काटेरी अंथरुणावर जन्माला येवून या अंथरूणाची ज्यांना सवय होते ते सामान्य म्हणून जगतात पण बोचणार्या काट्यांची ज्यांना जाणीव होते आणि हक्क मिळवण्यासाठी ज्यांच्यात जिद्द असते ते असामान्य होतात.भारत देशातील पुरुषप्रधान व्यवस्थेला तोंड देत प्रत्येक स्त्रीच्या जीवनाला ज्ञानाम्रुताचा आनंद देणार्या सावित्रीबाई फ़ुले या अशाच असामान्य व्यक्ती नव्हे तर ज्ञानाची देवता आहेत.त्यांच्यामुळेच आज,"अगं सोनू,अरे पिल्या,अरे बाळा लवकर उठ,शाळेला जायचं ना ! तयारी करावयाची आहे.लवकर उठ."अशाप्रकारचे संवाद आज भारतातील घराघरात ऐकायला मिळतात.
शिक्षणाची ज्ञानगंगा प्रत्येकाच्या घराघरात पोहवविणार्या पहिल्या महिला जन्मदात्या म्हणून अजरामर असणार्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फ़ुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात नायगांव येथे झाला.नायगाव येथील खंडूजी नेवसे पाटील यांची एकुलती एक लाडकी, हुशार मुलगी होती.तत्कालीन परिस्थितीत भारतीय समाजात बालविवाहाची पद्धत असल्यामुळे सावित्रीबाईंचं लग्न वयाच्या नवव्या वर्षी जोतिबा फ़ुले यांच्याबरोबर झाले.त्यावेळी फ़ुलेंचे वय १३ वर्ष होते.१८४० मध्ये विवाह झाल्याबरोबर परंपरागत चातुर्वर्ण्याधिष्ठीत समाज व्यवस्थेरूपी हिरव्यागार विषव्रुक्षाला घनदाट जंगलातील एका-एका विषव्रुक्षाला मुळासकट उपटून फ़ेकून देण्याचे धाडस,बाणेदारपणा आणि जॊखिम आपल्या पतीबरोबर सावित्रीबाईंनी तना-मनाने स्विकारले होते.
सावित्रीबाईंनी त्याच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर स्वतंत्र स्त्री म्हणून विचार केला.फ़क्त विचार करून थांबल्या नाहीत तर प्रत्यक्ष त्याप्रमाणे वाटचाल केली.ही वाटचाल सनातन काळात अत्यंत खडतर होती म्हणूनच त्यांनी घडवून आणलेल्या शैक्षणिक क्रांतीचे मोल अनमोल होते हे निश्चितपणे समाजाने स्वीकारले आहे.ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा आहे असे राष्ट्रपिता महात्मा जोतिराव नेहमी म्हणत त्यामुळे "विद्या हेच बळ,ज्ञान हीच शक्ती" ही म.जोतिराव फ़ुलेंची मुलगामी क्रांतिकारी वचने सावित्रीबाईंनी आत्मसात केली होती.शिक्षणाशिवाय समता नाही आणि समतेशिवाय मानवता नाही हे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी "चुल आणि मुल" यात गुंतुन न पडता घराचा उंबरठा ओलांडून त्यांनी सामाजिक कार्यात भाग घेतला.महात्मा जोतिराव फ़ुलेंनी स्वत: सावित्रीबाईंनी शिकविण्यास सुरुवात केली.त्यासाठी शेतातील काळी जमीन सावित्रीबाईंची पाटी होती.त्या पाटीवर सावित्रीबाई एका छोट्याशा काडीने अक्षरे गिरवायला शिकल्या पुढे त्यांनी अहमदनगर येथे फ़रारबाईंच्या व पुण्यात मिचेलाबाईंच्या मॉर्मन स्कुलमध्ये अध्यापनाचे शिक्षण घॆऊन आद्य भारतीय शिक्षिका आणि मुख्याध्यापिका झाल्या हिच भारतीयांच्या इतिहासात अजरामर संस्मरणीय घटना घडली.
स्त्रियांच्या आणि शुद्रांच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून ज्ञानाचे दरवाजे त्यांच्यासाठी खुले करण्याचा महात्मा जोतिराव फ़ुलेंचा मानस होता."जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाची उद्धारी." या सत्याचा त्यांना प्रत्यय आल्यामुळे विचाराअंती त्यांनी मुलींच्यासाठी शाळा काढण्याचे ठरवून १ जानेवारी १८४८ रोजी पुणे येथील भिडे वाड्यात मुलींच्या शिक्षणासाठी पहिली शाळा सुरु केली आणि त्या शाळेत सावित्रीबाई विनावेतन शिक्षिकेचे काम करू लागल्या.आपल्या या कार्याचा एकखांबी तंबू होऊ नये म्हणून त्यांनी कार्यकारी मंडळाची स्थापना केली.
१ जानेवारी १८४८ रोजी मुलींची पहिली शाळा पुण्यात सुरु करण्यात आली होती. ती भारतातील पहिली शाळा म्हणून भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहावा लागेल.जेव्हा ब्राह्मण समाजाला समजले की ही शाळा एका शुद्र जोडप्यांनी सुरु केली आहे.तेंव्हा त्यांनी संताप व्यक्त केला.सावित्रीबाई शाळेत जात असताना त्यांच्यावर शेण टाकणे,चिखल फ़ेकणे,अचकट-विचकट भाषेचा वापर करणे,निंदानालस्ती करणे असे अनेक प्रकार सुरु होते.परंतू सावित्रीबाई फ़ुले या स्वभावाने बंडखोर स्वभावाच्या होत्या.अशा अनेक अडचणी आणि संकटांना त्यांनी भीक घातली नाही.कारण जे कार्य त्यांनी हाती घेतले ते भारतातील महिलांसाठी उज्वल भविष्या निर्माण करणारे होते.त्यांनी अस्प्रुश्यांसाठी शाळा काढल्या.त्याकाळी स्त्रीयांना अजिबातच स्वातंत्र नव्हते.स्त्रियांना शिक्षण देणे म्हणजे पाप आहे असे समजले जात असे.परंतू हे धाडसी काम फ़ुले दांपत्यांनी सुरु केले.
