विश्ववंद्य छत्रपती शिवरायांनी अठरापगड जातींना सोबत घेऊन मराठा स्वराज्य स्थापन केले. मराठा स्वराज्य म्हणजे सर्व जाती धर्मातील रयतेच्या आशा आकांक्षा पुर्ण करणारे लोकल्याणकारी राज्य. आजपर्यंतच्या इतिहासात पाहिले तर बर्याच अंशी इतिहासाचा विपर्यास केला गेला आहे. त्यामधील सर्वाच चर्चेचे ठरलेले प्रकरण म्हणजे स्वराज्याचे प्रेरणास्थान. आजपर्यंतचा इतिहास बघितला तर शिवरायांचे प्रेरणास्थान रामदास होते असा गवगवा केला गेला त्याचबरोबर पुरोगामी संघटनांचे म्हणने आहे शिवरायांचे प्रेरणास्थान तुकोबा होते. यातुनच "शिवरायांचे प्रेरक कोण रामदास स्वामी की तुकाराम महाराज" या वादाला परिमाण प्राप्त झाले आहे. वास्तविक इतिहास बघता शिवरायांचे गुरु किंवा प्रेरणास्थान म्हणून रामदासांचा किंवा तुकाराम महाराजांचा एकही उल्लेख सापडत नाही. पण मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर साहेब ज्याप्रमाणे म्हणतात "जेंव्हा जेंव्हा आपल्याकडे कागदोपत्री काही पुरावे उपलब्ध नसतात त्या वेळेस आपल्या मेंदूचा तार्किक पद्धतीने वापर केला पाहिजे." त्याप्रमाणे चिकित्सा केली पाहिजे.
क्षत्रियकुलावतंस श्री शिवाजी महाराज भोसले यांच्या पराक्रमास इ.स. १६४० चे सुमारास प्रारंभ झाला असे श्री वि.ल.भावे म्हणतात तर प्रत्यक्ष राज्य स्थापनेला सुरुवात इ.स. १६४५ साली झाली. त्यांची मुद्रा असणारे पहिले पत्र इ.स. १६४६ चे असे नरहर कुरुंदकर म्हणतात आणि ते सभासदाची बखर आणि शिवभारत इत्यादिंशी सुसंगत आहे. यावेळेपर्यंत रामदासस्वामी हे शिवरायांच्या प्रदेशात आलेही नव्हते. वर्णवर्चस्ववादी वि.का.राजवाडे यांनी "राष्ट्रगुरू रामदास" या लेखात छत्रपती शिवरायांच्या एकंदर व्यक्तिमत्वाच्या तसेच स्वराज्याच्या उभारणीत रामदासांचा कसा वाटा आहे हे ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे पटवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये ऐतिहासिक पुराव्यांच्या नावाखाली उत्तरकालीन खोट्या रामदासी बखरींचा संसर्भ देण्यात आला होता. उत्तरकालीन बखरी ह्या सर्वात अविश्वसनीय मानल्या जातात. कारण त्या सर्व पेशवेकालीन आहेत.
रामदास स्वामी महाराष्ट्रात पहिल्यांदा आले ते इ.स. १६४४ मध्ये. यावेळी महाराष्ट्राच्या ज्या भागात रामदास स्वामींनी वास्तव्य केले तो भाग म्हणजे महाबळेश्वर. त्यावेळी महाबळेश्वर, जावळी वगैरे ठिकाणे ही शिवरायांच्या शत्रुकडे होती. त्यामुळे तिकडे शिवरायांच्या भेटीचा प्रश्नच उद्भवत नव्हता. रामदासी संप्रदायाचा विश्वकोश "दासविश्रामधाम" या ग्रंथाप्रमाणे रामदास पिशाचलिला करत होते. यामुळे त्या काळात ते "पिसाट रामदास" म्हणूनच ते चहुकडे ओळखले जायचे. याच काळात त्यांनी अदिलशहाच्या मुलुखातील चाफ़ळ येथे श्रीरामाच्या मुर्तीची स्थापना इ.स.१६४८ मध्ये केली. याचवेळी विजापुरच्या सरदारांकडून इनाम जमिनीही मिळवल्या. दियानतराव व बाजी घोरपडे यांनी रामदासांना जमीनी इनाम देऊ करून त्यांचे शिष्यही बनले. याच वेळेस बाजी घोरपड्याने शहाजीराजांना कपटाने पकडून दिले. यावरून स्पष्टच आहे की तेंव्हा शहाजीराजे, शिवाजी महाराज किंवा स्वराज्याशी रामदासांचा यावेळेपर्यंत तरी कुठलाही संबंध नव्हता हेच सिद्ध होते.
