इंद्रजित सावंत (इतिहास अभासक)
१७ जानेवारी २०११
शिवाजीराजांचं पुण्यातलं वास्तव्य कुठे होतं ?शनिवारवाड्याच्या पिछाडीला असलेल्या लालमहालात दादू कोंडदेवच्या पुतळ्याने वादग्रस्त झालेल्या या लालमहालात शिवाजीराजे राहीले होते ? तिथेच शाहीस्तेखानाची बोटं छाटली का ? ठाऊक नाही ?!
मग, "रामदास किंवा दादू कोंडदेव हे शिवाजी राजांचे गुरु होते", ही क्लुप्ती ब्राह्मणांची आहे. असं छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज राजर्षी शाहू महाराज इ.स. १९२० मध्येच एका सनदेत लिहुन ठेवलं असलं तरी दादू - रामदास शिवरायांचे गुरु होते असं सांगणं - लिहिणं मात्र काही थांबलेलं नाही. उलट,नव्या जोमाने दादू कोंडदेवाचं नसलेलं कर्तृत्व मांडण्याची चढाओढ लागली.
एवढंच नव्हे तर चित्र,शिल्पांच्या माध्यमातून ते शिवरायांचे पालक - गुरु होते हे असत्य जास्तच द्रुढ करण्याचा प्रयत्नही होत आहे. याचाच एक भाग म्हणुन लालमहालातील हे समुह शिल्प तयार झालं होतं.
पुण्यातील शिवरायांचा लालमहाल म्हणुन आज दाखवली जाणारी वास्तू ही अलीकडच्या काळात म्हणजे १९८८ मध्ये बांधण्यात आलेली इमारत आहे.शिवाजी महाराज राहात होते तो मुळचा लालमहाल आज अस्तित्वातच नाही.असं असलं तरी शिवरायांच्या लालमहालाविषयी अनेक संदर्भ आपल्याला इतिहासाच्या कागदपत्रातून मिळतात. यातील सर्वात विश्वसनीय पुरावा म्हणजे जेधे करीन्यात आलेला आहे.यात म्हंटलं आहे- "१५१५ शोभक्रुत संवछरी चैन शुध अष्टमी रविवारी लोकाची निवडी करून पुणियात राजश्री स्वामींनी खासा दाहा लोकानसी लाल महालात जाऊन शास्ताखानाकरवी छापा घातला बा कान्होजी ना यांचे पुत्र चांदजी जेधे होते मारामारी झाली.तेंव्हा शास्ताखानाचा हात तुटला.मग पळोन गेला.त्याचा लेक अबदुल फ़ते ठार झाला. त्याउपरी स्वामी परसातील दिंडीने बाहीर निघाले.तो सर्जाभाऊ जेधे घोडियावरी बैसोन पागेचा घोडा दुसरा खासदाराजवल देऊन दिंडी समीप आज्ञाप्रमाणे राहीले होते.राजश्री स्वामी येताच घोडियावरी बैसोन मुळा उतरोन जरेसाकडे निघाले.जागाजागा लस्कराच्या टोळ्या व करणे नगारे ठेविले होते.त्याची गुली मोगलाच्या लस्करात जाली.राजश्री स्वामी हशमाच्या व लष्कराच्या जमावानसी दुसरे दिवसी सिहगडास आले.शास्ताखान कुच करुन गेला."(या मजकुरात पुर्णविराम वाचण्याच्या सोयीसाठी दिले आहे,मुळ मजकुर मोडी लिपित आहे.त्यात स्वल्प-अर्ध-पुर्ण विराम नाही त्यामुळे संदर्भ देताना अडचणिचा मजकुर गाळला जातो. त्याचा दाखला पुढे आहेच)
