20 April 2014

महाराष्ट्राचे हृदयसम्राट : ज्ञानराज

               संत ज्ञानेश्वरांचा जन्म इ.स. १२७५ मध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत व आईचे नाव रुक्मिणीबाई असे होते. विठ्ठलपंतचे मूळ घराणे पैठणजवळील आपेगावचे; पण पुढे ते आळंदी येथे स्थायिक झाले. ज्ञानेश्वर जन्मले ते सनातनी समाजाचा शाप घेवूनच. ‘संन्याशाचा मुलगा’ हा शिक्का त्यांच्या कपाळावर समाजाने मारला होता. त्यांचे वडील विठ्ठलपंत कुलकर्णी यांनी काही काळ संन्यास घेतला आणि नंतर गुरूच्या आज्ञेवरून परत ते संसारात आले. त्यानंतर त्यांना निर्वृतीनाथ, ज्ञानदेव, सोपानदेव, मुक्ताबाई अशी चार मुले  जन्माला आली. कर्मठ व नतद्रष्ट समाजाला ते पाहवले नाही. त्याने या कुटुंबाला बहिष्कृत करून कुटुंबाचे स्वास्थ हिरावून घेतले. तरीपण निष्ठुर समाजाने त्या चार अनाथ लेकारांनाही छळले.
आपेगाव हे औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणजवळ गोदावरी नदीच्या काठावर वसलेले छोटे गाव आहे. विठ्ठलपंत तीर्थयात्रा करत करत श्री क्षेत्र आळंदी मुक्कामी येऊन स्थायिक झाले. आळंदी हे सिद्धपीठ होते. त्या काळी संन्यासाची मुले म्हणून सर्व समाज या चौघा भावंडांची हेटाळणी करीत असे. परित्यक्त ब्राह्मण म्हणून त्यांना काळ कंठावा लागला. श्रीज्ञानेश्र्वरांच्या आई-वडिलांनी देहांत प्रायश्र्चित घेतले.
ज्ञानराज माऊली..
        संत ज्ञानेश्वर म्हणजे महाराष्ट्राचे एक अनमोल रत्न ! महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनातील, परमार्थाच्या क्षेत्रातील ‘न भूतो न  भविष्यति’ असे अजोड व्यक्तिमत्त्व व अलौकिक चरित्र म्हणजे संत ज्ञानेश्वर! गेली सुमारे ७४० वर्षे महाराष्ट्रातील सर्व पिढ्यांतील, सर्व स्तरांतील समाजाने जे व्यक्तिमत्त्व आपल्या मनोमंदिरात एक अढळ श्रद्धास्थान म्हणून जपले आहे आणि जे श्रद्धास्थान पुढील असंख्य पिढ्यांतही कायमच अढळ व उच्चस्थानी राहणार आहे; असे एकमेवाद्वितीय व्यक्तिमत्त्व म्हणजे श्री संत ज्ञानेश्वर!
          अलौकिक काव्य प्रतिभा लाभलेला रससिद्ध महाकवी, महान तत्त्वज्ञ, श्रेष्ठ संत, सकल विश्र्वाचे कल्याण चिंतणारा भूतदयावादी परमेश्वरभक्त, पूर्ण ज्ञानाचे मूर्तिमंत प्रतीक, श्रीविठ्ठलाचा प्राणसखा - अशा शब्दांत त्यांचे वर्णन केले जाते. परंतु त्यांचे परिपूर्ण वर्णन करण्यासाठी शब्द अपुरे पडल्याचेही जाणवते. संत चोखामेळा पुढील शब्दांत त्यांना वंदन करतात.
‘कर जोडोनिया दोन्ही। चोखा जातो लोटांगणी।।
महाविष्णूचा अवतार। प्राणसखा ज्ञानेश्वर।।’ 
             प्राणसखा' हा अतिशय वेगळा, सुंदर व समर्पक शब्द चोखोबांनी संत ज्ञानेश्वरांबद्दल वापरला आहे.
संत ज्ञानेश्वरांविषयी तुकोबा म्हणतात...
ज्ञानियांचा गुरु राजा महाराव । म्हणती ज्ञानदेव तुम्हां ऐसें ॥१॥
मज पामरा हे काय थोरपण । पायींची वाहान पायीं बरी ॥२॥
ब्राह्मादिक जेथें तुम्हां वोळगणें । इतर तुळणे काय पुढं ॥३॥
तुका म्हणे नेणें युक्तीची ते खोली । म्हणोनी ठेवीली पायीं डोई ॥४॥
तर नामदेव महाराज ज्ञानेश्वरांबद्दल उद्गारतात...
ज्ञानराज माझी योगियांची माऊली । जेणे निगम वल्ली प्रगट केली ॥१॥
गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी । ब्रह्मानंद लहरी प्रगट केली ॥२॥
अध्यात्म विद्येचे दाविलेसे रुप । चैतंन्याचा दिप उजळला ॥३॥
नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी । एक तरी ओवी अनूभवावी ॥४॥
ज्ञानराज म्हणजे माय मराठीचे हृदय !
          श्री निवृत्तीनाथ हेच संत ज्ञानेश्र्वरांचे सदगुरू होते. ज्ञानेश्वरांनी भगवद् गीतेवर  प्रख्यात टीका लिहिली.या ग्रंथास ‘ज्ञानेश्वरी’ किंवा ‘भावार्थदीपिका’ असे म्हणतात. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून संस्कृत भाषेतील ‘ज्ञान’, श्री संत ज्ञानेश्वरांनी प्राकृत भाषेत आणले.
माझा मराठाचि बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके।
ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।। 
               असे म्हणत त्यांनी मराठी भाषेविषयीचा अभिमान, मराठीची महती व्यक्त केली आहे. सर्व स्तरांतील लोकांना ही ‘ज्ञानेश्वरी’ भुरळ घालते. मराठी भाषेतील हा अद्वितीय ग्रंथ आहे. विचार, भावना, आशयाची खोली, अलंकाराचे श्रेष्ठत्व, अद्वैतानुभूती, भक्तीचा ओलावा, रससंपन्नता या सर्वच बाबतीत ज्ञानेश्वरीने उंची गाठलेली आहे. ‘पसायदान’ ही विश्वकल्याणाची प्रार्थना म्हणजे संत ज्ञानेश्वरांच्या वैश्विक सद्भावनेचा, तसेच प्रतिभेचा परमोच्च साक्षात्कार आहे. कर्मयोग, ज्ञानयोग व भक्तियोग सांगणार्‍या ग्रंथराज ज्ञानेश्वरीत सुमारे ९००० ओव्या आहेत. हा ग्रंथ इ.स. १२९० मध्ये लिहिला गेल्याचे मानले जाते.
पुर्वी गीता ही संस्क्रुत भाषेमध्ये होती. ही संस्क्रुत भाषा सर्वसामान्य मराठी माणसाला समजत नव्हती. म्हणूनच ज्ञानेश्वरीच्या रुपाने हीच गीता ज्ञानेश्वरांनी प्रथम मराठीमध्ये आणली. इ.स.१२७५ मध्ये जन्मलेल्या संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेले पसायदान आजही भारतात म्हंटलं जातं.ज्ञानेश्वर  केवळ गीतेचे भाष्यकारच नव्हते तर लेखक आणि कवीही होते.भागवत धर्माला त्यांनी तात्विक अधिष्ठान दिले.संस्क्रुत भाषेच्या वर्चस्वाच्या काळात सामान्य माणसाला मराठीतून आध्यात्मज्ञान उपलब्ध करून मराठी भाषेला प्राधान्य मिळवुन दिले.
           त्यांचा दुसरा ग्रंथ ‘अनुभवामृत’ किंवा ‘अमृतानुभव’ होय. हा विशुद्ध तत्त्वज्ञानाचा ग्रंथ आहे. सुमारे ८०० ओव्या या ग्रंथात आहेत. तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने हा श्रेष्ठ ग्रंथ आहे. वाङमयीन सौंदर्य व गुणविशेषांबरोबरच मराठीचा अभिमान, संयम, उदात्तता, नम्रता, त्यांचे निर्मळ चारित्र्य, सर्वसमावेशकता, वात्सल्य, भक्तिपरता आणि कालातीतता - असे अनेक गुणविशेष त्यांच्या साहित्यातून आपल्याला अनुभवण्यास मिळतात. ज्ञानदेवांसह सर्व भावंडांवर तत्कालीन समाजाने प्रचंड अन्याय केला, पण त्या अन्यायाबद्दलची पुसटशी प्रतिक्रियादेखील त्यांच्या साहित्यात आढळत नाही, हे त्यांच्या मनाचे मोठेपणच.!
