23 December 2013

प्रतिशिवराय : नरवीर शिवाजी काशिद [भाग २]

शिवाजी काशिद यांची स्वराज्यनिष्ठा
फ़ाजलखान म्हणाला "अगर आपको जान चाहिए तो सच बताओ",तरीदेखील शिवाजी काशिद म्हणाले,"हॉं मै ही शिवाजी महाराज हूं".पण वर्मीच्या घावाचा व्रण दिसला पाहिजे अशी अफ़जलखानाच्या मुलाची तथा फ़ाजलखानाची पक्की खात्री होती.तो वर्मी घाव त्यांना दिसला नाही.कारण ते छ्त्रपती शिवाजी महाराज नव्हते.तर प्रतिशिवराय नरवीर शिवाजी काशिद होते.यामुळे सिद्धी जौहरला कळून चुकले की आपणास छत्रपती शिवाजी महाराजांनी चकवा दिला आहे.यावर शिवाजी महाराज म्हणजेच शिवाजी काशिद यांच्या जवळ संशयाच्या नजरेने न्याहाळत विचारले, तू छत्रपती शिवाजी  महाराज नाहिस तर कोण आहेस ? यावर शिवाजी काशिद हसत म्हणाले,मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा एक चाकर आहे,यावर सिद्धी म्हणाला हं.. कसलं स्वराज्य ? कसाला शिवाजी राजा ? जौहर संतापलेला होता.तो छद्मी स्वरात म्हणाला,मला दगाबाजी करून तुझा शिवाजी राजा माझ्या हातातून निसटला आहे.पण जाणार कुठे ? गाठ जौहरशी आहे ! पाताळातून शोधून काढीन’ शिवाजी काशिद जौहरकडे पाहून हसू लागले आणि म्हणाले,’आमचे राजे धनुष्यातून सुटलेल्या बाणाप्रमाणे  तुमच्या वेढ्यातून निसटले आहेत.आता हाती लागणे शक्य नाही.छातीचा कोट करून आमच्या राजाला जपणारे कितीएक तरी त्यांच्या सोबत आहेत.जीव देतील स्वत:च्या राजासाठी पण राजाला तुमच्यापासून राखून ठेवतील हाती लागू देणार नाहीत.
सिद्धी जौहर मोठमोठ्याने हसू लागला आणि शिवाजी काशिद यांच्याकडे पाहत म्हणाला, तुझा राजा नक्की सापडेल आणी सापडल्यावर मी त्याला काय शिक्षा देईन ठाऊक आहे काय ? जौहरने स्वत:चा हात गळ्याभोवती फ़िरवला आणि बोलला , समजलं ? शिरच्छेद करील त्याचा,आणि तू::::: त्याच्यानंतर तुझं देखील मुंडकं उडवीन मी ! म्हणजे आता जे बोलत होतास त्याबद्दल तुला पश्चाताप वाटेल.यावर शिवाजी काशिद यांना जौहरचे बोलणे आवडले नाही.त्यांचे डोळे रागाने लालेलाल झाले आणि जौहरच्या नजरेला नजर भिडवित शिवाजी काशिद ओरडले,खामोश! माझ्या राजाबद्दल एक शब्द जरी वावगा बोललास तर याद राख! वटवागूळ देखील रात्रीच घुत्कारतं, म्हणून ते कोणी कान देऊन ऐकत नाही,तुझं बोलणं तसलंच आहे.ते कशापायी ऐकायचं ? 
माझा शिवाजी राजा :: त्यांची सर  तुझ्यासारख्याला यायची नाही.तू पोटार्थी हबशी:: तुला शिवरायांचं मोठंपण काय समजणार ? आमचा राजा लाखमोलाचा आहे,पोशिंदा आहे.लाख मरोत पण माझा राजा जगो,असंच मी म्हणणार! हे सारं ऐकून सिद्धी जौहर गांगरला.थोड्याच वेळात स्वत:स सावरून म्हणाला,वैसाही होगा......मरने को हो तैयार..तेरे राजा के वास्ते तू मरेगा ? अब यहॉं इसी वक्त ? शिवाजी काशिद हसत म्हणाले, मरणाचे भय मला घालतोस ? मरणाचे भय तुझ्यासारख्यांना वाटावं, आम्हाला नाही.छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा स्वराज्याचा भगवा हाती घॆतला,त्याच वेळी या मर्द मराठा मावळ्याने छातीवर मरण गोंदवून घेतलं.स्वराज्यासाठी मरण कुठेही येवो,कसंही येवो::मरणाला भिऊन पळणारा हा शिवाजी काशिद नाही.मेला तरी स्वराज्यासाठी मरण:..! स्वराज्यासाठी जगणं आणि स्वराज्यासाठी मरणं..स्वराज्याचा चंग बांधला आहे आम्ही.तेंव्हा मरणाचं भय या गड्याला गालू नकोस समजलं ? जौहर पिसाळला शिवाजी काशिद यांचे बोलने त्याच्या जिव्हारी झोंबलं, छत्रपती शिवाजी महाराज हातून निसटल्याने तो बिथरला होता,शिवाजी काशिद हे देखील वस्तादों के वस्ताद होते.त्यांना ना मरणाचे भय, ना खेद, ना खंत यांचे बोलणे आणि विचार म्हणजे फ़क्त छत्रपती शिवाजी महाराज रयतेच्या स्वराज्याचे.
शिवाजी काशिद यांची स्वराज्यनिष्ठा पाहून सिद्धी जौहरने शिवाजी काशिद यांना ठार मारण्याचा आदेश दिला.तरी देखील शिवाजी काशिद हे ठाम होते.जौहरच्या सैनिकांनी शिवाजी काशिद यांच्या छातीत दोन भाले खुपसले.शिवाजी काशिद खाली कोसळले; शिवाजी काशिद यांच्या छातीतून भाले खुपसल्याने रक्त उडाले.खाली पडत असताना प्राण सोडण्यापुर्वी शिवाजी काशिद म्हणाले.’अरे वेड्यांनो! सोंग घेणार्या शिवाजीची पाठ पाहता आली नाही.खर्या शिवाजीराजांचा विचारच सोडून द्या,गुप्तहेर खात्यातील शिवाजी काशिद यांनी प्राण सोडला.त्यांना शिवाजी राजांचे रुप घेत असताना माहीत होते की, आपल्याला जर दगाफ़टका झाला तर आपल्याला जीव गमवावा लागेल,याची पुरेपूर खात्री असताना देखील आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी;रयतेच्या स्वराज्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालून छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रतिरूप घॆऊन आपले प्राण त्यागले.(दिनांक - १३ जुलै १६६०).
छत्रपती शिवाजी महाराज वेढ्यातून निसटले
छत्रपती शिवाजी महाराज निसटल्याचे समजल्याबरोबर जौहरने "दिलेर मसूद" याला राजांच्या पाठलागावर पाठविले.तोपर्यंत काही अवधी निघून गेला होता.छत्रपती शिवाजी महाराजांनी योजलेली रणनीती पाहून सिद्धी जौहर आणि त्याचे सैन्य कमालीचे संतापले होते.त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी मोठ्या त्वेषाने पाठलाग सुरु केला.विशाळगडापर्यंतचे अंतर खूप असल्याने मावळ्यांना प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागत होती.परंतू जिद्द कायम होती.विशाळगडापासून आठ मैल अंतरावर असणार्या गजापूर जवळील घोडखिंडीत छत्रपती शिवाजी महाराज जेंव्हा आले,त्यावेळी त्या खिंडीतच शत्रुशी लढ्यासाठीची तयारी शिवरायांनी दाखवली.मात्र बाजीप्रभूंनी शिवाजी राजांना पुढे निघून जाण्यास सांगितले.आपण काही सैन्य घेऊन ही खिंड लढवतो.शरीरात प्राण असेपर्यंत एकाही गनिमास पुढे जाऊ देणार नाही.असे सांगितले.छत्रपती शिवाजी महाराजांना बाजीप्रभूंच्या हट्टापायी विशाळगडावर जावे लागले.तथापि शिवरायांनी विशाळगडावर गेल्यागेल्या ५ तोफ़ा उडविल्या जातील.अशी ग्वाही देऊन त्यानंतर ही लढाई थांबवून ताबडतोब विशाळगडाकडे बाजीप्रभूंना सर्व सैन्य घॆऊन कुच करण्यास सांगितले.
बाजीप्रभूंनी स्वराज्यासाठी प्राण त्यागले
बाजीप्रभूंना निवडक सैन्य घॆऊन घोडाखिंडीत मसुदला रोखन्यासाठी थांबविले.बाजीप्रभूंच्या शरीरावर असंख्य घाव होऊन देखील त्यांची तलवार शत्रूंची शिरे उडवित होती.बाजीप्रभू मसुदशी लढता लढता धारातिर्थी पडले.मात्र शिवाजी महाराज विशाळगडावर गेल्याच्या ५ तोफ़ा ऐकल्याबरोबर बाजीप्रभूंनी प्राण सोडला.(दिनांक - १३ जुलै १६६०).छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रतिरूप घॆणारे शिवाजी काशिद व घोडखिंड पावनखिंड बनविणारे बाजीप्रभू या शूरवीरांचे पुर्णाक्रुती पुतळे कोल्हापूरातील पन्हाळगडावर बसविण्यात आले आहेत.छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या रयतेच्या स्वराज्यासाठी प्राणाची आहुती देणारे वीर बाजीप्रभू आणि वीर शिवाजी काशिद हे स्वराज्यनिष्ठ मावळे होते.शाहिस्तेखानावर हल्ला करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी तह करून पन्हाळा २२ सप्टेंबर १६६० रोजी सिद्धी जौहरला दिला.यानंतर सुमारे १३ वर्षानंतर पन्हाळगड पुन्हा ६ मार्च १६७३ रोजी कोंडाजी फ़र्जंद यांनी अवघ्या ६० मावळ्यांच्या शर्तीच्या प्रयत्नाने स्वराज्यात जिंकून घॆतला.छत्रपती शिवाजी महाराजांनी या गडाचा कारभार महाप्रतापी स्वातंत्र्यवीर छत्रपती संभाजी महाराजांवर सोपविला होता.
छत्रपती शिवाजी महाराजांचे नेबापूला आगमन
छत्रपती शिवाजी महाराज रयतेच्या स्वराज्यासाठी प्राणत्याग करणार्या प्रतिशिवाजी गुप्तहेर शिवाजी काशिद यांच्या घरी गेले.शिवाजी काशिद यांच्या पत्नी पारूबाई यांचे छत्रपती शिवाजी महाराजांनी सांत्वन केले.शिवाजी काशिद यांचा मुलगा यशवंत यांना अधिकारी पदी नेमले.गुप्तहेर शिवाजी काशिद यांचे नेबापूरला स्मारक उभारले.सर्व कुटुंबाची व्यवस्था करून छत्रपती शिवाजी महाराज राजगडावर गेले.
प्रतिशिवराय गुप्तहेर नरवीर शिवाजी काशिद आणि वीर बाजीप्रभू या स्वराज्यनिष्ठ मावळ्यांना विनम्र अभिवादन आणि मानाचा मुजरा....

