6 January 2016

शिवरायांचे प्रेरक : रामदास स्वामी की तुकाराम महाराज ?

         विश्ववंद्य छत्रपती शिवरायांनी अठरापगड जातींना सोबत घेऊन मराठा स्वराज्य स्थापन केले. मराठा स्वराज्य म्हणजे सर्व जाती धर्मातील रयतेच्या आशा आकांक्षा पुर्ण करणारे लोकल्याणकारी राज्य. आजपर्यंतच्या इतिहासात पाहिले तर बर्याच अंशी इतिहासाचा विपर्यास केला गेला आहे. त्यामधील सर्वाच चर्चेचे ठरलेले प्रकरण म्हणजे स्वराज्याचे प्रेरणास्थान. आजपर्यंतचा इतिहास बघितला तर शिवरायांचे प्रेरणास्थान रामदास होते असा गवगवा केला गेला त्याचबरोबर पुरोगामी संघटनांचे म्हणने आहे शिवरायांचे प्रेरणास्थान तुकोबा होते. यातुनच "शिवरायांचे प्रेरक कोण रामदास स्वामी की तुकाराम महाराज" या वादाला परिमाण प्राप्त झाले आहे. वास्तविक इतिहास बघता शिवरायांचे गुरु किंवा प्रेरणास्थान म्हणून रामदासांचा किंवा तुकाराम महाराजांचा एकही उल्लेख सापडत नाही. पण मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर साहेब ज्याप्रमाणे म्हणतात "जेंव्हा जेंव्हा आपल्याकडे कागदोपत्री काही पुरावे उपलब्ध नसतात त्या वेळेस आपल्या  मेंदूचा तार्किक पद्धतीने वापर केला पाहिजे." त्याप्रमाणे चिकित्सा केली पाहिजे.
         क्षत्रियकुलावतंस श्री शिवाजी महाराज भोसले यांच्या पराक्रमास इ.स. १६४० चे सुमारास प्रारंभ झाला असे श्री वि.ल.भावे म्हणतात तर प्रत्यक्ष राज्य स्थापनेला सुरुवात इ.स. १६४५ साली झाली. त्यांची मुद्रा असणारे पहिले पत्र इ.स. १६४६ चे असे नरहर कुरुंदकर म्हणतात आणि ते सभासदाची बखर आणि शिवभारत इत्यादिंशी सुसंगत आहे. यावेळेपर्यंत रामदासस्वामी हे शिवरायांच्या प्रदेशात आलेही नव्हते. वर्णवर्चस्ववादी वि.का.राजवाडे यांनी "राष्ट्रगुरू रामदास" या लेखात छत्रपती शिवरायांच्या एकंदर व्यक्तिमत्वाच्या तसेच स्वराज्याच्या उभारणीत रामदासांचा कसा वाटा आहे हे ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे पटवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये ऐतिहासिक पुराव्यांच्या नावाखाली उत्तरकालीन खोट्या रामदासी बखरींचा संसर्भ देण्यात आला होता. उत्तरकालीन बखरी ह्या सर्वात अविश्वसनीय मानल्या जातात. कारण त्या सर्व पेशवेकालीन आहेत.
       रामदास स्वामी महाराष्ट्रात पहिल्यांदा आले ते इ.स. १६४४ मध्ये. यावेळी महाराष्ट्राच्या ज्या भागात रामदास स्वामींनी वास्तव्य केले तो भाग म्हणजे महाबळेश्वर. त्यावेळी महाबळेश्वर, जावळी वगैरे ठिकाणे ही शिवरायांच्या शत्रुकडे होती. त्यामुळे तिकडे शिवरायांच्या भेटीचा प्रश्नच उद्भवत नव्हता. रामदासी संप्रदायाचा विश्वकोश "दासविश्रामधाम" या ग्रंथाप्रमाणे रामदास पिशाचलिला करत होते. यामुळे त्या काळात ते "पिसाट रामदास" म्हणूनच ते चहुकडे ओळखले जायचे. याच काळात त्यांनी अदिलशहाच्या मुलुखातील चाफ़ळ येथे श्रीरामाच्या मुर्तीची स्थापना इ.स.१६४८ मध्ये केली. याचवेळी विजापुरच्या सरदारांकडून इनाम जमिनीही मिळवल्या. दियानतराव व बाजी घोरपडे यांनी रामदासांना जमीनी इनाम देऊ करून त्यांचे शिष्यही बनले. याच वेळेस बाजी घोरपड्याने शहाजीराजांना कपटाने पकडून दिले. यावरून स्पष्टच आहे की तेंव्हा शहाजीराजे, शिवाजी महाराज किंवा स्वराज्याशी रामदासांचा यावेळेपर्यंत तरी कुठलाही संबंध नव्हता हेच सिद्ध होते.
     अर्थात सत्य काय आहे, "शिवरायांच्या स्वराज्य ऊभारणीस ९ वर्षे झाली तोवर रामदासांचे पाऊल शिवरायांच्या प्रदेशातही नव्हते. ते होते शत्रुंच्या प्रदेशात". ज्यावेळी रामदास महाराष्ट्रात आले त्यांच्या आगमनापुर्वी पाच - सहा वर्षापासून तुकाराम महाराजांची किर्ती व वाणी  मात्र सर्वत्र दुमदुमत होती हे बहिनाबाईंचे आत्मचरित्र सांगते. तेंव्हा मावळखोर्यातील लोकांची मनोरचना स्वराज्य उभे करण्याची पुर्व तयारी रामदासांना करता येणे शक्य नसून ते कार्य तुकोबांनीच केले होते हेच निष्पन्न होते. शिवकालीन महाराष्ट्रात झालेल्या क्रांतीचा विचार करणे म्हणजे शिवाजी महाराजांच्या केवळ भौतिक साधनांचा विचार करून चालणार नाही तर त्याकाळी लोकांचा आत्मा कोणत्या स्वरुपाचा होता याचा विचार करणे आवश्यक आहे असे महाराष्ट्रधर्मकार भा.वा.भट म्हणतात. महाराष्ट्रातील साधुसंत यांनी समतेची शिकवण दिली, भजनी मेळावे भरवले, त्यामुळे समाजात चैतन्य निर्माण झाले आणि शिवाजी महाराजांना स्वराज्य संघटना करण्यासाठी जाग्रुत जनतेची बैठक मिळाली. श्री. त्र्यं. शेजवलकर यांनी राज्याची सप्तांगे सांगुण म्हंटले आहे, "शिवाजीने प्रथम शेवटचे अंग जे मित्र ते जोडून घेतले ही गोष्ट कधी साध्य झाली याचा इतिहास अज्ञात आहे. पण त्याने हाती घेतलेल्या कार्यात वाटेल ते परिश्रम करणारे, प्रसंगी जीवावर उदक सोडणारे मित्र त्याला मिळाले हे सर्वात आधी लक्षात घेतले पाहिजे. समाजाची उंची वाढवण्यास शिवाजीला राजकारणापुढे केंव्हाच उसंत मिळाली नाही" मग हे कार्य शिवरायांच्या उदयकाळी कोणी केले ?
       बहुजन समाजास जागरुकतेचा संदेश देऊन समता, बंधुभाव इत्यादी राष्ट्रीय सदगुणांची ओळख करून देण्यास श्री तुकाराम महाराजांची अभंगवाणी कारण ठरली असे किर्तनसम्राट श्री नित्यानंद मोहिते म्हणतात. सर्व संतांमध्ये श्री तुकाराम महाराज यांची कामगिरी विषेश नजरेत भरण्यासारखी आहे. त्यांनी आपल्या भक्तीपुर्ण, रसाळ, सोप्या अर्थपुर्ण अभंगातून जनतेमध्ये जाग्रुती निर्माण केली व म्रुतवत पडलेल्या महाराष्ट्राला अभंगरुपी संजिवनी देऊन त्यांच्यात नवचैतन्य निर्माण केले. श्री बाळशास्त्री हरदास म्हणतात, "श्री तुकाराम महाराजांमुळेच पंडीत - अपंडीत, शुद्र-अतिशुद्र, यच्चयावत बहुजन समाज देवनिष्ठेच्या आणि धर्मनिष्ठेच्या सुत्रात उपनिबद्ध होऊन पंढरीच्या पांडुरंगाच्या केंद्राभोवती एकात्म भुमिकेवर आला. श्री तुकारामांच्या ठिकाणी स्वतंत्र संप्रदाय प्रवर्तकाचे सामर्थ्य होते". तर ह. श्री. शेणोलीकर म्हणतात, "धर्माभिमान, स्वामीनिष्ठा, शरीरसुखापेक्षा धर्मनितीचे श्रेष्ठ्त्व, धर्मकर्मापेक्षा चित्तशुद्धीचे व सदाचाराचे महत्व इ. उच्चतर जीवनमुल्यांनी ओळख तुकारामांनी सामान्य जनतेला करून दिली. त्यांच्या या विधायक कार्याने शिवकार्याला उपयोगी असा ध्येयनिष्ठ, सुसंघटित व कार्यक्षम मराठा समाज तयार झाला. त्यात मराठा मावळ्यांच्या बळावर स्वराज्यसंपादनाच्या कार्यात शिवरायांना यशस्वी होता आले".
    मावळ्यांना धर्मवाड:मय कोणतेही माहीत असेलच तर तुकोबांचे अभंगच होय. मावळ्यांना धर्मनीतीव्यवहाराचे मोठे शिक्षण तुकोबांच्या किर्तनातून मिळाले होते हे अमान्य करणे शक्य नाही. समाज हा विराट पुरुष आहे व विराट झालेल्या महात्म्यावाचून त्याला गदगद हालवायला कोणीही समर्थ होत नाही. असे पांगारकरांचे विचार सार्थच आहेत. म्हणूनच श्री ना.ग.जोशी म्हणतात, "महाराष्ट्राची उंची व गौरव वाढविण्याचे ,या राष्ट्रगत व्यक्तित्वाच्या आविष्काराचे कार्य संतश्रेष्ट तुकारामांनी जे केले ते अपुर्व आहे". "एखादा संत म्हणजे नुसता मऊ मेंगुळवाणा माणुस अशी जी समजुत वारकरी संतांबाबत रुढ झाली तिला संपुर्णपणे निरुत्तर करणारा जबाब या विभुतीने केला". कळीकाळालाही पायाशी नमवण्याची अमोघ शक्ती ज्यांच्याजवळ आहे. त्यांच्या मनाची थोरवी केवढी असेल. अशा या विठठलाच्या गाढ्या विरांमध्ये तुकारामांचे स्थान अत्युच्यपदी आहे हे स्वाभाविकच आहे. तुकारामांची उन्नत व्यक्तिरेखा मोठी उठावदार दिसते आणि युगपुरुष त्याला मिळालेले महत्व सार्थ ठरते.
