16 January 2014

मराठा सेवा संघ बदलतो आहे?

             सिंदखेडराजाला १२ जानेवारीला होणारा मराठा सेवा संघाचा जिजाऊ महोत्सव. या सार्‍या उत्सवांना लाखोंची गर्दी असते. हे उत्सव आयोजित करणार्‍या संस्था, संघटना या महाराष्ट्राचे राजकारण व समाजकारणावर निर्णायक प्रभाव टाकणार्‍या असल्याने स्वाभाविकच या उत्सवांमध्ये कुठले निर्णय होतात, कार्यकर्त्यांना कुठली दिशा दिली जाते, याकडे राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसोबतच माध्यमांचंही बारकाईने लक्ष असतं.
महाराष्ट्रात काही संस्था-संघटनांच्या वार्षिक उत्सवांचं एक वेगळं महत्त्व आहे. दसर्‍याच्या दिवशी नागपुरात दीक्षाभूमीवर आयोजित होणारा धम्मचक्र परिवर्तन दिन, त्याचदिवशी रेशीमबागमध्ये होणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव, तिकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवरील शिवसेनेचा दसरा उत्सव आणि
         या संघटनांमध्ये मराठा सेवा संघ ही तुलनेने नवी संघटना. मात्र केवळ २४ वर्षांच्या कालावधीत या संघटनेने सार्‍याच क्षेत्रातील दिग्गजांना दखल घेणे भाग पडावे, असे आपले वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण केले आहे. त्यामुळेच जिजाऊ महोत्सवात काय निर्णय होतात, याबाबत सार्‍यांनाच उत्सुकता असते. मराठा सेवा संघाबद्दल त्यांचे टीकाकार, विश्लेषक काहीही म्हणो, मात्र महाराष्ट्राच्या समाजजीवनात त्यांनी घडविलेले काही बदल कोणालाच नाकारता येणार नाही. मराठा सेवा संघाचं सर्वात मोठं कुठलं योगदान असेल, तर हजारो वर्षे चुकीच्या रूढी-परंपरा आणि कर्मकांडांचा जबरदस्त पगडा असलेल्या बहुजन समाजाला त्यांनी खडबडून जागं केलं. इतिहासाचं जाणीवपूर्वक केलेलं विकृतीकरण या समाजाच्या लक्षात आणून देताना त्यांना त्यांच्या सत्त्वाची जाण सेवा संघाने करून दिली. असं म्हटलं जातं की, पोथी वाचणार्‍या समाजाला सेवा संघानं पुस्तकं वाचायला शिकविली. ते खरंच आहे. धार्मिक पोथी, पुराणांशिवाय काही न वाचणार्‍या समाजाला सेवा संघानं फुले, आंबेडकर वाचायला लावले. हे परिवर्तन खूप मोठं आहे. सामाजिक समरसता वगैरे अशा भंपक गोष्टी न करता एका समाजाची मानसिकता बदलविण्याचं मोठं काम सेवा संघानं केलं आहे. एका मोठय़ा समूहाला आत्मभान देणारं हे परिवर्तन आहे. हा असा बदल घडवायला शेकडो वर्षे जातात. 
         मात्र २५ वर्षांपेक्षा कमी कालावधीत सेवा संघाने हे काम केलं. दुसरं महत्त्वाचं कुठलं काम सेवा संघानं केलं असेल, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सनातन संस्था अशा जातीयवादी आणि समाजात द्वेषाची पेरणी करणार्‍या संघटनांविरुद्ध ताकदीने शड्ड ठोकला. सरकार नावाची यंत्रणा आणि इतर पुरोगामी संघटना या संस्थांचा मुकाबला करताना सपशेल अयशस्वी ठरत असताना सेवा संघाने वैचारिक मार्गाने आणि वेळप्रसंगी मैदानातही या संघटनांना जबरदस्त