20 December 2013

प्रतिशिवराय : नरवीर शिवाजी काशिद [भाग १]

        स्वराज्य स्थापनेच्या कार्यात श्री शिवरायांच्या पराक्रमी अनुयायांबरोबरच त्यांच्या गुप्तहेर खात्याचा सुद्धा अत्यंत उपयुक्त सहभाग होता. स्वकीय विरोधक व उघड शत्रू यांच्या हालचाली, दूरवरच्या प्रदेशातील परिस्थिती इ. माहिती वेळच्या वेळी मिळण्यावर राजकीय आणि सैनिकी यश अवलंबून आहे हे ओळखून शिवराय गुप्तहेर खात्यावर भरपूर पैसा खर्च करत. शत्रूच्या हालचाली आणि गुप्त कारवाया तसेच शत्रुप्रदेशातील संपन्न शहरे, खजिन्याच्या जागा,हल्ल्यासाठी जाण्याचा आणि परत येण्याचा मार्ग इत्यादी गोष्टींची गुप्तहेरांमार्फत खडानखडा माहिती मिळवून श्री शिवरायांनी अनेक धाडसी हल्ले करून शत्रूंची शहरे लुटली.छत्रपती शिवरायांचे गुप्तहेर खाते अतिशय कार्यक्षम होते. या गुप्तहेरांपैकी एक नाव म्हणजे नरवीर शिवाजी काशिद. छत्रपती शिवरायांच्या रयतेच्या स्वराज्यासाठी आपल्या प्राणाची बाजी लढवणारे गुप्तहेर नरवीर शिवाजी काशिद हे मराठ्यांच्या इतिहासातील एका महानायकाचं.
ऐतिहासिक पार्श्वभूमी
छत्रपती शिवरायांनी दिनांक १० नोव्हेंबर १६५९ रोजी प्रतापगडावर अफ़जलखानास व अफ़जलखानाचा वकील क्रुष्णा भास्कर कुलकर्णीस कापल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज जानेवारी १६६० मध्ये आदिलशाहाच्या ताब्यातील मिरजेला वेढा देण्यासाठी आले.आदिलशाहाने कुर्नलचा सिद्धी जौहर याला सलामतखान हा किताब देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात लढण्यासाठी पाठविले.मिरजेला छत्रपती शिवाजी महाराजांनी वेढा दिल्यानंतर आजच्या सांगली जिल्ह्यातील तासागांव तालुक्यातील धुळगांव या छोट्याशा गावांत छत्रपती शिवाजी महाराज आल्याची व येथील रहिवाश्यांना शिवाजी महाराजांनी जमिनी दिल्याची ऐतिहासिक नोंद आजही धुळगांवातील लोकांच्या घरी ताम्रपटाच्या स्वरुपात सापडते.आजही तेथील लोकांकडे छत्रपती शिवरायांनी दिलेले ताम्रपट उपलब्ध आहेत.
सिद्धी जौहरचा पन्हाळगडचा वेढा
छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावर राहून सिद्धी जौहरला तेथेच रोखून ठेवणार होते.जोवर शिवराय पन्हाळगडावर आहेत तोवर जौहर तेथेच थांबणार हे निश्चित होते आणि पुढील रणनीती छत्रपती शिवाजी महाराज आखणार होते.कधीकधी डावपेच यशस्वी करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीची आखणी करावी लागते.अत्यंत मुत्सद्दीपणाने आखलेले डावपेच देखील एखाद्यावेळी यशस्वी होत नाहीत.त्याप्रमाणे पन्हाळगडाच्या वेढ्यात छत्रपती शिवाजी महाराज अडकले आणि पन्हाळगडचा वेढा जौहरने घट्ट आवळला.
वेढ्यातून सुटण्यासाठी रणनीती
सिद्धी जौहर मुत्सद्दी सेनानी होता,मुत्सद्दी राजकारणी नव्हता,विचार न करता सरळ रेषेत धडक देणार्या रेड्यासारखे त्याचे वागणे होते.म्हणून तो छत्रपती शिवाजी महाराजांना ओळखू शकला नाही.जौहरला छत्रपती शिवरायांची रणनीती ओळखणे जमले नाही.या पन्हाळगडाच्या वेढ्याचा चार महिन्याचा काळ ओलांडला होता.नेमके याच वेळेत छत्रपती शिवाजी महाराजांनी जौहरला पत्र पाठविल्यामुळे जौहर सुखावला होता.छत्रपती शिवाजी महाराजांकडून जौहरला निरोप गेला.उद्या आम्ही भेट घेण्यासाठी तळावर येऊ.छत्रपती शिवाजी महाराजांकडून हा निरोप गेल्याने जौहरचा वेढा ढिला पडल.सैनिक बेहोश झाले.अवघ्या एका रात्रीचा प्रश्न होता.
गुप्तहेर खात्यातील शूरवीर शिवाजी काशिद
गडाबाहेर कसे पडायचे ? या योजनेची तयारी चालू झाली होती.छत्रपती शिवाजी महाराज या विचारात असतानाच गुप्तहेर खात्यातील शूरवीर शिवाजी काशिद छत्रपती शिवाजी महाराजांकडे आले.शिवाजी काशिद हे पन्हाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या नेबापूर गावचे होते.ते दिसायला छ्त्रपती शिवाजी महाराजांसारखेच होते.
पन्हाळगडावर बाहेरचा माणूस आत जाऊ शकत नव्हता व आतील माणूस बाहेर जाऊ शकत नव्हता.जौहरने छत्रपती शिवाजी महाराजांना वेढ्यामध्ये अडकून ठेवल्याने स्वत: जौहरला देखील येथून हालता येत नव्हते.छत्रपती शिवाजी महाराजांनी याठिकाणची अडचण लक्षात घॆऊन नेताजी पालकरांनी विजापूरला मुबलक सैन्यासह धडका देण्यास सुरुवार केली खरी पण त्यांना त्यात यश मिळाले नाही.
विशाळगडासही वेढा
सिद्धी जौहरने विशाळगडासही वेढा दिला.वेढा अत्यंत कडक होता.नेमक्या त्याच वेळी नेताजी पालकर विजापूरला धडक देऊन जिजाऊंच्या मार्गदर्शनासाठी राजगडावर आले होते.नेताजी पालकर समोर आलेले पाहून आई जिजाऊंना संताप आला व त्या म्हणाल्या तुमचा राजा तिकडे कैद होऊन पडला आहे आणि तुम्ही दुरवर जाऊन बसलात ? राजांची सुटका कोण करणार ? तेंव्हा राजमाता जिजामातांनी छत्रपती शिवाजी महाराजांची सुटका करण्यासाठी हाती तलवार घेतली व राजगडावरून पन्हाळगडाकडे निघाल्या.हे पाहत असलेल्या नेताजी पालकरांनी जिजाऊंना विनंती केली व जिजाऊंकडील तलवार हातात घेत म्हंटले जौहरला हिसका दाखवितो आणि राजांना सोडवून आणतो आणि आई जिजाऊंचा आशिर्वाद घेऊन नेताजी पन्हाळगडाच्या मोहिमेकडे निघाले.विजापूरहून आलेले नेताजी पालकर क्षणाची देखील विश्रांती न घेता तातडीने पन्हाळगडाकडे निघाले.
छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या दिसणार्या समकालीन दोन व्यक्ती होत्या, हिरोजी फ़र्जंद आणि शिवाजी काशिद
