30 December 2015

छ.शिवराय गोब्राह्मणप्रतिपालक की रयतेचे राजे ?

       विश्ववंद्य छ.शिवरायांच्या नावामागे अनेक बिरुदावल्या लावल्या जातात त्यात "गोब्राह्मणप्रतिपालक" ही बिरुदावली जास्त प्रसिद्ध आहे.[की जाणुनबुजुन प्रसिद्ध केली गेली ?]. हिंदुत्ववादी मंडळींना तर शिवराय छत्रपती असण्यापेक्षा गोब्राह्मणप्रतिपालक होते यातच जास्त भुषण वाटते. यासाठी ते ना तर्हेच्या क्लुप्त्या शोधत असतात. ब्राह्मण सुद्धा एवढे कष्ट घेत नसतील असो. ब्राह्मणांनी आजपर्यंत पवित्र म्हणून सांगितलेल्या गोष्टीपैकी दोन महत्वाच्या गोष्टी म्हणजे गाय आणि ब्राह्मण."गायींचा" आणि "ब्राह्मणांचा" प्रतिपाळ करणारा अशी बिरुदावली सारखी प्रसिद्ध केली जाते.मग प्रश्न असा आहे की शिवराय याच दोहोंच्या रक्षणासाठी आयुष्यभर लढले काय ? गाय पवित्र आहे कारण तिच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देव आहेत म्हणे! पण गायींना कोण मानतात पवित्र ? ब्राह्मण मानतात का पवित्र ? गाय पवित्र आहे असे म्हणण्यापेक्षा उपयुक्त आहे असे म्हणणे योग्य ठरेल.पण आज गायींना पवित्र बनवण्याआधी गायींसंदर्भात आदराने,प्रेमाने कोण वागले आहे हे एकदा तपासून बघितले पाहिजे.गाय समस्त शेतकर्याला पुजनीय आहे. त्यामुळे प्राचिन काळापासून शेतकरी सामान्य रयतेने गायी पाळल्या आहेत. गायींची पुजा केली आहे; गायींचे रक्षण केले आहे.
          ब्राह्मणांनी आयुष्यात कधीही शेती केली नाही,न नांगरलेली जमीन जिथे राहतो ब्राह्मण तिथे, असे ओळखावे असे म्रुच्छकटिक नाटकात म्हंटले आहे. ब्राह्मणांच्या धर्मशास्त्राने सांगितलेले काम शिक्षण घेणे व देणे; पुजा-यज्ञविधी करणे, दक्षिणा घेणे हे आहे. प्राचिन काळी ब्राह्मणांची यज्ञसंस्क्रुती होती. यज्ञाचे एक विषेश असे आहे की पशूचा बळी दिल्याशिवाय यज्ञ पुर्णच होऊ शकत नव्हता. प्राचीन काळी गोमेध नावाचा एक यज्ञही होता. .जुण्या पौराणिक कथेत ब्राह्मणांना शेकडॊ गायी दान दिल्याचा उल्लेख आढळतो.ब्राह्मण या गायींचे काय करायचे, याचा असा सहज उलघडा होतो. (आजही ब्राह्मण मुंजीसारख्या काही विधीत कणकेची गाय करून कापतात म्हणे !).
        या उलट गायींचे रक्षण केल्याचे अनेक पुरावे आजही गावागावात आढळतात. (केवळ) मुसलमान गायी कापून खातात म्हणूण छत्रपती शिवरायांनी गायींचे रक्षण करण्याचे ऐतिहासिक कार्य केले असे ब्राह्मणवादी म्हणतात. मात्र मुसलमान भारतात येण्यापुर्वी गायींचे रक्षण करण्यासाठी अनेकांना हुतात्मा व्हावे लागले. त्या काळी गायचोर कोण होते, असा प्रश्न सहज निर्माण होतो. मग बौद्धांच्या नंतर अहिंसाच्या मागे लोक लागतील आणि सामान्य लोक तिकडे लागलेले आहेत मागे त्याला ओढायचे असेल तर आपल्या कडे अहिंसा घ्यायची आणि गायीला पवित्र मानायची ही नवीन प्रथा निर्माण करायची. तीर्थकर आणि बुद्धांच्या अहिंसा तत्वाने ब्राह्मणी संस्क्रुतीची पिछेहट झाली. तेंव्हा ब्राह्मणांनी गायींमध्ये तेहतीस कोटी देव असल्याचे घोषीत केले. या सर्व गोष्टींचा अर्थ इतकाच की आज जे ब्राह्मण गोहत्या संदर्भात व गायीच्या पावित्र्या संदर्भात ज्या दंगली घडवून आणत आहेत, त्यामागचा त्यांचा हेतू वेगळाच आहे. "चोर तो चोर, वर शिरजोर" म्हणतात तो प्रकार हाच!
छ.शिवराय ब्राह्मणप्रतिपालक होते का ?
          छत्रपती शिवराय हे कुळवाडी शेतकरी परंपरेतील असल्यामुळे त्यांनी गायींच्या रक्षणाचे आदेश दिले, हे योग्यच आहे. पण त्यांनी कधीही ब्राह्मणांच्या रक्षणाचे आदेश दिलेले नाहीत. छ. शिवरायांची अस्सल म्हणून मान्यता पावलेली अनेक पत्रे उपलब्ध आहेत. यातील एकाही पत्रात शिवरायांनी स्वत:स ’गोब्राह्मणप्रतिपालक’ म्हणवून घेतलेले नाही. छ.शिवरायांच्या समकालीनांनी शिवरायांना लिहिलेली पत्र आहेत. त्या पत्रांपैकी एकाही पत्रात कुणीसुद्धा शिवरायांना ’गोब्राह्मणप्रतिपालक’ म्हणत नाहीत. उलट छ.शिवरायांची राज्याभिषेक शक असलेली २९ पत्रे उपलब्ध आहेत.या सर्व पत्रांत ते स्वत:स "क्षत्रियकुलवतंस श्रीराजाशिवछत्रपती" असे म्हणवून घेतात,ते कधीही स्वत:स गोब्राह्मणप्रतिपालक म्हणवून घेत नाहीत. मग हे गोब्राह्मण प्रकरण आले कोठून ?. इथे असा प्रश्न निर्माण होतो की, शिवराय गोब्राह्मणप्रतिपालक होते असा गैरसमज कोणी व का पसरविला ?.
        छत्रपती शिवराय हे गोब्राह्मणप्रतिपालक होते असे छत्रपती शिवरायांच्या चरित्रावर कमाई करणार्या बाबासाहेब पुरंदरेने म्हंटले आहे. त्यासाठी शिवचरित्र साधने खंड ५,क्र.५३४ व ५३७ असा आधार देतात. या सर्व पत्रांची व आधारांची छाननी करून श्री शेजवलकर निर्वाळा देतात की, "५३४ क्रमांकाच्या लेखात शिवाजी स्वत:स गोब्राह्मणप्रतिपालक म्हणवून घेत नाहीत तर त्या पत्रात ज्याचा उल्लेख आहे तो बाह्मण त्यास तशी पदवी देतो. ५३७ क्रमांकाच्या लेखात तर "गोब्राह्मणप्रतिपालक" असा शब्दच आलेला नाही. म्हणजे सगळे "भटी गौडबंगाल". शिवाजी राजांनी स्वत:स गोब्राह्मणप्रतिपालक म्हणवून घेणे आणि ब्राह्मणांनी तसे म्हणणे यातले अंतर स्पष्ट आहे. काम करवून घ्यायला आलेला किंवा याचना करायला गेलेला कुणीही राजास तु आमचा प्रतिपाल करणारा आहेस असे म्हणणारच त्यात विषेश काय आहे ? ब्राह्मण तर शहाजान बादशहाला "जगदिश्वरो वा दिल्लीश्वरो" म्हणायचे फ़ायद्यासाठी ब्राह्मण स्तुती करतात हे इतिहासप्रसिद्ध आहेच.
       मग शिवरायांना लावलेली किंवा बळेच चिकटवलेली "गोब्राह्मणप्रतिपालक" बिरुदावली कुणी लावली असेल ? गायीने  लावणे शक्यच नाही त्यामुळे उत्तर स्वच्छच आहे. ग्रॅंड डफ़ आपल्या ग्रंथात "गायी, रयत व स्त्रिया यांना लुटण्यास शिवाजीने आपल्या शिपायांस बंदी केली होती." असे नमूद केले आहे.त्याला इतरही आधार आहेत.पण मग गायी, रयत आणि स्त्रिया यांचा प्रतिपालक असलेले शिवराय गोब्राह्मणप्रतिपालक कसे केले गेले ? रयत आणि स्त्रिया यांना बाजुला सारून त्याठिकाणी ब्राह्मण कधी व कुणी आणले याचा अंदाज करणे कठीण जाणार नाही.
        छ.शिवरायांच्या राज्यात ब्राह्मणांस खास सवलतीसुद्धा कोठे दिसत नाहीत. उलट एका पत्रात आगळीक केलेल्या ब्राह्मणांसबंधी शिवराय लिहितात, "ब्राह्मण म्हणूण कोण मुलाहिजा करू पाहतो" असे बजावून धमकावतात की, "जे गनिमांचे गनीम ते तसाच नतीजा पावणार".काही ब्राह्मण शिवरायांच्या बरोबर होते तसे काही ब्राह्मण शिवरायांच्या विरोधातही होते त्यामुळे शिवराय ब्राह्मणप्रतिपालक अशी बिरुदावली घॆणे शक्य नव्हते व तशी त्यांनी घेतलेली नाही.
           काही महाभाग छत्रपती संभाजी राजांच्या बुधभूषण ग्रंथाचा दाखला देताना म्हणतात की संभाजी राजांनी शिवरायांचा उल्लेख गोब्राह्मणप्रतिपालक असा केला आहे. पहिली गोष्ट म्हणजे बुधभूषण ची मुळ प्रत सध्या उपलब्ध नाही असे अनेक इतिहासकारांचे मत आहे तरीही सध्याची प्रत मुळची संभाजी राजेंनी लिहिलेलीच आहे असे मानले तरीही काही गोष्टी जाणुन घेणं गरजेचे आहे. संभाजी राजांनी पुराण ग्रंथांचे विवेचन करून, त्यातील अर्थपूर्ण भाग निवडून ग्रंथ रचला आहे, हे त्यांनीच नमुद केले आहे. पुराणं असो वा इतर धार्मिक साहित्य या सगळ्याचाच तत्कालीन समाजावर प्रभाव होता. असे साहित्य ब्राह्मण वर्चस्वाने ग्रासलेले होते , त्यामध्ये क्षत्रियांचे कार्य गायी आणि ब्राह्मणांचे रक्षण करणे असे सांगितली आहेत. याच साहित्याचा प्रभाव संभाजी राजांच्या लिखानावर पडला असला तर नवल नाही, कारण शिवरायांना गोब्राह्मण प्रतिपालक म्हणवताना त्यांनी एकही प्रमाण दिलेले नाही तथा या काळात संभाजी राजेंनी हा ग्रंथ लिहिला त्या काळात व त्याच्या आधी आणि नंतरच्या काळात कधीही शिवरायांनी ब्राह्मणप्रतिपालन केल्याचे एकही प्रमाण, तथा पुरावा नाही. त्यामुळे एखाद्या मिथ्या बिरुदावलीपेक्षा प्रत्यक्ष कार्यच महत्वाचे असते हेच सत्य आहे.
        छ.शिवरायांना कुळवाडीभुषण रयतेचा राजा म्हणणे आधिक गौरवास्पद आहे. छ.शिवराय फ़क्त गायी आणि ब्राह्मणांच्या रक्षणाकडे  विशेष लक्ष देत होते, असे गोब्राह्मणप्रतिपालक शब्दावरून वाटू शकते. पण खरे पाहता छ.शिवरायांनी आपल्या अठरा पगड जातींच्या प्रजेसह, प्रजेची शेती, प्रजेने वाढवलेली झाडे यांचेही रक्षण केले. त्याचबरोबर मुस्लिम व इतर धर्मियांना त्यांच्या धर्माप्रमाणे वागवले. म्हणूनच शिवराय "गोब्राह्मणप्रतिपालक" नव्हते तर "कुळवाडीभुषण रयतेचे राजे" होते.
संदर्भ:
श्री.शिवछत्रपती [त्र्यं.शं.शेजवलकर].
शिवचरित्र - मिथक आणि वास्तव [श्यामसुंदर मिरजकर].
मनुस्म्रुती-अध्याय१,श्लोक ८८.
भारद्वाज श्रौतसूत्र ६.१३.१०.
छत्रपती संभाजी महाराज(प्रुष्ठ क्र.८५) - [वा.सी.बेंद्रे].
शिवाजी आणि शिवकाळ (प्रुष्ठ क्र.२०५-२०६,२११-२१३) - [जदुनाथ सरकार].
छ.शिवाजी महाराजांची पत्रे(प्रुष्ठ क्र.१६७)- [प्र.न.देशपांडे].
व्याख्यान(धर्म : बहुजनांचा आणि ब्राह्मणांचा) - [प्राध्यापक राजेंद्र कुंभार] 

