22 March 2014

संतश्रेष्ठ तुकोबा : वैकुंठगमन की खुन ? [भाग दोन]

संशोधनापुढे ध्येय
        तुकोबारायांची "ब्रह्मरुप काया" ऐन उमेदीत नाहिशी झाल्याने त्यांच्या परीवाराचे,देशाचे आणि धर्माचे देखील अपरिमित नुकसान झाले. हे खरे असले तरी ती काया नाहीशी कशी झाली याचे गुढ आता उकलून काही खास लाभ होण्याचा संभव आहे का ? अजिबात नाही आणि या संशोधनाचा उद्देश तो असूच नये.पण त्यांच्या देहाबरोबर त्यांचे श्रेष्ठ तत्वज्ञानच लोपवून टाकण्याचा जो प्रयत्न ’सदेह वैकुंठगमना’ची कल्पना पसरवणार्यांनी कळत-नकळत केला.तो हाणून पाडणे हेच काय ते प्रयोजन असले पाहिजे. "पावलो पंढरी वैकुंठभवन"(३८९९) म्हणणार्या तुकोबांना कुठल्या दुरस्थ वैकुंठी जायचे होते की हे विश्वच वैकुंठरुप करायचे होते ? हे जरी स्पष्ट झाले तर मानव समाजाला ते हितावह ठरणार हे सांगायलाच नको.तुकोबांना वैकुंठातून भुमीवर आणणे हे लोकाद्धारासाठीच उपयुक्त आहे.नाहीतर कुठले तरी वैकुंठ हेच भाविकांचे ध्येय ठरून, आकाशाकडे पाहत त्यांची भुमीवर अस्ताव्यस्त पावले पडणे व "परलोका"च्या ठेकेदारांना त्याची मनसोक्त लुट करता येणे चालूच राहणार हे लक्षात घेता, हे संशोधन म्हणजे गडे मुर्दे उकरणे नव्हे तर "खरे नानवट निक्षेपीचे जुने । काढले ठेवणे समर्थांचे" (८८३) याची जाणीव ज्ञात्यांना झाल्याखेरीज राहणार नाही.
संतशिरोमणी तुकोबा आणि इतर संत महात्म्य..
आज श्री ज्ञानराजांचे समाधीजीवन व तुकोबारायांचे सदेह वैकुंठगमन असे या महापुरुषांचे लोकोत्तरत्व दर्शविणारे वेगळे कार्य सदभक्तांद्वारे अहमहमिकतेने प्रचारिले जाते. त्याब बाबत कोणी शब्द काढला तरी तो द्वेषी वा तिरस्कारणीय नास्तिक ठरतो. याबाबत खरा विचार करायला हवा की खरेच का असली बाब हीच त्या महापुरुषांचे सर्वश्रेष्ठत्व दर्शवणारी आहे ? त्यांच्या संतत्वाची गमक काय ? आद्यशंकराचार्यापासून तर समर्थ रामदासांपर्यंत एकालाही- श्री ज्ञानराजाला सुद्धा-सदेह वैकुंठी सुयोग लाभला नाही, म्हणून त्या सर्वांच्याच संतत्वाचा दर्जा तुकोबारायांपेक्षा कमी असे लेखण्याचे मनोधैर्य आपल्यात आहे काय ? समाधीजीवन, पुनर्जीवन किंवा सदेहवैकुंठगमन हेच आपले खरे पुर्णत्व किंवा हेच मानवजीवणाचे परमलक्ष्य होय. असे तरी त्या महात्म्यांनी स्वत: कोठे सांगून ठेवले आहे काय  ? तसे जर नाही तर या गोष्टीला इकडे पराकोटीचे महत्व देण्याला तरी काय अर्थ आहे ? 
वैकुंठगमनालाच खराखुरा अर्थ आहे असे जर प्रामाणिकपणे वाटत असेल तर त्याचा पुरेपूर छडा लावणे हे तरी प्रत्येक जाणत्या भक्ताला अत्यावश्यक का वाटू नये ? निव्वळ ’पीछेसे आयी आगे धकाय” अशी मुर्दांड श्रद्धा जपून ठेवण्याला काही किम्मत आहे का ? "वंदिले वंदावे निंदिले निंदावे" अशी "न धरावी चाली करावा विचार" हीच तुकोबांरायांची शिकवण आहे आणि याच शिकवणीनुसार त्यांच्या "सदेह वैकुंठगमना" च्या अथाशक्य सर्व पैलूंवर त्यांच्याच वाणीचा विवेकपुर्ण प्रकाश पाडताना अनेक प्रश्न-शंका उभे ठाकतात, "ज्या महापुरुषाचा इहलोकी अभंगरचना करण्याचा देखील अधिकार तीव्रपणे नाकारण्यात आला, त्या महापुरुषाला एकट्यालाच सदेह वैकुंठगमनाचा सर्वाच्च अधिकार मात्र खुशाल बहाल केला जातो यातील मख्खी काय कळत नाही. शिवाय, ज्या कुटुंबातील प्रमुख देवपुरुष ’सकळा पुसून’ देवासह सदेह वैकुंठी जाण्याचे अभूतपुर्व कार्य करून दाखवितो, त्या कुटुंबाला त्या भाग्यशाली घटानेनंतर महिन्याभरातच सर्वस्व टाकून त्या पावन पित्रुभुमीतून पळून जावे लागते याचा अर्थ काय ? इत्यादी शंकांच्या संदर्भातही अथाशक्य समग्र विचार करणे प्रत्येक तुकोबांच्या सदभक्तांचे कर्तव्य आहे."
तुकोबांच्या हत्येची शक्यता ?
यापुर्वीचे बरेच विचारवंत आणि आजच्या सामाजिक संघटनांच्या मते तुकोबांची हत्या झाली असावी. याचे मुख्य कारण त्यांचे क्रांतिकारक तत्वज्ञान. कर्मकांडांच्या बडिवारापेक्षा भक्तीचे श्रेष्ठत्व ते सांगत होते. वर्णश्रेष्ठत्वापेक्षा सदचाराचा महिमा ते गात होते."वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा । येरांनी वाहावा भार माथा" असे गर्जत "भेदाभेद अमंगळ" म्हणून इंद्रायणीच्या वाळवंटात तुकोबांनी समतेचा झेंडा रोवला होता. त्यामुळे प्रतिष्ठितांच्या प्रतिष्ठेवर आघात होत होते. त्यांच्या प्रस्थापित वर्णवर्चस्वाला होणार्या खंद्या विरोधामुळे मंबाजी सारखे अहंकारी भट मत्सराने जळू लागले होते. याचा पहिला प्रत्यय तुकोबांना आला तो त्यांना आपल्या अभंगाच्या वह्या इंद्रायणीत बुडवायला सांगण्यात आले तेंव्हा.वर्णवर्चस्वाच्या स्वार्थापलीकडे कुठलाही शास्त्रार्थ यामागे नव्हता.
या प्रसंगानंतर कालांतराने तुकोबांना आपल्यावरील प्राणांतिक संकटाची कल्पना आली."लावुनी कोलीत माझा करतील घात" ह्या अशा अनेक उद्गारावरून हे स्पष्ट होईल.त्याप्रमाणेच शेवटी झाले. सालो-मालो, मंबाजी यासारखे दुर्जन भट तुकोबांच्या विरोधात जळफ़ळत होते.त्यांनीच तुकोबांच्या खुनाचा डाव रचला आणि सिद्धिसही नेला. तुकोबांच्या त्या अंत्यकालीन संकटाची जाणीव संत बहिनाबाईंच्या अभंगाद्वारे होते. संत बहिनाबाईंनी पाहिलेला मंबाजी "मारु पाहे घात चिंतुनीया" असे स्पष्ट वर्णन केले आहे.
तुकोबांचा खुन झाला असावा असे आत्तापर्यंत अनेकांनी म्हंटलेले आहे. श्री दयानंद पोतदार यांच्या "संत तुकाराम आणि त्यांच्यावरील आक्षेप" या पुस्तकाला लिहिलेल्या प्रस्तावनेत त्यांनी म्हंटले आहे की तेंव्हा तुकोबांचा कोणीतरी गुप्तपणे वध केला असावा आणि खर्या गोष्टीच तपास लावण्याकडे कोणाची मती वळू नये म्हणुन प्रारंबी यात्रेची, नंतर जलसमाधीची व त्यानंतर सदेह वैकुंठगमनाची अशा एकेक कंड्या वातावरणात सोडून दिल्या असाव्यात असा तर्क संभवणीय वाटतो."
दुसरा पुरावा असा की तुकोबांचा नैसर्गिक म्रुत्यू आला असता किंवा ते खरोखरच सदेह वैकुंठाला गेले असते तर त्यांचे बंधू कान्होबा यांना "दु:खे दुभागले ह्रुदयसंपुष्ट" इतका शोक करण्याचे काय कारण होते ? वस्तुस्थिती अशी दिसते की तुकोबांच्या अंतानंतर त्यांचे सगळे कुटुंबच देशोधडीला लागले.पुढे अनेक वर्षापर्यंत तुकोबांचा एकही वंशज देहूला नव्हता.याचे कारण काय असावे ? ह्या सर्व गोष्टी विचारवंतांनी प्रतिपादन केलेल्या प्रमेयाला पुष्टीच देतात.
                                                                                                                                 (क्रमश:)