पन्हाळगडावर गुप्त बैठक
छत्रपती शिवाजी महाराजांची व गुप्तहेरांची बैठक झाली.यात छत्रपती शिवाजी महाराजांनी रणनीती आखली.पन्हाळगडावरून २४ मैल दूर असलेल्या विशाळगडाच्या दिशेने या योजनेची तयारी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केली होती.जाण्याचा मार्ग निवडला होता,केंव्हा निघायचं ? कसे निघायचं ? सोबत कोण कोण असणार ? शत्रूने अडविले तर कसा प्रतिकार करायचा ? शत्रूच्या गोटात कसा गोंधळ निर्माण करायचा ? सगळा तपशील या अगोदरच ठरला होता.या अनुषंगाने शिवाजी काशिद छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणाले,राजे तुम्ही सिद्धी जौहरला तहासाठी निरोप द्या.जौहरच्या भेटीला मी जातो.तुम्ही गडाबाहेर पडा,यावर छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले तुम्हाला दगा फ़टका झाला तर ? त्यावर शिवाजी काशिद म्हणाले होणार नाही आणि झालाच तर माझ्यासारखे अनेक शिवाजी काशिद निर्माण होतील पण तुमच्यासारखे शिवराय स्वराज्याला नितांत आवश्यक आहेत.शिवाजी काशिदांच्या या प्रामाणिक व निष्ठापूर्वक आवेशाच्या बोलण्याने छत्रपती शिवाजी महाराजांना गहिवरून आले.
प्रतिरुपाचे प्रात्यक्षिक
शिवाजी काशिद यांना कोण ओळखेल काय ? याची खात्री करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वत:चा पेहराव देऊन दुपारी गडावरील अधिकारी कर्मचारी यांचे सत्कार शिवाजी काशिद यांच्या हाती पार पाडले.गुप्तहेर खात्यातील शिवाजी काशिद यांना कोणीही ओळखले नाही.जिथे आपले कर्मचारी ओळखू शकले नाहीत तिथे शत्रू तर अजिबातच ओळखू नाही शकणार अशी खात्री पटल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी तहाच्या वाटाघाटीसाठी येत आहोत असा निरोप सिद्धी जौहरला पाठविला.
१२ जुलै १६६० चा दिवस उजाडला.छत्रपती शिवाजी महाराजांनी दोन पालख्या तयार ठेवण्यास संगितल्या.गुप्तहेर खात्यातील शिवाजी काशिद आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा समान पेहराव,समान सैनिक रात्री १० वाजता किल्ल्यातून दोन पालख्या खाली उतरू लागल्या.शिवाजी महाराजांनी पन्हाळगड सोडला.वेढ्याच्या एका बाजूतून ते वेढ्याबाहेर पडले.सोबत वाट दाखविणारे वाटाडे होते.त्यांनी विशाळगडाचा रस्ता धरला,मार्गात राजांची माणसे अगोदर ठरल्यानुसार त्यांना येवून मिळत होती.वेढ्यापासून छत्रपती शिवाजी महाराज ४ ते ५ मैल दूर पोहचले.विशाळगडावर पोहचण्यासाठी १९ ते २० मैल अंतर अद्याप बाकी होते.याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांसोबत १००० मावळे होते.त्यातच शिवाजी काशिद होते.यावेळी त्यांच्या अंगावर छत्रपती शिवाजी महाराजांसारखा पेहराव होता.जणू प्रतिशिवराय राजेच.
सिद्धी जौहरला चकवा दिला
शिवाजी काशिद यांना पालखीत बसविण्यात आले.पालखीसोबत १० ते १२ हत्यारबंद मावळे होते.राजांचा निरोप घेऊन शिवाजी काशिद यांची पालखी लगबगीने मलकापूरच्या दिशेने गेली व छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी विशाळगडाच्या दिशेने रस्त्याने निघाली.ते पन्हाळगडापासून आणखी दूर जात असताना जौहरच्या गस्ताच्या सैनिकांनी त्यांना पाहिले.आरडाओरडा करीत ते तंबूच्या दिशेने धावले.काही वेळातच सगळा तळ जागा झाला.जौहर रागाने लालेलाल झाला होता.छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला मुर्ख बनविल्याची भावना त्याला क्षणाक्षणाला झाली.
प्रतिरुपाला शत्रुने ओळखले
सिद्धी जौहरने घोडदळाच्या तुकड्या छत्रपती शिवरायांना शोधण्यासाठी पाठविल्या.एक तुकडी मलकापूरच्या दिशेने गेली होती.या तुकडीला मलकापूरच्या रस्त्यात शिवरायांची पालखी दिसली.या पालखीत बसलेले छत्रपती शिवाजी महाराज (प्रति शिवाजी राजे: गुप्तहेर शिवाजी काशिद) दिसले.या जौहरच्या हत्यारबंद सैनिकांच्या तुकडीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशातील गुप्तहेर शिवाजी काशिद यांना पकडले.त्यांची पालखी सिद्धी जौहरच्या तंबूकडे नेली.छत्रपती शिवाजी  महाराज आल्याची बातमी जौहरला समजताच तो राजांच्या स्वागताला आला.त्याने छत्रपतींच्या पेहराव्यातील गुप्तहेर शिवाजी काशिद यांची भेट घेतली.छत्रपती शिवाजी महाराज तहासाठी गडाखाली तंबूत आलेले आहेत ही बातमी वार्यासारखी पसरली व गडाभोवती डोळ्यात तेल घालून पहारा देणार्या सैनिकांना समजताच त्यांना आनंद झाला.पालखीत बसलेल्या शिवाजी महाराजांना(गुप्तहेर शिवाजी काशिद) जौहरच्या समोर नेण्यात आले.इकडे सिद्धी जौहरच्या तंबूत छत्रपती शिवाजी महाराजांना ओळखणारा अफ़जलखानाचा मुलगा फ़ाजलखान होता.क्रुष्णा भास्कर कुलकर्णीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या कपाळावर तलवारीचा वार केला होता हे फ़ाजलखानास माहीती होते.म्हणुन फ़ाजलखान गुप्तहेर शिवाजी काशिद यांना म्हणाला ’क्या आप सचमुच शिवाजी महाराज है ? अगर आपको जान प्यारी है तो सच बत’,यावर शिवाजी काशिद म्हणाले, ’हॉं मै शिवाजी महाराज हू’ आणि फ़ाजलखानाने शिवरायांचा जिरेटोप मागे सारला आणि पाहतो तर काय कपाळावर क्रुष्णा भास्कर कुलकर्णीने दिलेल्या तलवारीचा वर्मी बसलेल्या घावाचा व्रण काही दिसला नाही.त्याने तात्काळ ही बाब सिद्धी जौहरच्या नजरेत आणून दिली.

