१८५१ साली घडलेली एक घटना ! एक जोडपे आपापसात चर्चा करत होते, अहो आपल्याला स्व:चे मुलबाळ नाही, मेल्यावर आपल्या समाधीवर फ़ुले वाहण्यासाठी आपल्या रक्ताचा वारस असावा ! असे पत्निने विचारताच पती म्हणाला,अग ! भले आज आपल्या रक्ताचा वारसदार नाही, परंतू आपण जे समाजोद्धाराचे काम करीत आहोत यातून आपण पेरलेल्या क्रांतीकारी विचारांचे हजारो,लाखो वारस तयार होतील आणि आपल्या समाधीवर फ़ुले वाहतील. विचारांचे वारस निर्माण होतील असे म्हणणारे ते ग्रुहस्त कोण ? ते होते महात्मा फ़ुले.१६० वर्षापुर्वीची भविष्यवाणी जोतिरावांनी केली होती त्याप्रमाणे त्यांच्या विचारांचे किती वारस निर्माण झाले ? याची समीक्षा आम्ही केली तर लोककल्याणकारी राजर्षी छ.शाहू महाराज आणि युगप्रवर्तक डॉ.बाबासाहेब आंबेडकर या दोन नावाच्या पलीकडे नावे आम्हाला सापडत नाहीत.
मग यांच्या शिवाय फ़ुलेंच्या विचारांचे वारसदार आम्हाला का सापडत नाहीत ? तरीही त्यांची जयंती आपण उत्साहाने साजरी करतो.वारसदार नसताना जयंती का साजरी होते ? कारण जयंती साजरी करणे एवढंच वारसदारांचे काम आहे, असे महापुरुषांचे भक्त समजतात परंतू महापुरुषांना त्यांच्या कार्याला,विचारांना भक्तांची नसूण अनुयायांची गरज आहे.
जयंती कोणाची व कशासाठी साजरी करतो ?
जे ध्येयासाठी जगतात,ध्येयपुर्तीसाठी जीवन समर्पित करतात त्यांना आपल्या स्म्रुती जपतो.हे जे महापुरुष आहेत त्यांनी जीवन काळात एक निश्चित असा मोठा संघर्ष चालवला त्यामुळे ते आज समाजाचे आदर्श बनले आहेत आज त्यांना जपन्याचे,पुजा करण्याचे अभियान जोरात चालू आहे.त्यांनी ज्या व्यवस्थेच्या विरोधात काम केले ती व्यवस्था आजही समाजाचे शोषण करीत आहे.ज्या समाजाचे आंदोलन चालवले त्या समाजाच्या समस्या आजुनही कायम आहेत.मग ज्या महात्मा फ़ुलेंनी शेतकर्यांच्या हातात आसूड देऊन त्याला बैलाप्रमाणे माजलेल्या ब्राह्मणी व्यवस्थेला वटणीवर आणायला शिकवले तोच शेतकरी आज आत्महत्या का करीत आहे ?
ज्या हातात छत्रपती शिवरायांनी तलवार देऊन त्यांच्या करवी बहुजनांचे छत्र निर्माण केले,टिपरीची तलवार करून ज्यांनी पराक्रम घडविला ती मनगडे आज इतकी लाचार का झाली,की पोटाची टिचभर खळगी भरण्यासाठी दुसर्यापुढे हात पसरू लागली ?ज्याचे हात देण्यासाठीच निर्माण झाले होते तो बळीराजा आज स्वत:च मागणार्याच्या दारात उभा आहे.ज्या जमातीला राज्यकर्ती जमात व्हा म्हणून बाबासाहेबांनी त्यांच्या पंखात गरूडाचे बळ देऊन त्यांना भरारी घ्यायला शिकवली तीच जमात ते गरूडाची उंची गाठणारे आज इतके लाचार का झाले ?
असे एक ना अनेक प्रश्न आपल्या समोर उभे राहतात.क्रुषीप्रधान देशामध्ये शेतकर्यालाच आत्महत्या करावी लागते याचे नेमके कारण काय ? हे पहिला शोधावे लागेल. मग आपल्याला आठवेल की जे ध्येय जो मार्ग अपल्याला आपल्या महापुरुषांनी दिला ते ध्येय ,तो मार्ग आपण सोडून दिला ? आज आपला समाज प्रचंड भ्रमित झालेला आहे, गोंधळात आहे.हजारो समस्या डोळ्यावासून उभ्या आहेत.पण समाधानाचा रस्ता आपल्या समोर नाही.उलट ज्यांनी या समस्या निर्माण केल्या त्यांच्यावरच त्याने समाधानाची जबाबदारी सोपविली म्हणून ही अशी अवस्था !
