महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात ३ जानेवारी २०१७ हा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्वाच्या दिवसातील एक ठरला. छत्रपती संभाजी महाराज उद्यानात असलेला रा. ग. गडकरी यांचा पुतळा काही तरुणांनी मध्यरात्री हातोडी, कुर्हाडीचे घाव घालून फोडला आणि तो मुठा नदीत फेकून दिला. काही वेळातच हा प्रकार सर्वदुर पसरला. या घटनेचे शंभुप्रेमींनी जोरदार समर्थन केले तथा नितेश राणेंनी त्या तरुणांचा शब्द दिल्याप्रमाणे उचित सन्मान केला तर गडकरी प्रेमींनी निषेद आणि संताप व्यक्त केला. पण रा. ग. गडकरींचा पुतळा का तोडला, यामागची भावना काय होती याचा विचार करणे निषेदार्ह संताप व्यक्त करणार्यां गडकरी प्रेमींना महत्वाचे वाटले नाही. कारण शिवभक्तांनी केलेल्या कोणत्याही घटनेला ब्राह्मणद्वेषाचे लेबल लावून त्यातुम निसटणे हा आज लोकप्रिय फ़ंडा झालेला आहे.
राम गणेश गडकरीं यांची ओळख सांगायची तर, गडकरींचा जन्म गुजरात मधील नवसारी येथे २६ मे १८८५ रोजी झाला. तर २३ जानेवारी १९१९ रोजी त्यांचा म्रुत्यु झाला. वयाच्या ३४ वर्षात त्यांनी कविता, नाटक तथा विनोदी लेख यांसारखे बरेच साहित्य निर्माण केले. त्यांच्या साहित्यांनी आयुष्याच्या शेवटच्या काळात मराठी भाषा आणि साहित्यावर सत्ता गाजवली. प्रेमसंन्यास, राजसंन्यास, एकच प्याला, पुण्यप्रभाव ही त्यांची गाजलेली काही नाटके लिहिणारे गडकरी हे मराठीतील शेक्सपियर म्हणून ओळखले जात. राम गणेश गडकरींच्या पुतळ्याला मुठा नदीच्या पाण्याची चव चाखायला लावणारे त्यांचे साहित्य म्हणजे "राजसंन्यास" नाटक. आजपर्यंत इतिहासाचे बर्याच प्रमाणात विक्रुतीकरण झालेले आहे तसेच सत्य इतिहासही बाहेर आलेला आहे.महाराष्ट्राच्या इतिहासात अशा विक्रुती करताना बर्याच मर्यादा ओलांडल्या आहेत. त्यापैकी म्हणजे इतिहासाचे संशोधन करताना नाना फ़डणीस याने भोगलेल्या रखेल्यांची यादी सापडली होती ती दत्तो वामन पोतदार याने गिळून टाकली. नाना ने रखेल्या भोगल्या पण पोतदार ने तर अखंड रखेल्या गिळुन नाना फ़डणीस वरच कढी केली. महाराष्ट्रातील इतिहास विक्रुतीने सडलेला आहे त्यात गडकरींच्या "राजसंन्यास" ची भर पडली.
