आजपर्यत शिवरायांची प्रतिमा मुस्लिम विरोधी आणि शिवरायांचा कालखंड हिंदू - मुस्लिम संघर्षाचा कालखंड म्हणुन सांगितला गेला. पण हा चुकीचा प्रचार आहे. छत्रपती शिवरायांचा कालखंड हा हिंदू-मुस्लिम धार्मिक संघर्षाचा कालखंड नव्हता तर राजकीय सत्तासंघर्षाचा कालखंड होता. जर छत्रपती शिवरायांचा कालखंड हा हिंदू - मुस्लिम असा असता तर सर्व हिंदू एका बाजूला आणि सर्व मुस्लिम एका बाजूला दिसले असते मात्र तसे इतिहासात अजिबात दिसत नाही. बरेच मुस्लिम शिवरायांच्या सैन्यात होते तर बरेच हिंदू लोकं मुस्लिम राज्यकर्त्यांच्या सैन्यात होते. दुसरे असे की शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेपुर्वी महाराष्ट्रात आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, इमादशाही व बरीदशाही ही पाच मुस्लिम राज्ये एकमेकांविरुद्ध लढत होती. याचा सरळ अर्थ असा की शिवकाळातील संघर्ष हा सत्तासंघंर्ष होता.
छ.शिवरायांचे मुस्लिम सैन्य
छ.शिवरायांच्या सैन्यामध्ये अनेक मुस्लिम सरदार, वतनदार व इतर चाकर होते आणि ते अगदी मोठमोठ्या हुद्द्यांवर जबाबदारीच्या जागांवर होते. शिवरायांच्या तोफ़खान्याचा प्रमुख इब्राहिमखान नावाचा एक मुस्लिम होता. तोफ़खाना म्हणजे लष्कराचे एक प्रमुख अंग. कदाचित सर्वात महत्वाचे. अशा महत्वाच्या तोफ़खान्याचा प्रमुख मुस्लिम होता.छत्रपती शिवरायांच्या दुरद्रुष्टीचं उदाहरण म्हणून सांगितल्या जाणार्या आरमार विभागाचा प्रमुखसुद्धा एक मुस्लिम सरदारच होता. त्याचे नाव दर्यासारंग दौलतखान. शिवरायांच्या खास अंगरक्षकांत व खाजगी नोकरांत अत्यंत विश्वासू म्हणून मदारी मेहतर यांचा समावेश होता. आग्र्याहुन सुटकेच्या प्रसंगात या विश्वासू मुस्लिम साथीदाराने काय म्हणून साथ दिली ? शिवराय मुस्लिमद्वेष्टे असते तर असे घडले असते का ?
शिवरायांच्या पदरी अनेक मुसलमान चाकर होते. त्यात काजी हैदर हा एक होता. सालेरीच्या लढाईनंतर औरंगजेबाच्या दक्षिणेतील अधिकार्यांनी शिवाजीनं सख्य जोडावे म्हणून एक हिंदू ब्राह्मण वकील पाठवला. तेंव्हा शिवाजीनं उलट काजी हैदर यास मोघलांकडे पाठवलं. म्हणजे मुसलमानांचा वकील हिंदू आणि हिंदूंचा वकील मुस्लिम. त्या काळातील समाजाची फ़ाळणी हिंदू विरुद्ध मुस्लिम अशी असती तर असे घडले नसते. सिद्धी हिलाल हा असाच आणखी एक मुस्लिम सरदार शिवरायांच्या पदरी होता. १६६० मध्ये रुस्तुमजमा व फ़ाजलखान यांचा शिवरायांनी रायबागेजवळ पराभव केला. त्या वेळी सिद्धी हिलाल शिवरायांच्या बाजुने लढला त्याप्रमाणेच १६६० मध्ये सिद्धी जौहरने पन्हाळगडास वेढा दिला होता तेंव्हा नेताजी पालकरनं त्यांच्या सैन्यावर छापा घालून वेढा उठवण्याचा प्रयत्न केला त्या वेळीसुद्धा हिलाल व त्याचा पुत्र वाहवाह हे नेताजीबरोबर होते. या चकमकीत सिद्धी हिलालचा पुत्र वाहवाह जखमी व कैदी झाला होता. शिवरायांच्या बाजूने मुस्लिम सिद्धी हिलाल आपल्या पुत्रासह मुस्लिमांच्या विरोधात लढता.
