
म्हणून आम्ही आतातरी अंतर्मुख होऊन तुकोबारायांना समजून घेतले पाहिजे.किमान त्या दिशेने एखादे पाऊल तरी टाकले पहिजे.असे म्हणतात साहित्याला काळाच्या मर्यादा असतात.पण आजही तुकोबारायांचं साहित्य प्रासंगिक ठरतं.समाजोपयोगी ठरतं.ही गोष्ट केवढी मोठी आणि अभिमानाची आहे.आपली प्रगती व्हावी,गुलामीतून आपण बहुजन समाजाने बाहेर पडावे म्हणून आयुष्य पणाला लावणारे संत तुकोबाराय आम्ही असेच विसरून जायचे का ?
ह्रुदयाला घाव झाल्यावर,असंख्य शारिरीक आणि मानसिक वेदना सहन करून अगदी आतून घायाळ झालेले संत तुकोबाराय अगदी  कळवळून शेवटचा उपदेश करतात.रात्रंदिवस तुमचा आमचा विचार करणारे तुकोबाराय शेवटीस काकुळतीस येवून म्हणतात...
"आतातरी पुढे हाची उपदेश।
नका करू नाश आयुष्याचा ॥
सकळ्यांच्या पाया माझे दंडवत ।
आपुलाले चित्त शुद्ध करा ॥"
बघा काही.....जमतं का पाळायला !!

* नार्याची मुंज आणि कूशीचे लग्न
* तुकोबारायांची गाथा

10 October 2013

विश्ववंद्य छ.शिवरायांचे सांस्क्रुतीक धोरण

          कुळवाडीभूषण विश्ववंद्यछत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा कधी हिंदू धर्मरक्षक, कधी महाराष्ट्र रक्षक,कधी मराठी भाषा रक्षक,कधी सांस्क्रुतीक रक्षक तर कधी मुस्लिम विरोधक अशा प्रकारे उभी करण्यात आली.पण शिवरायांच्या चरित्रासंबंधी ऐतिहासिक तथ्यांचा अभ्यास केला असता शिवरायांच्या वरील प्रतिमा अनैतिहासिक आणि शिवरायांना संकुचित ठरविणार्या आहेत,हे स्पष्ट होते.
शिवरायांना संस्क्रुतीचा जरूर अभिमान होता. पण कोणत्या संस्क्रुतीचा ? तर सिंधु संस्क्रुतीचा,परंपरेचा म्हणून महात्मा फ़ुले त्यांचे वर्णन "कुळवाडीभूषण" शिवराय असे करतात.कुळवाडीभूषण म्हणजे अठरापगड बारा बलुतेदार यांचा राजा,शेतकर्यांचा,रयतेचा राजा.सांस्क्रुतीक धोरणांमध्ये महत्वाचा भाग म्हणजे भाषा! शिवरायांना मराठीचा अभिमान होता याबाबत कोणाचे दुमत असण्याचे कारण नाही.पण मराठीबद्द्ल आंधळा अभिमान त्यांच्याकडे नव्हता.मराठीच्या अभिमानापोटी इतर भाषांचा अनादर महाराजांची कधीच केला नाही.याउलट शिवरायांच्या पत्रात अरबी,पार्सी भाषेचा (शब्दांचा) त्यांनी मोठ्या प्रमाणात वापर केलेला आहे.याबाबत डॉ.प्र.न.देशपांडे त्यांच्या "शिवरायांची पत्रे" या ग्रंथातील प्रस्तावनेत लिहितात-शिवाजी महाराजांच्या कचेरीपत्रामध्ये प्रामुख्याने पुढील मायना आढळतो.अजरख्त खाने राजर्षी शिवाजीराजे दामदैलत हूं आणि पुढील अर्ध्या भागात बजानीखा कारखुनांनी हाल व इस्तकथाल देशमुखांनी अशा आशयाचा मजकूर येतो.अजरख्त खाने याचा अर्थ कचेरीपासुन असा असून ’दामदौलत हू” याचा अर्थ त्याचे राज्य चिरायु होवो,असा होतो.