आव्हान दिले. बहुजन समाजाचं ब्राह्मणीकरण करायला निघालेल्या या संघटनांच्या कारवायांना सेवा संघाने बर्‍यापैकी चाप लावला हे कबूल करावंच लागतं. पुरोगामी विचारसरणीचा पुरस्कार करणारा एक जबरदस्त दबाव गट सेवा संघाच्या निमित्ताने महाराष्ट्रात तयार झाला. हे परिवर्तन करताना मराठा सेवा संघालाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारखाच द्वेषाचा मार्ग पत्करावा लागला. ब्राह्मण समाजाला टार्गेट करून इतर जातीयवादी संघटनांप्रमाणेच स्वतंत्र विचार न करू शकणारी पिढी सेवा संघाने तयार केली, असा आरोप त्यांच्यावर होतो. या आरोपात काही अंशी तथ्यांश निश्‍चित आहे. सेवा संघाच्या प्रारंभीच्या काळात आणि अगदी आताआतापर्यंतही देशातील प्रत्येक समस्येला ब्राह्मण जबाबदार आहेत, अशी मांडणी सेवा संघाकडून होत होती. कुठलाही अपवाद न करता सरसकट सर्व ब्राह्मणांना सेवा संघाचे नेते आडव्या हाताने घेत होते. ब्राह्मणांनी निर्माण केलेल्या सर्व प्रथा, परंपरा मोडित काढल्या पाहिजेत, आर्यांनी (ब्राह्मणांनी) या देशावर आक्रमण केल्यानंतर येथील समाजाला गुलाम केल्यानंतर ज्या-ज्या गोष्टी लादल्या, त्या सार्‍या नाकारायचा चंग सेवा संघानं बांधला. त्यातून मग गुलामगिरीची सारी प्रतीकं झिडकारून लावायचे आवाहनही सेवा संघाच्या विचारपीठावरून करण्यात येत असे. 
         अगदी आताआतापर्यंत महिलांनी मंगळसूत्र घालू नये, कुंकू लावू नये, बांगड्या घालू नये, असे ठासून सांगणारे काही वक्ते जिजाऊ महोत्सवात असायचे. हिंदू धर्मातील बहुसंख्य ज्यांना देव म्हणून भक्तिभावानं पूजतात, ते आपले देव असू शकत नाही, असेही सांगितले जात असे. हा सर्व प्रचार सनातन व्यवस्थेविरुद्ध एल्गार पुकारण्यासाठी व्यूहरचना म्हणून कदाचित ठीक असेल, पण यातून सामान्य कार्यकर्त्यांच्या डोक्यात जबरदस्त गोंधळ तयार होत होता. तसंही देवाधर्माच्या विषयात हात टाकला की सॉलिड केमिकल लोचा निर्माण होतो, हा पुरोगामी संघटनांचा नेहमीचा अनुभव आहे. मराठा सेवा संघही सध्या या अवस्थेतून जात आहे. त्यामुळेच परवाच्या जिजाऊ महोत्सवात डॉ. आ. ह. साळुंखे यांनी सुधारित शिवधर्मगाथेबद्दल माहिती देताना मानवी स्वातंत्र्यांचा आदर करण्याचे आवाहन करताना महिलांनी मंगळसूत्र घालावे की नाही, कुंकू लावावे की नाही, बांगड्या घालाव्या की घालू नये, हा त्यांचा अधिकार आहे. या विषयात जबरदस्ती करता येणार नाही, अशी भाषा वापरली तेव्हा सेवा संघाचे अनेक कार्यकर्ते चमकले. सेवा संघ बदलत तर नाही ना, अशी भावना त्यांच्या मनात निर्माण झाली. जिजाऊ महोत्सवाचे अनेक वर्षांपासून वार्तांकन करणार्‍या वार्ताहरांनाही सेवा संघ बदलतो आहे, काहीसा सौम्य होत आहे, हे या वेळी जाणवले. कधी काळी क्रिकेट या खेळाची तीन लाकडं आणि अकरा माकडं अशा वाक्यात संभावना करणारा सेवा संघ आता एका क्रिकेटपटूला मराठा विश्‍वभूषण पुरस्कार देतो, ही विसंगतीही