अर्थात सत्य काय आहे, "शिवरायांच्या स्वराज्य ऊभारणीस ९ वर्षे झाली तोवर रामदासांचे पाऊल शिवरायांच्या प्रदेशातही नव्हते. ते होते शत्रुंच्या प्रदेशात". ज्यावेळी रामदास महाराष्ट्रात आले त्यांच्या आगमनापुर्वी पाच - सहा वर्षापासून तुकाराम महाराजांची किर्ती व वाणी मात्र सर्वत्र दुमदुमत होती हे बहिनाबाईंचे आत्मचरित्र सांगते. तेंव्हा मावळखोर्यातील लोकांची मनोरचना स्वराज्य उभे करण्याची पुर्व तयारी रामदासांना करता येणे शक्य नसून ते कार्य तुकोबांनीच केले होते हेच निष्पन्न होते. शिवकालीन महाराष्ट्रात झालेल्या क्रांतीचा विचार करणे म्हणजे शिवाजी महाराजांच्या केवळ भौतिक साधनांचा विचार करून चालणार नाही तर त्याकाळी लोकांचा आत्मा कोणत्या स्वरुपाचा होता याचा विचार करणे आवश्यक आहे असे महाराष्ट्रधर्मकार भा.वा.भट म्हणतात. महाराष्ट्रातील साधुसंत यांनी समतेची शिकवण दिली, भजनी मेळावे भरवले, त्यामुळे समाजात चैतन्य निर्माण झाले आणि शिवाजी महाराजांना स्वराज्य संघटना करण्यासाठी जाग्रुत जनतेची बैठक मिळाली. श्री. त्र्यं. शेजवलकर यांनी राज्याची सप्तांगे सांगुण म्हंटले आहे, "शिवाजीने प्रथम शेवटचे अंग जे मित्र ते जोडून घेतले ही गोष्ट कधी साध्य झाली याचा इतिहास अज्ञात आहे. पण त्याने हाती घेतलेल्या कार्यात वाटेल ते परिश्रम करणारे, प्रसंगी जीवावर उदक सोडणारे मित्र त्याला मिळाले हे सर्वात आधी लक्षात घेतले पाहिजे. समाजाची उंची वाढवण्यास शिवाजीला राजकारणापुढे केंव्हाच उसंत मिळाली नाही" मग हे कार्य शिवरायांच्या उदयकाळी कोणी केले ?
बहुजन समाजास जागरुकतेचा संदेश देऊन समता, बंधुभाव इत्यादी राष्ट्रीय सदगुणांची ओळख करून देण्यास श्री तुकाराम महाराजांची अभंगवाणी कारण ठरली असे किर्तनसम्राट श्री नित्यानंद मोहिते म्हणतात. सर्व संतांमध्ये श्री तुकाराम महाराज यांची कामगिरी विषेश नजरेत भरण्यासारखी आहे. त्यांनी आपल्या भक्तीपुर्ण, रसाळ, सोप्या अर्थपुर्ण अभंगातून जनतेमध्ये जाग्रुती निर्माण केली व म्रुतवत पडलेल्या महाराष्ट्राला अभंगरुपी संजिवनी देऊन त्यांच्यात नवचैतन्य निर्माण केले. श्री बाळशास्त्री हरदास म्हणतात, "श्री तुकाराम महाराजांमुळेच पंडीत - अपंडीत, शुद्र-अतिशुद्र, यच्चयावत बहुजन समाज देवनिष्ठेच्या आणि धर्मनिष्ठेच्या सुत्रात उपनिबद्ध होऊन पंढरीच्या पांडुरंगाच्या केंद्राभोवती एकात्म भुमिकेवर आला. श्री तुकारामांच्या ठिकाणी स्वतंत्र संप्रदाय प्रवर्तकाचे सामर्थ्य होते". तर ह. श्री. शेणोलीकर म्हणतात, "धर्माभिमान, स्वामीनिष्ठा, शरीरसुखापेक्षा धर्मनितीचे श्रेष्ठ्त्व, धर्मकर्मापेक्षा चित्तशुद्धीचे व सदाचाराचे महत्व इ. उच्चतर जीवनमुल्यांनी ओळख तुकारामांनी सामान्य जनतेला करून दिली. त्यांच्या या विधायक कार्याने शिवकार्याला उपयोगी असा ध्येयनिष्ठ, सुसंघटित व कार्यक्षम मराठा समाज तयार झाला. त्यात मराठा मावळ्यांच्या बळावर स्वराज्यसंपादनाच्या कार्यात शिवरायांना यशस्वी होता आले".