राजसंन्यास आणि आधुनिक धर्मप्रेमी
हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज म्हणजे विरश्रींचे शिरोमणी. वयाच्या १४ व्या वर्षी बुधभुषणम सारखा ग्रंथ लिहुन साहित्य क्षेत्रात आपले नाव अजरामर केले.शिवराज्याभिषेक विधी करणार्या गागा भट्टांनी देखील त्यांचा समयनद हा ग्रंथ संभाजी राजांना अर्पण केला आहे. या महानायकाने भारतातील साहित्यिकांना, कादंबरीकारांना, कथाकारांना, नाटककारांना वेगवेगळ्या प्रकारे खाद्य पुरविले. बुद्धीच्या अनेक ठेकेदारांनी आपापल्या पद्धतीने शंभुराजांचे चरित्र लोकांसमोर मांडले. परंतु राष्ट्ररक्षणार्थ बलिदान देणार्या पराक्रमी शिवपुत्रावर साहित्यिकांनी प्रचंड अन्याय केलेला आहे. राम गणेश गडकरींनी "राजसंन्यास" नाटकाच्या माध्यमातून सर्वांवर कढी केलेली आहे. कारण राजसंन्यास नाट्य छ.संभाजी राजांचे बदफ़ैली, स्त्रीलंपट चरित्र रंगवून प्रचंड अन्याय करणारे आहे. संभाजी राजांच्या बदनामीला सर्वप्रथम कारणीभूत होती ती मल्हार रामराव चिटणीसची बखर. स्वराज्यद्रोहा बद्दल संभाजी राजांनी बाळाजी आवजी चिटणीसला देहांत शासन दिले होते. बाळाजी हा मल्हार रामराव चिटणीसचा खापरपणजोबा होता. आपल्या खापर पणजोबाला शंभूराजांनी हत्तीच्या पायाखाली दिले होते, त्याचाच सूड घेण्यासाठी तब्बल १२२ वर्षांनी मल्हार रामरावाने बखर लिहून त्यांना बदनाम करण्याचे कारस्थान केले. परंतू कै. वा. सी. बेंद्रे यांनी चाळीस वर्षे कष्ट घेऊन शंभुचरित्राचा खरा इतिहास उभा केला आणि जाज्वल्य इतिहासातून अनेक लेखकांना दिव्य द्रुष्टी दिली. त्यामध्ये शिवाजी सावंत, डॉ.जयसिंगराव पवार, विश्वास पाटील, डॉ.कमल गोखले, विजय देशमुख यांसारख्या विद्वानांनी खरे आणि भव्य दिव्य असे शंभुराजांचे चरित्र जनमानसांसमोर आणले. पण दुर्दैवाने संभाजी राजांच्या ज्वाज्वल कर्त्रुत्वापेक्षा त्यांच्या इतिहासाची विक्रुत मांडणी करणार्यांना साहित्य क्षेत्रामध्ये आढळ स्थान दिले गेले. त्यावर कढी म्हणजे संभाजी राजांच्या चरित्रावर प्रचंड अन्याय करणार्या गडकरींचा पुतळा संभाजी राजांच्या नावाने असणार्या उद्यानात उभारणे हीच खरी महाराष्ट्राची शोकांतिका आहे.
संभाजी महाराज उद्यानातील गडकरींचा पुतळा काढल्यानंतर खरी कसोटी लागली ती शंभुच्या रक्तगटाची तरून पिढी निर्माण करायला निघालेल्या आणि आयुष्य ब्राह्मणप्रतिपालनाला वाहुन घेतलेल्या हिंदुत्ववाद्यांची. आता काय करावे ? या प्रश्नाने गोंधळ घातला. एकिकडे शंभुराजांविषयी निष्ठा दाखायची होती तर दुसरीकडे गडकरींचा निषेद करायचा होता अशा धर्मसंकटात सापडलेल्या हिंदुत्ववाद्यांनी या सगळ्या कृत्याला नेहमीप्रमाणे ब्राह्मणद्वेषाची लेबल लावून हात झटकून घेतले. हिंदुत्वावाद्यांचे शिव-शंभुंवरचे खोटे प्रेम वेळोवेळी उघडे पडले आहे. संभाजी ब्रिगेड ने केलेली प्रत्येक गॊष्ट ब्राह्मणद्वेषाचा शिक्का मारून झाकुन ठेवायची ही हिंदुत्ववाद्यांची जुनी खोड आहे, म्हणुनच की काय जेम्स लेन प्रकरणावेळी संभाजी ब्रिगेडने जिजाऊ मातांच्या अपमानाचा तिव्र संताप आणि निषेद व्यक्त केल्यावर हिंदुत्ववाद्यांनी मात्र शांत राहाणंच पसंत केलं होतं. तोच स्थायी स्वभाव त्यावेळीही त्यांनी अबाधित ठेवला आहे. हिंदुत्ववाद्यांना जर संभाजी राजेंविषयी आदर आणि प्रेम असता तर गडकरींच्या लिखानाचा विचार केला असता आणि काही कारणास्तव निषेद करायला जमत नसले तरी किमान खंत तरी व्यक्त असती पण या दोन्ही ठिकाणी ते असमर्थ ठरलेत. बहुजनवाद्यांची काय वेगळी स्थिती नाही. संभाजी राजेंना शाक्तवीर ठरवनार्या बहुजनवाद्यांनी पण या प्रकराणाकडे केवळ संभाजी मराठा आणि गडकरी ब्राह्मण त्यामुळे ते दोघे बघून घेतील असा सोईस्कर विचार करून दुर्लक्ष करणंच पसंत केलेलं दिसतं. त्यामुळे सच्चा शंभुभक्तांच्या जबाबदाऱ्या आहेत.