        ‘जो जे वांछिल, तो ते लाहो’ असे म्हणत अखिल विश्वाची जणू काळजी वाहणार्‍या संत ज्ञानेश्वरांना वारकरी संप्रदायासह सर्वच भक्त प्रेमाने ‘माउली’ म्हणतात. त्यांनी धर्मातील क्लिष्ट अवडंबरे काढून धर्माला कर्तव्याचा वेगळा अर्थ दिला. वाङ्मय निर्मितीबरोबरच त्यांनी आध्यात्मिक लोकशाहीचे बीज रोवण्याचा यशस्वी प्रयत्न चंद्रभागेच्या वाळवंटात केला. भागवत धर्माचा तथा वारकरी संप्रदायाचा पाया रचण्याचे अभूतपूर्व कार्य त्यांनी केले. संत नामदेव, संत गोरोबा कुंभार, संत सावतामाळी, संत नरहरी सोनार, संत चोखामेळा या समकालीन संत प्रभावळीचे अनौपचारीक नेतृत्व करत, संत ज्ञानेश्वरांनी अध्यात्माच्या क्षेत्रात समानता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला.
महाराष्टातील वारकरी संप्रदायची प्रतिष्ठापणा ज्ञानेश्वरांनी केली. त्यांनी समाजातल्या सर्व लोकांना भागवत पंथाच्या झेंड्याखाली एकत्र आणले. ज्ञानेश्वरांच्या काळात  नाम शिंपी, नरहरी सोनार, सावता माळी, कान्होपात्रा असे कित्येक भागवत भक्त अभंगरचना करत होते. हे वारकरी कोणालाही श्रेष्ठ-कनिष्ठ मानत नव्हते. ज्ञानदेवांनी लोकांना भक्तीचा सोपा मार्ग दाखवला. परमेश्वरला तुमच्याकडून काही नको असते. देव भक्त भावाचा भुकेला असतो तुम्ही मनापासून भक्ती करा. त्यासाठी पुजा व अर्चेचे अवडबर  माजवण्याची  गरज नाही. केवळ नामस्मरण करा, देव तुमच्यावर प्रसन्न होईल. ज्ञानेदेव जरी मोठे तत्त्वज्ञ होते तरी ते रुक्ष स्वभावाचे नव्हते. उलट त्यांच्या वागणुकीत सर्वांना आईचे वात्सल्य दिसायचे. म्हणूनच सर्वच भक्त ज्ञानेश्वरांना प्रेमाने ‘माउली’ म्हणतात. 
        ‘अमृतानुभव’ या ग्रंथाच्या लेखनानंतर संत ज्ञानेश्वरांनी तीर्थयात्रा केली. संत नामदेव महाराजांच्या ‘तीर्थावली’ मध्ये या तीर्थयात्रेचा उल्लेख आढळतो. या यात्रेनंतर माउलींनी समाधी घेण्याचा निर्णय घेतला. संत नामदेवांच्या ‘समाधीच्या अभंगां’मध्ये तत्कालीन संदर्भ सापडतात. अन्य संतांची मानसिक स्थिती, त्यांच्यासह समाजाला झालेले दु:ख, खुद्द नामदेव महाराजांच्या वेदना, ज्ञानेश्वरांचा संयम आणि निग्रह या सर्व गोष्टींचे प्रतिबिंब समाधीच्या अभंगांत आढळते.
        ज्ञानेश्वरांनी केवळ मराठी साहित्यालाच नाही तर संपुर्ण जनमाणसाला दिलेली अम्रुतवाणी लोकांच्या चिरकाल स्मरणात राहिल. ते सांगत असलेले तत्वज्ञान सनातनी लोकांना समजत नव्हते, की त्यांचा विरोध होता की कोनते कारण होते. त्यांच्या समाधीपणात ते अल्प काळात समाधिस्त झाले. त्यांचे समाधी घेणे म्हनजे न उलघडलेलं कोडंच आहे. आज श्री ज्ञानराजांचे समाधीजीवन असे या महापुरुषाचे लोकोत्तरत्व दर्शविणारे वेगळे कार्य सदभक्तांद्वारे अहमहमिकतेने प्रचारिले जाते. त्याब बाबत कोणी शब्द काढला तरी तो द्वेषी वा तिरस्कारणीय नास्तिक ठरतो.पण मराठीजन म्हणून एवढं मात्र नक्की वाटते की ज्ञानराज जर अजुन काही दिवस जिवंत राहिले असते तर मराठी भाषेला अजुन मोठ्या दर्जाची सम्रुद्धी प्राप्त झाली असती यात काही एक दुमत नाही. असा हा महान ज्ञानसुर्य इ.स.१२९६ ला आळंदी इथे समाधिस्त झाला.
संदर्भ :
मराठी संतांचा परमार्थमार्ग [गुरुदेव रानडे].
संत आणि समाज [पद्मश्री का.कारखानीस ].
संतश्रेष्ठ तुकोबांच्या अभंगाचा गाथा [शासकीय].
आंतरजालावरील काही संकेतस्थळे.
दैनिक देशोन्नती [आत्मोन्नती गुरुवार,दि.२० नोव्हेंबर २००८].