ह्या अशा अवस्थेत पुन्हा आपल्याला गरज पडेल ती आपल्या महापुरुषांच्या विचारांची त्यांच्या सत्यवादी मार्गाची.ती समजून घेतली तरच समाधान होईल अन्यथा नाही.बळीराजाने आपल्या पदरात भरभरून माप दिलं होतं, अगदी सोन्याचा धुर निघावा अशी आमची परिस्थिती होती त्या बळीराजावर ही परिस्थिती का आली ? आधुनिक भारताच्या इतिहासापासून जरी पाहिले तरी स्पष्ट पणे या बाबी आपल्यासमोर येतात की, आज या शेतकर्याची,बहुजन समाजाची काय अवस्था झाली आहे ?महात्मा फ़ुलेंच्या काळापासून परिस्थिती जर डोळ्यासमोर घेतली तर काय दिसते.
तो काळ एका संक्रमन अवस्थेचा होता.पेशवाई नुकतीच संपली होती.जरी पेशवाई संपली होती तरी पेशवाई ज्यांच्या अंगात रुजली होती त्यांची धुंदी, मस्ती उतरली नव्हती जे राज्य क्षेत्र निर्माण करण्यासाठी मावळ्यांनी रक्त सांडले त्या मराठा स्वराज्याचे पेशव्यांनी पेशवाईत रुपांतर केले होते.परीणामी नंगानाच पेशवाईत सुरु झाला.पेशवाई म्हंटले की एकच आठवते ते म्हणजे गळ्यात गाडगे आणि कमरेला खराटा !शिक्षणावर केलेली बंदी म्हणजे धर्म बुडतो जेंव्हा क्षुद्र शिक्षण घेतो.
विद्या नाकारणे हा काय धर्म असू शकतो का ? असे प्रश्न उभे करून त्यांनी ठरवले ही व्यवस्था आमच्या शेतकर्याला न्याय देऊ शकत नाही.त्यासाठी ही व्यवस्था बदलावी लागेल.शेतकर्यांना या अवस्थेतून मुक्त करावे लागेल.त्यासाठी सर्वात प्रथम शेतकर्याला मुक्त करायचे असेल तर वामनाने गाडलेल्या बळीराजाला पाताळातून बाहेर काढावे लागेल.त्याशिवाय आमच्या समस्यांचे समाधान होणार नाही.त्यासाठी ब्राह्मणांनी केलेल्या आपमतलबी धर्मग्रंथातील लांडी-लबाडी महात्मा फ़ुलेंनी आपल्या गुलामगिरीतून जगासमोर मांडली.या ग्रंथामध्ये शेतकर्याला आपल्या सांस्क्रुतीक संघर्षाचा इतिहास समजावून दिला.महात्मा फ़ुले जाणीवपुर्वक या देशाला बळीस्थान मानतात.बळीराजाची क्रुषीप्रधान संस्क्रुती नष्ट करून ब्राह्मणी धर्माने निर्माण केलेली संस्क्रुती अशी बनावटी,ढोंगी,आपमतलबी आहे हे जगाला समजावून दिले.एवढ्यावरच थांबले नाहीत तर शिक्षणाची बंदी उठवली,मनुस्म्रुतीचे उल्लंघन केले.ज्ञानाच्या किल्ल्या ब्राह्मणांच्या कमरेला होत्या त्या काढून आपल्या ज्ञानाची कवाडे खुली केली.
जे काम छत्रपती शिवरायांच्या तलवारीने केले तेच काम महात्मा फ़ुले यांच्या लेखणीने केले.त्यांची धार तेवढीच होती.आज मात्र ती धार बोथट झाली आहे.ब्राह्मणांनी सांगितले उत्त्तम शेती,मध्यम व्यापार आणि कनिष्ट नोकरी.महात्मा फ़ुलेंनी सांगितले की उत्तम शिक्षण, याच शिक्षणामुळे फ़ुलेंचा अनुयायी ब्राह्मणांना आव्हान देऊ शकेल.यातूनच सत्यशोधक समाजाची स्थापना झाली.ज्या दिवशी शिवरायांनी दुसरा राज्याभिषेक करवून घेतला त्याच दिवशी २४ सप्टेंबर १८७३ ला महात्मा फ़ुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
सत्याला प्रमाण मानणारा ,असत्याला जुगारून देऊन सत्याची कास धरणारा समाज,प्रामाण्यवादी समाज.याच समाजाची चळवळ एवढी मोठी होती की यातूनच शाहू महाराजांसारखे नेत्रुत्व तयार झाले.त्या आधारावरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर निर्माण झाले.सत्यशोधक चळवळीची धुरा मराठा बांधवांनी दिनकरराव जवळकर, केशवराव जेधे, जाधवांसारखी मंडळी यांनी सांभाळली.
