कुळवाडीभूषण विश्ववंद्यछत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा कधी हिंदू धर्मरक्षक, कधी महाराष्ट्र रक्षक,कधी मराठी भाषा रक्षक,कधी सांस्क्रुतीक रक्षक तर कधी मुस्लिम विरोधक अशा प्रकारे उभी करण्यात आली.पण शिवरायांच्या चरित्रासंबंधी ऐतिहासिक तथ्यांचा अभ्यास केला असता शिवरायांच्या वरील प्रतिमा अनैतिहासिक आणि शिवरायांना संकुचित ठरविणार्या आहेत,हे स्पष्ट होते.
शिवरायांना संस्क्रुतीचा जरूर अभिमान होता. पण कोणत्या संस्क्रुतीचा ? तर सिंधु संस्क्रुतीचा,परंपरेचा म्हणून महात्मा फ़ुले त्यांचे वर्णन "कुळवाडीभूषण" शिवराय असे करतात.कुळवाडीभूषण म्हणजे अठरापगड बारा बलुतेदार यांचा राजा,शेतकर्यांचा,रयतेचा राजा.सांस्क्रुतीक धोरणांमध्ये महत्वाचा भाग म्हणजे भाषा! शिवरायांना मराठीचा अभिमान होता याबाबत कोणाचे दुमत असण्याचे कारण नाही.पण मराठीबद्द्ल आंधळा अभिमान त्यांच्याकडे नव्हता.मराठीच्या अभिमानापोटी इतर भाषांचा अनादर महाराजांची कधीच केला नाही.याउलट शिवरायांच्या पत्रात अरबी,पार्सी भाषेचा (शब्दांचा) त्यांनी मोठ्या प्रमाणात वापर केलेला आहे.याबाबत डॉ.प्र.न.देशपांडे त्यांच्या "शिवरायांची पत्रे" या ग्रंथातील प्रस्तावनेत लिहितात-शिवाजी महाराजांच्या कचेरीपत्रामध्ये प्रामुख्याने पुढील मायना आढळतो.अजरख्त खाने राजर्षी शिवाजीराजे दामदैलत हूं आणि पुढील अर्ध्या भागात बजानीखा कारखुनांनी हाल व इस्तकथाल देशमुखांनी अशा आशयाचा मजकूर येतो.अजरख्त खाने याचा अर्थ कचेरीपासुन असा असून ’दामदौलत हू” याचा अर्थ त्याचे राज्य चिरायु होवो,असा होतो.तर बजानीबु याचा अर्थ ’कडे’ असा असून "हाल" म्हणजे हल्लीचे आणि "इस्तकबाल" म्हणजे पुढे होणारे भावी असा आहे.(प्रुष्ठ क्र.१४) वरील अनेक शब्द पार्सी,अरबी आहेत.याचा अर्थ शिवरायांनी केवळ संस्क्रुत,मराठी याच भाषांचा कैवार घेतला आणि इतर भाषांचा द्वेष केला असे सिद्ध होत नाही.शिवरायांचे सांस्क्रुतीक धोरण हे भाषावादाचे नव्हते,तर जगाच्या स्पर्धेत टिकायचे असेल तर अनेक भाषा अवगत असल्या पाहिजेत अशाच स्वरूपाचे होते.शिवरायांचे पुत्र संभाजीराजेंनी तर एक संस्क्रुत आणि तीन हिंदी असे चार ग्रंथ लिहिले.म्हणजे शिवकाळात भाषावाद अस्तित्वात नव्हता.आजच्या राजकारण्यांनी राजकीय लाभासाठी भाषावाद उभा केलेला असून मराठी भाषेच्या अस्मितेचे प्रतिक म्हणून शिवरायांची प्रतिमा उभी केली जाते.शिवरायांचे सांस्क्रुतीक धोरण पाहता ही बाब अत्यंत खोटारडी आहे.
शिवाजी राजांचा पोषाख व राहणीमान पाहता सुफ़ी संतांच्या भारतातील वास्तव्याने बहुजन-मुस्लिम धर्मियांमध्ये मोठ्या प्रमाणावर सांस्क्रुतीक देवाण-घेवाण झाली.याबाबत इतिहासतज्ञ चंद्रशेखर शिखरे त्यांच्या प्रतिइतिहास या अभ्यासपुर्ण ग्रंथात लिहितात मुस्लिम स्त्रियांनी सौभाग्य अलंकार म्हणून पुरुषांचा झब्बे आणि तंग तुमानी हा पोषाख वापरणे या गोष्टी शिवरायांच्या पुर्वीपासून घडत आलेल्या होत्या.शिवाजी महाराजांचा पोषाख व राहणीमान यातूनही हा सांस्क्रुतीक प्रभाव जाणवतो याचा अर्थ कोणी धर्म बदलला असा होत नाही(प्रथमाव्रुती प्रुष्ठ क्र.५६). कुळवाडीभूषण शिवाजी महाराजांना आपल्या धार्मिक अस्मितेचा अभिमान होता.भवानी माता,महादेव,खंडोबा यांच्याबद्दल शिवाजी महाराजांना नितांत आदर होता.ते देव म्हणून नव्हे तर भवानीमाता, महादेव, खंडोबा हे सर्व श्रद्धास्थाने आहेत.त्यांच्याबद्दल शिवरायांना आदर होता पण यश मिळवण्यासाठी हाती तलवार घ्यावी लागते.केवळ नामस्मरण आणि देवपुजा केल्याने आपणाला यश मिळणार नाही असे समजण्याइतके महाराज प्रगल्भ विचारसरणीचे होते.