18 March 2014

संतश्रेष्ठ तुकोबा : वैकुंठगमन की खुन ? [भाग एक]

संतश्रेष्ठ तुकोबाराया
           साने गुरुजींनी त्यांच्या स्वप्न आणि सत्य ग्रंथामध्ये प्रुष्ट क्र.११२ वर म्हंटले आहे "ग्यानबातुकाराम हे महाराष्ट्राचे ह्रुदयसम्राट आहेत. त्यांचे साहित्य हे खरे राष्ट्रीय साहित्य आहे,कारण ते सर्व थराथरात गेले." संत तुकोबांच्या गाथेमध्ये अखिल विश्वाच्या कल्याणाचे तत्वज्ञान एकवटलेले आहे. प्रा.न.र.फ़ाटक म्हणतात "तुकोबांच्या वाणीत जे तेज व सत्व आहे त्याची घट्ट ओळख असणार्यांनी ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ यांची ओळख करून नाही घेतली तरी चालेल. तुकोबांच्या लिखानात या सर्वांच्या शिकवणुकीचे रहस्य सापडेल; अशा योग्य उद्देशाने भागवतधर्ममंदिराचा कळस म्हणण्याची प्रथा पडली." अशा या परमोज्ज्वल कळसा बाबत जनाजनाच्या मनामनात प्रगाढ श्रद्धा आहे.पण त्यातही वारकर्यांच्या आवडीचे स्वरूप काही निराळे आहे.
जीव जीती जीवनासंगे । मत्स्या मरण त्या वियोगे ॥
सकळा पढीये भानु । परि त्या कमळाचे जीवनु ॥
या प्रमाणे इतरांच्या द्रुष्टीने महान असणारे तुकोबाराय वारकर्यांचे तर जीवनच आहेत.
            संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या निर्वाणासंबंधी आजपर्यंत अनेकांनी चर्चा केली आहे."महाराष्ट्र सारस्वत"कार भावे यांच्या पासून ते आत्तापर्यंतचे साहित्यिक यात आहेत. श्री वा.सी.बेंद्रे यांसारखे संशोधकही यामध्ये आहेत. यांच्या मालिकेत आजच्या सामाजिक संघटनांचा देखील समावेश करावा लागेल. संत तुकारामांचा खुनच केला असावा असे स्पष्टपणे प्रतिपादन करणारेही बरेच होऊन गेले. इतकेच काय पण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनीही "मेला की मारला कळेना । म्हणती वैकुंठाला गेला ।" या आपल्या उद्गारात याच प्रमेयाकडे संकेत केला आहे.
निर्वाण अभंग आणि अभंगपत्रे
           संतश्रेष्ठ तुकोबांच्या निर्वानाचा प्रश्न त्यांच्याच अभंगाच्या द्वारे सर्वांनी सोडविण्याचा प्रयत्न केला आहे.मग त्यात मत-मतांतरे का निर्माण व्हावीत ? यातील एक महत्वाची गोष्ट अशी की, संतांच्या आज ज्या गाथा आढळतात त्यात त्यांनी हे लिहिलेले अभंग कालानुक्रमाने दिलेले असतात असे मुळीच नाही. संत तुकारामांच्या अभंगातही असेच झालेले आहे. आपल्या आयुष्यात अभंगरचना करताना कदाचित स्वत: तुकाराम महाराजांनी किंवा त्यांच्या लेखनिकांनी  ते क्रमश: लिहुन ठेवलेलेही असतील. पण आज कालानुक्रमाने लिहिलेल्या अशा अभंगाचा अस्सल गाथा उपलब्ध नाही. आहे त्या अभंगाची विषयावार विभागणी करून ते छापलेले आहेत. उपलब्ध गाथ्यात सर्वत्र ही विषयविभागणी आणि त्यात अंतर्भूत केलेल्या अभंगाची संख्या ही सारखी आढळते अशी नाही. अशा विषयविभागणीच्या प्रयत्नातूनच तुकाराम महाराजांच्या अंत्यकाळा विषयीच्या अभंगाचे प्रकरण निर्माण झाले आहे.
             निरनिराळ्या गाथ्यात आढळणार्या अशा निर्वाण प्रकरणातील अभंगाची तर्ककठोर बुद्धीने छाननी केली तर समजुन येईल की हे निर्वाणाचे अभंग केवळ संकलनात्मक आहेत. प्रत्येक संपादकाने वेगवेगळ्या अभंगसंचातून आपल्याला सोईचे वाटतील असे किंवा ओढून ताणून उपयोगी आणता येतील असे असंबद्ध विषयींचे अभंग आपापल्या संपादणीतील निर्वाण प्रकरणात संकलीत केले आहेत. इतकेच नाही तर तुकोबांच्या निर्वाणासंबंधी आपल्या मताच्या पुष्ट्यर्थ काही प्रक्षिप्त अभंगही त्यात घातले गेले आहेत. या संकलनाबाबत एक दोन उदाहरणे पुरेशी आहेत.
१] "क्र.१५९६ या अभंगात गरुडावर बसून चतुर्भुज हरी वैकुंठाहुन तुकोबांच्या घरी येतात. क्र.१६०६ मध्ये श्रीरंगाशेजारी गरुडावर बसण्याऐवजी तुकोबा एकदम कुडीसहीत गुप्त होतात...गुप्त झाल्यानंतरही अभंग सुरुच असतात. क्र.१६०७ मध्ये तर आत्तापर्यंतच गरूड विमानात परिवर्तीत होतो आणी तुका बैसला विमानी हे द्रुष्य़ संत लोचनी पाहू शकतात. याच अभंगाच्या शेवटी तुका वैकुंठासी नेला तरी देखील १६०८ हा अभंग जन्मास येतोच.त्यात तर तुकोबा ’क्षीरसागर शयनी’ पोहचून सिंहासनी बसले आहेत.तो अभंग इहलोकी कसा म्हंटला गेला ? आणि क्षीरसागरी पोहचल्यानंतर वाराणसीपर्यंत असो सुखरूप (क्र.१६०९) असा काशीला पोहचल्याचा निरोप कसा काय आला ? या शेवटच्या अभंगात आपण येथून निजधामास जाणार असे तुकोबा म्हणतात. येथे तुकोबांबरोबर देव नाही पण गरूड मात्र आहे ! अशी ही सारी विसंगतीची चमत्क्रुती !"