करीन्यातील या उल्लेखावरून हा महाल पुण्यात मुळा नदिच्या जवळ होता व त्यास लालमहाल हे नाव शिवकाळात मिळालं होतं. हे समजुन येतं. यानंतरचा या महालाचा उल्लेख एका शकावलीत आला असून ही शकावलीतील नोंद पेशवे दफ़्तरातून निवडलेले कागद खंड २२ मध्ये लेख नं.२९२ वर छापलेली आहे.यावर या कगदाची तारीख २८-०६-१७३५ अशी दिली आहे. या नोंदीत म्हंटले आहे - "आश्याढ वद्ये ४ सुक्रवारी पंतप्रधान यांणी राजश्री सिवाजी राजे यांचा मालमहाल राजश्री दादाजी कोंडदेऊ याणी राजश्री शाहाजी राजे याचे कारकीर्दीस बांधला होता.त्यांचे भाऊ राजश्री संभाजी राजे सिवाजी राजे याचे भाऊ त्याचा महाल वेदमूर्ती राजश्री खंडभट शालेग्राम याच्या वाडियापावेतो होता. त्याचे जोते उतरामुख होते. ते उखळुन चिरे कारंजियापासी घर बांधले त्याजला जोतीयास नेले.राजश्रीच्या माहालावरही येक दोन घरे बांधोन अबदार वाडा करून ठेवावा. तुर्त एक दोन घरे बांधली, माहलात नेहमी घरे रहावयास होतील म्हणुन पंती लालमहाल बांधायची तजवीज केली.आठरापंधरा रोज झाले. जुना हौद कारंजियाचा पका आहे, त्यावरती पछेकेमडे दिवाणखाणा जुना होता तेथे घर बांधिले त्यास यांची साधत नाही त्या दिवाणखानियाची जुनी काहीवाही भिंताडे होती ते धोंडे काहडुन आपल्या वाडियाच्या सुताने दोरी धरून प्रांची साधून कारंजियाचा सुमार टाकून तुर्त येक घर कारंजियाच्या कोनासी दक्षणेकडल्या लाऊन (?) केले होता. मुळे हे कारंजे रद जाले असे.देसपांडियाच्या पछमेस खंडभटाने दक्षणेस जे जागा आहे ते आजी पंती उखळुन चिरे हाऊदाकडे नेऊन तुर्त घर बांधतात.त्याच्या जोतियास लाविले असेत.लालमाहलाचा वगैरे दोन यैस तीन आठ पंती गाडले होते ते उकरिले. पाणी लागले. म-हामती तोडाची केली असे.लालमाहालाची जमीन पछमेसहि काही गेली असावीसी आहे. तुर्त जोते काहडलियाने माहालचे हादेचे हिंदाने मोडले; परंतु ते जागा महालाची असे"
वरील उल्लेख हा महत्वाचा असून यातील माहीतीवरून हा महाल शहाजी महाराजांच्या कारकीर्दित दादू कोंडदेवनं बांधल्याचं नोंदवलं आहे.पण यामध्ये कुठेही दादु शिवरायांचा गुरु असं म्हंटलेलं नाही. त्यावरून इ.स.१७३५ पर्यंत तरी दादू हा शिवरायांचा गुरु होता, असा प्रवाद रुढ झाला नव्हता, हे स्पष्ट होतं.
एवढंच नाहीतर, या लालमहालासोबत शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ बंधू संभाजी महाराजांचा वाडाही या लालमहालाच्या शेजारी होता, हे समजुन येतं. हा संभाजी महाराजांचा वाडा व लालमहाल पंती म्हणजे पंतप्रधान उर्फ़ पेशव्यांनी पाडुन त्या बांधकामातील दगडाचे चिरे व जागा आपला वाडा बांधण्यासाठी वापरले होते.या लालमहालात कमीत कमी तीन पाण्याचे आड (विहिरी) होते.मोठा दिवाणखाना होता.पाण्याचे हौद व कारंजे होते, हेही वरील उल्लेखावरून स्पष्ट होतं.
म्हणजे शिवरायांचा मुळचा लालमहाल अलीकडचा लालमहाल दिसतो तेवढा लहान निश्चितच नव्हता.कारण इ.स.१६६१-६३ शायिस्तेखानाने जेंव्हा पुण्यात मुक्काम ठोकला होता, तेंव्हा त्याने आपलं निवासस्थान म्हणुन या शिवरायांच्याच वाड्याची निवड केली होती.ज्यावेळी शिवरायांनी शायिस्तेखानावर छापा टाकला, त्यावेळी मुघली इतिहासकार भिमसेना सक्सेना व ख्वाफ़ीखानाने केलेली वर्णने उपलब्ध आहेत. या वर्णनांवरूनही लालमहालाची भव्यता समजून येतं.
