संतश्रेष्ठ तुकोबांच्या हयातीत मंबाजी भट-ब्राह्मण आणि त्यांचे सर्व साथीदार यांनी तुकोबांचा खुप कडाडून विरोध केला. त्यांचे अभंग नदीत बुडविले. गाथा इंद्रायणीच्या डोहात बुडवली आणि तुका सदेह वैकुंठाला गेला अशी आवई मात्र जोरात उठवली. नदीत बुडवूनदेखील तुकोबांचे अभंग लोकांत राहिलेच. ते तेच म्हणू लागले आणि जेंव्हा अभंग बुडवूनसुद्धा आणि तुकोबांना संपवूनही तुकोबा संपत नाही असं दिसून आलं तेंव्हा मंबाजीचे सर्व प्रकारचे सर्व वारसदार तुकोबांचे कौतुक करू लागले. त्यांच्या अभंगात आपले फ़ुसके अभंग घुसडू लागले [त्यांचेच वंशज आजही आहेतच]. त्यांच्या अभंगावर कथा-किर्तने करू लागले.पण हे सगळे करताना एक करू लागले की तुकोबांनी अंधश्रद्धेवर व अन्यायावर जे कोरडे ओढले होते ते लोकांपर्यंत पोहचणार नाहीत अशी दक्षता घेऊ लागले.
असेच काही फ़ुसके क्षेपक अभंग तुकोबांच्या गाथेत आढळतात त्यातील एक प्रचलित म्हणजे "जरी तो ब्राह्मण झाला कर्मभ्रष्ट । तुका म्हणे श्रेष्ठ तिन्ही लोकी ॥ [३०४०].तुकोबांची ब्राह्मणांविषयी ही आस्था आधिक ताणून "जरी ब्राह्मण झाला भ्रष्ट तरी तो तिन्ही लोकी श्रेष्ठ असे भ्रष्ट ब्राह्मणांविषयी उदारतेचे उद्गार काढणारे तुकोबाराय" सर्वप्रथम श्री अनंतदास रामदासींनी उभे केले; आणि ’तुका म्हणे तुम्ही देवा द्विज वंद्य’ [शा.२८८४] आदि अभंग पाहून "रुढ मुल्यांवर निष्ठुरपणे प्रहार करणारे तुकोबा शांत मन:स्थितीत पुन: रुढीपुढे नम्र होतात."हे मात्र सत्य नाही.जरी तो ब्राह्मण झाला कर्मभ्रष्ट । तुका म्हणे श्रेष्ठ तिन्ही लोकी.[३०४०] हे तुकोबांचे म्हणणे केवळ औपरोधित किंवा अर्थवादात्मक आहे"(सा.सं.तु.प्रुष्ठ:१४०) वस्तुश: असली दोनचार वचणे हे गाथेच्या अंगावरील आगंतुक कोडच म्हंटले पाहिजे. असल्या भोंगळ वचनांच्या विरोधात तुकोबांची शेकडो युक्तियुक्त वचणे बाह्या ठोकून उभी आहेत.
यथार्तवाद सांडून उपचार बोलती ते अघोर भोगतील ! "तुका म्हणे आम्ही येथील पारखी । छंदावी सारिखी नव्हो ऐसी" माझ्या जातीचे वजनास बोल कोण ठेवू शके ? "सत्या नाही पाठीपोट" व "लटकियाची न करू स्तुती हिशेब आले ते घ्यावे" हीच तुकोबांची खरी कणखर भुमिका ! "गुण-अवगूण निवाडा " करणारा व "अवगुणी दंडण गुणी पुजा" हे न्याय्य ब्रिद सांभाळणारा तुकोबांचा ’निवाड्याचा ठाव’ असली बुद्धिभेद करणारी वचणे उच्चारूच शकत नव्हता,हे उघड आहे.[९६२, ११३७, १३६७, २३७६,२३७८,२७३५,३४८५,३५१८,(पं.५२४९),५३४७].
"पंडिता: समदर्शिन:" व "य.क्रियावान स पंडित:" यापैकी एकही गुण अंगी नसलेल्या पण अंगी ज्ञानपणाची मस्ती ठेवून इतरांना हिन,तुच्छ समजणार्या ब्राह्मणांना तुकोबा स्पष्टपणे सुनावतात की, "मर्यादा ते जाण अरे अभागिया । देवाच्या ऐसिया सकळ मुर्ती ॥","करी अनेकांचा अपमान । खळ छळवादी ब्राह्मण । तया देता दान । नरका जाती उभयता ॥".असे रोखठोक बाण्याचे तुकोबा; "ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा करू पाहतो" म्हणणार्या शिवरायांच्या प्रणालीचेच होते. म्हणूनच तुकोबांनी ’भेदवाही’ व ’खळवादी वेव्हार’ करणार्या ब्राह्मणांना ’भ्रष्ट सुतकिया खेळ..विटाळ पातकी..न्यानगंडे ढोरे’ इ. शेलक्या शिव्या हासडल्या आहेत व नरकगामी म्हंटलेले आहे.(११२९, १३४५, २३३६, ३६७८, ४५०५)."महाराचा स्पर्ष झाल्यामुळे ज्या ब्राह्मण म्हणविणार्यास क्रोध येतो, तो खरा ब्राह्मणच नव्हे. " या दोषद्रुष्टीमुळे त्याच्या हातून जे पातक घडाले गेले, त्या पातकाला देहान्त प्रायचित्ताशिवाय अन्य प्रायश्चित नाही" हा रोखठोक निर्णय तुकोबा सुनावतात; किंबहुना तया प्रायश्चित काही देहत्याग करता नाही. असे त्यापुढेही एक पाऊल टाकतात. "यातिकुळ येथे असे अप्रमाण । गुणाचे कारण असे अंगी ॥" असे वारंवार झडझडून सांगणार्या तुकोबांनी कोणत्याही कर्मभ्रष्टाला श्रेष्ठत्व देणे शक्यच नाही. हे अभंग बळीच घुसडलेले आहेत.मग हे असले अभंग एखाद्या "सालो-मालो" चे असोत की "श्री समर्थप्रतापामधील एखाद्या हेळवाकीच्या अथवा बिडवीच्या रामदास्याचे असोत.
