23 August 2020

जागतिक किर्तीच्या लेखिका : महाराणी चिमनाबाई

          गुजरातमधील बडोदा या मराठी संस्थानिक महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या पत्नी महाराणी चिमनाबाई यांचा जन्म इंदोर जवळील देवास या ठिकाणी १३ नोव्हेंबर १८७१ साली सनातनी कुटुंबात झाला. चिमनाबाईंना लग्नाअगोदर लिहिता वाचता येत नव्हते. विवाहानंतरच्या काळात चिमनाबाईंची जडणघडण करण्यात स्वतः महाराजांचा फार मोठा वाटा होता. त्या आधुनिक जीवन प्रणालीचा स्वीकार करण्यास सुरुवातीला तयार नव्हत्या पण, युरोपियन देशाचे अनेक दौरे व पाश्चात्य राजघराण्यातील जोडप्यांशी झालेले आदान-प्रदान यामुळे त्यांना स्त्रीशिक्षणाचे महत्व पटले व त्यातूनच सयाजीरावांच्या निर्भय आणि कर्तबगार पत्नीची नवी प्रतिमा निर्माण झाली. सामाजिक सुधारणा, स्त्रियांची उन्नती आणि राष्ट्रवाद याबद्दलच्या आपल्या पतीच्या आंतरिक तळमळीला त्यांनी बरोबरीने साथ दिली. महाराजांच्या सतत मिळत गेलेल्या प्रेरणेने महाराणी चिमनाबाईंच्या रूपाने भारतातील स्त्रियांना एक सक्षम नेतृत्व आणि विसाव्या शतकातील स्त्रियांच्या कल्याणकारी योजनेला एक खंबीर पुरस्कर्ता मिळाला.
            महाराणी चिमनाबाईंनी महाराजांच्या समवेत भारतात आणि परदेशात चौफेर प्रवास केला या प्रवासाने त्यांचा एकंदर दृष्टिकोन अधिक विशाल झाला. त्यांना संगीत, कला, साहित्य, राजकारण, विविध खेळ यासारख्या अनेक विषयात रस उत्पन्न झाला. वेळोवेळी केलेल्या युरोप अमेरिकेसारख्या पाश्चात्य आणि जपानसारख्या पौरात्य देशाच्या प्रवासात तेथील वास्तव्यात तीव्र धारणक्षमता असलेल्या  मनःशक्तीमुळे त्यांना अनेक गोष्टी शिकता आल्या. आपल्या परदेश प्रवासाच्या अनुभवातून स्त्रियांचे हक्क, समानता आत्मनिर्भरता याबाबत दूरदृष्टीने त्यांना जे जाणता आले त्याला समूर्तता आणण्यासाठी त्यांनी राज्यात अनेकविध प्रयत्न केले. पाश्चिमात्य संस्थानातील कोणकोणते विचार एतद्देशीय पर्यावरणाला हितकारक ठरू शकतील याचे चांगले भान त्यांना होते.
          ३ ऑगस्ट १८९२ साली महाराणी चिमनाबाई यांना “इंपीरियल ऑर्डर ऑफ द क्राऊन ऑफ इंडिया” या क्वीन एक्सप्रेस यांनी प्रदान केलेल्या किताबाने सन्मानित करण्यात आले. स्त्रियांची सर्वोतपरी उन्नती व त्यांचे कल्याण हा त्यांच्या हृदयातील गाभ्याचा विषय होता. स्त्रियांबद्दलच्या या त्यांच्या कळकळीने त्यांना ग्रंथ लेखनाची प्रेरणा दिली. “द पोझिशन ऑफ वुमन इन  इंडियन लाइफ” हे त्यांचे स्त्रियांच्या स्थितीबद्दलचे पुस्तक १९११ साली लंडन येथून प्रकाशित झाले. हे पुस्तक त्यांनी भारतीय स्त्रियांना अर्पण केले आहे. कर्तुत्वान राण्या भरपूर होऊन गेल्या. राण्या म्हटलं की, आपल्याला लढाई करणारी, तलवार चालवणारी झाशीची राणी, ताराबाई आठवतात पण लेखणीत पारंगत असणारी पहिली राणी म्हणून चिमनाबाईंकडे पहावे लागेल. ‘पोझिशन ऑफ वुमन इंन इंडियन लाइफ’ या पुस्तकाचे लेखन त्यांनी श्री. एस. एम. मित्रा या विद्वान व्यक्तीच्या सहकार्याने केले आहे.