२] "चार कोसांवर विमान थांबवून जर हे अभंग लिहिले तर ’सकळही माझी बोळवण करा’ हे म्हणजे भुमीवरचे की आकाशातले ? ’उठा एक ऐका सांगतो तुम्हासी’..अशी सहा ओळीत तीनदा सांगण्याची पुनुराव्रुत्ती व्हावी,हे तुकोबांना सर्वथा अमान्य असणार्या रचनाशैथिल्याची कल्पना आणुन देण्यास पुरेसे नाही का ? स्वपत्नीसाठी येतो काकुलती मनी धरा म्हणून ’पदर पसरून दाढी ओठी’ धरून केविलवाणीने लोकांची मनधरणी करावी. देवासह वैकुंठी जाण्याचे अपुर्व भाग्य लाभले असताही ’अहो देवा ! कैसी घरबुडवण केली’ म्हणून आकांत करावा आणि ’देवांचे ते मुळ शोधू नये कोणी’ असा भलताच उपदेश करावा  हे सारे तुकोबांच्या व्यक्तित्वाशी सुसंगत असेच आहे का ?  ’म्हणे मज आता निरोप द्यावा- ऐसे बोलो निया गुप्त झाले’ ही सारी रचना तुकोबांचीच आहे असे म्हणता येईल का ?..."
श्री तुकोबा महाराज विमानात बसुन सदेह वैकुंठाला गेले असे मानणार्या प्राचीनांनीच त्यांची ’विमानातून लिहिलेई अभंगरुप पत्रे’ निर्माण केली आहेत. असे का म्हणू नये ? ’चौकोशावरी थांबवली विमाने । पत्र हे तेथून तुम्हा लिहिले’ व ’स्वर्गलोकीहुनि आले हे अभंग’ या वचनांमधील ’तेथून’ व ’आले’ हे शब्द स्पष्टच सुचवितात की ते शब्द प्रुथ्वीवरील व्यक्तीच उच्चारू शकते. शिवाय ’चौकशा’वर ’स्वर्गलोक’ असू शकत नाही. ’सप्त अभंगी पत्र’ व ’बारा अभंगी पत्र’ या दोन्ही बरोबर ’टाळगोधडी’ चा उल्लेख आहेच. तेंव्हा, तुकोबांबरोबर ’टाळगोधड्या तरी किती कल्पाव्या ? "तुकोबांचे निर्वाण झाले द्वितीयेस तर टाळगोधडी मिळाली पंचमीस ! हे साहित्य नेमके देहुलाच पडले" हे वास्तवतेच्या पलिकडचे नव्हे काय ? अशा भाकडकथा सांगणारे अभंग प्रक्षिप्त नव्हे तर काय म्हणावे ?.  
शुद्ध संशोधनासाठी
देवधर्म आणि अंधश्रद्धा यांमध्ये बुडालेले कोणी भक्त म्हणतील की लोकमाणसात वैकुंठगमनाची दिव्य कल्पना शेकडो वर्ष द्रुढमुल झाली असता आता हे नव्याने मांडून कोणते कल्याण होणार आहे ? "जाले तेंव्हा जाले मागील ते मागे । आता वर्म लागे ठावी झाली ॥" हे सत्य असले तरी गडे मुर्दे उकरून लाभ काय ? हा प्रश्न बराच महत्वाचा आहे..खरे तर कोणत्याही बाबतीतले सत्यदर्शन हे निरपेक्षपणे स्वत:च अत्यंत मुल्यवान असते हे खरे. असत्यावर आधारलेली कल्पना दिव्य असली तरी ती कांचनम्रुगाप्रमाणे फ़सवी असते.  ’जगरुढीसाठी घातले दुका असे ’पोटदंभाचे पसार’ मांडणारे धर्माचे घाऊक व्यापारी ’चालीचाचि वाहो’ कायम ठेऊन आपल्या ग्राहकांच्या भ्रांत भावनांची खुशाल जपणूक करोत, पण संत मात्र तो मुलामा उडवून लावणेच हितावह समजतात. कारण भ्रामक कल्पनांनी कोणाचा कधीच उद्धार होत नसतो. उलट असत्याभिमान व डोळे बांधलेली श्रद्धा यांच्या पोटी शेकडॊ पापेच जन्मास येतात.
"तुका म्हणे लोपे । सत्याचिया घडती पापे " हे कसे विसरता येईल ? म्हणूनच तुकोबाराया निक्षून सांगतात-
"अहो श्रोतेवक्ते । सकळही जन ! बरे पारखून बांधा गाठी ॥
तुके तरी तुकी खर्याचे उत्तम । मुलामांचा भ्रम कोठवरी ?"
           भक्तांच्या भावना दुखावतील एवढ्यासाठी सत्य दडपून टाकायचे हा धर्म आहे का ? "लटिके ते रुचे । सत्य कोणाही ना पचे ॥" म्हणून असत्यच घोपटायचे की काय ? "धर्म आहे वर्माअंगी" याची वारंवार जाणीव करून देणार्या तुकोबांनी स्वष्ट केले आहे की कोणाच्या भिडेसाठी अथवा भावनेसाठी सत्य डावलता कामा नये.’नये भिडा सांगो आन’ व ’काकुळतीसाठी सत्याचा विसर । पडले अंतर न पाहिजे॥. ’त्यामुळे इथे कोरड्या कल्पना जुगारून यथार्तवादच स्विकारायला हवा.
                                     (क्रमश:)

