संतश्रेष्ठ तुकोबाराया
साने गुरुजींनी त्यांच्या स्वप्न आणि सत्य ग्रंथामध्ये प्रुष्ट क्र.११२ वर म्हंटले आहे "ग्यानबातुकाराम हे महाराष्ट्राचे ह्रुदयसम्राट आहेत. त्यांचे साहित्य हे खरे राष्ट्रीय साहित्य आहे,कारण ते सर्व थराथरात गेले." संत तुकोबांच्या गाथेमध्ये अखिल विश्वाच्या कल्याणाचे तत्वज्ञान एकवटलेले आहे. प्रा.न.र.फ़ाटक म्हणतात "तुकोबांच्या वाणीत जे तेज व सत्व आहे त्याची घट्ट ओळख असणार्यांनी ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ यांची ओळख करून नाही घेतली तरी चालेल. तुकोबांच्या लिखानात या सर्वांच्या शिकवणुकीचे रहस्य सापडेल; अशा योग्य उद्देशाने भागवतधर्ममंदिराचा कळस म्हणण्याची प्रथा पडली." अशा या परमोज्ज्वल कळसा बाबत जनाजनाच्या मनामनात प्रगाढ श्रद्धा आहे.पण त्यातही वारकर्यांच्या आवडीचे स्वरूप काही निराळे आहे.
जीव जीती जीवनासंगे । मत्स्या मरण त्या वियोगे ॥
सकळा पढीये भानु । परि त्या कमळाचे जीवनु ॥
या प्रमाणे इतरांच्या द्रुष्टीने महान असणारे तुकोबाराय वारकर्यांचे तर जीवनच आहेत.
संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या निर्वाणासंबंधी आजपर्यंत अनेकांनी चर्चा केली आहे."महाराष्ट्र सारस्वत"कार भावे यांच्या पासून ते आत्तापर्यंतचे साहित्यिक यात आहेत. श्री वा.सी.बेंद्रे यांसारखे संशोधकही यामध्ये आहेत. यांच्या मालिकेत आजच्या सामाजिक संघटनांचा देखील समावेश करावा लागेल. संत तुकारामांचा खुनच केला असावा असे स्पष्टपणे प्रतिपादन करणारेही बरेच होऊन गेले. इतकेच काय पण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनीही "मेला की मारला कळेना । म्हणती वैकुंठाला गेला ।" या आपल्या उद्गारात याच प्रमेयाकडे संकेत केला आहे.
निर्वाण अभंग आणि अभंगपत्रे
संतश्रेष्ठ तुकोबांच्या निर्वानाचा प्रश्न त्यांच्याच अभंगाच्या द्वारे सर्वांनी सोडविण्याचा प्रयत्न केला आहे.मग त्यात मत-मतांतरे का निर्माण व्हावीत ? यातील एक महत्वाची गोष्ट अशी की, संतांच्या आज ज्या गाथा आढळतात त्यात त्यांनी हे लिहिलेले अभंग कालानुक्रमाने दिलेले असतात असे मुळीच नाही. संत तुकारामांच्या अभंगातही असेच झालेले आहे. आपल्या आयुष्यात अभंगरचना करताना कदाचित स्वत: तुकाराम महाराजांनी किंवा त्यांच्या लेखनिकांनी ते क्रमश: लिहुन ठेवलेलेही असतील. पण आज कालानुक्रमाने लिहिलेल्या अशा अभंगाचा अस्सल गाथा उपलब्ध नाही. आहे त्या अभंगाची विषयावार विभागणी करून ते छापलेले आहेत. उपलब्ध गाथ्यात सर्वत्र ही विषयविभागणी आणि त्यात अंतर्भूत केलेल्या अभंगाची संख्या ही सारखी आढळते अशी नाही. अशा विषयविभागणीच्या प्रयत्नातूनच तुकाराम महाराजांच्या अंत्यकाळा विषयीच्या अभंगाचे प्रकरण निर्माण झाले आहे.