           या ग्रंथात स्त्रियांसंदर्भात व्यवसायाचे विश्लेषण करताना त्यांनी त्यातील उणिवा, क्षमता आणि शक्यता यासंबंधी बारकाईने विचार मांडले आहेत. तर पडदा पद्धतीच्या सनातनी काळात स्त्रियांनी कृषी, कला, कारागीर, हॉटेल, लोकोपयोगी सेवा, आर्थिक व्यवसायाशी परिचित व्हावे व त्यांनी ते स्वीकारावे अशी भूमिका मांडली आहे. तर जगातील स्त्रियांच्या स्थितीशी भारतीय स्त्रियांच्या स्थितीची तुलना करून लिहलेला हा आजखेरचा एकमेव ग्रंथ आहे. या पुस्तकातून प्रकट होणारी त्यांची क्रांतीदर्शी दृष्टी आश्चर्यकारकरित्या आजच्या वास्तवातही संदर्भयुक्त ठरते.
         महाराणींच्या स्वच्छ, स्पष्ट आणि मनमोकळ्या अशा वैचारिकतेमुळे १९२७ ला पुण्यात भरलेल्या पहिल्या भारतीय महिला परिषदेच्या अध्यक्षपदाचे स्थान त्यांना सन्मानपूर्वक देण्यात आले. ज्या काळात  स्त्रियांबद्दलच्या पारंपारिक धारणा आणि कल्पना समाजात दृढमूल  झाल्या होत्या त्या काळात महाराणींनी अत्यंत आश्चर्यकारकरित्या मुलींसाठी प्राथमिक शिक्षणाचा जोरदार पुरस्कार केला आणि बालविवाह रूढ नाहीशी करावी याची जोराने मागणी केली. या परिषदेमध्ये मिसेस कमलादेवी चट्टोपाध्याय यांनी महाराणी चिमनाबाईंच्या प्रगत दृष्टिकोनाची प्रशंसा करताना म्हटले की, पहिल्या अखिल भारतीय महिला परिषदेच्या अध्यक्षा बडोद्याच्या महाराणी चिमनाबाई गायकवाड या होत्या. त्यांनी आणि महाराजांनी त्यांच्या राज्यात स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला व त्यातही स्त्रियांचे लग्नाचे वय वाढवून यासंबंधी कायदेशीर सुधारणा सर्वात लवकर व वेगाने केल्या. या त्यांच्या कार्यामुळे त्यांची अध्यक्षपदासाठी निवड करण्यात आली. त्यांचे पती महाराजा सयाजीराव हे सुधारणावादी राज्यकर्ते होते आणि महाराणी त्यांना सर्वतोपरी योग्य अशा साथीदार होत्या. पडदा पद्धतीचा त्याग करणाऱ्या राजघराण्यातील पहिल्या महिला होत्या. स्वयंप्रेरणेने जगणाऱ्या या महाराजांचे व्यक्तिमत्त्व अतिशय प्रभावशाली होते.
         आपल्या पतीसमवेत राज्यात अनेक कल्याणकारी योजनेत सहभागी होत होत्या. स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी स्वतःहून मोठ्या रकमेचा विश्वस्त निधी निर्माण केला व त्यातून बुद्धिमान, सर्जनशील विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती देण्याची तरतूद केली. त्या सतत विकसित होणाऱ्या नवनव्या क्षितिजांच्या प्रेरणादायी वातावरणात राहत होत्या. महाराजांच्या परदेशवारीत त्या सतत त्यांच्यासमवेत प्रवास करीत असत त्यामुळे पाश्चात्य जीवनातील गुणवत्तापूर्ण चांगला भाग त्यांनी पाहिला होता. महाराणी चिमनाबाई याही महाराजांप्रमाणे जाज्वल देशभक्त होत्या. आपली राजकीय मते व विचार त्या निर्भीडपणे व स्पष्टपणे व्यक्त करीत होत्या.
          आधुनिक काळातील स्त्रीपुरुष तुलना यासारखा अत्यंत स्फोटक निबंध १८८३ ला लिहिणाऱ्या ताराबाई शिंदे प्रमाणेच महाराणी चिमनाबाई या स्त्रियांच्या हक्कासाठी अत्यंत कृतीशील विचार करत होत्या, परंतु दुर्दैवाने स्त्री-मुक्ती चळवळीच्या इतिहासाने, अभ्यासकांनी आणि महाराष्ट्राने त्यांची आजअखेर दखल घेतलेली नाही हे आमचं दुर्दैव....! स्त्रियांच्या पाठीराखे आधारस्तंभ आणि प्रेरणास्त्रोत असणाऱ्या हर हायनेस महाराणी चिमनाबाई गायकवाड २३ ऑगस्ट १९६३ साली काळाच्या पडद्याआड निघून गेल्या. 
अशा या राणीला स्मृती दिनानिमित्त त्रिवार अभिवादन !