28 December 2015

शिवरायांकृत रामदासांना पत्र

        रामदास स्वामींवरील आक्षेपाचे खंडण करण्यासाठी सुनिल चिंचोलकर नामक लेखकाने "श्री समर्थ चरित्र : आक्षेप आणि खंडन" हे पुस्तक (चिंचोलकरांच्या मते ग्रंथ) लिहिले आहे.त्यामध्ये अनेक संघटना रामदासांवर करत असलेले आक्षेप आणि आरोप काहीअंशी खोडण्याचा प्रयत्न केला आहे. पण शेवटी आपण ब्रह्मव्रुंद आहोत हे तो विसरलेला नाही.सुनिल चिंचोलकरने त्या पुस्तकामध्ये शिवाजी महाराजांनी रामदासांना सन १६७८ मध्ये लिहिलेले पत्र दिलेले आहे आणि त्या पत्राच्या आधारे तो रामदासाला शिवाजी महाराजांचा गुरुपदी बसवतो. पण वास्तव सर्वांना समजले पाहिजे. आज रामदासांच्या गुरुत्वाबद्दल (शेवटचा) पुरावा म्हणून रामदास भक्तांकडून वापरले जाणारे अस्त्र म्हणजे शिवरायांनी रामदासांना सन १६७८ मध्ये लिहिलेले पत्र.या पत्रामध्ये रामदासांमुळेच राज्यप्राप्ती झाल्याचे व हे राज्य रामदास चरणी अर्पण करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. या पत्राचे वैशिष्ट्य म्हणजे पत्राच्या वरच्या उजव्या कोपर्यात श्रीरघुपती, श्रीमारुती असे शब्द लिहिलेले आहेत. असे शब्द शिवरायांच्या अन्य कोणत्याच पत्रात नाहीत. शिवरायांच्या इतर पत्रांमध्ये श्रीसांब,श्रीजगदंबा असे शब्द आढळतात. फ़क्त या एका पत्रातच रघुपती आणि मारुती हे शब्द आहेत. रघुपती आणि मारुती ही रामदासांची प्रेरणास्थाने आहेत ही गोष्ट येथे महत्वाची आहे. शिवरायांनी पत्र पाठविणे, रामदासांमुळेच राज्यप्राप्ती झाल्याचे व हे राज्य रामदास चरणी अर्पण करण्याचा मनोदय व्यक्त करणे या क्रुती जर शिवरायांनी केली असती तर शिरायांच्या आणि रामदासांच्या जीवनातील महत्वपुर्ण घटना ठरली असती. मग तिचे प्रतिबिंब शिवकालीन ग्रंथामध्ये निश्चितच उमटले असते. पण तसे काहीही घडलेले नसल्यामुळे हे पत्र बनावट असल्याचे निश्चित होते.
           शिवरायांच्या राज्याभिषेक प्रसंगी म्हणजे स्वतंत्र राज्याच्या घोषणेवेळी ६ जून १६७४ ला रामदास हजर नव्हते. शिवराय १६७६ ते १६७८ दक्षिणेत होते.यादरम्यान रामदासांचा व त्यांचा संपर्कही होणे शक्य नव्हते. मग अचानक या मोहिमेवरून आल्यावर शिवराय रामदासांना गुरुचा दर्जा देतात व त्यांच्या झोळीत राज्य अर्पन करतात ही गोष्ट अनाकलनीय आहे. हे सर्व खोटे असून संपुर्णत: कल्पोकल्पित आहे. हे पत्र बनावट आहे असे शिवचरित्राचे अभ्यासक गजानन भास्कर मेहंदळे यांनी त्यांच्या शिवचरित्रामध्ये नमुद केले आहे. "चाफ़ळची सनद" म्हणून ज्याचा फ़ारच उदो उदो केला गेला त्या पत्राबद्दल त्र्यं. शं. शेजवलकर म्हणतात, "शिवाजीने रामदासाला राज्य अर्पण करण्याची गोष्ट घडलीच असली पाहिजे असे अनुमान करणे अनैतिहासिक आहे. जर अशी गोष्ट प्रत्यक्ष घडली असती तर तीचा उल्लेख कोणत्यातरी शकावलीत, बखरीत आवश्यक आला असता. तो नाही यावरून आणि मिळालेले पत्रही रामदासांच्या भक्तमंडळींतच उपलब्ध झाले आहे हे पाहता त्याबद्द्ल मन साशंक होते. "या सर्व भक्कम परिस्थितीजन्य पुराव्यावरून व इतिहास संशोधकांच्या निष्कर्षावरून हे पत्र खोटे असल्याचे सिद्ध होते.
           पार्थ पोकळे म्हणतात "रामदासांसारख्या वैदिक संतांनी महाराष्ट्र उभारला.बहुजनांच्या शिवाजीला मदत केली. अशा प्रकारचा प्रचार करून त्यांचे उदात्तीकरन केले गेले. या उदात्तीकरणाचा हेतू शुद्ध नाही. बहुजन समाजातील श्रेष्ठ मंडळींना गौणत्व येईल व त्यांचे कार्य गौण ठरेल आणि रामदासांसारखे कसे श्रेष्ठ ठरतील, त्यांचे कार्य कसे श्रेष्ठ होते हे भासविण्याचा प्रयत्न गेली दोनशे वर्ष महाराष्ट्रात झाला आहे" आज रामदास हे शिवरायांचे गुरु नव्हते आणि शिवरायांच्या स्वराज्य स्थापणेस रामदासांची कसलीच प्रेरणा नाही हे स्पष्ट असताना आणि न.र.फ़ाटक, कुरुंदकर आणि त्र्यं.शेजवलकर यांसारख्या विद्वानांनीसुद्धा निर्वाळा दिला असताना सुद्धा अद्यापही रामदासांना शिवरायांचे गुरु दाखवून त्यांनीच स्वराज्य स्थापनेची प्रेरणा दिली असे जेंव्हा मनोरुग्न मंडळी म्हणतात तेंव्हा त्यांच्या अकलेची किव करावीशी वाटते.
        शेजवलकर शिवरायांविषयी म्हणतात, "शिवाजीच्या राज्यस्थापनेचे मुख्य श्रेय त्यांच्या स्वत:च्या स्पुर्तीला, कल्पनेला व पराक्रमाला देणे योग्य आहे असे वाटते. इतिहासात अनेक शतकांनी एखादा स्वयंभू जेता जगाच्या पाठीवर केंव्हातरी, कोठेतरी एकदम उदय पावताना दिसतो, त्या जातीचा शिवाजी आहे.अशी व एवढी पराक्रमी व्यक्ती हिंदुस्तानात मुसलमानी राज्यस्थापनेपासून दुसरी झाली नव्हती. "आज सत्य इतिहास समोर आल्यामुळे रामदास आणि शिवरायांची भेटच झाली नाही हे समोर आले.आजपर्यंत आपल्या लेखणीतून रामदासांच्या उदात्तीकरणाची राजवाडी परंपरा पुढे चालविणारे पुरंदरे रामदास शिवरायांचे गुरु नव्हते आणि शिवरायांची आणि रामदासांची भेटच झाली नाही असे म्हणत आहेत. परंतू वयाच्या ऐंशिव्या वर्षी त्यांना आलेली अक्कल आत्तापर्यंत केलेल्या इतिहासाच्या खोट्या प्रचाराचा परीणाम कसा दूर होणार ? त्यांच्या पुस्तकांच्या हजारो प्रती विकल्या गेलेल्या आहेत. ज्यामध्ये इतिहासाचा खोटा प्रचार केला आहे. शिवराय हे रामदासांच्या जवळ दाखवले आहेत ते चित्र कसे बदलणार ? आजही तेच चित्र बरेच मनोरुग्न प्रसारित करत असतात. आता जागरुत जनतेमुळे पुरंदरेने माघार घेतली हे खरे.पण पुरंदरेंना जर सत्य इतिहास समजण्यासाठी आयुष्यातील पाऊन शतक  लागले तर त्यांनी उर्वरीत आयुष्य आपण नेमका कोणता अभ्यास केला याचे विंतन करण्यात घालवावे आणि चुका सुधारून आपल्याला अक्कल असल्याची जाणीव करून द्यावी.
         खरंतर रामदासांच्या उदात्तीकरणाच्या खटपटीत रामदासांचे कर्त्रुत्व शिवरायांच्या गुरुत्वावरच अवलंबून राहिले आणि मर्यादित राहिले. ज्यावेळी रामदास शिवरायांचे गुरु नाहीत हे सत्य बाहेर येईल आणि रामदास कर्त्रुत्वशुन्य ठरतील तेंव्हा मोठी अडचण होणार हे जाणुन पेशवेकालीन बखरींना ऐतिहासिक पुरावा म्हणुन पुढे आणले गेले आणि कहान्या रचल्या.शेकडो पुस्तके लिहिली आणि पुर्ण वेळ खोटा प्रचार केला असाच खोटा प्रचार आजही सुरुच आहे.
            छत्रपती शिवराय आणि रामदास यांच्यातील फ़रक साधायचा झाल्यास छत्रपती शिवराय हे शिवभक्त होते व भवानी मातेचे भक्त होते. तर रामदास हे रामभक्त होते.शिवाजी महाराजांची घोषणा होती "हर हर महादेव" तर रामदासांची घोषणा होती "जय जय रघुवीर समर्थ". शिवराय मस्तकी शिवगंध धारण करायचे,त्यांनी रायगडावर बांधलेले जगदिश्वराचे मंदिर या सर्व शिवभक्तीची साक्ष देतात तर प्रतापगडावरील भवानी देवी, त्यांच्या पत्रामधील भवानी देवीचे उल्लेख ते भवानीदेवीचे भक्त असल्याचे स्पष्ट करतात.शिवरायांनी कोठेही रामाचे एखादे मंदीर बांधल्याचा किंवा जिर्णोद्धार केल्याचा उल्लेख नाही. या साध्या गोष्टीवरून देखील रामदास हे शिवरायांचे गुरु होते असे म्हणणे म्हणजे शुद्ध मुर्खपणाच आहे हे सिद्ध होते. जातीश्रेष्टत्वाच्या तोर्यामुळे निर्माण केलेले कुटील षडयंत्र आहे. नाहीतरी बा. र. सुंठणकर म्हणतातच, "शिवाजीच्या राज्यस्थापनेत रामदासाच्या कर्त्रुत्वाचे फ़ाजील स्तोम माजविण्यात आले आहे. त्याला इतिहासात काढीचा आधार नाही."
संदर्भ :
 श्री समर्थ चरित्र : आक्षेप आणि खंडन [सुनिल चिंचोलकर]
शिवरायांचे प्रेरणास्त्रोत आणि खरे स्वराज्यद्रोही [चंद्रशेकर शिखरे]
शिवाजी महाराज की सत्ता बहुजन समाज के लिये थी ब्राह्मणों के लिये नही,बहुजनोंका बहुजन भारत (साप्ताहिक)
वर्ष ३ रे अंक २७ दि.७ मार्च २००४.प्रुष्ठ क्र.८८ ते ९१.
छ.शिवाजी महाराजांची पत्रे [प्र.न.देशपांडे].
श्री राजाशिवछत्रपती (प्रुष्ठ क्र. ४५ ते ४६,५२)[त्र्यं.शं.शेजवलकर].
बहुजनांचा सांस्क्रुतीक संघर्ष (पृष्ठ क्र.२७९)[पार्थ पोकळे]
महाराष्ट्रीय संत मंडळांचे ऐतिहासिक कार्य (आवृत्ती पहिली,पृष्ठ क्र.१३६)[बा.र.सुंठणकर]

27 December 2015

जरी तो ब्राह्मण झाला कर्मभ्रष्ट तरी.....??