तुकोबा जर कोणा कर्मभ्रष्ट ब्राह्मणांनाही श्रेष्ठ म्हणू शकले असते तर त्यांचे साहित्य बुडविण्याचे महत्पाप कोणालाही करावेसे वाटले नसते. "सत्याचिया लोपे पापे घडती" या धारणेने तुकोबा सत्य तेच बोलायचे. शिवाय सामान्य समाज हा तत्कालीन ब्राह्मणांच्या नादी लागून आंधळ्याचे काठी लागलेल्या आंधळ्याप्रमाने देवधर्माला आचवन गर्तेत बुडत आहे हे द्रुष्य़ तुकोबांना डोळा देखेवेना. त्याकाळी ब्राह्मणांचे किती अंध:पात झाला होता याची शेकडो प्रमाणे तुकोबांच्याच नव्हे तर ब्राह्मण लेखकांच्याही साहित्यात मिळते.रामदासांचे शिष्य दिनकर गोसावी "स्वानुभव-दिनकर" ग्रंथात ब्राह्मण भांग सेवू लागल्याचे लिहिले आहे.किंबहुना "ब्राह्मण झाले दासीगमनी" असे वर्तवले आहे. समर्थबंधु "श्रेष्ठ" यांनी सुद्धा "तपसत्यविहिन द्विज परान्न प्रद्रव्य परस्त्रीलोलुप" होऊन "तीर्थव्रतादि करणारांचा उपहास" करीत, "वेदशास्त्र पुराण"च नव्हे, तर "कन्याविक्रय"करीत. "दुष्टदेवा दुष्टपरिग्रह दुराचारी दुराग्रह व मद्यमांसाशन" हेच ब्राह्मणांचे स्वरूप झाले होते असे म्हंटले आहे(भक्तिरहस्य). खुद्द रामदास स्वामी सुद्धा "ब्राह्मण बुद्धिपासून चेवले । आचारापासून भ्रष्टले ॥", ब्राह्मणास ग्रामणीने बुडविले, मिथ्या अभिमान गळेना मुर्खपणाचा, आदि वचणं बोलीले आहेत. संत कान्होबा म्हणतात, "उत्तम ब्रह्मकर्म सोडून अठरा यातीचे व्यापार ब्राह्मण करत."
ब्राह्मणांचा देह शुद्रकर्मासाठी नसतो असे भागवत म्हणते. वेदाखेरीज अन्य कार्य करणारा ब्राह्मण जीवंतपणीच शुद्र होतो. अशीही स्म्रुती आहे. तरीपण व्याजबट्याचा व्यवसाय ब्राह्मणांनी सर्वत्र स्विकारलेला दिसतो आणि स्म्रुतीनियमाप्रमाणे असे करणे पाप होते. साता दिवसांचा जरी झाला उपाशी । तेने किर्तनासी सोडू नये ॥ हे तुकोबांचे नि:स्प्रुह लोकशिक्षणव्रत म्हणजे ब्रह्मकर्मावर आक्रमण वा अपराध म्हणता येईल का ? ब्राह्मण वेदविद्वांस मद्यमांस, अंगीकरून भेद न देखता खुशाल गोंधळ घालायचे, केवळ पिंडाचे पाळण करण्यासाठी पुण्यविकारा करायचे किंबहुना आचार सांडून अधर्मा टेकायचे, चहाड्चोर व्हायचे. अर्थात त्याकाळी बहुतांशी ब्राह्मण वंदाया पुरते तणसाचे वाघ होऊन राहिले होते आणि आपली आब्रु वाचवण्यासाठी "ब्राह्मण जरी झाला भ्रष्ठ । तरी तो तिन्ही लोकी श्रेष्ठ" असल्या बिनबुडाच्या पाट्या रंगवाव्या लागत होत्या. मग अशांना "हिन सुकराच्या जाती" म्हणून तुकोबांनी संबोधले तर चुकले कोठे ?.