महात्मा फ़ुले यांनी आपल्या शेतकर्याचा आसुड मध्ये १८८३ मध्ये जी शेतकर्याची दयनीय परिस्थिती वर्णन केली आहे तीच आजही लागू आहे.शेतकर्यांचे परिस्थितीचे वर्णन करताना महात्मा फ़ुले म्हणतात की शेतकरी हा भ्रष्ट नोकरशाही आणि सावकारशाही यांनी पिळला जात आहे.आज शेतकरी कर्जबाजारी होत आहे.आत्महत्या करत आहे.पण हे कर्ज काही त्यांनी शेतीच्या कामासाठी काढलेले नाही.९०% कर्ज हे धार्मिक कारणासाठी काढलेले आहे.हे सर्व कशामुळे होते ? कारण महात्मा फ़ुलेंनी शिकवलेला शेतकर्याचा आसूड शिकवला गेला नाही.जोतिरावांनी समाजाला तयार करण्यासाठी २५ वर्षे मेहनत घेतली,शेवटी त्यांचा समाज रस्त्यावर आला. त्यांच्या या सार्वजनिक आंदोलनाचे प्रमुख पाच टप्पे होते.१.शिक्षण, २.साहित्य, ३. महिलांचे प्रबोधन, ४.शिवजयंती, ५.सत्यशोधक समाज.
पहिला टप्पा शिक्षण : शिक्षणाच्या बाबतीत महात्मा फ़ुलेंनी एक मंत्र दिला होता.
विद्येविना मती गेली । मती विना नीती गेली ॥
नीती विना गती गेली । गती विन वित्त गेले ॥
वित्ताविना शूद्र खचले । एवढे सारे अनर्थ एका अविद्येने केले ॥
विद्येच्या या मंत्रात महात्मा फ़ुलेंनी जो मार्ग सांगितला आहे तो विद्या,मती-नीती-गती-वित्त असा होता.परंतू आजच्या शिकलेल्या लोकांनी विद्येवरून जी उडी मारली ती थेट वित्तावर.विद्येचा जो संबंध मतीशी, तर्काशी होता तो थेट वित्ताशी जोडला.शिक्षणाची फ़ार सोपी व्याख्या महात्मा फ़ुलेंनी केली होती.आमच्या लोकांना इतकं शिकवा इतकं शिकवा की त्यांना खरं काय नि खोटं काय हे समजेल.ते खर्याचं समर्थन करतील.परंतू आज परिस्थिती काय आहे.
या शिक्षण- साहित्य- महिला प्रबोधन-शिवजयंती- सत्यशोधक समाज या टप्प्यामध्ये शेवटचा टप्पा म्हणजे सत्यशोधक समाज.या समाजातून याच्या आंदोलनातून शाहू महाराजांनी प्रेरणा घेतली.सत्यशोधक चळवळ चालविण्याचे काम मराठा बांधवांनी केले.यामधुनच बाबासाहेबांनी राष्ट्रव्यापी आंदोलन उभे केले.परंतू महात्मा फ़ुले-शाहू महाराज-बाबासाहेब यांच्यामधील ही नाळ सुसंगत सुत्रबद्धता आमच्या लोकांपर्यंत पोहचली नाही.म्हणूनच त्यांना मानणारे आपापसात भांडतात.आज जे सत्यशोधक आहेत त्यांनी सत्यशोधकाचा अर्थ सत्ताशोधन असा घेतला आणि सत्ताशोधनाच्या नादाने स्वत:चा व समाजाचा सत्यानाश कधी झाला हे त्यांना कळलेच नाही.हा सत्यानाश जर थांबवायचा असेल तर महापुरुषांचा जयजयकार करण्याने तो थांबनार नाही त्यासाठी आम्हाला फ़ुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांची गरज आहे.ते विचार आचरणात आणण्याची गरज आहे आणि महापुरुषांनी दाखवलेल्या मार्गाने जर आम्ही चाललो तरच आज आम्ही आमच्या समस्यांचे समाधान करू शकतो.म्हणूनच आजपासून स्वत:ला फ़ुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांचे वारसदार मानून त्यांचे कार्य आणि विचार जगभर पसरविणे हीच खरी फ़ुले-शाहू-आंबेडकर यांना आदरांजली ठरेल.हेच खरे विनम्र अभिवादन ठरेल.
शिका ! संघटित व्हा ! संघर्ष करा !