अनेकांना खटकली. अर्थात, रेखाताई खेडेकरांनी भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढविण्यासारख्या अनेक विसंगती सेवा संघाच्या प्रवासात दाखविता येतात. मात्र सेवा संघाच्या विचारपीठावर आणि कोअर मीटिंगमध्ये त्यावर वेळोवेळी मोकळेपणाने चर्चाही होते. या लेखाचा तो विषय नाही. सेवा संघ बदलतो आहे का, हा मुद्दा आहे. या विषयात सेवा संघाच्या जडणघडणीत सुरुवातीपासून सहभागी असलेल्या काही जणांसोबत चर्चा केली असता त्यांनी सेवा संघ निश्‍चितपणे बदलत आहे, हे मान्य केले. मात्र हे बदल वैज्ञानिक बदल असून संघटनेला निकोप वाढीकडे नेणारे बदल असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ब्राह्मण समाजाबद्दलचा आक्रमक प्रचार आणि प्रतीक नाकारण्याबाबतचा टोकाचा अट्टाहास याबाबत सेवा संघामध्ये प्रारंभापासूनच दोन मतप्रवाह होते. 
         एक गट इतिहासाचं विकृतीकरण ज्यांनी केलं, ज्यांनी वर्णव्यवस्था, जातिव्यवस्था निर्माण करून बहुजन समाजाला हजारो वर्षे गुलामगिरीत ठेवलं त्यांच्याबद्दल आक्रमकतेनेच बोललं पाहिजे, लिहिलं पाहिजे आणि त्यांनी निर्माण केलेली सारी प्रतीकं उखडून फेकली पाहिजे, नाकारली पाहिजे, या मताचा होता. दुसरा गट मात्र हजारो वर्षांच्या माथी मारलेल्या का होईना परंपरा, प्रतीकं काही दिवसात मोडीत काढता येत नसतात. तसेही माणसं जबरदस्तीने बदलत नसतात. त्यामुळे वैयक्तिक आचरणाबाबत कुठलेही फतवे काढू नयेत. माणसं तयार झालीत की त्यांचे अपसमज आपोआप मोडित निघतात. त्यामुळे टोकाचा विचार न करता चळवळ निकोप आणि सशक्त केली पाहिजे, या मताचा होता. कोणं कोणत्या जातीत जन्माला यावं हे कोणाच्याच हाती नसतं. त्यामुळे ठरावीक समाजाबद्दल न बोलता प्रवृत्तीला विरोध असला पाहिजे, असेही हा गट आग्रहाने सांगत होता. शेवटी डॉ. आ. ह. साळुंखेंसारख्या ज्यांचा इतिहास, धर्म, संस्कृती, समाजशास्त्राबद्दल प्रचंड अभ्यास आहे, त्यांना भूमिका ठरविण्याचे अधिकार देण्यात आले. डॉ. साळुंखे यांचा लौकिक हा अतिशय संतुलित व निकोप विचार करणारा विचारवंत असा आहे. त्यांनी शिवधर्मगाथेतील बदलाबाबत सांगताना, 'लढाई ही ईश्‍वराच्या अस्तित्वाबद्दल कधीच नव्हती. संघर्ष हा शोषणाविरोधातला आहे. त्याविरोधात ठामपणे उभं राहून समतेची शिकवण देणं हाच शिवधर्माचा गाभा आहे,' असे सांगितले. हे त्यांचं सांगणं समजून घेण्याजोगं आहे. 
            विवेकवाद आणि विवेकाचा आधार हीच सुजाण म्हणविणार्‍या सर्वांची जगण्याची पद्धत असली पाहिजे. त्यातही परिवर्तनाच्या चळवळीत काम करणार्‍या माणसांनी चळवळीच्या वाढीसाठी आवश्यक ते बदल स्वीकारले पाहिजे. बदल हा शेवटी माणसाचा स्थायिभाव आहे आणि तसंही कट्टरता ती कोणाचीही असो, शेवटी ती नुकसानच करते. त्यामुळे रौप्यमहोत्सवी वर्षाकडे वाटचाल करताना एका व्यापक उद्देशाने मराठा सेवा संघात सकारात्मक बदल होत असेल, तर त्याचं स्वागतच करायला हवं. 