संतश्रेष्ठ तुकोबांच्या हयातीत मंबाजी भट-ब्राह्मण आणि त्यांचे सर्व साथीदार यांनी तुकोबांचा खुप कडाडून विरोध केला. त्यांचे अभंग नदीत बुडविले. गाथा इंद्रायणीच्या डोहात बुडवली आणि तुका सदेह वैकुंठाला गेला अशी आवई मात्र जोरात उठवली. नदीत बुडवूनदेखील तुकोबांचे अभंग लोकांत राहिलेच. ते तेच म्हणू लागले आणि जेंव्हा अभंग बुडवूनसुद्धा आणि तुकोबांना संपवूनही तुकोबा संपत नाही असं दिसून आलं तेंव्हा मंबाजीचे सर्व प्रकारचे सर्व वारसदार तुकोबांचे कौतुक करू लागले. त्यांच्या अभंगात आपले फ़ुसके अभंग घुसडू लागले [त्यांचेच वंशज आजही आहेतच]. त्यांच्या अभंगावर कथा-किर्तने करू लागले.पण हे सगळे करताना एक करू लागले की तुकोबांनी अंधश्रद्धेवर व अन्यायावर जे कोरडे ओढले होते ते लोकांपर्यंत पोहचणार नाहीत अशी दक्षता घेऊ लागले.
असेच काही फ़ुसके क्षेपक अभंग तुकोबांच्या गाथेत आढळतात त्यातील एक प्रचलित म्हणजे "जरी तो ब्राह्मण झाला कर्मभ्रष्ट । तुका म्हणे श्रेष्ठ तिन्ही लोकी ॥ [३०४०].तुकोबांची ब्राह्मणांविषयी ही आस्था आधिक ताणून "जरी  ब्राह्मण झाला भ्रष्ट तरी तो तिन्ही लोकी श्रेष्ठ असे भ्रष्ट ब्राह्मणांविषयी उदारतेचे उद्गार काढणारे तुकोबाराय" सर्वप्रथम श्री  अनंतदास रामदासींनी उभे केले; आणि ’तुका म्हणे तुम्ही देवा द्विज वंद्य’ [शा.२८८४] आदि अभंग पाहून "रुढ मुल्यांवर निष्ठुरपणे प्रहार करणारे तुकोबा शांत मन:स्थितीत पुन: रुढीपुढे नम्र होतात."हे मात्र सत्य नाही.जरी तो ब्राह्मण झाला कर्मभ्रष्ट । तुका म्हणे श्रेष्ठ तिन्ही लोकी.[३०४०] हे तुकोबांचे म्हणणे केवळ औपरोधित किंवा अर्थवादात्मक आहे"(सा.सं.तु.प्रुष्ठ:१४०) वस्तुश: असली दोनचार वचणे हे गाथेच्या अंगावरील आगंतुक कोडच म्हंटले पाहिजे. असल्या भोंगळ वचनांच्या विरोधात तुकोबांची शेकडो युक्तियुक्त वचणे बाह्या ठोकून उभी आहेत.
यथार्तवाद सांडून उपचार बोलती ते अघोर भोगतील ! "तुका म्हणे आम्ही येथील पारखी । छंदावी सारिखी नव्हो ऐसी" माझ्या जातीचे वजनास बोल कोण ठेवू शके ? "सत्या नाही पाठीपोट" व "लटकियाची न करू स्तुती हिशेब आले ते घ्यावे" हीच तुकोबांची खरी कणखर भुमिका ! "गुण-अवगूण निवाडा " करणारा व "अवगुणी दंडण गुणी पुजा" हे न्याय्य ब्रिद सांभाळणारा तुकोबांचा ’निवाड्याचा ठाव’ असली बुद्धिभेद करणारी वचणे उच्चारूच शकत नव्हता,हे उघड आहे.[९६२, ११३७, १३६७, २३७६,२३७८,२७३५,३४८५,३५१८,(पं.५२४९),५३४७].
"पंडिता: समदर्शिन:" व "य.क्रियावान स पंडित:" यापैकी एकही गुण अंगी नसलेल्या पण अंगी ज्ञानपणाची मस्ती ठेवून इतरांना हिन,तुच्छ समजणार्या ब्राह्मणांना तुकोबा स्पष्टपणे सुनावतात की, "मर्यादा ते जाण अरे अभागिया । देवाच्या ऐसिया सकळ मुर्ती ॥","करी अनेकांचा अपमान । खळ छळवादी ब्राह्मण । तया देता दान । नरका जाती उभयता ॥".असे रोखठोक बाण्याचे तुकोबा; "ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा करू पाहतो" म्हणणार्या शिवरायांच्या प्रणालीचेच होते. म्हणूनच तुकोबांनी ’भेदवाही’ व ’खळवादी वेव्हार’ करणार्या ब्राह्मणांना ’भ्रष्ट सुतकिया खेळ..विटाळ पातकी..न्यानगंडे ढोरे’ इ. शेलक्या शिव्या हासडल्या आहेत व नरकगामी म्हंटलेले आहे.(११२९, १३४५, २३३६, ३६७८, ४५०५)."महाराचा स्पर्ष झाल्यामुळे ज्या ब्राह्मण म्हणविणार्यास क्रोध येतो, तो खरा ब्राह्मणच नव्हे. " या दोषद्रुष्टीमुळे त्याच्या हातून जे पातक घडाले गेले, त्या पातकाला देहान्त प्रायचित्ताशिवाय अन्य प्रायश्चित नाही" हा रोखठोक निर्णय तुकोबा सुनावतात; किंबहुना तया प्रायश्चित काही देहत्याग करता नाही. असे त्यापुढेही एक पाऊल टाकतात. "यातिकुळ येथे असे अप्रमाण । गुणाचे कारण असे अंगी ॥" असे वारंवार झडझडून सांगणार्या तुकोबांनी कोणत्याही कर्मभ्रष्टाला श्रेष्ठत्व देणे शक्यच नाही. हे अभंग बळीच घुसडलेले आहेत.मग हे असले अभंग एखाद्या "सालो-मालो" चे असोत की "श्री समर्थप्रतापामधील एखाद्या हेळवाकीच्या अथवा बिडवीच्या रामदास्याचे असोत.
तुकोबा जर कोणा कर्मभ्रष्ट ब्राह्मणांनाही श्रेष्ठ म्हणू शकले असते तर त्यांचे साहित्य बुडविण्याचे महत्पाप कोणालाही करावेसे वाटले नसते. "सत्याचिया लोपे पापे घडती" या धारणेने तुकोबा सत्य तेच बोलायचे. शिवाय सामान्य समाज हा तत्कालीन ब्राह्मणांच्या नादी लागून आंधळ्याचे काठी लागलेल्या आंधळ्याप्रमाने देवधर्माला आचवन गर्तेत बुडत आहे हे द्रुष्य़ तुकोबांना डोळा देखेवेना. त्याकाळी ब्राह्मणांचे किती अंध:पात झाला होता याची शेकडो प्रमाणे तुकोबांच्याच नव्हे तर ब्राह्मण लेखकांच्याही साहित्यात मिळते.रामदासांचे शिष्य दिनकर गोसावी "स्वानुभव-दिनकर" ग्रंथात ब्राह्मण भांग सेवू लागल्याचे लिहिले आहे.किंबहुना "ब्राह्मण झाले दासीगमनी" असे वर्तवले आहे. समर्थबंधु "श्रेष्ठ" यांनी सुद्धा "तपसत्यविहिन द्विज परान्न प्रद्रव्य परस्त्रीलोलुप" होऊन "तीर्थव्रतादि करणारांचा उपहास" करीत, "वेदशास्त्र पुराण"च नव्हे, तर "कन्याविक्रय"करीत. "दुष्टदेवा दुष्टपरिग्रह दुराचारी दुराग्रह व मद्यमांसाशन" हेच ब्राह्मणांचे स्वरूप झाले होते असे म्हंटले आहे(भक्तिरहस्य). खुद्द रामदास स्वामी सुद्धा "ब्राह्मण बुद्धिपासून चेवले । आचारापासून भ्रष्टले ॥", ब्राह्मणास ग्रामणीने बुडविले, मिथ्या अभिमान गळेना मुर्खपणाचा, आदि वचणं बोलीले आहेत. संत कान्होबा म्हणतात, "उत्तम ब्रह्मकर्म सोडून अठरा यातीचे व्यापार ब्राह्मण करत."
