12 June 2012

दादोजीचा पुतळा हटला : इतिहासाचे शुद्धीकरण.

इंद्रजित सावंत (इतिहास अभासक)
१७ जानेवारी २०११
शिवाजीराजांचं पुण्यातलं वास्तव्य कुठे होतं ?शनिवारवाड्याच्या पिछाडीला असलेल्या लालमहालात दादू कोंडदेवच्या पुतळ्याने वादग्रस्त झालेल्या या लालमहालात शिवाजीराजे राहीले होते ? तिथेच शाहीस्तेखानाची बोटं छाटली का ? ठाऊक नाही ?!
मग, "रामदास किंवा दादू कोंडदेव हे शिवाजी राजांचे गुरु होते", ही क्लुप्ती ब्राह्मणांची आहे. असं छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज राजर्षी शाहू महाराज इ.स. १९२० मध्येच एका सनदेत लिहुन ठेवलं असलं तरी दादू - रामदास शिवरायांचे गुरु होते असं सांगणं - लिहिणं मात्र काही थांबलेलं नाही. उलट,नव्या जोमाने दादू कोंडदेवाचं नसलेलं कर्तृत्व मांडण्याची चढाओढ लागली.
          एवढंच नव्हे तर चित्र,शिल्पांच्या माध्यमातून ते शिवरायांचे पालक - गुरु होते हे असत्य जास्तच द्रुढ करण्याचा प्रयत्नही होत आहे. याचाच एक भाग म्हणुन लालमहालातील हे समुह शिल्प तयार झालं होतं.
            पुण्यातील शिवरायांचा लालमहाल म्हणुन आज दाखवली जाणारी वास्तू ही अलीकडच्या काळात म्हणजे १९८८ मध्ये बांधण्यात आलेली इमारत आहे.शिवाजी महाराज राहात होते तो मुळचा लालमहाल आज अस्तित्वातच नाही.असं असलं तरी शिवरायांच्या लालमहालाविषयी अनेक संदर्भ आपल्याला इतिहासाच्या कागदपत्रातून मिळतात. यातील सर्वात विश्वसनीय पुरावा म्हणजे जेधे करीन्यात आलेला आहे.यात म्हंटलं आहे- "१५१५ शोभक्रुत संवछरी चैन शुध अष्टमी रविवारी लोकाची निवडी करून पुणियात राजश्री स्वामींनी खासा दाहा लोकानसी लाल महालात जाऊन शास्ताखानाकरवी छापा घातला बा कान्होजी ना यांचे पुत्र चांदजी जेधे होते मारामारी झाली.तेंव्हा शास्ताखानाचा हात तुटला.मग पळोन गेला.त्याचा लेक अबदुल फ़ते ठार झाला. त्याउपरी स्वामी परसातील दिंडीने बाहीर निघाले.तो सर्जाभाऊ जेधे घोडियावरी बैसोन पागेचा घोडा दुसरा खासदाराजवल देऊन दिंडी समीप आज्ञाप्रमाणे राहीले होते.राजश्री स्वामी येताच घोडियावरी बैसोन मुळा उतरोन जरेसाकडे निघाले.जागाजागा लस्कराच्या टोळ्या व करणे नगारे ठेविले होते.त्याची गुली मोगलाच्या लस्करात जाली.राजश्री स्वामी हशमाच्या व लष्कराच्या जमावानसी दुसरे दिवसी सिहगडास आले.शास्ताखान कुच करुन गेला."(या मजकुरात पुर्णविराम वाचण्याच्या सोयीसाठी दिले आहे,मुळ मजकुर मोडी लिपित आहे.त्यात स्वल्प-अर्ध-पुर्ण विराम नाही त्यामुळे संदर्भ देताना अडचणिचा मजकुर गाळला जातो. त्याचा दाखला पुढे आहेच)
           करीन्यातील या उल्लेखावरून हा महाल पुण्यात मुळा नदिच्या जवळ होता व त्यास लालमहाल हे नाव शिवकाळात मिळालं होतं. हे समजुन येतं. यानंतरचा या महालाचा उल्लेख एका शकावलीत आला असून ही शकावलीतील नोंद पेशवे दफ़्तरातून निवडलेले कागद खंड २२ मध्ये लेख नं.२९२ वर छापलेली आहे.यावर या कगदाची तारीख २८-०६-१७३५ अशी दिली आहे. या नोंदीत म्हंटले आहे - "आश्याढ वद्ये ४ सुक्रवारी पंतप्रधान यांणी राजश्री सिवाजी राजे यांचा मालमहाल राजश्री दादाजी कोंडदेऊ याणी राजश्री शाहाजी राजे याचे कारकीर्दीस बांधला होता.त्यांचे भाऊ राजश्री संभाजी राजे सिवाजी राजे याचे भाऊ त्याचा महाल वेदमूर्ती राजश्री खंडभट शालेग्राम याच्या वाडियापावेतो होता. त्याचे जोते उतरामुख होते. ते उखळुन चिरे कारंजियापासी घर बांधले त्याजला जोतीयास नेले.राजश्रीच्या माहालावरही येक दोन घरे बांधोन अबदार वाडा करून ठेवावा. तुर्त एक दोन घरे बांधली, माहलात नेहमी घरे रहावयास होतील म्हणुन पंती लालमहाल बांधायची तजवीज केली.आठरापंधरा रोज झाले. जुना हौद कारंजियाचा पका आहे, त्यावरती पछेकेमडे दिवाणखाणा जुना होता तेथे घर बांधिले त्यास यांची साधत नाही त्या दिवाणखानियाची जुनी काहीवाही भिंताडे होती ते धोंडे काहडुन आपल्या वाडियाच्या सुताने दोरी धरून प्रांची साधून कारंजियाचा सुमार टाकून तुर्त येक घर कारंजियाच्या कोनासी दक्षणेकडल्या लाऊन (?) केले होता. मुळे हे कारंजे रद जाले असे.देसपांडियाच्या पछमेस खंडभटाने दक्षणेस जे जागा आहे ते आजी पंती उखळुन चिरे हाऊदाकडे नेऊन तुर्त घर बांधतात.त्याच्या जोतियास लाविले असेत.लालमाहलाचा वगैरे दोन यैस तीन आठ पंती गाडले होते ते उकरिले. पाणी लागले. म-हामती तोडाची केली असे.लालमाहालाची जमीन पछमेसहि काही गेली असावीसी आहे. तुर्त जोते काहडलियाने माहालचे हादेचे हिंदाने मोडले; परंतु ते जागा महालाची असे"