निरनिराळ्या गाथ्यात आढळणार्या अशा निर्वाण प्रकरणातील अभंगाची तर्ककठोर बुद्धीने छाननी केली तर समजुन येईल की हे निर्वाणाचे अभंग केवळ संकलनात्मक आहेत. प्रत्येक संपादकाने वेगवेगळ्या अभंगसंचातून आपल्याला सोईचे वाटतील असे किंवा ओढून ताणून उपयोगी आणता येतील असे असंबद्ध विषयींचे अभंग आपापल्या संपादणीतील निर्वाण प्रकरणात संकलीत केले आहेत. इतकेच नाही तर तुकोबांच्या निर्वाणासंबंधी आपल्या मताच्या पुष्ट्यर्थ काही प्रक्षिप्त अभंगही त्यात घातले गेले आहेत. या संकलनाबाबत एक दोन उदाहरणे पुरेशी आहेत.
१] "क्र.१५९६ या अभंगात गरुडावर बसून चतुर्भुज हरी वैकुंठाहुन तुकोबांच्या घरी येतात. क्र.१६०६ मध्ये श्रीरंगाशेजारी गरुडावर बसण्याऐवजी तुकोबा एकदम कुडीसहीत गुप्त होतात...गुप्त झाल्यानंतरही अभंग सुरुच असतात. क्र.१६०७ मध्ये तर आत्तापर्यंतच गरूड विमानात परिवर्तीत होतो आणी तुका बैसला विमानी हे द्रुष्य़ संत लोचनी पाहू शकतात. याच अभंगाच्या शेवटी तुका वैकुंठासी नेला तरी देखील १६०८ हा अभंग जन्मास येतोच.त्यात तर तुकोबा ’क्षीरसागर शयनी’ पोहचून सिंहासनी बसले आहेत.तो अभंग इहलोकी कसा म्हंटला गेला ? आणि क्षीरसागरी पोहचल्यानंतर वाराणसीपर्यंत असो सुखरूप (क्र.१६०९) असा काशीला पोहचल्याचा निरोप कसा काय आला ? या शेवटच्या अभंगात आपण येथून निजधामास जाणार असे तुकोबा म्हणतात. येथे तुकोबांबरोबर देव नाही पण गरूड मात्र आहे ! अशी ही सारी विसंगतीची चमत्क्रुती !"
२] "चार कोसांवर विमान थांबवून जर हे अभंग लिहिले तर ’सकळही माझी बोळवण करा’ हे म्हणजे भुमीवरचे की आकाशातले ? ’उठा एक ऐका सांगतो तुम्हासी’..अशी सहा ओळीत तीनदा सांगण्याची पुनुराव्रुत्ती व्हावी,हे तुकोबांना सर्वथा अमान्य असणार्या रचनाशैथिल्याची कल्पना आणुन देण्यास पुरेसे नाही का ? स्वपत्नीसाठी येतो काकुलती मनी धरा म्हणून ’पदर पसरून दाढी ओठी’ धरून केविलवाणीने लोकांची मनधरणी करावी. देवासह वैकुंठी जाण्याचे अपुर्व भाग्य लाभले असताही ’अहो देवा ! कैसी घरबुडवण केली’ म्हणून आकांत करावा आणि ’देवांचे ते मुळ शोधू नये कोणी’ असा भलताच उपदेश करावा हे सारे तुकोबांच्या व्यक्तित्वाशी सुसंगत असेच आहे का ? ’म्हणे मज आता निरोप द्यावा- ऐसे बोलो निया गुप्त झाले’ ही सारी रचना तुकोबांचीच आहे असे म्हणता येईल का ?..."