ब्राह्मणांचा देह शुद्रकर्मासाठी नसतो असे भागवत म्हणते. वेदाखेरीज अन्य कार्य करणारा ब्राह्मण जीवंतपणीच शुद्र होतो. अशीही स्म्रुती आहे. तरीपण व्याजबट्याचा व्यवसाय ब्राह्मणांनी सर्वत्र स्विकारलेला दिसतो आणि स्म्रुतीनियमाप्रमाणे असे करणे पाप होते. साता दिवसांचा जरी झाला उपाशी । तेने किर्तनासी सोडू नये ॥ हे तुकोबांचे नि:स्प्रुह लोकशिक्षणव्रत म्हणजे ब्रह्मकर्मावर आक्रमण वा अपराध म्हणता येईल का ? ब्राह्मण वेदविद्वांस मद्यमांस, अंगीकरून भेद न देखता खुशाल गोंधळ घालायचे, केवळ पिंडाचे पाळण करण्यासाठी पुण्यविकारा करायचे किंबहुना आचार सांडून अधर्मा टेकायचे, चहाड्चोर व्हायचे. अर्थात त्याकाळी बहुतांशी ब्राह्मण वंदाया पुरते तणसाचे वाघ होऊन राहिले होते आणि आपली आब्रु वाचवण्यासाठी "ब्राह्मण जरी झाला भ्रष्ठ । तरी तो तिन्ही लोकी श्रेष्ठ" असल्या बिनबुडाच्या पाट्या रंगवाव्या लागत होत्या. मग अशांना "हिन सुकराच्या जाती" म्हणून तुकोबांनी संबोधले तर चुकले कोठे ?.
सर्वात महत्वाचे म्हणजे ब्राह्मण त्याकाळी वयक्तिक चरित्रच गमावून बसला होता असे नाही. तर स्वदेश, स्वभाषा व स्वदेशधर्म आपल्या शुद्रस्वार्थापायी कोळून पिताना दिसत होता.
सांडुनिया रामराम । ब्राह्मण म्हणती दोमदोम । 
तुका म्हणे व्रुत्ती । सांडूनी गदा मागत जाती ॥(७९३)
पोटासाठी खौसा । वंदिती म्लेच्छांच्या ॥ (३०३५)
हे निरुपायाने आपदधर्म म्हणून ते करीत होते, असेही नाही.स्वार्थ बुडविली आचरणे (३९२२) असे तुकोबा सांगतात तर रामदास म्हणतात."कित्येक दावलमलकास जाती । कितेक पिरास भजती । कितेक तुरूक होती । आपुले इच्छेने ॥" इथे आपुले इच्छेने  हे शब्द विशेष लक्षणीय आहेत.
एकूण ब्राह्मणवर्ग परधर्मिय मुसलमानांच्या सेवेत गर्क झालेला असून त्याची नीतिमत्ताही सामान्य जनांच्या पातळीवर आलेली होती. ब्राह्मण वर्गात अमुक एक गोष्ट न करणारा असा राहिला नव्हता असे त्र्यं.शं.शेजवलकर म्हणतात. वि.का.राजवाडे देखील मान्य करतात की "घाटांचे दर्गे बनले आणि राऊळाचे महल झाले, फ़ार काय सांगावे, ब्राह्मण दावलमलकादि पीरांना भजू लागले. कित्येक ब्राह्मण पीरांचे मुजावरही बनले ! ते बहुतेक मुसलमान बनन्यासारखे झाले, इतकेच की त्यांनी सुनतेची दिक्षा मात्र घेतली नाही, तीही त्यांनी घॆतली असती, परंतू त्यांच्या आड एक मोठी धॊंड आली ती धॊंड म्हणजे महाराष्ट्रातील साधूसंत होते." याच साधुसंतांचे मुख्य प्रतिनिधी शिवबालकिल्यात संतश्रेष्ठ तुकोबा हे होते आणि ते "झाडू संतांचे मारग" या प्रतिज्ञेने कटिबद्ध होऊन भक्तिच्या सुगम मार्गाने संपुर्ण बहुजन समाजाची उन्नती सारी शक्ती एकवटून करू पाहत होते.
अवघ्या दूर्बळ जगात "दुर्बळांच्या नावे डोंगारा पिटून" आपली प्रतिष्ठा टिकवण्यासाठी ब्राह्मणांनी जो ’लटकियाचा वाहो’ म्हणजे असत्य रुढ्यांचा हैदोस चालवला होता, तो जनजाग्रुतीद्वारे हाणुन पाडण्यासाठी "गाडीन मी भेद । प्रमाण तो यासी वेद ॥" अशी प्रतिज्ञा तुकोबांना करावी लागली. भेद वाढवणार्या धर्मठकांची रोखठोक पणे "वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा" या आत्मविश्वासपुर्ण घोषणेने तुकोबांनी इंद्रायणीच्या वाळवंटात समतेचा झेंडा रोवला.ही घटना अटकेपार झेंडा रोवण्याच्या घटनेपेक्षा कमी नव्हेच, उलट आधिक गौरवाची आहे.
म्हणुनच "वर्ण-अभिमाने कोण झाले पावन । ऐसे द्या सांगूण  मजपाशी ॥
अत्यंजादि योनी तरल्या हरीभजणे । तयांची पुराणे भाट झाली ॥
            असे ठणकावून वर्णव्यवस्थेची रेवडी उडवून टाकणारे तुकोबा कोणत्याही कर्म-भ्रष्ट झालेल्या ब्राह्मणाला सर्वश्रेष्ठत्वाचे प्रमाण दिले असेल असे ज्यांना वाटेल त्यांना वाटो पण हा अभंग निश्चितच क्षेपक आहे.
संदर्भ : 
संतश्रेष्ठ श्री तुकोबांच्या अभंगगाथा [शासकीय,पंढरीप्रत,श्री पडवळ संपादित]
श्री.शिवछत्रपती(प्रुष्ठ क्र.३४) [त्र्यं.शं.शेजवलकर].
छ.शिवाजी महाराजांची पत्रे(प्रुष्ठ क्र.१६७)- [प्र.न.देशपांडे].
संतश्रेष्ठ तुकाराम : वैकुंठगमन की खून ? [साहित्यरत्न सुदाम सावरकर].
गीता (अ. ६-श्लो. १८) [व्यास].
महाभारत (शां.२६५-९) [वाल्मिकी].
भागवत (११-१७-४२).
स्वानुभव-दिनकर (९-२-७७)[दिनकर गोसावी].
भक्तिरहस्य (२-३९,४०.७३-४६,४८).
पहिला सुमनहार (प्रुष्ठ क्र.१२७) [श्री अनंतदास रामदासी].
दासबोध (१४-७-३१ते ३९)[समर्थ रामदास].
संत आणि समाज(प्रुष्ठ क्र.१२०) [श्री कारखाणीस].