         वरील उल्लेख हा महत्वाचा असून यातील माहीतीवरून हा महाल शहाजी महाराजांच्या कारकीर्दित दादू कोंडदेवनं बांधल्याचं नोंदवलं आहे.पण यामध्ये कुठेही दादु शिवरायांचा गुरु असं म्हंटलेलं नाही. त्यावरून इ.स.१७३५ पर्यंत तरी दादू हा शिवरायांचा गुरु होता, असा प्रवाद रुढ झाला नव्हता, हे स्पष्ट होतं.
             एवढंच नाहीतर, या लालमहालासोबत शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ बंधू संभाजी महाराजांचा वाडाही या लालमहालाच्या शेजारी होता, हे समजुन येतं. हा संभाजी महाराजांचा वाडा व लालमहाल पंती म्हणजे पंतप्रधान उर्फ़ पेशव्यांनी पाडुन त्या बांधकामातील दगडाचे चिरे व जागा आपला वाडा बांधण्यासाठी वापरले होते.या लालमहालात कमीत कमी तीन पाण्याचे आड (विहिरी) होते.मोठा दिवाणखाना होता.पाण्याचे हौद व कारंजे होते, हेही वरील उल्लेखावरून स्पष्ट होतं.
         म्हणजे शिवरायांचा मुळचा लालमहाल अलीकडचा लालमहाल दिसतो तेवढा लहान निश्चितच नव्हता.कारण इ.स.१६६१-६३ शायिस्तेखानाने जेंव्हा पुण्यात मुक्काम ठोकला होता, तेंव्हा त्याने आपलं निवासस्थान म्हणुन या शिवरायांच्याच वाड्याची निवड केली होती.ज्यावेळी शिवरायांनी शायिस्तेखानावर छापा टाकला, त्यावेळी मुघली इतिहासकार भिमसेना सक्सेना व ख्वाफ़ीखानाने केलेली वर्णने उपलब्ध आहेत. या वर्णनांवरूनही लालमहालाची भव्यता समजून येतं.
             या वर्णानांवरून या वाड्याला मोठा नगारखाना होता.शिवाय या वाड्यात पाण्याचे हौद होते.भली मोठी बाग होती.या बागेला "राजबाग" असं म्हणत असत.या बागेच्या देखभालीचं काम महाराजांनी मोतमाळी दरवडा याला दिलं होतं. पुढे शायिस्तेखानावर छापा टाकला, त्यावेळी या माळ्यांनी शिवरायांना माहिती देऊन मदत केल्याचा उल्लेखही मिळुन येतो.
            असा हा शिवरायांच्या महालाचा काही भाग जरी पेशव्यांनी पाडला असला तरी या भल्या  मोठ्या महालाचा काही भाग इंग्रज आमदनीपर्यंत शिल्लक होता त्या भागास अंबरखाना म्हणुन ओळखलं जात असे.याची नोंद इ.स.१८८५ च्या बोम्बे प्रेसिडेंसी ग्याझेटीअरमध्ये आली आहे.(बोम्बे ग्याझेटीयर प्रेसिडेंसी व्होल्यूम १९ भाग ३ पुना)
              असा हा शिवरायांचा भव्य लालमहाल पेशव्यांनी पाडल्यामुळे आज अस्तित्वात नाही. हा महाल शहाजी महाराजांनी बांधून घेतला व या महालात शिवाजी महाराज, जिजामाता, संभाजी महाराज, शहाजी महाराज यांचं वास्तव्य अनेक वर्षे झलं होतं. 
               लालमहाल नेमका कधी बांधला याचा उल्लेख अजुन पर्यंत उजेडात आलेला नाही. पण इ.स. १६४२ नंतर शिवराय जेंव्हा बंगरुळवरुन पुण्यास आले तेंव्हा त्यांचं वास्तव्य काही काळ म्हणजे इ.स.१६४९ पर्यंत तरी खेडमध्ये बांधलेल्या वाड्यात होतं. हे निश्चित. शिवाजी महाराज इ.स. १६४२ मध्ये पुणे जहागिरीवर आले तेंव्हा पहिल्यांदा ते खेड मध्ये आले. तेथे त्यांच्यासाठी एक वाडा बांधण्यात आला पुढे हा वाडा बांधण्यासाठी काही लोकांची घरे पाडण्यात आली. त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी खेडजवळच एक पेठ बसविण्यात आली. या पेठेला शिवापुर असं नाव देण्यात आलं. या गावाजवळच कामथाडी इथे जिजाऊंची शेती होती.या शेतीसाठी शिवगंगानदीवर दगडाचे बांधही घालण्यात आले होते. ते आजही पहावयास मिळतात. पण शिवरायांचा वाडा खेडमध्ये नेमका कुठे होता याचा शोध घेणं बाकी आहे.
               १६४९ नंतर जिजामाता व शिवाजी महाराज पुण्यात रहावयास आले.त्यावेळी काही काळ ते पुण्यातील झांबरे पाटलांच्या वाड्यात राहीले होते.(पुढे याच झांबरे पाटलांकडुन जागा विकत घेऊन त्या जागेवर ललमहाल बांधला.) म्हणजे तोपर्यंत तरी लालमहाल व संभाजी महाराजांचा महाल बांधुन पुर्ण झाला नव्हता, हे समजुन येतं. पुढे लालमहाल बांधुन पुर्ण झाल्यावर शिवराय व जिजामाता या महालात राहावयास आल्या.
                 शिवरायांच्या वास्तव्याची इतकी सविस्तर माहीती देण्याचं कारण; आज ज्या लालमहालातील दादू कोंडदेवच्या पुतळ्याचा विषय पुण्यातील काही संशोधक व त्यांचे पाठीराखे धरत आहेत.त्यांना हे माहीत व्हावं की ज्यावेळी शिवराय लालमहालात राहावयास आले, त्याच्या खुपच अगोदर म्हणजे दोन-तीन वर्षापुर्वी दादू कोंडदेवाचा म्रुत्यु झाला होता.अशा व्यक्तीचा पुतळा त्या ठिकाणी बसवावा म्हणुन आग्रह धरणे, हे कोणत्याही तर्कशास्त्रात बसत नाही.त्यामुळे लालमहालातील बाल शिवबा, जिजामाता आणि दादू कोंडदेवाचं समुह शिल्प हे इतिहासाच्या अडाणीपणातून उभं राहिलं हे सिद्ध होतं.