सावित्रीबाई प्रतिभावंत कवयत्री देखील होत्या.त्यांनी ५० वर्षे जोतिराव फ़ुलेंच्या ध्येय प्रणाली, चळवळीमध्ये झोकून दिले होते.सावित्रीबाईंचा पहिला काव्यसंग्रह १८५४ साली प्रकाशीत झाला.त्यामध्ये सुद्धा त्यांनी आपल्या बहुजन बांधवांना काव्य अर्पण केले.उदा.तयास म्हणावे मानव काय,शिकण्यासाठी जागे व्हा,शुद्र शब्दाचा अर्थ श्रेष्ठ धन इत्यादी काव्य रचनेमधून त्यांनी शिक्षणाचे महत्व पटवून दिले.एका काव्यामध्ये सावित्रीबाई फ़ुले म्हणतात- नसानसात इर्षा खेळवू विद्या मी घेईन,शुद्रत्वाचा डाग हो माझा निपटून मी काढीन.सावित्रीबाई म्हणतात-तुमच्या रोमारोमात अशी इर्षा जाणवू द्या की,आम्ही शुद्र आहोत याचा डाग आम्ही पुसुन टाकणार आहोत आणि त्यासाठी आम्हाला शिक्षण घेणे आवश्यक आहे.अशा प्रकारे काव्य रचना करून बहुजनांना शिक्षणासाठी प्रेरित,चैतन्यमय केले आहे.विद्येचे महत्व पटवून दिले.खालील ओळीमध्ये त्यांनी सांगितले आहे की "विद्याधन आहे रे श्रेष्ठ सार्या धनाहून,तिचा साठा जयापाशी ज्ञानी तो मानवी जन".पुरुष शिकला तर तो एकटाच शिकतो परंतू स्त्री शिकली तर संपुर्ण कुटूंब शिक्षित होते.पर्यायाने समाज शिकतो आणि राष्ट्राच्या प्रगतीला हातभार लागू शकतो.ही शिकवण सावित्रीबाईंनी समाजाला दिली.कारण त्या काळात अखंड भारतामध्ये स्त्री ही एका रानात चुकलेल्या पाडसासारखी वावरत होती.ती घाबरलेली,बावरलेली,मनाने दबलेली होती.कोणीतरी ब्रुचे धिंडवडे काढील या मनस्थितीत वावरत होती.तिला शिक्षणापासून वंचित केले जात होते.पुरुषप्रधान समाजव्यवस्था आणि स्त्रियांना दासी लेखणारी पुरुषी मानसिकतेने महिलांवर अनेक बंधने लादली होती.त्याठिकाणी सावित्रीबाईंनी अंधार्या कोठडीत चाचपडणार्या स्त्रीला तिच्या आस्तित्वाची जाणीव करून दिली.सनातनी लोकांचा रोष पत्करून तिला पुरुषांच्या बरोबरीत वागायला शिकवले.असे हे शिक्षण क्षेत्रातील महान कार्या बघून ब्रिटीश सरकारने त्यांचा पुणे येथील विश्रामवाड्यात १६ नोव्हेंबर १८५२ मध्ये तत्कालीन पुना संस्क्रुत कॉलेज चे प्राचार्य मेजर कॅंडी यांच्या अध्यक्षतेखाली फ़ुले दांपत्यांना सन्मानित करून त्यांचा गौरव करण्यात आला.
आज एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करायला स्त्रीला कोणी मार्ग दाखविला असेल तर तो सावित्रीबाई फ़ुलेंनीच.त्यांनी जर हा रस्ता दाखवला नसता तर कोठेतरी सह्याद्रीच्या रांगामध्ये,कोणत्यातरी दाट जंगलात,कोणत्यातरी गुहेत काट्यांतून प्रवास करायला लागला असता.सह्याद्रीच्या शिखरावर पोहचण्याऐवजी सह्याद्रीच्या खोल दरीत व दु:खाच्या गर्तेत हिंडावे लागले असते.पण सावित्रीबाई फ़ुलेंनी राष्ट्रपिता महात्मा फ़ुले यांच्या बरोबरीने स्त्रियांसाठी जी नवीन दालने उभी केली त्याला तोड नाही.त्याकाळी मुठीमध्ये मापेल एवढ्या मनुवादी लोकांची शिक्षणावर मक्तेदारी होती.ही मक्तेदारी स्वत: अक्षर गिरवून या गिरवण्यातून पुर्ण भारतातील स्त्रियांना भवितव्याचा मार्ग दाखविला.
या प्रेमळ माऊलीचे १० मार्च १८९७ ला महानिर्वाण झाले.म्हणून म्हंटले जाते की,"युगायुगातून एखादीच अशी सावित्री जन्माला येते म्हणूनच ती युगसावित्री होते." राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फ़ुलेंसारख्या क्रांतीसुर्याबरोबर सहवास आणि मार्गक्रमण करीत असणारी ती एक क्रांतीज्योती होती.म्हणूनच अशा तपस्वी,न्यायमुर्ती,तेजस्विनी महामायेला कोटी कोटी विनम्र प्रणाम.