संशोधनापुढे ध्येय
तुकोबारायांची "ब्रह्मरुप काया" ऐन उमेदीत नाहिशी झाल्याने त्यांच्या परीवाराचे,देशाचे आणि धर्माचे देखील अपरिमित नुकसान झाले. हे खरे असले तरी ती काया नाहीशी कशी झाली याचे गुढ आता उकलून काही खास लाभ होण्याचा संभव आहे का ? अजिबात नाही आणि या संशोधनाचा उद्देश तो असूच नये.पण त्यांच्या देहाबरोबर त्यांचे श्रेष्ठ तत्वज्ञानच लोपवून टाकण्याचा जो प्रयत्न ’सदेह वैकुंठगमना’ची कल्पना पसरवणार्यांनी कळत-नकळत केला.तो हाणून पाडणे हेच काय ते प्रयोजन असले पाहिजे. "पावलो पंढरी वैकुंठभवन"(३८९९) म्हणणार्या तुकोबांना कुठल्या दुरस्थ वैकुंठी जायचे होते की हे विश्वच वैकुंठरुप करायचे होते ? हे जरी स्पष्ट झाले तर मानव समाजाला ते हितावह ठरणार हे सांगायलाच नको.तुकोबांना वैकुंठातून भुमीवर आणणे हे लोकाद्धारासाठीच उपयुक्त आहे.नाहीतर कुठले तरी वैकुंठ हेच भाविकांचे ध्येय ठरून, आकाशाकडे पाहत त्यांची भुमीवर अस्ताव्यस्त पावले पडणे व "परलोका"च्या ठेकेदारांना त्याची मनसोक्त लुट करता येणे चालूच राहणार हे लक्षात घेता, हे संशोधन म्हणजे गडे मुर्दे उकरणे नव्हे तर "खरे नानवट निक्षेपीचे जुने । काढले ठेवणे समर्थांचे" (८८३) याची जाणीव ज्ञात्यांना झाल्याखेरीज राहणार नाही.
संतशिरोमणी तुकोबा आणि इतर संत महात्म्य..
आज श्री ज्ञानराजांचे समाधीजीवन व तुकोबारायांचे सदेह वैकुंठगमन असे या महापुरुषांचे लोकोत्तरत्व दर्शविणारे वेगळे कार्य सदभक्तांद्वारे अहमहमिकतेने प्रचारिले जाते. त्याब बाबत कोणी शब्द काढला तरी तो द्वेषी वा तिरस्कारणीय नास्तिक ठरतो. याबाबत खरा विचार करायला हवा की खरेच का असली बाब हीच त्या महापुरुषांचे सर्वश्रेष्ठत्व दर्शवणारी आहे ? त्यांच्या संतत्वाची गमक काय ? आद्यशंकराचार्यापासून तर समर्थ रामदासांपर्यंत एकालाही- श्री ज्ञानराजाला सुद्धा-सदेह वैकुंठी सुयोग लाभला नाही, म्हणून त्या सर्वांच्याच संतत्वाचा दर्जा तुकोबारायांपेक्षा कमी असे लेखण्याचे मनोधैर्य आपल्यात आहे काय ? समाधीजीवन, पुनर्जीवन किंवा सदेहवैकुंठगमन हेच आपले खरे पुर्णत्व किंवा हेच मानवजीवणाचे परमलक्ष्य होय. असे तरी त्या महात्म्यांनी स्वत: कोठे सांगून ठेवले आहे काय ? तसे जर नाही तर या गोष्टीला इकडे पराकोटीचे महत्व देण्याला तरी काय अर्थ आहे ?
वैकुंठगमनालाच खराखुरा अर्थ आहे असे जर प्रामाणिकपणे वाटत असेल तर त्याचा पुरेपूर छडा लावणे हे तरी प्रत्येक जाणत्या भक्ताला अत्यावश्यक का वाटू नये ? निव्वळ ’पीछेसे आयी आगे धकाय” अशी मुर्दांड श्रद्धा जपून ठेवण्याला काही किम्मत आहे का ? "वंदिले वंदावे निंदिले निंदावे" अशी "न धरावी चाली करावा विचार" हीच तुकोबांरायांची शिकवण आहे आणि याच शिकवणीनुसार त्यांच्या "सदेह वैकुंठगमना" च्या अथाशक्य सर्व पैलूंवर त्यांच्याच वाणीचा विवेकपुर्ण प्रकाश पाडताना अनेक प्रश्न-शंका उभे ठाकतात, "ज्या महापुरुषाचा इहलोकी अभंगरचना करण्याचा देखील अधिकार तीव्रपणे नाकारण्यात आला, त्या महापुरुषाला एकट्यालाच सदेह वैकुंठगमनाचा सर्वाच्च अधिकार मात्र खुशाल बहाल केला जातो यातील मख्खी काय कळत नाही. शिवाय, ज्या कुटुंबातील प्रमुख देवपुरुष ’सकळा पुसून’ देवासह सदेह वैकुंठी जाण्याचे अभूतपुर्व कार्य करून दाखवितो, त्या कुटुंबाला त्या भाग्यशाली घटानेनंतर महिन्याभरातच सर्वस्व टाकून त्या पावन पित्रुभुमीतून पळून जावे लागते याचा अर्थ काय ? इत्यादी शंकांच्या संदर्भातही अथाशक्य समग्र विचार करणे प्रत्येक तुकोबांच्या सदभक्तांचे कर्तव्य आहे."