बहुजन समाजातील विचारवंतांचे मोलाचे कार्य

         शिवरायांचे कार्य आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर पोहचविण्यासाठी बहुजन समाजातील विचारवंतांनी मोलाचे कार्य केले ते पाहुया.
       लाला लजपतरायांनी सिवोजी नावाचे उर्दुमधुन शिवचरित्र लिहिले. त्यामुळे राजे पंजाब, सिंध पर्यंत समजले. रविंद्रनाथ टागोर आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे शिवाजीराजे हे आदर्श होते. कर्मवीर भाऊराव पाटील म्हणाले की प्रसंगी जन्मदात्या बापाचे नाव बदलेन पण कोलेजला दिलेलं शिवाजीराजांचं नाव मी कधिच बदलनार नाही. ते भाऊराव पाटील जैन होते. त्यांच्यामुळे शिवराजांच्या रयतेला शिक्षण मिळाले. कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे, डॉ.पंजाबराव देशमुख, राजर्षी शाहू महाराज, क्रांतीसिंह नाना पाटील, संत गाडगेबाबा, प्रबोधनकार केशव सी. ठाकरे इ. समाजसुधारकाची शिवरायांवर अनन्यनिष्ठा होती.भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा शिवचरित्राचा सखोल अभ्यास होता. त्यांनी शुद्र पुर्वी कोन होते ? या ग्रंथात शिवाजीराजांबाबत खुप सखोल माहिती लिहिलेली आहे. शिवाजीराजांच्या त्रिशताब्दी उत्सवाच्या निमित्ताने बदलापूर येथे आयोजित केलेल्या समारंभाच्या अध्यक्षस्थानी डॉ.बाबासाहेब आंबेडकर होते.या प्रसंगी त्यांनी राजांच्या जीवनावर अभ्यासपुर्ण आणि प्रभावी भाषण केले.त्यामुळे राजांचे अपरिचीत रुप जनतेला समजले.राष्ट्रपिता ज्योतिराव फ़ुले यांनी शिवजयंती सुरु केली.त्यांचे राजांवर डोळस प्रेम होते आंधळे प्रेम नव्हते.
                शिवाजीराजांचे भांडवल करुन फ़ुलेनी समाजामध्ये धार्मिक जातीय दंगे निर्माण केले नाहीत किंवा शिवाजीराजांच्याद्वारे त्यांनी बहुजन समाजाचे दैवीकरण केले नाही. फ़ुले यांनी शिवाजीराजांचा खरा इतिहास देशाला सांगितला.
                साहीत्यरत्न थोर देशभक्त आणि समाजसुधारक आण्णाभाऊ साठे यांनी गणपतीला वंदन असनारा पारंपारीक गण बदलला.गणाचा प्रारंभ शिवछत्रपतींना वंदन करूनच सुरु केला.आण्णाभाऊंनी शिवरायांवर महाराष्ट्राची परंपरा हा पोवाडा लिहिला. आण्णाभाऊ रशियात गेल्यानंतर त्याठिकाणी शिवचरित्रावर रशियन भाषेत लिहिनारे प्रा.चेलिशेव आण्णांना भेटले.आण्णांनी त्यांना शिवरायांबाबत खुप दुर्मिळ माहीती सांगितली म्हणजेच आण्णाभाऊं मुळेच रशियन जनतेला शिवरायांचे कार्य माहीत झाले. शिवरायांचे कार्य आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर पोहचविण्यासाठी बहुजन समाजातील विचारवंतांनी मोलाचे कार्य केले 

6 June 2012

इतिहास संशोधनानेच बदलतो

             पेशवाईच्या उत्तर काळात इ.स.१८०० च्या आसपास (याच वेळी पेशव्यांच्या गादीवर इतिहासात चैनखोर व पळपुटा म्हणुन प्रसिद्ध असलेला बाजीराव दुसरा स्थानापन्न झालेला होता) स्वराज्य स्थापनेचे श्रेय जातीनिशी लाटण्यासाठी दादोजी कोंडदेव कुलकर्णीला शिवरायांच्या गुरुपदावर आरुढ करण्याचं कार्य सुरु झालं. त्याला साजेसा असा इतिहास बखरीच्या रुपाने पुढे आणण्यास ब्रह्मव्रुंदांनी सुरवात केली.याच काळात लिहिल्या गेलेल्या शिवदिग्विजय,चिटणीस बखर,शेडगावकर भोसल्याची बखर यांसारख्या बखरीमधुन दादोजी कोंडदेव कुलकर्णी हा शिवरायांचा गुरु असल्याचा खोटा इतिहास रचण्यात आला. दादोजी कोंडदेव ची प्रामाणिकता आणि महानता द्रुढ करणार्या भाकडकथा त्यावेळी रचण्यात आल्या.असत्य ठासुन वारंवार सांगितलं की ते सत्य भासू लागतं या तत्वाने दादोजी कोंडदेव कुलकर्णी शिवरायांचा गुरु होता,त्याने शिवरायांना घडविले,स्वराज्य उभारण्यामागे त्याची प्रेरणा होती.त्यांनी शिवरायांना स:शास्त्र चालविण्यास शिकवले, दादोजी कोंडदेव ने मावळ्यांची सैन्याची उभारणी केली.दादोजी कोंडदेव ने शिवरायांच्या आंब्याच्या बागेतील आंबा धापला (चोरला) नंतर पश्चाताप होऊन त्याने आपल्या हाताची बाही लांडी करून आयुष्यभर तशा एक बाहीचा अंगरखा वापरला अशा अनेक फ़ालतु ऐनतिहासिक कथांचा सुळसुळाट या बखरीतून झालेला आहे.
                 अशा बखरीचा आणि त्या बरहुकुम लिहिलेल्या लेखकांच्या पुस्तकाचा आधार दादोजी कोंडदेव चे समर्थक कायम घेत असतात हे इतिहासलेखनशास्त्राच्या विरुद्ध आहे.या दादोजी कोंडदेव समर्थकांनी दादोजी कोंडदेवला शिवरायांचा गुरु करण्यासाठी लबाडीच्या सीमांचं अनेक वेळा  उल्लघंन केलं आहे.
                    त्याचं एक उदाहरण द्यायचं झाल्यास तर जेष्ट इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी ३० वर्षापुर्वी "मराठी सत्तेचा उदय" आणि "शिवाजी व शिवकाल" हे ग्रंथ उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमासाठी लिहिले होते.त्यावेळी म्हणजे ३० वर्षापुर्वी त्यांनीही दादोजी कोंडदेव हा शिवरायांचा शिक्षक होता(गुरु नव्हे) अशी मांडणी केली होती.पण वादग्रस्त जेम्स लेन प्रकरणानंतर या विषयाचा त्यांनी सखोल अभ्यास केला.त्यानंतर त्यांनीही दादोजी कोंडदेव हा शिवरायांचा शिक्षक नव्हता हे सप्रमाण सिद्ध करणारं संशोधन जगासमोर आणलं.त्यावेळी त्यांनी आपलं ३० वर्षापुर्वीचं दादोजी कोंडदेव संबंधाबाबत मत कसं चुकीच्या संदर्भावर आधारलेले होते याचीही मांडणी केली आणि त्यांचं नवंसंशोधन त्यांनी २००६ साली पुण्यात या विषयावर झालेल्या परिसंवादामध्ये मांडलं. त्यानंतरही त्यांनी अनेक व्रुत्तपत्रे,पुस्तक,साप्ताहीक व व्याख्यानामधुन वारंवार दादोजी कोंडदेव हा शिवरायांचा गुरु नव्हता असं लिहिलं- बोललं आहे.असं असुनही दादोजी कोंडदेव च्या गुरुपदाचं समर्थन करणारे भटी महाभाग त्यांच्या जुन्या ३० वर्षापुर्वीच्या पुस्तकातील वाक्य आपल्या मुद्द्याच्या समर्थनात पून:पून्हा सांगत लिहित असतात.
             पांडुरंग बलकवडे यांनी ७ जानेवारी २०११ च्या लोकप्रभा या साप्ताहीकात (याच साप्ताहीकात ४ महीन्यापुर्वी म्हणजेच ओक्टोंबर २०१० मध्ये डॉ.जयसिंगराव पवार यांनी प्रदीर्घ लेखातून आपलं म्हणनं मांडलं होतं)३० वर्षापुर्वीचं डॉ.पवारांचं मत पुन्हा एकदा आपल्या समर्थनासाठी मांडलेलं आहे.
              एखादा संशोधक माझं पुर्वीचं मत चुकीचं होतं आत ते मी बदलत आहे असं सांगितलं असुनही त्यांचं जुनं मत वापरनं हा शुद्ध मुर्खपणा आहे यात दुमत नाही.  