10 March 2014

अमर जाहले शंभुराजे !

शिवशाहीर जगदीशचंद्र पाटील
बुलढाणा
|| जय शिवराय | जय शंभुराजे | जयोस्तु मराठा | जयोस्तु महाराष्ट्र ||
              मराठा स्वराज्याचे दुसरे छत्रपती शंभुराजे म्हणजे जगातील इतिहासकारांचं न सुटलेलं कोडंच आहे. शंभुराजे या महानायकाने हिंदुस्तानातील हजारो साहित्यिकांना, कादंबरीकारांना, कथाकारांना, नाटककारांना, चित्रपट निर्मात्यांना वेगवेगळ्या प्रकारे खाद्य पुरविले. बुद्धीच्या अनेक ठेकेदारांनी आपापल्या पद्धतीने शंभुराजांचे चरित्र लोकांसमोर मांडले.ते सुद्धा बर्याच प्रमाणात विक्रुत चरित्र. शंभुराजांच्या विषयी उणीउरी दोनशे वर्षे गैरसमजांचे जे पिक आले, त्याला कारणीभूत होती ती मल्हार रामराव चिटणीसची बखर; परंतू कै.वा.सी.बेंद्रे यांनी चाळीस वर्षे कष्ट घेऊन शंभुचरित्राचा खरा इतिहास उभा केला आणि जाज्वल्य इतिहासातून अनेक लेखकांना दिव्य द्रुष्टी दिली. त्यामध्ये शिवाजी सावंत, डॉ.जयसिंगराव पवार, विश्वास पाटील, डॉ.कमल गोखले, विजय देशमुख यांसारख्या विद्वानांनी खरे आणि भव्य दिव्य असे  शंभुराजांचे चरित्र जनमानसांसमोर आणले. शंभुराजांनी वयाच्या नवव्या वर्षापासून राजकारणाचे धडे घेतले. हिंदी व संस्क्रुतमध्ये कमी वयात चार ग्रंथ लिहिणारे शंभुराजे एकमेव साहित्यिक होते. मोअज्जमच्या छावणीत शिवरायांनी त्यांना दोन वर्ष पाठविले होते. वयाच्या चौदाव्या वर्षी ते राजकारभारात लक्ष घालू लागले आणि वयाच्या सतराव्या वर्षी रायगडावर युवराज म्हणून घोषित झाले.एकोणीसाव्या वर्षी पन्हाळा, श्रुंगारपूर आणि प्रभावलीचे सरसुभेदार म्हणून नेमले गेले.
        छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसार ते दिलेरखानाच्या गोटात गेले आणि स्वराज्यावर होणारे मोघली आक्रमण काही काळ थोपवून धरले. या वेळेस छत्रपती शिवराय दक्षिण मोहिमेवर गेलेले होते. शंभुराजे जालन्याकडील लढाईवर गेले असता, थोरले महाराज निधन पावले. महाराजांच्या निधनाचे व्रुत्त आणि राजाराम महाराजांना गादीवर बसविण्याचे कारस्थान त्यांना पन्हाळ्यावर कळले. त्यानंतर त्यांनी पन्हाळ्यावरूनच कारभार पाहिला. या ठिकाणी शेकडो मराठे त्यांना येऊन मिळाले. रायगडावरील कट करणार्यां प्रधानमंत्र्यांनी शंभुराजांना अटक करण्याचा प्रयत्न केला; परंतू तो त्यांनी हाणून पाडला व स्वत: रायगडावर दाखल झाले. शिवरायांच्या काही मंत्र्यांनी विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रकार समजताच सर्वांना त्यांनी देहान्त शासन केले. या शिक्षेमध्ये बाळाजी आवजी चिटणीसचा समावेश होता. बाळाजी हा मल्हार रामराव चिटणीसचा खापरपणजोबा होता. आपल्या खापर पणजोबाला शंभूराजांनी हत्तीच्या पायाखाली दिले होते. म्हणून त्यांचा सूड घेण्यासाठी तब्बल १२२ वर्षांनी मल्हार रामरावाने शंभूराजांच्या चरित्राची बखर लिहून त्यांना बदनाम करण्याचे कारस्थान केले. पण असल्या गोष्टी इतिहासाला मानवत नसतात. शंभुराजे हे साधुसंतांचा आदर करणारे होते. छत्रपती शिवरायांच्या अलौकिक व्यक्तिमत्वातून हे शंभुतेज प्रकटले होते. आपल्या अचाट पराक्रमाने शंभुराजांनी मराठा स्वराज्याच्या सीमारेषा वर्धिष्णू करीत या तेजाची दाहकता सिद्ध केली होती. शिवरायांच्या निधनानंतर अवघं मराठा स्वराज्य नेस्तनाबूत करण्याच्या प्रचंड महत्वकांक्षेने सात लाखांच्या अफ़ाट फ़ौजेसह दक्षिणेत उतरलेल्या औरंगजेबाला नामोहरण करून सोडणं ही काही समान्य बाब नव्हती. या बलाढ्य मोगली सल्तनतीशिवाय जंजिरेकर सिद्धी, पोर्तुगीज आणि इंग्रजांसारखे शत्रूदेखील स्वराज्याचे लचके तोडायला एकवटून उभे झालेले होते. हे कमी पडावेत म्हणुन की काय आमच्यातलेही हिंदू विरोधकही तलवार उपसून सज्ज उभे होतेच. या सर्व आघाड्यांवर मराठा स्वराज्याच्या संवर्धनासाठी आणि संरक्षणासाठी सांडलेली संभाजी राजांची एकाकी झुंज, ही निर्विवादपणे त्यांच्या महानतेची आणि पराक्रमाची यथार्थ सक्ष देऊन जाते.उण्यापुर्या नऊ वर्षाच्या अखंड संघार्षात सुमारे सव्वाशे लढाया जिंकणारे आणि एकही तह न करणारे संभाजीराजे अलौकिक आणि असामान्य होते. अशा कडव्या धेयवादासाठी आणि अस्मितेसाठी काळीज आणि मनगट संभाजीराजांचेच हवे.येर्यागबाळ्याचे ते काम नव्हे.
           वयाच्या अवघ्या बत्तीसाव्या वर्षीच संभाजीराजांनी स्वराज्यकार्यी हौतात्म्य पत्करले. अटकेत असताना संभाजीराजांच्या दीर्घाकाळ यमयातना सुरु होत्या.तोज एक एक अवयव तोडल्या जाऊन त्यांच्या संपुर्ण अंगाची साल सोलून काढण्याच आली.डोळे काढून जीभ कापल्या गेली. पायापासून ते मस्तकापर्यंत अवघ्या देहाची खांडॊळी करून संभाजीराजांचे मस्तक भाल्याच्या टोकावर रोवण्यात आले. देह खंडित झाला तरीही शंभुराजांचा स्वाभिमान आणि राष्ट्रनिष्ठा अभेदच राहिली. कारण शिवशाहीची हीच उदात्त शिकवण होती. छत्रपती शिवरायांच्या आदर्श पावलांवर पाऊल टाकीत या सिंहपुत्राने बलिदानाची, त्यागाची एक नवी परंपरा राष्ट्राला समर्पित केली. जिला देशातच काय पण जगाच्या इतिहासात तोड नाही. 
रणधुरंदर महापराक्रमी शंभुराजांना मानाच मुजरा... जय शंभुराजे