तुकोबांच्या हत्येची शक्यता ?
यापुर्वीचे बरेच विचारवंत आणि आजच्या सामाजिक संघटनांच्या मते तुकोबांची हत्या झाली असावी. याचे मुख्य कारण त्यांचे क्रांतिकारक तत्वज्ञान. कर्मकांडांच्या बडिवारापेक्षा भक्तीचे श्रेष्ठत्व ते सांगत होते. वर्णश्रेष्ठत्वापेक्षा सदचाराचा महिमा ते गात होते."वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा । येरांनी वाहावा भार माथा" असे गर्जत "भेदाभेद अमंगळ" म्हणून इंद्रायणीच्या वाळवंटात तुकोबांनी समतेचा झेंडा रोवला होता. त्यामुळे प्रतिष्ठितांच्या प्रतिष्ठेवर आघात होत होते. त्यांच्या प्रस्थापित वर्णवर्चस्वाला होणार्या खंद्या विरोधामुळे मंबाजी सारखे अहंकारी भट मत्सराने जळू लागले होते. याचा पहिला प्रत्यय तुकोबांना आला तो त्यांना आपल्या अभंगाच्या वह्या इंद्रायणीत बुडवायला सांगण्यात आले तेंव्हा.वर्णवर्चस्वाच्या स्वार्थापलीकडे कुठलाही शास्त्रार्थ यामागे नव्हता.
या प्रसंगानंतर कालांतराने तुकोबांना आपल्यावरील प्राणांतिक संकटाची कल्पना आली."लावुनी कोलीत माझा करतील घात" ह्या अशा अनेक उद्गारावरून हे स्पष्ट होईल.त्याप्रमाणेच शेवटी झाले. सालो-मालो, मंबाजी यासारखे दुर्जन भट तुकोबांच्या विरोधात जळफ़ळत होते.त्यांनीच तुकोबांच्या खुनाचा डाव रचला आणि सिद्धिसही नेला. तुकोबांच्या त्या अंत्यकालीन संकटाची जाणीव संत बहिनाबाईंच्या अभंगाद्वारे होते. संत बहिनाबाईंनी पाहिलेला मंबाजी "मारु पाहे घात चिंतुनीया" असे स्पष्ट वर्णन केले आहे.
तुकोबांचा खुन झाला असावा असे आत्तापर्यंत अनेकांनी म्हंटलेले आहे. श्री दयानंद पोतदार यांच्या "संत तुकाराम आणि त्यांच्यावरील आक्षेप" या पुस्तकाला लिहिलेल्या प्रस्तावनेत त्यांनी म्हंटले आहे की तेंव्हा तुकोबांचा कोणीतरी गुप्तपणे वध केला असावा आणि खर्या गोष्टीच तपास लावण्याकडे कोणाची मती वळू नये म्हणुन प्रारंबी यात्रेची, नंतर जलसमाधीची व त्यानंतर सदेह वैकुंठगमनाची अशा एकेक कंड्या वातावरणात सोडून दिल्या असाव्यात असा तर्क संभवणीय वाटतो."
दुसरा पुरावा असा की तुकोबांचा नैसर्गिक म्रुत्यू आला असता किंवा ते खरोखरच सदेह वैकुंठाला गेले असते तर त्यांचे बंधू कान्होबा यांना "दु:खे दुभागले ह्रुदयसंपुष्ट" इतका शोक करण्याचे काय कारण होते ? वस्तुस्थिती अशी दिसते की तुकोबांच्या अंतानंतर त्यांचे सगळे कुटुंबच देशोधडीला लागले.पुढे अनेक वर्षापर्यंत तुकोबांचा एकही वंशज देहूला नव्हता.याचे कारण काय असावे ? ह्या सर्व गोष्टी विचारवंतांनी प्रतिपादन केलेल्या प्रमेयाला पुष्टीच देतात.
(क्रमश:)
(क्रमश:)