सर्वात महत्वाचे म्हणजे ब्राह्मण त्याकाळी वयक्तिक चरित्रच गमावून बसला होता असे नाही. तर स्वदेश, स्वभाषा व स्वदेशधर्म आपल्या शुद्रस्वार्थापायी कोळून पिताना दिसत होता.
सांडुनिया रामराम । ब्राह्मण म्हणती दोमदोम ।
तुका म्हणे व्रुत्ती । सांडूनी गदा मागत जाती ॥(७९३)
पोटासाठी खौसा । वंदिती म्लेच्छांच्या ॥ (३०३५)
हे निरुपायाने आपदधर्म म्हणून ते करीत होते, असेही नाही.स्वार्थ बुडविली आचरणे (३९२२) असे तुकोबा सांगतात तर रामदास म्हणतात."कित्येक दावलमलकास जाती । कितेक पिरास भजती । कितेक तुरूक होती । आपुले इच्छेने ॥" इथे आपुले इच्छेने हे शब्द विशेष लक्षणीय आहेत.
एकूण ब्राह्मणवर्ग परधर्मिय मुसलमानांच्या सेवेत गर्क झालेला असून त्याची नीतिमत्ताही सामान्य जनांच्या पातळीवर आलेली होती. ब्राह्मण वर्गात अमुक एक गोष्ट न करणारा असा राहिला नव्हता असे त्र्यं.शं.शेजवलकर म्हणतात. वि.का.राजवाडे देखील मान्य करतात की "घाटांचे दर्गे बनले आणि राऊळाचे महल झाले, फ़ार काय सांगावे, ब्राह्मण दावलमलकादि पीरांना भजू लागले. कित्येक ब्राह्मण पीरांचे मुजावरही बनले ! ते बहुतेक मुसलमान बनन्यासारखे झाले, इतकेच की त्यांनी सुनतेची दिक्षा मात्र घेतली नाही, तीही त्यांनी घॆतली असती, परंतू त्यांच्या आड एक मोठी धॊंड आली ती धॊंड म्हणजे महाराष्ट्रातील साधूसंत होते." याच साधुसंतांचे मुख्य प्रतिनिधी शिवबालकिल्यात संतश्रेष्ठ तुकोबा हे होते आणि ते "झाडू संतांचे मारग" या प्रतिज्ञेने कटिबद्ध होऊन भक्तिच्या सुगम मार्गाने संपुर्ण बहुजन समाजाची उन्नती सारी शक्ती एकवटून करू पाहत होते.
अवघ्या दूर्बळ जगात "दुर्बळांच्या नावे डोंगारा पिटून" आपली प्रतिष्ठा टिकवण्यासाठी ब्राह्मणांनी जो ’लटकियाचा वाहो’ म्हणजे असत्य रुढ्यांचा हैदोस चालवला होता, तो जनजाग्रुतीद्वारे हाणुन पाडण्यासाठी "गाडीन मी भेद । प्रमाण तो यासी वेद ॥" अशी प्रतिज्ञा तुकोबांना करावी लागली. भेद वाढवणार्या धर्मठकांची रोखठोक पणे "वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा" या आत्मविश्वासपुर्ण घोषणेने तुकोबांनी इंद्रायणीच्या वाळवंटात समतेचा झेंडा रोवला.ही घटना अटकेपार झेंडा रोवण्याच्या घटनेपेक्षा कमी नव्हेच, उलट आधिक गौरवाची आहे.
म्हणुनच "वर्ण-अभिमाने कोण झाले पावन । ऐसे द्या सांगूण मजपाशी ॥
अत्यंजादि योनी तरल्या हरीभजणे । तयांची पुराणे भाट झाली ॥
असे ठणकावून वर्णव्यवस्थेची रेवडी उडवून टाकणारे तुकोबा कोणत्याही कर्म-भ्रष्ट झालेल्या ब्राह्मणाला सर्वश्रेष्ठत्वाचे प्रमाण दिले असेल असे ज्यांना वाटेल त्यांना वाटो पण हा अभंग निश्चितच क्षेपक आहे.
संदर्भ :
संतश्रेष्ठ श्री तुकोबांच्या अभंगगाथा [शासकीय,पंढरीप्रत,श्री पडवळ संपादित]
श्री.शिवछत्रपती(प्रुष्ठ क्र.३४) [त्र्यं.शं.शेजवलकर].
छ.शिवाजी महाराजांची पत्रे(प्रुष्ठ क्र.१६७)- [प्र.न.देशपांडे].
संतश्रेष्ठ तुकाराम : वैकुंठगमन की खून ? [साहित्यरत्न सुदाम सावरकर].
गीता (अ. ६-श्लो. १८) [व्यास].
महाभारत (शां.२६५-९) [वाल्मिकी].
भागवत (११-१७-४२).
स्वानुभव-दिनकर (९-२-७७)[दिनकर गोसावी].
भक्तिरहस्य (२-३९,४०.७३-४६,४८).
पहिला सुमनहार (प्रुष्ठ क्र.१२७) [श्री अनंतदास रामदासी].
दासबोध (१४-७-३१ते ३९)[समर्थ रामदास].
संत आणि समाज(प्रुष्ठ क्र.१२०) [श्री कारखाणीस].