(लेखक दैनिक 'पुण्य नगरी'चे कार्यकारी संपादक आहेत.) भ्रमणध्वनी : ८८८८७४४७९६

9 प्रतिक्रिया :

 1. मराठा सेवा संघ ही संघटना म्हणजे फक्त ब्राह्मणांना शिव्या-श्राप देणारी संघटना आहे,
  देव -धर्म नाकारणारी संघटना आहे,
  असा बराच अपप्रचार या संघटनेबद्दल काही मनुवादी विचारसरणीच्या लोकांकडून होताना दिसतोय...
  >>वास्तविकही संघटना ब्राह्मणांच्या विरोधातली संघटना नसून,मनुवादी,शोषनवादी,खोटारडे इतिहासकार यांच्या कुविचारांच्या विरोधात काम करणारी पुरोगामी विचारांची संघटना आहे...
  >>अर्थात,मनुवादी,शोषनवादी,खोटारडे इतिहासकार यांच्या विचारांच्या, वृत्तीच्या लोकांची ब्राह्मण समाजामध्ये संख्या जास्त असल्यामुळे त्यांच्या विरोधात जास्त बोलल्या जाते... स्वराज्यावर चालून आलेल्या अफजलखानसोबत असलेल्या कृष्णा कुलकर्णी या ब्राह्मण वकिलाने शिवरायांवर हल्ला केला होता,हे जे आम्ही सांगतो,त्याचवेळी अफजलखानसोबत सैन्यामध्ये जीजाऊंचे मावसभाऊ आणि शिवरायांचे चुलते होते हे आम्ही झाकून ठेवत नाही...
  >>मराठा आरक्षणाच्या बाबतीत जेव्हा कधी शरद पवार,विलासराव देशमुख यांच्यासारखे मराठा नेते मंडळी यांच्या कडून काही चुका झाल्या तेव्हा त्यांचेवर देखील या संघटनेकडून कडाडून टीका झालेल्याच आहेत...
  >>युगपुरुष खेडेकर साहेब हे सर्व ब्राह्मनांविरोधात बोलत नाहीत तर ते फक्त मनुवादी विचारसरणीच्या ब्राह्मनांविरोधात व अश्या ब्राह्मणांच्या पायावर लोळण घेणाऱ्या नालायक नेत्यांच्या विरोधात बोलत असतात...

  ReplyDelete
  Replies
  1. भारतीय संस्कृतीत आई ही केवळ व्यक्ती नसून, ते एक संस्कार केंद्रच आहे. मराठा सेवा संघाने पूर्वीपासूनच महिलांचा पुरस्कार केला.संत- महात्म्यांनीही महिलांना आदराचे स्थान दिले. त्याचा यथोचित आदर राखत कुटुंबाच्या जडणघडणीत एक आई आपली भूमिका यशस्वीपणे वठवीत असते.

   Delete
 2. >>देवधर्म यांच्या बाबतीत सांगायचे झाल्यास फक्त संतश्रेष्ठ तुकोबाराय यांनी सांगितलेला देव आणि धर्म म्हणजेच शिवधर्म आहे....
  --देवाचे आणि धर्माचे जे मनुवाद्यांनी बाजारीकरण केलय...देव आणि धर्माच्या नावाखाली सामान्य बहुजनांची आर्थिक आणि मानसिक लुट जी होतेय,तशी लुट तुकोबारायांनी सांगितलेल्या देवधर्मात अजिबात नाही आणि तो धर्म आम्ही अंगीकारलाय....
  >>म्हणजेच आम्ही देव धर्माच्या विरोधातले नसून,ढोंग व अंधश्रद्धेच्या विरोधातले,देवधर्माच्या नावाखाली होणार्या पिळवनुकीच्या विरोधातले आहोत...
  >>खंडोबा,एडोबा,मसोबा हे जुन्या काळातील बहुजनांचे महापुरुष होऊन गेले.त्यांनी त्या काळात सर्वसामान्य जनतेचे संरक्षण केले.त्यांची जीवनातील दु:खे कमी केली.दुर्दैवाने या महापुरुषांचा इतिहास लिहिल्या गेला नाही...तसेच त्याकाळी पुतळे उभारण्याची प्रथा नसलेमुळे,त्यांची आठवण म्हणून लहान मोठ्या मंदिरात त्यांच्या मूर्ती बसविल्या व नंतर मनुवाद्यांनी या महापुरुषांचे दैवीकरण करून त्यांचा कर्तत्वान इतिहास कायमचा दाबून टाकला...
  >>जसे आपले जग सोडून गेलेले आजे-पंजे मानवच होते पण ते गेल्यावर आपण त्यांना देव मानतो,तसेच हे सर्व महापुरुष मानवच होते पण त्यांनी समाजाची फार मोठी सेवा केल्यामुळे ,त्यांना प्रथेनुसार सर्व समाजाकडून देव मानल्या गेले...
  >>पण त्यांचे नवस करणे,त्यांच्याबद्दल अंधश्रद्धापसरवणे,त्यांच्या यात्रा भरवणे [यात्रेमध्ये नको ते धंदे चालवणे]ह्या गोष्टी म्हणजे त्यांचा अवमानच आहे...