9 March 2014

शाहूछत्रपती आणि तथाकथित अनुयायी

सातशे संस्थानी अशी शक्ती । एक कोल्हापूरी शाहूमुर्ती ।
अलौकीक विलायतेत किर्ती ॥
जो निद्रिस्त महाराष्ट्राला । जागे करण्याला ज्ञानरवी झाला ।
शाहू छत्रपती सत्य आधार । मानवी जाणविले अधिकार ।
म्हणुन शाहू प्रभू शिव अवतार ॥
राजर्षी शाहू महाराजांनी सत्ता आणि संपत्ती ही एक सामाजिक द्रुष्ट्या नैतिक जबाबदारी आणि ठेव समजून आपले आयुष्य खर्ची घातले. त्यांच्या स्वभावातील मानवतेचे दर्शन त्यांच्या जीवनकार्यातून प्रेतीत होते. एकवेळ राज्य गेले तरी चालेल पण बहुजन उद्धाराचे कार्य मी कदापि सोडणार नाही. असे म्हणणार्या शाहू छत्रपतींची जयंती एखाद्या सण-उत्सवासारखी साजरी केली पाहिजे असा आर्त संदेश देऊन युगप्रवर्तक बाबासाहेब आंबेडकर यांनी शाहू महाराजांचं स्थान स्पष्ट केलं. परंतू आज बहुजन समाजामध्ये आणि बहुजन चळवळ-संघटनेत सुद्धा मनुवादी निर्माण होत आहेत. याच तथाकथित बहुजनवादी संघटनांनी तर शाहू महाराजांचे नावच घेणं सोडून दिले आहे. काही तथाकथित पुरोगामी मंडळी तर फ़ुले-शाहू-आंबेडकर चळवळीला फ़क्त फ़ुले-आंबेडकर चळवळ संबोधून छत्रपती शाहू महाराजांना संपविण्याचा विडा उचलत आहेत. यांचे शाहूकार्य संपले आहे आता यांना शाहू महाराजांची गरज नाही असे यांचा समज आहे. याच बहुजनवादी संघटनांना छत्रपती शाहू राजांच्या बहुजनवादी कार्याचा विसर पडलेला आहे. गादी सोडेन पण बहुजन उद्धारांचे कार्य सोडणार नाही असे म्हणनार्या शाहू छत्रपतींचा समाजाला पडलेला विसर, त्यांचे कार्य घरोघरी न पोहचण्याचे कारण व त्यांचे बहुजनवादी कार्य याचा विचार करणं गरजेचं आहे.
आरक्षणाचे जनक
२६ जुलै १९०२ रोजी युरोप दौर्यावर असताना कोल्हापूरात छत्रपती शाहू महाराजांनी प्रसिद्ध केलेला जाहीरनामा म्हणजे बहुजन समाजासाठी आजवर कोणीही न केलेले उपकार होय. तो असा की सरकारी जागांमध्ये रिकाम्या झालेल्या जागांपैकी शेकडा ५० जागा मागासलेल्या लोकांस भराव्या. ज्या कार्यालयामध्ये मागासलेल्या वर्गाचे प्रमाण शेकडा ५० पेक्षाही कमी असेल तर पुढची नेमणूक ह्या वर्गातील व्यक्तीची करावी. असा जाहीरणामा मागासलेल्यांना सन्मानाने प्रशासनात आणून त्यांच्या गुणांना योग्य वाव देणारा आहे, असे कोणाला का वाटत नाही ? जर छत्रपती शाहू राजे मागासवर्गीयांना हल्ली कळले असते तर त्यांनी किमान शाहूंच्या विचारांचे अनुकरण तरी केले असते. पण हाच तो बहुजन समाज ज्यांच्यासाठी छत्रपती शाहू महाराज राज्य सोडायला तयार होते तोच समाज आपमतलबी बनताना पाहून कीव करावीसी वाटते. विचारांचे अनुकरण करायचे लांबच पण यांना राजे शाहूंचे नाव घ्यायची पण अडचण वाटू लागलीये ! 
          बहुजनांसाठी मुलांसाठी उभारलेली वसतीग्रुहे १८ एप्रिल १९०१ मध्ये शिक्षणात मागासलेल्या खेड्यापाड्यातील शेकडो वर्षापासून अज्ञानात पिचत पडलेल्या बहुजन मुलांसाठी छत्रपती शाहूंनी वसतीग्रुहाची स्थापना "व्हिक्टोरिया मराठा बोर्डींग" च्या नावे कोल्हापूरात प्रथम केली. वसतीग्रुहाला मराठा नाव असलं किंवा संस्थानही मराठ्यांचं समजलं जात असलं तरी फ़क्त मराठाच असा त्याचा अर्थ नाही. छत्रपती शाहूंच्या वसतीग्रुहात मुस्लिम, शिंपी, कोळी, माळी, गवळी असा बहुजन विद्यार्थ्यांचा भरणा होता. सोबतच १९०१ मध्ये जैन, लिंगायत, मुस्लिम, अस्प्रुश्य, सोनार, शिंपी, पांचाळ, गौड, सारस्वत, इंडियन ख्रिश्चन, वैश्य, ढोर, चांभार,सुतार, नाभिज, सोमवंशीय, आर्य, क्षत्रिय, कोष्टी अशी विविध जातीधर्माची वसतीग्रुहे छत्रपती शाहू महाराजांनी स्थापन करून देखील बहुजनांच्या जातीतील किती टक्के बहुजन छत्रपती शाहू महाराजांची जयंती साजरी करतात याचे चिंतन होणे गरजेचे आहे.
अस्प्रुष्याच्या पंगतीत बसून जेवणारे शाहू :-
        शाहू महाराज हे केवळ मराठाच नव्हे तर सार्या बहुजन समाजात मिळून मिसळून राहत असे. अस्प्रुष्याच्या पंगतीत बसूण जेवन घॆत.त्यांच्या घरचे, त्यांच्या हातचे पाणी पीत असत. शाहू महाराजांनी त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था करून नोकर्यांमध्ये आरक्षण दिले. ते एवढ्यावरही थांबले नाहीत तर महाराजांनी दुर्गम डोंगराळ भागात राहणार्या आदिवासी लोकांची सक्षम गाठीभेटी घॆतल्या व त्यांच्या अडीअडणींचे निवारणही केले. महारोग्यांची परिस्थिती पाहून राजांना दुख: होत असे. म्हणुन त्यांनी महारोग्यांसाठी दवाखाना सुरु केला. ते महारोग्याच्या जवळ बसून त्यांच्या प्रक्रुतीची, त्यांना मिळत असलेल्या औषदाची चौकशी करत असत. एवढेच नव्हे तर रोगमुक्त होणार्या रोग्यांना पोटापाण्याची व्यवस्था देखील करीत होते. राजर्षी शाहू महाराज लोकराजा या नावाने प्रसिद्ध झाले, त्यांना आपल्या रयतेची विशेष करून अस्प्रुष्य समाजाची जास्त काळजी वाटत असे, कारण अस्प्रुष्य समाजात त्यांची काळजी घॆणारा, त्यांच्या वेदना जाणणारा, त्यांना बरोबर घेऊन जाणारा कोणी दमदार पुढारी दिसून येत नसे.