11 प्रतिक्रिया :

 1. इतके दिवस कुठे पत्ता आहे साहेब ? चक्क ३ वर्षांनी आलात. नोटीफ़िकेशन दिसले आनंद झाला म्हंटले काहीतरी नवीन आले आहे वाचण्यासाठी. आता पुढे चालू ठेवा. खुपच छान लेख आहे.

  ReplyDelete
  Replies
  1. एका अशाच मोठ्या वेब पोर्टल चे काम सुरु आहे. म्हणुन इथे जास्त काही लिहित नाही पण फ़ेसबुक वरील सुरक्षाचा हा लेख आवडला म्हणुन म्हंटले पोस्ट करू. कारण अशा प्रेरणादायी व्यक्ती समाजासमोर आल्या पाहिजेत हेच माझे ध्येय्य राहिले आहे. पोर्टल चे काम पुर्ण झाले की त्यावरतीच माझे अधिकृत लेख असतील. तंत्रज्ञान, आरोग्यविषयक, इतिहास, पाककला, मनोरंजन, चरीत्रे, कथानक, अध्यात्मिक इत्यादी विषयाला स्पर्ष करणारे असतील जे मराठी, हिंदी आणि इंग्रजी इ. भाषेमधुन असतील. तेंव्हा संपर्कात रहा.

   Delete
  2. वाट पाहतोय आम्ही पाटील साहेब. लवकरात लवकर काम पुर्ण करा आणि पुन्हा एकदा धमाकेदार लिहायला सुरु करा. सध्या राजकीय आणि धार्मिक विचारांचे प्राबल्य वाढताना आपल्यासारखे निरपेक्ष लिहिणारे कमी आहेत. तेंव्हा लेखन लवकर सुरु करा.
   जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र

   Delete
 2. वा सुरेख लेख सुरक्षा ताई.
  हा लेख प्रसारित केल्याबद्दल धन्यवाद. खुप महत्वपुर्ण माहीती मिळाली. आपल्या खुप स्त्रीया इतिहासात होऊन गेल्या ज्यांची दखल आपण घेतली नाही. स्त्रीयांच्या मनातील दुर्बलतेचा न्युनगंड नष्ट करण्यासाठी अशा व्यक्तींचा अभ्यास होणे आवश्य़क आहे.
  धन्यवाद.