30 November 2013

आतातरी पुढे हाची उपदेश

             जगतगुरु संतशिरोमणी संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे ह्र्दयाला भिडणारे अभंग. अज्ञान, रुढी, परंपरा, ब्राह्मणवाद आणि कर्मकांडात अडकलेला समाज व त्याची दयनीय अवस्था पाहून महाराज कळवळून गेले.त्यांनी बहुजन समाजाची बारकाव्याने चौफ़ेर पाहणी केली. त्यातून समाजाची दयणीय अवस्था तुकोबारायांना पाहवली नाही.ते म्हणाले,
"न देखवे डोळा ऐसा हा आकांत । परपिडे चित्त दु:खी होते ॥"
त्यानंतर त्यांच्या जे काही लक्षात आले ते समाजाचे चित्र बदलण्यासाठी समाज परिवर्तनासाठी त्यांनी खुप कष्ट घेतले,तेंव्हा महाराज म्हणाले.
"भीत नाही आता आपुल्या मरणा । दु:खी होता जन न देखवे ॥"
यातून महाराजांनी निर्भीडपणे सत्य सांगण्यास सुरुवात केली.हे सत्य कितीही तिखट व झोंबणारे का असेना पण शेवटपर्यंत त्यांनी सत्य सांगायचे सोडले नाही.हे सत्य जरी बहुमतांच्या विरोधात का असेना पण बहुमतांपेक्षा आम्ही सत्यालाच मानतो.या बद्दल महाराज म्हणतात.
"सत्य असत्याशी मन केले ग्वाही । मानियेली नाही बहुमता ॥"
किंवा हे सत्य सांगत असताना कुणाला तनका येत असेल,राग येत असेल तरी देखील आम्ही सत्यच सांगण्याचं काम करणार आहोत असे महाराज एके ठिकाणी म्हणतात.
"तुका म्हणे सत्य सांगोत । येतील रागे तरी येवोत ॥"
यावरून महाराज अत्यंत परखड भूमिका घॆताना दिसून येतात.मग ते व्रत वैकल्यांवर आसूड ओढतात.बुवाबाजीवर प्रहार करतात तर कधी वैदिक पंडीतांच्या बाष्फ़ळ ज्ञानाची प्रौढी उघड करतात.अनेकेश्वर नाकारताना ते म्हणतात.
"सेंदरी ही देवी दैवसे । कोण ती पुजी भूते केते ॥
आपल्या पोटा जी रडते । मगती शिते अवदान ॥१॥"
त्याहीपेक्षा पुढे जाऊन महाराज म्हणतात सगळ्या देवांचा देव म्हणून आम्ही फ़क्त विठ्ठलच मानतो,स्वीकारतो.
"नव्हे जोखाई जोखाई । मायराणी मेसाबाई॥
बळीया माझा पंढरीराव । जो या देवांचाही देव ॥
रंडीचंडी शक्ती । मदयमांस भक्षिती॥
बहीराव खंडेराव । रोटी सोटीसाठी देव ॥
गणोबा विक्राळ । लाडू मोदकांचा काळ ॥
मुंज्या मैसासुरे । हे तो कोण लेखी पोरे॥
वेताळे फ़ेताळे । जळो त्यांचे तोंड काळे ॥
तुका म्हणे चित्ती । धरा रखुमाईचा पती ॥४॥"
नवस केल्यावर लेकरं-बाळं झाले असते तर नवरा करायची गरज काय ? हा जाहीर प्रश्न महाराज चुकलेल्या समाजाला करतात.
"नवसे कन्या-पुत्र होती । मग का करणे लागे पती ॥"
हे सगळे करीत असताना समाजाला अज्ञानाच्या अंधकारातून बाहेर काढत असताना,ज्ञानाचा नवा मार्ग दाखवत असताना त्यांना बर्याच संकटांना तोंड द्यावे लागतं.ब्राह्मणवर्ग त्यांना त्रास देतो,अमानुष छळ करतो तर त्यांची गाथा पाण्यात बुडवतो.
यातून महाराज खचून न जाता पुन्हा नव्याने उभे राहतात आणि पहिल्याहीपेक्षा खंबीर,धाडसी भूमिका ते पुढे घॆतात.
"तुका म्हणे ऐसा नरा । मोजुनी हाणाव्या पैजारा ॥"
किंवा
"तुका म्हणे गाढव लेखा । जेथे भेटेल तेथे ठोका ॥"
             अशा प्रकारे जगतगुरु तुकोबाराय समाजासाठी दिवसरात्र स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करायला लागतात.अज्ञान सोडा,भटमुक्त व्हा,भागवत धर्म स्विकारा असे वारंवार महाराज सांगतात.सर्व सांगुनही न ऐकणार्या वर्गाबद्दल त्यांना चीड येते.ह्या न ऐकणार्या वर्गाला एकदा महाराज उद्देशून म्हणतात.
"किती सांगू तरी न ऐकती बटकीचे।
पुढे शिंदळीचे रडतील ॥"
               आज शेतकर्यांच्या आत्महत्या झाल्या आणि वाटले महाराजांचे बोल खरे ठरले.त्यांनी सांगितलेले न ऐकल्यामुळे आमच्यावर रडायची वेळ आली.अजुन आम्हाला तुकोबाराय पुर्णपणे समजलेले नाहीत असेच म्हणावे लागेल.एवढेच काय तर बर्याच जनांच्या घरामध्ये तुकोबारायांची गाथा नाही.संत तुकोबाराय वाचून,समजून घेण्याऐवजी आम्ही वारकरी फ़क्त मंदिरात तुकाराम चालीवर गातो.तुकोबाराय फ़क्त गाण्यापुरतेच ठेवले आम्ही.यामुळे त्यांच्याच शब्दात सांगायचे झाल्यास,
"उठिते ते कुटिते टाळ । अवघा मांडिला कोल्हाळ ॥"
आम्ही एवढे शहाणे, महाराज करू नको म्हणाले ते आम्ही आधी करून बसलो.नव्हे आजही करत आहोत.
महाराज व्रत,वैकल्याच्या भानगडीत पडू नका म्हणाले होते.आम्ही अजुनही व्रतवैकल्य सोडायला तयार नाही.महाराज दगडाला देव मानू नका म्हणाले होते,ते रंजल्या गांजल्यांना आपुले म्हणणार्यांच्यात देव शोधा म्हणाले होते.आम्ही नेमकं याच्या उलट वर्तन करतो.ते नवस करू नका म्हणाले होते आम्ही करतो,ते बुवाबाजी,कर्मकांड करू नका म्हणाले होते.पण बुवाबाजी,बापूकापू आणि भामट्यांशिवाय आमचे पान हालत नाही.ते अनेक देवी-देवता मानू नका म्हणाले होते.आम्ही सगळ्यांना खेटून येतो.ते म्हणाले होते प्रत्येक गोष्ट श्रमाने,अभ्यास करून मिळवा पण आम्हाला हे जमत नाही.आपला कल दोन नंबरच्या मार्गावर असतो.
म्हणून आम्ही आतातरी अंतर्मुख होऊन तुकोबारायांना समजून घेतले पाहिजे.किमान त्या दिशेने एखादे पाऊल तरी टाकले पहिजे.असे म्हणतात साहित्याला काळाच्या मर्यादा असतात.पण आजही तुकोबारायांचं साहित्य प्रासंगिक ठरतं.समाजोपयोगी ठरतं.ही गोष्ट केवढी मोठी आणि अभिमानाची आहे.आपली प्रगती व्हावी,गुलामीतून आपण बहुजन समाजाने बाहेर पडावे म्हणून आयुष्य पणाला लावणारे संत तुकोबाराय आम्ही असेच विसरून जायचे का ?
ह्रुदयाला घाव झाल्यावर,असंख्य शारिरीक आणि मानसिक वेदना सहन करून अगदी आतून घायाळ झालेले संत तुकोबाराय अगदी  कळवळून शेवटचा उपदेश करतात.रात्रंदिवस तुमचा आमचा विचार करणारे तुकोबाराय शेवटीस काकुळतीस येवून म्हणतात...
"आतातरी पुढे हाची उपदेश।
नका करू नाश आयुष्याचा ॥
सकळ्यांच्या पाया माझे दंडवत ।
आपुलाले चित्त शुद्ध करा ॥"
बघा काही.....जमतं का पाळायला !!