त्या लढ्यांचे स्वरुप निव्वळ हिंदू विरुद्ध मुस्लिम असे असते तर असे घडले असते का ? सभासद बखरीत प्रुष्ठ क्र. ७६ वर शिवरायांच्या अशा एका शामाखान नावाच्या मुस्लिम शिलेदाराचा उल्लेख आहे. मराठ्यांच्या इतिहासाची साधने या ग्रंथाच्या खंड १७ मधील प्रुष्ठ क्र.१७ वर नूरखान बेग याचा "शिवाजीचा सरनोबत" म्हणून उल्लेख आहे.हे सरदार एकटे नव्हते हे स्पष्टच आहे. त्यांच्या हाताखालील मुस्लिम शिपायांसह ते शिवरायांच्या चाकरीत होते.
या सर्वांहून एक महत्वाचा अस्सल पुरावा आहे. त्यावरून मुस्लिम धर्मिय शिपायांबद्दलचे शिवरायांचे धोरण स्पष्ट होते. सन १६४८ च्या सुमारास विजापुरच्या लष्करातले सातशे पठाण शिवरायांकडे नोकरीस आले.तेंव्हा गोमाजी नाईक पानसंबळ याने त्यांना सल्ला दिला, तो शिवरायांनी मान्य केला व तेच धोरण ठेवले. नाईक म्हणाले," तुमचा लौकिक ऐकून हे लोक आले आहेत त्यांस विन्मुख जाऊ देणे योग्य नाही. हिंदुंचाच संग्रह करू, इतरांची दरकार ठेवणार नाही अशी कल्पना धरीली तर राज्य प्राप्त होणार नाही, ज्यास राज्य कारणे त्याने अठरा जाती, चारी वर्ण यांस आपापले धर्माप्रमाणे चालवून त्यांचा संग्रह करून ठेवावे." ग्रॅंट डफ़ने सुद्धा त्याच्या शिवरायांवरील चरित्र ग्रंथात प्रुष्ठ १२९ वर गोमाजी नायकाच्या सल्याचा उल्लेख करून म्हंटले आहे की, "यानंतर शिवाजीने आपल्या सैन्यात मुसलमानांनासुद्धा सामावून घेतले आणि त्यांच्या स्थापनेत याचा फ़ार मोठा उपयोग झाला."
शिवरायांचे सरदार व सैन्य हे फ़क्त हिंदू धर्माचे नव्हते. त्यात मुस्लिम धर्मियांचासुद्धा भरणा होता. हे यावरून स्पष्ट व्हावे. शिवराय हे मुस्लिम धर्म नाहीसा करण्याचे कार्य करीत असते तर हे मुस्लिम शिवरायांच्या पदरी राहिले नसते. शिवराय राज्यकर्त्यांचे जुलमी राज्य नाहीसे करायला निघाला होता. धर्माचा प्रश्न मुख्य नव्हता, राज्याचा प्रश्न मुख्य़ होता. धर्म मुख्य़ नव्हता, राज्य मुख्य होते. धर्मनिष्ठा मुख्य नव्हती, राज्यनिष्ठा व स्वामिनिष्ठा मुख्य होती.
मुस्लिम राज्यकर्त्यांच्या पदरी हिंदू सैन्य
ज्याप्रमाणे शिवरायांच्या पदरी मुस्लिम सरदार व सैन्य होतं त्याचप्रमाणे मुस्लिम राजांच्या-शहनशहांच्या - पदरी अगणित हिंदू सरदार होते. त्यांची यादी खुपच मोठी आहे. खुद्द शिवरायांचे वडील विजापूरच्या मुस्लिम आदिलशहाच्या पदरी मोठे सरदार होते. शहाजी महाराजांचे सासरे लखुजी जाधव निजामशाहीचे महाराष्ट्रातील एक मनसबदार होते. जावळीचे मोरे, फ़लटणचे निंबाळकर, सावंतवाडीचे खेमसावंत, श्रुंगारपुरचे सुर्यराव श्रुंगारपुरे हे सर्वजण आदिलशाहीचे मनसबदार होते.