2 June 2012

सूर्याजी पिसाळ - फ़ितूर नव्हेच ! [पान ३]

मुत्सद्दी राणी येसूबाई
             रायगडाबाबत धोरणी,निग्रही व मुत्सद्दी येसूबाईंनी प्रतिकार अशक्य झाल्याने कमीतकमी नुकसान सोसून किल्ला स्वाधिन केला.पुढेही औरंगजेबाच्या स्वारीचा रेटा अन भर ओसरेपर्यंत हे धोरण मरठ्यांनी स्वीकारलेले दिसते. म्हणजे मोठी फ़ितूरी नाही.सूर्याजींचे नावही तेथे नाही.जेधे शकावलीत नोंद ’कार्तिक महिन्यात रायगड झुल्फ़िकारखानाच्या स्वाधिन करण्यात आला.शाहूस (शिवाजी द्वितीय) गडावरुन तुळापुरास औरंगजेबकडे नेण्यात आले.बादशहाने त्यास सहा हजारी मनसबदार केले व शाहू राजे असे नाव ठेवले.आणि त्यास आपल्या ’जाळी’ (तुरुंगात) मध्ये ठेविले.शिवचरित्रप्रदीपमध्ये हे पहिल्या ५० पानात वाचावयास मिळत.खानास राजधानीत खुप द्रव्य सापडले .त्याने सिंहासन फ़ोडले.बंदीवासात प्रतापराव गुजरांचे कुटुंब आणि मुलगा खंडेराव होते.खंडेरावावर धर्मांतराचा प्रसंग आला. नाव बदलले नाही. सुटून दक्षिणेत आल्यावर, म्रुत्यूनंतर त्यांचे व्रुंदावन  कसबे परळी येथे बांधिले.सूर्याजींचेवर धर्मांतराचा प्रसंग नंतर आलाच.शिवरायांची एक भार्या व संभाजीची एक मुलगी, मोरोपंत सबनीस, राजाद्न्या, कारकून, कारभारी, कारखानदार असे व विश्वासू नोकर इ. हजार - पाचसे लोक कैद झाले होते.सर्वांच्या खर्चाची व्यवस्था बादशहाने लाऊन दिली.कदाचित राजा पौरसची इतकी व्यवस्था सिकंदराने लावली नसावी ! शाहूंचे लग्न कैदेतच झाले, तेंव्हा रायगडचा पाडाव करून आणलेली शिवाजींची भवानी तलवार त्यांनी शाहूस बक्षीस दिली.
फ़ितूर केंव्हा ?
           छत्रपती राजाराम सिंहगडावर इ.स.१७०० त निवर्तले. मराठ्यांसह छत्रपती नाही, शाहू कैदेत. पुर्ण पराभव करण्यास बादशहाने मराठ्यांचे किल्ले पुन्हा जिंकून घ्यायचे ठरविले.वाई प्रांतात वैराटगड, पांडवगड वगैरे चार किल्ले जिंकण्याचे काम (केंजळगड,कमळगडसहीत) बादशाही सरदार इस्माईल मका यांस करावयाचे होते. या इस्माईल मकास इ.स. १७०४ मध्ये सूर्याजी पिसाळची मदत झाली.मराठ्यांच्या द्रुष्टिने झाली असेल तर हिच त्याची फ़ितूरी होइल.पण १६८९ कोठे आणि १७०४ कोठे ? शिवाय तीन छत्रपतीनंतर झालेल्या विस्कळीत कारभारात इकडचे सरदार, देशमुख तिकडे तर तिकडचे इकडे, एरव्ही अकबर हा बादशहाचा मुलगा संभाजीराजेंकडे आश्रयास आलाच होता.जेधेंच्यावर वहीम आला.अशी स्वामीनिष्टेची थोडीफ़ार अदलाबद्ल त्याकाळी मुख्य आधार गेल्यावर घडचत असे.त्यात नविन काही नाही. पण महत्वाच्या प्रसंगी कोणी ’स्वामीनिष्ट’ फ़ितूर होत नसत, हेही ध्यानात घ्यावयास हवे.राजारामांची पत्नी ताराबाईंनी खुपच शौर्य गाजविले. स्वराज्याची ढासळली इमारत सावरुन धरली, हे नि:संशय शाहू सुटून आल्यावर थोडी भाऊबंदकी झालीच.दोन राज्ये झाली म्हणुन का,मराठे शिलेदारांच्या हालचाली सर्वथा फ़ितुरीस पोषक असे म्हणता यावयाचे नाही.
नरसिंगराव पिसाळांचे म्हणणे
            सूर्याजींना चार पुत्र जानोजी नाईक, फ़िरंगोजी, गुणाजी व रुद्राजी.नरसिंगराव पिसाळ म्हणतात की,इ.स.११०० ते १२०० च्या दरम्यान देवगिरीचे यादवांचे कारकीर्दीत त्यांचे पुर्वजास देशमुखी मिळाली.असो, पद्मसिंह पिसाळ शाहूंचे बरोबर कैदेत होते.नंतर ते शाहूंचे सेनापतीही झाले.सूर्याजी पिसाळ नंतर मुसलमान झाले.तेही शाहू व येसूबाईंना मुस्लिम करणार म्हणुन ! बहीण मिरा पिसाळ यांचे शहाजी लोखंडेबरोबर लग्न झाले.सूर्याजी मुसलमान झाल्यावर त्यांना इमामखान व तीन पुत्र झाल.सूर्याजी पिसाळांच्या मुसलमान वंशजापैकी गफ़ूर बाळासाहेब देशमुख सेवानिव्रुत्त (१९६२).