          तुकोबा खरे युगपुरुष होते.समकालीन संत बहिनाबाईंनी त्यांना सर्वद्रष्टा, सर्वांतरसाक्षी, विश्ववंद्य इत्यादी विशेषणे लावली असून रामेश्वरांनी विश्वसखा, सच्चिदानंदमुर्ति इत्यादी पदव्यांनी गौरवले आहे. एवढेच नाही तर त्यांनी तुकोबांचा गौरव करताना म्हंटले आहे, "तुकाराम तुकाराम । नाम घॆता कापे यम ॥ धन्य तुकोबा समर्थ । जेणे केला पुरुषार्थ ॥". अर्थात तुकोबा हेच स्वराज्योदयकाळी वस्तुत: समर्थ म्हणुन सर्वत्र गाजत होते असे रामेश्वरांच्या उद्गारावरून दिसते. या राष्ट्रपुरुषाच्या महत्कार्याचा गौरव त्यांचे काळीच सतजन करीत. म्हणजे आपल्या  कार्याची फ़लश्रुती तुकोबांना आपल्या चाळीसीतच पाहायला मिळाली. अशा परिस्थितीत शिवरायांना कोणाकडेही पाठवण्याची तुकोबांना काय आवश्यकता उरली होती ? आणि कोणत्या विषेश प्राप्तव्यासाठी ? गेली कित्येक वर्ष शुन्यातून स्रुष्टी उभी करणार्या शिवबांना खास कोणता मंत्र मिळवायचा राहिला होता ?
         एक विषेश बाब अशी की, "शिवाजी महाराज नेहमी फ़िरत असून वेळोवेळा तुकारामांचे किर्तन ऐकावयाची संधी साधीत असत. असा इतरत्र स्पष्ट उल्लेख आहे मग अशा वेळी त्यांस दर्शन होत नसे का ?" असे केळुसकर गुरुजी म्हणतात त्यावेळी श्री रा.ग.हर्षे म्हणतात की, "शिवाजी अनेक बार तुकोबांच्या किर्तनाला येत पण एकमेकांच्या प्रत्येक्ष भेटीचा असा प्रसंग कधी आला नव्हता." पण हे म्हणने किती असंभाव्य ठरते ?. बाबा  याकुत सारख्या फ़किराकडे श्रद्धेने जाणारे शिवाजी पुण्यानिकटच्या देहूच्या महाराष्ट्रसिद्ध तुकोबांना विसरतील आणि दिल्लीपर्यंत ख्यात असणार्या शिवयुवकाचे नाव शेजारच्या तुकोबांना ठाऊक नसेल हा सामान्यज्ञानविरोधा कुतर्क कोण मानणार ?
देहू पुणे अन आसपासच्या गावागावात । अहा वसविली श्री तुकयाने भक्तीची पेठ ॥
कीर्ती सकळही शिवरायांच्या श्रवणावर आली । श्रद्धा या सत्पुरुषावर शिवरायाची जडली ॥
हे अगदी स्वाभाविकच आहे.
          आता रामदासांच्या कारकिर्दीकडे वळुया, पुर्वोक्त रामदास हे स्वराज्याचा यत्न केला तेंव्हा महाराष्ट्रातही आले नव्हते. श्री नरहर कुरुंदकर म्हणतात, "शिवाजीच्या स्वराज्य उद्योगाला सुरुवात इ.स.१६४५ ला आणि मुद्रा असणारे पत्र इ.स.१६४६ चे व रामदासी पंथाची स्थापना इ.स.१६४९ ची हा कालानुक्रम समजून घ्यावा. रामदासी पंथ हा आदिलशाहीत स्थापिला गेला व चाफ़ळ देवस्थानचे पहिले विश्वस्त शिवाजीचे शत्रु आहेत. स्वराज्यनिर्मितीची प्रेरणा समर्थांची नव्हे हाच याचा अर्थ." ह.वी राजमाने म्हणतात, "शिवाजीमहाराजांच्या यश-किर्तीचा प्रताप महिमा मध्यान्हीच्या सुर्यापासून तळपत असताना समर्थ पाहत होते. पण त्यांना भेटण्यास जाण्याचे रामदासांनी मनावर घेतलेले दिसत नाही. रामदास ज्या भागात वावरत होते,तो भाग महाराजांच्या शत्रुच्या ताब्यात होता. त्यामुळे शहाणा माणुस तरी विनाकारण विस्तवावर पाय ठेवण्याचे टाळणारच"
रामदास स्वामी आणि शिवरायांची पहिली भेट राज्याभिषेकापुर्वी झाली नव्हती यावर सर्वांचेच एकमत आहे. पण त्यानंतर केंव्हा झाली याबाबतही अस्सल पुरावा उपलब्ध नाही. दि.२२ जुलै १६७२ रोजी दत्ताजी पंत व गणेश गोजदाऊ यांना जी आज्ञा दिली आहे त्यावरून असे दिसते की तोपर्यंत तरी महाराजांचे रामदासांशी जवळकीचे नाते प्रस्थापित झाले नव्हते. शिवसमर्थांच्या जीवनकालातली व नंतरची कागदपत्रे तर शके १५९४ (इ.स.१६७२) नंतर केंव्हातरी भेट झाली असली पाहिजे असे दर्शवणारी आहेत असे प्रा. फ़ाटक म्हणतात. ती भेट झालीच असेल तर पुढे केंव्हाही होवो पण इ.स.१६७२ पर्यंत मात्र झालेली नव्हती हेच इतिहास सांगतो. श्री नरहर कुरुंदकर म्हणतात, "रामदास-शिवाजी भेट झालीच असेल तर ती इ.स. १६७२  साली झाली, हे एक साधे सत्य आहे. पण समजा ही भेट इ.स.१६४५ साली झाली असती तरी त्यामुळे रामदास हा शिवाजीचा राजकीय गुरु व प्रेरक ठरत नाही.
शेवटी येथे चंद्रशेखर शिखरे यांच्या "शिवरायांचे प्रेरणास्त्रोत आणि खरे स्वराज्यद्रोही" या पुस्तकातील उतारा देत आहे.
       "शहाजीराजांचे असामान्य धैर्य, त्यांची स्वतंत्र राज्यकारभार करण्याची व्रुत्ती, त्यांनी मोघलांना दिलेला एक हाती लढा यापासुनच शिवरायांना प्राथमिक प्रेरणा मिळाली. शिवाजीराजांची राजमुद्रा व ध्वज ही शहाजीराजांची देणगी आहे. शिवाजीराजांचे पालनपोषन, संगोपण, त्यांना उत्क्रुष्ठ शिक्षण देण्याची व्यवस्था जिजाऊंनी केली. त्यांनी शिवरायांवर अत्युच्च प्रतिचे संस्कार केले, त्यांच्या मनात स्वतंत्र राज्याचे बीजारोपन केले. हे स्वराज्य अस्तित्वात येण्यासाठी शिवरायांना मार्गदर्शन करून त्यांची खंबीरपणे पाठराखन केली. त्यामुळे जिजाऊ ह्याच शिवाजीराजाच्या प्रेरणास्त्रोत असल्याचे स्पष्ट होते. वारकरी चळवळीच्या व विशेषत: संत तुकारामांच्या प्रबोधन कार्यामुळे शिवाजीराजांच्या स्वराज्यस्थापनेत मदत झाली. त्यांच्या अभंगामुळे समाजजाग्रुती झाली व हजारो मावळे शिवकार्यात सहभागी झाले. या सर्वांचे शिवकार्यात निश्चितच महत्वाचे स्थान आहे. दादोजी किंवा रामदास स्वामी यांचा शिवाजी महाराजांच्या स्वराज्यस्थापनेशी दुरान्वयानेही संबंध नाही हे सुर्यप्रकाशाएवढे स्वच्छ आहे. त्यांनी स्वत:ही असे श्रेय घेतलेले नाही. त्यांच्या जात्यभिमानी अनुयायींनी ओढूनतानून रचलेला हा बनाव आहे. यामध्ये रामदास आणि दादोजी यांच्याच इभ्रतीचे धिंडवडे निघाले आहेत."
   यामुळे या तथाकथित इतिहासचार्यांसाठी रामदासांचा एक सल्ला खुप महत्वाचा आहे किमान रामदासभक्तांनीतर मानलाच पाहिजे.
"अक्षरे गाळून वाची । कां ते घाली पदरची ॥
निगा न करी पुस्तकांची । तो येक मुर्ख ॥"
संदर्भ :
पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी (पृष्ट क्र.११) [श्री बाळशास्त्री हरदास],प्राचिन मराठी वाड:मयाचे स्वरुप (पृष्ट क्र.११५) [श्री शेणोलीकर],श्री तुकाराम चरित्र (पृष्ट क्र.४१६) [श्री पांगारकर],शिवरायांचे प्रेरणास्त्रोत आणि खरे स्वराज्यद्रोही.(पृष्ट क्र.४४) [चंद्रशेखर शिखरे],श्री दासबोध (२-२-७०) [समर्थ रामदास स्वामी],श्रीमान योगी, प्रस्तावना [श्री नरहर कुरुंदकर],समर्थांचे गुरु छत्रपती,प्रथमाव्रुत्ती(पृष्ट क्र.४५,४६) [ह.वि.राजमाने],छत्रपती शिवरायांची पत्रे (पहिली आव्रुत्ती,पृष्ट क्र.१४९) [श्री प्र.न.देशपांडे],वारसा (पृष्ट क्र.९२) [वि.ल.भावे],श्री समर्थावतार (पृष्ट क्र. १९५) [श्री देव],समर्थ चरित्र (पृष्ट क्र. २९,पृष्ट क्र.१७०) [ज.स.करंदीकर,प्रा.न.र.फ़ाटक],श्री सांप्रदायिक विविध विषय (पृष्ट क्र. ५८)[श्री देव,राजवाडे],श्री सांप्रदायिक वृत्त व चर्चा (पृष्ट क्र. १६)[श्री भा.वा.भट],अस्मिता महाराष्ट्राची (पृष्ट क्र. ६४) [श्री पा.वा.गाडगीळ],श्री शिवछत्रपती (पृष्ट क्र. ८८,९५) [श्री त्र्यं.श.शेजवलकर], श्री संत तुकारामांची राष्ट्रगाथा (पृष्ट क्र.११) [श्री नित्यानंद मोहिते],छ.शिवाजी महाराज (पृष्ट क्र.५३५) [श्री क्रुष्णाराव अर्जुन केळुसकर],सांप्रदायिक विवेचन (पृष्ट क्र.१२१ ते १२३) [श्री ना.ग.जोशी],शिवायन महाकाव्य (पृष्ट क्र.१०७) [श्री ना.रा.मोरे],तुकाराम चरित्र (पृष्ट क्र.९६) [श्री रा.ग.हर्षे].