तर बजानीबु याचा अर्थ ’कडे’ असा असून "हाल" म्हणजे हल्लीचे आणि "इस्तकबाल" म्हणजे पुढे होणारे भावी असा आहे.(प्रुष्ठ क्र.१४) वरील अनेक शब्द पार्सी,अरबी आहेत.याचा अर्थ शिवरायांनी केवळ संस्क्रुत,मराठी याच भाषांचा कैवार घेतला आणि इतर भाषांचा द्वेष केला असे सिद्ध होत नाही.शिवरायांचे सांस्क्रुतीक धोरण हे भाषावादाचे नव्हते,तर जगाच्या स्पर्धेत टिकायचे असेल तर अनेक भाषा अवगत असल्या पाहिजेत अशाच स्वरूपाचे होते.शिवरायांचे पुत्र संभाजीराजेंनी तर एक संस्क्रुत आणि तीन हिंदी असे चार ग्रंथ लिहिले.म्हणजे शिवकाळात भाषावाद अस्तित्वात नव्हता.आजच्या राजकारण्यांनी राजकीय लाभासाठी भाषावाद उभा केलेला असून मराठी भाषेच्या अस्मितेचे प्रतिक म्हणून शिवरायांची प्रतिमा उभी केली जाते.शिवरायांचे सांस्क्रुतीक धोरण पाहता ही बाब अत्यंत खोटारडी आहे.
शिवाजी राजांचा पोषाख व राहणीमान पाहता सुफ़ी संतांच्या भारतातील वास्तव्याने बहुजन-मुस्लिम धर्मियांमध्ये मोठ्या प्रमाणावर सांस्क्रुतीक देवाण-घेवाण झाली.याबाबत इतिहासतज्ञ चंद्रशेखर शिखरे त्यांच्या प्रतिइतिहास या अभ्यासपुर्ण ग्रंथात लिहितात मुस्लिम स्त्रियांनी सौभाग्य अलंकार म्हणून पुरुषांचा झब्बे आणि तंग तुमानी हा पोषाख वापरणे या गोष्टी शिवरायांच्या पुर्वीपासून घडत आलेल्या होत्या.शिवाजी महाराजांचा पोषाख व राहणीमान यातूनही हा सांस्क्रुतीक प्रभाव जाणवतो याचा अर्थ कोणी धर्म बदलला असा होत नाही(प्रथमाव्रुती प्रुष्ठ क्र.५६). कुळवाडीभूषण शिवाजी महाराजांना आपल्या धार्मिक अस्मितेचा अभिमान होता.भवानी माता,महादेव,खंडोबा यांच्याबद्दल शिवाजी महाराजांना नितांत आदर होता.ते देव म्हणून नव्हे तर भवानीमाता, महादेव, खंडोबा हे सर्व श्रद्धास्थाने आहेत.त्यांच्याबद्दल शिवरायांना आदर होता पण यश मिळवण्यासाठी हाती तलवार घ्यावी लागते.केवळ नामस्मरण आणि देवपुजा केल्याने आपणाला यश मिळणार नाही असे समजण्याइतके महाराज प्रगल्भ विचारसरणीचे होते.
शिवाजी राजे बुद्धिप्रामाण्यवादी होते.वैदिक धर्मग्रंथात अनेक अतार्किक बाबी आहेत.त्यांचे अनुकरण महाराजांनी कधीही केले नाही.शिवरायांनी आरमारदलाची उभारणी केली.सिंधुदुर्गसारखे सागरी किल्ले बांधले.बेदनुरवर समुद्रामार्गे स्वारी करून शिवरायांनी सिंधू बंदी तोडली.समुद्र उल्लंघन करणे पाप आहे असे लिहुन ठेवनार्या वैदिक ग्रंथाचे काही ठिकाणी प्रामाण्य नाकारले.शिवरायांनी शुद्रातिशुद्र  बांधवांना हक्क-अधिकार दिले. म्हणजे महाराजांनी विषमता नाकारली.राज्यात समता निर्माण केली.समतावादी स्वराज्य हे शिवरायांच्या सांस्क्रुतीक धोरणाचे महत्वाचे अंग होते.