छत्रपती शाहू आणि मुस्लिम समाज
         शाहू महाराज यांचे मुस्लिम प्रेम कदाचित मुस्लिम समाजात येवू दिले नाही वा मुस्लिम समाजासही समजले नाही. निदान मुस्लिम समाजाने यावर लक्ष देणे अत्यंत महत्वाचे आहे. छत्रपती शिवरायांचा सर्वधर्मसमभाव हा छत्रपती शाहू महाराजांनी जोपासला.जगाच्या इतिहासात मुस्लिम समाजासाठीही प्रेम करणार्या लोकराजाने १९०६ मध्ये स्वत:च्या पुढाकाराने प्रमुख मुस्लिम मंडळांची सभा बोलावून मोहोमेडन एज्युकेशन सोसायटी ची स्थापना करून मुस्लिम बोर्डींग सुरु केले. संस्थानातील दर्गे, मशिदी इ.धार्मिक स्थळांच्या खर्चातून उरलेला पैसा मुस्लिम समाजासाठी गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर खर्च केला. या सोसायटीचे छत्रपती शाहू महाराज खुद्द पदसिद्ध अध्यक्ष होते. इतिहासात मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक विकासासाठी प्रयत्न करणारे छत्रपती शाहू महाराज कदाचित पहिलेच असू शकतील. मुस्लिमांना शिक्षणाची गोडी लागावी म्हणून शाहू महाराजांनी जोरदार प्रयत्न केले. मात्र मुस्लिम समाजाने या संधीचा फ़ायदा घेतला नाही. शिक्षण क्षेत्रात मुस्लिम समाज थंड राहिल्यावरही छत्रपती शाहू राजे मात्र थंड न बसता या समाजातील शिक्षणाची आवड असणार्या विद्यार्थ्यांना आपल्या व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग मध्ये प्रवेश देऊन मुस्लिम शिक्षणास चालना दिली.
         मुस्लिम बोर्डिंग साठी चौफ़ाळाच्या माळावर पंचवीस हजार चौरस फ़ुटाची मोकळी जागा व इमारत बांधणीस ५५०० रु.ची भरगोस देणगी दिली व संस्थानच्या जंगलातून मोफ़त सागवान लाकूड दिले. मुस्लिम समाजातील मुलांनी शिकावे यासाठी भरभरून दान छत्रपती शाहू महाराजांनी दिले. मुस्लिम समाजाच्या उत्कर्षासाठी प्रयत्न करणार्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याचा सन्मान करणे प्रत्येक मुस्लिमांचे कर्तव्य नव्हे काय ? उर्दू शाळांमधून छत्रपती शाहू महाराजांचे कार्य जिवंत ठेवण्यास मुस्लिम समाजाने छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याचा अभ्यास करून हे कार्य जोमाने पुढे नेणे आता आवश्यक बनले आहे.
छत्रपती शाहूं विषयी खोटे प्रेम
           छत्रपती शाहूंचा गौरव करताना यशवंतराव मोहिते म्हणतात की "राजर्षी शाहू महाराजांना जातिभेदाच्या चौकटीत सर्व जातींना सहिष्णुतेने सामावून घ्यावयाचे नव्हते, तर ती जातिभेदाची चौकटच मोडावयाची होती. म्हणुन शाहू महाराज महाराष्ट्राचे गौतम बुद्ध होत."
         हल्ली आमच्या महापुरुषांचा वापर फ़क्त सत्तेसाठी आणि राजकीय समारंभापुरताच केला जातो. जसा हिंदुत्ववाद्यांनी शिवरायांच्या नावाचं भांडवल केलं. हिंदुत्ववाद्यांची दुकानदारी शिवाजी या एका नावाच्या पलीकडे जात नाही. संपुर्ण भारतात कोणतेही आंदोलन करताना श्री रामा चे नाव घेतात पण महाराष्ट्रात शिवरायांच्या नावाशिवाय काहीही चालत नाही हे या मंडळींना चांगलंच ठाऊक आहे. हे शाहूंच्या बाबतीत आहे. पण छत्रपती शाहू महाराजांच्या नावाचा फ़क्त खोटा आदर करणारे फ़ुले-आंबेडकरांचा तरी वारसा काय चालवणार ? डॉ. बाबासाहेबांच्या जीवनातील एक सच्चा मित्र म्हणजे राजर्षी शाहू महाराज. म्हणून तर बाबासाहेब म्हणतात "छत्रपती शाहू महाराजांसारखा सखा आम्हाला पुर्वी लाभला नव्हता व पुढे लाभेल की नाही याबद्दल मला शंका आहे."
           मुकनायक व्रुत्तपत्रामागे अर्थसहाय्य उभे करणे, माणगांव परिषदेत बाबासाहेबांना भारताचे पुढारी म्हणून गौरव करणे, सोनतळी कॅंम्पवर   बाबासाहेबांच्या  जेवणाचे  निमंत्रण  स्विकारून  कोल्हापूरी जरीपटक्याचा  भावपुर्ण  आहेर करणे, २६ जून १९२० ला बाबासाहेबांनी "मुकनायक" चा विशेषांक  काढून छत्रपती शाहू महाराजांबद्दल क्रुतज्ञता व्यक्त करणे ह्या सगळ्या ठळक घटनेवरून आपण लक्षात घ्यावे की महात्मा फ़ुलें मुळे शाहू महाराज तर शाहू महाराजांमुळेच डॉ.बाबासाहेब!या त्रिमुर्तींचा वसा आणि वारसा एकच होता.
          सामाजिक चळवळीत कार्य करणार्या बहुजनवाद्यांनी ही गोष्ट कायमस्वरुपी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. हिंदुत्ववादी तसेच टिळक कंपुतील मंडळी शाहू द्वेष्टी आहेत. यांना शाहू राजांच्या कार्याचे किंवा जयंतीचे काही देणे घेणे नाही. छत्रपती शाहूंना सुद्धा टिळक कंपुच्या प्रवाहाशी सोयरसुतक नव्हते. शाहू महाराज लढले ते ब्राह्मणेत्तर समाजाच्या उत्कर्षासाठी, बहुजन समाजासाठी! निदान बहुजनवाद्यांनी तरी शाहूंशी बेइमानी करू नये, अन्यथा याचे पातक भोगावे लागेल."शाहू महाराजांचा जन्मदिवस बहुजनांनी सणाप्रमाणे साजरा करावा असे ठासून सांगणार्या बाबासाहेबांचा तरी आदर करावा". राजर्षी शाहू महाराज हे फ़ुले आणि आंबेडकर यांना जोडणारा दुवा आहे शाहू महाराजांशिवाय फ़ुले-शाहू-आंबेडकर चळवळ पुर्णत्वास येणार नाही हे तरी लक्षात घ्यावे.