श्री तुकोबा महाराज विमानात बसुन सदेह वैकुंठाला गेले असे मानणार्या प्राचीनांनीच त्यांची ’विमानातून लिहिलेई अभंगरुप पत्रे’ निर्माण केली आहेत. असे का म्हणू नये ? ’चौकोशावरी थांबवली विमाने । पत्र हे तेथून तुम्हा लिहिले’ व ’स्वर्गलोकीहुनि आले हे अभंग’ या वचनांमधील ’तेथून’ व ’आले’ हे शब्द स्पष्टच सुचवितात की ते शब्द प्रुथ्वीवरील व्यक्तीच उच्चारू शकते. शिवाय ’चौकशा’वर ’स्वर्गलोक’ असू शकत नाही. ’सप्त अभंगी पत्र’ व ’बारा अभंगी पत्र’ या दोन्ही बरोबर ’टाळगोधडी’ चा उल्लेख आहेच. तेंव्हा, तुकोबांबरोबर ’टाळगोधड्या तरी किती कल्पाव्या ? "तुकोबांचे निर्वाण झाले द्वितीयेस तर टाळगोधडी मिळाली पंचमीस ! हे साहित्य नेमके देहुलाच पडले" हे वास्तवतेच्या पलिकडचे नव्हे काय ? अशा भाकडकथा सांगणारे अभंग प्रक्षिप्त नव्हे तर काय म्हणावे ?.
शुद्ध संशोधनासाठी
देवधर्म आणि अंधश्रद्धा यांमध्ये बुडालेले कोणी भक्त म्हणतील की लोकमाणसात वैकुंठगमनाची दिव्य कल्पना शेकडो वर्ष द्रुढमुल झाली असता आता हे नव्याने मांडून कोणते कल्याण होणार आहे ? "जाले तेंव्हा जाले मागील ते मागे । आता वर्म लागे ठावी झाली ॥" हे सत्य असले तरी गडे मुर्दे उकरून लाभ काय ? हा प्रश्न बराच महत्वाचा आहे..खरे तर कोणत्याही बाबतीतले सत्यदर्शन हे निरपेक्षपणे स्वत:च अत्यंत मुल्यवान असते हे खरे. असत्यावर आधारलेली कल्पना दिव्य असली तरी ती कांचनम्रुगाप्रमाणे फ़सवी असते. ’जगरुढीसाठी घातले दुका असे ’पोटदंभाचे पसार’ मांडणारे धर्माचे घाऊक व्यापारी ’चालीचाचि वाहो’ कायम ठेऊन आपल्या ग्राहकांच्या भ्रांत भावनांची खुशाल जपणूक करोत, पण संत मात्र तो मुलामा उडवून लावणेच हितावह समजतात. कारण भ्रामक कल्पनांनी कोणाचा कधीच उद्धार होत नसतो. उलट असत्याभिमान व डोळे बांधलेली श्रद्धा यांच्या पोटी शेकडॊ पापेच जन्मास येतात.
"तुका म्हणे लोपे । सत्याचिया घडती पापे " हे कसे विसरता येईल ? म्हणूनच तुकोबाराया निक्षून सांगतात-
"अहो श्रोतेवक्ते । सकळही जन ! बरे पारखून बांधा गाठी ॥
तुके तरी तुकी खर्याचे उत्तम । मुलामांचा भ्रम कोठवरी ?"
भक्तांच्या भावना दुखावतील एवढ्यासाठी सत्य दडपून टाकायचे हा धर्म आहे का ? "लटिके ते रुचे । सत्य कोणाही ना पचे ॥" म्हणून असत्यच घोपटायचे की काय ? "धर्म आहे वर्माअंगी" याची वारंवार जाणीव करून देणार्या तुकोबांनी स्वष्ट केले आहे की कोणाच्या भिडेसाठी अथवा भावनेसाठी सत्य डावलता कामा नये.’नये भिडा सांगो आन’ व ’काकुळतीसाठी सत्याचा विसर । पडले अंतर न पाहिजे॥. ’त्यामुळे इथे कोरड्या कल्पना जुगारून यथार्तवादच स्विकारायला हवा.
(क्रमश:)