ज्याच्या सैन्यसामर्थ्यापुढे शिवरायांना माघार घ्यावी लागली होती व नामुष्कीचा तह करून आग्र्यास जाऊन संभाजीराजेंसह कैद होऊन पडावं लागलं, तो उत्तरेचा मातब्बर सरदार मिर्झाराजे जयसिंग तर अस्सल रजपूत हिंदूच होता आणि मुस्लिम शहेनशहाच्या पदरी मानाची असेल पण चाकरीच करत होता. मिर्झाराजे जयसिंग शिवरायांवर चाल करून आला तेंव्हा त्याच्या सैन्यात अनेक हिंदू सरदार होते, जाट होते, मराठा होते, रजपूत होते. राजा रायसिंग सिसोदिया, सुजनसिंग बुंदेला, हरीभान गौर, उदयभान गौर, शेरसिंग राठोड, चतुर्भुज चौहान, मित्रसेन, इंद्रभान बुंदेला, बाजी चंद्रराव, गोविंदराव इत्यादि..
कोंडाणा किल्ला हस्तगत करताना तानाजी मालुसरे वीरमरण पावले आणि कोंडाण्याचा सिंहगड झाला.त्या लढाईतील कोंडाण्याचा किल्लेदार उदयभानू हा एक हिंदू रजपूतच होता आणि तो मुसलमान राजाचा किल्लेदार होता. अकबराच्या पदरी पाचशेहून आधिक मनसब असणारे जेवढे सरदार होते त्यात हिंदू सरदारांचे प्रमाण २२.५ टक्के होते. शहाजहानच्या राज्यात हे प्रमाण २२.४ टक्के होते. अगदी सर्व मुस्लिम राज्यकर्त्यांत अगदी कडवा म्हणून समजला जातो त्या औरंगजेबाच्या पदरी सुरुवातीला हिंदू मनसबदारांचे हे प्रमाण २१.६ टक्के होते. ते पुढे वाढले व ३१.६ टक्के झाले.
औरंगजेबानेच राजा जसवंतसिंग या हिंदू रजपूतला दक्षिणेचा सुभेदार नेमले होते. याच औरंगजेबाचा पहिला प्रधान रघुनाथदास नावाचा हिंदू होता. तो स्वत: रजपूत असून रजपुतांविरुद्ध लढला. पानिपतच्या लढाईत पेशव्यांच्या तोफ़खाण्याचा प्रमुख इब्राहिमखाण गारदी मुस्लिम होता. जे हिंदू मुस्लिम राज्याच्या पदरी चाकरी करत होते आणि इमान राखून प्रसंगी हिंदूविरुद्ध सुद्धा लढत होते त्यांना त्या काळी कुणी "धर्मबुडवे, किंवा धर्मद्वेष्टे किंवा मुस्लिमधार्जिणे" म्हणत नव्हते. धर्मनिष्ठेपेक्षा स्वामिनिष्ठेला जास्त मान्यता होती.
भारतात धर्मामुळे व धर्मासाठी लढाया होत नव्हत्या, लढायांचे मुख्य कारण राज्य मिळवणे, राज्य बळकावणे वा टिकवणे हे होते. हे करायला उपयोगी ठरेल तेवढ्यापुरता धर्माचा वापर केला जाई पण ती मुख्य बाब नव्हती. शिवाजी महाराजांच्या पदरी मुस्लिम सरदार होते व मुस्लिम राजांच्या पदरी हिंदू सरदार हे जसे खरे आहे तसेच त्या काळात कोण कोणाविरुद्ध लढला ह्याची पाहणी केली तर त्या लढाया केवळ हिंदू विरुद्ध मुसलमान अशा झाल्या असे दिसत नाही. त्यामुळेच शिवकाळातील संघर्ष हा राजकीय संघर्ष होता धार्मिक संघर्ष नव्हे.
संदर्भ :
मराठ्यांच्या इतिहासाची साधने,खंड १७ प्रुष्ठ क्र.१७-[वि.का.राजवाडे].
शककर्ता शिवाजी (प्रुष्ठ क्र.४०-४१)-[गो.स.सरदेसाई].
शिवाजी कोण होता ? [कॉ.गोविंद पानसरे]
शिवाजी कोण होता ? [कॉ.गोविंद पानसरे]
मराठ्यांचा इतिहास (खंड १,प्रुष्ठ क्र.१२९)-[ग्रॅंट डफ़]
श्री.शिवछत्रपती [त्र्यं.शं.शेजवलकर].
शिवचरित्र - मिथक आणि वास्तव [श्यामसुंदर मिरजकर].