14 February 2014

शिवजन्मोत्सव : १९ फ़ेब्रुवारी

        शिवरायांची आठवण तर उठता बसता, चालता फिरता, कायमस्वरुपी यायला हवी. पण जर एकाच दिवशी महान शिवजन्मोत्सव  करायचा असेल तर तो तारखेप्रमाणे केला पाहिजे. १९ फ़ेब्रुवारी ही तारीख अवघ्या जगभरात मान्य केली असताना हिंदुत्व वाद्यांच्या काही सडक्या कल्पनेने नासलेले काही लोक मात्र तिथी चा आग्रह धरतात. मुळात देशातला कोणताच व्यवहार हा तिथी प्रमाणे न होत तारखे प्रमाणे होतो. शाळा, कोलेज, न्यायालये, बाजारपेठा, संसद हे सगळे तारखेप्रमाणे चालतात आणि तारीख ही जगभरात इथुन-तिथुन एकच असते. म्हणजे तारखेप्रमाणे (१९ फ़ेब्रुवारी) जर शिवजयंती साजरी केली तर ती जगभरात साजरी होईल आणि सर्व मराठे एकत्र जमतील ही भीती सड्क्या डोक्याच्या उपटसुंभांना आहे म्हणुन त्यांनी तथाकथित हिंदूह्र्दयसम्राटांना  हाताशी  धरून  मराठ्यांत  फ़ुट  पाडण्यासाठी  आणि  शिवजयंती फ़क्त महाराष्ट्रापुरती मर्यादित करण्यासाठी तिथी चा आग्रह धरतात.कुठल्याही व्यक्तीला शिवजयंतीची तारीख विचारली तर तो १९ फ़ेब्रुवारी ही तारीख पटकन सांगू शकेल. पण तिथी कोण सांगु शकेल काय ? 
         छत्रपती शिवरायांच्या जन्मदिनाबाबतचा वाद गेली शंभर वर्ष आहे, शिवचरित्राच्या अनेक साधनांमधून साधारणत: दोन जन्मतिथी येतात.वैशख शके १५४९ म्हणजे एप्रिल१६२७ आणि फ़ाल्गुन शके १५५१म्हणजे फ़ेब्रुवारी १६३०. सर्वप्रथम १९०० मध्ये वि.का.राजवाडे यांनी बखरीच्या आधारे शके १५४९(१६२७) हा शक निश्चित केला.नंतर "जेधे शकावली"मिळाल्यावर शके १५५१शुक्ल संवत्सर, फ़ाल्गून वद्य त्रुतीया(१६३०) ही नवी तिथी उजेडात आली. जेधे शकावली हे मराठ्यांच्या इतिहासातील एक अस्सल साधन व अव्वल प्रतिचा ऐतिहासिक कागद मानल्याने या जन्मतिथीबद्दल विद्वानांत एकमत होऊ लागले.
              इ.स. १६२७(शके १५४९) ही जन्म तारीख पुढील साधनांच्या आधारे मानली गेली होती. [१]९१ कलमी बखर [२] मल्हार रामराव चिटणीस बखर [३] मराठी साम्राज्याची छोटी बखर [४] शिवदिग्विजय [५] श्री शिवप्रताप [६] पंत प्रतिनिधीची बखर इ.इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यावी लागेल ती अशी की, या बखरी व इतर साधने पेशवाई व उत्तर पेशवाईतील आहेत.
                इ.स.१६३०(शके १५५१) या तिथीचा आधार मुखत्वे जेधे शकावली, शिवभारत व शिवराम ज्योतिषी हा आहे.जेधे शकावली ही छत्रपतींच्या म्रुत्युनंतर १०-१५ वर्षांत लिहिण्यात आली आहे. शिवभारत हा काव्यग्रंथ छत्रपती शिवरायांच्या पदरी असणार्या परमानंद कवीने लिहिला आहे. तर शिवराम ज्योतिषी हा छत्रपती शिवरायांचा समकालीन होता.
             वरील सर्व मतमतांतरातून शिवजन्माची तिथी निश्चितीसाठी महाराष्ट्र राज्यशासनाने दत्तो वामन पोतदार, प्रा.न.र.फ़ाटक, डॉ.आप्पासाहेब पवार, ग.ह.खरे,बा.सी.बेंद्रे, बाबासाहेब पुरंदरे यांची "निर्णय समिती" १९६६ मध्ये नेमली. परंतू त्यातून तिथीनिश्चिती न झाल्याने इ.स.१६२७ ही तिथी चालू ठेवण्याचा निर्णय घेतला. हा वाद २००१ पर्यंत चालला.शासनाने २००१मध्ये अध्यादेश काढून १९ फ़ेब्रुवारी १६३० ही जन्मतारीख निश्चित केली. या तारखेनंतर एक नवा वाद काही ब्राह्मणवादी मंडळींनी सुरु केला. त्यामध्ये बाबासाहेब पुरंदरे, "कालनिर्णय" वाले जयंत साळगावकर, निनाद बेडेकर आदींचा समावेश आहे. या मंडळींच्या मते शिवजयंती ही इंग्रजी तारखेप्रमाणे साजरी न करता मराठी तिथीप्रमाणे करावी.तिथीप्रमाणे शिवजयंतीची तारीख सतत बदलत राहते. म्हणजे २००० साली शिवजयंती २३ मार्च ला होती तर २००१ ला १२ मार्च,२००२ ला ३१ मार्च, २००३ ला २० मार्च, २००४ ला ०९ मार्च आणि २००५ ला २८ मार्च रोजी.
             आता इथे एक प्रश्न तयार होतो तो असा की ,बाळ गंगाधर टिळक,हिंदुत्ववाद्यांचे प्रेरणास्थान विनायक सावरकर, गांधी, नेहरू अशा अनेकांची जयंती सर्वत्र  इंग्रजी तारखेप्रमाणे साजरी होते मग विश्ववंद्य छत्रपती शिवरायांची जयंती तिथीप्रमाणे का ?
              हिंदुंच्या  कालगणनेनुसार शिवजयंती व्हावी असा आग्रह हे लोक धरतात. परंतु  हिंदूंची  कालगणना  एक  नाही. भारतात  विक्रम संवत व शालीवाहन शक अशा दोन  कालगणना  हिंदुंच्या आहेत. यातही बोंब अशी की   या   कालगणनेमध्ये   भारतातच  अनेक  बदल  आहेत  .उदा. विक्रम संवतच्या  वर्षाची सुरुवात बंगाल व इतर प्रांतात चैत्र शुक्ल प्रतिपदा आहे. तर  गुजरात आणि राजस्थानच्या काही भागात आषाढ शुद्ध प्रतिपदा आहे. तर शाहीवाहन शक महाराष्ट्रापेक्षा तामीळनाडूत एक वर्षाने  पुढे आहे. म्हणजे तामिळनाडूत  ३०० वी  शिवजयंती असेल  तर महाराष्ट्रात २९९ वी शिवजयंती असते.
                याचा अर्थ इतकाच की हिंदूंची म्हणून खात्रीपुर्वक सांगता येईल अशी सर्वमान्य कालगणना वापरात नाही. व्यवहारात सर्व सामान्य माणसे हिंदूंची कालगणना वापरत नाहीत तर इंग्रजी कालगणना वापरतात.जर तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करायची म्हंटले तर मागील वर्षी किती तारखेला जयंती झाली किंवा पुढील वर्षी  किती तारखेला जयंती येईल हे साळगांवकर सारख्या भटांच्या पंचांगाचा आधार घेतल्याशिवाय सांगता येणार नाही.
         आज शिवजयंती महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेर आणि भारताबाहेरदेखील साजरी होत आहे. त्यामुळे शिवजयंती ही प्रतिवर्षी एकाच तारखेला शिस्तबद्धपणे साजरी होणे महत्वाचे आहे. काही ब्राह्मणवाद्यांना मात्र शिवजयंतीच्या माधमातून स्वत:चे स्वार्थी राजकारण राबवायचे आहे म्हणून ते इंग्रजी तारखेला विरोध करत असतात. तिथीच्या आग्रहामुळे शिवजयंती उत्सवात एकवाक्यता राहत नाही. ही गोष्ट छत्रपती शिवरायांच्या व्यक्तिमत्वास हानीकारक आहे. म्हणून १९ फ़ेब्रुवारी १६३० ही तारीख बरोबर आहे हे सत्य स्विकारून मोठ्या प्रमाणात शिवजयंती १९ फ़ेब्रुवारी रोजीच धुमधडाक्यात साजरी केली पाहिजे. शेवटी शिवभक्तांचा निर्णय हा अंतिम आहे. पुन्हा एकदा शिवभक्तांना विनंती कि छत्रपती शिवराय यांच्या दोन जयंत्या करुन राजांची थट्टा थांबवावी. छत्रपतींचा जन्मोत्सव जर जागतिक दर्जाचा बनवायचा असेल तर आपणास जगमान्य असलेल्या कॅलेंडर नुसार तारखेप्रमाणे शिवजयंती साजरी करावी लागेल. सर्व शिवभक्तांना पुन्हा एकदा आवाहन शिवजयंती हि तारखे प्रमाणेच करावी. 
जय जिजाऊ । जय शिवराय । जयोस्तु मराठा । जयोस्तु शिवराष्ट्र ॥