प्राथमिक शिक्षक सांगतात की सूर्याजी हे नंतर मुसलमान झाले आणि म्हणून त्यांना वाईची देशमुखी मिळाली(हेही चुक). पद्मसिंह पिसाळांना शाहूंनी एका कामगिरीत पाठविले त्या लढाईत ते मारले गेले. सूर्याजी पिसाळ घोडेगाव, ता. आंबेगाव,जि,पुणे येथे म्रुत्यू पावले. सुर्याजी पिसाळांच्या मुलीचा मुलगा (मानाजी ?) अक्कलकोट संस्थानात गेला.त्या शाहूंनी दत्तक घेतले, ते अक्कलकोटचे संस्थापक भोसले आडनाव लावतात.रायगडहून सातार्यास गादी आणताना पद्मसिंह पिसाळ (मुलगा) शाहूंबरोबर होते.शाहूंचा राज्याभिषेक झाला तेंव्हा पिसाळांनी आपल्या देशमुखी वतनातील  लिंब,वाघोली, बावधन, अष्टे इ. गावे नजराना म्हणून दिली आहेत.या सर्व गावांचे उत्पन्न सातारच्या छत्रपतींच्या खाजगीत जाते/मिळते.मूळ तारळे गावचे पण आत सातार चे देशपांडे वकील म्हणत, ’१९६५-६७ च्या दरम्यान श्री.बाबासाहेब पुरंदरे यांनी पिसाळ- देशमुखांचा व्रुतांत लिहावा म्हणून ठरविले होते पण ते घडू शकलेले नाही.
राजकारणातील विश्वासघात
     शत्रुला फ़ितूर होऊन स्वजनांचा विश्वासघात करणार्या व्यक्तिला ’सूर्याजी पिसाळ’ म्हणवयाचे. हा शब्दप्रयोग मराठी वाड:मयातच रुढ झालेला आहे. इतकेच नव्हे तर छोट्या-छोट्या फ़सवणुकीच्या, लबाडीच्या, काही काल संधिसाधुपणा करणार्या व्यक्तिंना आपण काही मंडळी सर्रास सूर्याजी पिसाळ हे नामाभिधान करुन रिकामे होतो, हे गैर. राजकारण्यांनादेखील सवंगपणे लावला जातो.थोडाफ़ार उलटा गेला की खंजीर खुपसणारा, सूर्याजी पिसाळ ही विशेषणे लावण्यास राजकारणी भूषण मानतात.देशांतर्गत राजकारणात अशी दुषणे लावणे सर्वथा चूक.Everything is fair in love and war (and Election !) प्रेमात,युद्धात अन आता लोकशाही जमान्यात, निवडणुकीत सारेच क्षम्य ! सारे चालते, चालवून घेतले जाते. पण तसे नाही / नव्हेच. विरोध पक्ष (शत्रुपक्ष म्हणनेही चुक) नेत्यांच्या चुका दाखविणे ठिक. पण राळ, चिखल अन त्याही पुढे जाऊन वैयक्तिक अतिनीचतम पातळीवरुन गलिच्छ, गालीप्रधानात्मक भाषा वापरणे कितपत योग्य हे पाहाणे इष्ट ठरेल.
अन्यायाची परमावधी
             किंबहुना एकाच देशातील लोक पक्ष, संघटना, संस्था अनेक कारणांनी भांडता.ते एकमेकांचे विरोध अलंकारीकरित्या शत्रुपक्ष म्हणने इथपर्यंत ठिक, पण वारंवार शत्रु, सूर्याजी पिसाळ, राय नाईक (रायनाक),,आनंदीबाई (’ध’ चा ’मा’ ), दुसरे बाजीराव (पळपुटा) असे जर आपण म्हणत राहीलो तर त्या एतिहासिक व्यक्तिंवर आपण सारे घोर अन्याय करतो.उचलली जीभ लावली टाळ्याला, असा प्रकार होऊ नये. Tell a lie hundred times and it become a truth - खोटे शंभर वेळा सांगा अन ते सत्यच ठरते.या हिटलरी न्यायाने असत्ये सत्य म्हणुन लोक स्वीकारतात. याचे भानही बोलणार्यास, लिहिणार्यास राहात नाही. गैरसमज खोडुन सत्य प्रस्थापित करणे अवघड होते.नुकसान होऊन जाते.इतिहासकारांनी ते काम करु नये.त्यांचे काम सत्य मांडणे.
           शेवटी पुनश्च लक्षात घेऊया की, रायगड व राजकुटूंब सूर्याजी पिसाळांच्या फ़ितूरी,विश्वासघातकीपणा, स्वार्थी यामुळे शत्रुच्या ताब्यात गेलेले नाही.तसे झाले असते तर इतर मराठा मंडळातील सरदार-दरकदारांनी सूर्याजींचा खातमा तात्काळ केला असता.बादशाहाच्या छावणीचे सोन्याचे कळस कापणारे छ,राजारामांचे तरुण साथीदार आणि सेनापती संताजी घोरपडे व धनाजी जाधव यांनी सूर्याजी पिसाळांना शिल्लक ठेवले नसते.राजारामांनी त्यांची कन्या त्यांच्या पुत्रास दिली नसती. रायगडावर वेढ्याच्यावेळी त्यांचे तेथे आस्तित्व नव्हते.मोठी लढाई रायगड काबीज करताना झालेली नाही.
          शिवाजी द्वितीय (शाहू) केवळ ९ वर्षाचे होते.राणी येसूबाई आणि त्यांचे सल्लागार मराठा मंडळाने ’ शांतपणे शरण जाण्यातच शाहूंचे व सर्वांचे कल्याण आहे’ असा विचार तो बरोबरच. मराठेशाहीत अन बिकट प्रसंगाच्या युद्धात किल्ल्यांच्या आणि माघारीबाबत हाच विचार क्रुतीत आणला जात असे/जातो."शक्य तेवढा प्रतिकार अशक्य झाल्यास कमीत कमी नुकसान सोसून किल्ला स्वाधीन करणे हेच धोरण  मराठ्यांनी औरंगजेबच्या दक्षिण स्वारीचा जोर ओसरेपर्यंत स्वीकारले.’......’ तेच धोरण राणी येसूबाईंनी अमलात आणले.
            सूर्याजीने ना गडाचा दस्तुरखुद्द दरवाजा उघडला ना फ़ितुरी केली हे नि:संशय. येथुन पुढे फ़ितूर "फ़ितूरच" ,  सूर्याजी पिसाळ नव्हे.
          (पूरक माहीती : श्री नरसिंगराव पिसाळ-देशमुख,ओझर्डे; श्री राम राजेशिरके, कोल्हापूर; अनेक इतिहासग्रंथ)