या वर्णानांवरून या वाड्याला मोठा नगारखाना होता.शिवाय या वाड्यात पाण्याचे हौद होते.भली मोठी बाग होती.या बागेला "राजबाग" असं म्हणत असत.या बागेच्या देखभालीचं काम महाराजांनी मोतमाळी दरवडा याला दिलं होतं. पुढे शायिस्तेखानावर छापा टाकला, त्यावेळी या माळ्यांनी शिवरायांना माहिती देऊन मदत केल्याचा उल्लेखही मिळुन येतो.
असा हा शिवरायांच्या महालाचा काही भाग जरी पेशव्यांनी पाडला असला तरी या भल्या मोठ्या महालाचा काही भाग इंग्रज आमदनीपर्यंत शिल्लक होता त्या भागास अंबरखाना म्हणुन ओळखलं जात असे.याची नोंद इ.स.१८८५ च्या बोम्बे प्रेसिडेंसी ग्याझेटीअरमध्ये आली आहे.(बोम्बे ग्याझेटीयर प्रेसिडेंसी व्होल्यूम १९ भाग ३ पुना)
असा हा शिवरायांचा भव्य लालमहाल पेशव्यांनी पाडल्यामुळे आज अस्तित्वात नाही. हा महाल शहाजी महाराजांनी बांधून घेतला व या महालात शिवाजी महाराज, जिजामाता, संभाजी महाराज, शहाजी महाराज यांचं वास्तव्य अनेक वर्षे झलं होतं.
लालमहाल नेमका कधी बांधला याचा उल्लेख अजुन पर्यंत उजेडात आलेला नाही. पण इ.स. १६४२ नंतर शिवराय जेंव्हा बंगरुळवरुन पुण्यास आले तेंव्हा त्यांचं वास्तव्य काही काळ म्हणजे इ.स.१६४९ पर्यंत तरी खेडमध्ये बांधलेल्या वाड्यात होतं. हे निश्चित. शिवाजी महाराज इ.स. १६४२ मध्ये पुणे जहागिरीवर आले तेंव्हा पहिल्यांदा ते खेड मध्ये आले. तेथे त्यांच्यासाठी एक वाडा बांधण्यात आला पुढे हा वाडा बांधण्यासाठी काही लोकांची घरे पाडण्यात आली. त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी खेडजवळच एक पेठ बसविण्यात आली. या पेठेला शिवापुर असं नाव देण्यात आलं. या गावाजवळच कामथाडी इथे जिजाऊंची शेती होती.या शेतीसाठी शिवगंगानदीवर दगडाचे बांधही घालण्यात आले होते. ते आजही पहावयास मिळतात. पण शिवरायांचा वाडा खेडमध्ये नेमका कुठे होता याचा शोध घेणं बाकी आहे.
१६४९ नंतर जिजामाता व शिवाजी महाराज पुण्यात रहावयास आले.त्यावेळी काही काळ ते पुण्यातील झांबरे पाटलांच्या वाड्यात राहीले होते.(पुढे याच झांबरे पाटलांकडुन जागा विकत घेऊन त्या जागेवर ललमहाल बांधला.) म्हणजे तोपर्यंत तरी लालमहाल व संभाजी महाराजांचा महाल बांधुन पुर्ण झाला नव्हता, हे समजुन येतं. पुढे लालमहाल बांधुन पुर्ण झाल्यावर शिवराय व जिजामाता या महालात राहावयास आल्या.
शिवरायांच्या वास्तव्याची इतकी सविस्तर माहीती देण्याचं कारण; आज ज्या लालमहालातील दादू कोंडदेवच्या पुतळ्याचा विषय पुण्यातील काही संशोधक व त्यांचे पाठीराखे धरत आहेत.त्यांना हे माहीत व्हावं की ज्यावेळी शिवराय लालमहालात राहावयास आले, त्याच्या खुपच अगोदर म्हणजे दोन-तीन वर्षापुर्वी दादू कोंडदेवाचा म्रुत्यु झाला होता.अशा व्यक्तीचा पुतळा त्या ठिकाणी बसवावा म्हणुन आग्रह धरणे, हे कोणत्याही तर्कशास्त्रात बसत नाही.त्यामुळे लालमहालातील बाल शिवबा, जिजामाता आणि दादू कोंडदेवाचं समुह शिल्प हे इतिहासाच्या अडाणीपणातून उभं राहिलं हे सिद्ध होतं.