* नार्याची मुंज आणि कूशीचे लग्न
* तुकोबारायांची गाथा

10 October 2013

विश्ववंद्य छ.शिवरायांचे सांस्क्रुतीक धोरण

          कुळवाडीभूषण विश्ववंद्यछत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा कधी हिंदू धर्मरक्षक, कधी महाराष्ट्र रक्षक,कधी मराठी भाषा रक्षक,कधी सांस्क्रुतीक रक्षक तर कधी मुस्लिम विरोधक अशा प्रकारे उभी करण्यात आली.पण शिवरायांच्या चरित्रासंबंधी ऐतिहासिक तथ्यांचा अभ्यास केला असता शिवरायांच्या वरील प्रतिमा अनैतिहासिक आणि शिवरायांना संकुचित ठरविणार्या आहेत,हे स्पष्ट होते.
शिवरायांना संस्क्रुतीचा जरूर अभिमान होता. पण कोणत्या संस्क्रुतीचा ? तर सिंधु संस्क्रुतीचा,परंपरेचा म्हणून महात्मा फ़ुले त्यांचे वर्णन "कुळवाडीभूषण" शिवराय असे करतात.कुळवाडीभूषण म्हणजे अठरापगड बारा बलुतेदार यांचा राजा,शेतकर्यांचा,रयतेचा राजा.सांस्क्रुतीक धोरणांमध्ये महत्वाचा भाग म्हणजे भाषा! शिवरायांना मराठीचा अभिमान होता याबाबत कोणाचे दुमत असण्याचे कारण नाही.पण मराठीबद्द्ल आंधळा अभिमान त्यांच्याकडे नव्हता.मराठीच्या अभिमानापोटी इतर भाषांचा अनादर महाराजांची कधीच केला नाही.याउलट शिवरायांच्या पत्रात अरबी,पार्सी भाषेचा (शब्दांचा) त्यांनी मोठ्या प्रमाणात वापर केलेला आहे.याबाबत डॉ.प्र.न.देशपांडे त्यांच्या "शिवरायांची पत्रे" या ग्रंथातील प्रस्तावनेत लिहितात-शिवाजी महाराजांच्या कचेरीपत्रामध्ये प्रामुख्याने पुढील मायना आढळतो.अजरख्त खाने राजर्षी शिवाजीराजे दामदैलत हूं आणि पुढील अर्ध्या भागात बजानीखा कारखुनांनी हाल व इस्तकथाल देशमुखांनी अशा आशयाचा मजकूर येतो.अजरख्त खाने याचा अर्थ कचेरीपासुन असा असून ’दामदौलत हू” याचा अर्थ त्याचे राज्य चिरायु होवो,असा होतो.तर बजानीबु याचा अर्थ ’कडे’ असा असून "हाल" म्हणजे हल्लीचे आणि "इस्तकबाल" म्हणजे पुढे होणारे भावी असा आहे.(प्रुष्ठ क्र.१४) वरील अनेक शब्द पार्सी,अरबी आहेत.याचा अर्थ शिवरायांनी केवळ संस्क्रुत,मराठी याच भाषांचा कैवार घेतला आणि इतर भाषांचा द्वेष केला असे सिद्ध होत नाही.शिवरायांचे सांस्क्रुतीक धोरण हे भाषावादाचे नव्हते,तर जगाच्या स्पर्धेत टिकायचे असेल तर अनेक भाषा अवगत असल्या पाहिजेत अशाच स्वरूपाचे होते.शिवरायांचे पुत्र संभाजीराजेंनी तर एक संस्क्रुत आणि तीन हिंदी असे चार ग्रंथ लिहिले.म्हणजे शिवकाळात भाषावाद अस्तित्वात नव्हता.आजच्या राजकारण्यांनी राजकीय लाभासाठी भाषावाद उभा केलेला असून मराठी भाषेच्या अस्मितेचे प्रतिक म्हणून शिवरायांची प्रतिमा उभी केली जाते.शिवरायांचे सांस्क्रुतीक धोरण पाहता ही बाब अत्यंत खोटारडी आहे.
शिवाजी राजांचा पोषाख व राहणीमान पाहता सुफ़ी संतांच्या भारतातील वास्तव्याने बहुजन-मुस्लिम धर्मियांमध्ये मोठ्या प्रमाणावर सांस्क्रुतीक देवाण-घेवाण झाली.याबाबत इतिहासतज्ञ चंद्रशेखर शिखरे त्यांच्या प्रतिइतिहास या अभ्यासपुर्ण ग्रंथात लिहितात मुस्लिम स्त्रियांनी सौभाग्य अलंकार म्हणून पुरुषांचा झब्बे आणि तंग तुमानी हा पोषाख वापरणे या गोष्टी शिवरायांच्या पुर्वीपासून घडत आलेल्या होत्या.शिवाजी महाराजांचा पोषाख व राहणीमान यातूनही हा सांस्क्रुतीक प्रभाव जाणवतो याचा अर्थ कोणी धर्म बदलला असा होत नाही(प्रथमाव्रुती प्रुष्ठ क्र.५६). कुळवाडीभूषण शिवाजी महाराजांना आपल्या धार्मिक अस्मितेचा अभिमान होता.भवानी माता,महादेव,खंडोबा यांच्याबद्दल शिवाजी महाराजांना नितांत आदर होता.ते देव म्हणून नव्हे तर भवानीमाता, महादेव, खंडोबा हे सर्व श्रद्धास्थाने आहेत.त्यांच्याबद्दल शिवरायांना आदर होता पण यश मिळवण्यासाठी हाती तलवार घ्यावी लागते.केवळ नामस्मरण आणि देवपुजा केल्याने आपणाला यश मिळणार नाही असे समजण्याइतके महाराज प्रगल्भ विचारसरणीचे होते.
शिवाजी राजे बुद्धिप्रामाण्यवादी होते.वैदिक धर्मग्रंथात अनेक अतार्किक बाबी आहेत.त्यांचे अनुकरण महाराजांनी कधीही केले नाही.शिवरायांनी आरमारदलाची उभारणी केली.सिंधुदुर्गसारखे सागरी किल्ले बांधले.बेदनुरवर समुद्रामार्गे स्वारी करून शिवरायांनी सिंधू बंदी तोडली.समुद्र उल्लंघन करणे पाप आहे असे लिहुन ठेवनार्या वैदिक ग्रंथाचे काही ठिकाणी प्रामाण्य नाकारले.शिवरायांनी शुद्रातिशुद्र  बांधवांना हक्क-अधिकार दिले. म्हणजे महाराजांनी विषमता नाकारली.राज्यात समता निर्माण केली.समतावादी स्वराज्य हे शिवरायांच्या सांस्क्रुतीक धोरणाचे महत्वाचे अंग होते.
शिवराय महाराजांचे बरेचसे आयुष्य लढाया राजकीय संघर्ष स्वराज्याची निर्मीती प्रवास यामध्ये गेलेले आहे.त्यांना जर दीर्घायुष्य लाभले असते तर त्यांनी दुसर्या राज्याभिषेकानंतर निश्वितच अब्राह्मणी धार्मिक संहिता निर्माण केली असती.तरी देखील त्यांच्या पत्रावरून,जीवनातील काही प्रसंगावरून त्यांचा मानवतावाद,प्रेमळपणा,धार्मिक.सांस्क्रुतीक धोरणे प्रकर्षाने जाणवते.त्यांनी २३ ऑक्टोंबर १६६२ रोजी सर्जेराव जेधे यांना पत्र पाठवले आहे.त्या पत्रात ते लिहितात की मोघल स्वराज्यावर चाल करून येत आहेत तरी रयतेला सुरक्षीत ठिकाणी हलवावे.मोघलाकडून रयतेला त्रास झाला तर "त्याचे पाप तुमच्या माथी बैसेल".यावरून परोपकार हे पुण्य आणि परपीडा हे पाप आहे हे महाराजांचे सांस्क्रुतीक धोरण होते.
शिवाजी महाराजांची हिंदू धर्मरक्षक आणि मुस्लिमांचा कर्दनकाळ अशी प्रतिमा झाली किंवा तशी केली गेली.शिवाजी महाराजांचे अदिलशहा, मोघल यांच्याबरोबर राजकीय संघर्ष होता,धार्मिक नव्हे.शिवरायांनी अफ़जलखानाला ठार मारले,शाईस्तेखानावर वार केला ते मुस्लिम होते म्हणून नव्हे तर स्वराज्याचे शत्रू होते म्हणून.शिवाजी महाराजांनी जसा अफ़जलखानाला ठार मारला तसाच खानाचा निष्ठावंत वकील क्रुष्णा कुलकर्णी यालाही उभा कापला.शिवरायांच्या सैन्यात अनेक मुस्लिम अधिकारी होते.शिवरायांच्या सैन्यात ज्याप्रमाणे अनेक मुस्लिम अधिकारी होते त्याचप्रमाणे मोघल. अदिलशहाच्या सैन्यात देखील मराठा , रजपुत, ब्राह्मण अधिकारी होते.याचाच अर्थ संघर्ष हा धार्मिक नसून राजकीय होता.शिवरायांचे धोरण कोणत्या धर्माला विरोध किंवा कोणत्या धर्माचा अनुनय करण्याचे नव्हते. याउलट औरंगजेबाला १६५७ साली लिहिलेल्या पत्रावरून शिवरायांचा मानवतावाद प्रकर्षाने जाणवतो.
बहुजनप्रतिपालक विश्ववंद्य छ.शिवाजी महाराजांच्या धार्मिक आणि सांस्क्रुतीक धोरणावरून हे स्पष्ट होते की शिवरायांना जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषा, लिंग, वंश, राष्ट्र भेदाच्या पलीकडे जाऊन मानवाचे आनंददायी प्रसन्न भेदा-भेदरहित असे स्वराज्य अपेक्षीत होते.त्याची प्रत्येक्ष कार्यवाही त्यांनी आपल्या स्वराज्यात केली.शिवरायांचे खरे सांस्क्रुतीक आणि धार्मिक धोरण जगाला समजेल तेंव्हा जगात शांतता आणि विकास झपाट्याने वाढेल.शिवाजी हे केवळ मराठी, महाराष्ट्र, भारताचे राजे नाहीत तर संपुर्ण जगातील आदर्श व्यक्तिमत्वांचे आदर्श आहेत.
अशा कुळवाडीभूषण समतेचे पुरस्कर्ते हिंदवी स्वराज्य संस्थापक विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराजांना कोटी कोटी विनम्र अभिवादन !
जय जिजाऊ ॥ जय शिवराय ॥ जय महाराष्ट्र.