4 January 2016

मुस्लिम राज्यकर्ते आणि देवळांची लुट,मोडतोड

           आज समाजामध्ये अनेक संघटना उदयास आलेल्या आहेत. प्रत्येक संघटनेचा लोकांना आपल्याकडे आकर्षीत करण्यासाठी एक युक्तिवाद असतो. त्यामध्ये हिंदूत्ववादी संघटनेंचा सगळ्यात जुना युक्तिवाद म्हणजे मुसलमानांनी आपल्या धर्मावर अन्याय केला, देवळांची लुट केली म्हणून (निव्वळ) मुसलमांनांना विरोध करण्यासाठी हिंदुंनो एक व्हा !. (इथे यांना सामान्य हिंदूंशी काही देणंघेणं नसतं). यामध्ये हिंदू धर्मावर अन्याय करण्यापेक्षा देवळांची लुट केली यावर यांचा जास्त रोष असतो (कारण देशात कितीही मोठा दुष्काळ येवो पण भट-बामनांच्या पोटापाण्याच्या प्रश्नाला देवळामुळे कसलाच चिमटा बसत नाही). पण सामान्य जनतेने या लुटालूट प्रकरणापासून दुरच रहावे (कारण सामान्य जनतेला लुटण्यात देवळांचा पहिला नंबर लागतो) आणि आजही परिस्थिती काही वेगळी नाही. आज जिवंत माणसाला एक वेळचे जेवण मिळो ना मिळो पण देवांना मात्र सकाळ - दुपार - संध्याकाळ पंचपक्वान्नांची न्याहारी आहेच, शिवाय काकडआरत्या, माकडआरत्या आहेतच की. कोट्यावधी गरीब (हिंदू) जनतेला थंडीच्या कडाक्यात साधे अंग झाकण्याइतके कपडे मिळो ना मिळो पण देवांना मात्र छपरीपलंग, मच्छरदाणी, गाद्यागिरद्यांची कमी नाही.
               आज हिंदुत्व, हिंदुराष्ट्र अशा घोषणा आणि भुमिकांच्या आधारावरचे राजकारण गेल्या काही वर्षात वाढू लागले आहे. हिंदुत्ववादी संघटनेंचा एक (त्यांचा) आवडता युक्तिवाद असतो व आहे, मुसलमान क्रुर होते,त्यांनी देवळे पाडली, देवळे भ्रष्ट केली,हिंदू धर्मावर अन्याय-अत्याचार केला, धर्म बुडाला म्हणून सर्व मुसलमान हिंदूविरुद्ध व हिंदू धर्माविरुद्ध असतातच  व आहेत आणि ज्या अर्थी ते हिंदूविरुद्ध आहेत त्याअर्थी सर्व हिंदूंनी त्यांच्याविरुद्ध असले पाहिजे.धर्माधारे हिंदुंना संघटित करणार्या संघटनांचा जसा युक्तिवाद असतो तसाच काहीसा मुसलमान संघटनेंचा असतो.
           आक्रमक मुस्लीम सैन्यानं सत्ता काबीज करताना व राज्यविस्तार करताना हिंदुंची देवळे फ़ोडली व लुटली हा हिंदुत्ववाद्यांच्या युक्तिवादाचा महत्वाचा भाग असतो. हे सत्य असले तरी पण हे पुर्ण सत्य नाही,अर्ध्य सत्य आहे. अरब, तुर्क, अफ़गाण इत्यादी आक्रमकांच्या टोळीवजा सैन्यांना नियमीत पगार दिला जात नसे, त्यांनी लुट करावी आणि लुटीतल्या हिश्श्यातून त्यांचा पगार घ्यावा अशी रीत असे. हिंदूंच्या मंदिरात खुप संपत्ती असे. आक्रमक सैन्य ही संपत्ती लुटत असे. लुटताना देवळे पाडत व संपत्ती वाटून घेत.
            आज दर्याकपारीत आणि डोंगरमाथ्यावरच्या ज्या देवळात संपत्ती नसे पण देव असत त्या देवळांच्या वाटेला हे आक्रमक सैन्य जात नसे. कारण काय ? देवळे पाडणे हे मुख्य नसून संपत्ती लुटणे हा मुख्य हेतु असे. जर हिंदू धर्मद्वेषातून देवळं पाडली म्हणायचे तर मग छोटी छोटी मंदिरे सहीसलामत कशी ? याचाच अर्थ की लुटीची संपत्ती मुख्य असत, तिथे धर्म दुय्यम होता. मुख्य हेतू साध्य करायला आवश्यक म्हणून देवळे पाडत. याच लुटीतील मोठा हिस्सा राजाकडे जाई. राजाचे उत्पन्नाचे ते एक साधन असे. देवळाभोवतील लोकांचे खच्चीकरण करणे, त्यांच्यात भय निर्माण करणे हा सुद्धा एक हेतू असे देवळे पाडण्यामागे. लोक श्रद्धाळू असतात, त्यांनी देव लुटला मग आम्हाला लुटायला काय वेळ लागणार आहे असे भय असे. त्यामुळे मुलुख जिंकणे सोपे जाई. त्याकाळातील देवळे केवळ धर्मकेंद्रे नव्हती तर संपत्तीची केंद्रे होती, मानाची केंद्रे होती आणि सत्तेचीही केंद्रे होती. हीच मुख्य कारणे ठरली देवळांच्या नाशाला.
            आजच्या हिंदुत्ववाद्यांच्या म्हणण्यानुसार मुस्लिमांनी धर्मद्वेषातून हिंदूंची देवळे पाडली. त्यामध्ये ते पंढरपूर, तुळजापूर या देवस्थानांची उदाहरणे देतात जी अफ़जलखानाने उध्वस्त केली असेही हिंदुत्ववाद्यांचं म्हणनं आहे. पण हेही विसरून चालणार नाही की, अफ़जलखान मराठा स्वराज्यावर चालून येत होता आणि हिंदुत्ववाद्यांच्या म्हणण्यानुसार वाटेतील देवळांची लुट व मोडतोड करत होता तर त्याच्याबरोबर अनेक हिंदू धर्मिय सरदार होते त्यांच्या भावना दुखावल्या नाहीत का ? तसेच तुळजाभवानीचे मंदिर अफ़जलखानाने तोडलं म्हणून हिंदुत्ववादी सांगतात, त्यावेळी अफ़जलखानाबरोबर पिलाजी मोहिते, शंकररावजी मोहिते, कल्याणराव यादव, नाईकजी सराटे, नागोजी पांढरे, प्रतापराव मोरे, झुंझारराव घाटगे, काटे, बाजी घोरपडे (रामदास स्वामींचा प्रिय शिष्य) आणि संभाजीराव भोसले हे उपस्थित होते हेही विचरून चालणार नाही. १७९१ मध्ये हिंदूंकडून लुटीत पतझड झालेलं देवी सारदेचं श्रुगेरीचं मंदिर मुसलमान टिपू सुलतानाने दुरुस्त केलं हे तर सर्वांना माहीत आहेच.
            अफ़जलखान तुळजापूर व पंढरपूर येथील हिंदूंची देवस्थाने फ़ोडत होता, त्यावेळी अफ़जलखानाचा ब्राह्मण वकील क्रुष्णा भास्कर कुलकर्णी हिंदू असून काय करत होता ? त्याला माहीत नव्हतं का ? की देवळावर आपलेच जातबंधू जगत आहेत, आणि मंदिरे फ़ोडली तर आमच्या जातीची रोजगार हमी योजना बंद होईल, म्हणुन मंदिरे पाडू नका. असे सांगून तरी किमान अफ़जलखानाचे मन परिवर्तन का केले नाही ? तीच गत सोमनाथ मंदिराची, गजनीच्या महंमदने थानेश्वरचा राजा आनंदपाल याच्याशी समझोता करून मग सोमनाथवर हल्ला केला, खरे तर आनंदपालने याची सुचना मंदिरामध्ये का दिली नाही ? महंमदाचे अनेक सेनाधिकारी व सैनिक हिंदू होते. मग तरीही त्या पापाचा वाटेकरी फ़क्त मुसलमान महंमद कसा ?
                शिवाय फ़क्त मुसलमानच देवळे पाडायचे असे म्हणने म्हणजे सुद्धा अडाणीपणाचे लक्षण आहे कारण फ़क्त मुसलमान राजेच देवळे लुटत होते हे सत्य नाही. हिंदू राजे सुद्धा संपत्तीसाठी हिंदूंची देवळे लुटीत असत.काश्मिरचा हिंदू राजा हर्षदेव याने बाराव्या शतकात हिंदूंचीसुद्धा मंदिरे लुटली आहेत. धातूसाठी मुर्ती वितळवी, वितळण्यापुर्वी त्यांच्यावर विष्ठा व मुत्र शिंपडून त्यांचा पवित्रभंग करी इत्यादिचे तपशीलवार वर्णन कल्हणाच्या "राजतरंगिणी" या ग्रंथात आहे. देवाच्या मुर्तीची विटंबना केली म्हणून त्या काळी दंगे झाल्याची नोंद मात्र नाही. मंदिरे तोडून ती लुटण्यासाठी राजा हर्षदेव ने खास देवोत्पतक नायक नावाने अधिकारी नेमला.(११९३ ते १२१०) कॅबी आणि दाभाई येथील जैन मंदिरे उध्वस्त केली. मंदिरातील उत्पनाची जी खाती होती त्यात त्याने "देवोत्पादन" हे खातेच उघडले होते. मंदिरातील लुटलेली संपत्ती या खात्यात जमा होत असत.म्हणजे देव-देवळे पाडण्यामध्ये हिंदू राजे पण काही मागे नव्हते तरीही देवंळाच्या लुटीचा इतिहास सांगताना केवळ मुस्लिमांचाच उल्लेख का केला जातो हे कोणता हिंदुत्वाचा ठेकेदार सांगेल का ?
              मुस्लिम राज्याला त्रासदायक ठरू लागले तर मुस्लिम राज्यकर्ते मुस्लिम धर्मगुरुंची, मुल्ला-मौलवींची सुद्धा पर्वा न करता त्यांनाही छळत. महंमद तुघलक याने मुल्ला व सय्यद यांच्या कत्तली केल्याचा आरोप बखरकारांनी नोंदवून ठेवलेला आहे. काही इतिहासकारांनी तर असे लिहिले आहे की, जहांगीर बादशहाला मुल्ला मंडळी एवढी घाबरत की तो आला की ते लपून बसत.म्हणजे देवळे पाडली व लुटली त्याला कारण राज्यच आणि देवळांना इनामे दिली किंवा देवळे दुरुस्त केली त्यालाही कारण राज्यच इथे धर्माचा काडीमात्र संबंध नाही. म्हणुनच मुस्लिमांनी जशी देवळे लुटली तशी हिंदू राजांनी सुद्धा हिंदूंची देवळे लुटल्याचे दाखले आहेत.
तात्पर्य काय ? त्या काळातल्या राज्यकर्त्यांच्या द्रुष्टीने राज्य महत्वाचे होते. धर्म महत्वाचा नव्हता. स्वत:चे राज्य स्थापायला आणि स्थिर करायला धर्माचा आधार घेतला पण धर्म मुख्य नव्हता, राज्य मुख्य होते आणि पूर्ण सत्य हे असे आहे.
संदर्भ :
देवळांचा धर्म आणि धर्मांची देवळे [प्रबोधनकार ठाकरे].
शिवाजी कोण होता ? [गोविंदराव पानसरे].
शिवचरित्र एक अभ्यास [सेतू माधव पगडी].
राजतरंगिणी [कल्हन पंडीत (अनुवाद डॉ.माधव व्यंकटेश लेले)].
छ.शिवाजी महाराज यांचे चरित्र [क्रुष्णराव अर्जुन केळूसकर].