शिवराय महाराजांचे बरेचसे आयुष्य लढाया राजकीय संघर्ष स्वराज्याची निर्मीती प्रवास यामध्ये गेलेले आहे.त्यांना जर दीर्घायुष्य लाभले असते तर त्यांनी दुसर्या राज्याभिषेकानंतर निश्वितच अब्राह्मणी धार्मिक संहिता निर्माण केली असती.तरी देखील त्यांच्या पत्रावरून,जीवनातील काही प्रसंगावरून त्यांचा मानवतावाद,प्रेमळपणा,धार्मिक.सांस्क्रुतीक धोरणे प्रकर्षाने जाणवते.त्यांनी २३ ऑक्टोंबर १६६२ रोजी सर्जेराव जेधे यांना पत्र पाठवले आहे.त्या पत्रात ते लिहितात की मोघल स्वराज्यावर चाल करून येत आहेत तरी रयतेला सुरक्षीत ठिकाणी हलवावे.मोघलाकडून रयतेला त्रास झाला तर "त्याचे पाप तुमच्या माथी बैसेल".यावरून परोपकार हे पुण्य आणि परपीडा हे पाप आहे हे महाराजांचे सांस्क्रुतीक धोरण होते.
शिवाजी महाराजांची हिंदू धर्मरक्षक आणि मुस्लिमांचा कर्दनकाळ अशी प्रतिमा झाली किंवा तशी केली गेली.शिवाजी महाराजांचे अदिलशहा, मोघल यांच्याबरोबर राजकीय संघर्ष होता,धार्मिक नव्हे.शिवरायांनी अफ़जलखानाला ठार मारले,शाईस्तेखानावर वार केला ते मुस्लिम होते म्हणून नव्हे तर स्वराज्याचे शत्रू होते म्हणून.शिवाजी महाराजांनी जसा अफ़जलखानाला ठार मारला तसाच खानाचा निष्ठावंत वकील क्रुष्णा कुलकर्णी यालाही उभा कापला.शिवरायांच्या सैन्यात अनेक मुस्लिम अधिकारी होते.शिवरायांच्या सैन्यात ज्याप्रमाणे अनेक मुस्लिम अधिकारी होते त्याचप्रमाणे मोघल. अदिलशहाच्या सैन्यात देखील मराठा , रजपुत, ब्राह्मण अधिकारी होते.याचाच अर्थ संघर्ष हा धार्मिक नसून राजकीय होता.शिवरायांचे धोरण कोणत्या धर्माला विरोध किंवा कोणत्या धर्माचा अनुनय करण्याचे नव्हते. याउलट औरंगजेबाला १६५७ साली लिहिलेल्या पत्रावरून शिवरायांचा मानवतावाद प्रकर्षाने जाणवतो.
बहुजनप्रतिपालक विश्ववंद्य छ.शिवाजी महाराजांच्या धार्मिक आणि सांस्क्रुतीक धोरणावरून हे स्पष्ट होते की शिवरायांना जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषा, लिंग, वंश, राष्ट्र भेदाच्या पलीकडे जाऊन मानवाचे आनंददायी प्रसन्न भेदा-भेदरहित असे स्वराज्य अपेक्षीत होते.त्याची प्रत्येक्ष कार्यवाही त्यांनी आपल्या स्वराज्यात केली.शिवरायांचे खरे सांस्क्रुतीक आणि धार्मिक धोरण जगाला समजेल तेंव्हा जगात शांतता आणि विकास झपाट्याने वाढेल.शिवाजी हे केवळ मराठी, महाराष्ट्र, भारताचे राजे नाहीत तर संपुर्ण जगातील आदर्श व्यक्तिमत्वांचे आदर्श आहेत.
अशा कुळवाडीभूषण समतेचे पुरस्कर्ते हिंदवी स्वराज्य संस्थापक विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराजांना कोटी कोटी विनम्र अभिवादन !
जय जिजाऊ ॥ जय शिवराय ॥ जय महाराष्ट्र.