महात्मा फ़ुले, केळुस्करादी लेखक आणि राजसंन्यास
गडकरींचा पुतळा काढून फ़ेकल्यानंतर त्यांच्या साहित्यविषयी चर्चेला उधान आलं. बर्याच विद्वानांनी मते मांडली. संभाजी महाराजांविषयीचे हे चित्र दुर्दैवाने इतिहासकारांमध्येच बराच काळ प्रचलित होते. तेंव्हाचे सर्वच इतिहासकार या गैरसमजाला बळी पडलेले आहेत. केवळ गडकरीच नव्हे. त्यामुळे गडकरींनी लिहिलेले नाटक हे त्यावेळच्या संदर्भ आणि पुराव्यावर आधारीत आहे असे म्हणून या विद्वानांनी पद्धतशीरपणे गडकरींना पाठिशी घातले आहे. परंतु हे विद्वान हे विसरले आहेत की गडकरींनी राजसंन्यास मध्ये जो विक्रुतीचा उन्माद मांडलाय तो याआधी कोनत्याही लेखकाने किंवा इतिहासकाराने मांडलेला नाही. इतर लेखकांनी संभाजीराजेंच्या विक्रुत इतिहासातील संदर्भ आहे तसे वापरले आहेत पण गडकरींनी मात्र त्या विक्रुतीमध्ये स्वत:च्या विकृतीची घुसळण केलेली स्पष्ट जाणवते. त्यामुळे इतर इतिहासकार चुकिच्या इतिहासाला बळी पडले असे म्हणता येईल पण गडकरींबद्दल तसं समजता येणार नाही.
महाराष्ट्रामध्ये संभाजी ब्रिगेड जे काही करेल त्याला ब्राह्मनद्वेषाची पार्श्वभुमी असते तसेच अफ़जल आणि औरंगजेबाची कबर उध्वस्त करणे हा इस्लामद्वेष नाही पण कोंडदेव आणि गडकरींचा पुतळा काढणे म्हणजे ब्राह्मणद्व्वेष आहे असा एक लाडका सिद्धांत हिंदुत्ववाद्यांचा असतो. पण संभाजी ब्रिगेडला विरोध करण्याच्या नादात आपण काय करतोय याचही भान त्यांना राहात नाही. याही प्रकरणात संभाजी ब्रिगेडला विरोध करण्याच्या भरात त्यांनी गडकरींच्या लेखनाचे समर्थन केले. मग खरच जर गडकरींच्या वेळी संभाजी राजेंचा तोच इतिहास प्रचलित होता तर त्या इतिहासामध्ये संभाजींची बदनामी आहे आणि तो आपण ऐतिहासिक आधार म्हणून घेऊ नये एवढी पण अक्कल गडकरींना असू नये हे मात्र न पटण्यासारखे आहे. एक वेळ मान्य केले की संभाजींचा इतिहास त्यावेळी तोच होता त्याला गडकरी बळी पडले पण शिवरायांचा इतिहास तर सत्य होताच ना तरीही शिवरायांना दुय्यम स्थान देऊन स्वराज्ज्याचे श्रेय रामदासांच्या घस्यात घालण्यामागचा गडकरींचा काय हेतु होता ? किमान याचा तरी विचार हिंदुत्ववाद्यांनी करावा. हिंदुत्ववादी मंडळीं दावा करतात की ते नाटक प्रकाशित झालं नाही त्यामुळे जे नाटक कोणीच वाचलेले नव्हते ते आता संर्वांना माहीत झाले. हिंदुत्ववाद्यांची एक सर्वात मोठी अडचण आहे ती म्हणजे त्यांना जे माहीत नाही ते आस्तित्वातच नाही असे ते ग्रुहित धरतात त्यामुळे "राजसंन्यास" आम्हाला माहीत नाही म्हणजे कोणालाच माहीत नाही असे त्यांनी सहज ठरवूनही ठाकले. पण त्यांना माहीत असणे गरजेचे आहे की, 'महाराष्ट्र शासनाने' 'राम गणेश गडकरी समग्र वाड्मय' प्रकाशित केलेले आहे.त्याचे संपादन प्र. के. अत्रे यांनी केलेले आहे. त्यामध्ये राजसंन्यास नाटकही प्रकाशित केले आहे. त्यामुळे हे नाटक कोणालाच माहीत नाही या भ्रमातून हिंदुत्ववाद्यांनी स्वत:ची सुटका करावी.