30 September 2013

स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ : ज्ञानज्योती सावित्रीबाई फ़ुले

            काटेरी अंथरुणावर जन्माला येवून या अंथरूणाची ज्यांना सवय होते ते सामान्य म्हणून जगतात पण बोचणार्या काट्यांची ज्यांना जाणीव होते आणि हक्क मिळवण्यासाठी ज्यांच्यात जिद्द असते ते असामान्य होतात.भारत देशातील पुरुषप्रधान व्यवस्थेला तोंड देत प्रत्येक स्त्रीच्या जीवनाला ज्ञानाम्रुताचा आनंद देणार्या सावित्रीबाई फ़ुले या अशाच असामान्य व्यक्ती नव्हे तर ज्ञानाची देवता आहेत.त्यांच्यामुळेच आज,"अगं सोनू,अरे पिल्या,अरे बाळा लवकर उठ,शाळेला जायचं ना ! तयारी करावयाची आहे.लवकर उठ."अशाप्रकारचे संवाद आज भारतातील घराघरात ऐकायला मिळतात.
शिक्षणाची ज्ञानगंगा प्रत्येकाच्या घराघरात पोहवविणार्या पहिल्या महिला जन्मदात्या म्हणून अजरामर असणार्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फ़ुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात नायगांव येथे झाला.नायगाव येथील खंडूजी नेवसे पाटील यांची एकुलती एक लाडकी, हुशार मुलगी होती.तत्कालीन परिस्थितीत भारतीय समाजात बालविवाहाची पद्धत असल्यामुळे सावित्रीबाईंचं लग्न वयाच्या नवव्या वर्षी जोतिबा फ़ुले यांच्याबरोबर झाले.त्यावेळी फ़ुलेंचे वय १३ वर्ष होते.१८४० मध्ये विवाह झाल्याबरोबर परंपरागत चातुर्वर्ण्याधिष्ठीत समाज व्यवस्थेरूपी हिरव्यागार विषव्रुक्षाला घनदाट जंगलातील एका-एका विषव्रुक्षाला मुळासकट उपटून फ़ेकून देण्याचे धाडस,बाणेदारपणा आणि जॊखिम आपल्या पतीबरोबर सावित्रीबाईंनी तना-मनाने स्विकारले होते.
सावित्रीबाईंनी त्याच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर स्वतंत्र स्त्री म्हणून विचार केला.फ़क्त विचार करून थांबल्या नाहीत तर प्रत्यक्ष त्याप्रमाणे वाटचाल केली.ही वाटचाल सनातन काळात अत्यंत खडतर होती म्हणूनच त्यांनी घडवून आणलेल्या शैक्षणिक क्रांतीचे मोल अनमोल होते हे निश्चितपणे समाजाने स्वीकारले आहे.ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा आहे असे राष्ट्रपिता महात्मा जोतिराव नेहमी म्हणत त्यामुळे "विद्या हेच बळ,ज्ञान हीच शक्ती" ही म.जोतिराव फ़ुलेंची मुलगामी क्रांतिकारी वचने सावित्रीबाईंनी आत्मसात केली होती.शिक्षणाशिवाय समता नाही आणि समतेशिवाय मानवता नाही हे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी "चुल आणि मुल" यात गुंतुन न पडता घराचा उंबरठा ओलांडून त्यांनी सामाजिक कार्यात भाग घेतला.महात्मा जोतिराव फ़ुलेंनी स्वत: सावित्रीबाईंनी शिकविण्यास सुरुवात केली.त्यासाठी शेतातील काळी जमीन सावित्रीबाईंची पाटी होती.त्या पाटीवर सावित्रीबाई एका छोट्याशा काडीने अक्षरे गिरवायला शिकल्या पुढे त्यांनी अहमदनगर येथे फ़रारबाईंच्या व पुण्यात मिचेलाबाईंच्या मॉर्मन स्कुलमध्ये अध्यापनाचे शिक्षण घॆऊन आद्य भारतीय शिक्षिका आणि मुख्याध्यापिका झाल्या हिच भारतीयांच्या इतिहासात अजरामर संस्मरणीय घटना घडली.
स्त्रियांच्या आणि शुद्रांच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून ज्ञानाचे दरवाजे त्यांच्यासाठी खुले करण्याचा महात्मा जोतिराव फ़ुलेंचा मानस होता."जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाची उद्धारी." या सत्याचा त्यांना प्रत्यय आल्यामुळे विचाराअंती त्यांनी मुलींच्यासाठी शाळा काढण्याचे ठरवून १ जानेवारी १८४८ रोजी पुणे येथील भिडे वाड्यात मुलींच्या शिक्षणासाठी पहिली शाळा सुरु केली आणि त्या शाळेत सावित्रीबाई विनावेतन शिक्षिकेचे काम करू लागल्या.आपल्या या कार्याचा एकखांबी तंबू होऊ नये म्हणून त्यांनी कार्यकारी मंडळाची स्थापना केली.