  ReplyDelete
 3. >>समाजातील अज्ञान व दु:ख दूर करणारे महात्मा बसवेश्वर,चक्रधरस्वामी, महात्मा गौतम बुद्ध,संत कबीर,संत नामदेव,संत तुकोबाराय, गोरोबा काका,संत सावतोजी महाराज,संत सेना महाराज,संत चोखोबा महाराज .........ते अलीकडचे गाडगे महाराज,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या महात्म्यांच्या शिकवणीवर काम करणारी,व स्वराज्य संकल्पक शहाजीराजे, मां जिजाऊ,छत्रपती शिवराय,शंभूराजे,महाराणी ताराराणी,महात्मा फुले,राजर्षी शाहू,भारतरत्न डॉ.आंबेडकर,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे इत्यादी महापुरुषांच्या शिवकार्यास पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करणारी संघटना म्हणजेच ''मराठा सेवा संघ''होय...

  जय जिजाऊ,जय शिवराय,जय शंभूराजे...

  ReplyDelete
 4. संस्कृती, इतिहास, धर्मकारण, राजसत्ता अशा विविध आघाड्यांवर मराठा सेवा संघाने कार्य केले आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर सखोल अभ्यास करण्यात आला आहे. त्यामुळे समाजाला आरक्षण लागू व्हावे, यासाठी प्रत्येकाने आता पुढे येण्याची आवश्‍यकता आहे. कुणबी व मराठ्यांना संधी दिली गेली नाही, त्यामुळेच हा समाज मागे राहिला. परंतु, "सरकार कमी तिथे आम्ही' हे आम्ही सिद्ध करून दाखविले आहे. त्यामुळे सरकारने आता आमच्या समाजाच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा करावा, यासाठी गावागावांतून जनजागृती करण्याचे काम प्रत्येक कार्यकर्त्याने करावे.

  ReplyDelete
 5. पूर्वीच्या काळी मराठा समाजात विचारांची क्रांती झाल्याने सत्तेचा उदय झाला. मात्र, तो झाला नसता तर इतिहास कदाचित वेगळाच राहिला असता. पण, मध्यंतरीच्या काळात समाजातील विचार संपला. त्यामुळे प्रगतीपासून वंचित राहिलेल्या तळागाळातील समाजबांधवांना समोर आणण्यासाठी मराठ्यांचा आत्मा जागृत करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी समाजात वावरताना व्यापक दृष्टिकोन ठेवावा लागेल,

  ReplyDelete
  Replies
  1. सुयोगMonday, 14 April, 2014

   अगदी बरोबर भाऊ

   Delete
 6. खरं आहे आर एस एस आणि सनातन संघटनांना लोळविण्याचे ताकद फ़क्त आणि फ़क्त मराठ्यांच्या मराठा सेवा संघात आहे

  जय संभाजी राजे जय संभाजी ब्रिगेड

  ReplyDelete
 7. आदेश भोई कट्टर मराठाMonday, 14 April, 2014

  मराठा सेवा संघ स्थापना दिन पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी लावलेल रोपट बहरत जाऊनया वटवृक्षाखाली 32 कक्षाच्या साह्यान ेमराठा समाजाच्या तरुणांना जाती अडकता सर्वधर्म समान या नितीने जगण्यास सांगितले दुसर्याच्या आदेशाने दंगली आंदोलन करुन आपले आयुष्यबरबाद करणार्या तरुणांना प्रगतीची वाट
  दाखवली ज ेअभिमानाने जगत होते त्यांना स्वाभिमानाने जगण्यास शिकवले आज हजारो शिवव्याख्याते तयार करुन शिवरायांचा खरा इतिहास जगासमोर आणणारी संघटना...!जातीपातीच्या गर्तेत अडकलेल्या मराठा बहुजनांची टाळकी भटी गुलामीतुन मुक्त करुन त्यांना धर्म, राज, शिक्षण, अर्थ, प्रचारप्रसार माध्यम
  सत्ता मिळवण्यासाठी कार्यक्षमकरणारी चळवळ जोपासणार्या बांधवांना हार्दिक सदिच्छा.

  ReplyDelete

प्रतिक्रिया देताना सभ्य भाषेचा वापर करावा तसेच मराठी भाषेत लिहिण्याचा जास्तित जास्त प्रयत्न करावा. प्रतिक्रिया देताना कोणत्याही जात, धर्म, पंथ, वर्ण तथा कोणत्याही समुहाच्या श्रद्धास्थानांविषयी बोलताना सभ्यता बाळगणे आवश्यक.