राम गणेश गडकरींच्या बचावा साठी हिंदुत्ववाद्यांची एक मांडणी असते की, महात्मा फ़ुलेंनी शिवरायांना अक्षरशुन्य म्हंटले. तसेच क्रुष्णा अर्जुन केळूस्कर यांनीही संभाजी राजें आणि शिवरायांविषयी हेच मत मांडलेले आहे मग यांचं काय करायचं ?. महात्मा फ़ुलेंनी शिवरायांवर जे लिखाण केले ते त्या काळात जे पुरावे उपलब्ध होते त्यानुसार. शिवरायांना ते कमी लेखत नव्हते. किंबहुना शिवरायांचे श्रेष्ठ्त्व त्यांच्या साहित्यातून दिसून येतेच. शिवराय हे निरक्षर नव्हते. आज याचे पुरावे उपलब्ध आहेत. त्यामुळे महात्मा फ़ुलेंना कोणताही दोष लागत नाही. आज महात्मा फ़ुले हयात नाहीत. ते हयात असताना जर असे पुरावे उपलब्ध झाले असते तर त्यांनी आपल्या भुमिकेत निश्चित बदल केला असता.किंबहुना त्यांना या गोष्टींचा खुप आनंदच झाला असता. महात्मा फ़ुले हे खरे सत्यशोधक छ्त्रपती शिवाजी महाराजांचे सच्चे अनुयायी होते. परंतु महात्मा फ़ुलेंच्या शिवरायांविषयीच्या बोलण्याची तुलना गडकरींच्या राजसंन्यास शी करणे म्हणजे कानाखाली चपटी मारलेल्याची तुलना आयसीस च्या आतंकवाद्याशी करण्यासारखे आहे. शिवरायांना दुय्यम ठरवून संभाजी राजेंना चरित्रहीन ठरवण्यापेक्षा केवळ अक्षरशुन्य म्हणने हा खुप मोठा अपमान हिंदुत्ववाद्यांना वाटतो यातून शिवरायांविषयीचा आदर नाही तर महात्मा फ़ुलेंविषयीचा द्वेषच स्पष्ट जाणवतो. केळुस्कर गुरुजींबद्दल बोलायचे झाले तर त्यांनीच आपल्या छत्रपती शिवाजी महाराज या पहिल्या शिवचरित्रामध्ये प्रस्थावनेत नमुद असे केले आहे कि, "लेखकाला ज्या गोष्टी आज सत्य वाटल्या व ज्या क्रमाने त्या घडल्या अशी त्याची खात्री झाली, त्या गोष्टी त्या क्रमाने त्याने प्रस्तुत ग्रंथात नमूद केल्या आहेत. अनेक पंडितांचे इतिहाससंशोधनाचे काम सांप्रत चालू आहे. त्यांचे शोध जगापुढे आल्यावर प्रस्तुत चरित्रलेखात दुरुस्ती करावी लागेल हे उघड आहे." त्यामुळे आज आपण त्यांच्या ग्रंथातील अनैतिहासिक मुद्दे बाजुला काढू शकतो पण गडकरींच्या राजसंन्यास मधील असे मुद्दे बाजुला काढण्याची हिम्मत गडकरीप्रेमी हिंदुत्ववाद्यांमध्ये आहे काय ?. त्यामुळे गडकरींच्या राजसंन्यास मधील विक्रुतीची तुलना इतर इतिहासकारांच्या लेखणाशी करणे ही सुद्धा एक विक्रुतीच आहे असं म्हणावं लागेल.