7 प्रतिक्रिया :

 1. भाऊसाहेब केसरकरSunday, 20 April, 2014

  भागवत धर्माचे संस्थापक ज्ञानेश्वर महाराज यांना प्रणाम !

  ReplyDelete
 2. अजय जगतापSunday, 20 April, 2014

  वारकरी सांप्रदायाचा पाया ज्ञानदेवांनी घातला म्हणणार्यांनी आह्माला या प्रश्नाची उत्तरे द्यावीत मगच असा फालतू वाद मांडावा
  ज्ञानदेव म्हणे परियेसी नामया ।।
  अद्वैत आत्मया प्रेम मूर्ती ।।
  भक्ती भाग्य तुवा जोडीले अविनाश ।।
  सांगपा साविलास मार्ग त्याचा ।।
  कैसा तो साधावा सांग भजन विधी ।।
  कैसी नमन बुद्धी सत्वशील ।।
  नमन श्रवण ध्यान मनन निजध्यास सर्व सांग
  सांगे हा अनुभवो साधन उपाओ ।।
  विनवी ज्ञानदेवो नामयासी ।।
  इथे तर ज्ञानदेव संत नामदेवांना भक्ती कशी करावी याची विनवणी करून राहिले आहेत,तरी बामन लोक ज्ञानदेवाला वारकरी संप्रदायाचा रचेता म्हणतात कसे श्रवण ,मनन ,चिंतन करावे असें ज्ञानदेव विचारतात मग ज्ञानदेव कसे काय वारकरी संप्रदायाचे रचेता आहेत ?
  जगद्गुरु तुका अवतार नामयाचा ।।
  संप्रदाय सकलांचा येथोनिया ।।
  नामदेवे रचिला पाया ।।
  तुका झालासे कळस ।।
  असे किती तरी पुरावे आह्माला नामदेव महाराज वारकरी संप्रदायाचे रचेता असल्याचे सांगून राहतात तरी पण आमच्या डोक्यात घुसत नाही
  वारकरी संप्रदाय हा भक्ती चा आहे आणि ज्ञानदेव महाराज भक्ती करावी असे विचारात आहेत आता याला काय म्हणावे ?आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्ञानदेव नामदेवाला विनवणी करत आहेत कशी भक्ती करावी म्हणून ?
  तिसरी गोष्ट म्हणजे ज्ञानेश्वर हे योगी होते
  ज्ञानेश्वर माझी योगियाची माउली ।।
  जेणे निगम वल्ली प्रगत केली ।।
  वारकरी संप्रदाय मध्ये योगाला स्थान मुळीच नाही तर ज्ञानेश्वर म्हणतात
  उपनिशादाकडे न वचे । योगशास्त्र न रुचे । अध्यात्माज्ञानी जायचे । मनची नाही ।।२२६।।
  म्हणजे योग आणि शास्त्र वाचणार्याला ज्ञानेश्वर अध्यात्म म्हणतात
  तर दुसरी कडे ज्ञानेश्वर म्हणतात
  योग याग विधी।। येणे नव्हे सिद्धी ।। वयाची उपाधी ।। दंभ धर्म ।। हा हरिपाठातील अभंग आहे योगाला आणि यज्ञाला अभंगाच्या माध्यमातून नाकारतात तर ज्ञानेश्वरी मधून याचे समर्थन करतात यातून हे स्पष्ट होते कि ,ज्ञानेश्वर अगोदर योग करायचे जेंव्हा संत नामदेवाचा उपदेश ज्ञानदेवाला झाला तेव्हा पासून योगाला नाकारून नामस्मरण करायला सांगू लागले भक्तीचा मार्ग ज्ञानदेवांनी स्वीकारला होता आणि याचे सारे श्रेय संत नामदेवाला जाते
  फ़ेसबुक वरुन