20 April 2014

महाराष्ट्राचे हृदयसम्राट : ज्ञानराज

               संत ज्ञानेश्वरांचा जन्म इ.स. १२७५ मध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत व आईचे नाव रुक्मिणीबाई असे होते. विठ्ठलपंतचे मूळ घराणे पैठणजवळील आपेगावचे; पण पुढे ते आळंदी येथे स्थायिक झाले. ज्ञानेश्वर जन्मले ते सनातनी समाजाचा शाप घेवूनच. ‘संन्याशाचा मुलगा’ हा शिक्का त्यांच्या कपाळावर समाजाने मारला होता. त्यांचे वडील विठ्ठलपंत कुलकर्णी यांनी काही काळ संन्यास घेतला आणि नंतर गुरूच्या आज्ञेवरून परत ते संसारात आले. त्यानंतर त्यांना निर्वृतीनाथ, ज्ञानदेव, सोपानदेव, मुक्ताबाई अशी चार मुले  जन्माला आली. कर्मठ व नतद्रष्ट समाजाला ते पाहवले नाही. त्याने या कुटुंबाला बहिष्कृत करून कुटुंबाचे स्वास्थ हिरावून घेतले. तरीपण निष्ठुर समाजाने त्या चार अनाथ लेकारांनाही छळले.
आपेगाव हे औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणजवळ गोदावरी नदीच्या काठावर वसलेले छोटे गाव आहे. विठ्ठलपंत तीर्थयात्रा करत करत श्री क्षेत्र आळंदी मुक्कामी येऊन स्थायिक झाले. आळंदी हे सिद्धपीठ होते. त्या काळी संन्यासाची मुले म्हणून सर्व समाज या चौघा भावंडांची हेटाळणी करीत असे. परित्यक्त ब्राह्मण म्हणून त्यांना काळ कंठावा लागला. श्रीज्ञानेश्र्वरांच्या आई-वडिलांनी देहांत प्रायश्र्चित घेतले.
ज्ञानराज माऊली..
        संत ज्ञानेश्वर म्हणजे महाराष्ट्राचे एक अनमोल रत्न ! महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनातील, परमार्थाच्या क्षेत्रातील ‘न भूतो न  भविष्यति’ असे अजोड व्यक्तिमत्त्व व अलौकिक चरित्र म्हणजे संत ज्ञानेश्वर! गेली सुमारे ७४० वर्षे महाराष्ट्रातील सर्व पिढ्यांतील, सर्व स्तरांतील समाजाने जे व्यक्तिमत्त्व आपल्या मनोमंदिरात एक अढळ श्रद्धास्थान म्हणून जपले आहे आणि जे श्रद्धास्थान पुढील असंख्य पिढ्यांतही कायमच अढळ व उच्चस्थानी राहणार आहे; असे एकमेवाद्वितीय व्यक्तिमत्त्व म्हणजे श्री संत ज्ञानेश्वर!
          अलौकिक काव्य प्रतिभा लाभलेला रससिद्ध महाकवी, महान तत्त्वज्ञ, श्रेष्ठ संत, सकल विश्र्वाचे कल्याण चिंतणारा भूतदयावादी परमेश्वरभक्त, पूर्ण ज्ञानाचे मूर्तिमंत प्रतीक, श्रीविठ्ठलाचा प्राणसखा - अशा शब्दांत त्यांचे वर्णन केले जाते. परंतु त्यांचे परिपूर्ण वर्णन करण्यासाठी शब्द अपुरे पडल्याचेही जाणवते. संत चोखामेळा पुढील शब्दांत त्यांना वंदन करतात.
‘कर जोडोनिया दोन्ही। चोखा जातो लोटांगणी।।
महाविष्णूचा अवतार। प्राणसखा ज्ञानेश्वर।।’ 
             प्राणसखा' हा अतिशय वेगळा, सुंदर व समर्पक शब्द चोखोबांनी संत ज्ञानेश्वरांबद्दल वापरला आहे.
संत ज्ञानेश्वरांविषयी तुकोबा म्हणतात...
ज्ञानियांचा गुरु राजा महाराव । म्हणती ज्ञानदेव तुम्हां ऐसें ॥१॥
मज पामरा हे काय थोरपण । पायींची वाहान पायीं बरी ॥२॥
ब्राह्मादिक जेथें तुम्हां वोळगणें । इतर तुळणे काय पुढं ॥३॥
तुका म्हणे नेणें युक्तीची ते खोली । म्हणोनी ठेवीली पायीं डोई ॥४॥
तर नामदेव महाराज ज्ञानेश्वरांबद्दल उद्गारतात...
ज्ञानराज माझी योगियांची माऊली । जेणे निगम वल्ली प्रगट केली ॥१॥
गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी । ब्रह्मानंद लहरी प्रगट केली ॥२॥
अध्यात्म विद्येचे दाविलेसे रुप । चैतंन्याचा दिप उजळला ॥३॥
नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी । एक तरी ओवी अनूभवावी ॥४॥
ज्ञानराज म्हणजे माय मराठीचे हृदय !
          श्री निवृत्तीनाथ हेच संत ज्ञानेश्र्वरांचे सदगुरू होते. ज्ञानेश्वरांनी भगवद् गीतेवर  प्रख्यात टीका लिहिली.या ग्रंथास ‘ज्ञानेश्वरी’ किंवा ‘भावार्थदीपिका’ असे म्हणतात. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून संस्कृत भाषेतील ‘ज्ञान’, श्री संत ज्ञानेश्वरांनी प्राकृत भाषेत आणले.
माझा मराठाचि बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके।
ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।। 
               असे म्हणत त्यांनी मराठी भाषेविषयीचा अभिमान, मराठीची महती व्यक्त केली आहे. सर्व स्तरांतील लोकांना ही ‘ज्ञानेश्वरी’ भुरळ घालते. मराठी भाषेतील हा अद्वितीय ग्रंथ आहे. विचार, भावना, आशयाची खोली, अलंकाराचे श्रेष्ठत्व, अद्वैतानुभूती, भक्तीचा ओलावा, रससंपन्नता या सर्वच बाबतीत ज्ञानेश्वरीने उंची गाठलेली आहे. ‘पसायदान’ ही विश्वकल्याणाची प्रार्थना म्हणजे संत ज्ञानेश्वरांच्या वैश्विक सद्भावनेचा, तसेच प्रतिभेचा परमोच्च साक्षात्कार आहे. कर्मयोग, ज्ञानयोग व भक्तियोग सांगणार्‍या ग्रंथराज ज्ञानेश्वरीत सुमारे ९००० ओव्या आहेत. हा ग्रंथ इ.स. १२९० मध्ये लिहिला गेल्याचे मानले जाते.