30 December 2015

छ.शिवराय गोब्राह्मणप्रतिपालक की रयतेचे राजे ?

       विश्ववंद्य छ.शिवरायांच्या नावामागे अनेक बिरुदावल्या लावल्या जातात त्यात "गोब्राह्मणप्रतिपालक" ही बिरुदावली जास्त प्रसिद्ध आहे.[की जाणुनबुजुन प्रसिद्ध केली गेली ?]. हिंदुत्ववादी मंडळींना तर शिवराय छत्रपती असण्यापेक्षा गोब्राह्मणप्रतिपालक होते यातच जास्त भुषण वाटते. यासाठी ते ना तर्हेच्या क्लुप्त्या शोधत असतात. ब्राह्मण सुद्धा एवढे कष्ट घेत नसतील असो. ब्राह्मणांनी आजपर्यंत पवित्र म्हणून सांगितलेल्या गोष्टीपैकी दोन महत्वाच्या गोष्टी म्हणजे गाय आणि ब्राह्मण."गायींचा" आणि "ब्राह्मणांचा" प्रतिपाळ करणारा अशी बिरुदावली सारखी प्रसिद्ध केली जाते.मग प्रश्न असा आहे की शिवराय याच दोहोंच्या रक्षणासाठी आयुष्यभर लढले काय ? गाय पवित्र आहे कारण तिच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देव आहेत म्हणे! पण गायींना कोण मानतात पवित्र ? ब्राह्मण मानतात का पवित्र ? गाय पवित्र आहे असे म्हणण्यापेक्षा उपयुक्त आहे असे म्हणणे योग्य ठरेल.पण आज गायींना पवित्र बनवण्याआधी गायींसंदर्भात आदराने,प्रेमाने कोण वागले आहे हे एकदा तपासून बघितले पाहिजे.गाय समस्त शेतकर्याला पुजनीय आहे. त्यामुळे प्राचिन काळापासून शेतकरी सामान्य रयतेने गायी पाळल्या आहेत. गायींची पुजा केली आहे; गायींचे रक्षण केले आहे.
          ब्राह्मणांनी आयुष्यात कधीही शेती केली नाही,न नांगरलेली जमीन जिथे राहतो ब्राह्मण तिथे, असे ओळखावे असे म्रुच्छकटिक नाटकात म्हंटले आहे. ब्राह्मणांच्या धर्मशास्त्राने सांगितलेले काम शिक्षण घेणे व देणे; पुजा-यज्ञविधी करणे, दक्षिणा घेणे हे आहे. प्राचिन काळी ब्राह्मणांची यज्ञसंस्क्रुती होती. यज्ञाचे एक विषेश असे आहे की पशूचा बळी दिल्याशिवाय यज्ञ पुर्णच होऊ शकत नव्हता. प्राचीन काळी गोमेध नावाचा एक यज्ञही होता. .जुण्या पौराणिक कथेत ब्राह्मणांना शेकडॊ गायी दान दिल्याचा उल्लेख आढळतो.ब्राह्मण या गायींचे काय करायचे, याचा असा सहज उलघडा होतो. (आजही ब्राह्मण मुंजीसारख्या काही विधीत कणकेची गाय करून कापतात म्हणे !).
        या उलट गायींचे रक्षण केल्याचे अनेक पुरावे आजही गावागावात आढळतात. (केवळ) मुसलमान गायी कापून खातात म्हणूण छत्रपती शिवरायांनी गायींचे रक्षण करण्याचे ऐतिहासिक कार्य केले असे ब्राह्मणवादी म्हणतात. मात्र मुसलमान भारतात येण्यापुर्वी गायींचे रक्षण करण्यासाठी अनेकांना हुतात्मा व्हावे लागले. त्या काळी गायचोर कोण होते, असा प्रश्न सहज निर्माण होतो. मग बौद्धांच्या नंतर अहिंसाच्या मागे लोक लागतील आणि सामान्य लोक तिकडे लागलेले आहेत मागे त्याला ओढायचे असेल तर आपल्या कडे अहिंसा घ्यायची आणि गायीला पवित्र मानायची ही नवीन प्रथा निर्माण करायची. तीर्थकर आणि बुद्धांच्या अहिंसा तत्वाने ब्राह्मणी संस्क्रुतीची पिछेहट झाली. तेंव्हा ब्राह्मणांनी गायींमध्ये तेहतीस कोटी देव असल्याचे घोषीत केले. या सर्व गोष्टींचा अर्थ इतकाच की आज जे ब्राह्मण गोहत्या संदर्भात व गायीच्या पावित्र्या संदर्भात ज्या दंगली घडवून आणत आहेत, त्यामागचा त्यांचा हेतू वेगळाच आहे. "चोर तो चोर, वर शिरजोर" म्हणतात तो प्रकार हाच!
छ.शिवराय ब्राह्मणप्रतिपालक होते का ?
          छत्रपती शिवराय हे कुळवाडी शेतकरी परंपरेतील असल्यामुळे त्यांनी गायींच्या रक्षणाचे आदेश दिले, हे योग्यच आहे. पण त्यांनी कधीही ब्राह्मणांच्या रक्षणाचे आदेश दिलेले नाहीत. छ. शिवरायांची अस्सल म्हणून मान्यता पावलेली अनेक पत्रे उपलब्ध आहेत. यातील एकाही पत्रात शिवरायांनी स्वत:स ’गोब्राह्मणप्रतिपालक’ म्हणवून घेतलेले नाही. छ.शिवरायांच्या समकालीनांनी शिवरायांना लिहिलेली पत्र आहेत. त्या पत्रांपैकी एकाही पत्रात कुणीसुद्धा शिवरायांना ’गोब्राह्मणप्रतिपालक’ म्हणत नाहीत. उलट छ.शिवरायांची राज्याभिषेक शक असलेली २९ पत्रे उपलब्ध आहेत.या सर्व पत्रांत ते स्वत:स "क्षत्रियकुलवतंस श्रीराजाशिवछत्रपती" असे म्हणवून घेतात,ते कधीही स्वत:स गोब्राह्मणप्रतिपालक म्हणवून घेत नाहीत. मग हे गोब्राह्मण प्रकरण आले कोठून ?. इथे असा प्रश्न निर्माण होतो की, शिवराय गोब्राह्मणप्रतिपालक होते असा गैरसमज कोणी व का पसरविला ?.
        छत्रपती शिवराय हे गोब्राह्मणप्रतिपालक होते असे छत्रपती शिवरायांच्या चरित्रावर कमाई करणार्या बाबासाहेब पुरंदरेने म्हंटले आहे. त्यासाठी शिवचरित्र साधने खंड ५,क्र.५३४ व ५३७ असा आधार देतात. या सर्व पत्रांची व आधारांची छाननी करून श्री शेजवलकर निर्वाळा देतात की, "५३४ क्रमांकाच्या लेखात शिवाजी स्वत:स गोब्राह्मणप्रतिपालक म्हणवून घेत नाहीत तर त्या पत्रात ज्याचा उल्लेख आहे तो बाह्मण त्यास तशी पदवी देतो. ५३७ क्रमांकाच्या लेखात तर "गोब्राह्मणप्रतिपालक" असा शब्दच आलेला नाही. म्हणजे सगळे "भटी गौडबंगाल". शिवाजी राजांनी स्वत:स गोब्राह्मणप्रतिपालक म्हणवून घेणे आणि ब्राह्मणांनी तसे म्हणणे यातले अंतर स्पष्ट आहे. काम करवून घ्यायला आलेला किंवा याचना करायला गेलेला कुणीही राजास तु आमचा प्रतिपाल करणारा आहेस असे म्हणणारच त्यात विषेश काय आहे ? ब्राह्मण तर शहाजान बादशहाला "जगदिश्वरो वा दिल्लीश्वरो" म्हणायचे फ़ायद्यासाठी ब्राह्मण स्तुती करतात हे इतिहासप्रसिद्ध आहेच.
       मग शिवरायांना लावलेली किंवा बळेच चिकटवलेली "गोब्राह्मणप्रतिपालक" बिरुदावली कुणी लावली असेल ? गायीने  लावणे शक्यच नाही त्यामुळे उत्तर स्वच्छच आहे. ग्रॅंड डफ़ आपल्या ग्रंथात "गायी, रयत व स्त्रिया यांना लुटण्यास शिवाजीने आपल्या शिपायांस बंदी केली होती." असे नमूद केले आहे.त्याला इतरही आधार आहेत.पण मग गायी, रयत आणि स्त्रिया यांचा प्रतिपालक असलेले शिवराय गोब्राह्मणप्रतिपालक कसे केले गेले ? रयत आणि स्त्रिया यांना बाजुला सारून त्याठिकाणी ब्राह्मण कधी व कुणी आणले याचा अंदाज करणे कठीण जाणार नाही.
        छ.शिवरायांच्या राज्यात ब्राह्मणांस खास सवलतीसुद्धा कोठे दिसत नाहीत. उलट एका पत्रात आगळीक केलेल्या ब्राह्मणांसबंधी शिवराय लिहितात, "ब्राह्मण म्हणूण कोण मुलाहिजा करू पाहतो" असे बजावून धमकावतात की, "जे गनिमांचे गनीम ते तसाच नतीजा पावणार".काही ब्राह्मण शिवरायांच्या बरोबर होते तसे काही ब्राह्मण शिवरायांच्या विरोधातही होते त्यामुळे शिवराय ब्राह्मणप्रतिपालक अशी बिरुदावली घॆणे शक्य नव्हते व तशी त्यांनी घेतलेली नाही.
           काही महाभाग छत्रपती संभाजी राजांच्या बुधभूषण ग्रंथाचा दाखला देताना म्हणतात की संभाजी राजांनी शिवरायांचा उल्लेख गोब्राह्मणप्रतिपालक असा केला आहे. पहिली गोष्ट म्हणजे बुधभूषण ची मुळ प्रत सध्या उपलब्ध नाही असे अनेक इतिहासकारांचे मत आहे तरीही सध्याची प्रत मुळची संभाजी राजेंनी लिहिलेलीच आहे असे मानले तरीही काही गोष्टी जाणुन घेणं गरजेचे आहे. संभाजी राजांनी पुराण ग्रंथांचे विवेचन करून, त्यातील अर्थपूर्ण भाग निवडून ग्रंथ रचला आहे, हे त्यांनीच नमुद केले आहे. पुराणं असो वा इतर धार्मिक साहित्य या सगळ्याचाच तत्कालीन समाजावर प्रभाव होता. असे साहित्य ब्राह्मण वर्चस्वाने ग्रासलेले होते , त्यामध्ये क्षत्रियांचे कार्य गायी आणि ब्राह्मणांचे रक्षण करणे असे सांगितली आहेत. याच साहित्याचा प्रभाव संभाजी राजांच्या लिखानावर पडला असला तर नवल नाही, कारण शिवरायांना गोब्राह्मण प्रतिपालक म्हणवताना त्यांनी एकही प्रमाण दिलेले नाही तथा या काळात संभाजी राजेंनी हा ग्रंथ लिहिला त्या काळात व त्याच्या आधी आणि नंतरच्या काळात कधीही शिवरायांनी ब्राह्मणप्रतिपालन केल्याचे एकही प्रमाण, तथा पुरावा नाही. त्यामुळे एखाद्या मिथ्या बिरुदावलीपेक्षा प्रत्यक्ष कार्यच महत्वाचे असते हेच सत्य आहे.
        छ.शिवरायांना कुळवाडीभुषण रयतेचा राजा म्हणणे आधिक गौरवास्पद आहे. छ.शिवराय फ़क्त गायी आणि ब्राह्मणांच्या रक्षणाकडे  विशेष लक्ष देत होते, असे गोब्राह्मणप्रतिपालक शब्दावरून वाटू शकते. पण खरे पाहता छ.शिवरायांनी आपल्या अठरा पगड जातींच्या प्रजेसह, प्रजेची शेती, प्रजेने वाढवलेली झाडे यांचेही रक्षण केले. त्याचबरोबर मुस्लिम व इतर धर्मियांना त्यांच्या धर्माप्रमाणे वागवले. म्हणूनच शिवराय "गोब्राह्मणप्रतिपालक" नव्हते तर "कुळवाडीभुषण रयतेचे राजे" होते.
संदर्भ:
श्री.शिवछत्रपती [त्र्यं.शं.शेजवलकर].
शिवचरित्र - मिथक आणि वास्तव [श्यामसुंदर मिरजकर].
मनुस्म्रुती-अध्याय१,श्लोक ८८.
भारद्वाज श्रौतसूत्र ६.१३.१०.
छत्रपती संभाजी महाराज(प्रुष्ठ क्र.८५) - [वा.सी.बेंद्रे].
शिवाजी आणि शिवकाळ (प्रुष्ठ क्र.२०५-२०६,२११-२१३) - [जदुनाथ सरकार].
छ.शिवाजी महाराजांची पत्रे(प्रुष्ठ क्र.१६७)- [प्र.न.देशपांडे].
व्याख्यान(धर्म : बहुजनांचा आणि ब्राह्मणांचा) - [प्राध्यापक राजेंद्र कुंभार] 