2 February 2014

भारतातील पहिल्या महिला संपादिका : तानुबाई बिर्जे

            कृष्णाजी भालेकर यांनी १८७७ मध्ये सुरू केलेल्या ‘दिनबंधु’ या वृत्तपत्राचं संपादकपद 1906 ते 1912 या काळात तानुबाई बिर्जे यांनी साभाळलं. महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील त्या पहिल्या संपादिका ठरल्या. महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रभाव असलेल्या तानुबाईंनी संपादक म्हणून आपल्या अग्रलेखातून समाजातील विषमतेवर प्रहार करून त्याची चिरफाड केली. बहुजन शिक्षणाचा विचार मांडला. नाविन्यपूर्ण विषय हाताळले. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला महाराष्ट्राच्या प्रबोधनात महत्त्वाची भूमिका बजावणा-या तानुबाईंची ही ओळख..
     तानुबाई बिर्जे हे नाव महाराष्ट्रात परिचित नाही. अलिकडच्या काळात तानुबाईंना महाराष्ट्रात फारसे कुणी ओळखत असल्याचे ऐकिवात नाही. तानुबाई आणि त्यांचे ‘दिनबंधु’ वृत्तपत्र यांची दखल वृत्तपत्रसृष्टीच्या इतिहासातही फारशी कुणी घेतली नाही. सत्यशोधक चळवळीतील विचारांशी बांधिलकी असणा-या अनेक वृत्तपत्रांची दखल मराठी वृत्तपत्रसृष्टीने घेतली नाही. मात्र, ज्यावेळी महिलांना चूल आणि मूल यापलीकडे पाहिलं जात नव्हतं, अशा काळात तानुबाईंनी सत्यशोधकीय पत्रकारितेची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आणि ती चोखपणे बजावली. हे समजलं तर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसू शकतो. सत्यशोधकीय चळवळ ही महात्मा जोतिबा फुलेंनी सुरू केली आणि त्यांना अनेक ब्राह्मणेतर समर्थक लाभले. ‘दिनबंधु’चे पहिले संस्थापक-संपादक कृष्णाजी भालेकर यांनी 1877 ध्ये सुरू केलेल्या या वृत्तपत्राचं नंतरच्या काळात संपादन तानुबाई बिर्जे यांनी उत्कृष्टरीत्या केलं होतं. त्या भारतातील पहिल्या महिला संपादक ठरल्या. परंतु भारतातीलच नव्हे तर जगातील त्या पहिल्या संपादक असाव्यात, असा निष्कर्ष काढला जात आहे. त्या काळात भारतातील पहिल्या महिला संपादक म्हणून त्यांचं नाव गाजलं, परंतु पत्रकारितेच्या इतिहासाने तानुबाईंची योग्य प्रकारे दखल घेऊन त्यांना प्रकाशझोतात ठेवलं असतं तर आज हजारो महिला पत्रकारिता क्षेत्रात पुढे आल्या असत्या.
          महात्मा फुलेंचे सहकारी व शेजारी देवराव ठोसर यांची कन्या व सावित्रीबाई फुले यांची मानसकन्या तानुबाईंचा जन्म 1876 मध्ये पुण्यात झाला. त्यांचं शिक्षण वेताळपेठेतील महात्मा फुलेंच्या शाळेत झालं, तर 26 जानेवारी 1893 रोजी पुण्यामध्ये वासुदेव लिंबोजी बिर्जे यांच्याशी सत्यशोधकीय पद्धतीने त्यांचा विवाह झाला. वासुदेव बिर्जे यांनी बडोदा सरकारमध्ये त्यांनी 1894 ते 1905 अशी अकरा वर्षे ग्रंथपाल म्हणून कार्य केलं. त्यानंतर नोकरीचा राजीनामा देऊन ‘दिनबंधु’ हे वृत्तपत्र 1897 मध्ये पुन्हा सुरू केलं. कृष्णाजी भालेकर यांनी 1 जानेवारी 1877 रोजी सुरू केलेलं हे वृत्तपत्र आर्थिक अडचणीत सापडल्यामुळे बंद पडलं होतं. 1880 मध्ये नारायण मेघाजी लोखंडे यांनी ते मुंबईतून सुरू केलं. त्यानंतर 1897 मध्ये बिर्जे यांनी त्याची जबाबदारी घेतली व ते 1906 पर्यंत चालवलं, मात्र 1906 मध्ये प्लेगने त्यांचा मृत्यू झाला तेव्हा ते वृत्तपत्र पुन्हा बंद पडते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली. मात्र पतीनिधनानंतर डगमगून न जाता प्रबोधनाचे कार्य तानुबाई बिर्जे यांनी पुढे चालू ठेवले. तानुबाईचे वडील देवराव ठोसर हे महात्मा फुले यांचे सहकारी आणि सत्यशोधकच होते. महात्मा फुले यांच्या घराशेजारीच त्यांचं घर होतं. त्यामुळे फुले दांपत्याचा सहवास तानुबाईंना लहानपणीच मिळाला. वडील ठोसर व पती बिर्जे यांच्या संस्कारातून तयार झालेल्या तानुबाईंनी ‘दिनबंधु’ चालवायला घेतले आणि जगातल्या पहिल्या संपादक बनण्याचा लौकिक मिळवला. हे वृत्तपत्र त्यांनी 1906 ते 1912 पर्यंत अतिशय चांगल्या प्रकारे चालवून संपादिका म्हणून आपल्या कार्याचा ठसा उमटवला. 
           तानुबाईंनी त्यांच्या संपादकपदाच्या कारकीर्दीत ‘दिनबंधु’मध्ये सत्यशोधक चळवळीच्या वृत्तांवर भर दिला. समाजाला आत्मभान यावे म्हणून जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची वचने ‘दिनबंधु’मध्ये छापली. तुकाराम महाराजांचे अभंग अग्रलेखाच्या शिरोस्थानी प्रसिद्ध करून तानुबाईंनी एका अर्थाने ‘दिनबंधु’चे उद्दिष्ट कथन केले होते. वासुदेव राव बिर्जे यांनी सातत्याने बहुजनांच्या सर्वागीण उन्नतीसाठी शिक्षणाच्या अनुषंगाने विचार मांडले तर तानुबाईंनी बहुजन शिक्षण पॅटर्नसह विविध विषयांवर लेखन केले. समाजजागृतीच्या हेतूने 1912 मध्ये ‘दिनबंधु’मध्ये एक नाविन्यपूर्ण विषय हाताळण्यात आला आहे. देशाच्या स्वातंत्र्याची पहाट उजाडण्यास मोठा अवधी असताना त्यांनी भारतासारख्या खंडप्राय देशात लोकशाही शासनप्रणाली अंमलात आणण्यासाठी हिंदुस्तान लायक आहे का, असा प्रश्न उपस्थित करून अभ्यासू लेखमाला प्रसिद्ध केली. अग्रलेखाच्या मांडणीवरून तानुबाईंच्या प्रतिभेची झेप किती मोठी होती, याची कल्पना येते. 
               तानुबाईंच्या एकूण लेखमालेवर फुले, भालेकर, लोखंडे आणि बिर्जे यांच्या लेखनाचा प्रभाव जाणवतो. 27 जुलै 1912 च्या अंकातील ‘मुंबई इलाक्यातील लेजिस्लेटिव्ह कौन्सिल आणि बहुजन समाज’ हे तनुबाईंचे आणखी एक असाधारण ऐतिहासिक, राजकीय आणि धारदार संपादकीय आहे. या संपादकीयामध्ये तानुबाई म्हणतात, ‘कायदे कौन्सिलात बहुजन समाजाच्या हिताविषयी अनास्था दिसून येत आहे. या अनास्थेचे कारण शोधण्यास दूर जावयास नको. मराठीत एक म्हण अशी आहे की, ज्याचे पोट दुखेल तो ओवा मागेल. बहुजन समाजाच्या दु:खांनी हल्लीच्या कौन्सिलातील लोकनियुक्त अथवा सरकारी सभासदांचे पोट दुखत नाही. कारण त्यांचा बहुजन समाजाशी निकटचा संबंध नाही. श्रीमंत आणि गरीब या भेदाशिवाय हिंदुस्थानात नाना जाती आणि पंथ आणि धर्म यांचे जाळे पसरलेले आहे. या अनेक भेदांनी बहुजन समाजास या देशात राजकीय अस्तित्वच नाही, असे म्हटले असता चालेल. याप्रमाणे कायदे कौन्सिलात किंबहुना सरकार दरबारात ज्या लोकांचा प्रवेश होऊ शकतो अथवा होत आहे, त्या लोकांच्या आणि बहुजन समाजाच्या चालीरीती व आचार-विचार यामध्ये महद अंतर असल्यामुळे कौन्सिलात सभासदांस या मुक्या समाजाची ओरड ऐकू जावी कशी अणि त्यांनी सरकारपाशी या मुक्या समाजाचे पोट दुखत आहे म्हणून ओवा मागावा कसा हा एक मोठा प्रश्न आहे. याचे कारण काय? याचे कारण हेच की, ‘तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे, येरा गबाळाचे काम नाही, न ये नेत्रांजळ, नाही अंतरी कळवळा’. 
           तानुबाईंनी समाजातील विषमतेवर प्रहार करून त्याची चांगलीच चिरफाड आपल्या अग्रलेखातून केली. सत्ता चिरंतन राहावी म्हणून चार वर्णाचा पुरस्कार करणा-या मनुस्मृतीला राजघराण्यांनी आपलेसे केले. त्यामुळे समाजात विषमता निर्माण झाली. मात्र, गौतम बुद्धाच्या कालखंडात समता प्रस्थापित झाल्याचे नमूद करून त्यांनी पुढे म्हटले आहे, ‘शंकराचार्यानी मंडनमिश्रावर मिळवलेल्या विजयानंतर पुनश्च वेदांत बोकाळला. ब्राह्मण हा देवांचाही देव समजला जावा, अशा प्रकारची योजना, ब्राह्मण हिंदुशास्त्राकारांनी करून ठेवलेली आहे. परंतु, फार पुढे इंग्रजांचे राज्य देशावर चालून आले. इंग्रजांनी समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी केलेल्या सुधारणांचा आढावा घेऊन याविरोधात येथील उच्चवर्णीयांनी समान हक्कांची मागणी करून स्वहितासाठी राष्ट्रीय सभा (काँग्रेस) स्थापन केली.’ यावरून तानुबाईंची सामाजिक जाणीव, बहुजनांच्या उत्थानासाठी तळमळ आणि देशातील सामाजिक सुधारणांसाठी वृत्तपत्राच्या माध्यमातुन तानुबाईंची सामाजिक जाणीव, बहुजनांच्या उत्थानासाठी तळमळ आणि देशातील सामाजिक सुधारणांसाठी वृत्तपत्राच्या माध्यमातून प्रबोधन करण्याचे ध्येय यांची कल्पना येते. एक अत्यंत यशस्वी, सक्षम संपादक म्हणून त्यांचे नाव मराठी पत्रकारितेच्या इतिहासात नक्कीच सुवर्णाक्षरांनी लिहावे लागेल.