मावळ्यांना धर्मवाड:मय कोणतेही माहीत असेलच तर तुकोबांचे अभंगच होय. मावळ्यांना धर्मनीतीव्यवहाराचे मोठे शिक्षण तुकोबांच्या किर्तनातून मिळाले होते हे अमान्य करणे शक्य नाही. समाज हा विराट पुरुष आहे व विराट झालेल्या महात्म्यावाचून त्याला गदगद हालवायला कोणीही समर्थ होत नाही. असे पांगारकरांचे विचार सार्थच आहेत. म्हणूनच श्री ना.ग.जोशी म्हणतात, "महाराष्ट्राची उंची व गौरव वाढविण्याचे ,या राष्ट्रगत व्यक्तित्वाच्या आविष्काराचे कार्य संतश्रेष्ट तुकारामांनी जे केले ते अपुर्व आहे". "एखादा संत म्हणजे नुसता मऊ मेंगुळवाणा माणुस अशी जी समजुत वारकरी संतांबाबत रुढ झाली तिला संपुर्णपणे निरुत्तर करणारा जबाब या विभुतीने केला". कळीकाळालाही पायाशी नमवण्याची अमोघ शक्ती ज्यांच्याजवळ आहे. त्यांच्या मनाची थोरवी केवढी असेल. अशा या विठठलाच्या गाढ्या विरांमध्ये तुकारामांचे स्थान अत्युच्यपदी आहे हे स्वाभाविकच आहे. तुकारामांची उन्नत व्यक्तिरेखा मोठी उठावदार दिसते आणि युगपुरुष त्याला मिळालेले महत्व सार्थ ठरते.
तुकोबा खरे युगपुरुष होते.समकालीन संत बहिनाबाईंनी त्यांना सर्वद्रष्टा, सर्वांतरसाक्षी, विश्ववंद्य इत्यादी विशेषणे लावली असून रामेश्वरांनी विश्वसखा, सच्चिदानंदमुर्ति इत्यादी पदव्यांनी गौरवले आहे. एवढेच नाही तर त्यांनी तुकोबांचा गौरव करताना म्हंटले आहे, "तुकाराम तुकाराम । नाम घॆता कापे यम ॥ धन्य तुकोबा समर्थ । जेणे केला पुरुषार्थ ॥". अर्थात तुकोबा हेच स्वराज्योदयकाळी वस्तुत: समर्थ म्हणुन सर्वत्र गाजत होते असे रामेश्वरांच्या उद्गारावरून दिसते. या राष्ट्रपुरुषाच्या महत्कार्याचा गौरव त्यांचे काळीच सतजन करीत. म्हणजे आपल्या कार्याची फ़लश्रुती तुकोबांना आपल्या चाळीसीतच पाहायला मिळाली. अशा परिस्थितीत शिवरायांना कोणाकडेही पाठवण्याची तुकोबांना काय आवश्यकता उरली होती ? आणि कोणत्या विषेश प्राप्तव्यासाठी ? गेली कित्येक वर्ष शुन्यातून स्रुष्टी उभी करणार्या शिवबांना खास कोणता मंत्र मिळवायचा राहिला होता ?
एक विषेश बाब अशी की, "शिवाजी महाराज नेहमी फ़िरत असून वेळोवेळा तुकारामांचे किर्तन ऐकावयाची संधी साधीत असत. असा इतरत्र स्पष्ट उल्लेख आहे मग अशा वेळी त्यांस दर्शन होत नसे का ?" असे केळुसकर गुरुजी म्हणतात त्यावेळी श्री रा.ग.हर्षे म्हणतात की, "शिवाजी अनेक बार तुकोबांच्या किर्तनाला येत पण एकमेकांच्या प्रत्येक्ष भेटीचा असा प्रसंग कधी आला नव्हता." पण हे म्हणने किती असंभाव्य ठरते ?. बाबा याकुत सारख्या फ़किराकडे श्रद्धेने जाणारे शिवाजी पुण्यानिकटच्या देहूच्या महाराष्ट्रसिद्ध तुकोबांना विसरतील आणि दिल्लीपर्यंत ख्यात असणार्या शिवयुवकाचे नाव शेजारच्या तुकोबांना ठाऊक नसेल हा सामान्यज्ञानविरोधा कुतर्क कोण मानणार ?