28 December 2015

शिवरायांकृत रामदासांना पत्र

        रामदास स्वामींवरील आक्षेपाचे खंडण करण्यासाठी सुनिल चिंचोलकर नामक लेखकाने "श्री समर्थ चरित्र : आक्षेप आणि खंडन" हे पुस्तक (चिंचोलकरांच्या मते ग्रंथ) लिहिले आहे.त्यामध्ये अनेक संघटना रामदासांवर करत असलेले आक्षेप आणि आरोप काहीअंशी खोडण्याचा प्रयत्न केला आहे. पण शेवटी आपण ब्रह्मव्रुंद आहोत हे तो विसरलेला नाही.सुनिल चिंचोलकरने त्या पुस्तकामध्ये शिवाजी महाराजांनी रामदासांना सन १६७८ मध्ये लिहिलेले पत्र दिलेले आहे आणि त्या पत्राच्या आधारे तो रामदासाला शिवाजी महाराजांचा गुरुपदी बसवतो. पण वास्तव सर्वांना समजले पाहिजे. आज रामदासांच्या गुरुत्वाबद्दल (शेवटचा) पुरावा म्हणून रामदास भक्तांकडून वापरले जाणारे अस्त्र म्हणजे शिवरायांनी रामदासांना सन १६७८ मध्ये लिहिलेले पत्र.या पत्रामध्ये रामदासांमुळेच राज्यप्राप्ती झाल्याचे व हे राज्य रामदास चरणी अर्पण करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. या पत्राचे वैशिष्ट्य म्हणजे पत्राच्या वरच्या उजव्या कोपर्यात श्रीरघुपती, श्रीमारुती असे शब्द लिहिलेले आहेत. असे शब्द शिवरायांच्या अन्य कोणत्याच पत्रात नाहीत. शिवरायांच्या इतर पत्रांमध्ये श्रीसांब,श्रीजगदंबा असे शब्द आढळतात. फ़क्त या एका पत्रातच रघुपती आणि मारुती हे शब्द आहेत. रघुपती आणि मारुती ही रामदासांची प्रेरणास्थाने आहेत ही गोष्ट येथे महत्वाची आहे. शिवरायांनी पत्र पाठविणे, रामदासांमुळेच राज्यप्राप्ती झाल्याचे व हे राज्य रामदास चरणी अर्पण करण्याचा मनोदय व्यक्त करणे या क्रुती जर शिवरायांनी केली असती तर शिरायांच्या आणि रामदासांच्या जीवनातील महत्वपुर्ण घटना ठरली असती. मग तिचे प्रतिबिंब शिवकालीन ग्रंथामध्ये निश्चितच उमटले असते. पण तसे काहीही घडलेले नसल्यामुळे हे पत्र बनावट असल्याचे निश्चित होते.
           शिवरायांच्या राज्याभिषेक प्रसंगी म्हणजे स्वतंत्र राज्याच्या घोषणेवेळी ६ जून १६७४ ला रामदास हजर नव्हते. शिवराय १६७६ ते १६७८ दक्षिणेत होते.यादरम्यान रामदासांचा व त्यांचा संपर्कही होणे शक्य नव्हते. मग अचानक या मोहिमेवरून आल्यावर शिवराय रामदासांना गुरुचा दर्जा देतात व त्यांच्या झोळीत राज्य अर्पन करतात ही गोष्ट अनाकलनीय आहे. हे सर्व खोटे असून संपुर्णत: कल्पोकल्पित आहे. हे पत्र बनावट आहे असे शिवचरित्राचे अभ्यासक गजानन भास्कर मेहंदळे यांनी त्यांच्या शिवचरित्रामध्ये नमुद केले आहे. "चाफ़ळची सनद" म्हणून ज्याचा फ़ारच उदो उदो केला गेला त्या पत्राबद्दल त्र्यं. शं. शेजवलकर म्हणतात, "शिवाजीने रामदासाला राज्य अर्पण करण्याची गोष्ट घडलीच असली पाहिजे असे अनुमान करणे अनैतिहासिक आहे. जर अशी गोष्ट प्रत्यक्ष घडली असती तर तीचा उल्लेख कोणत्यातरी शकावलीत, बखरीत आवश्यक आला असता. तो नाही यावरून आणि मिळालेले पत्रही रामदासांच्या भक्तमंडळींतच उपलब्ध झाले आहे हे पाहता त्याबद्द्ल मन साशंक होते. "या सर्व भक्कम परिस्थितीजन्य पुराव्यावरून व इतिहास संशोधकांच्या निष्कर्षावरून हे पत्र खोटे असल्याचे सिद्ध होते.
           पार्थ पोकळे म्हणतात "रामदासांसारख्या वैदिक संतांनी महाराष्ट्र उभारला.बहुजनांच्या शिवाजीला मदत केली. अशा प्रकारचा प्रचार करून त्यांचे उदात्तीकरन केले गेले. या उदात्तीकरणाचा हेतू शुद्ध नाही. बहुजन समाजातील श्रेष्ठ मंडळींना गौणत्व येईल व त्यांचे कार्य गौण ठरेल आणि रामदासांसारखे कसे श्रेष्ठ ठरतील, त्यांचे कार्य कसे श्रेष्ठ होते हे भासविण्याचा प्रयत्न गेली दोनशे वर्ष महाराष्ट्रात झाला आहे" आज रामदास हे शिवरायांचे गुरु नव्हते आणि शिवरायांच्या स्वराज्य स्थापणेस रामदासांची कसलीच प्रेरणा नाही हे स्पष्ट असताना आणि न.र.फ़ाटक, कुरुंदकर आणि त्र्यं.शेजवलकर यांसारख्या विद्वानांनीसुद्धा निर्वाळा दिला असताना सुद्धा अद्यापही रामदासांना शिवरायांचे गुरु दाखवून त्यांनीच स्वराज्य स्थापनेची प्रेरणा दिली असे जेंव्हा मनोरुग्न मंडळी म्हणतात तेंव्हा त्यांच्या अकलेची किव करावीशी वाटते.
        शेजवलकर शिवरायांविषयी म्हणतात, "शिवाजीच्या राज्यस्थापनेचे मुख्य श्रेय त्यांच्या स्वत:च्या स्पुर्तीला, कल्पनेला व पराक्रमाला देणे योग्य आहे असे वाटते. इतिहासात अनेक शतकांनी एखादा स्वयंभू जेता जगाच्या पाठीवर केंव्हातरी, कोठेतरी एकदम उदय पावताना दिसतो, त्या जातीचा शिवाजी आहे.अशी व एवढी पराक्रमी व्यक्ती हिंदुस्तानात मुसलमानी राज्यस्थापनेपासून दुसरी झाली नव्हती. "आज सत्य इतिहास समोर आल्यामुळे रामदास आणि शिवरायांची भेटच झाली नाही हे समोर आले.आजपर्यंत आपल्या लेखणीतून रामदासांच्या उदात्तीकरणाची राजवाडी परंपरा पुढे चालविणारे पुरंदरे रामदास शिवरायांचे गुरु नव्हते आणि शिवरायांची आणि रामदासांची भेटच झाली नाही असे म्हणत आहेत. परंतू वयाच्या ऐंशिव्या वर्षी त्यांना आलेली अक्कल आत्तापर्यंत केलेल्या इतिहासाच्या खोट्या प्रचाराचा परीणाम कसा दूर होणार ? त्यांच्या पुस्तकांच्या हजारो प्रती विकल्या गेलेल्या आहेत. ज्यामध्ये इतिहासाचा खोटा प्रचार केला आहे. शिवराय हे रामदासांच्या जवळ दाखवले आहेत ते चित्र कसे बदलणार ? आजही तेच चित्र बरेच मनोरुग्न प्रसारित करत असतात. आता जागरुत जनतेमुळे पुरंदरेने माघार घेतली हे खरे.पण पुरंदरेंना जर सत्य इतिहास समजण्यासाठी आयुष्यातील पाऊन शतक  लागले तर त्यांनी उर्वरीत आयुष्य आपण नेमका कोणता अभ्यास केला याचे विंतन करण्यात घालवावे आणि चुका सुधारून आपल्याला अक्कल असल्याची जाणीव करून द्यावी.
         खरंतर रामदासांच्या उदात्तीकरणाच्या खटपटीत रामदासांचे कर्त्रुत्व शिवरायांच्या गुरुत्वावरच अवलंबून राहिले आणि मर्यादित राहिले. ज्यावेळी रामदास शिवरायांचे गुरु नाहीत हे सत्य बाहेर येईल आणि रामदास कर्त्रुत्वशुन्य ठरतील तेंव्हा मोठी अडचण होणार हे जाणुन पेशवेकालीन बखरींना ऐतिहासिक पुरावा म्हणुन पुढे आणले गेले आणि कहान्या रचल्या.शेकडो पुस्तके लिहिली आणि पुर्ण वेळ खोटा प्रचार केला असाच खोटा प्रचार आजही सुरुच आहे.
            छत्रपती शिवराय आणि रामदास यांच्यातील फ़रक साधायचा झाल्यास छत्रपती शिवराय हे शिवभक्त होते व भवानी मातेचे भक्त होते. तर रामदास हे रामभक्त होते.शिवाजी महाराजांची घोषणा होती "हर हर महादेव" तर रामदासांची घोषणा होती "जय जय रघुवीर समर्थ". शिवराय मस्तकी शिवगंध धारण करायचे,त्यांनी रायगडावर बांधलेले जगदिश्वराचे मंदिर या सर्व शिवभक्तीची साक्ष देतात तर प्रतापगडावरील भवानी देवी, त्यांच्या पत्रामधील भवानी देवीचे उल्लेख ते भवानीदेवीचे भक्त असल्याचे स्पष्ट करतात.शिवरायांनी कोठेही रामाचे एखादे मंदीर बांधल्याचा किंवा जिर्णोद्धार केल्याचा उल्लेख नाही. या साध्या गोष्टीवरून देखील रामदास हे शिवरायांचे गुरु होते असे म्हणणे म्हणजे शुद्ध मुर्खपणाच आहे हे सिद्ध होते. जातीश्रेष्टत्वाच्या तोर्यामुळे निर्माण केलेले कुटील षडयंत्र आहे. नाहीतरी बा. र. सुंठणकर म्हणतातच, "शिवाजीच्या राज्यस्थापनेत रामदासाच्या कर्त्रुत्वाचे फ़ाजील स्तोम माजविण्यात आले आहे. त्याला इतिहासात काढीचा आधार नाही."
संदर्भ :
 श्री समर्थ चरित्र : आक्षेप आणि खंडन [सुनिल चिंचोलकर]
शिवरायांचे प्रेरणास्त्रोत आणि खरे स्वराज्यद्रोही [चंद्रशेकर शिखरे]
शिवाजी महाराज की सत्ता बहुजन समाज के लिये थी ब्राह्मणों के लिये नही,बहुजनोंका बहुजन भारत (साप्ताहिक)
वर्ष ३ रे अंक २७ दि.७ मार्च २००४.प्रुष्ठ क्र.८८ ते ९१.
छ.शिवाजी महाराजांची पत्रे [प्र.न.देशपांडे].
श्री राजाशिवछत्रपती (प्रुष्ठ क्र. ४५ ते ४६,५२)[त्र्यं.शं.शेजवलकर].
बहुजनांचा सांस्क्रुतीक संघर्ष (पृष्ठ क्र.२७९)[पार्थ पोकळे]
महाराष्ट्रीय संत मंडळांचे ऐतिहासिक कार्य (आवृत्ती पहिली,पृष्ठ क्र.१३६)[बा.र.सुंठणकर]