पुर्वी गीता ही संस्क्रुत भाषेमध्ये होती. ही संस्क्रुत भाषा सर्वसामान्य मराठी माणसाला समजत नव्हती. म्हणूनच ज्ञानेश्वरीच्या रुपाने हीच गीता ज्ञानेश्वरांनी प्रथम मराठीमध्ये आणली. इ.स.१२७५ मध्ये जन्मलेल्या संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेले पसायदान आजही भारतात म्हंटलं जातं.ज्ञानेश्वर  केवळ गीतेचे भाष्यकारच नव्हते तर लेखक आणि कवीही होते.भागवत धर्माला त्यांनी तात्विक अधिष्ठान दिले.संस्क्रुत भाषेच्या वर्चस्वाच्या काळात सामान्य माणसाला मराठीतून आध्यात्मज्ञान उपलब्ध करून मराठी भाषेला प्राधान्य मिळवुन दिले.
           त्यांचा दुसरा ग्रंथ ‘अनुभवामृत’ किंवा ‘अमृतानुभव’ होय. हा विशुद्ध तत्त्वज्ञानाचा ग्रंथ आहे. सुमारे ८०० ओव्या या ग्रंथात आहेत. तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने हा श्रेष्ठ ग्रंथ आहे. वाङमयीन सौंदर्य व गुणविशेषांबरोबरच मराठीचा अभिमान, संयम, उदात्तता, नम्रता, त्यांचे निर्मळ चारित्र्य, सर्वसमावेशकता, वात्सल्य, भक्तिपरता आणि कालातीतता - असे अनेक गुणविशेष त्यांच्या साहित्यातून आपल्याला अनुभवण्यास मिळतात. ज्ञानदेवांसह सर्व भावंडांवर तत्कालीन समाजाने प्रचंड अन्याय केला, पण त्या अन्यायाबद्दलची पुसटशी प्रतिक्रियादेखील त्यांच्या साहित्यात आढळत नाही, हे त्यांच्या मनाचे मोठेपणच.!
        ‘जो जे वांछिल, तो ते लाहो’ असे म्हणत अखिल विश्वाची जणू काळजी वाहणार्‍या संत ज्ञानेश्वरांना वारकरी संप्रदायासह सर्वच भक्त प्रेमाने ‘माउली’ म्हणतात. त्यांनी धर्मातील क्लिष्ट अवडंबरे काढून धर्माला कर्तव्याचा वेगळा अर्थ दिला. वाङ्मय निर्मितीबरोबरच त्यांनी आध्यात्मिक लोकशाहीचे बीज रोवण्याचा यशस्वी प्रयत्न चंद्रभागेच्या वाळवंटात केला. भागवत धर्माचा तथा वारकरी संप्रदायाचा पाया रचण्याचे अभूतपूर्व कार्य त्यांनी केले. संत नामदेव, संत गोरोबा कुंभार, संत सावतामाळी, संत नरहरी सोनार, संत चोखामेळा या समकालीन संत प्रभावळीचे अनौपचारीक नेतृत्व करत, संत ज्ञानेश्वरांनी अध्यात्माच्या क्षेत्रात समानता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला.
महाराष्टातील वारकरी संप्रदायची प्रतिष्ठापणा ज्ञानेश्वरांनी केली. त्यांनी समाजातल्या सर्व लोकांना भागवत पंथाच्या झेंड्याखाली एकत्र आणले. ज्ञानेश्वरांच्या काळात  नाम शिंपी, नरहरी सोनार, सावता माळी, कान्होपात्रा असे कित्येक भागवत भक्त अभंगरचना करत होते. हे वारकरी कोणालाही श्रेष्ठ-कनिष्ठ मानत नव्हते. ज्ञानदेवांनी लोकांना भक्तीचा सोपा मार्ग दाखवला. परमेश्वरला तुमच्याकडून काही नको असते. देव भक्त भावाचा भुकेला असतो तुम्ही मनापासून भक्ती करा. त्यासाठी पुजा व अर्चेचे अवडबर  माजवण्याची  गरज नाही. केवळ नामस्मरण करा, देव तुमच्यावर प्रसन्न होईल. ज्ञानेदेव जरी मोठे तत्त्वज्ञ होते तरी ते रुक्ष स्वभावाचे नव्हते. उलट त्यांच्या वागणुकीत सर्वांना आईचे वात्सल्य दिसायचे. म्हणूनच सर्वच भक्त ज्ञानेश्वरांना प्रेमाने ‘माउली’ म्हणतात. 
        ‘अमृतानुभव’ या ग्रंथाच्या लेखनानंतर संत ज्ञानेश्वरांनी तीर्थयात्रा केली. संत नामदेव महाराजांच्या ‘तीर्थावली’ मध्ये या तीर्थयात्रेचा उल्लेख आढळतो. या यात्रेनंतर माउलींनी समाधी घेण्याचा निर्णय घेतला. संत नामदेवांच्या ‘समाधीच्या अभंगां’मध्ये तत्कालीन संदर्भ सापडतात. अन्य संतांची मानसिक स्थिती, त्यांच्यासह समाजाला झालेले दु:ख, खुद्द नामदेव महाराजांच्या वेदना, ज्ञानेश्वरांचा संयम आणि निग्रह या सर्व गोष्टींचे प्रतिबिंब समाधीच्या अभंगांत आढळते.
        ज्ञानेश्वरांनी केवळ मराठी साहित्यालाच नाही तर संपुर्ण जनमाणसाला दिलेली अम्रुतवाणी लोकांच्या चिरकाल स्मरणात राहिल. ते सांगत असलेले तत्वज्ञान सनातनी लोकांना समजत नव्हते, की त्यांचा विरोध होता की कोनते कारण होते. त्यांच्या समाधीपणात ते अल्प काळात समाधिस्त झाले. त्यांचे समाधी घेणे म्हनजे न उलघडलेलं कोडंच आहे. आज श्री ज्ञानराजांचे समाधीजीवन असे या महापुरुषाचे लोकोत्तरत्व दर्शविणारे वेगळे कार्य सदभक्तांद्वारे अहमहमिकतेने प्रचारिले जाते. त्याब बाबत कोणी शब्द काढला तरी तो द्वेषी वा तिरस्कारणीय नास्तिक ठरतो.पण मराठीजन म्हणून एवढं मात्र नक्की वाटते की ज्ञानराज जर अजुन काही दिवस जिवंत राहिले असते तर मराठी भाषेला अजुन मोठ्या दर्जाची सम्रुद्धी प्राप्त झाली असती यात काही एक दुमत नाही. असा हा महान ज्ञानसुर्य इ.स.१२९६ ला आळंदी इथे समाधिस्त झाला.
संदर्भ :
मराठी संतांचा परमार्थमार्ग [गुरुदेव रानडे].
संत आणि समाज [पद्मश्री का.कारखानीस ].
संतश्रेष्ठ तुकोबांच्या अभंगाचा गाथा [शासकीय].
आंतरजालावरील काही संकेतस्थळे.
दैनिक देशोन्नती [आत्मोन्नती गुरुवार,दि.२० नोव्हेंबर २००८].