सुर्याजी पिसाळ - फ़ितूर नव्हेच ! [पान २]

पक्षांच्या पंखावर शेवाळ उगवते.
             आवळसकर सांगतात की, याबाबत पुर्व इतिहासकारांचे लेखन अत्यंत भ्रामक स्वरुपाचे आहे. मराठ्यांनी शर्थ केली,पण शेवटी रायगड सुर्याजी पिसाळांच्या फ़ितूरीमुळे मोंगलांच्या हाती गेला तसे नाही.शिवसून येसूबाईंनी रायगड मजबुत आहे, हे जाणले होते.’छत्रपती राजाराम व त्यांच्या पत्नींनी गडावरून निघावे’.राजाराम सहकुटूंब प्रतापगडाकडे ५ एप्रिल १६८९ ला बाहेर पडल.वेढा आरंभी अगदीच शिथील होता.
          संपुर्ण रायगडला वेढा  देणे, तेथील आजची ही भौगोलिक स्थिती पाहाता अशक्य होते.राजारामांच्या बरोबर खंडो बल्लाळ, रामचंद्र आमात्य, प्रल्हाद निराजी, शंकराजी नारायण इ. नामवंत माणसे वेढ्यातून निसटली. एकही मोंघलांच्या हाती लागला नाही.रायगडच्या खोर्यात श्रावण, भाद्रपद व आश्विन महिन्यात पाऊस इतका कोसळतो की ’पक्षांच्या पंखावर शेवाळ उगवते’ व वारा इतका सुटतो की, त्यावेळी वेढा घालणार्या सैनिकांना नुसते उभे राहाणेदेखील अशक्य ! ’वेढा नाममात्र. गड अजिंक्यच ! मोठी मंडळी बाहेर पडल्याने शत्रु त्यांचे अंगावर जाईल, गडावरील ताण कमी होईल.
          राजारामांच्या दोन्ही भार्या रांगणा,विशाळगड, गगनगडकडे सुरक्षित गेल्या.छत्रपती राजाराम पुढे जिंजीस जाताना कोल्हापूर प्रांतातील शिवगड (दाजीपूर) गगनगड-काळम्मावाडी खोर्यातूनच गेले, त्यासमयी भागातील राणे, जाधव, खोपडे, पाटील, कुलकर्णी या मराठ्यांनीच त्यांना सर्व बाबतीत सहय्य केले आहे.
मोठी लढाई नाही, ठिसूळ पुरावा
            म्हणजे परीसरात अशी लढाई झाली नसावी. तसे पुरावे नाहीत.शर्थीची झुंज दिली असती तर शेकडो मुसलमान सैनिक मरण पावले व त्यांची एखादी कबर तरी रायगड परिसरात सापडली. एकही नाही ! मराठ्यांनी नष्ट केली म्हणावे तर त्यांचा तो स्वभाव नाही.रायगडावरच्या फ़ितूरांचा गवगवा,गाजावाजा हा कालविपर्यासाचा प्रकार आहे.सुर्याजी वाई प्रांतातील ओझर्डे देशमुख.तो दुरवरच्या रायगडावर कशाला जानार ? तो सरदार वा किल्लेदारही त्यावेळी नव्हता.
          ’फ़ितुरी’स भक्कम पुरावा नाही.इतिहासकारांचे भ्रामक,रंजित लिखानच काय तो ठिसुळ पुरावा.तो ग्राह्य धरता येणार नाही.पण गडावरुन सुटलेल्या राजारामांचे तरुण साथीदार संताजी व धनाजींनी बादशाही फ़ौजेस ’दे माय धरणी ठाय’ करुन सोडले.बादशहाच्या तंबूचे सोन्याचे कळसही कापले.पाण्यात त्यांना ही जोडगोळी दिसायची म्हणे.खरे की वाडःमयीन रंजितपणा ? मग त्यांनी फ़ितुर सूर्याजीचा खातमा का केला नाही ? तसे काही नव्हतेच.                                      
शुभविवाह
           विशेष गोष्ट अशी की, छत्रपती राजारामांची दासीपुत्री व सूर्याजी पिसाळांचा दासीपुत्र यांचा विवाह होऊन ते व्याही झाले.हा विवाह इ.स.१६८९ नंतर व १७०० चे पुर्वी दासीपुत्री अनौरस..तिचा विवाह कोनाशीही झाला तरी चालेल असे अशी समाजनिती इतिहासकालात नव्हती.उलट समसमासंयोग साधण्याची प्रव्रुत्ती असे. त्या कालात अशी संतती शिष्टसंमत होती.छत्रपती राजाराम सूर्याजीशी नाते जोडतात, याचा स्पष्ट अर्थ असा की सूर्याजी इ.स.१७०० पर्यंत तरी फ़ितुर नव्हते.रायगड समेटामुळे पडला ती तारीख ३ नोव्हेंबर १६८९ आहे.झुल्फ़िकारखानाच्या मर्दमुखीमुळे नव्हे, तर राणी येसूबाईंच्या मुत्सदीपणामुळे गड ताब्यात दिला गेला.
            फ़ितुर्यांच्या, खंजीर खुपसणार्यांच्या मुलास, स्वातंत्र्याची किंमत जाणणारा, जाणत्या शिवरायांचा मुलगा राजाराम आपली मुलगी,दासीपुत्री असो , देईलच कसा ? इति सूर्याजी पिसाळ रायगडप्रकरणी पुर्णपणे निर्दोष आहेत. माझे तसे स्पष्ट मत आहे.
इतिहासकार सरदेसाई
          इतिहासकार सरदेसाई म्हणतात, फ़ितूरीपुढे हद्द आहे... वाईच्या सूर्याजी पिसाळास देशमुखी हवी होती.तिच्या लोभाने किल्ल्याचा दरवाजा खानास सताड उघडा झाला असे एके ठिकाणी लिहितात, तर दुसरीकडे ’ आठ महीने झाले तरी इतिकादखानाचे (झुल्फ़िकारखान) पाऊल य:त्किंचितही पुढे पडेना.... कपटविद्या, हुशार सूर्याजी पिसाळास वाईच्या देशमुखीचे आमिष .... त्याने मोंघलांचा आत प्रवेश करुन दिला.राणी येसूबाईंच्या अवस्थेची त्यांना काळजी पडते ! आणि त्या खानाकडुन शपथ घेववुन मुलामंडळीसह    खानाच्या स्वाधिन होतात.असे सांगतात.कुलाबा ग्याझिटियरने तीच री ओढली आहे. पण प्रथम सूर्याजी हे वाईचे नव्हे,ओझर्ड्याचे. तसेच ते किल्लेदार नव्हते की रायगडावरही त्यांचे आस्तित्व १६८९ मध्ये नव्हते.ही दुसरी गोष्ट लक्षात घेतली तर फ़ितूर ठरविणारे सारे खोटे पडतात.
               शिवाय पुणे जहागीर व आसपासचे पहीले तीन देशमुख शिवाजीराजेंना मिळाले ते जेधे,पिसाळ व मरळ हे होत.ते प्रथमपासून विश्वासातील होते, असे सध्याचे त्यांचे वंशज ओझर्डेचे नरसिंगराव पिसाळ, देशमुख ठासून सांगतात.सूर्याजी हे मुळ पुरुष हरनाकपासून सातव्या पिढीतील.
इतिहासकार राजवाडे
         इतिहासकार राजवाडे तर सांगतात की, छत्रपती राजाराम कर्नाटकात गेले.रायगड व इतर किल्ले गनिमाने घेतले.त्यावेळी जेधे-देशमुख गनिमास सामील झाले ! पण पुढे या पत्रास राजवाडे टिप देतात की, पत्र विश्वसनीय दिसत नाही ! मोठ्या प्रमाणावर फ़ितुरी होणे  असंभव. शिवचरित्र साहित्य खंड १० मधील लेखांक २४ च्या उतार्यांन्वये राजाराम छत्रपतींनी चंदीहुन (जिंजी) नरसोजी गायकवाड रायगडावर असता इतिकादखानास गडावरील हावपालत सांगितली म्हणून त्याचा मुलगा संभाजी गायकवाड देशमुख तपे(तालुका) बिरवाडी याची देशमुखी जप्त केली.गुन्हा तसा गंभीर,पण पुढे ५०० पातशाही होन खंड घेऊन देशमुखी दुमाला केली आहे.
सरदेसाई व राजवाडे दोन्ही खरोखरच मातब्बर इतिहासकार पण त्यांच्याकडून काहीच चुकणार  नाही असे कसे म्हणायचे.
सर जदुनाथ सरकार
               बंगालचे जागतिक कीर्तीचे इतिहासतद्न्य सर जदुनाथ सरकार १९३१ च्या दरम्यान ओझार्डे येथे आले होते.त्यांनी आत्ताच्या पिसाळ मंडळींची भेट घेतली होती.त्यांच्या चर्चेत सूर्याजी पिसाळांवरचा आरोप खोटा आहे, असे प्रतिपादिले गेले.(इति नरसिंगराव पिसाळ) हिस्ट्री ओफ़ औरंगजेब भाग ४ या त्यांच्या इतिहासग्रंथात सरकारांनी आपले विचार मांडले आहेत.१६८८ डिसेंबरमध्येच आसदखानपुत्र इतिकादखान रायगडकडे निघाला होता.१९ ओक्टोंबर १६८९ मध्ये रायगड घेऊन शिवाजी,संभाजी व राजाराम यांचे परिवारास कैद केले.
               चिटणीसांची बखर व इश्वरदास यांचे संयुक्तीक म्हणने असे की, येसूबाई आणि तिचे सल्लागार यांनी बहुदा असे ठरविले असावे की,संभाजींचा म्रुत्यू व राजारामांचे  महाराष्ट्राबाहेर जाणे या गोष्टी ध्यानी घेता व महत्वाची बरीच मातब्बर माणसे महाराष्ट्राबाहेर गेली आहेत.अशावेळी रायगडावर असलेल्या सामान्य बिनलढाऊ माणसांचा प्रतिकाराचा यत्न फ़ुकट आह. शांतपणे शरण जाण्यातच शाहू व सर्वांचे कल्याण आहे.फ़ुका मरण व नुकसान यापेक्षा तह समेट योग्य.  