27 December 2015

जरी तो ब्राह्मण झाला कर्मभ्रष्ट तरी.....??

संतश्रेष्ठ तुकोबांच्या हयातीत मंबाजी भट-ब्राह्मण आणि त्यांचे सर्व साथीदार यांनी तुकोबांचा खुप कडाडून विरोध केला. त्यांचे अभंग नदीत बुडविले. गाथा इंद्रायणीच्या डोहात बुडवली आणि तुका सदेह वैकुंठाला गेला अशी आवई मात्र जोरात उठवली. नदीत बुडवूनदेखील तुकोबांचे अभंग लोकांत राहिलेच. ते तेच म्हणू लागले आणि जेंव्हा अभंग बुडवूनसुद्धा आणि तुकोबांना संपवूनही तुकोबा संपत नाही असं दिसून आलं तेंव्हा मंबाजीचे सर्व प्रकारचे सर्व वारसदार तुकोबांचे कौतुक करू लागले. त्यांच्या अभंगात आपले फ़ुसके अभंग घुसडू लागले [त्यांचेच वंशज आजही आहेतच]. त्यांच्या अभंगावर कथा-किर्तने करू लागले.पण हे सगळे करताना एक करू लागले की तुकोबांनी अंधश्रद्धेवर व अन्यायावर जे कोरडे ओढले होते ते लोकांपर्यंत पोहचणार नाहीत अशी दक्षता घेऊ लागले.
असेच काही फ़ुसके क्षेपक अभंग तुकोबांच्या गाथेत आढळतात त्यातील एक प्रचलित म्हणजे "जरी तो ब्राह्मण झाला कर्मभ्रष्ट । तुका म्हणे श्रेष्ठ तिन्ही लोकी ॥ [३०४०].तुकोबांची ब्राह्मणांविषयी ही आस्था आधिक ताणून "जरी  ब्राह्मण झाला भ्रष्ट तरी तो तिन्ही लोकी श्रेष्ठ असे भ्रष्ट ब्राह्मणांविषयी उदारतेचे उद्गार काढणारे तुकोबाराय" सर्वप्रथम श्री  अनंतदास रामदासींनी उभे केले; आणि ’तुका म्हणे तुम्ही देवा द्विज वंद्य’ [शा.२८८४] आदि अभंग पाहून "रुढ मुल्यांवर निष्ठुरपणे प्रहार करणारे तुकोबा शांत मन:स्थितीत पुन: रुढीपुढे नम्र होतात."हे मात्र सत्य नाही.जरी तो ब्राह्मण झाला कर्मभ्रष्ट । तुका म्हणे श्रेष्ठ तिन्ही लोकी.[३०४०] हे तुकोबांचे म्हणणे केवळ औपरोधित किंवा अर्थवादात्मक आहे"(सा.सं.तु.प्रुष्ठ:१४०) वस्तुश: असली दोनचार वचणे हे गाथेच्या अंगावरील आगंतुक कोडच म्हंटले पाहिजे. असल्या भोंगळ वचनांच्या विरोधात तुकोबांची शेकडो युक्तियुक्त वचणे बाह्या ठोकून उभी आहेत.
यथार्तवाद सांडून उपचार बोलती ते अघोर भोगतील ! "तुका म्हणे आम्ही येथील पारखी । छंदावी सारिखी नव्हो ऐसी" माझ्या जातीचे वजनास बोल कोण ठेवू शके ? "सत्या नाही पाठीपोट" व "लटकियाची न करू स्तुती हिशेब आले ते घ्यावे" हीच तुकोबांची खरी कणखर भुमिका ! "गुण-अवगूण निवाडा " करणारा व "अवगुणी दंडण गुणी पुजा" हे न्याय्य ब्रिद सांभाळणारा तुकोबांचा ’निवाड्याचा ठाव’ असली बुद्धिभेद करणारी वचणे उच्चारूच शकत नव्हता,हे उघड आहे.[९६२, ११३७, १३६७, २३७६,२३७८,२७३५,३४८५,३५१८,(पं.५२४९),५३४७].
"पंडिता: समदर्शिन:" व "य.क्रियावान स पंडित:" यापैकी एकही गुण अंगी नसलेल्या पण अंगी ज्ञानपणाची मस्ती ठेवून इतरांना हिन,तुच्छ समजणार्या ब्राह्मणांना तुकोबा स्पष्टपणे सुनावतात की, "मर्यादा ते जाण अरे अभागिया । देवाच्या ऐसिया सकळ मुर्ती ॥","करी अनेकांचा अपमान । खळ छळवादी ब्राह्मण । तया देता दान । नरका जाती उभयता ॥".असे रोखठोक बाण्याचे तुकोबा; "ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा करू पाहतो" म्हणणार्या शिवरायांच्या प्रणालीचेच होते. म्हणूनच तुकोबांनी ’भेदवाही’ व ’खळवादी वेव्हार’ करणार्या ब्राह्मणांना ’भ्रष्ट सुतकिया खेळ..विटाळ पातकी..न्यानगंडे ढोरे’ इ. शेलक्या शिव्या हासडल्या आहेत व नरकगामी म्हंटलेले आहे.(११२९, १३४५, २३३६, ३६७८, ४५०५)."महाराचा स्पर्ष झाल्यामुळे ज्या ब्राह्मण म्हणविणार्यास क्रोध येतो, तो खरा ब्राह्मणच नव्हे. " या दोषद्रुष्टीमुळे त्याच्या हातून जे पातक घडाले गेले, त्या पातकाला देहान्त प्रायचित्ताशिवाय अन्य प्रायश्चित नाही" हा रोखठोक निर्णय तुकोबा सुनावतात; किंबहुना तया प्रायश्चित काही देहत्याग करता नाही. असे त्यापुढेही एक पाऊल टाकतात. "यातिकुळ येथे असे अप्रमाण । गुणाचे कारण असे अंगी ॥" असे वारंवार झडझडून सांगणार्या तुकोबांनी कोणत्याही कर्मभ्रष्टाला श्रेष्ठत्व देणे शक्यच नाही. हे अभंग बळीच घुसडलेले आहेत.मग हे असले अभंग एखाद्या "सालो-मालो" चे असोत की "श्री समर्थप्रतापामधील एखाद्या हेळवाकीच्या अथवा बिडवीच्या रामदास्याचे असोत.
तुकोबा जर कोणा कर्मभ्रष्ट ब्राह्मणांनाही श्रेष्ठ म्हणू शकले असते तर त्यांचे साहित्य बुडविण्याचे महत्पाप कोणालाही करावेसे वाटले नसते. "सत्याचिया लोपे पापे घडती" या धारणेने तुकोबा सत्य तेच बोलायचे. शिवाय सामान्य समाज हा तत्कालीन ब्राह्मणांच्या नादी लागून आंधळ्याचे काठी लागलेल्या आंधळ्याप्रमाने देवधर्माला आचवन गर्तेत बुडत आहे हे द्रुष्य़ तुकोबांना डोळा देखेवेना. त्याकाळी ब्राह्मणांचे किती अंध:पात झाला होता याची शेकडो प्रमाणे तुकोबांच्याच नव्हे तर ब्राह्मण लेखकांच्याही साहित्यात मिळते.रामदासांचे शिष्य दिनकर गोसावी "स्वानुभव-दिनकर" ग्रंथात ब्राह्मण भांग सेवू लागल्याचे लिहिले आहे.किंबहुना "ब्राह्मण झाले दासीगमनी" असे वर्तवले आहे. समर्थबंधु "श्रेष्ठ" यांनी सुद्धा "तपसत्यविहिन द्विज परान्न प्रद्रव्य परस्त्रीलोलुप" होऊन "तीर्थव्रतादि करणारांचा उपहास" करीत, "वेदशास्त्र पुराण"च नव्हे, तर "कन्याविक्रय"करीत. "दुष्टदेवा दुष्टपरिग्रह दुराचारी दुराग्रह व मद्यमांसाशन" हेच ब्राह्मणांचे स्वरूप झाले होते असे म्हंटले आहे(भक्तिरहस्य). खुद्द रामदास स्वामी सुद्धा "ब्राह्मण बुद्धिपासून चेवले । आचारापासून भ्रष्टले ॥", ब्राह्मणास ग्रामणीने बुडविले, मिथ्या अभिमान गळेना मुर्खपणाचा, आदि वचणं बोलीले आहेत. संत कान्होबा म्हणतात, "उत्तम ब्रह्मकर्म सोडून अठरा यातीचे व्यापार ब्राह्मण करत."