१ जानेवारी १८४८ रोजी मुलींची पहिली शाळा पुण्यात सुरु करण्यात आली होती. ती भारतातील पहिली शाळा म्हणून भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहावा लागेल.जेव्हा ब्राह्मण समाजाला समजले की ही शाळा एका शुद्र जोडप्यांनी सुरु केली आहे.तेंव्हा त्यांनी संताप व्यक्त केला.सावित्रीबाई शाळेत जात असताना त्यांच्यावर शेण टाकणे,चिखल फ़ेकणे,अचकट-विचकट भाषेचा वापर करणे,निंदानालस्ती करणे असे अनेक प्रकार सुरु होते.परंतू सावित्रीबाई फ़ुले या स्वभावाने बंडखोर स्वभावाच्या होत्या.अशा अनेक अडचणी आणि संकटांना त्यांनी भीक घातली नाही.कारण जे कार्य त्यांनी हाती घेतले ते भारतातील महिलांसाठी उज्वल भविष्या निर्माण करणारे होते.त्यांनी अस्प्रुश्यांसाठी शाळा काढल्या.त्याकाळी स्त्रीयांना अजिबातच स्वातंत्र नव्हते.स्त्रियांना शिक्षण देणे म्हणजे पाप आहे असे समजले जात असे.परंतू हे धाडसी काम फ़ुले दांपत्यांनी सुरु केले.
सावित्रीबाई प्रतिभावंत कवयत्री देखील होत्या.त्यांनी ५० वर्षे जोतिराव फ़ुलेंच्या ध्येय प्रणाली, चळवळीमध्ये झोकून दिले होते.सावित्रीबाईंचा पहिला काव्यसंग्रह १८५४ साली प्रकाशीत झाला.त्यामध्ये सुद्धा त्यांनी आपल्या बहुजन बांधवांना काव्य अर्पण केले.उदा.तयास म्हणावे मानव काय,शिकण्यासाठी जागे व्हा,शुद्र शब्दाचा अर्थ श्रेष्ठ धन इत्यादी काव्य रचनेमधून त्यांनी शिक्षणाचे महत्व पटवून दिले.एका काव्यामध्ये सावित्रीबाई फ़ुले म्हणतात- नसानसात इर्षा खेळवू विद्या मी घेईन,शुद्रत्वाचा डाग हो माझा निपटून मी काढीन.सावित्रीबाई म्हणतात-तुमच्या रोमारोमात अशी इर्षा जाणवू द्या की,आम्ही शुद्र आहोत याचा डाग आम्ही पुसुन टाकणार आहोत आणि त्यासाठी आम्हाला शिक्षण घेणे आवश्यक आहे.अशा प्रकारे काव्य रचना करून बहुजनांना शिक्षणासाठी प्रेरित,चैतन्यमय केले आहे.विद्येचे महत्व पटवून दिले.खालील ओळीमध्ये त्यांनी सांगितले आहे की "विद्याधन आहे रे श्रेष्ठ सार्या धनाहून,तिचा साठा जयापाशी ज्ञानी तो मानवी जन".पुरुष शिकला तर तो एकटाच शिकतो परंतू स्त्री शिकली तर संपुर्ण कुटूंब शिक्षित होते.पर्यायाने समाज शिकतो आणि राष्ट्राच्या प्रगतीला हातभार लागू शकतो.ही शिकवण सावित्रीबाईंनी समाजाला दिली.कारण त्या काळात अखंड भारतामध्ये स्त्री ही एका रानात चुकलेल्या पाडसासारखी वावरत होती.ती घाबरलेली,बावरलेली,मनाने दबलेली होती.कोणीतरी ब्रुचे धिंडवडे काढील या मनस्थितीत वावरत होती.तिला शिक्षणापासून वंचित केले जात होते.पुरुषप्रधान समाजव्यवस्था आणि स्त्रियांना दासी लेखणारी पुरुषी मानसिकतेने महिलांवर अनेक बंधने लादली होती.त्याठिकाणी सावित्रीबाईंनी अंधार्या कोठडीत चाचपडणार्या स्त्रीला तिच्या आस्तित्वाची जाणीव करून दिली.सनातनी लोकांचा रोष पत्करून तिला पुरुषांच्या बरोबरीत वागायला शिकवले.असे हे शिक्षण क्षेत्रातील महान कार्या बघून ब्रिटीश सरकारने त्यांचा पुणे येथील विश्रामवाड्यात १६ नोव्हेंबर १८५२ मध्ये तत्कालीन पुना संस्क्रुत कॉलेज चे प्राचार्य मेजर कॅंडी यांच्या अध्यक्षतेखाली फ़ुले दांपत्यांना सन्मानित करून त्यांचा गौरव करण्यात आला.
आज एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करायला स्त्रीला कोणी मार्ग दाखविला असेल तर तो सावित्रीबाई फ़ुलेंनीच.त्यांनी जर हा रस्ता दाखवला नसता तर कोठेतरी सह्याद्रीच्या रांगामध्ये,कोणत्यातरी दाट जंगलात,कोणत्यातरी गुहेत काट्यांतून प्रवास करायला लागला असता.सह्याद्रीच्या शिखरावर पोहचण्याऐवजी सह्याद्रीच्या खोल दरीत व दु:खाच्या गर्तेत हिंडावे लागले असते.पण सावित्रीबाई फ़ुलेंनी राष्ट्रपिता महात्मा फ़ुले यांच्या बरोबरीने स्त्रियांसाठी जी नवीन दालने उभी केली त्याला तोड नाही.त्याकाळी मुठीमध्ये मापेल एवढ्या मनुवादी लोकांची शिक्षणावर मक्तेदारी होती.ही मक्तेदारी स्वत: अक्षर गिरवून या गिरवण्यातून पुर्ण भारतातील स्त्रियांना भवितव्याचा मार्ग दाखविला.
या प्रेमळ माऊलीचे १० मार्च १८९७ ला महानिर्वाण झाले.म्हणून म्हंटले जाते की,"युगायुगातून एखादीच अशी सावित्री जन्माला येते म्हणूनच ती युगसावित्री होते." राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फ़ुलेंसारख्या क्रांतीसुर्याबरोबर सहवास आणि मार्गक्रमण करीत असणारी ती एक क्रांतीज्योती होती.म्हणूनच अशा तपस्वी,न्यायमुर्ती,तेजस्विनी महामायेला कोटी कोटी विनम्र प्रणाम.