सूर्याजी पिसाळ - फ़ितूर नव्हेच !

मूळ लेखक : प्रिं.अमरसिंह राणे
संदर्भ : दैनिक पुढारी (बहार ) , रविवार, दि.२८ नोव्हेंबर १९९९ .
लेखन : अभिजीत पाटील 
"कूणीही फ़ितुर झालं की त्याला महाराष्ट्रात ताबडतोब ’सूर्याजी पिसाळ’ हे विशेषण जाते.जणू काही फ़ितुरांना दिला जाणारा किताबच.निवडनुकीच्या काळात ’सूर्याजी पिसाळ’ हे नाव शिवी म्हणुन मुक्तकंठाने वापरले जाते.....पण मराठेशाहीतील लढवय्या सुर्याजी पिसाळ हा योद्धा हा साहसी लढवय्या कधिही फ़ितुर झाला नव्हता.हा स्वराज्यनिष्ठ देशमुख आजतागायत फ़ितुरीची खोल जखम कपाळी घेऊन वावरत आहे..... पण आता त्याची खोल जखम भरुन निघायलाच हवी... कारण तो खरोखरच स्वराज्याचा प्रामाणिक पाईक होता."

           इतिहास हा व्यक्तिंभोवती फ़िरतो. व्यक्तिपरत्वे गुणदोष आलेच.इतिहास लेखणाची पुनर्छाननी व मुल्य तपासले जावे.त्यातील बारकावे आणि तपशील देताना शास्त्रशुद्ध, ओघवते विवेचन दिसले पाहीजे सत्याचा अपलाप न करता काल्पनिक,पुर्णत: कादंबरीमय घटना आणि व्यक्तीचित्रणे असता कामा नयेत. तटस्थ व्रुतीने आणि निष्पक्षपणे लेखण व्हावे लागते.मराठ्यांच्या इतिहासात अनेक समज,गैरसमज आणि अपसमज आढळुन येतात. इतिहासलेखण देखील व्यक्तीच करतात.छत्रपती संभाजी,सुर्याजी पिसाळ, महादजी शिंदे, मल्हारराव होळकर, दुसरा बाजीराव,आनंदीबाई, सोयराबाई शिर्के, टिळक, छ.शाहु आदी; एवढेच काय छत्रपती शिवरायांच्या बाबतही आपल्या काही लेखकांनी अवास्तव, अवाजवी गोष्टी लिहुन ठेवल्या आहेत.विशेषत: बखरकारांना गोंधळ व भडक, रंजक चित्रणे तर विचारायलाच नको.त्यातले सत्य शोधणे/ घेणे आवश्यक.