ब्राह्मणांचा देह शुद्रकर्मासाठी नसतो असे भागवत म्हणते. वेदाखेरीज अन्य कार्य करणारा ब्राह्मण जीवंतपणीच शुद्र होतो. अशीही स्म्रुती आहे. तरीपण व्याजबट्याचा व्यवसाय ब्राह्मणांनी सर्वत्र स्विकारलेला दिसतो आणि स्म्रुतीनियमाप्रमाणे असे करणे पाप होते. साता दिवसांचा जरी झाला उपाशी । तेने किर्तनासी सोडू नये ॥ हे तुकोबांचे नि:स्प्रुह लोकशिक्षणव्रत म्हणजे ब्रह्मकर्मावर आक्रमण वा अपराध म्हणता येईल का ? ब्राह्मण वेदविद्वांस मद्यमांस, अंगीकरून भेद न देखता खुशाल गोंधळ घालायचे, केवळ पिंडाचे पाळण करण्यासाठी पुण्यविकारा करायचे किंबहुना आचार सांडून अधर्मा टेकायचे, चहाड्चोर व्हायचे. अर्थात त्याकाळी बहुतांशी ब्राह्मण वंदाया पुरते तणसाचे वाघ होऊन राहिले होते आणि आपली आब्रु वाचवण्यासाठी "ब्राह्मण जरी झाला भ्रष्ठ । तरी तो तिन्ही लोकी श्रेष्ठ" असल्या बिनबुडाच्या पाट्या रंगवाव्या लागत होत्या. मग अशांना "हिन सुकराच्या जाती" म्हणून तुकोबांनी संबोधले तर चुकले कोठे ?.
सर्वात महत्वाचे म्हणजे ब्राह्मण त्याकाळी वयक्तिक चरित्रच गमावून बसला होता असे नाही. तर स्वदेश, स्वभाषा व स्वदेशधर्म आपल्या शुद्रस्वार्थापायी कोळून पिताना दिसत होता.
सांडुनिया रामराम । ब्राह्मण म्हणती दोमदोम । 
तुका म्हणे व्रुत्ती । सांडूनी गदा मागत जाती ॥(७९३)
पोटासाठी खौसा । वंदिती म्लेच्छांच्या ॥ (३०३५)
हे निरुपायाने आपदधर्म म्हणून ते करीत होते, असेही नाही.स्वार्थ बुडविली आचरणे (३९२२) असे तुकोबा सांगतात तर रामदास म्हणतात."कित्येक दावलमलकास जाती । कितेक पिरास भजती । कितेक तुरूक होती । आपुले इच्छेने ॥" इथे आपुले इच्छेने  हे शब्द विशेष लक्षणीय आहेत.
एकूण ब्राह्मणवर्ग परधर्मिय मुसलमानांच्या सेवेत गर्क झालेला असून त्याची नीतिमत्ताही सामान्य जनांच्या पातळीवर आलेली होती. ब्राह्मण वर्गात अमुक एक गोष्ट न करणारा असा राहिला नव्हता असे त्र्यं.शं.शेजवलकर म्हणतात. वि.का.राजवाडे देखील मान्य करतात की "घाटांचे दर्गे बनले आणि राऊळाचे महल झाले, फ़ार काय सांगावे, ब्राह्मण दावलमलकादि पीरांना भजू लागले. कित्येक ब्राह्मण पीरांचे मुजावरही बनले ! ते बहुतेक मुसलमान बनन्यासारखे झाले, इतकेच की त्यांनी सुनतेची दिक्षा मात्र घेतली नाही, तीही त्यांनी घॆतली असती, परंतू त्यांच्या आड एक मोठी धॊंड आली ती धॊंड म्हणजे महाराष्ट्रातील साधूसंत होते." याच साधुसंतांचे मुख्य प्रतिनिधी शिवबालकिल्यात संतश्रेष्ठ तुकोबा हे होते आणि ते "झाडू संतांचे मारग" या प्रतिज्ञेने कटिबद्ध होऊन भक्तिच्या सुगम मार्गाने संपुर्ण बहुजन समाजाची उन्नती सारी शक्ती एकवटून करू पाहत होते.
अवघ्या दूर्बळ जगात "दुर्बळांच्या नावे डोंगारा पिटून" आपली प्रतिष्ठा टिकवण्यासाठी ब्राह्मणांनी जो ’लटकियाचा वाहो’ म्हणजे असत्य रुढ्यांचा हैदोस चालवला होता, तो जनजाग्रुतीद्वारे हाणुन पाडण्यासाठी "गाडीन मी भेद । प्रमाण तो यासी वेद ॥" अशी प्रतिज्ञा तुकोबांना करावी लागली. भेद वाढवणार्या धर्मठकांची रोखठोक पणे "वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा" या आत्मविश्वासपुर्ण घोषणेने तुकोबांनी इंद्रायणीच्या वाळवंटात समतेचा झेंडा रोवला.ही घटना अटकेपार झेंडा रोवण्याच्या घटनेपेक्षा कमी नव्हेच, उलट आधिक गौरवाची आहे.
म्हणुनच "वर्ण-अभिमाने कोण झाले पावन । ऐसे द्या सांगूण  मजपाशी ॥
अत्यंजादि योनी तरल्या हरीभजणे । तयांची पुराणे भाट झाली ॥
            असे ठणकावून वर्णव्यवस्थेची रेवडी उडवून टाकणारे तुकोबा कोणत्याही कर्म-भ्रष्ट झालेल्या ब्राह्मणाला सर्वश्रेष्ठत्वाचे प्रमाण दिले असेल असे ज्यांना वाटेल त्यांना वाटो पण हा अभंग निश्चितच क्षेपक आहे.
संदर्भ : 
संतश्रेष्ठ श्री तुकोबांच्या अभंगगाथा [शासकीय,पंढरीप्रत,श्री पडवळ संपादित]
श्री.शिवछत्रपती(प्रुष्ठ क्र.३४) [त्र्यं.शं.शेजवलकर].
छ.शिवाजी महाराजांची पत्रे(प्रुष्ठ क्र.१६७)- [प्र.न.देशपांडे].
संतश्रेष्ठ तुकाराम : वैकुंठगमन की खून ? [साहित्यरत्न सुदाम सावरकर].
गीता (अ. ६-श्लो. १८) [व्यास].
महाभारत (शां.२६५-९) [वाल्मिकी].
भागवत (११-१७-४२).
स्वानुभव-दिनकर (९-२-७७)[दिनकर गोसावी].
भक्तिरहस्य (२-३९,४०.७३-४६,४८).
पहिला सुमनहार (प्रुष्ठ क्र.१२७) [श्री अनंतदास रामदासी].
दासबोध (१४-७-३१ते ३९)[समर्थ रामदास].
संत आणि समाज(प्रुष्ठ क्र.१२०) [श्री कारखाणीस].