17 April 2014

"अब्राह्मणी" इतिहासकार : कॉम्रेड शरद पाटील

दिनेश पाटील
संपर्क : ९६२३८५८१०४
        स्वातंत्र्य समता आणि मित्रता ही त्रयी फ़्रेंच समाजक्रांतीने प्रथम प्रवर्तित केली नसून नितींच्या वैराजाने केलेली आहे. तिची समतावादी परंपरा "अब्राह्मणी" परंपरा म्हणून वैदिक काळापासून ओळखली जाऊ लागली. असा क्रांतिकारक सिद्धांत मांडून भारतीय इतिहासातील "अब्राह्मणी" इतिहास आणि ज्ञानपरंपरेची सशक्त पुराव्यानिशी पुनर्मांडणी कॉम्रेड शरद पाटील यांनी केली. म्हणूनच अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचा पहिला "इतिहासकार वा.सी.बेंद्रे पुरस्कार" त्यांना जाहीर झाला, ही महत्वाची घटना आहे. इतिहास संशोधक वा. सी. बेंद्रेंनी अब्राह्मणी इतिहास लेखणाचा प्रवाह मराठ्यांच्या इतिहास लेखणात विकसीत केला. त्यामुळेच इतिहासाची नव्याने मांडणी करणार्या संशोधकास हा पुरस्कार दिला गेला. या पुरस्काराच्या निमित्ताने त्यांच्या संशोधनाला ॲकॅडेमिक मान्यता मिळत आहे.
            गेली ४० वर्ष एक "जीवनदायी कार्यकर्ता" म्हणून संशोधन आणि चळवळ या दोन्ही क्षेत्रात अखंडपणे कार्यरत असणार्या शरद पाटील यांना अवहेलना, द्वेष आणि मनहानी सहन करत अत्यंत एकाकी प्रवास करावा लागला. हा प्रवास कोणत्याही वैचारिक तडजोडीशिवाय झाला असल्याने एक "जैविक विचारवंत" ही त्यांची ओळख कोणालाही पुसता येणार नाही.
इतिहासाची पुनर्मांडणी करताना त्यांनी मांडलेली भुमिका, लावलेला इतिहासाचा अन्वयार्थ याबाबत नेहमीच अभ्यासकांमध्ये मतभेद आढळतात. भविष्यातही ते निर्माण होतील. परंतू इतिहासाच्या अभ्यासाची त्यांची अन्वेषण पद्धत, त्यांचे सिद्धांत समग्र समाजाचा इतिहास समजून घॆऊ इच्छिणार्यांना सतत प्रेरक शक्ती देणारे आहेत. भुतकाळाच्या घनदाट अरण्यात दडलेल्या अनेक प्रश्नांची त्यांनी दिलेली उत्तरे नवी द्रुष्टी आणि आत्मविश्वास देतात.
          राम आणि क्रुष्ण यांची भारताच्या इतिहासातील भुमिका, भारतातील आद्य स्त्रीसत्ताक गणराज्याचे ऐतिहासिक महत्व असे अनेक मुलभुत विषय त्यांनी सैद्धांतिक मांडणीत केंद्रस्थानी आणले. इ.स.१९८२ मध्ये रणजित गुहा यांच्या नेत्रुत्वाखाली "वंचितांचे" भारताच्या इतिहासातील योगदान मांडणारा "सबर्ल्टन प्रकल्प" सुरु झाला. त्याअगोदर शरद पाटील यांनी वंचित / हीन मानल्या गेलेल्या जात समुह तसेच स्त्रियांच्या योगदानाचे महत्व अधोरेखित करनार्या अब्राह्मणी परंपरेची सैद्धांतिक मांडणी सुरु केली होती हे महत्वाचे.
         इतिहासाला बुद्ध, दिग्नाग, धर्मकीर्ती ते फ़ुले आंबेडकरांचे असणारे योगदान सैद्धांतिक पातळीवर मांडण्याचा बहुदा पहिला यशस्वी प्रयत्न त्यांनी केला. तर फ़ुले आणि आंबेडकर हे दार्शनिक होते हे त्यांनीच सिद्ध केले. भारतीय इतिहासातील अब्राह्मणी ज्ञानशाखेची असणारी भक्कम परंपरा हजारो वर्षाचा भारताचा इतिहास नव्या परिप्रेक्ष्यात मांडून त्यांनी पुढे आणली. "दासशुद्रांची गुलामगिरी", जातिव्यवस्थाक सामंती सेवकत्व, जात्यंतक भांडवलदारी लोकशाही क्रांती व तिची समाजवादी पुर्ती व प्रिमिटिव्ह कम्युनिझम, मात्रुसत्ता-स्त्रीसत्ता आणि भारतीय समाजवादी या चार ग्रंथामधून त्यांनी हा महाप्रकल्प साकार केला.
           शिवराय-संभाजींची सर्वाधिक चिकित्सा धर्मकेंद्री झाली आहे. ती तशी का झाली हे नव्याने सांगण्याची गरज नाही; परंतू या चिकित्सेतून शिवराय-संभाजींच्या ऐतिहासिक योगदानाला योग्य न्याय मिळाला नाही. शरद पाटील यांनी त्यांच्या "शिवाजीच्या हिंदवी स्वराज्याचे खरे शत्रु कोण-महंमदी की ब्राह्मणी ?" या बहुचर्चित मौलिक ग्रंथात जातकेंद्री अन्वेषन पद्धतीद्वारे या दोघांचे समतावादी समाज उभारणीतील मौलिक योगदान पुढे आणले. या पुस्तकाने अनेक प्रश्न उपस्थित करून महाराष्ट्रातील प्रस्थापित इतिहास लेखनासमोर कडवे आव्हान उभे केले. महाराष्ट्राची अस्मिता असनार्या शिवरायांच्या वस्तुनिष्ठ आकलनाच्या अनेक शक्यता त्यातून स्पष्ट झाल्या. हे पुस्तक म्हणजे कॉम्रेड शरद पाटील यांचे महाराष्ट्राच्या इतिहासाला असणारे अद्वितीय योगदान आहे. याबरोबरच "अब्राह्मणी साहित्याचे सौंदर्यशास्त्र" या ग्रंथाने संस्क्रुतीतील  सौंदर्यशास्त्राचे स्थान मराठी साहित्य आणि संस्क्रुतीच्या संदर्भात अधोरेखित केले.
         मराठी साहित्याला स्वत:चे स्वतंत्र सौंदर्यशास्त्र नाही. म्हणूनच हे सौंदर्यशास्त्र दिग्नाग आणि धर्मकीर्ती यांसारख्या बौद्ध दार्शनिकांच्या सौंदर्यशास्त्रीय योगदानाशी नाते जोडत दलित अदिवासी साहित्यातील समन्वयातून उभारण्याचा आग्रह त्यांनी धरला.संस्क्रुत, प्राच्यविद्या  आणि तत्वज्ञान या तिन्ही शाखांचा आणि सर्वाहारांच्या चळवळीतील रस्त्यावरचा कार्यकर्ता म्हणून त्यांनी घेतलेला अनुभव यामुळे त्यांच्यातील इतिहास संशॊधकाची द्रुष्टी आधिक व्यापक, मुलगामी झाली आहे. त्यांची ही द्रुष्टी निखळ भुमिकेतून स्वीकारल्यास इतिहासाच्या आकलनाच्या प्रस्थापित मर्यादा आणि सांस्क्रुतीक राजकारणाचे दबाव झुगारून संशोधन करण्यासाठी आवश्यक आत्मविश्वास आणि मनोधैर्य अभ्यासकांना मिळेल. ज्याची उद्याच्या काळात अनिवार्य गरज आहे.
         शरद पाटील यांच्या संशोधनाची तुलना "अल्जेरीअन मनोविश्लेषक" आणि "काळ्यांच्या" आत्मसन्मानाच्या लढ्यातील जीवनदायी कार्यकर्ता फ़्रांन्झ फ़ॅननशी करता येईल. त्यांच्या "वसाहतवादाचे मानसशास्त्र" मांडनार्या "द रेचेड ऑफ़ द अर्थ" या १९६३ मधील महान साहित्य क्रुतीने तुलनात्मक वाचन केल्यास शरद पाटील यांच्या योगदानाचे महत्व अधिक प्रकर्षाने जाणवते. त्यांनी वर्गजातीस्त्रीदास्यातांच्या लढ्यांना अग्रकमाने समजावून घेत माफ़ुआ अन्वेषण पद्धतीने वासाहतिक काळ आणि एकुणच भारतीय इतिहास याकडे पारंपारिक मार्क्सवादी अभ्यासकापेक्षा वेगळ्या आणि बहुपर्यायी द्रुष्टीने पाहिले. याचे कारण असे की फ़क्त मार्क्सवाद, फ़ुलेवाद किंवा आंबेडकरावाद हे द्रुष्टीकोन स्वतंत्रपणे वापरल्यामुळे  समाजाच्या आकलनावर मर्यादा येतात. त्याऐवजी मार्क्स, फ़ुले आणि आंबेडकरांचा समन्वय साधणारी बहुप्रवाही "मार्क्सवाद - फ़ुले - आंबेडकरवाद" ही अब्राह्मणी अन्वेषणपद्धती आधिक व्यापक आणि सर्वस्पर्शी असल्याने या पद्धतीची अनिवार्यता शरद पाटील सातत्याने मांडत आले आहेत. या अन्वेषणपद्धतीमध्ये ते ब्राह्मणी/अब्राह्मणी या कोटीक्रमांचा वापर करतात.हा कोटीक्रम जातीवाचक नसून ज्ञानपरंपरावाचक आहे.
कॉम्रेड शरद पाटील यांची ग्रंथसंपदा : 
            कॉ. शरद पाटील यांनी दास - शुद्रांची गुलामगिरी, खंड एक भाग १ व दोन इंग्रजी व मराठी तसेच रामायण-महाभारतातील वर्ण संघर्ष खंड १ भाग , जाती व्यवस्थापक सामंती सेवकतत्त्व हे इंग्रजी व मराठी खंड २ भाग १ तसेच शिवाजीच्या हिंदवी स्वराज्याचे खरे शत्रू कोण, खंड भाग २  जात्यंतक भांडवलदारी लोकशाही क्रांती व तिची समाजवादी कृती, मराठी व हिंदी, खंड  तर खंड ४  मध्ये प्रिमिटिव्ह कम्युनिझम मातृसत्ता-स्त्रीसत्ता आणि भारतीय समाजवाद असे चार खंड लिहिले आहेत. इतर पुस्तकांमध्ये अब्राह्मणी साहित्याचे सौंदर्यशास्त्र, मार्क्‍सवाद-फुले- आंबेडकरवाद, भारतीय तत्त्वज्ञान व नास्तिक मत बुध्द-भारतीय इतिहासातील लोकशाही, स्वातंत्र्य व समतेचा अग्निस्रोत, पश्चिम भारतीय स्वायत्त आदिवासी राज्याची भूमिका, स्त्री शूद्रांच्या स्वराज्याचा राजा, शोध, मूलनिवासींचा की शूद्र वर्णाचा जात्यंतक समतेचा? नामांतर-औरंगाबाद आणि पुण्याचे, बुध्द, भिक्खू, आनंद, धम्म-आनंद-वधू विशाखा यांचा समावेश आहे.