वाडःमयाची घुसखोरी 
           वास्तवाशी फ़ारकत घेतली आणि काल्पनिकतेस प्राधान्य दिले की इतिहासाची प्रासादिक कादंबरी होते.तसे पाहता ऐतिहासिक कादंबरीनेही इतिहासाशी प्रामाणिकपणा राखला पाहीजे आणि म्हणूनच श्रीमान योगी, छावा, राजेश्री आदी ग्रंथ, ऐतिहासिक कादंबरी न राहता कादंबरीमय इतिहास किंवा इतिहासमय कादंबर्या झाल्या आहेत.ग्रंथाच्या तिनीही  नामवंत लेखकांनी सत्य, ऐतिहासिक घटना अनेकवेळा पाठीमागे ठेवून स्वत:च्या प्रासादिक फ़ुलोर्यास अतिमहत्व दिले आहे.परंतु सर्वसामान्य वाचक  आणि प्रेक्षक त्या प्रसंगांना सहजपणे सत्य मानतो.त्यावरील चित्रपटात तेच दाखवले जाते.म्हणून अशा कादंबर्या, चित्रपट आणि नाटके ऐनैतिहासिक ठरतात. मग लेखनपरत्वे अनेक ऐतिहासिक व्यक्तिंच्यावर अन्याय होतो.समजापसमजास वाव मिळ्तो आणि तेच सत्य म्हणून समाजात वर्षानुवर्षे, शतकानुशतके प्रचलित होत राहते.हा एक दैवदुर्विलासच.याच द्रुष्टिकोनातुन "सुर्याजी पिसाळ" या इतिहासकालीन देशमुखावर अन्याय झालेला आहे.
सुर्याजी पिसाळ आणि राजकारण
          ’सुर्याजी पिसाळ’ म्हणजे ’फ़ितूर’ हे समीकरण जे झाले आहे, ते निखालस खोटे.इतिहासात आणि  राजकारणातले फ़ितूर व गद्दार हे शब्द अगदीच सापेक्ष असतात.आजचा फ़ितूर हा उद्याचा जीवस्चकंठस्च मित्र होऊ शकतो.मतभेदांपायी कोणी दुर गेला तर गद्दार होतो.मग गद्दाराचा विजय झाला तर त्याला तसे म्हणणारा करंटा होऊ शकतो.कुटील नीती अथवा राजनीतीचा तो अपरिहार्य  भाग असतो. नाही तरी राजकारण हे बदमाशांचे शेवटचे आश्रयस्थान असे कोणी आंग्ल  लेखकाने गमतीने खरेच लिहून ठेवले आहे.त्या उक्तिचा उपयोग देखील आपण एक ठाम सत्य म्हणुन सरसकट वापरात आणतोच.तसे पाहीले तर रामायनकालीन रावन हा एक सोन्याच्या लंकेचा चांगला राजा होता.त्याचा पराभव झाल्यावर लेखकांनी त्यास दहा तोंडे चिकटवली.तो क्रुर, दुसर्याची पत्नी पळवणारा,घाणेरडा रावण झाला.जेत्यांनी त्याच्या प्रतिमा करवून तिचे वार्षिक अग्निदहन, हेटाळणी सुरु केली.आजही चालु आहे.
रावणराजा
            क्षणभर कल्पना करा, रावणराजाचा विजय झाला असता तर राम भले एकपत्नी,एकवचनी, एकबानी खरोखर असुनही रामायनाच्या ऐवजी जे महारावणायण लिहिले गेले असते, त्यात राम-लक्ष्मण कसे दाखवले असते ? त्यांना क्रुर,गद्दार, फ़ितूर, खंजीर खुपसणारे ही विशेषणे ग्रंथकर्त्यांनी प्रासादिकरीत्या चपखलपणे बसविली असतीच नाही का ? म्हणून शब्दांचा वापर,प्रसंगानुरुप जित-जेत्यांच्या संदर्भातही तपासुन पाहिला पाहिजे. हजारो  वर्षे रामराजांची परीक्षा होऊन ते आज देवत्वाला पोहोचले आहेत ते नि:संशय. एरव्ही बिभीषणाने रावणाच्या पाठीत खंजीर खुपसलाच.रामाचा विजय झाला म्हणून तो सुटला.
आलमगीर
            आलमगीर (औरंगजेब) जितका आपणास वाईट, जिझिया कर बसविणारा,हिंदूद्वेष्टा वाटतो, तितका तो इतर सर्व बाबतीत होता का ? तो स्वधर्मपरायण होता.दिवसातून पाच वेळा नमाज पढे, तो ऐषआरामी नव्हता, चटईवर झोपे वगैरे. आमच्या एका इतिहासाच्या प्राध्यापकांनी ’आलमगीर’ या विषयावर पंचवीस वर्षापुर्वी मिरजेत जोरकस व्याख्यान देऊन औरंगजेब काही गोष्टीत कसा चांगला होता, हे पटवून द्यायचा सोदाहरण प्रयत्न केला.
        ’रायगडची जीवनकथा’ या महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्क्रुती मंडळाने १९६२ साली प्रसिद्ध केलेल्या ले.शां.वि. आवळसकरांच्या रु.४ किमतीच्या पुस्तकात त्यांनी रायगड प्रकरणी सुर्याजी पिसाळ (१९८९) आणि रा.य.नाईक (१८१८) हे दोघेही मोघलांस व इंग्रजांस फ़ितूर झाले या गोष्टी संशयातीत आहेत, दोघेही निर्दोष आहेत,असे सांगितले आहे. त्यांचे व अस्मादिकांचे तसे पक्के मत झाले आहे.
घटनाक्रम असा-
संभाजीराजे गिरफ़्तार 
राजारामांचे मंचकारोहण
१ फ़ेब्रुवारी १६८९ रोजी छ संभाजी संगमेश्वराजवळ अलकनंदा व वरुणा या  नद्यांचे संगमावरील नावडी येथे होते.मोंघल सरदार शेख निजाम तथा मुकबर्रखानने चकमकीनंतर त्यांना पकडले.संताजी घोरपडे यांचे वडील आणि शिवकालिन सरदार मालोजी घोरपडे त्यावेळी  ठार झाले.रायगडावर ९ फ़ेब्रुवारी १६८९ रोजी राजाराम अटकेत असताना ही वार्ता कळाली.त्याची सुटका होऊन राजारामांनी ’ मंचकारोहण’ केले.
          रायगडचा किल्लेदार चांगोजी काटकरने कैदेतील मानाजी मोरे इ. ना सोडले तर यसजी व सिदोजी फ़र्जंद यांचा कडेलोट केला.म्हणजे रायगडावर सुर्याजी पिसाळ त्यावेळी किल्लेदार नव्हते.राजप्रतिनीधी म्हणुन राजाराम राज्यकारभार १२ फ़ेब्रुवारी १६८९ पासुन शाहू लागले.कारण शिवाजी द्वितीय (शाहू) केवळ सात वर्षाचे होते.हा दुरदर्शीपणा येसूबाईंचा.मराठ्यांची राजधानी व नविन राजा यांना ताब्यात घेण्यास आसदखानपुत्र इतिकादखानने रायगडला २५ मार्चला वेढा घातला.