देहू पुणे अन आसपासच्या गावागावात । अहा वसविली श्री तुकयाने भक्तीची पेठ ॥
कीर्ती सकळही शिवरायांच्या श्रवणावर आली । श्रद्धा या सत्पुरुषावर शिवरायाची जडली ॥
हे अगदी स्वाभाविकच आहे.
आता रामदासांच्या कारकिर्दीकडे वळुया, पुर्वोक्त रामदास हे स्वराज्याचा यत्न केला तेंव्हा महाराष्ट्रातही आले नव्हते. श्री नरहर कुरुंदकर म्हणतात, "शिवाजीच्या स्वराज्य उद्योगाला सुरुवात इ.स.१६४५ ला आणि मुद्रा असणारे पत्र इ.स.१६४६ चे व रामदासी पंथाची स्थापना इ.स.१६४९ ची हा कालानुक्रम समजून घ्यावा. रामदासी पंथ हा आदिलशाहीत स्थापिला गेला व चाफ़ळ देवस्थानचे पहिले विश्वस्त शिवाजीचे शत्रु आहेत. स्वराज्यनिर्मितीची प्रेरणा समर्थांची नव्हे हाच याचा अर्थ." ह.वी राजमाने म्हणतात, "शिवाजीमहाराजांच्या यश-किर्तीचा प्रताप महिमा मध्यान्हीच्या सुर्यापासून तळपत असताना समर्थ पाहत होते. पण त्यांना भेटण्यास जाण्याचे रामदासांनी मनावर घेतलेले दिसत नाही. रामदास ज्या भागात वावरत होते,तो भाग महाराजांच्या शत्रुच्या ताब्यात होता. त्यामुळे शहाणा माणुस तरी विनाकारण विस्तवावर पाय ठेवण्याचे टाळणारच"
रामदास स्वामी आणि शिवरायांची पहिली भेट राज्याभिषेकापुर्वी झाली नव्हती यावर सर्वांचेच एकमत आहे. पण त्यानंतर केंव्हा झाली याबाबतही अस्सल पुरावा उपलब्ध नाही. दि.२२ जुलै १६७२ रोजी दत्ताजी पंत व गणेश गोजदाऊ यांना जी आज्ञा दिली आहे त्यावरून असे दिसते की तोपर्यंत तरी महाराजांचे रामदासांशी जवळकीचे नाते प्रस्थापित झाले नव्हते. शिवसमर्थांच्या जीवनकालातली व नंतरची कागदपत्रे तर शके १५९४ (इ.स.१६७२) नंतर केंव्हातरी भेट झाली असली पाहिजे असे दर्शवणारी आहेत असे प्रा. फ़ाटक म्हणतात. ती भेट झालीच असेल तर पुढे केंव्हाही होवो पण इ.स.१६७२ पर्यंत मात्र झालेली नव्हती हेच इतिहास सांगतो. श्री नरहर कुरुंदकर म्हणतात, "रामदास-शिवाजी भेट झालीच असेल तर ती इ.स. १६७२ साली झाली, हे एक साधे सत्य आहे. पण समजा ही भेट इ.स.१६४५ साली झाली असती तरी त्यामुळे रामदास हा शिवाजीचा राजकीय गुरु व प्रेरक ठरत नाही.
शेवटी येथे चंद्रशेखर शिखरे यांच्या "शिवरायांचे प्रेरणास्त्रोत आणि खरे स्वराज्यद्रोही" या पुस्तकातील उतारा देत आहे.