शंभुप्रेमींची जबाबदारी
संभाजीराजे म्हणजे शिवरायांच्या वंदणीय व्यक्तिमत्वातून हे प्रकटलेले शंभुतेज. आपल्या अफ़ाट पराक्रमाने शंभुराजांनी हिंदवी स्वराज्याच्या सीमारेषा वर्धिष्णू करीत या तेजाची दाहकता सिद्ध केली. शिवरायांनंतर हिंदवी स्वराज्यावर लाखोंचा फ़ौजफ़ाटा घेऊन चालून आलेल्या औरंगजेबाला नामोहरण करणे ही सामान्य बाब नव्हती. नऊ वर्षाच्या अखंड संघर्षात एकही लढाई हरले नाहीत किंवा एकही तह केला नाही.मोगली सल्तनत, पोर्तुगिज, इंग्रज या बलाढ्य शत्रुबरोबरच स्वकियांविरोधात हिंदवी स्वराज्याच्या संवर्धनासाठी आणि संरक्षणासाठी केलेली एकाकी झुंज ही निश्चितच संभाजीराजांच्या महानतेची आणि पराक्रमाची साक्ष देते.हे सगळं त्यांनी कोणासाठी केले ? स्वराज्यासाठी, तुमच्या - आमच्यासाठी. वयाच्या अवघ्या ३२ व्या वर्षीच संभाजीराजेंनी स्वराज्यकार्यी हौतात्म्य पत्करले. अटकेत असताना त्यांनी दिर्घकाळ यमयातना सहन केल्या, एक - एक अवयव तोडला गेला, अंगाची साल सोलून काढण्यात आली, डोळे काढून जीभ कापली गेली, पायापासून ते मस्तकापर्यंत अवघ्या शरीराची खांडोळी केली गेली, आणि हे सगळं सहन केलं ते स्वराज्यासाठी, आपल्या साठी. एवढ्या मरणयातना सहन करूनही स्वाभिमान आणि राष्ट्रनिष्ठा अभेदच राखुन बलिदानाची, त्यागाची एक परंपरा या राष्ट्राला समर्पित केली जिला देशातच काय पण जगाच्या इतिहासात तोड नाही. पण मालती तेंडुलकर "मराठ्यांचा राजा" या नाटकात म्हणतात, "संभाजी म्हणजे स्वाभिमानाची व शौर्याची जळती मशाल, परंतु दुर्दैवाने ते महाराष्ट्रात जन्मले ! त्यांच्या अतुल व अमोघ क्रुतीला आमच्या कारस्थानी इतिहासकारांनी हिडिस रुप दिले व मानभावी इतिहासकारांनी त्याला माना डोलवल्या". याचप्रमाणे संभाजी राजांच्या इतिहासाचे विक्रुतीकरण पुन्हा होऊ शकते.आपल्या समाजाची मानसिकता ही नाटक, कादंबरी, चित्रपट या माध्यमातून मांडला जाणारा इतिहास हाच खरा असे माननारी आहे. कारण ग्रंथापेक्षा या नाटक आणि चित्रपट माध्यमांचा प्रभाव खुप असतो. हेच काही वर्षात हे नाटक प्रकाशित होऊन त्या विक्रुतीखाली संभाजी राजांचा खरा इतिहास दडपला जाऊ शकतो. त्यामुळे संभाजी राजांचं खरे चरित्र आणि इतिहास सर्वांसमोर आणने हे महत्वाचे कर्तव्य आहे. संभाजी राजांचे मद्यान्हीच्या तळपत्या सुर्यप्रकाशाइतके शुद्ध चरित्र सर्वांसमोर आणने हे शंभुप्रेमींचे आद्य कर्तव्य आहे, हिच सर्वात मोठी जबाबदारी आहे.