24 September 2013

जिजाऊ चरित्रातून काय शिकावे

           अराजकतेच्या पार्श्वभूमीवरती मूर्तिमंत शिवराज्य उभं करणार्या राजमाता म्हणजे जिजाऊ माता.विखुरलेल्या देशबांधवांना एकतेच्या सुत्रात गुंफ़ुन स्वराज्याचे जनआंदोलन उभं करणार्या राजमाता जिजाऊ माता यांचे जीवनचरित्र अत्यंत प्रेरणादायक आहे!. त्यांनी प्रतिकुल परिस्थितीवर मात करून रयतेचे स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज घडवले.जिजाऊंचे व्यक्तिमत्व म्हणजे धैर्य,शौर्य,प्रचंड आत्मविश्वास,इच्छाशक्ती आणि गरीबांप्रति प्रचंड तळमळीने ओतप्रोत भरलेले आहे.
राजमाता जिजाऊंचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी सिंडखेडराजा (जि.बुलढाणा) येथे इतिहास प्रसिद्ध यादव घराण्यातील लखूजीराजे जाधव म्हाळसाराणी या राजघराण्यात झाला. लखुजीराजेंनी आपल्या मुलांबरोबरच मुलीला म्हणजेच जिजाऊला देखील राजनीती, युद्धकलेचे शिक्षण दिले. जिजाऊंनी राजघराण्याचा व्रुथा अभिमान न बाळगता युद्धकला राजनीती यामध्ये प्रावीण्य मिळवले.आज आपण जिजाऊ चरित्रातून प्रेरणा घेऊन वेगवेगळ्या क्षेत्रात प्राविण्य मिळवले पाहिजे.आजच्या मुलींमध्ये प्रचंड नैराश्य,न्युनगंड किंवा असुरक्षतेची भावना प्रामुख्याने जाणवते.जिजाऊंनी आत्मविश्वासाने युद्धकलेत नैपुण्य मिळवले याचा उपयोग पुढे शिवरायांना युद्धकला आणि राजनीतीचे शिक्षण देण्यासाठी झाला.
आजची श्री चुल आणि मुल या परिघाबाहेर पडायला तयार नाही किंबहुना तिने त्यातच सौख्य मानावे अशी समाज व्यवस्था आजदेखील आहे.पण जिजाऊंनी विवाहानंतर स्वराज्यसंकल्पनेला अखंड स्वरूप प्राप्त करून देण्याचे ऐतिहासिक कार्य केले आहे.शहाजीराजे-जिजाऊमाता यांनी मोठ्या उदात्त आणि व्यापकपणे रयतेच्या स्थैर्यासाठी स्वराज्य स्थापण्याचा निर्णय घेतला.केवळ आपली जहागिरी किंवा वतन याचा विचार न करता प्रजेला न्याय मिळाला पाहिजे ही भुमिका शहाजीराजे-जिजाऊमातांची होती.
शहाजीराजांच्या कार्यात जिजाऊमाता अत्यंत खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभ्या होत्या. अदिलशहा, निजाम,मुघल असे बलाढ्य विरोधात असताना मोठ्या निर्भिडपणे जिजाऊमाता शहाजीमहाराजांच्या खांद्याला खांदा लावून पुढे आल्या.आजची स्त्री माझी मुले माझे घर माझे सगेसोयरे आणि कौटूंबिक कार्यक्रम या पलीकडे विचार करताना दिसत नाही.जिजाऊमातेनं स्वत:च्या जाधव-भोसले कुटूंबाच्या पलीकडे जाऊन रयतेचा विचार केला.त्यामुळे तानाजी,येसाजी,कान्होजी,शिवाजी,बाजी पालसकर,मुरारबाजी,बहिर्जी,कावजी,नेताजी इ.सर्व जाती धर्मातील सरदार व मावळे स्वराज्यासाठी सर्वस्व अर्पणासाठी पुढे आले.म्हणजे जिजाऊमातेनं आपले मात्रुप्रेम शिवरायांप्रमाणेच सर्व मावळ्यांवर केले.त्यामुळे जिजाऊ ही स्वराज्यमाता आहेत.
स्वराज्यावर अनेक संकट आली,अफ़जलखान,दिलेरखान,शाईस्तेखान,सिद्धी जौहर या प्रसंगी जिजाऊ शिवरायांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या.संकटसमयी जिजाऊ लढणार्या होत्या,रडणार्या नव्हत्या. शिवरायांमध्ये प्रचंड आत्मविश्वास  निर्माण करण्याचे कार्य जिजाऊंनी केले.शिवरायांचे मोठेपणाचे श्रेय जिजाऊंना जाते.कारण शिवरायांना जिजाऊंनी बालपणापासून तलवार घ्या,घोड्यावर बसा,गडकोट-किल्ले पायदळी घाला,शत्रुचा नि:पात करा,तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचे आहे,मी तुमच्या पाठीशी आहे असे सांगितले.आजची आई मुलांना तू कोणाच्या भानगडीत पडू नकोस,आपल्याला काय करायचेय, असे सांगते.आजची आई आत्मकेंद्री बनत चालली आहे.जिजाऊंनी मात्र उपेक्षित, वंचित, शोषित जनतेचा प्राधान्याने विचार केला.आज देखील शिवरायांसारखे पराक्रमी,मानवतावादी नेते उदयाला येतील पण त्याअगोदर जिजाऊंसारखी माता घरोघरी निर्माण झाली पाहिजे.
राजमाता जिजाऊ संकटसमयी डगमगल्या नाहीत,शिवरायांना यश मिळावे यासाठी यज्ञ,तप,शांती,उपवास करीत बसल्या नाहीत.यश मिळवण्यासाठी हाती तलवार घ्यावी लागते,चातुर्य पणाला लावावे लागते,प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागते.यावर जिजाऊंचा द्रुढ विश्वास होता.जिजाऊ प्रयत्नवादी होत्या.शिवरायांवर चालून आलेल्या शत्रुचा नायनाट करण्यासाठी जिजाऊंनी मार्गदर्शन केले.प्रसंगी जिजाऊ जपमाळ ओढत नामस्मरण करत बसल्या नाहीत.जिजाऊ दैववादी नव्हे तर प्रयत्नवादी होत्या.त्यामुळे संकटसमयी त्या हताश-निराश झाल्या नाहीत.आजची स्त्री मुलाचा गुणवत्ता यादीत क्रमांक यावा,नोकरी मिळावी,पदोन्नती मिळावी,निवडणूक जिंकावी यासाठी यज्ञ,होमहवन,तीर्थयात्रा,नारायण-नागबळी, उपवास, नामस्मरण करताना दिसते.जिजाऊंचा प्रयत्नवाद स्रियांनी आत्मसात केला पाहिजे.
जिजाऊमाता पन्हाळ्याच्या दिशेने निघाल्या त्यावेळेस नेताजी पालकरांनी जिजाऊंना साकडे घातले. आम्ही जीवंत असेपर्यंत आपण तसदी न घ्यावी,म्हणजे जिजाऊमाता वेळप्रसंगी हाती तलवार घेऊन लढणार्या होत्या. आज स्त्रियांवर अनेक ठिकाणी अत्याचार होतात त्याप्रसंगी  स्त्री  स्वत:चे संरक्षण  करू  शकत नाही. इतका न्युनगंड स्त्रियांमध्ये  असणार्या  धैर्याचे-शौर्याचे अनुकरण स्त्रियांनी करावे.
जिजाऊमातांनी संभाजीराजेंना राजनीती,युद्धकलेचे शिक्षण दिले.पुत्राप्रमाणे नातवावर उत्तम संस्कार करणारी जिजाऊमाता म्हणजे स्वराज्याचे खरे विद्यापीठ आहे.शिवाजीराजे-संभाजीराजे मावळे यांच्या मध्ये असणारी  उच्चकोटीची नैतिकता जिजाऊंच्या संस्कारातून आलेली आहे.विखुरलेला मराठा समाज एक करावा म्हणून शहाजी राजे-जिजाऊंनी शिवरायांचे आठ विवाह केले.त्या आठही महाराण्यांचा जिजाऊंनी सन्मान केला.सासू-सुन हे नातं संघर्षाचे नव्हे तर अत्यंत जिव्हाळ्याचं,विकासाचं,प्रेमाचं नातं आहे हे जिजाऊंनी दाखवून दिले.जिजाऊंचा हा आदर्श आजच्या महिलांनी अंगिकारावा.
शिवाजी महाराज ज्यावेळेस आग्राकैदेत होते,तेंव्हा महाराष्ट्रातील इंचभर भूमी देखील मिर्जाराजा जयसिंगला जिंकता आली नाही.कारण त्यावेळेस स्वराज्याची सुत्रे जिजाऊमातांच्या हाती होती.म्हणजे जिजाऊंमातांची जरब कशाप्रकारे होती हे यावरून स्पष्ट होते.शहाजीराजांचा म्रुत्यू झाला त्याप्रसंगी जिजाऊ सती गेल्या नाहीत,म्हणजे जाधव-भोसले घराण्यात सतीप्रथा तर नव्हतीच पण जिजाऊमाता देखील सतीप्रथेच्या विरोधात होत्या.आज २१ व्या शतकात जिजाऊमातेच्या पुरोगामी विचारांची गरज आहे.शिवरायांना न्यायनिवाडा करण्याचे धडे जिजाऊमातेने दिले.गावागावांईल तंटे-बखेडे जिजाऊंनी मिटवले.
शिवरायांनी स्वराज्य स्थापनेचा निर्णय घेतला तेंव्हा ब्राह्मणांनी राज्याभिषेकाला विरोध केला.या प्रसंगी जिजाऊंची भुमिका अत्यंत महत्वाची आहे.जिजाऊ - शिवराय जर ग्रंथप्रामाण्य मानणारे असते तर त्यांनी राज्याभिषेकाचा निर्णय घेतला नसता.जिजाऊमाता बुद्धिप्रामाण्यवादी होत्या त्यामुळेच त्यांनी वैदिकांचा विरोध झुगारून राज्याभिषेक करण्याचा क्रांतिकारक निर्णय घेतला.आज अनेक कठीण प्रसंग येतात त्याप्रसंगी स्त्री-पुरुष हतबल होतात.असे प्रसंग जिजाऊंच्या जीवनात देखील आले होते पण जिजाऊ हतबल,निराश झाल्या नाहीत त्यांनी मोठ्या हिंमतीने संकटावर मात करून स्वराज्य निर्माण केले.जिजाऊंची हिम्मत आजच्या महिलांमध्ये यावी,हिच जिजाऊ चरणी प्रार्थना...
शिवश्री श्रीमंत कोकाटे,इतिहासतज्ञ 
संपर्क : ९४२३३३६४२८