शिवाजी राजे बुद्धिप्रामाण्यवादी होते.वैदिक धर्मग्रंथात अनेक अतार्किक बाबी आहेत.त्यांचे अनुकरण महाराजांनी कधीही केले नाही.शिवरायांनी आरमारदलाची उभारणी केली.सिंधुदुर्गसारखे सागरी किल्ले बांधले.बेदनुरवर समुद्रामार्गे स्वारी करून शिवरायांनी सिंधू बंदी तोडली.समुद्र उल्लंघन करणे पाप आहे असे लिहुन ठेवनार्या वैदिक ग्रंथाचे काही ठिकाणी प्रामाण्य नाकारले.शिवरायांनी शुद्रातिशुद्र बांधवांना हक्क-अधिकार दिले. म्हणजे महाराजांनी विषमता नाकारली.राज्यात समता निर्माण केली.समतावादी स्वराज्य हे शिवरायांच्या सांस्क्रुतीक धोरणाचे महत्वाचे अंग होते.
शिवराय महाराजांचे बरेचसे आयुष्य लढाया राजकीय संघर्ष स्वराज्याची निर्मीती प्रवास यामध्ये गेलेले आहे.त्यांना जर दीर्घायुष्य लाभले असते तर त्यांनी दुसर्या राज्याभिषेकानंतर निश्वितच अब्राह्मणी धार्मिक संहिता निर्माण केली असती.तरी देखील त्यांच्या पत्रावरून,जीवनातील काही प्रसंगावरून त्यांचा मानवतावाद,प्रेमळपणा,धार्मिक.सांस्क्रुतीक धोरणे प्रकर्षाने जाणवते.त्यांनी २३ ऑक्टोंबर १६६२ रोजी सर्जेराव जेधे यांना पत्र पाठवले आहे.त्या पत्रात ते लिहितात की मोघल स्वराज्यावर चाल करून येत आहेत तरी रयतेला सुरक्षीत ठिकाणी हलवावे.मोघलाकडून रयतेला त्रास झाला तर "त्याचे पाप तुमच्या माथी बैसेल".यावरून परोपकार हे पुण्य आणि परपीडा हे पाप आहे हे महाराजांचे सांस्क्रुतीक धोरण होते.
शिवाजी महाराजांची हिंदू धर्मरक्षक आणि मुस्लिमांचा कर्दनकाळ अशी प्रतिमा झाली किंवा तशी केली गेली.शिवाजी महाराजांचे अदिलशहा, मोघल यांच्याबरोबर राजकीय संघर्ष होता,धार्मिक नव्हे.शिवरायांनी अफ़जलखानाला ठार मारले,शाईस्तेखानावर वार केला ते मुस्लिम होते म्हणून नव्हे तर स्वराज्याचे शत्रू होते म्हणून.शिवाजी महाराजांनी जसा अफ़जलखानाला ठार मारला तसाच खानाचा निष्ठावंत वकील क्रुष्णा कुलकर्णी यालाही उभा कापला.शिवरायांच्या सैन्यात अनेक मुस्लिम अधिकारी होते.शिवरायांच्या सैन्यात ज्याप्रमाणे अनेक मुस्लिम अधिकारी होते त्याचप्रमाणे मोघल. अदिलशहाच्या सैन्यात देखील मराठा , रजपुत, ब्राह्मण अधिकारी होते.याचाच अर्थ संघर्ष हा धार्मिक नसून राजकीय होता.शिवरायांचे धोरण कोणत्या धर्माला विरोध किंवा कोणत्या धर्माचा अनुनय करण्याचे नव्हते. याउलट औरंगजेबाला १६५७ साली लिहिलेल्या पत्रावरून शिवरायांचा मानवतावाद प्रकर्षाने जाणवतो.
बहुजनप्रतिपालक विश्ववंद्य छ.शिवाजी महाराजांच्या धार्मिक आणि सांस्क्रुतीक धोरणावरून हे स्पष्ट होते की शिवरायांना जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषा, लिंग, वंश, राष्ट्र भेदाच्या पलीकडे जाऊन मानवाचे आनंददायी प्रसन्न भेदा-भेदरहित असे स्वराज्य अपेक्षीत होते.त्याची प्रत्येक्ष कार्यवाही त्यांनी आपल्या स्वराज्यात केली.शिवरायांचे खरे सांस्क्रुतीक आणि धार्मिक धोरण जगाला समजेल तेंव्हा जगात शांतता आणि विकास झपाट्याने वाढेल.शिवाजी हे केवळ मराठी, महाराष्ट्र, भारताचे राजे नाहीत तर संपुर्ण जगातील आदर्श व्यक्तिमत्वांचे आदर्श आहेत.
अशा कुळवाडीभूषण समतेचे पुरस्कर्ते हिंदवी स्वराज्य संस्थापक विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराजांना कोटी कोटी विनम्र अभिवादन !
जय जिजाऊ ॥ जय शिवराय ॥ जय महाराष्ट्र.