13 April 2014

इतिहासावरील विषाणू दाखवणारा लेखक

             आपल्या देशाचा इतिहास म्हणजे गुलामगिरीचा इतिहास होय. हिंदुस्तान आणि महाराष्ट्राचा विचार केला तर बाहेरून आलेल्या आर्यांच्या टोळ्यांनी इथल्या मुळ रहिवाशी महारट्ठ यांना जिंकुन इथला मुळ इतिहास मिटवण्याचे काम या टोळ्यांनी केले. राजमाता जिजाऊ, विश्ववंद्य शिवराय यांनी गुलामगिरीचा इतिहास बदलला आणि स्वराज्याची स्थापना केली.नंतर फ़ुले, शाहू, आंबेडकरांनी [यामध्ये केळुस्कर गुरुजी आणि जवळकर यांचेही मोलाचे योगदान आहे.] आपल्या इतिहासात घुसखोरी करणार्या विषाणूंना नष्ट केले व स्वत: इतिहास समोर आणला. परंतू [अजुनही] आपल्या इतिहासात विषाणू लपून बसले आहेत हे विषाणू दाखविण्याचे काम डॉ.बालाजी जाधव हे करीत आहेत.
डॉ.बालाजी जाधव समिक्षक, विचारवंत आणि नव्या पिढीचे लेखक आहे. मराठा सेवा संघाची मराठवाडा विभागाची त्यांच्याकडे जबाबदारी आहे. महाराष्ट्रभर त्यांचे व्याख्यानाचे कार्यक्रम होत असतात. त्यांचे कार्यक्षेत्र मोठे आहे. शिवाय ते उच्चशिक्षित बी. एच. एम. एस डॉक्टर आहेत. सध्या एम. डी. चेही शिक्षण चालू आहे. तरूण वयात अल्पावधीतच त्यांनी हे यश प्राप्त केलं आहे. समाजसेवेचे व्रुत्त घॆऊन ते काम करत आहेत. त्यांच्याशी संवाद साधताना त्यांनी मराठ्यांना संघटीत होण्याचे आवाहन केले आहे. त्यांची घेतलेली ही मुलाखत.
खंरत्नाकर डागळे : आपण लेखक म्हणून परिचीत आहात त्याच बरोबर मराठा सेवा संघाचे कार्य ही चालू आहे. या विचाराकडे आपण कसे वळलात ?
डॉ.जाधव साहेब : तसा मी कट्टर शिवसैनिक होतो. घरातही हिंदुत्ववादी वातावरण. माझ्या घरात बाळासाहेब ठाकरे यांचे फ़ोटो असायचे. सामना या दैनिकातील कात्रणं मी काढून ठेवत. ते आजही माझ्याकडे आहेत.मी कट्टर हिंदुत्ववादी होतो.आज अगदी या विरोधी आहे.
रत्नाकर खंडागळे : मग परिवर्तनवादी विचाराकडे कसे ?
डॉ.जाधव साहेब : मी प्रथम कट्टर हिंदुत्ववादी होतो. मी कुणाचेही काही ऐकत नव्हतो. माझ्या भावांनी मला एकदा प्रश्न केला की, शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध का झाला ? या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नव्हते. त्यांनी दुसरा प्रश्न केला की, तुकाराम महाराज वैकुंठी गेले की त्यांच्या खून झाला ? याही प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नव्हते. मात्र भावाने असे प्रश्न केल्याने मी मात्र भावावर खवळलोच तेंव्हा भावाने मला आ.ह.साळूंके यांचे विद्रोही तुकाराम, मा.म.देशमुख यांचे रामदास पेशवाई आणि गोविंद पानसरे यांचे शिवाजी कोण होता हे पुस्तक वाचण्यास सांगितले. दुसरा प्रसंग असा घडला की, मी लातुरला १२ वी इंटरशीपला असतांना माझा मित्र भोसले मला मा.म.देशमुख यांच्या केडर कॅंपला घेऊन गेला होता. तेंव्हा मला त्यांचे विचार आवडले आणि डोळ्यावरची हिंदुत्ववादाची झाडप गळून पडली. आपणही समाजासाठी काहीतरी करावं असं ठरवलं. त्यावेळेस मा.म.देशमुख यांची भेट घेतली. त्यांनी शिक्षण विचारलं, मी १२ वी इंटरशिपला असल्यामुळे त्यांनी नंतर या तुमचं समाजासाठी काम करण्याचं वय नाही असे सांगितले. ही आपलेपणाची भावना मला पटली कारण असे कोणीही सांगत नाही तेंव्हा पासून मी या चळवळीत कार्य करायचं ठरवलं व त्याप्रमाणे मी कार्य करत आहे.
रत्नाकर खंडागळे : आपण लिखानाकडे कसे वळलात ? 
डॉ.जाधव साहेब : मराठा सेवा संघाचे किर्तन ऐकले व जेम्स लेन हे प्रकरण झालं तेंव्हा अक्षरशा मी रडलो. यावेळेस मी या विषयावर अनेक पुस्तकं वाचली यावरच मी माझ्या शैलीत एक प्रकरण लिहिले या प्रकारे मी लेखनाकडे वळलो. एक द्रुष्टी मिळाली ओळीचा मतिअर्थ समजला.
रत्नाकर खंडागळे : आपले पहिले पुस्तक कोणते ? काही अडचणी आल्या का ?
डॉ.जाधव साहेब : रामदासी पेशवे शिवाजी महाराजांवर शिंतौडे उडवत होते. तेंव्हा मराठा हा झोपलेलाच होता त्यांना जागे करण्यासाठी मराठ्यांनो षंड झालात काय ? हे पहिले पुस्तक लिहिले.अडचण म्हणजे हे पुस्तक छापायला कोणी प्रकाशक तयार नव्हता. मुद्रकही छापायला तयार नव्हता. तेंव्हा नाव न टाकण्याच्या अटीवर एक मुद्रक तयार झाला व मी ही आईच्या नावाने पंचफ़ुला प्रकाशन मार्फ़त पहिले पुस्तक छापले. ह्या पुस्तकाची दोन वर्षात १५००० प्रति विकल्या गेल्या. काही पुस्तके तर आमच्या बौद्ध बांधवांनी स्वत: वाटली.७ हजार पुस्तके जिजाऊ स्रुष्टीवर दोन तासात विकल्या गेली या पुस्तकाच्या सात आव्रुत्या आहेत.
रत्नाकर खंडागळे : आगामी कुठलं पुस्तक येतय ? किती पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत.
डॉ.जाधव साहेब : सध्या खेडेकर साहेबांच्या जिजाऊ कहे शिवबासे या पुस्तकाचे अनुवाद चालू आहेत. त्याच वाघ्या कुत्र्यावर ही पुस्तक येतय. माझी पाच पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. त्यामध्ये मराठ्यांनो षंड झालात काय ?, नाठाळांच्या काठी हानू माथा,ब्राह्मणांना का झोडपू नये, जेम्स लेन पुस्तकातील ब्रह्मराक्षस हे पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.
रत्नाकर खंडागळे : शिवधर्माबद्दल थोडं सांगा.
डॉ.जाधव साहेब : शिवधर्म म्हणजे एक जाती अंताची चळवळ आहे. इथला बहुजन समाज अठरा पगड जातीत विभागला आहे.त्यांना स्वत:ची ओळख नाही. त्यांना ओळख देण्याचे काम आम्ही करतो. बौद्ध धर्म आणि शिवधर्माच्या माध्यमातून आम्ही जाती अंताचा लढा लढतोय.
रत्नाकर खंडागळे : मराठा आरक्षणा बाबत काय मत आहे ?
डॉ.जाधव साहेब : मराठा समाज हा शिक्षणापासून दुर आहे.आरक्षण हे बाबासाहेब आंबेडकर आणि भाऊसाहेब देशमुख यांनी दिले आहे. सामाजिक,शैक्षणिक आणि मागासलेपण दुर करण्यासाठी दिले आहे. परंतू कुणबी आणि मराठा असा भेद करून ते नाकारले गेले आहे. त्यासाठी आम्ही लढत आहोत. ओबीसी ला आमचा विरोध नाही ते आमचे बंधुच आहेत.वैदिक विरुद्ध अवैदिक असा हा लढा आहे.
रत्नाकर खंडागळे : तरुणांना काय संदेश द्याल ?
डॉ.जाधव साहेब : मराठा तरुणांमध्ये एक दुर्गुण आहे ते एकमेकांच्या जवळ येत नाहीत. जेम्स लेन प्रकरणात ब्राह्मण समाज एक झाला परंतू आमचा मराठा समाज एक होत नाही. त्यांच्या अहंमपणाची भावना आहे.
ही भावना टाकून आज तरुणांनी संघटित व्हावे. आज विचार, देवान-घॆवान करणं महत्वाचं आहे. मोठा भाऊ म्हणून काम करावं तेंव्हा इतिहास सांगण्याचा व शिकवण्याचा अधिकार राहिल.
मुलाखत : रत्नाकर खंडागळे