  ReplyDelete
 3. ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस !

  ReplyDelete
 4. संत ज्ञानेश्वरांनी भागवत धर्माचा प्रसार संपूर्ण महाराष्ट्रात केला.सर्वसामान्यांना समजेल असा रसाळ भाषेत त्यांनी अभंग रचना केली.

  ReplyDelete
 5. Ravikumar BansodeSunday, 20 April, 2014

  संत ज्ञानेश्वरांच्या आईवडिलांनी (विठ्ठलपंत-रुक्मिणीबाई)यांनी संन्यासाश्रम त्यागून गृहस्थाश्रमाचा स्वीकार केलेला असल्यामुळे तत्कालीन समाजाने या कुटुंबाला वाळीत टाकले,मुलांना त्रास होऊ नये यासाठी विठ्ठलपंत व रुक्मिणीबाई यांनी देहत्याग केला.माधुकरी मागून राहात असलेल्या चारही भावंडाचा(संत निवृतीनाथ,संत सोपानदेव,संत ज्ञानेश्वर व संत मुक्ताबाई)सनातन धर्ममार्तंडानी छळ केला.या छळास कंटाळून संत ज्ञानेश्वर आपल्या झोपडीचे दार बंद करून बसत,अशावेळी संत मुक्ताबाई आपल्या वडिलबंधूची समजूत घालत,हेच संत मुक्ताबाईचे ताटीचे अभंग म्हणून प्रसिध्द आहेत.

  ReplyDelete
 6. वारकरी धर्मात अत्यंत मोलाचे स्थान असलेले संत ज्ञानेश्वर हे आमचेच असे म्हणून आजचा ब्राह्मण समाज त्यांना जवळ करण्याचा प्रयत्न करीत असतो. तथापि, ब्राह्मणी शास्त्रानुसार ज्ञानेश्वर हे ब्राह्मण नाहीत. केवळ ब्राह्मण स्त्री आणि पुरूषापासून जन्म झाला म्हणून कोणीही ब्राह्मण होत नाही. ब्राह्मण होण्यासाठी मुंज व्हावी लागते. ज्ञानेश्वरच नव्हे तर त्यांची इतर भावंडे निवृत्तीनाथ, सोपानदेव आणि मुक्ताबाई यापैकी कोणाचीही मुंज झालेली नव्हती. संन्याशाच्या पोटी जन्म घेतला म्हणून त्या काळातील ब्राह्मण समाजाने ज्ञानेश्वरादी भावंडांची मुंज करण्याचे नाकारले. त्यांना वाळीत टाकले. त्यामुळे ते ब्राह्मण नाहीत, हे सिद्ध होते.

  ReplyDelete
 7. नामदेवे रचिला पाया । तुका झालासे कळस

  ReplyDelete

प्रतिक्रिया देताना सभ्य भाषेचा वापर करावा तसेच मराठी भाषेत लिहिण्याचा जास्तित जास्त प्रयत्न करावा. प्रतिक्रिया देताना कोणत्याही जात, धर्म, पंथ, वर्ण तथा कोणत्याही समुहाच्या श्रद्धास्थानांविषयी बोलताना सभ्यता बाळगणे आवश्यक.