"शहाजीराजांचे असामान्य धैर्य, त्यांची स्वतंत्र राज्यकारभार करण्याची व्रुत्ती, त्यांनी मोघलांना दिलेला एक हाती लढा यापासुनच शिवरायांना प्राथमिक प्रेरणा मिळाली. शिवाजीराजांची राजमुद्रा व ध्वज ही शहाजीराजांची देणगी आहे. शिवाजीराजांचे पालनपोषन, संगोपण, त्यांना उत्क्रुष्ठ शिक्षण देण्याची व्यवस्था जिजाऊंनी केली. त्यांनी शिवरायांवर अत्युच्च प्रतिचे संस्कार केले, त्यांच्या मनात स्वतंत्र राज्याचे बीजारोपन केले. हे स्वराज्य अस्तित्वात येण्यासाठी शिवरायांना मार्गदर्शन करून त्यांची खंबीरपणे पाठराखन केली. त्यामुळे जिजाऊ ह्याच शिवाजीराजाच्या प्रेरणास्त्रोत असल्याचे स्पष्ट होते. वारकरी चळवळीच्या व विशेषत: संत तुकारामांच्या प्रबोधन कार्यामुळे शिवाजीराजांच्या स्वराज्यस्थापनेत मदत झाली. त्यांच्या अभंगामुळे समाजजाग्रुती झाली व हजारो मावळे शिवकार्यात सहभागी झाले. या सर्वांचे शिवकार्यात निश्चितच महत्वाचे स्थान आहे. दादोजी किंवा रामदास स्वामी यांचा शिवाजी महाराजांच्या स्वराज्यस्थापनेशी दुरान्वयानेही संबंध नाही हे सुर्यप्रकाशाएवढे स्वच्छ आहे. त्यांनी स्वत:ही असे श्रेय घेतलेले नाही. त्यांच्या जात्यभिमानी अनुयायींनी ओढूनतानून रचलेला हा बनाव आहे. यामध्ये रामदास आणि दादोजी यांच्याच इभ्रतीचे धिंडवडे निघाले आहेत."
यामुळे या तथाकथित इतिहासचार्यांसाठी रामदासांचा एक सल्ला खुप महत्वाचा आहे किमान रामदासभक्तांनीतर मानलाच पाहिजे.
"अक्षरे गाळून वाची । कां ते घाली पदरची ॥
निगा न करी पुस्तकांची । तो येक मुर्ख ॥"
संदर्भ :
पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी (पृष्ट क्र.११) [श्री बाळशास्त्री हरदास],प्राचिन मराठी वाड:मयाचे स्वरुप (पृष्ट क्र.११५) [श्री शेणोलीकर],श्री तुकाराम चरित्र (पृष्ट क्र.४१६) [श्री पांगारकर],शिवरायांचे प्रेरणास्त्रोत आणि खरे स्वराज्यद्रोही.(पृष्ट क्र.४४) [चंद्रशेखर शिखरे],श्री दासबोध (२-२-७०) [समर्थ रामदास स्वामी],श्रीमान योगी, प्रस्तावना [श्री नरहर कुरुंदकर],समर्थांचे गुरु छत्रपती,प्रथमाव्रुत्ती(पृष्ट क्र.४५,४६) [ह.वि.राजमाने],छत्रपती शिवरायांची पत्रे (पहिली आव्रुत्ती,पृष्ट क्र.१४९) [श्री प्र.न.देशपांडे],वारसा (पृष्ट क्र.९२) [वि.ल.भावे],श्री समर्थावतार (पृष्ट क्र. १९५) [श्री देव],समर्थ चरित्र (पृष्ट क्र. २९,पृष्ट क्र.१७०) [ज.स.करंदीकर,प्रा.न.र.फ़ाटक],श्री सांप्रदायिक विविध विषय (पृष्ट क्र. ५८)[श्री देव,राजवाडे],श्री सांप्रदायिक वृत्त व चर्चा (पृष्ट क्र. १६)[श्री भा.वा.भट],अस्मिता महाराष्ट्राची (पृष्ट क्र. ६४) [श्री पा.वा.गाडगीळ],श्री शिवछत्रपती (पृष्ट क्र. ८८,९५) [श्री त्र्यं.श.शेजवलकर], श्री संत तुकारामांची राष्ट्रगाथा (पृष्ट क्र.११) [श्री नित्यानंद मोहिते],छ.शिवाजी महाराज (पृष्ट क्र.५३५) [श्री क्रुष्णाराव अर्जुन केळुसकर],सांप्रदायिक विवेचन (पृष्ट क्र.१२१ ते १२३) [श्री ना.ग.जोशी],शिवायन महाकाव्य (पृष्ट क्र.१०७) [श्री ना.रा.मोरे],तुकाराम चरित्र (पृष्ट क्र.९६) [श्री रा.ग.हर्षे].