  ReplyDelete
  Replies
  1. नारायण ज्याच्या हाती लेखणी तोच इतिहासाचा धनी या प्रमाणे लेखन झाले खरे. पण आपण तरी कुठे आपल्या व्यक्तींना जाणून घेण्याचा प्रयत्न केला ? इतिहासाच्या बाबतीत शिवरायांच्या पलिकडे आपले विचार जात नाहीत आणि समाजसुधारकांच्या लिस्ट मध्ये फ़ुले-शाहू-आंबेडकर यांच्या नावाव्यतिरिक्त नावे आपल्याला माहीती नसतात त्यामुळे अशा विभुती उपेक्षित राहतात. असेच एक मराठा समाजाचे महानायक गंगारामभाऊ म्हस्के ज्यांनी महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या मदतीने १८८४ मध्ये "डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशन" सुरु करून मराठ्यांच्या शिक्षणाला चालना दिली. त्यांच्या विषयी पण लिहित आहे.

   Delete
 3. अप्रतिम लेख. धन्यवाद लेख पाठवल्यावद्दल अभि. मी आजपर्यंत मांसाहेब जिजाऊ आणि महाराणी ताराराणी यांचा इतिहास माहीती होता. पण एवढं कर्तृत्व असताना राणी चिमनाबाई दुर्लक्षित राहिल्या. वाचून आनंद झाला, अजुन काही माहीती वाचायचा नक्कीच प्रयत्न करेन मी.
  थॅंक्स.

  ReplyDelete
  Replies
  1. ऐतिहासिक लेख तुला वाचायला आवडतात मला माहीती आहे. म्हणुन म्हंटलं हा लेख पाठवून देऊ आवडेल तुला.

   Delete
 4. मस्त लेख जमलाय. आपल्या बहुजन महापुरुषांचा इतिहास आपण समाजासमोर आणायला मागे पडल्याचे वेळॊवेळी आपल्याला जाणवते. आपले इतिहासकार सुद्धा ब्राह्मणी इतिहासाला बळी पडले त्यात आपण मराठी माणसं तर खुपच मागास याबाबतीत म्हणुन इतकी वर्ष औरंगजेबाला झुंजवत ठेवून त्याची कबर इथेच खोदणारी ताराराणी आपल्या किती जनांना माहीती आहे ? पण झाशीच्या राणी विषयी विचारा लगेच मागच्या पुढच्या पिढ्यांची माहीती सांगतील आपली लोकं. आपल्या लोकांचा इतिहास आता समोर आणने आपली जबाबदारी आहे.
  धन्यवाद सुरक्षा असेच लिहित रहा.

  ReplyDelete
 5. महाराणी चिमनाबाईंचे जीवन खरंच प्रेरणादायी राहिलेले आहे. चिमनाबाई एक पुरोगामी विचारंच्या महिला होत्या. त्यांनी मुलींचे शिक्षण, पदडा परंपरा रद्द करणे, बाल विवाह बंदी ई. कार्य केली. त्या १९२७ च्या पहिल्या अखिल भारतीय महिला परिषदेच्या अध्यक्ष होत्या. अशा व्यक्तीचे जीवनचरित्र सर्वांसमोर आले पाहिजे.
  मस्त लेख आहे सुरक्षा. यासाठी संदर्भ कोणत्या पुस्तकांचा घेतला आहे किंवा अभ्यास केला आहे आम्हाला कळाले तर बरं होईल अजुन जास्त माहीती मिळवण्यासाठी.

  ReplyDelete
 6. Many scholar women were born in the history of India. Some of them came before the people but some did not get justice. This is the misfortune of our country. In a patriarchal system women who set an example of female empowerment were really great, their character should be respected.
  Thanks for writing a cool article. Keep writing

  ReplyDelete
 7. ग्रेट व्यक्तिमत्व. अशा व्यक्ती जन्मलेल्या भुमीत आपला जन्म झाला हे परमभाग्यच म्हणायचे. अशा उज्वल भविष्यासाठी अशा व्यक्तींचा वारसा पुढे घेऊन चालणे काळाजी गरज आहे.

  ReplyDelete

प्रतिक्रिया देताना सभ्य भाषेचा वापर करावा तसेच मराठी भाषेत लिहिण्याचा जास्तित जास्त प्रयत्न करावा. प्रतिक्रिया देताना कोणत्याही जात, धर्म, पंथ, वर्ण तथा कोणत्याही समुहाच्या श्रद्धास्थानांविषयी बोलताना सभ्यता बाळगणे आवश्यक.