20 April 2014

महाराष्ट्राचे हृदयसम्राट : ज्ञानराज

               संत ज्ञानेश्वरांचा जन्म इ.स. १२७५ मध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत व आईचे नाव रुक्मिणीबाई असे होते. विठ्ठलपंतचे मूळ घराणे पैठणजवळील आपेगावचे; पण पुढे ते आळंदी येथे स्थायिक झाले. ज्ञानेश्वर जन्मले ते सनातनी समाजाचा शाप घेवूनच. ‘संन्याशाचा मुलगा’ हा शिक्का त्यांच्या कपाळावर समाजाने मारला होता. त्यांचे वडील विठ्ठलपंत कुलकर्णी यांनी काही काळ संन्यास घेतला आणि नंतर गुरूच्या आज्ञेवरून परत ते संसारात आले. त्यानंतर त्यांना निर्वृतीनाथ, ज्ञानदेव, सोपानदेव, मुक्ताबाई अशी चार मुले  जन्माला आली. कर्मठ व नतद्रष्ट समाजाला ते पाहवले नाही. त्याने या कुटुंबाला बहिष्कृत करून कुटुंबाचे स्वास्थ हिरावून घेतले. तरीपण निष्ठुर समाजाने त्या चार अनाथ लेकारांनाही छळले.
आपेगाव हे औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणजवळ गोदावरी नदीच्या काठावर वसलेले छोटे गाव आहे. विठ्ठलपंत तीर्थयात्रा करत करत श्री क्षेत्र आळंदी मुक्कामी येऊन स्थायिक झाले. आळंदी हे सिद्धपीठ होते. त्या काळी संन्यासाची मुले म्हणून सर्व समाज या चौघा भावंडांची हेटाळणी करीत असे. परित्यक्त ब्राह्मण म्हणून त्यांना काळ कंठावा लागला. श्रीज्ञानेश्र्वरांच्या आई-वडिलांनी देहांत प्रायश्र्चित घेतले.
ज्ञानराज माऊली..
        संत ज्ञानेश्वर म्हणजे महाराष्ट्राचे एक अनमोल रत्न ! महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनातील, परमार्थाच्या क्षेत्रातील ‘न भूतो न  भविष्यति’ असे अजोड व्यक्तिमत्त्व व अलौकिक चरित्र म्हणजे संत ज्ञानेश्वर! गेली सुमारे ७४० वर्षे महाराष्ट्रातील सर्व पिढ्यांतील, सर्व स्तरांतील समाजाने जे व्यक्तिमत्त्व आपल्या मनोमंदिरात एक अढळ श्रद्धास्थान म्हणून जपले आहे आणि जे श्रद्धास्थान पुढील असंख्य पिढ्यांतही कायमच अढळ व उच्चस्थानी राहणार आहे; असे एकमेवाद्वितीय व्यक्तिमत्त्व म्हणजे श्री संत ज्ञानेश्वर!
          अलौकिक काव्य प्रतिभा लाभलेला रससिद्ध महाकवी, महान तत्त्वज्ञ, श्रेष्ठ संत, सकल विश्र्वाचे कल्याण चिंतणारा भूतदयावादी परमेश्वरभक्त, पूर्ण ज्ञानाचे मूर्तिमंत प्रतीक, श्रीविठ्ठलाचा प्राणसखा - अशा शब्दांत त्यांचे वर्णन केले जाते. परंतु त्यांचे परिपूर्ण वर्णन करण्यासाठी शब्द अपुरे पडल्याचेही जाणवते. संत चोखामेळा पुढील शब्दांत त्यांना वंदन करतात.
‘कर जोडोनिया दोन्ही। चोखा जातो लोटांगणी।।
महाविष्णूचा अवतार। प्राणसखा ज्ञानेश्वर।।’ 
             प्राणसखा' हा अतिशय वेगळा, सुंदर व समर्पक शब्द चोखोबांनी संत ज्ञानेश्वरांबद्दल वापरला आहे.
संत ज्ञानेश्वरांविषयी तुकोबा म्हणतात...
ज्ञानियांचा गुरु राजा महाराव । म्हणती ज्ञानदेव तुम्हां ऐसें ॥१॥
मज पामरा हे काय थोरपण । पायींची वाहान पायीं बरी ॥२॥
ब्राह्मादिक जेथें तुम्हां वोळगणें । इतर तुळणे काय पुढं ॥३॥
तुका म्हणे नेणें युक्तीची ते खोली । म्हणोनी ठेवीली पायीं डोई ॥४॥
तर नामदेव महाराज ज्ञानेश्वरांबद्दल उद्गारतात...
ज्ञानराज माझी योगियांची माऊली । जेणे निगम वल्ली प्रगट केली ॥१॥
गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी । ब्रह्मानंद लहरी प्रगट केली ॥२॥
अध्यात्म विद्येचे दाविलेसे रुप । चैतंन्याचा दिप उजळला ॥३॥
नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी । एक तरी ओवी अनूभवावी ॥४॥
ज्ञानराज म्हणजे माय मराठीचे हृदय !
          श्री निवृत्तीनाथ हेच संत ज्ञानेश्र्वरांचे सदगुरू होते. ज्ञानेश्वरांनी भगवद् गीतेवर  प्रख्यात टीका लिहिली.या ग्रंथास ‘ज्ञानेश्वरी’ किंवा ‘भावार्थदीपिका’ असे म्हणतात. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून संस्कृत भाषेतील ‘ज्ञान’, श्री संत ज्ञानेश्वरांनी प्राकृत भाषेत आणले.
माझा मराठाचि बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके।
ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।। 
               असे म्हणत त्यांनी मराठी भाषेविषयीचा अभिमान, मराठीची महती व्यक्त केली आहे. सर्व स्तरांतील लोकांना ही ‘ज्ञानेश्वरी’ भुरळ घालते. मराठी भाषेतील हा अद्वितीय ग्रंथ आहे. विचार, भावना, आशयाची खोली, अलंकाराचे श्रेष्ठत्व, अद्वैतानुभूती, भक्तीचा ओलावा, रससंपन्नता या सर्वच बाबतीत ज्ञानेश्वरीने उंची गाठलेली आहे. ‘पसायदान’ ही विश्वकल्याणाची प्रार्थना म्हणजे संत ज्ञानेश्वरांच्या वैश्विक सद्भावनेचा, तसेच प्रतिभेचा परमोच्च साक्षात्कार आहे. कर्मयोग, ज्ञानयोग व भक्तियोग सांगणार्‍या ग्रंथराज ज्ञानेश्वरीत सुमारे ९००० ओव्या आहेत. हा ग्रंथ इ.स. १२९० मध्ये लिहिला गेल्याचे मानले जाते.
पुर्वी गीता ही संस्क्रुत भाषेमध्ये होती. ही संस्क्रुत भाषा सर्वसामान्य मराठी माणसाला समजत नव्हती. म्हणूनच ज्ञानेश्वरीच्या रुपाने हीच गीता ज्ञानेश्वरांनी प्रथम मराठीमध्ये आणली. इ.स.१२७५ मध्ये जन्मलेल्या संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेले पसायदान आजही भारतात म्हंटलं जातं.ज्ञानेश्वर  केवळ गीतेचे भाष्यकारच नव्हते तर लेखक आणि कवीही होते.भागवत धर्माला त्यांनी तात्विक अधिष्ठान दिले.संस्क्रुत भाषेच्या वर्चस्वाच्या काळात सामान्य माणसाला मराठीतून आध्यात्मज्ञान उपलब्ध करून मराठी भाषेला प्राधान्य मिळवुन दिले.
           त्यांचा दुसरा ग्रंथ ‘अनुभवामृत’ किंवा ‘अमृतानुभव’ होय. हा विशुद्ध तत्त्वज्ञानाचा ग्रंथ आहे. सुमारे ८०० ओव्या या ग्रंथात आहेत. तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने हा श्रेष्ठ ग्रंथ आहे. वाङमयीन सौंदर्य व गुणविशेषांबरोबरच मराठीचा अभिमान, संयम, उदात्तता, नम्रता, त्यांचे निर्मळ चारित्र्य, सर्वसमावेशकता, वात्सल्य, भक्तिपरता आणि कालातीतता - असे अनेक गुणविशेष त्यांच्या साहित्यातून आपल्याला अनुभवण्यास मिळतात. ज्ञानदेवांसह सर्व भावंडांवर तत्कालीन समाजाने प्रचंड अन्याय केला, पण त्या अन्यायाबद्दलची पुसटशी प्रतिक्रियादेखील त्यांच्या साहित्यात आढळत नाही, हे त्यांच्या मनाचे मोठेपणच.!
        ‘जो जे वांछिल, तो ते लाहो’ असे म्हणत अखिल विश्वाची जणू काळजी वाहणार्‍या संत ज्ञानेश्वरांना वारकरी संप्रदायासह सर्वच भक्त प्रेमाने ‘माउली’ म्हणतात. त्यांनी धर्मातील क्लिष्ट अवडंबरे काढून धर्माला कर्तव्याचा वेगळा अर्थ दिला. वाङ्मय निर्मितीबरोबरच त्यांनी आध्यात्मिक लोकशाहीचे बीज रोवण्याचा यशस्वी प्रयत्न चंद्रभागेच्या वाळवंटात केला. भागवत धर्माचा तथा वारकरी संप्रदायाचा पाया रचण्याचे अभूतपूर्व कार्य त्यांनी केले. संत नामदेव, संत गोरोबा कुंभार, संत सावतामाळी, संत नरहरी सोनार, संत चोखामेळा या समकालीन संत प्रभावळीचे अनौपचारीक नेतृत्व करत, संत ज्ञानेश्वरांनी अध्यात्माच्या क्षेत्रात समानता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला.
महाराष्टातील वारकरी संप्रदायची प्रतिष्ठापणा ज्ञानेश्वरांनी केली. त्यांनी समाजातल्या सर्व लोकांना भागवत पंथाच्या झेंड्याखाली एकत्र आणले. ज्ञानेश्वरांच्या काळात  नाम शिंपी, नरहरी सोनार, सावता माळी, कान्होपात्रा असे कित्येक भागवत भक्त अभंगरचना करत होते. हे वारकरी कोणालाही श्रेष्ठ-कनिष्ठ मानत नव्हते. ज्ञानदेवांनी लोकांना भक्तीचा सोपा मार्ग दाखवला. परमेश्वरला तुमच्याकडून काही नको असते. देव भक्त भावाचा भुकेला असतो तुम्ही मनापासून भक्ती करा. त्यासाठी पुजा व अर्चेचे अवडबर  माजवण्याची  गरज नाही. केवळ नामस्मरण करा, देव तुमच्यावर प्रसन्न होईल. ज्ञानेदेव जरी मोठे तत्त्वज्ञ होते तरी ते रुक्ष स्वभावाचे नव्हते. उलट त्यांच्या वागणुकीत सर्वांना आईचे वात्सल्य दिसायचे. म्हणूनच सर्वच भक्त ज्ञानेश्वरांना प्रेमाने ‘माउली’ म्हणतात. 
        ‘अमृतानुभव’ या ग्रंथाच्या लेखनानंतर संत ज्ञानेश्वरांनी तीर्थयात्रा केली. संत नामदेव महाराजांच्या ‘तीर्थावली’ मध्ये या तीर्थयात्रेचा उल्लेख आढळतो. या यात्रेनंतर माउलींनी समाधी घेण्याचा निर्णय घेतला. संत नामदेवांच्या ‘समाधीच्या अभंगां’मध्ये तत्कालीन संदर्भ सापडतात. अन्य संतांची मानसिक स्थिती, त्यांच्यासह समाजाला झालेले दु:ख, खुद्द नामदेव महाराजांच्या वेदना, ज्ञानेश्वरांचा संयम आणि निग्रह या सर्व गोष्टींचे प्रतिबिंब समाधीच्या अभंगांत आढळते.
        ज्ञानेश्वरांनी केवळ मराठी साहित्यालाच नाही तर संपुर्ण जनमाणसाला दिलेली अम्रुतवाणी लोकांच्या चिरकाल स्मरणात राहिल. ते सांगत असलेले तत्वज्ञान सनातनी लोकांना समजत नव्हते, की त्यांचा विरोध होता की कोनते कारण होते. त्यांच्या समाधीपणात ते अल्प काळात समाधिस्त झाले. त्यांचे समाधी घेणे म्हनजे न उलघडलेलं कोडंच आहे. आज श्री ज्ञानराजांचे समाधीजीवन असे या महापुरुषाचे लोकोत्तरत्व दर्शविणारे वेगळे कार्य सदभक्तांद्वारे अहमहमिकतेने प्रचारिले जाते. त्याब बाबत कोणी शब्द काढला तरी तो द्वेषी वा तिरस्कारणीय नास्तिक ठरतो.पण मराठीजन म्हणून एवढं मात्र नक्की वाटते की ज्ञानराज जर अजुन काही दिवस जिवंत राहिले असते तर मराठी भाषेला अजुन मोठ्या दर्जाची सम्रुद्धी प्राप्त झाली असती यात काही एक दुमत नाही. असा हा महान ज्ञानसुर्य इ.स.१२९६ ला आळंदी इथे समाधिस्त झाला.
संदर्भ :
मराठी संतांचा परमार्थमार्ग [गुरुदेव रानडे].
संत आणि समाज [पद्मश्री का.कारखानीस ].
संतश्रेष्ठ तुकोबांच्या अभंगाचा गाथा [शासकीय].
आंतरजालावरील काही संकेतस्थळे.
दैनिक देशोन्नती [आत्मोन्नती गुरुवार,दि.२० नोव्हेंबर २००८].